तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
30 May 2016 - 8:53 pm

तलत महमूद ची आठवण....

‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं...
कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला. चित्रपट होते-‘बेवफा,’ ‘बारिश’ अाणि ‘नवबहार.’ पैकी बारिश मधे एक कव्वाली हाेती, त्यांत तलत देखील एक गायक होता-

‘एक नजर में दिल भरमाए, सूरत हो तो ऐसी हो...’

तसंच ‘नवबहार’ मधे देखील त्याची एकच गझल होती-

‘किसी सूरत लगी दिल की बहल जाए तो अच्छा हो,
तमन्ना एक नए सांचे में ढल जाए तो अच्छा हो...’

पण ‘बेवफा’ सर्वस्वी तलतचाच चित्रपट होता. त्यातील

‘सर मिला आपके कदमों पे झुकाने के लिए...’

‘दिल मतवाला लाख सम्हाला फिर भी किसी पर आ ही गया...’

‘तुमको फुरसत हो मेरी जान तो इधर देख तो लो...’

‘तू आए न आए तेरी खुशी हम आस लगाए बैठे हैं...’

ही तलत ने म्हटलेली गीते पुन्हां-पुन्हां ऐकावी अशीच आहेत. छोट्या पडद्यावर ‘बेवफा’ बघतांना मला ते दिवस आठवले, जेव्हां तलतचं एक गीत मिळवण्यासाठी रेडियोला अक्षरश: कान लावून बसावं लागे. मी नववीत असतांना एके दिवशी रेडियोवर (सीलोन) सकाळी साडे सात वाजता ‘पुरानी फिल्मों के गीत’ कार्यक्रमात ‘दिले नादान’ मधील तलत महमूद चं एक गीत ऐकलं-

‘जो खुशी से चोट खाए, वो जिगर कहां से लाऊं,
किसी और को देखे, मैं वो नजर कहां से लाऊं...’

तुला सोडून दुसरयाला बघणारी ‘नजर’ मी कुठून आणूं...?

किती गोड कल्पना आहे...! या शब्दांनी, या कल्पनेनं जाणवलं की या गायकाची बात ही कुछ और है...त्यापूर्वी मी तलतची प्रचलित गीतेच ऐकली होती. पण या ‘जिगर,’ ‘नजर’ या शब्दांनी मनांत कायम घर केलं. आणि मी रेडियो सीलाेनचा नियमित श्रोता झालो. ‘त्या’ कार्यक्रमांत वाजवलं गेलेलं तलतचं एकच गीत एेकून मन आनंदाने भरून जात असे. मग तो अख्खा दिवस कसा छान जायचा. तसंच ज्या दिवशी त्या कार्यक्रमांत तलतचं गीत नसे, त्या दिवशी चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. मुख्य म्हणजे या कार्यक्रमांत तलत ची जी गीते ऐकायला मिळायची, जी सहजासहजी इतरत्र सापडली नाही. याच दरम्यान एके दिवशी ‘एस कुमार्सची फिल्मी मुलाकात’ मधे तलतची मुलाखत ऐकली. त्यांत तलतनी त्याच्या अावडीच्या गीतांमधे ‘तस्वीर बनाता हूं...,’ ‘हमसे आया न गया...’ व ‘मुहब्बत ही न जाे समझे...’ ही गीते ऐकवली होती. या मुलाखातीमुळे देखील तलत खूप जवळचा वाटू लागला.

ते रेडियोचे, श्रवणभक्ति करण्याचे दिवस होते. त्याकाळी तलतची गीते ऐकतांना, ते शब्द लिहून घेतांना मनाला नेहमी प्रश्न पडायचा की ही इतकं सुंदर काव्य असलेली ही गीते याने कुणासाठी म्हटली असतील व यांचं चित्रण कसं काय झालं असेल...? गीते कोणती बरं...

‘मेरे ख्यालों में आके गले लगा जा मुझे,
कि आज फिर मेरा जी चाहता है रोने को...’
-कुणासाठी रडणार होता हा...?

‘मुहब्बत में कशिश होगी तो इक दिन तुमको पा लेंगे,
उसी सूरत में हम बिगड़ी हुई किस्मत बना लेंगे...’
-हा दृढ विश्वास कुणा करितां होता...?

‘महलों में रहने वाली, घर है गरीब का...’
-कोण तो बिच्चारा नायक आणि ती राणी बनून गेलेली नायिका कोण बरे असेल...?

‘मान करे क्या रंग रुप का, तू कागज का फूल है,
तुझमें खुशबू ढूंढ रही है ये दुनिया की भूल है...’
-बाप रे...! काय घोडं मारलं नायिकेनं याचं की हा इतका रागावला...?

‘दुनिया बहुत बुरी है दुनिया में बसने वालों,
मेरी तरह न रोना कुछ देर हंसने वालों,
रोया हूं जिंदगी भर इक बार मुस्कुरा के...’
-हे कटु सत्य याने कुणाला बरं सांगितलं असेल...?

‘कभी तनहाइयों में इक ऐसी भी घडी आई,
बहुत रोने की कोशिश की मगर फिर भी हंसी आई...’
-एकटेपणांत असा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी येतोच की..., पण याने कुणाला सांगितला असेल हा अनुभव...?,

पण...या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडणं केवळ अशक्य होतं. कारण जरी आमच्या शहरांत नऊ थिएटर होते तरी, त्याकाळी सुद्धा तलतची गीते असलेले चित्रपट त्यांत लागण्याची शक्यता कमीच होती...यावर उपाय एकच होता की जेवढी मिळतील तेवढी तलतची गीते ऐकायची, लिहून ध्यायची, गुणगुणायची व मनमुराद आनंद लुटायचा. त्या गीतांमधे जी शायरी, जे काव्य आहे त्यांत बालिशपणा, उथळपणा नावाला देखील नाही. त्यातील सोपे पण गूढार्थाने भरलेले शब्द...कदाचित म्हणूूनच त्याकाळी तलतचं एक गाणं दिवसभर सोबत असायचं, ते शब्द जणू कानांत घुमत राहायचे...

