फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?
पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ?
याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात
ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही
तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस
तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील
कुठेतरी धडपडतही असशील,
काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना
तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली
त्याला तू तरी काय करशील?
नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?
न ही जैवीक गुणसूत्रांमधून वाटता येते,
देश शब्दातून 'जैवीक कुटूंबीय'
आदर्श शब्दातला आदर्श, त्यागी शब्दातला त्याग
गांधी शब्दातला गंध हरवलेला पाहून
तुझे डोळे पाणावले असतील
या विचारानेच तुझ्या अखंडभारत-कुटूंबातील गोरगरीबांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हाव्यात,
होय फिरोज,
तूझ्या सारखा देशप्रेमी आपल्या भारतीय कुटूंबात होऊन गेल्याचा अभिमान
ठेवणारा सामान्य देशवासीय, तुझी प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा या देशाच्या रक्षणासाठी
नक्कीच उभा टाकेल, ज्याला तुझे कार्य समजेल तूझा आशिर्वाद घेईल
तो अजून करु तरी काय शकेल
काळ चुकत असेल तर त्याला नक्कीच वठणीवर आणेल
अशी आशा करत डोळ्याच्या कडा पुसून,
पुन्हा एकदा नव्या जोशाने उभे टाकूया, एक सैनीक बनून
या आपल्या भारत भूमीच्या प्रेमा खातर !
चल उद्घोष करुयात जय हिंदचा मोठ्या जोमाने अजून एकदा आणि पुन्हा पुन्हा,
जय हिंद ! जय हिंद !!
.
.
.
.
(माझी सदर उपरोक्त कविता या मिसळपाव संस्थळावरील http://www.misalpav.com/node/35922 ह्या दुव्याचा संदर्भ आणि कवितेत बदल न करण्याच्या अटीवर, आणि अनुवादांसाठी पुर्वानुमतीच्या अटीवर प्रताधिकारमुक्त करत आहे)
प्रतिक्रिया
5 May 2016 - 11:19 am | एस
कविता आवडली. कै. फिरोज गांधी हे कमालीचे तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच त्यांच्या व त्यांच्या बायको, सासर्यांमध्ये वितुष्ट आले.
5 May 2016 - 1:19 pm | माहितगार
प्रतिसादासाठी धन्यवाद. आंतरजालावर आत्ताच एक बरेच जूने रोचक व्यंगचित्र पहाण्यात आले, फिरोजनी या व्यंगचित्राला सद्यस्थितीत दाद दिली असती असे वाटून गेले.
(सौजन्य :विकिमिडीया कॉमन्स दुवा)
थॉमस नास्ट या व्यंगचित्रकाराचे इस.१८७१ मध्ये न्युयॉर्क टाईम्स मध्ये आलेले व्यंगचित्रात तो विचारतोय ' सांगा, जनतेचा पैसा कुणी चोरला ?' तर व्यंगचित्रातील पात्रे चक्राकार उभे राहून प्रत्येकजण दुसर्याकडे बोट दाखवत 'त्याने' असे म्हणतोय.
5 May 2016 - 1:26 pm | पथिक
आवडली. फिरोज गांधी असे होते हे माहिती नव्हते.
5 May 2016 - 1:40 pm | माहितगार
देशप्रेम आणि भ्रष्ट्राचार विरोध या विषयातला हा अध्वर्यू,- प्रकरणे स्वतः शोधून संसदेत मांडत असे, हा पत्रकारांकडून नव्ह पत्रकार याच्याकडून माहिती घेत, भूमिका बांधताना-टिका करताना त्याने ना त्याच्या स्वधर्मीयांची गय केली ना स्व कुटूंबीयांची- त्याच्या स्वकुटूंबीयांना आणि स्वपक्षीयांना त्याचा वारसा सांगण्याची हिंमत होताना कधी दिसत नाही, कदाचित आठवण दिली कौतुक केले तर त्याचे कुटूंबीय आणि पक्ष वारसा सांगतील या भितीने किंवा इतर कारणाने विरोधी पक्ष अथवा तथाकथित चळवळे या माणसाची आठवण काढताना फारसे दिसत नाहीत.
5 May 2016 - 1:51 pm | पैसा
नंतरच्या पिढीतल्या जावयांचे प्रताप बघून या जावयाने जरा जास्त अधिकार का गाजवला नाही असे वाटते.
5 May 2016 - 2:42 pm | हकु
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र चालवण्यामध्ये फिरोज गांधी यांचा मोलाचा वाटा होता. अर्थात सध्या समोर आलेला घोटाळा हा त्या नंतरचा. पण काँग्रेस पैकी कोणीही त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही.
6 May 2016 - 2:00 am | यशोधरा
कविता आवडली आणि पटली.
27 Aug 2018 - 4:08 pm | माहितगार
फिरोज गांधींच्या भावी पिढ्यातील जैविक गुणसुत्रे सत्ता परिवारत राखण्यासाठी अद्यपही नाट्यमय साठमारीत गुंतलेली आहेत. सप्टेंबरात फिरोज गांधींची जयंती १२ सप्टे, आणि पुण्यतिथी ८ सप्टें आहे . त्यांचा जैव गुणसूत्रीय आणि राजकीय परिवार त्यांची आठवण ठेवणार नाही हे एका परीने या माणसाचा अपमान टळण्यासाठी बरेच आहे. फिरोज गांधींची आठवण सामान्य भारतीयांनीच करावी. सप्टेंबर जवळ येतोय, फिरोज गांधीं ची आठवण येण्यास निमीत्तही झाले तेव्हा हा धागा वर काढतोय.