धाप्प....
योग्याच्या पाठीत अप्पांचा दणकट हात पडला.. " काय गो बायं ... सकाळ सकाळ कशाला बेंबाटतसं..." आप्पांचा दणकट हात पाठीत पडल्यावर योग्याची चोच बंद झाली.. एकदम स्पिचलेस.. "काही नाही.. काही नाही सहजच आपलं ... " म्हणत मान सोडवून घेतली. आप्पांना काय समजायचे ते समजले होतं बहुतेक.. पण त्यांनी ते दाखवले नाही. सगळ्यांना वाँर्मअपला पिटाळले.
आम्ही वाँर्मअप करेपर्यंत आप्पा आणि बापू काही तरी बोलत होते. संजूचा सगळा जीव तिथेच अडकला होता. जास्त बोलायची बंदी असल्यामुळे मुकाट सगळ चालू होत. सगळ्यांनी आपापल्या बदलेल्या प्लेस घेतल्या कव्हर फिरवली. सगळ्यांना बरोबर उलट प्लेस दिल्या होत्या. रेड आणि कव्हर सुरु झाली. नेहमीप्रमाणे ओपनची टीम आणि ज्युनियरची टीम मिक्स करून २ टीम तयार झाल्या आणि त्यांच्यात मँच लावली. बापू स्वत: खेळत असल्यामुळे ते आलटून पालटून एका एका कव्हर मध्ये जाऊन प्लेस घेऊन पकडी कशा कराव्या हे सांगत होते. खुपदा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तसेच व्यावसायिक संघातून खेळत असल्यामुळे त्यांच्याकडे चिकार अनुभव होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमच्याबरोबर ते स्वत: उतरून आम्हाला दाखवत असे त्यामुळे बापू आले कि सगळ पब्लिक खुश असायच. आम्ही खेळाची मजा घेत आणि संजू त्यांना बघण्याचा आनंद घेत असतानाच लक्ष नसल्यामुळे रेशमाच्या पायात पाय अडकून धडपडली. सगळ्यांना दात काढायला कारणच मिळालं. आलेल्या संधीचा फायदा घेत दात काढत संजूची मस्त खेचत होतो. लगेच योग्य पुन्हा सुरु झाली, " कही पें निगाहे कही पे निशाना... " १५ मिनिटानंतर बापूंनी प्रँक्टीस थांबवली आणि काही नवीन स्किल्स दाखवले. बापू ग्राउंड वर आहेत म्हणून आप्पा लवकर गेले आणि आम्ही मोकाट सुटलो. बापूंना गुंडाळून ठेवत मनसोक्त हुंदडलो.
संध्याकाळी सुद्धा छान प्रँक्टीस झाली. दीप्ती ग्राउंडवर आल्यामुळे सगळ्या प्लेसच्या मुली होत्या. ७ चे कॉम्बिनेशन बसवले. आप्पा आमच्या बरोबर टूरला येणार नसल्यामुळे बर्याचश्या सूचना, प्लान इथेच करायचे होते. उद्यापासून फक्त ४ दिवस मिळणार होते. त्यातसुद्धा शेवटचा दिवस सकाळची प्रँक्टीस नव्हती. ह्या सकाळ संध्याकाळच्या सेशनने फार फायदा झाला होता. फिटनेस कमालीचा सुधारला होता आणि आम्ही जास्त काहीही न करता ज्युनियर मुलींची हवा गेली होती. तसंही दीप्तीचा किस्सा झाल्यापासून आम्हालाही काही करणं जीवावर आलं होत. उगाच मस्करीची कुस्करी नको व्हायला..
मी बाबांच्या मागे लागून नवीन शूज घेतले आणि दुसर्या दिवशी लगेच प्रँक्टीसला घातले. वाँर्मअप करेपर्यंत पायात ते शूज होते मग ग्राउंड वर उतरताना सगळ्यांनी जिथे शूज काढले तिथे मी ही काढले. मैदान आखलं कव्हर लावली मुली रेड करायला लागल्या. रेड चालू असताना सगळ्यात छोटी नंदा ओरडली, "ताई, तो बघ काळू बूट घेऊन पळून जातोय." आम्ही मागे वळून बघेपर्यंत तो बूट घेऊन लांब गेला सुद्धा होता. सगळ्यांनी नजरेनेच आपापले शूज जागेवर आहे का पहिले. मी पहिले तर तो नेमका माझाच १ बूट घेऊन ग्राउंडभर बागडत होता. आता त्याच्या तोंडातून बूट काढणे साधे काम नव्हते.
