गूढकथा - आग्या वेताळ

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 5:26 pm

तो काळ होता सन 1960. महाराष्ट्रातले एक खेडेगाव- धामनेर! आमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात. ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते?
एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे?

आता मी येथे एका झाडावर बसलो आहे. पोळ्यातला मध कुणी चोरत तर नाही ना यावर जातीने लक्ष देतोय...मी झाडावरच बसलेला असतो. कंटाळा आलाय या आयुष्याचा पण, मी काही करू शकत नाही.

या बसा! झाडाखाली बसा, सांगतो सगळं!

माझे वडील धामनेर पासून जवळ तालुक्याच्या ठिकाणी शिंकपूर येथे प्राथमिक शिक्षक होते. नुकतीच तिथे त्यांची बदली झाली होती. आम्ही दोघे त्या वेळेस 14 वर्षांचे होतो. मी आणि माझा दोन मिनिटांनी लहान भाऊ राज. दिसायला आम्ही अगदी एकसारखे नव्हतो. आम्ही दोघे धामनेर गावातल्याच शाळेत जायचो. कारण सगळ्यांना रोज तालुक्याला जा-ये सध्यातरी परवडली नसती आणि तालुक्याचे गाव राहायला थोडे महागच होते म्हणून आम्ही धामनेरला राहत होतो!

“जय? झाली का अंघोळ? राज थांबलाय अंघोळीचा! लवकर ये बाहेर! ” मातीच्या चुलीवर भाकरी थापत त्या दिवशी माई मला म्हणाली. आम्ही आमच्या आईला माई म्हणत असू! सकाळचे नऊ वाजले होते.

“चल आटोप लवकर! रोज माझ्या आधी नंबर लावतोस आणि अंघोळीला वेळ लावतोस! ” राज खेकसला.

अर्धवट अंग पुसतच मी मोरीतून पडदा बाजूला करून बाहेर आलो. तसा राज माझ्या डोक्यावर टपली मारून मध्ये घुसला.

“माई, बघ ना हा. रोज उशिरा उठतो आणि वर अंघोळीला जायची घाई पहिले असते. ” राज माईला म्हणाला.

तात्या- माझे वडील, शाळेत जायची तयारी करता करता रेडिओ ऐकत होते. आमचा दोघांचा आवाज ऐकून ते रेडिओ बंद करून पांढरा कुर्ता, धोतर आणि गांधी टोपी असा रोजचा पोशाख घालून बाहेर आले आणि आमच्या दोघांवर ओरडले, “गप्प बसा रे, नालायकांनो! रोज सकाळच्या वेळेला कशाला अंघोळीसाठी भांडता? ”

तात्यांनी त्यांची सायकल पुसायला घेतली.

“तुमची शिदोरी बांधलीय. ठेचा, काकडी, कांदा, भाकरी बांधलीय! पापडाचा चुरा पण दिलाय तेल मीठ टाकून! ” माई त्यांना कापडात बांधलेली शिदोरी देत म्हणाली.

“बाळांनो, नीट शाळेत जा, अभ्यास करा आणि गोंधळ घालून घरी तुमच्या माईला त्रास द्यायचा नाही बरं का? ” माझ्या पाठीत एक धपाटा घालत ते म्हणाले आणि सायकलवर टांग टाकून जायला निघाले.

मी रडत म्हणालो, “भांडतो आम्ही दोन्ही आणि फक्त मलाच मार बसतो!”

“उद्या त्याची पाळी मार खायची! ” तात्या म्हणाले आणि सायकलवर निघून गेले.
राज मला मोरीतून चिडवत होता, “बघा बघा, आग्या वेताळ कसा रडतो! ”

लहान मुले एकमेकांना आग्या वेताळ असे चिडवायचे. आग्या वेताळ काय आहे ते त्यांना माहितीही नव्हते. आमचे भांडण झाले की राज मला असे चिडवायचा कारण त्याला माहीत होते की, कोण जाणे का पण मी आग्या वेताळ या नावाचा धसका घेतला होता. त्या सकाळी शाळेत जाताना फक्त आग्या वेताळाचाच फक्त विचार करत होतो.

राज शाळेत त्याच्या मित्रांसोबत वेगळा जायचा आणि मी माझ्या!

मी आणि माझा मित्र भानू शाळेत सोबत जात होतो. कच्ची पायवाट होती. त्यावरून आम्ही दोघे चालत होतो. शाळा चार किलोमीटर दूर होती. मध्ये एक छोटासा ओढा लागायचा. मी उदास का आहे असे त्याने विचारले पण मी जवळ आग्या वेताळाचा विषय काढला नाही. कदाचित तो मला हसला असता.

आम्ही इतर गप्पा गोष्टी करत असताना ओढ्याजवळून चालत असताना एक मधमाशी माझ्या डोक्यावर घोंघावू लागली पण मी तिला हाताने हाकलून दूर केले पण ती परत परत येऊ लागली. तेव्हा डाव्या बाजूला मला एका झाडावर मधमाश्यांचे पोळे दिसले. राजवरचा राग मधमाश्यांवर काढण्यासाठी मी एक गुळगुळीत दगडगोटा उचलला आणि त्या पोळ्याकडे वेगाने मारून फेकला. तो दगड पोळ्याला लागून पुन्हा त्याच वेगाने जोरात माझ्या दिशेने आला, तो मी पटकन झेलला आणि थोडक्यात बचावलो नाहीतर माझा डोळाच फुटला असता…

त्या पोळ्यातील मधमाश्यांना काहीच झाले नाही. उलट त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांचा एकत्रितपणे हवेतच एक मोठा गोळा तयार झाला. जणू काही त्या माश्या एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत आहेत..!

भानू म्हणाला, “अरे कशाला त्या जीवांना त्रास देतो उगाच? ”

“अरे, मी तर सहजच!”,असे म्हणून मी विषय टाळला आणि म्हटले, “निघू इथून आता आपण! ”

तो दगडगोटा मी सहज खिशात टाकला आणि आम्ही शाळेकडे निघालो..

दुपारी चार वाजता शाळेतून घरी परत आलो. आमच्या घराच्या पाठीमागे थोडे दूर एक शेत होते. त्या शेताजवळ एक झोपडी होती. त्याजवळ एका खांबाला बैलांना बांधून ठेवले जात असे. त्या बैलांच्या गळ्यातील घंटानाद कानाला नेहमी सुमधुर वाटे! मध्येच एखादी थंडगार वाऱ्याची झुळूक यायची आणि त्या झुळुकेचा आस्वाद घेत घेत मी त्या बैल जोडीकडे नेहमी तासनतास बघत राहायचो, घंटांची किण किण ऐकत राहायचो.

माईला मी शाळेतून घरी आल्याची आरोळी दिली, अंगणातील भल्या मोठ्या रांजणातून एक तांब्याभर पाणी काढून पिले आणि अंगणातील एका बाजेवर (खाट) अंग टाकले. काल रात्री माईला आम्ही दोघांनी लाडू बनवायला मदत केली होती. त्यामुळे जागरण झाले होते. म्हणून मला जवळजवळ आता झोपच येत होती. तोपर्यंत माईने आमच्या मातीच्या घरासमोर शेणाने सारवायला सुरुवात केली.

