केक खाताना दादाचं सेंटी होण उगाच मनात घर करून बसलं होत. बाप आपल्या मुलीचा किती विचार करत असतो ते जाणवलं.
थोड्यावेळाने मँच होती त्या दृष्टीने मानसिक तयारी करण गरजेचं होत पण काही केल्या पुढचा गियर पडत नव्हता. मँचसाठी लागणारा अर्लटनेस, अँग्रेशन मला माझ्यात कुठेच दिसत नव्हत. ह्या टुर्नामेण्टला मी कॅप्टन होते. त्यामुळे माझा मेंदू घोडयापुढे धावण अपेक्षित होत पण इथे तर मन आणि मेंदू कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नव्हते. "देवा… आता काय करू? " मी बाथरूमला जाऊन आले. उगाच तोंडावर भरपूर पाणी मारलं. ग्राउंडमध्ये जाऊन अंदाज घेतला तर तिसरी मँच आत्ता सुरु झाली होती. चांगला हाडं मोडे पर्यंत आळस दिला आणि रेश्माला बरोबर घेऊन स्लो जॉगिंग करत २ राउंड मारले त्यामुळे जरा हुशारी आली.
मग आम्ही सगळ्याजणी गोल करून बसलो आणि आजची पहिली ७ ची कव्हर सांगितली - मी, रेश्मा, तुप्या , जागू, रूपा, दीदी, दीप्ती. पम्मीला रेडी रहायला सांगितलं. वसईच्या मुलींपुढे आमच्या मुलींची चण जरा लहान होती. त्यामुळे ताकदी बरोबर वेगाचा जास्त उपयोग करायचा असं ठरवलं. कव्हर लावताना, डँश वैगरे देताना आपल्या लहान चणीचा उपयोग करत खालच्या बाजूने डँश द्यायचा जेणेकरून त्यांना ते वाचवण्यासाठी अजून वाकून खेळावं लागेल आणि त्यामुळे त्याचं स्टेपिंगचं गणित चुकेल. असं बरच काही ठरवत चर्चा करत आम्ही वाँर्मअपला उठलो. तेवढ्यात दीप्तीने मला बाजूला नेलं.
" रेवा... मला वाटत कि तुप्या ऐवजी आपण संजूला इनटीम खेळवूया... काय म्हणतेस?"
" का ? "
" अग.. तुप्या फक्त टर्न लावेल संजू कुठेही फिरते.. कॉर्नर, टर्न, हाताखाली... "
" दीप्ती... बाकीच्या टीम पण मँच बघत बसणार आहेत... सगळे पत्ते आत्ता नाही ओपन करायचे... गटातली मँच आहे... आपण काढूया... ह्या मँचला तरी मला आपल्या ७ व्यतिरिक्त कोणालाही उतरवायचं नाहीये... "
" मग पम्मीला रेडी राहायला सांगितलस?"
" ऎ... घोडे… ते तुझ्यासाठी... "
" मला काही होणार नाही... बघच तू.. तिला उतरवायचं म्हणून तू उतरव... माझ्यासाठी नको.. मी फिट आहे"
" हा माहितेय... चल तू वैशालीला आज ब्लॉक लावलास तर मानलं.."
" हा चालेल.. बेट?"
" बेट .. मँगोंला.. "
" हा.. हा.. चालेल .. सगळ्यांना? "
" चूप रे माझं दिवाळ काढते का काय ? ४ बाटल्या देईन... आपण शेअर करू... पण... दीप्ती सांभाळून… आपल्याला खांदा पण हवा आहे "
" डोंट वरी यार.. हम है तो क्या गम है"
हसत आम्ही सगळ्यामध्ये सामील झालो आणि वाँर्मअपला सुरुवात केली. चौथ्या मँचचा काँल दिला तशी वसईची टीम पण वाँर्मअपला आली. हळूच एकमेकांच्या टीमकडे बघत टीम मध्ये कोण कोण आहे त्यांचा गेम कसा आहे आहे ह्याचा अंदाज घेत वाँर्मअप सुरु होता. त्यांचा फुल सेट होता. चौथ्या मँचच्या हाफ टाइमची शिटी ऐकली आणि आमच्यासाठी असलेला दुसरा पुकारही ऐकला. वाँर्मअप झाल्यावर क्रेप बांधताना दादा आले. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक दिले आणि शांत डोक्याने खेळण्याचा सल्ला दिला. धनश्रीला आज स्कोअर लिहायला आणि मीनाला वेळ लावायला सांगितलं. परत एकदा चर्चेचा राउंड झाला. सगळे गोल करून ग्राउंडच्या पाया पडलो. तेवढ्यात आमच्या आणि वसईच्या संघाच्या नावाने पुकारा झाला.