ते शाळेचे भारावलेले दिवस होते. वाचनाची गोडी कळूं लागली होती, कान तयार होत होते, शास्त्रीय संगीत नुकतंच कुठं आवडूं लागले होते. तसं नाट्य संगीत जवळचं होतं म्हणां पण माणिक ताईंचा ‘भटियार’ अन त्या पाठोपाठ येणारया ‘अकेली मत जइयो राधे जमुना के तीर...’ वरुन जीव आेवाळून टाकावांसा वाटायचं...याच काळांत तलतची गीते कानावर पडली आणि मी त्याचा चाहत्यां मधे सामील झालो...

‘नमक छिडकते हैं ले-ले मजा वही आंसू,
हाय रे वही आंसू,
जो तेरे दर से मिले दिल के जख्म धोने को...’
‘गुनाह’ मधील या गीताचे संगीतकार होते स्नेहल भाटकर. किती सुंदर कल्पना आहे...

‘दरबार’ मधे तो म्हणतो-
‘मैं ऐसी कातिल नजर के सदके कि जिसने मेरा गुरुर तोडा,
जो सर कहीं भी न झुक सका था वो सर झुकाया तेरी गली में...’
-इतका प्रांजळपणा क्वचितच सापडतो...

‘न घबरा आसमां पर छाया है आज अगर बादल,
यही बादल तो चंदा के निकलने की निशानी है...’
-‘वारिस’ मधील हा आशावाद अप्रतिम असाच होता.

चित्रपट गीते म्हटली की त्यांत नायिकेचं वर्णन येणारच की. तलत देखील याला अपवाद नाही. आपण तलत पुरताच मर्यादित विचार केला तर पुन्हां असं जाणवतं की त्याने म्हटलेल्या अशा गीतांमधे देखील एक शालीनता, मर्यादा आहे. त्या वर्णनांत अश्लीलता नाहीं. पण एक मात्र खरं की त्या गीतांमधील कल्पना, त्या अपेक्षा देखील निराळ्याच, इतरत्र कुठेहि न सापाडणारया.

‘सलाम-ए-मुहब्बत’ मधे तो नायिकेची तुलना फुलाशी करतांना म्हणतो-
‘मैं तुझको अगर एक फूल कहूं, तेरे रुतबे की तौहीन है ये,
तेरा हुस्न हमेशा कायम है, दमभर के लिए रंगीन है ये...
दिन-रात महकते रहने की कलियों ने अदा तुझसे पाई,
ये चांद जो घटता-बढता है दरअस्ल है तेरी अंगडाई...’

‘छाया’ मधील गीतांत ती मिळाल्यानंतर मिळालेल्या आनंदाला तो शब्द रूप देतो-
‘आंखों में मस्ती शराब की काली जुल्फों में रातें शवाब की,
जाने आई कहां से टूट के मेरे दामन में पंखडी गुलाब की...’

‘नकाब’ च्या एका गीतामधे नायिकेच्या बेरुखीचा देखील सुंदर वापर होता-
‘वो उनकी परदादारियां वो उनकी बेरुखी,
दिल मेरा लूटने के ये बहाने बन गए...’

वारयाने भुरभुर उडणारया तिच्या केसांकडे बघत तो ‘अनमोल रतन’ मधे म्हणतो-
‘जब किसी के रुख पे जुल्फें आ के लहराने लगीं,
हसरतें उठ-उठ के अरमानों से टकराने लगीं...’

तलत महमूद एका गैर फिल्मी हिंदी गझल मुळे प्रकाशझोतांत आला. ती गझल होती-

‘तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी,
ये तेरी तरह मुझसे तो शरमा न सकेगी...’

तुझा फोटो, छायाचित्र माझ्या काहीच कामाचं नाही...कारण तो फोटो मला बघून तुझ्या सारखा लाजू शकणार नाही ना...
म्हणून असेल कदाचित तसवीर या शब्दाशी तलतचं जवळचं नातं जाणवतं.

‘नादान’ मधे तिच्या तसवीर मधे त्याला आपली तकदीर दिसते-
‘आ तेरी तसवीर बना लूं, मैं अपनी तकदीर बना लूं...
दिल के कोरे कागज पर, उल्फत की लकीर बना लूं...’

‘बारादरी’ मधे तो तसवीर बनवायचा प्रयत्न करतोय,...स्वप्न तर बघितलंय, कैनवास वर त्याला आकार देता येत नाहीये...म्हणून तो अस्वस्थ आहे-
‘तसवीर बनाता हूं, तसवीर नहीं बनती,
इक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती...’

तलतच्या चित्रपट गीतांमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की बरेचशा चित्रपटांत त्याच्या वाट्याला फक्त एकच गीत आलंय. गंमत म्हणजे त्या चित्रपटांचं नाव घेतांच सर्वात पहिले आठवतं ते तलतचंच गीत, त्यातील इतर तपशील लगेच आठवत नाहीत. या श्रेणीतील काही चित्रपट आज छोटया पडद्यावर बघतांना जाणवलं की तलतचं ते गीत त्या कथानकांत अगदी चपखल, फिट बसलंय. उदाहरणार्थ-

‘मदहोश’ नाव घेताच आठवते ही गझल-
‘मेरी याद में तुम न आंसू बहाना न जी को जलाना मुझे भूल जाना...’

‘किनारे-किनारे’ म्हणतांच आठवतं हे गीत-
‘देख ली तेरी खुदाई, बस मेरा जी भर गया...’

‘बाज’ म्हणताच आठवते ही गझल-
‘मुझे देखो हसरत की तसवीर हूं मैं...’