अचानक खिशातल्या दगडाकडे माझे लक्ष गेले, कारण तो अचानक अतिशय गरम झाला होता. का, कुणास ठाऊक? त्याचा चटका सहन न होऊन तो मी जोराने भिरकावून फेकून दिला…!

मी बाजेवर पहुडलो असताना एक मधमाशी येऊन कानाजवळ त्रास देऊ लागली. गुर्र गुन्न असा आवाज काढू लागली. मी तिला हाकलले पण ती हट्टी होती आणि इकडे माझी झोप पण डोळ्यात मावत नव्हती. अचानक त्या मधमाशीचा आकार हळू हळू मोठा होत गेला, तिचे कानाजवळचे गुर्र गुर्र गुंन्न गुन्न सुद्धा वाढले आणि पाहता पाहता ती हवेत वर वर ढगापर्यंत जाऊ लागली आणि तिचा तो गुर्र गुर्र गुन्न गुन्न आवाज सुद्धा खूप मोठा होत गेला.

ती जसजशी दूर जात होती तसतसा तिचा आकार अधिकाधिक मोठा होत गेला...

त्यामुळे अधिकाधिक अंधार होत गेला. गुर्र गुन्न आवाज आकाशभर येत होता. ती ढगात पोहोचली आणि अचानक जळाली. मग तो मोठा ढग सुद्धा जळाला. ढगांतून ज्वालांचा पाऊस पडायला लागला...

ज्वाळांचे थेंब माझ्या दिशेने येत होती. त्या मधमाशीचे विद्रूप, काळे आणि आकाश व्यापायला निघालेले भयंकर ध्यान पाहून मी घाबरलो. तसेच तो भयंकर गुर्र गुन्न असा आवाज असह्य होवू लागला...

ते ज्वाळांचे थेंब माझेकडे येत आहेत असे पाहून मी किंचाळलो आणि कानावर हात ठेवत बाजेवर ताडकन उठून बसलो. आधीच दुपारचा उकाडा आणि त्यात घाबरल्यामुळे आलेल्या घामाच्या धारा!!

इकडे तिकडे पाहतो तो काय, आजूबाजूला मधमाशी कुठेच नव्हती!

वरचे ढग सुद्धा शांत होते. मग मला जाणवले की ते मला दिवसा पडलेले भयंकर स्वप्न होते. कदाचित दुपारी शाळेत जातांना मी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारल्याने तर मला असे होत नाही ना, असा विचार माझ्या मनात थोड्या वेळाकरता आला. माईला मी स्वप्न सांगितले जरी असते तरी तिने पाठीत एक धपाटा घातला असता आणि गृहपाठ कर म्हणून पिटाळले असते, म्हणून मी ते स्वप्न विसरून जायचे ठरवले.

संध्याकाळी तात्या आले. गृहपाठ वगैरे आटोपल्यानंतर आणि अंगणात खेळून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी रात्री अंगणात कंदिलाच्या आणि चंद्राच्या उजेडात खिचडी आणि लोणचे असे जेवण केले. आज सोबत काकडीसुद्धा होती. तात्यांनी येताना आणली होती.

आमचेकडे घरी अजून वीज नव्हती. वीज आम्हाला अजून परवडत नसे! कंदील लावूनच आम्ही दिवस (की रात्र) काढायचो. जेवण झाल्यावर आम्ही अंगणात बाजा आणि त्यावर अंथरून टाकले. कंदील विझवून चंद्राच्या उजेडात अंगणात सगळे झोपी गेले.

रात्री दहा वाजले असतील तरी मी अजून झोपलो नव्हतो. खाटीवर पडले पडले एका ढगाकडे लक्ष गेल्यावर मला दुपारचे स्वप्न आठवले आणि छातीत धस्स झाले. ते स्वप्न आठवल्यावर दुपारी कानाला सुखद वाटणारी त्या बैल जोडींच्या गळ्यातील किणकिण, आता मात्र थोडी गूढ वाटायला लागली. पण नंतर हळू हळू मला झोप यायला लागली!

पण आकाशातल्या ढगातून दोन मधमाश्या निघाल्या. खाली येऊ लागल्या. मग आणखी चार, आठ.. असे करत करत असंख्य मधमाश्या त्या ढगातून निघाल्या जसे काही ते ढग म्हणजे एक मोहोळच होते!

पावसाच्या धारांसारख्या त्या खाली बरसू लागल्या…

मी प्रचंड घाबरलो. इतका की मला लघुशंका लागली.

आणि बघतो तो काय? तो एक भास होता! ढगांत काहीही नव्हते! तो खरंच भास होता? पुन्हा मी बघितलेले स्वप्न होते का ते?

आता नक्की मध्यरात्र उलटून असेल, असे मला वाटले. घरात एकटा जाऊ घड्याळ बघण्याची माझी हिंमत काही झाली नाही. मी उठलो आणि मोरी मध्ये गेलो.

मोरीतल्या खिडकीतून समोरचे एक जीर्ण आणि महाकाय वडाचे झाड दिसत होते. त्याच्या पारंब्या चंद्राच्या उजेडात वेगळ्याच भासत होत्या. एका क्षणाकरता मला समोर असे दिसले की त्या पारंब्या नाहीत तर उलट्या लटकलेल्या असंख्य माणसांचे हातच आहेत!

या विचारात असतानाच त्या झाडामागून एक संपूर्णपणे सफेद अशी मानवाकृती बाहेर आली. चंद्रप्रकाशात ती आकृती आणखीनच सफेद दिसत होती. तो एक पांढराशुभ्र माणूस होता. (की सैतान?) तो माझेकडे एकटक बघू लागला. माझी नजर त्याच्या नजरेशी अचानक बांधली गेली.

मग, विचित्र हावभाव करत तो खाली बसला. पुन्हा हातपाय वेडेवाकडे करत उभा राहिला. पुन्हा खाली बसला. पुन्हा विकट हास्य हसत हसत तो वेडावाकडा उभा राहिला. मग तो झाडाला टेकला. थोडा वेळ चंद्राकडे त्याने एकटक पाहिले. चंद्राकडे पाहून तो ओळखीचे हसला. जणू काय चंद्रावरून त्याला कुणीतरी माणसाने हात हालवून ओळख दिली!

मग अचानक त्याने झाडाच्या दोनचार पारंब्या पकडल्या आणि त्यांना लटकत लटकत तो झोके घेऊ लागला. झोके घेताना तो एकटक माझेकडेच नजर लाऊन एकसारखा बघत होता. सोबतच इतर पारंब्या सुद्धा आपोआप हालू लागल्या. झोके घेताना तो काहीतरी बडबडत होता पण ते बडबडणे अर्थहीन आणि अतर्क्य वाटत होते...

आता माझी जवळपास दातखीळ बसायचीच बाकी होती.

शहारलेल्या अवस्थेत पटकन लघुशंका आटोपून मी पळत पळत तात्यांच्या खाटेजवळ गेलो. त्या गडबडीत मोरीचा पडदा ताणला गेल्याने डोक्यावर पडला आणि तसाच मी पळत सुटलो.