सगळ्या मुली साखळी-साखळी खेळताना हातात हात घालून पळतो तशी साखळी करून त्याला घेरण्याचा प्रयत्न करू लागलो. जर तो चुकून ग्राउंड च्या भिंतीपलीकडे गेला तर काही खर नव्हतं कारण मागे नाला होता. मग उरलेला दुसरा बूट पण त्यालाच द्यावा लागणार होता. आम्ही सगळ्या एकदम त्याच्या दिशेने येताना बघून तो अजूनच चेकाळला. काळू म्हणजे एक मोठ कुत्र्याचं काळं पिल्लू होत जे जन्मापासून ग्राउंडवर होत आणि कित्येक वेळा प्रँक्टीस नंतर आम्ही त्याच्याशी खेळलेलो होतो, प्रेमानं त्याला खाऊ घातलं होत पण आत्ताच्या क्षणी तो काय करेल आणि कसा वागेल हे सांगणं पण कठीण होत. आमचा त्याला पकडण्याचा प्रयत्न फेल होतोय अस दिसताच आप्पांनी पुर्वाला पैसे देऊन दुकानातून बिस्कीटं आणायल लावली आणि त्याला ती दाखवली. बिस्किटांची जादू चालली आणि माझा बूट त्याचा तावडीतून सुटला. काळूने बिस्कीट खाल्ली आणि आला तसाच कान उडवत कुठे तरी पसार झाला.
आज संध्याकाळी बापू म्हणल्याप्रमाणे मँचसाठी कोणतातरी टीम येणार होती. आमचा आम्ही तर्क लावायला प्रयत्न करत होतो पण काही काळात नव्हते. प्रँक्टीस झाल्यावर स्ट्रेचिंग करताना आप्पांनीच बॉम्ब टाकला, " ऐ … पोरींनो आज संध्याकाळी जरा लवकर या आणि ७ ला वाँर्मअप करून रेडी रहा... आज तुमची मँच आहे. बापू त्याची ज्युनियरची टीम घेऊन येणार आहे. चला आटपा लवकर.." आम्ही आ करून बघत राहिलो मुलांबरोबर मँच.. ! आप्पा लांब गेल्यावर कुजबुज सुरु झाली. जागुचं गटार सुरु झालं. " अरे काय च्यूxगिरी आहे ??? हि काय मँच असणार आहे का? पोरांना भोx x x x तेवढाच चान्स मिळतो ना… बापूंची गोष्ट वेगळी आहे यार... तो माणूस एवढा आपल्यात खेळतो पण चकुन आपला जरी त्याला धक्का लागला तर आपल्या ऐवजी साँरी ते म्हणतात. आता हि पोर कोणत्या टीमची आहेत कशी आहेत काय माहित… " संजू हळूच रेश्माला विचारात होती," रेश्मा त्या टीम मधून बापू खेळणार का ग? म्हणजे आपण प्रॉपर मँच खेळणार कि प्रँक्टीसला जसं असत तसंच असणारं.. " रेश्मा म्हणाली," संध्याकाळी कळेल गं मलाही माहित नाहीये त्यातून तुला घाई असेल तर जा आप्पांना विचार..." अशी बडबड सुरु असताना स्ट्रेचिंग आटपून आम्ही चेन्गरूममध्ये आलो आणि सगळ्यांना कंठ फुटला. रुपा, योग्या आणि पियू कधीही न पाहिलेल्या पोरांना ग्राउंडमध्ये तुडवायला तयार झाल्या होत्या. संजूला भलतीच चिंता पडली होती. मी, रेश्मा आणि गीता तेव्हाच तेव्हा बघू म्हणून शांत राहायचा प्रयत्न करत होतो. घरी जाताना जागुने प्रत्येकाला २ वेळा बजावून एक्स्ट्रा टी-शर्ट आणि हाफ पँन्ट आणायला सांगितली," मुलं खूप रावडी खेळतात हं आणि समोर मुली आहेत हे पाहिल्यावर त्यांना चेवच चढतो त्यामुळे एक्स्ट्रा टी-शर्ट आणि हाफ पँन्ट आणाच ! उगाच काही फाटलं बिटल तर पंगा नको... आणि हो उतराच्या आधी टी-शर्टच्या आत अजून एक टी-शर्ट घाला" छोट्या मुली तिच्या तोंडाकडे बघायला लागल्या. सगळ आवरून घरी जाताना योग्याने तिला शांत करायचा प्रयत्न केला पण ती अजिबात शांत व्हायला तयार नव्हती.