‘दायरा’ नाव घेतांच आठवते ही गझल-
‘आंसू तो नहीं हैं आंखों में पहलू में मगर दिल जलता है,
होठों पे लहू है हसरत का आरा सा जिगर पर चलता है...’
चित्रपटाचं नाव घेत चला, तलतचं गीत कानांत घुमूं लागतं-
‘आशियाना’-‘मैं पागल मेरा मनवा पागल, पागल मेरी प्रीत रे...’
‘छोटे बाबू’-‘दो दिन की मुहब्बत में हमने कुछ खोया है कुछ पाया है...’
‘रेशमी रुमाल’-‘जब छाए कभी सावन की घटा...’
‘टैक्सी ड्राइवर’-‘जाएं तो जाएं कहां समझेगा कौन यहां दर्द भरे दिल की जुबां...’
‘एक साल’-‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया...’
‘बहाना’-‘बेरहम आसमां, मेरी मंजिल बता है कहां...’
‘यास्मीन’-‘बेचैन नजर बेताब जिगर ये दिल है किसी का दीवाना...’
‘शिकस्त’-‘सपनों की सुहानी दुनिया को आंखों में बसाना मुश्किल है...’
‘एक गांव की कहानी’-‘रात ने क्या-क्या ख्वाब दिखाए...’
‘आराम’-‘शुक्रिया, ऐ प्यार तेरा शुक्रिया...’
सगळीच एकापेक्षा एक अजरामर गीते...

‘अादमी’ चित्रपटांत मुहम्मद रफी सोबत तलतचं एक द्वंद्व गीत होतं-
‘कैसी हसीन आज बहारों की रात है...’

यात तलत महमूदचा स्वर शोकाकुल प्रियकराचा आहे-
‘आई हैं वो बहारें कि नग्मे उबल पडे, ऐसी खुशी मिली है कि आंसू निकल पडे,
होठों पे हैं दुआएं मगर दिल पे हाथ है... अब किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है...’

या गीताची सिचुएशन आठवून बघा. तिथे तलतचा आवाज अगदी परफेक्ट आहे...पण चित्रपट बघतांना मात्र रसभंग होतो...कारण तिथे तलत ऐवजी हे शब्द महेंद्र कपूरच्या आवाजात आहेत. मला वाटतं अशा प्रयोगांमुळेच भारतीय चित्रपट संगीताची घसरण सुरू झाली असावी. कारण याच काळांत चित्रपटांमधे नायकांचं महत्व वाढू लागलं होतं...

तलत महमूद नी काही चित्रपटांमधे अभिनय देखील केला होता. त्यातील ठळकपणे आठवतात ते ‘सोने की चिडिया,’ ‘दिल-ए-नादान,’ व ‘एक गांव की कहानी.’ पैकी ‘सोने की चिडिया’ मधे त्याच्या सोबत नूतन-बलराज साहनी होते. या दोन मातब्बर कलाकारां समोर वेगळं करण्यासारखं तलत जवळ काहीच नव्हतं. पण ‘दिल-ए-नादान’ सर्वस्वी तलतचाच चित्रपट होतां. यात पीस कंवल नायिका होती. त्यातील

‘मुहब्बत की धुन बेकरारों से पूछो...’

‘ये रात सुहानी रात नहीं ऐ चांद-सितारों सो जाओ...’

‘जो खुशी से चोट खाए मैं वो दिल कहां से लाऊं...’

ही गीते लाजवाब अशीच होती. तरी

‘जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया...’ हे गीत ऐकतांना आज देखील मन हळहळतं... हेच या गीताच्या यशाचं गमक असावं.

गेल्या वीस वर्षांत छोट्या पडद्यावरील निरनिराळया चैनल्समुळे तलतची बरीच गीते ‘त्या’ चित्रपटांतून बघतां आली. त्यात ‘देवदास’ चा ‘मितवा...’ व ‘किसको खबर थी किसको यकीं था ऐसे भी दिन आएंगे...’ होते. तसंच मनहर देसाई-मीना कुमारीच्या ‘मदहोश’ मधील ‘मेरी याद में तुम न आंसू बहाना...’ देखील होतं. ही गीते बघून कानां सोबतच डोळयांचं पारणं फिटलं. तलत माझ्या पीढीचा गायक नाही. तरी देखील त्याने मला वेड लावलं व आपलंसं करून घेतलं. तलतची गीते ऐकतांना वाटतं की तो आपल्याच भावनांना मूर्तरुप देताेय.

सेटमैक्स वर ‘बेपफा’ बघतांना गंमत वाटत होती की एकेकाळी मनाला भुरळ पाडणारया ‘तुमको फुरसत हो मेरी जान तो इधर देख तो लो...’ या गीतामधे नरगिस चक्क स्वीमिंग सूट घालून वावरली होती. पण रेडियावर पहिल्यांदा हे गीत ऐकलं, तेव्हां नरगिस ध्यानीमनी देखील नव्हती. मन भुललं हाेतं ते त्या आवाजातील सोप्या शब्दांवर, त्या आर्जवावर. किती आर्जव आहे तलतच्या आवाजात...तो म्हणतोय-

‘बात करने के लिए कौन तुम्हें कहता है,
ना कराे हमसे कोई बात, मगर देख तो लो...’

-माझ्याशी बोलावंच लागेल अशी सक्ती नाहीये तुझ्यावर...पण एकदा...फक्त एकदाच माझ्याकडे बघून तर घे...यावर कुणी कसं बरं रूसुं शकेल...

तलत आज नाही...पण त्याने म्हटलेली गीते अजरामर आहेत. त्याच्या गीतांकडे बघतांना शेवटी त्याच्याच शब्दांत म्हणावंसं वाटतं-

‘शुक्रिया, इस मेहरबानी का तुम्हारी शुक्रिया,
जब ख्यालों में बुलाता हूं ताे आ जाते हो तुम...’ (चित्रपट: नाजनीन).

---------------------

हा फक्त योगायोग होता कां...!

दो पहलू वाले गीत, म्हणजेच दोन निरनिराळया गायकांनी म्हटलेलं एकच गीत बरयाच चित्रपटांमधे होते. आपण फक्त तलत महमूद आणि लता मंगेशकर या दोनच गायकांचा विचार केला तर चटकन आठवतात ती ही गीते-

‘दाग’ मधील ‘ऐ मेरे दिल कहीं आैर चल...’

‘टैक्सी ड्राइवर’ मधील ‘जाएं तो जाएं कहां...’

‘एक साल’ मधील ‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया...’