तात्यांना जोरजोराने हालवत मोठ्याने म्हणालो, “त..त... तात्या.. तात्या. भुरा सैतान! भु.. भु... भुरकट भूत! ”

ते ऐकून माई जागी झाली पण अजून तात्या जागे होत नव्हते. मी पडदा काढून बाजूला फेकला. तोपर्यंत तात्या जागी झाले. मी त्यांना कसेबसे सांगितले की मी वडाच्या झाडाखाली काय काय पाहिले.

त्यांनी प्रथम मला शांत केले आणि आम्हाला म्हणाले, “शांत बैस जय. पहिले शांत बैस! मुलांची आई, तुम्ही मध्ये जा! राजला घेऊन मध्ये घरात बसा! मी बघतो काय ते!”

राज सुद्धा यायचा आग्रह धरू लागला पण “मदत लागली तर तुला बोलवेन. तू माई सोबत घरात थांब” असे म्हणून त्यांनी त्याला येऊ दिले नाही. माई आणि राज घरामध्ये गेले.

तात्यांनी मला पाणी प्यायला दिले, स्वतः पाणी पिले आणि शांतपणे कंदील पेटवला आणि म्हणाले, “जय, कुठे आहे रे तो सैतान? दाखव बरं मला! ”

आमचे ते मातीचे घर थोडे मुख्य वस्तीपासून बाजूलाच होते. दूरवरच्या घरातील लोक गाढ झोपले असावेत आणि आमचे आवाज त्यांचे पर्यंत पोचले नसावेत कदाचित, कारण कुणीही जागे झालेले वाटत नव्हते. मग तात्या मला बरोबर घेऊन वडाच्या झाडाखाली आले. मी घाबरत घाबरत त्यांच्यासोबत आलो. पारंब्या थोड्या थोड्या हालत होत्या. तो पांढरा सैतान तेथे दिसत नव्हता.

“इथेच तर होता तो! झो.. झो .. झोके घेत होता”, ते भयंकर नजरबंदी चे खेळ असणारे “त्याचे” झोके मनात आठवून मी थरथर कापत म्हणालो.

“चल, झाडाच्या त्या बाजूने पाहू, जेथून तो बाहेर आला असे तू सांगतोस”, तात्या हिंमत एकवटून मला धीर देत म्हणाले.

आम्ही झाडाच्या मागच्या बाजूला आलो. बाहेर रातकिडे किर्र किर्र करत होते. बैलांच्या गळ्यातील घंटा किण किण करत होत्या. आमच्या पावलांमुळे जमिनीवरच पाला पाचोळा आवाज करत होता.

बाजूचे अंधारे शेत!
शेतात तीन बागुलबुवा हात पसरवून उभे होते.
उभ्या काड्या आणि त्यावर मोठे मडके आणि त्यावर खडूने काढलेले दोन मोठे डोळे! मी तिकडे बघून भयंकर शहारलो.

“व्हयोम…... व्हयो ssss म्”, असा भयंकर आवाज करत पारंब्यांना पायाने पकडून उलटा लटकलेला तो अभद्र सफेद सैतान तात्यांच्या चेहऱ्याजवळ वरून एकदम झोके घेत झेपावला. त्याचे डोळे आता लाल प्रखर प्रकाशाने पेटले होते. त्या डोळ्यांनी क्षणभर तात्या सुद्धा घाबरले पण ते लगेच सावरले.

मी तर जोरात किंचाळलो, “हाच तो सै.. सै..सैतान!”

तात्यांनी हिंमत करून त्याची हनुवटी धरून त्याला जोरात खाली ओढले. तो जमिनीवर धाडकन आदळला. तात्यांच्या या धाडसाचे मला त्या वेळेस कोण कौतुक वाटले म्हणून सांगू? सांगता सोय नाही! एका भयंकर सैतानाला आपण इतके घाबरलो होतो आणि त्याला तात्यांनी झाडावरून खाली पाडले! वा!

त्याला तात्यांनी जोरात ओढल्याने एक क्षण ते झाड थरथरले. सगळ्या पारंब्या जोराजोराने हेलकावे घेऊ लागल्या. तो सैतान खाली पडला. जमिनीवरच्या पानांचा जोरात आवाज झाला. एका वाळलेल्या पानांच्या ढिगाऱ्यावर तो अचानक पडल्याने बावचळला. मी झाडाला टेकून थोडा दुरूनच हा प्रकार बघत होतो. तात्यांनी कंदील झाडाच्या ढोलीत ठेवला. ते आजूबाजूला कुठे काठी दिसते का ते बघू लागले. त्यांना थोड्या अंतरावर एक काठी दिसली. ती काठी उचलायला ते थोडे बाजूला झाले आणि म्हणाले, “बघतोच आता तूला, या काठीनेच झोडपतो आणि उद्या पोलिसांच्या स्वाधीन करतो. तू कसला सैतान? तू तर कुणीतरी बहुरूपी मूर्ख वाटतो मला!”

तेवढ्यात तो सफेद सैतान जमिनीवरून वेगाने उठला….

आणि त्याने गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. तो तात्यांच्या तावडीत सापडला नाही. सगळे अचानक घडल्याने तात्यांना सुद्धा सावरायला वेळ लागला तेवढ्यात तो पळाला. आता त्याच्या मागे पळून उपयोग नव्हता कारण तो जिकडे पळाला तेथे काटेरी झाडे झुडुपे होती. पळताना त्याने एकदा थांबून एक विखारी नजर आमच्यावर टाकली. तो क्षण आम्ही दोघे जण एकमेकांकडे बघू लागलो आणि जबरदस्त घाबरलो..

नंतर पुन्हा पळून तो सैतान एका अंधाऱ्या झुडुपातून गायब झाला...

तात्यांनी कंदील घेतला, काठी घेतली आणि मला म्हणाले, “चल जय! घरात जाऊया आता! ”

“तात्या! तुम्ही खूप शूर आहात! ” मी म्हणालो.

त्या घटनेनंतर रात्रभर आम्ही सगळ्यांनी जागून काढली. सकाळी पाच वाजता आम्हाला थोडी झोप आली...
***

दिवस उजाडला. सकाळचा नेहेमीचा सूर्य गूढ आणि भकास वाटत होता.

सकाळी पेंगुळलेल्या अवस्थेत सगळ्यांनी आपापली कामे आटोपली…

तात्यांच्या शाळेत त्यांच्या सहकारी शिक्षकांसोबत आणि धामनेर गावात काही मित्रांसोबत तात्यांनी रात्रीच्या त्या अनुभवाविषयी नक्की चर्चा केली असावी. कारण, त्या दिवशी उशिरा संध्याकाळी शाळेतून घरी आल्याबरोबर पाणीही न पिता तात्यांनी मला एकच प्रश्न दरडावून विचारला, “तू काल एखाद्या मधमाश्यांच्या पोळ्याला त्रास दिला होतास काय? ”

मी घाबरत होतो. मला वाटले आता मला नक्की मार बसेल. राज आणि माई आमच्या दोघांकडे बघत होते. एकटक! आता काय होणार?