डाव्या खांद्याला किट बँग आणि डाव्या हातात शूज असे आम्ही उंची प्रमाणे रांगेत निघालो. ग्राउंडमध्ये शिरताना परत एकदा ग्राउंडच्या पाया पडलो आणि एका बाजूला ओळीने शूज आणि त्यावर आपापली किट बँग ठेवली आणि परत एकदा रांगेत ग्राउंडला फेरी मारायला उभे राहिलो. ह्यावेळी मात्र मी सगळ्यात शेवटी उभी राहिले. सगळ्यात पुढे उंचीने लहान मीना आणि सगळ्यात मागे कर्णधार म्हणून मी... मीनाने बोट उंचावून मला काँल केला मेही बोट उंचावून त्याला प्रतिसाद दिला. ग्राउंडला फेरी मारताना सगळ्या प्रेक्षकांनी आमचं टाळ्यांनी स्वागत केलं. आम्हाला हव्या त्या बाजूला जाऊन उभे राहिलो आणि परत ग्राउंडच्या पाया पडलो. तेवढ्यात वसईची टीम आली. त्या ग्राउंडला फेरी मारेपर्यंत आम्ही एका लयीत टाळ्या वाजवत राहिलो.
दोन्ही बाजूचे पहिले ७ प्लेयर्स मैदानात उतरले कव्हर फिरवली. स्वच्छ प्रकाशात आम्हाला एकमेकांचे चेहरे आणि लावलेल्या प्लेस दिसल्या. तेवढ्यात पंच आणि पाहुणे आले. पाहुण्याच्या हस्ते टॉस उडवला गेला. पाहिलं दान त्यांना पडलं. त्यांनी ग्राउंड घेतलं आणि आम्हाला रेड मिळाली. परत काही सेकंदासाठी आम्ही गोळा झालो.
" आपली रेड आहे... जागू तू आत्ता... सेकंड रूपा... मग बघू "
" बर.. बॉयचा मी सेकंड रेडला मिळाला तर पट काढणार.. रेवा तू तयार रहा..."जागू मला म्हणाली.
" ओक डन "
शिटी वाजली.. जागुचा खणखणीत दम घुमला... कबड्डी... कबड्डी.. स्टेपिंग करताना बोनसच्या प्रयत्नात असताना टर्न फिरला पण जागुने तिला चकवलं आणि आम्हाला १ पाँइण्ट मिळाला. आता त्यांची रेड होती. ती आली. उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला संपूर्ण कव्हर नाचवून गेली. आता रूपा रेडला गेली. तिची स्टेपिंग सुरु असतानाच कॉर्नरने सुंदर बँक काढली. आमची कव्हर ६ ची झाली. आता रेडला बॉय आली. अपेक्षेपेक्षा खूप लूज खेळत होती ती आज.. नुसताच स्टेपिंग करून ती गेली. रेडला दीदी गेली आणि तिचा हुकमी बोनस घेतला. आता त्यांची सगळ्यात उंच रेडर आली. थोडस स्टेपिंग करून तिने रेश्माला हात मारला आणि मिडलाईन जवळ जाऊन अपील केलं. पंचांनी रेश्माला आउट दिलं. ह्यावेळी रेडला मी गेले. संपूर्ण कव्हर नाचवत असताना उलटा हात मारला. अपेक्षेप्रमाणे त्यांची लेफ्ट टर्न हाताला लागली. १ पाँइण्ट मिळाला रुपा उठली. रेश्मा नसल्यामुळे लेफ्ट कॉर्नर विक झाला. रूपाने लावून धरला होता पण त्यात काही दम नव्हता हे आम्हाला माहित होत. आम्ही कव्हर अजून वर काढायची ठरवली आणि त्याप्रमाणे जागुला इशारा केला. त्यांची लंबू रेडला आली. तिने परत कॉर्नरला मारायच्या इराद्याने सेम स्टेपिंगला सुरुवात केली. आम्ही वर तयार होतोच.. एकदा ती आत आली परत बाहेर गेली दुसर्या वेळेला ती आत आल्यावर आम्ही सुटलो. डँश बरोबर बसला. ती ग्राउंडच्या बाहेर आणि रेश्मा ग्राउंडच्या आत.. त्यांनी कव्हर बदलली... त्याचा अंदाज घेण्यासाठी तुप्याला रेडला पाठवलं. तुप्याने कव्हर बरीच नाचवली पण हवा तो परिणाम झाला नाही. कव्हर प्रचंड स्टेडी लागली होती. म्हणजेच आता त्यांनी सगळा गेम कव्हरवर काढायचा अस ठरवलं होत तर...