संध्याकाळी आम्ही ग्राउंडवर आलो. चेंज करून मैदान तयार केलं आणि वाँर्मअप करू लागलो. तेव्हढ्यात बापू त्यांचा ज्युनियरचा सेट घेऊन आले. " बापरे ! हि ज्युनियरची पोर???" रूपा गीताला म्हणाली. काही मुलं ज्युनियर नँशनलची होती काही स्टेटची होती हे त्यांना बघितल्यावर आम्हाला समजलं. त्यातल्या काहिंना आम्ही ओळखतही होतो. कारण नँशनलच्या बँचला ती मुलंही होती. सगळ्यांची उंची ५' ३'' ते ५' ७'' च्या मध्ये होती. व्यायामाने झालेले चपळ आणि काटक शरीर... त्यांनीही वाँर्मअप सुरु केला. लवकरच आमची स्ट्रेंथ आम्हाला कळणार होती. ह्या मुलांसमोर टिकाव लागला तर ठीक नाही तर कठीण होतं. आपला खेळ कसा उत्तम होईल ह्याकडे सगळ्याचं लक्ष होत.
क्रमशः
एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
प्रतिक्रिया
5 May 2016 - 1:39 pm | शलभ
मस्तच..मजा येतेय वाचायला..
5 May 2016 - 1:57 pm | अनुप ढेरे
जबरी! येऊ द्या लवकर पुढचा भाग
5 May 2016 - 2:07 pm | अभ्या..
हेहेहेहेहे. मस्तच. रिअल रिपोर्ट डैरेक्ट फ्रॉम ग्राउंड.
5 May 2016 - 2:22 pm | नीलमोहर
भारी !!
5 May 2016 - 2:56 pm | बाबा योगिराज
छान लिहिताय. और भी आने देव.
पुलेशु, पुभाप्र.
5 May 2016 - 3:17 pm | एस
एकदम अस्सल लिखाण! पुभाप्र.
5 May 2016 - 3:21 pm | तर्राट जोकर
मिपावरल्या जबरदस्त मालिकांमधली एक. जब्राट. आपण तर फ्यान झालो शि बि आय तुमचे. _/\_
5 May 2016 - 4:42 pm | टवाळ कार्टा
खिक्क
6 May 2016 - 12:26 am | अर्धवटराव
:)
6 May 2016 - 3:23 pm | शि बि आय
:)
धन्यवाद
__/\__
6 May 2016 - 3:44 pm | बोका-ए-आझम
चक दे ची आठवण झाली हे वाचून. येऊ द्या अजून. पुभाप्र!
7 May 2016 - 7:34 am | सुधीर कांदळकर
खेळाइतकेच वेगवान लेखन. मजा येते आहे वाचायला.
7 May 2016 - 2:57 pm | नाखु
जबर्या लिखाण...
प्रो (अक्टीव्ह) कब्बड्डी पंखा नाखु
7 May 2016 - 10:04 pm | गामा पैलवान
शीबीआय,
आम्ही आठवी नववीत असतांना आमच्या शाळेतल्या पोरी तुफान खेळायच्या. मुलींच्या विजेत्या संघासोबत आमच्या वर्गाची म्याच ठेवली असती तर आम्ही पोरं निश्चित हरलो असतो. बारातेराव्या वर्षी पोरींची अंगं चांगलीच थोरीव धरून राहतात. त्यामानानं पोरं कडकी पडतात. शिवाय आम्ही पडलो 'हुशार' वर्गातले. त्या काळी अभ्यासात हुशार म्हणजे खेळात ढ असा नियम होता आणि तो आमच्या वर्गास चपखलपणे लागू पडंत होता.
आ.न.,
-गा.पै.
7 May 2016 - 10:53 pm | एस
शेम पिंच. आमच्या शाळेचे कबड्डी-खोखो चे संघ जबरदस्त होते. मुलींच्या संघांशी आम्ही कधी म्यॅच लावू देत नसू गुरुजींना.
7 May 2016 - 10:09 pm | आतिवास
वेगळ्या विषयावरची लेखमाला आवडतेय.
प्रत्येक भागावर प्रतिसाद दिले नसले तरी लेखमाला आवर्जून वाचते आहे.