तात्या पुन्हा गर्जून म्हणाले, “ अरे सांग ना! मी काय विचारतोय तुला? ”

मी थरथरत म्हणालो, “मी … मी…दु दु दुपारी.. ”

तात्या आता सौम्य झाले, “ अरे सांगून टाक! नाहीतर आपले काही खरे नाही! मी तुला रागावणार नाही! सांग! ”

असे म्हटल्यावर मी थोडा दिलासा येऊन म्हणालो, “हो हो, मी … मी…दु दु काल दुपारी शाळेत जातांना सहज त्या ओढ्याजवळच्या एका मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला होता... पण पण.. ”

तात्या मला गदागदा हालवत म्हणाले: “अरे पण काय? बोल पुढे लवकर! ”

मी म्हणालो, “तो दगड पोळ्याला लागून वेगाने पुन्हा माझेकडे आला, पण मी तो चुकवला नाहीतर.. ”

तात्या: “अरे आता.. काय उपयोग? तुझ्याकडून एक मोठी चूक झाली आहे! ”

मी: “चूक.. कोणती चूक? ”

तात्या: “ आज मला चर्चेतून माहीत पडलं आहे की या गावात कुणीही मधमाश्यांचे नाव घेत नाही. त्रास देत नाही. आणि पौर्णिमेच्या आसपास तर मुळीच नाही. त्यांचे मध कुणीच काढत नाही. जर का तसे केले तर मधमाश्यांचा रक्षक म्हणजेच “आग्या वेताळ” त्यांचे रक्षण करतो, बदला घेतो. ”

मग मला हळू हळू लक्षात यायला लागले की मला मधमाश्यांचे भीतिदायक स्वप्न का पडले ते! पण मी ते कुणाला सांगितले नाही!

तात्या पुढे म्हणाले, “शाळेत जातांना जो पाण्याचा ओढा लागतो त्या ओढ्याच्या उजव्या बाजूला दूरवर एक पर्वत दिसतो. त्यावर अनेक मोठी झाडे दिसतात. मग पर्वत चढून गेले असता तेथे एक पडका छोटासा ऐतिहासिक किल्ला आहे. खरे तर तो किल्ला नाही तर एक ऐतिहासिक काळापासूनचे एकमेव बांधकाम उरले आहे जे आता पडझड होवून खराब झाले आहे. पण गावातले सगळेजण त्याला किल्लाच म्हणतात. काही लोकांनी बघितल्यानुसार बरेचदा रात्री पौर्णिमेच्या रात्री त्या पडक्या किल्ल्यातून एक जाळ निघतो आणि तो हळूहळू त्या झाडांजवळ जातो. तो जाळ अधांतरी तरंगत तरंगत जातो. आग लागलेला वेताळ म्हणजेच “आग्या वेताळ” असे लोक त्याला म्हणतात. ”

मी आवंढा गिळून विचारले: “मग, काल रात्री जो सैतान आला होता तोच आग्या वेताळ होता का? ”

आता आम्ही सगळेजण अंगणात खाली सतरंजी टाकून बसलो होतो... बाजूला कंदील होता. चंद्राचाही उजेड होता!

तात्या: “ नाही! तो या गावातला एक वेडा माणूस आहे. ”

मी: “वेडा माणूस? ”

मध्येच माई म्हणाली, “याला कशाला त्या मधमाश्यांची नाव घ्यायची दुर्बुद्धी सुचली कुणास ठाऊक? ”

राज: “ अगं माई! पहिले ऐक तर खरं तात्या काय म्हणत आहेत! ”

तात्या: “ऐका तर! मी काय सांगत होतो की कालचा तो भुरा सैतान एक वेडा आहे. तो एकदा आग्या वेताळाच्या तावडीत सापडला होता आणि त्यानंतरच त्याचे असे हाल झाले आहेत. तसा या गावात तो अनेक दिवस राहत आहे. त्या पर्वतावरच्या पडक्या किल्ल्यात तो राहतो. पण काही दिवस तो या गावातून गायब झाला होता. ”

माई पुन्हा म्हणाली, “आणि आमचा कारटा बघा, कसा गायब लोकांना परत आणतो ते? भलता हुश्शार आहे! ”

राज, “ माई गं! पहिले ऐक तर खरं पूर्ण हकीगत! ”

तात्या, “मी आपली रात्रीची हकीगत आणि वेड्याचे वर्णन सगळ्यांना सांगितल्यावर त्यांना वाटले की तो तोच वेडा आहे आणि तो काल रात्री या गावात परत आला होता. मला वाटते तू पोळ्याला दगड मारल्याने आग्या वेताळ पुन्हा जागृत झाला आणि तो वेडा पण परत आला! ”

मी घाबरत विचारले, “पण आग्या वेताळाने त्या वेड्याला का तावडीत पकडले होते? ”

तात्या सांगू लागले, “मी ज्यांना आपली कालची घटना सांगितली त्यांनी बड्या बुजुर्ग लोकांकडून असे ऐकलेय की एकदा धामनेर गावात एक मध चोरणारी आणि तो भरपूर मध वेड्यासारखी पोटभर पिणारी एक टोळी आली होती. त्या टोळीच्या नादी लागून त्या वेड्याने (जो आधी वेडा नव्हता) विनाकारण लाखो मधमाश्यांना जाळून जाळून ठार मारले होते. पैश्यांकरता!…ती रात्र पौर्णिमेची होती. त्यांनी त्या झाडांवरील मधमाश्यांत खूप बेधुंदपणे खळबळ माजवून खूप मध गोळा केला.”

राज मध्येच म्हणाला, “अशी भयंकर टोळी आली तरी कुठून? आणि ती टोळी एवढा मध का प्यायची?”

तात्या पुढे म्हणाले, “ती टोळी कुठून आली होती कुणालाच माहीत नाही. ती म्हणे अघोरी राक्षसांचीच एक प्रजाती होती! ती टोळी मधाची खूप भुकेली असते. चंद्राच्या उजेडात पौर्णिमेला ते एक अघोरी यज्ञ करत आणि मध पिऊन यज्ञाला बसत. यज्ञात मधाची आहुती देत. त्यामुळे त्यांना कसलीतरी अघोरी सिद्धी मिळत असे. पण त्या टोळीने जेव्हा तो मध त्या रात्री पडक्या किल्ल्यात बसून पोटभर पिला तेव्हा त्या सगळ्या जणांच्या शरीरावर फोड उगवले आणि त्या फोडांतून जाळ बाहेर येऊन त्यांना वेदना होऊ लागल्या. सकाळी ते सगळे मृतावस्थेत दिसले. त्यानंतरच त्या जळून मेलेल्या लाखो मधमाश्या भूत बनून म्हणजेच आग्या वेताळाचे रूप घेऊन पुन्हा आल्या, कारण मधमाश्यांचा एवढा भयानक संहार या आधी आजपर्यंत कधीच कुठेच झाला नव्हता म्हणे! त्या वेड्याने म्हणे निर्घृणपणे मधमाश्यांना जाळून मारण्याचे विविध उपाय त्या टोळीला सुचवले होते! पैशांकरता!”

सगळे श्वास रोखून ऐकत होते.