टाईम आउट घेतला आणि मला जे वाटलं ते टीमला सांगितलं. पुढची ५ मिनिट आपणही कव्हरवर खेळूया अस ठरलं आणि मीनाला वेळ लावायला सांगितलं. तसंही आमच्याकडे २ चा लीड होता. प्रयत्न त्यांच्या बाजूने जास्त व्हायला हवे होते. ५ मिनिट झाली पण स्कोअर बोर्ड तसाच ४-२ होता. मध्ये- मध्ये दीदीने बोनससाठी ट्राय केलं पण त्यांची कव्हर जाम टाईट होती. अजून ३ मिनिटांनी हाफ टाईम होणार होता. दिप्तीने माझ्याकडे येउन मला फक्त रेडरला अंगावर घे (आपण पुढे- पुढे जाऊन रेडरला लालूच दाखवणं) म्हणून सांगितलं. पुढच्या रेडला दीप्तीला डोळ्यांनी इशारा करत मी ठरल्याप्रमाणे केल. टर्नच्या बरोबरीने कॉर्नर काढून तयारीने उभी राहिले. त्यांची रेडर आली. उजव्या बाजून स्टेपिंग करत असताना तिने जागुवर अटँक केला. दीप्तीने लेफ्ट टर्न वरून तिचा चौडा काढला त्यामुळे ती धडपडली आणि तोच मौका साधून जागू आणि तुप्या तिला ब्लॉक करायला गेल्या पण काही तरी गडबड झाली आणि तिचा पाय मध्य रेषेला लागला. ३ पाँइण्ट गेलेच आणि १ चा लीडहि त्यांना मिळाला. दीदी रेडला गेली मी आणि रेश्माने दिप्तीकडे बघत हात जोडले. ती बेशरम बाहेर बसून उलट आम्हाला हात जोडत फिदीफिदी दात काढत म्हणाली," चला.. चला... पटापट आम्हाला उठावा.. तुझ्या पैशाचा मला मँगोंला प्यायचाय... नाही तर झोप नाही लागणार मला "भर ग्राउंडमध्ये मँच चालू असताना मँगोंला वैगरे ऐकल्यावर दादा भडकले आणि दीप्तीला काही तरी म्हणाले तोपर्यंत त्यांची लंबू रेडला आली. ह्यावेळी तिने डाव्या बाजूने रेड सुरु केली. वर बघत मला २ वेळा हात मारायचा प्रयन्त केला पण मी तो चुकवला. ती स्टेपिंग करत परत बाहेर गेली आणि जोरदार परत माझ्याच दिशेने आली. ह्यावेळी मी पण मनात काहीतरी ठरवलं होत त्याप्रमाणे ती आल्याबरोबर मीही उडी मारली आणि तिला हँन्ड कँच टाकली. ती जागच्याजागी थांबली. नियमाप्रमाणे दीप्ती सगळ्यात आधी आत आली. त्यांनतर सगळ्या रेड नील गेल्या. स्कोअर बरोबरीत होता.
हाफ टाईम नंतरही बर्याच रेड नील जात होत्या. कोणीही आक्रमक होत नव्हत पण त्याचबरोबर अतिशय सावधगिरीनं खेळ सुरु होता. शेवटी त्यांच्या ६च्या कव्हरचा फायदा आम्ही उचलायचं ठरवलं. दीदीने जाऊन बोनस केला आमच्याकडे १ चा लीड आला पण परत मँच शांत.. नील रेड सुरुच होत्या. प्रेक्षक कंटाळले. बाहेरून ह्या रटाळ खेळावर शेरेबाजी सुरु झाली होती. काहींनी जागा बदलल्या आणि दुसरी मँच बघायला लागले.
