संध्याकाळी ग्राउंडवर सगळेच जोशात होते. उद्या निघायचं म्हणून आज काही जास्त प्रँक्टिस नव्हती आणि मुख्य म्हणजे आज फायनल ७ ची कव्हर कळणार होती. आप्पा म्हणाल्या प्रमाणे ते काही टूरला येऊ शकत नव्हते त्यामुळे बर्याचश्या गोष्टी आजच ठरणार होत्या. १७ मुलींमधून टूरला जाणाऱ्या १२ जणी...... त्यातून सर्वप्रथम मैदानात उतरणाऱ्या ७ जणी कोण ?
वाँर्मअप झाला थोडी स्किल प्रँक्टिस झाली, आळीपाळीने सगळ्यांची कव्हर फिरवून झाली. खंर तर आम्ही वाट बघत होतो की आप्पा आत्ता सगळ्यांना बोलावतील आणि टूरची टीम सांगून पुढचा प्लान सांगतील. पण कसलं काय आणि कसलं काय? उलट आम्ही टंगळ-मंगळ करतोय बघून अंगावर ओरडले," चला..चला टाईमपास नकोय...अजून प्रत्येकीच्या १० रेड व्हायच्या आहेत त्याशिवाय सुटका नाही.. चला रेड करायला घ्या"
"हे बरोबर येत नाहीये तेच बंर आहे.. तिथे पण डोक्याला शॉट लावतील..." रेश्मा माझ्या कानात म्हणाली. आप्पा नाही मग आपल्याबरोबर कोण येणार? कि आपणच सगळ्याजणी? माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. सगळ्या आम्ही मुली नुसती धमाल करत आहोत..काही कोणाची कटकट नाही कि आरडा-ओरड नाही.. येता जाता कोणी काही सुनावणार नाही... वा.. अस झालं तर काय मज्जा येईल ना? माझा खयाली पुलाव सत्यात उतरणार आहे का हे मला कन्फर्म करून घ्यायचं होत म्हणून मी योग्याला विचारलं,"योग्या गब्बर नाहीये आपल्याबरोबर टूरला..मग कोण आहे? काही खबर लागली का?" योग्य त्या बाबतीत CID ची बाप आहे. बरोबर खबर काढून आणते. पण ह्या वेळेस अजून तिला पण खबर नव्हती म्हणजे अजून कोण यणार हे ठरलं नव्हत तर... ठीक आहे ना ... आता तरी त्यांना ठरवावं लागेलच… कारण उद्या संध्याकाळची गाडी होती आणि रिझर्वेशन फक्त आमची मुलींचीच होती. तेवढ्यात "आपल्याबरोबर दादा येणार आहेत" असं दीदी सांगत आली. चला दादा तर दादा... गब्बर सोडून कोणीही चालेल.
प्रँक्टिसला सुरुवात झाली. सगळ्यांच्या १० रेड मारून झाल्यावर आप्पांनी आम्हाला स्ट्रेचिंग करायला सांगितले आणि ते करता करता ते सूचना द्यायला लागले.
" सगळ्यांनी ऐका गं... मी नाहीये म्हणजे तुम्ही उंडारायचं नाहीये...तुमच्याबरोबर दादा असेल आणि तो सगळ्याचा रिपोर्ट मला देत राहणार आहे... रोज सकाळी नेहमी सारखा वाँर्मअप झालाच पाहिजे. ग्राउंडवर आणि ग्राउंडच्याबाहेर सगळ्यांनी शिस्तीत राहिलेच पाहिजे. उगाचच फालतूगिरी केली असं मला समजलं तर तंगडी तोडून ठेवेन एकेकीची... त्यावेळी तुमचे पालक काय म्हणतात आणि कोण आहेत हे बघणार नाही.. आणि हो मुलीचे प्रोब्लेम्स असतात ह्या नावाखाली वाँर्मअपला न येण खपवून घेतलं जाणार नाही. बाकी सगळ्या सूचना तुम्हाला माहित आहेतच. उन्हाळा आहे त्यामुळे जवळ इलेक्ट्रोलची पाकीटं ठेवा. प्रत्येकानं आपापलं मेडिकल कीट जवळ ठेवा. उगाच त्यावरून बोलाचाली, टोमणे आणि मारामारी नकोय... कीटचे २ सेट जवळ ठेवा.. लहान मुलींना नेताय त्यांच्याशी ताई सारखचं वागा... समोरची ज्युनियर टीम असेल तर आपल्याही ज्युनियरच खेळवा.. त्यांनाही अनुभव मिळाला पाहिजे... ग्राउंडमध्ये अजिबात भांडण नकोयत... पंचांचा निर्णय शेवटचा असतो हे लक्षात असू दया... जर लोकल टीम असेल तर ५ पाँइण्ट देऊन खेळायच्या इराद्यानेच लीड ठेवा.. " ह्या आणि अशा बर्याच सूचना दिल्या. मग त्यांनी कव्हर सांगितली. आमची नेहमीच कव्हर होती दीप्तीला मध्येच विश्रांती देण्याकरता पम्मी होती. अल्टरनेट रेडर म्हणून मीना आणि धनश्री होती. ज्युनियरच्या आँल- राउंडर अंकू आणि जिया होत्याच.