मी विचारले, “पुढे काय झाले? ”

तात्या सांगू लागले, “त्या वेड्याने तेव्हा मध पिला नव्हता पण तो आग्या वेताळाचा अभद्र आकार बघणे त्याच्या नशिबी आले. त्याच्याच कर्मामुळे! त्या आग्या वेताळाच्या तावडीत तो सापडला. त्या भयंकर अक्राळ विक्राळ वेताळाने त्याला घेरले, त्याच्या सर्वांगावर कडाडून चावे घेतले आणि त्या पौर्णिमेच्या मध्यरात्री गावाकडे पाय नेतील तिकडे भयानकपणे ओरडत तो पळत सुटला!”

राज म्हणाला, “बापरे, किती भयंकर आहे हे सगळे! पुढे काय घडले?”

तात्या पुढे म्हणाले, “पुढे आणखीन भयंकर प्रकार घडला. त्याने पळता पळता स्मशानात सुद्धा अनेक मुडदे पायदळी तुडवले. इतके की त्याला गणतीच नाही. काही लोकांनी ते बघितले तेव्हा त्यांना अभद्राची चाहूल लागली. गावात तो आल्यावर रात्री अर्धे अधिक गाव जागे झाले. मधमाश्यांना अकारण त्रास देऊन मारण्याची शिक्षा त्याला मिळाली सगळ्यांनी त्याला पिटाळून गावातून हाकलून दिले. कुणी म्हणे तो त्यानंतर पडक्या किल्ल्यात राहायला गेला. पोलीस सुद्धा त्याला पकडू शकले नाहीत. “

मी म्हणालो, “मग पुढे काय? तो गावात पुन्हा आला का?”

तात्या म्हणाले, “ मी ऐकल्याप्रमाणे त्या वेड्याच्या अंगात कधी कधी आग्या वेताळ येतो, विशेषतः पौर्णिमेच्या रात्री आणि त्याआधीच्या व नंतरच्या काही रात्री! अंगात आल्यावर तो वेडा इतका भयंकर दिसतो आणि वागतो की सांगता सोय नाही! ”

हे सगळे ऐकून आम्ही सगळेजण अत्यंत भयभीत झालो होतो.

राज ने विचारले: "आणि काल तो वेडा पळून कुठे गेला असेल? ”

तात्या: “आज सकाळी पाच वाजता गावातल्या अनेकांनी त्याला पर्वतावरच्या शिखरावर जाऊन छाती ठोकून आकांत करताना पहिले. सगळीकडे वाऱ्यासारखी खबर पसरली आहे की वेडा परत आलाय.. ”

मी विचारले, “मग आता आपण काय करायचे? "

तात्या म्हणाले, "आता आपण एकच करू. मला काहींनी सुचवल्यानुसार या गावातून आता बाडबिस्तरा गुंडाळून माझी शाळा ज्या गावात आहे त्या शिंकपूर या गावी जाऊया. तेच योग्य आहे. नाहीतर तो वेडा किंवा तो आग्या वेताळाच्या रूपातील मधमाश्या तुला किंवा आपल्या सगळ्यांना त्रास देण्याची शक्यता आहे! मी उद्या त्या गावात भाड्याच्या खोलीची चौकशी करतो आणि आपण लवकरच स्थलांतर करूया! आणि गावातली लोकही आपल्याला त्रास देऊ शकतात कारण आपण आग्या वेताळाला जागृत करायला कारणीभूत ठरलोय! ”

माई उद्वेगाने उद्गारली, “काय याने नसती ब्याद करून ठेवली! ”

मी: “माई, मी मुद्दाम थोडेच केले? आणि माझ्या दगडाने त्या मधमाश्यांना काहीही झाले नाही. उलट दगडच उलट्या पावली माझ्या कडे परत आला! उलट माझाच डोळा फुटता फुटता वाचला! ”

माई म्हणाली, “अरे पण तू पौर्णिमेच्या जवळपास त्यांचे नाव घेतले ना! ती पांढरी ब्याद आपल्या मागे लावलीस ना तू त्यामुळे!! दगड परत आला तेव्हा तुला काहीतरी संशय यायला हवा होता आणि त्या मधमाश्यांची माफी मागून घ्यायला हवी होती तू! "

मी: "आता मला काय माहिती होते असे? मी तो दगड खिशात टाकून आणला होता काल? "

माई: “काय? तू तो दगड घरी घेऊन आलास? फेक तो दगड!"

मी: "त्याच दिवशी म्हणजे काल दुपारी फेकला मी तो दगड त्या वडाच्या झाडावर! "

माई: "अरे अरे, हे काय केलेस करनाळ्या? "

तात्या: “जाऊद्या मुलांची माई! गप्प बसा! जे झाले ते झाले. आता फक्त आपण या गावातून स्थलांतर करेपर्यंत सुरक्षित कसे राहायचे ते बघायचे! मी उद्या आणखी चौकशी करून आपण सुरक्षित राहण्यासाठी यावर आणखी काही उपाय आहेत का ते तपासतो! तोपर्यंत सगळ्यांनी सावध राहा आणि कोणतीही गडबड नको! काय? कळलं ना? ”

राज ला विज्ञान आवडायचे. तो म्हणाला, "पण तात्या, फक्त मधमाश्यांना दगड मारून असे कुठे वेडे माणसं आणि भूत येतात का कुठे? मला नाही पटत आहे हे! ”

तात्यांनी उत्तर देण्याआधीच माई त्याला म्हणाली, “आता हा आपला वैज्ञानिक मुलगा आणखी नवी ब्याद आणणार की काय? ”

माई सुशिक्षित नव्हती पण अनुभवातून आलेल्या ज्ञानातून ती समोरच्याला बरोबर भयंकर मर्मभेदी टोमणे मारत असे!

तात्या म्हणाले, “अरे राज, काही गोष्टींवर विश्वास हा ठेवावा लागतो. आणि तू काय करणार आहेस? प्रयोगशाळेत मधमाश्यांवर किंवा वेड्या माणसावर प्रयोग करणार का? त्यात भूत शिरले आहे की नाही हे बघायला? एखादा लिटमस पेपर वापरून? ”

माई म्हणाली, ”काही लिटमस नाही आणि फिटमस नाही करणार तो! हा मुकाट्याने आणि गप्प गुमान बसणार घरात! नाहीतर मी खांबाला बांधून ठेवेन तुला! ”

राज हसत म्हणाला, “अरे! तुम्ही सगळे विज्ञानाची मजाक उडवत आहात! हे बरोबर नाही”

तात्या, “यात हसण्यासारखं काय आहे? मला एकच कळतं! जेव्हा जीवाला धोका असतो, तेव्हा आपण आपला बचाव करावा. विज्ञान श्रेष्ठ की श्रद्धा असा वाद करत बसू नये! रात्री वडाच्या झाडावर पहिले ते खरे होते ना? तूही खिडकीतून बघतच होतास ना? चला आता झोपा लवकर! या एक दोन दिवसात आपल्याला या गावातून निघण्याची तयारी करायची आहे. मी उद्या तुमचे या गावातल्या शाळेतून नाव काढून आणतो आणि तालुक्याच्या माझ्या शाळेत टाकतो! ”

तात्यांनी एकंदर परिस्थिती फार शांततेने हाताळली होती आणि आणीबाणीच्या प्रसंगी कुटुंबाला कसे वाचवायचे हे तात्याकडून शिकावे ही मात्र खात्री मला त्या रात्री झाली.