‘बेवफा’ मधील ‘दिल मतवाला लाख संभाला फिर भी किसी पर आ ही गया...’

या पैकी ‘दाग’ ‘टैक्सी ड्राइवर’ आणि ‘एक साल’ मधील या गीतांमधे एक साम्य आहे. ते म्हणजे लता दीदींनी म्हटलेली ही तिन्हीं गीते सेड मूड मधील आहेत. पण ‘बेवफा’ मधील ‘दिल मतवाला...’ हे गीत मात्र लता दीदींनी उल्हसित मूड मधे म्हटलंय.
‘बेवफा’ बघितल्या वर मनांत सहज एक विचार आला. वर उल्लेखिलेल्या तिन्हीं चित्रपटांमधे म्हणजेच ‘दाग’ ‘टैक्सी ड्राइवर’ आणि ‘एक साल’ मधे लता दीदींनी गायलेली गीते सेड मूड मधे होती पण या चित्रपटांचा शेवट मात्र गाेड होता. उलट ‘बेवफा’ मधे लता दीदींचं गीत उल्हसित मूड मधे होतं पण या चित्रपटाचा शेवट मात्र शोकान्त होता...या चारहि चित्रपटांमधे दो पहलू वाल्या या गीतांचा दुसरा गायक नेमका तलत महमूद होता...
हा फक्त योगायाेग होता कां...!

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

30 May 2016 - 10:55 pm | चौकटराजा

तलत साहेबांच्या मखमली आवाजा सारखाच लेख.तलत यांची गीते अजरामर होण्याची कारणे प्रामुख्याने दोन.एक साहजिकच चाली.दुसरे असे की हे तलतचेच गीत असे असले की त्यान्च्या विशिष्ट गोड आवाजाने ते अधिक खुलत असे.

.

यशोधरा's picture

31 May 2016 - 9:18 am | यशोधरा

मखमली आवाज ह्याशिवाय दुसरी उपमा सुचत नाही.
ए गम ए दिल क्या करू, प्यार पर बस तो नहीं हैं मेरा फिर भी ह्यातलं - कभी ऐसा न हो पाव मेरे थर्रा जायें, और तेरी मरमरीं बाहों का सहारा न मिलें - ह्या ओळींवर लागलेला आवाज.., जलते हैं जिस के लिये, हमसे आया न गया, सीनें में सुलगतें हैं अरमां, फिर वोही गम, वोही शाम, वोही तनहाई हैं, मैं दिल हू इक अरमान भरा, चल दिया कारवां, अंधे जहां के अंधे रास्ते..

किती तरी गाणी आठवायला लागलीत. ह्या लेखाबद्दल धन्यवाद!

आंसू समझ के क्यों मुझे आंख से तूने गिरा दिया...

हे पण त्यांचंच आहे का?

बोका-ए-आझम's picture

1 Jun 2016 - 12:05 am | बोका-ए-आझम

छाया - संगीत सलील चौधरी.

पद्मावति's picture

31 May 2016 - 6:23 pm | पद्मावति

जलते है जिसके लिए, हम से आया ना गया सारखी गाणी....केवळ अप्रतिम!!

अहा संग्रही ठेवण्यासारखा लेख, सावकाश शोधुन काढतो आता सगळी गाणी
तलत कधी एकलाच नाही जास्त काही तुरळक गाणी वगळता

भंकस बाबा's picture

31 May 2016 - 11:43 pm | भंकस बाबा

जाए तो जाये कहां, ये हवा ये रात ये चांदनी ही माझी आवडती गाणी

बोका-ए-आझम's picture

1 Jun 2016 - 12:04 am | बोका-ए-आझम

तलतची solo गाणी अप्रतिम आहेत यात शंका नाही पण तलतने लताबरोबर काही अ फ ला तू न द्वंद्वगीतंही गायली आहेत. माझी आवडती ३ -
१. आसमांवाले तेरी दुनियासे जी घबरा गया - लैला मजनू. संगीत - गुलाम महंमद.
२. सीनेमे सुलगते है अरमां - तराना - संगीत - अनिल विश्वास
३. दिलमे समा गये सजन - संगदिल - संगीत - सज्जाद हुसेन

मखमली आवाजाचा मालक तलत दुर्दैवाने १९७० आणि नंतरच्या पाॅप संगीताच्या प्रभावामुळे मागे पडला. पण त्याच्यासारखा तोच!

प्रदीप's picture

4 Jun 2016 - 5:55 pm | प्रदीप

'ये मेरे अंधेरे, उजाले न होते, अगर तुम न आते मेरी जिंदगी मे'-- प्रेम पत्र: सलील चौधरी

सिरुसेरि's picture

1 Jun 2016 - 9:57 am | सिरुसेरि

अभ्यासपूर्ण लेख. तलत यांची अशीच काहि लक्षात राहिलेली गाणी -

"तेरे रास्तेपे हमने एक घर बना लिया है "
" कहता है दिल तुम हो "
"हसले आधी कुणी " ---- मराठी गीत
"तुझको पर्दा रुख ए रोशन "
"फिर वही शाम , वही गम "
"ए सनम हम आज ये कसम "
"तुम तो दिलकी तार "
"फिर मुझे दिद ए तर याद आया "

ऐकली काही गाणी यु ट्यूब वर

कदाचित माझी पातळी तेवढी उच्चन ही, जाम बोर झालो :(

यशोधरा's picture

1 Jun 2016 - 12:26 pm | यशोधरा

अच्च झालं तल!

स्पा's picture

1 Jun 2016 - 12:42 pm | स्पा

के

प्रचेतस's picture

1 Jun 2016 - 4:15 pm | प्रचेतस

तलतचं एकही गाणं मी ऐकलं नै. एका फार मोठ्या ठेव्याला मी मुकलो असेल ना?