मग आम्ही जाऊन कपाटातून किट आणलं ( खेळताना घालायचा गणवेश). आपापल्या नंबर आणि साईझ प्रमाणे सगळ्यांनी किट घेतलं नि कलकलाट करत चेंगरूम मध्ये गेलो. तिथे दुसर्या दिवशी गाडीत खायला कोण कायकाय डबे आणणार आहे ह्यावर चर्चा सुरू झाली. मी पाव-भाजी नेणार होते. बुधवार असल्याने रेश्मा आणि योगिता चिकन आणणार होत्या. रुपाला शिरा आणायला सांगितलं. बराच वेळ चर्चा करून असा काही मेन्यु फायनल केला होता की बास.. सांगलीला दुष्काळ असल्याप्रमाणेच चाललं होत सगळ... १२ जणीत मिळून ५ पत्त्यांचे कँट घेणार होतो.
घरी आल्यावर बँग भरणं हा एक प्रोग्रॅम उरकायचा होता. त्या आधी मी टूरसाठी म्हणून काढून ठेवलेले कपडे जे पप्याने ढापलेले असणार ते शोधण हि मोठी कामगिरी करायची होती. ग्राउंडवर उद्याच्या डब्याच्या चर्चेमुळे आज जरा जास्तच भूक लागली होती. छानपैकी काळ्या वाटण्याचं तिखट सांबर, फडफडीत भात आणि जोडीला लोणचं असं हादडून झाल्यावर बँग भरण्याचा प्रोग्राम मी उद्यावर ढकलला आणि ताणून दिली. दुसर्या दिवशी सर्वप्रथम मी कपड्याच्या शोध मोहिमेवर रवाना झाले. अपेक्षेप्रमाणे कपडे गायब होतेच.. पप्याला कितीही दया पण माझे टी- शर्ट आणि ट्रँक का पळवतो ते मला समजत नाही. फायनली २ तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर माझे कपडे मला मिळाले आणि ती बँग भरली गेली. सगळ्यांचा निरोप घेऊन घरातून ७ वाजता निघाले.
आमचे महालक्ष्मीचे रिझर्वेशन होते आणि गाडी आम्ही ठाण्याला पकडणार होतो. ठरल्याप्रमाणे ठाणे स्टेशनला जमा झालो. आम्हाला ट्रेनमध्ये बसवून द्यायला आणि जमलच तर कान चावायला आप्पा आलेच होते. दादाचं रिझर्वेशन नसल्यामुळे ते बसने सांगलीला पोचणार होते. काही मुलींचे पालक देखील आले होते. आप्पा आणि आलेल्या पालकांच्या सूचना चालू होत्या तेवढ्यात गाडी आली त्या सूचना ऐकत ऐकतच गाडीत चढलो. एकमेकांचे निरोप घेतले आणि कोणी कुठे कस बसायचं ह्यावर खल सुरु झाला. खर तर जेवल्यावर आम्हा मोठ्या मुलींना गाण्याच्या भेंड्या आणि पाँइण्ट लावून मेंढी-कोट खेळायचा होता. पण लहान मुलींना एकटही बसवायचं नव्हत त्यामुळे ६ जणांच्या जागेत आम्ही १२ जणी बसलो. त्याच गर्दीत जेवण घेतले.. खर तर त आडवा हात मारावा असं जेवण होत पण ट्रेनचा प्रवास त्यातून पहाटे उठायचे असल्याने थोडं हातच राखूनच जेवलो. त्यानंतर लगेचच सीट प्रमाणे आपोआप २ गट पडले आणि गाण्याच्या भेंड्याना सुरुवात झाली. बराच वेळ घसा साफ केल्यावर जर दमायला झालं तोपर्यंत १२ वाजत आले होते. काही वेळातच पुणे येणार होत. पुण्याहून गाडी हलली कि झोपूया अस ठरवलं आणि टाइमपास चालू ठेवला, पण पुण्यानंतर होणार्या गोंधळाची आम्हाला कल्पना नव्हती.
क्रमशः
एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
प्रतिक्रिया
18 May 2016 - 12:31 pm | एस
आता पुण्याला काय वाढून ठेवलं असेल? उत्सुकता चाळवली गेली आहे. फारच भारी लिहिताय!
18 May 2016 - 12:34 pm | असंका
लोकल टीमबद्दलची सुचना-
_/\_
गोष्ट फारच सुंदर सांगत आहात!
धन्यवाद!
18 May 2016 - 12:50 pm | क्रेझी
सही है :) मस्त चालू आहे कथाप्रवास उत्सुकता ताणल्या जात आहे प्रत्येक भागात, लवकर पुढचा भाग टाका :)
18 May 2016 - 3:38 pm | नाखु
अगदी लिहून ठेवल्यात का कुठे या नोंदी? कारण कुठेही घटनाक्रम/क्रियापद चुकत नाही म्हणून विचारले?
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत वाचक नाखु
18 May 2016 - 6:04 pm | बोका-ए-आझम
हे लई म्हणजे लईच आवडण्यात आले आहे! मस्तच! पुभाप्र!
18 May 2016 - 7:10 pm | शि बि आय
☺ धन्यवाद
18 May 2016 - 8:57 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
19 May 2016 - 8:48 am | संजय पाटिल
वाचतोय ...
19 May 2016 - 9:41 am | शि बि आय
तशा बर्याच नोंदी मनात आहेत..हळूहळू त्या कथेत गुंफल्या जात आहेत पण कागदावर मात्र कुठेही नाहीत.. एक आपलं विश्व जपण्यासाठी त्या तशा करून ठेवल्या नाहीत पण आता त्यातल्या काही गोष्टी इथे सांगाव्या वाटल्या..
19 May 2016 - 9:48 am | अनुप ढेरे
छान चालुये!
25 May 2016 - 8:18 pm | सुधीर कांदळकर
सुंदर, अस्सल आणि वेगवान मालिका. उत्सुकता भरपूर ताणली गेलेली आहे.
धन्यवाद, पुभाप्र