त्या रात्री आम्ही झोपताना आणि झोपल्यानंतर काहीच घडले नाही. रात्र अतिशय शांत गेली. बैलांच्या गळ्यातील किणकिण मधुर वाटत होती. कुणालाच कसलाच वाईट अनुभव आला नाही. ढग शांत होते. वारा शांतपणे वाहता होता. झाडांची पाने अतिशय संथपणे हालत होती. सगळे शांत आणि गाढ झोपले होते. तात्या फक्त एक दोनदा रात्री झोपेतून उठल्याचे पुसटसे मला अर्धवट झोपेत जाणवले. बहुतेक पाणी प्यायला उठले असावेत. त्या रात्री साधी एक मधमाशी सुद्धा स्वप्नात आली नाही.
***
शांत आणि गाढ झोप संपून प्रसन्न सकाळ उगवली. प्रसन्न मनाने सगळे उठले. सूर्य छानपैकी वर आला होता. अंगणात दात घासताना मला ते वडाचे झाड दिसले. सूर्यकिरणे त्यावर पडल्याने ते अतिशय सुंदर दिसत होते.

तात्या सकाळी लवकर घरातून निघून गेले. ते जातांना म्हणाले होते की बहुतेक आजच ते सगळं आटोपून येणार होते म्हणजे उद्या आम्हाला या गावातून निघता येणार होते. निघताना तात्या थोडे अस्वस्थ वाटत होते. सायकलवर टांग मारून ते निघाले आणि दिसेनासे झाले.

आम्ही दोघेजण त्या दिवशी शाळेत गेलो नाही.. पण आमच्या शक्य तेवढ्या मित्रांना भेटून आलो. माई सुद्धा आजूबाजूच्या घरात जी ओळखपाळख या गावात आल्यानंतर झाली होती त्यांना भेटून आली. बहुतेकांना आमच्या त्या घटनेबद्दल माहिती नव्हते आणि ज्यांना माहिती होते त्याची आम्हाला सहानुभूती होती. हे आधीच आम्हाला माहिती असते तर कदाचित मी त्या मधमाश्यांच्या पोळ्यांचे नाव घेतले नसते. पण का कोण जाणे, आम्हाला या गावातल्या त्या आग्या वेताळा च्या इतिहासाबाबत अपूर्ण ज्ञान होते आणि तेच अंगाशी आले होते. बहुतेक गावांत अशा कथा असतात पण बरेच वेळा आपण त्यांचा इतिहास आणून घेत नाही कारण त्या कथा आपल्याला भाकड कथा वाटतात. म्हणून आपण तिकडे जास्त लक्ष देत नाही. तसा या गावा बद्दल आम्हाला फारसा लगाव निर्माण झाला नव्हता कारण या गावात येऊन आम्हाला जास्त काळ झाला नव्हता. म्हणून येथून स्थलांतर करताना जास्त काही वाईट वाटणार नव्हते.

तात्या संध्याकाळी आले. त्यांनी सगळे बिल, उधारी फेडली होती. आमच्या शाळेतून आमचे नाव काढले होते. जेथे शक्य असेल तेथे स्थलांतराचे खरे कारण सांगणे त्यांनी टाळले होते. गावातील त्यांच्या स्नेह्यांना ते भेटून आले होते. दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन बैलगाड्यांतून या गावातून निघायचे आहे आहे त्यांनी जाहीर केले. पहिली एसटी सकाळी सात वाजता होती. पण सगळेजण आणि सामान एसटी ने परवडले नसते म्हणून बैलगाडीचा स्वस्त पर्याय निवडला होता. नव्या गावात घर सुद्धा निश्चित झाले होते. तसे नव्या गावात परवडणार नव्हते पण आता इलाजच नव्हता. हा निर्णय घावाच लागला होता. माई ने कपडे, भांडे, इतर महत्त्वाचे साहित्य असा सगळा समान गोण्यांमध्ये टाकून ठेवला.

आमचे दोघांचे साहित्य आम्ही एका छोट्या पोत्यात भरले. आणखी काही साहित्य असे मिळून पाच गोणी भरली आणि काही किरकोळ थैल्या असे सगळे बांधले गेले. उद्या जातांना फक्त वेळेवर भरायचे साहित्य असलेली आणखी एक गोणी भरणार होती.

त्या रात्री आम्ही अंगणात बसून कंदिलाच्या उजेडात जेवण केले. मसाला खिचडी आणि त्यावर लोणचे आणि उडदाचा पापड असा बेत होता. जे घडते आहे ते भाग्यात होतं असं समजून आम्ही एकमेकांना दोष न देता शांतपणे नेहमीचाच प्रसन्नतेने जेवण केले. बाजूला रेडियो होता. बिनाका गीतमाला सुरू होती. त्या काळातला सर्वात प्रसिद्ध गाण्यांचा कार्यक्रम. अमीन सायानी निवेदन करत करत एक एक गाणे ऐकवत होता. गाणी छान मधुर होती. नंतर बातम्या लागल्या.

त्या रात्री आम्ही अंगणात झोपल्यानंतर काहीच विशेष घडले नाही. रात्रीची सुरुवात अतिशय शांत झाली. आकाशातील शांत चंद्र मस्त ढगांसोबत मजा करत होता. काय मस्त उजेड होता सगळीकडे!

बैलांच्या गळ्यातील किणकिण मधुर वाटत होती. मध्यरात्रीपर्यंत कुणालाच कसलाच वाईट अनुभव आला नाही. ढग शांत होते. वारा शांतपणे वाहता होता. झाडांची पाने अतिशय संथपणे हालत होती. सगळे शांत आणि गाढ! आता असे वाटत होते आम्ही उगाच गांव सोडतोय. सगळे काही शांत तर होते.

रात्रीचे बारा वाजले असावेत. घरात स्टूलवर ठेवलेला आमचा रेडियो अचानक खर्र खर्र वाजायला लागला. असंख्य हिरवे भुंगे एकत्र येऊन आपल्या डोक्यावर भिर भिर करायला लागल्यावर जसा भयंकर आवाज होईल तसाच आवाज यायला लागला.

“मी स्वप्नात आहे का?”, मी मलाच विचारले.

मला समजतच नव्हते की मी स्वप्नात आहे की जागाच आहे?

एक क्षण वाटे की स्वप्न आहे, दुसरा क्षण वाटे की मी प्रत्यक्ष तो आवाज ऐकतो आहे. मला तो आवाज असह्य होत होता. मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण डोळे फक्त अर्धवट उघडले जात होते. असे वाटत होते मी खाटेवरच जायबंदी झालो आहे. तो आवाज अजून कर्कश झाला.

अचानक “व्हयोम…... व्हयो ssss म्” असा पुसटसा आवाज येताना मी ऐकला. असा आवाज मी कुठे ऐकला होता? त्या वडाच्या झाडावरचा तो सैतान! त्याचा अभद्र आवाज होता तो!