स्पा's picture

1 Jun 2016 - 4:17 pm | स्पा

होय
तुम्ही उगाच जगताय

प्रचेतस's picture

1 Jun 2016 - 4:21 pm | प्रचेतस

:)

तलतचं यू ट्यूब वर बघण्यासारखा नाहीच मुळी।

कैसेट सिटी वर ऐका।

आणि अनुभव करा।

इमेजिनेशन।

ये रात सुहानी रात नहीं, ऐ चांद सितारों सो जाओ।

असं फक्त तलत ने म्हटलंय।

सपनों की सुहानी दुनिया को आंखों में बसाना मुश्किल है

गैराें पे जताना मुश्किल है अपनों से छुपाना मुश्किल है ।

इतक्या सोप्या शब्दांत तोच सांगू शकतो

दुसरं म्हणजे तलतचे पंखे असलेली मंडळी चाळीशी गाठलेली आहे।

तलत समजला नाही म्हणजे तपश्चर्या करा। हे सगळे पंखे आत्ता आत्ता कुठे गरगरायला लागलेत।

नाही तर टेप रेकार्ड सोबत तहान भागवत होतेच की।

तात्पर्य काय सगळं काही विसरुन तलत ला ऐका। नसेल आवडत तर उगाच त्यांच्या नादी लागू नकां

और भी गम हैं तलत के सिवा।

तलत ला सांभाळायला पंखे मंडळी आहेच की।

स्पा's picture

1 Jun 2016 - 3:52 pm | स्पा

धन्य्वाद्स

सुबोध खरे's picture

1 Jun 2016 - 6:32 pm | सुबोध खरे

महामाया साहेब
तलत ज्यांना आवडतो त्यांना आवडतो.
इतरांना तो आवडला पाहिजे असेही नाही किंवा त्यांनी आवर्जून तलत ऐकावा असा आग्रह धरायची गरज हि नाही.
तो जसा आहे तसा आस्वाद घ्या नाही तर सोडून द्या. .

सुबोध खरे's picture

1 Jun 2016 - 12:11 pm | सुबोध खरे

"तलत मेहमूद" हा एक तर तुम्हाला आवडतो किंवा आवडत नाही. (all or none) take it or leave it.
तो तुम्हाला आवडला तर पूर्ण आवडतो आणि जसा आहे तसा. त्याच्या गाण्यांचे चाहते (fan) वर्गापैकी मी एक आहे. आयुष्याची अतिशय सुंदर वर्षे आणि तेंव्हा तलत बरोबर निगडीत अशा आठवणी अनेक आहेत. एम बी बी एस करून होईपर्यंत मी तलतच "चाहता" झालेला होतो.या काळात मी मराठी हिंदी उर्दू शब्दकोश विकत आणून आणि वर्गातील मुसलमान मित्रांकडून " नशेमन" सारख्या शब्दांचा अर्थ मुळापासून समजावून घेतला. माझे दोन जवळचे मित्र सुद्धा तलतचे चाहते आहेत. यातील एक अस्थिरोग तज्ञ आहे आणि दुसरा स्थापत्य अभियंता आहे. एम बी बी एस होऊन नोकरीला लागल्यावर पहिली गोष्ट काय केली ती म्हणजे छोटा टेप रेकोर्डर होता त्याच्या जागी दोन फुट उंचीचे लाकडी स्पीकर असलेली फिलिप्स ची उत्तम म्युझिक सिस्टीम दोन महिन्यांचा पगार टाकून विकत घेतली. पश्चिम नौदल कमांडच्या कुलाब्याला असलेल्या मेस मध्ये कित्येक संध्याकाळी आम्ही एका ठिकाणी बसून मैफिल जमवून दारू पीत निः शब्दपणे तलत ची गाणी ऐकत घालवलेली आहेत. अशा मैफलीत दारू नव्हे तर तलत आपल्या मेंदूत चढत जातो. शांत अशा वातावरणात माझ्याकडे होती.त्या सुरेख म्युझिक सिस्टीमवर गाणी ऐकत तीन चार तास कसे जात हे समजत नसे. मध्ये फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज. हि धुंदी उतरत नाही.
शाम -ए गम कि कसम सारखी विराणी असो किंवा फिर वोही शाम वोही गम किंवा सीने मे सुलगते है अरमान किंवा रात ने क्या क्या ख्वाब दिखाये असो एक से एक गाणी तुमच्या गात्रात उतरत जातात. सर्व गाणी मला पाठ आहेत.
एका बाबतीत आमचे एकमत आहे कि सर्वात मुलायम आणि मृदू गाणे कोणते असेल तर ते म्हणजे "जलते है जिसके लिये" हे गाणे ऐकल्यानंतर पुढचे कोणतेही गाणे ऐकू नये. पाच मिनिटे निःशब्द बसावे आणि मग उठून जेवायला जावे. या पातळीचे मृदू आणि मुलायम आवाजात गायलेले दुसरे गाणे म्हणजे श्री अरुण दाते यांचे "शुक्रतारा मंद वारा". तिसरे असे गाणे नाहीच
हि दोन्ही गाणी म्हणजे पहाटेच्या शांत वेळी गार वार्याच्या हलक्या झुळुकी अंगावर येताना जे सुख होते तशी आहेत.
बस हि गाणी ऐकावी आणि दुलईत शांत झोपावे.

चौकटराजा's picture

1 Jun 2016 - 2:44 pm | चौकटराजा

यस , तलत तुम्हाला आवडतो किंवा आवडत नाही. अर्थात यात एक मेख पण॑ आहे. तुम्हाला रफी सारखे मेलो ड्रामा पद्धतीचे गायन आवडत असेल तर तुम्हाला तलत फक्त गोड आवाजासाठी आवडेल. किशोर रेकून म्हणणारा गायक वाटेल अन मन्नाडेचा आवाज चाळीशी ओलांडलेला वाटेल .जसे अरूण दाते यांचे मराठीत आहे. ज्याना जयवंत दळवी यांचा रेंज ( वाट संपता संपेना रामकृष्ण गोविंद, नाच लाडके नाच , लबाड लांडगं हे वानगी दाखल) माहीत आहे त्याना अरूण दाते मखमली आवाजाचे गोड गायकच फक्त वाटतील. यासाठी अरूण दाते हे चित्रपट गीत गायनात चमकले नाहीत. कोणताही कलाकार जितका वैशिष्टपूर्ण॑ तितकेच त्याचे यश मर्यादित असते. उदा. ओ पी नय्यर. उदा बाबा सहगल. उर्मिला धनगर ई. ई.