शेवटची ३ मिनिट असताना त्यांच्या लंबू रेडरने हात मारून दीदीचा पाँइण्ट घेतला. तिने दीदीला तापवलं (चूक करायला भाग पाडणे) परत मँच इक्वल...
त्यांच्या सेकंड लास्ट रेडला मी फॉलो( पाठलाग करत चढाई करणे) मारला आणि परत १चा लीड घेतला आणि जमेल तेवढा तिथे मिडलाईन जवळ टाईमपास करण्याचा प्रयत्न केला पण पंचाने मला ऑउट देण्यासाठी तोंडात शिटी घेतल्यावर मात्र मागे आले. आता ही मँचची लास्ट रेड होती. रेडरची स्टेपिंग सुरु होती ती पाँइण्ट घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होती आणि आम्ही तो वाचवण्यासाठी....
अगदी शेवटचे काही क्षण बाकी असताना रेडरने रेश्मावर अटँक केला रेश्माला खेचायच्या नादात रूपाचा पाय लास्ट लाईनला लागला आणि त्याच वेळी रेडरची रेडिंगची वेळ पण पूर्ण झाल्यामुळे तीही मागे त्यांच्या ग्राउंडमध्ये गेली...पण त्या टीमने ते बरोबर पहिले आणि पंचांच्या लक्षात आणून दिले. रुपा ऑउट झाली आणि वसईच्या टीमला तो पाँइण्ट मिळाला आणि मँच ७ -७ अशी बरोबरीत संपली.
ग्राउंडच्या पाया पडून समोरच्या टीमला शेकहँन्ड करून बाहेर आलो. माझ्यामते खेळ बरा झाला होता. शेवटच्या चुकीमुळे वाट लागली होती पण गेम इक्वलवर संपला होता. आम्ही सगळ्या मुली हरलो नाही म्हणून खुश होतो. मँचची उजळणी सुरु असताना कोल्हापूरच्या टीमचे सर दादांना भेटायला आले. दादा बाजूला गेले. ते सर आणि दादा काही तरी बोलत होते आणि आम्ही कन्फ्युज्ड नजरेने त्यांच्याकडे लक्ष ठेवत आमचं आवरत होतो. उद्या मँच असताना आज हे का भेटायला आले??
क्रमशः
एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
प्रतिक्रिया
3 Jun 2016 - 4:18 pm | एकनाथ जाधव
छान केलय खेळाच वर्णन.
3 Jun 2016 - 5:28 pm | पैसा
मालिका मस्त सुरू आहे
3 Jun 2016 - 5:33 pm | मुक्त विहारि
"उद्या मँच असताना आज हे का भेटायला आले??"
एकदम उत्कंठावर्धक शेवट.
3 Jun 2016 - 5:35 pm | एस
चित्रदर्शी! पुभाप्र.
3 Jun 2016 - 5:51 pm | बाबा योगिराज
जबरदस्त. छान.
पुढचे भाग जरा लवकर येऊ द्या ब्रे.
3 Jun 2016 - 6:31 pm | असंका
सुरुवात फार आवडली. आधीच्या भागाचा शेवट वाचताना अगदी हेच मनात आलेलं की फोकस कुठाय!! त्यामुळे आजचा भाग जबरदस्त आवडला आहे...
धन्यवाद..
4 Jun 2016 - 11:49 am | नाखु
मस्त एखादी मालीका होईल आणि नाही तरी खेळप्रधान मालीकाच नाही कधी "रड्+ओरडकथा" जामान्यात..
सासु सुना कब्बड्डी,मालीका वासु सपना लप्पाछप्पीकम खोखो,आणि शेजारी-पाजारी+ढीगभर नातलग्+कार्यालयीन कर्मचारी यांच्या डब्बाऐसपैसविथ रुमाल पाणी असेच पाहणे नशीबी आहे.
कमी पडले तर खेळ झालेला खंडोबा आहेच.
नेमस्त वाचक नाखु
3 Jun 2016 - 6:48 pm | रमेश भिडे
७-७ म्हणजे फारच कमी स्कोर.
3 Jun 2016 - 9:35 pm | अर्धवटराव
पुभाप्र
4 Jun 2016 - 11:21 am | संजय पाटिल
वाचतोय..
पुभालटा..