आणि ती रेडियो मधली खर्र खर्र? आलं लक्षात! भुंग्याचा आवाज नसेल तो! मधमाश्या असतील त्या? पण आवाज रेडियोतून आल्यासारखा का वाटतोय? मी कानावर हात दाबण्याचा प्रयत्न केला पण मला हातच हालवता येईनात. मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो पण पाय उचलता येईनात! मी ओरडण्याचा प्रयत्न करणार होतो, पण माझ्या तोंडावर कुणीतरी दाब देत आहे असे वाटत होते पण तसे कुणीही दिसत नव्हते.

अचानक रेडियो मधला आवाज बंद झाला आणि माझ्या अंगावर अचानक त्या दिवशीचा तो दगड येऊन आदळला. तो दगड छोटा होता पण अंगावर पडल्यावर असे वाटत होते जणू काही शंभर किलो वजनाचा दगड माझ्या छातीवर कुणीतरी ठेवला आहे. कालचक्र पुढे सरकल्याचा भास झाला. मला काळाची नीट जाणीवच होत नव्हती.

नंतर सगळे जण म्हणजे माई, तात्या, राज व इतर गावातले अनोळखी जण मला माझ्या अवतीभवती दिसले. ते मला हात धरून खाटेवरून ओढून काढण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी खाट जमिनीपासून उखडण्याचा प्रयत्न केला…

शेवटी माझे हात पाय डोळे शरीर हालले, पण अजून नीट बोलता येत नव्हते. मी खाटेपासून वेगळा झालो. मला सगळ्यांनी बैलगाडीत बसवले…

मला शुद्ध आली तेव्हा दिसले की घरावर मधमाश्यांच्या थव्याने आक्रमण केले होते. त्या जळत होत्या. त्यांचा एकत्रित आकार एका भयंकर राक्षसा सारखा दिसत होता. दुसरीकडे त्या वडाच्या झाडाजवळ बसून चंद्राकडे बघत तो पांढरा सैतान भेसूपणे हसत सुटला होता….

मला वाटते तात्यांनी तडक रात्रीच या गावातून निघण्याचा निर्णय घेतला असावा कारण समोर दोन बैलगाड्या आणि त्यांचे चालक दिसत होते. दोन पैकी एका बैलगाडीमध्ये पोते, बादल्या वगैरे समान आणि दुसऱ्या बैलगाडीत आम्ही सगळे! आणि तात्या सायकलवर! असे आम्ही निघालो होतो. सर्वांना त्या मधमाश्यांचा थोडा चावा बसला होता.

कुणीतरी म्हणाले की रात्रीचा एक वाजला होता.

बैलगाड्या तडक निघाल्या.

सामानाची बैलगाडी पुढे! आमची त्या मागे! आमच्या बैलगाडीवर जवळ ठेवलेला आमचा कंदील आणि रेडियो! आणि काही सामान!

आणि त्या बैलगाडीमागे आमचे तात्या सायकलवर!

त्या मधमाश्या घोंघावत घोंघावत त्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या वेड्याकडे गेल्या आणि त्याच्या अंगा खांद्यावर खेळू लागल्या...मग तो वेडा आणि त्याच्या अंगावरच्या त्या मधमाश्या अंधाऱ्या झुडुपात गायब झाले.

संकट टळले असे वाटून आम्हाला हायसे वाटले. आता फक्त तालुक्याच्या गावी पोहोचायचे! बस! आम्हाला त्या गावी पोचायला एक तास लागणार होता.
कुणीच नीट बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

अंधाऱ्या मातीच्या रस्त्यातून झाडा झुडपातून आम्ही पुढे पुढे जात होतो. पुढे पुढे जातच होतो. बैलांचा पळण्याचा आवाज. गळ्यातील घंटांची किणकिण! चालक निर्विकारपणे बैलगाडी चालवत होते. बैलांच्या वरच्या बाजूला कंदील टांगले होते. रस्ता दिसण्यासाठी! तसा चंद्राचा उजेडही होताच सोबत!

बराच वेळ प्रवास सुरु होता! शांत रस्ता. शांत प्रवास.
मधमाश्यांचे चावे दुखत होते. पण इलाज नव्हता.

अण्णांची कमाल होती. ते न थकता सायकल चालवत आमच्या दोन बैल गाड्यांच्या मागे मागे येत होते. रोजची सवयच होती त्यांना! मी माई च्या मांडीवर डोके टेकून पहुडलो होतो. राज झोपून गेला होता.

सगळ्या कंदिलांची ज्योत विझत चालली होती, पण चंद्राचा थोडा उजेड झाडांमधून आमच्यापर्यंत पोचत होता. अचानक रेडियो चालू झाला. त्यातून वेगळेच चमत्कारिक ध्वनी बाहेर पडू लागले. आधी कधीही कुणीही ऐकले नसतील असे!! शंभर माणसे एकत्र जमून एकमेकांच्या कानात काहीतरी सांगत आहेत असा आवाज येत होता. समोर पुसटसे तात्या दिसत होते. ते सायकल चालवत होते! का कुणास ठाऊक पण तात्या वेगळेच वाटत होते...

आणि आता, हे काय चाललंय समोर? तात्या तर चंद्राकडे एकटक बघत होते आणि हसत होते. समोर न बघता सायकल चालवत होते... नंतर त्यांनी चंद्राकडे बघून आपण ओळखीचे माणूस दिसल्यावर हात देतो तसा कुणालातरी हात दाखवला.

अचानक मला जाणवले की बैलगाड्यांचे चालक गायब झालेत! त्या आपोआप चालत होत्या! पुढच्या बाजूला लावलेले पण विझलेले कंदील हेलकावे खात होते. बापरे! हे काय अघटित घडते आहे?

आम्ही काळोख्या रस्त्यावर आलो जेथे वरचे आकाश दिसत होते. माई आणि राज कडे मी बघणार एवढ्यात चंद्रप्रकाश गायब झाला आणि बैलगाडीवरचा आमचा एकमेव कंदील विझला!

काळोख. ढिम्म काळोख!!

बैलांचा पायांचा आवाज नाहीसा झाला. किणकिण बंद झाली.
एका झाडावर एका क्षणाकरता मला तो वेडा उलटा टांगून हेलकावे घेतांना दिसला..आणि मग गायब!

आणि हे काय? आम्ही सगळे बैलगाडी सहित आणि तात्या सायकल सह तरंगत आहेत असे मला वाटू लागले.

वर आकाशात अनेक तारे उगवले. फक्त आकाशातच नाही तर आमच्या आजूबाजूला, अवती भवती, अगदी आमच्या जवळ तारेच तारे. बैलगाडी च्या खाली सुद्धा तारेच तारे!

नंतर ते तारे नसून त्या जळणाऱ्या मधमाश्या आहेत हे मला कळले. आणि जाणवले की आम्ही सगळे बैलगाडी आणि सायकलसह त्या पर्वतावरील पडक्या किल्ल्यात आलो होतो. कसे आलो ते माहीत नाही! आणि माहीत झाले असतेही तरी आता उशीर झाला होता…!!