चौकटराजा's picture

1 Jun 2016 - 2:46 pm | चौकटराजा

जयवंत दळवी नव्हेत जयवंत कुल्कर्णी.

मराठी_माणूस's picture

1 Jun 2016 - 3:17 pm | मराठी_माणूस

रफी सारखे मेलो ड्रामा पद्धतीचे
किशोर रेकून म्हणणारा गायक

म्हणजे नक्की काय ?

यशोधरा's picture

2 Jun 2016 - 7:05 am | यशोधरा

रफी सारखे मेलो ड्रामा पद्धतीचे गायन
किशोर रेकून म्हणणारा गायक
मन्नाडेचा आवाज चाळीशी ओलांडलेला

का ही ही!!

उदा . बाबुलकी दुआए लेती जा हे रफींचे गीत घ्या . त्यात ते चक्क फक्त रडायचे राहिलेत. तेच नय्यरच्या दो उस्ताद मधले
वरलीका नाका हे गीत ऐका . त्यात रफीनी अक्षरशः हैदोस घातलेला दिसतो. तेच रफींचे ज्याने क्या ढूंढती रहती है ये हे गीत ऐका , प्यासा मधले जला दो जला दो ही गीते ऐका. त्यात रफी हे काहीसे ओव्हरप्ले करून गात असत नव्हे तेच तर त्यांचे गायकी कौशल्य होते. किशोर कुमारनेही काही गीते सोफ्ट आवाजात गायली आहेत . उदा ये जीवन हे इस जीवनका पण त्यात रफींचा हळूवार पणा नाही. पुण्यातच ओपीना प्रश विचारला की किशोरला मन मोरा बावरा या गीतासाठी रफी का वापरला तर ताडकन त्यानी उत्तर दिले " ना ना वो किशोरका काम ही नही...." मनाडेंच्या आवाजाची जात पहाता ते समर्थ गायक असूनही त्याना राजकपूर वगळता कुणा हिरोचा फारसा लाभ झाला नाही हा इतिहास आहे. तुमसा नही देखा पासून गाणारा नायक हा नाचणारा झाला त्यात देखील रफीनी आघाडी मारली. रफी के सिवा मै कुछ भी नही असे शम्मी कपूर म्हणतात ते त्यामुळेच. राजेश खन्ना याना किशोरचा आवाज रफी साहेब लंडनला गेल्यामुळे मिळाला व किशोरचे नशीब पालटले. तलाश मधे शाहू मोडक याना मनाडेच॑अ आवाज जरी मिळाला तरी राजेंद्रकुमार याना रफी यांचा आवाज मिळाला .सचिनदा बंगाली त्याना राजेंद्रकुमार यानाही मनादांचा आवाज देता आला असता ना ?

चांदणे संदीप's picture

2 Jun 2016 - 11:18 pm | चांदणे संदीप

माझ्यापेक्षा काहीएक दशके पावसाळे तुम्ही जास्त पाहिले आहेत आणि त्या पावसाळ्यात तेवढीच जास्त गाणीही ऐकली असतील हेही मान्यच! तरीही तुमच्या या प्रतिसादातून तुम्ही किशोर कुमारला जेवढ Underestimate केलंय ना तेवढं ओपींनीही केल नसेल आणि रफिंनी तर नसतच केल. नाही म्हणायला मन्नादा किशोरकुमारला गाणी मिळतात आणि मला मिळत नाहीत यावरून कुरबूर करायचे.

आणि ते रफी लंटनला गेल्यामुळे राजेश खन्नाला किशोरचा आवाज मिळाला आणि त्याचे नशीब फळफळले हा तर कहर विनोद आहे! =)) प्लीजच!! राजेश खन्ना किंवा त्याचा कुणी प्रोडूसर किंवा डायरेक्टरने किशोर कुमारला नाही निवडले तर दस्तुरखुद्द किशोर कुमारने राजेश खन्नाला बाकायदा त्याचा इंटरव्ह्यू घेऊन त्याच्या आवाजासाठी निवडले!! By the time kaka turned to acting Kishor Kumar was already an established actor and renowned singer and only his passion towards singing kept him away from acting and doing any other stuff consistently! अतिशयोक्ती वाटत असली तरी खरी घटना आहे. आणि किशोरच्या आवाजानेच राजेश खन्नाला पडद्यावर सुसह्य केले!!

उपरोक्त उल्लेखलेल्या कथनाचा पुरावा अस्मादिक बाळगून आहेत. प्रत्यक्ष भेटून खात्री करावी! :)

तलतच्या धाग्यावर किशोरबद्दल बोललोय त्याबद्दल माफी धागालेखक, पण किशोरसाठी सत्यावर थोडा उजेड पाडण्याची ही थोडी धडपड!

Sandy

भंकस बाबा's picture

4 Jun 2016 - 9:29 am | भंकस बाबा

किशोरकुमार जरी त्यावेळी एक परिचित गायक व् अभिनेता असला तरी त्याचे बस्तान फ़िल्म इंडस्ट्रीत व्यवस्थित बसले नव्हते, शिवाय राजेश खन्नावर एक फ्लॉप स्टार म्हणुन शिक्का लागलेला होता. रूप तेरा मस्ताना, मेरे सपनो की रानी ही आराधनातील गाणी हिट झाली आणि किशोर, खन्नाची गाडी मार्गी लागली. इतकी की काका आपल्या हर एक पिक्चर साठी किशोरचा हट्ट धरु लागला. ( पुरावा- इसाक मुजावरानी आपल्या लेखनात लिहून ठेवले आहे). अगदी काट्यावर मोजायला गेले तर रफ़ी, किशोरपेक्षा कांकनभर वरचढ़ होता.
चर्चा करण्याची तयारी आहे

चांदणे संदीप's picture

4 Jun 2016 - 10:21 am | चांदणे संदीप

रफी वर्सेस किशोर कुठून आणलात याच्यात??

माझा प्रतिसाद नीट वाचा. चौराकाकांनी रफीच्या अनुपब्धतेमुळे किशोरला काकासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली असे म्हटले तेव्हा फक्त आणि फक्त त्यावरच मला ज्ञात असलेली विश्वास ठेवण्यालायक माहिती मी सांगीतली! हे असलं रफी-किशोर तुलना, रफी भारी का किशोर भारी का अजून मुकेश भारी वगैरे करत बसणाऱ्यांची फक्त "कीव" करावीशी वाटते. रफीने गायलेले किशोरला शोभले नसते व तेच वाईस व्हर्सा. हेच त्या काळातील सुज्ञ संगीतकारही जाणत होते व त्यामुळेच आरडीसारखा किशोरचा यारही काही महत्वाची गाणी रफीकडून गाऊन घ्यायचा. व गुलजारसारखा शब्दप्रभू आपल्या गीतांसाठी आरडी - किशोर - आशा असे कॉंबिनेशन्स जमवून आणायचा! त्या महान लोकांनी जे काय करायचे ते करून गेलेत आणि इतकं करून गेलेत की आपल्याला एका हयातीत त्या सगळ्याचा आस्वाद घेऊन संपवणे केवळ अशक्य!

चर्चा कसली बोडक्याची करायचीय? मीही दोनचार इसाक मुसावरांसारखे पुराव्यादाखल साक्षीदार उभा करू शकतो. फोर्ब्जने किशोरला भारतातील सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक म्हटलेले आहे. येसुदासना सर्वात जास्त पार्श्वगायनातले "राष्ट्रीय" पुरस्कार मिळाले आहेत ह्या अशा सांख्यिकीय आकडेवाऱ्या मोजून नीट बैजवार लावायच्या म्हटल्या तर नोकरी/व्यवसाय सोडून बसावे लागेल इतके प्रचंड ते काम असेल!

भंकसबाबा, भलत्या धाग्यावर भलत्या चर्चा नकोत अशा मताचा मी आहे तरी इथे नको इतके बोलून गेलोच! तेव्हा रफीसमर्थनार्थ/रफीगुणगाणस्तवनअतिदिव्यभव्य असा धागा काढा, तिथेच सकाळ-दुपार-संध्याकाळ अजून कसल्या कसल्या चर्चा करत बसू! हाकानाका! इथे फुलस्टॉप!!

Sandy

प्रदीप's picture

4 Jun 2016 - 6:04 pm | प्रदीप

जास्त पाहिले/ भोगले की वास्तविक माणसात एक 'मेलोनेस' यावा. काही माणसांच्या बाबतीत तसे ते होत नाही, काय करणार?

(चौरांपेक्षा चार-आठ पावसाळे अधिक पाहिलेला/ भोगलेला प्रदीप)

ह्या वानगीदाखल गाण्यांबद्दल काय म्हणाल? ओव्हर प्ले की अंडर प्ले?

लिखे जो खत तुम्हें?
तुमने मुझे देखा होकर मेहेरबां
एहसान तेरा होगा
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
दर्द ए दिल, दर्दे जिगर
बदन पे सितारे लपेटे हुवे

चांदणे संदीप's picture

3 Jun 2016 - 7:12 am | चांदणे संदीप

माझं फेवरेट्ट.... अतिमधुर एक गाणं पण ॲडवा

"आपके हसीन रूख पे आज नया नूर है..."

Sandy

यशोधरा's picture

3 Jun 2016 - 7:31 am | यशोधरा

हां संदीप, तेही. :)

खरे पाहता, रफी, मन्ना डे आणि किशोर ह्यांच्या आवाजांव्यतिरिक्त इतर कोणाचा विचारही करु शकणार नाही, अशी बरीच गाणी आहेत. मन्ना डेंची लगेच आठवतात म्हणजे तू प्यार का सागर है, कस्मे वादे प्यार वफा, जोहरा जबीं, सूर ना सजे, तुम गगन के चंद्रमा, ए मेरे प्याते वतन..
किशोरची किती सांगावी? लिस्ट कमीच पडेल!

तेव्हा कोणाही गायकावर/ गायिकेवर रेकतो, रडतो इत्यादि शेरे देणे म्हणजे प्रत्यक्ष ऐकले तरी अनुभव कमी पडला असावा हेही कारण असू शकते ना? :)

चांदणे संदीप's picture

3 Jun 2016 - 8:31 am | चांदणे संदीप

किंवा कदाचित चौराकाकांना सगळ्या रेकॉर्डस, क्यासेटी, सीड्या, पिड्या खराब लागल्या असाव्यात! ;)

चौराकाका ह. घ्या... जस्ट किडींग! :)

असो, धागा तलतचा आहे आणि त्याचा थोडा मान राखून काही: हा लेख वाचूनच (म्हणजे तलत माहित होता तरीही) तलतला पुन्हा एकदा काल रात्री व्यवस्थित ऐकून घेतला. इथे सुचवलेली काही गाणी इंटरनेटकृपेने मिळवून ऐकली आणि जाम भारी वाटले. त्यात माझ्या अल्पपुण्याईने माझ्या घराची गॅलरी आणि आजूबाजूचा परिसर शांत निवांत असल्याने खरेसरांनी वर्णन केल्याप्रमाणे खुर्ची टाकून (फक्त!) निवांत गाणी ऐकत बसलो आणि वेळ कसा गेला कळलेच नाही!! हा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांना माझे सस्नेह निमंत्रण!! :) अजून काय बोलू? जुन्या रेडियोच्या आवाज कमी जास्त करणाऱ्या गोल बटणासारखे जर आवाजाचा गोडवा कमी जास्त गोड करून ऐकता येत असता तर ते बटण ज्या ठिकाणी फिरायचे थांबेल तिथेच तलतचा आवाज सुरू होईल असंच मला काल वाटून गेलं!

Sandy

चांदणे संदीप's picture

3 Jun 2016 - 7:14 am | चांदणे संदीप

माझं फेवरेट्ट.... अतिमधुर एक गाणं पण ॲडवा

"आपके हसीन रूख पे आज नया नूर है..."

Sandy

पुढचे कोणतेही गाणे ऐकू नये.

+ १२३४५६७८९०

महामाया's picture

1 Jun 2016 - 2:46 pm | महामाया

क्या बात है, मजा आ गया, सुबोध जी।

सुंदर आठवणी

दुर्गविहारी's picture

1 Jun 2016 - 8:46 pm | दुर्गविहारी

तलत विषयी मागे वाचले होते की परमेश्वराने प्रथम प्रेम निर्माण केले आणि जर प्रेमभन्ग झाला तर तो व्यक्त करण्यासाठी तलतला प्रुथ्वीवर पाठविले. मखमली स्वर ही फक्त या आवाजाला शोभते. गझलेचा बादशहाला माझा सलाम.
वरच्या यादीत आणखी भर घालतो.
मराठी:- विष हे अम्रुत झाले.
गया अन्धेरा हुआ उजाला, चमका चमका सुबहा का तारा ( लता सोबत चित्रपट :- सुबहा का तारा)
राही मतवाले ( सुरैय्या सोबत चित्रपट :- दिले ए नादान )
बैचैन नजर बेताब जिगर ( यास्मीन )
झुमे रे, निला अम्बर झुमे धरती को चुमे रे ( चित्रपट :- लालारुख )

मुक्त विहारि's picture

2 Jun 2016 - 7:11 am | मुक्त विहारि

तलतच्या आवाजा सारखाच एकदम मुलायम

महामाया's picture

2 Jun 2016 - 4:42 pm | महामाया

मुवि जी, धन्यवाद।

एस's picture

2 Jun 2016 - 5:05 pm | एस

शाम-ए-ग़म की क़सम....

अमेरिकन त्रिशंकू's picture

2 Jun 2016 - 5:06 pm | अमेरिकन त्रिशंकू

दुसर्‍या संस्थळावर याच लेखावर ही प्रतिक्रिया दिली होती तीच इथे देतोय.

पुण्यात टिळक स्मारक मंदिराकडून पेरूगेटकडे जायला लागलं की डाव्या हाताला फ्रेंड्स म्युझिक नावाचं एक दुकान होतं. आता आहे की नाही माहिती नाही.
त्यांच्याकडे जुन्या/नव्या गाण्यांचं मोठं कलेक्षन होतं आणि ते कॅसेट्वर ती टेप करून देत असत.

११-१२वीत असताना तलत नुकता आवडू लागला होता. त्या फेजमध्ये असताना त्यांच्याकडे असलेल्या गाण्यांच्या जाडजूड बाईंडरमधून तलतची गाणी शोधून काढली होती.
काल अडगळीमध्ये काहीतरी शोधत असताना जुन्या कॅसेट्सचं खोकं आणि त्यातली ती तलतची कॅसेट्पण सापडली. आणि आज हा लेख वाचला.

त्या कॅसेट्वरची गाणी कोणती होती हे सहज बघितलं. बहुतेक सगळी वरती लिहिली आहेत. सगळी आज आवडतातच असं नाही. पण एकत्र यादी राहावी म्हणून इथे लिहितोय.

ये हवा ये रात ये चांदनी - संगदिल
मैं दिल हूं एक अरमानभरा - अनहोनी
शाम ए गम की कसम - फूट्पाथ
मेरी यादमें तुम ना आंसू बहाना - मदहोश
आंसू समझके - छाया
देखली तेरी खुदाई - किनारें किनारें
मैं पागल मेरा मनवा पागल - आशियाना
सब कुछ लुटाके होशमें - इक साल
मुहब्बतही न जो समझे - परछाई
जलते है जिसके लिये - सुजाता
तस्वीर बनाता हूं - बारादरी
इतना ना मुझसे तू प्यार बढा - छाया
ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल - आरझू
जली जो शाखे चमन - तराना
ऐ मेरे दिल कहीं और चल - दाग
जिंदगी देने वाले सुन - दिल-ए-नादान
चल दिया कारवां - लैला मजनू
फिर मुझे दीदारे तर - मिर्झा गालिब
जायें तो जायें कहां - टॅक्सी ड्रायव्हर
रात ने क्या क्या ख्वाब दिखाये - एक गांव की कहानी
दो दिनकी मुहब्बत में हमने - छोटे बाबू
अश्कोने जो पाया है - चांदी की दीवार

दुर्गविहारी's picture

2 Jun 2016 - 8:31 pm | दुर्गविहारी

टिम टिम टिम तारोके दिप जले ( लता, चित्रपटः- दिवाली)
अन्धे जहाके अन्धे रास्ते जाये तो जाये कहा ( दाग)
सच बता तु मुझपे फिदा ( लालारुख ) आशा भोसले
कहेता है दिल तुम हो मेरे लिये ( सहगायिका आशा भोसले)
आ तेरी तस्वीर बना लू ( नन्दन )
महामायाजी आपण हा लेख लिहून मेन्दूवरची बर्याच दिवसाची धुळ झटकली आणि तलतच्या गाण्याना उजाळा मिळाला, त्याबद्दल आपले आभार.

पैसा's picture

4 Jun 2016 - 10:05 am | पैसा

तलत!

परत ऎकला , परत बोर झालो, असो

प्रदीप's picture

4 Jun 2016 - 6:14 pm | प्रदीप

छान आहे, व आवडला, फक्त त्यातील "मला वाटतं अशा प्रयोगांमुळेच भारतीय चित्रपट संगीताची घसरण सुरू झाली असावी' ह्या विधानास सोडून. असो.

तलत- लता ह्यांनी वेगवेगळी गायिलेली 'जोरू का गुलाम' ह्या एकाच चित्रपटातील (संगीतकारः जयदेव) मधील ही दोन गीतेही आहेतः

'सुबह का इंतजा़र कौन करे' :लता
'अब तेरा इंतजा़र कौन करे' :तलत

लताचे व्हर्शन शृंगारीक अहे, तलतचे हताश- दु:खी आहे.