“या पडक्या किल्ल्यात सहसा मध्यरात्री नंतर गेल्यास कुणी बाहेर परत येऊच शकत नाही”… हे मला माहीत नव्हते पण त्या रेडियोतून एक आवाज मला तसे बोलला. आपण एखाद्याच्या कानात हळूच सांगतो ना तसा तो आवाज होता.
तो आवाज हसायला लागला...

“पण आम्ही थोडेच आमच्या मर्जीने येथे आलो आहोत?”, मी सुध्दा अचानक त्या आवाजा प्रमाणे हळूच बोललो. का? ते मलाही कळत नव्हते.

त्यानंतर काय झाले ते आठवत नाही पण नंतर मी अगदी हलका होऊन उडायला लागलो होतो. राज, तात्या, माई आम्ही सगळे आता मधमाश्या झालो होतो.

आणि तो वेडा? त्याच्याशी आमची दोस्ती झाली आहे! आता त्याचे भय वाटत नाही! आम्ही सगळे त्या पडक्या वाड्यात राहतो. आता त्या किल्ल्यातून जो जळत्या मधमाश्यांचा जाळ निघतो त्यात आम्ही सगळे सुद्धा असतो! आम्ही आता आग्या वेताळाचा भाग बनलो आहोत.

(समाप्त)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

25 Apr 2016 - 5:42 pm | विजय पुरोहित

मस्तच लिहिलंय.
अगदी टिपिकल ग्रामीण मसाला मारलेली भयकथा.
वाचन अगदी एंजॉय केलं. मस्तच!!!

विजय पुरोहित's picture

25 Apr 2016 - 7:39 pm | विजय पुरोहित

अगदी तपशीलवार वर्णन, ग्रामीण समजुती, एक पारंपारिक मध्यमवर्गीय कुटुंब मस्तच चितारलंय हे सगळं! हे पुन्हा नमूद करतो.

निमिष सोनार's picture

25 Apr 2016 - 7:44 pm | निमिष सोनार

आभारी आहे!

हकु's picture

25 Apr 2016 - 7:13 pm | हकु

छान जमलीये.

निमिष सोनार's picture

25 Apr 2016 - 7:44 pm | निमिष सोनार

.

कानडाऊ योगेशु's picture

25 Apr 2016 - 9:00 pm | कानडाऊ योगेशु

दणकट लिहिली आहे.
पण राजला व "मी" ला जुळा का ठेवले ते ही भिन्न दिसणारे असे.
म्हणजे सुरवातीला जेव्हा हे समजले तेव्हा मला असे वाटले कि ह्या जुळेपणामुळे पुढे ट्विस्ट येऊ शकतो.

निमिष सोनार's picture

4 May 2016 - 4:39 pm | निमिष सोनार

जुळा ठेवण्याचा उद्देश होता मनात, पण नंतर तसा प्लॉट जमला नाही

कानडाऊ योगेशु's picture

5 May 2016 - 9:37 pm | कानडाऊ योगेशु

मला असे वाटुन गेले कि दगड मारलाय एकाने व आग्यावेताळ मागे लागलाय दुसर्याच्या असे काहीसे.!
पण बाकी कहाणी खत्रा आहे हे.वे.सां.न.ल.!

निमिष सोनार's picture

6 May 2016 - 12:13 pm | निमिष सोनार

आणखी चांगले लिहिण्याचा पुढे प्रयत्न करेन.

मला कळली गोष्ट.उद्या मी माझी सांगेन.राजला आणायचं का इकडे?

DEADPOOL's picture

25 Apr 2016 - 9:58 pm | DEADPOOL

छान!

वसंत वडाळकर_मालेगांव's picture

26 Apr 2016 - 3:59 pm | वसंत वडाळकर_मालेगांव

खूप भीतीदायक!

सिंधू वडाळकर's picture

26 Apr 2016 - 4:01 pm | सिंधू वडाळकर

अंगावर काटा आला!

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2016 - 5:39 pm | मराठी कथालेखक

छान

क्रेझी's picture

27 Apr 2016 - 2:53 pm | क्रेझी

डेंजर एकदम!

मी काय म्हणतो's picture

27 Apr 2016 - 3:17 pm | मी काय म्हणतो

एखादा चित्रपट बघतो आहोत असे वाटले!
छान कथा आहे! आणखी लिहा!

सुमीत's picture

27 Apr 2016 - 5:04 pm | सुमीत

ओघवती शैली, थोडी वेगळी थरार कथा

जेवढी वाचने त्या प्रमाणात प्रतिक्रिया कमी येत आहेत?
असे का बरे?

एक एकटा एकटाच's picture

5 May 2016 - 8:09 am | एक एकटा एकटाच

बहुतेक कथेची लांबी कारणीभुत असावी.
मोठ्या लांबीच्या कथा वाचकांना एका बैठकीत वाचणे कठिण जात असावे.
स्वानुभव आहे. त्यावरून हां कयास

पण तरीही गुढकथा भयकथा तुकड्या तुकड्यात वाचणे हयात मजा नाही. असं माझं वैयक्तिक मत.

आपण लिहित रहा.
पुढिल गुढकथेस शुभेच्छा.

निमिष सोनार's picture

5 May 2016 - 3:08 pm | निमिष सोनार

.

अत्रुप्त आत्मा's picture

5 May 2016 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा

नशिब तुमचं!
.
.
.
.
;)

पैसा's picture

4 May 2016 - 4:48 pm | पैसा

आवडली

एक एकटा एकटाच's picture

5 May 2016 - 8:05 am | एक एकटा एकटाच

चांगली आहे

मिनेश's picture

5 May 2016 - 11:30 am | मिनेश

चांगली कथा आहे

निमिष सोनार's picture

5 May 2016 - 3:08 pm | निमिष सोनार

.

असंका's picture

5 May 2016 - 3:42 pm | असंका

भयानक!!

आवडलं..
धन्यवाद!

मितान's picture

5 May 2016 - 5:17 pm | मितान

छान सांगितली आहे गोष्ट !

यशोधरा's picture

6 May 2016 - 11:05 pm | यशोधरा

आवडली कथा.

वाचकसंख्या 5000 चा टप्पा गाठेल काय?

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 12:04 pm | टवाळ कार्टा

स्वतःच रिफ्रेश करत बसा...वाढेल :)

नाखु's picture

11 May 2016 - 2:59 pm | नाखु

उत्तर इथे आहे

बर मग असं नाही की फक्त कवीगणच स्वतःच्या पाठ थोपटून घ्यायच्या विश्वात मशगुल असतात, ही बघ वेगवेगळ्या दगडावजा झाडाच्या पारावर बसलेली स्व तंत्र संस्थाने.

निळकंठ दशरथ गोरे
dorugaDe
shawshanky
सशुश्रीके
निमिष सोनार

आणि तजोंनी दाखवलेला आरसा
तजो बहुरंगी आयडी आहे पण वाद विवादात फारच शक्ती खर्च करतोय का काय असे मला वाटते तुला काय वाटते?

आणि हे बघ सोनार सगळ्यांचे कान टोचतो इथे सा़क्षात सोनाराचेच टोचले कान

संपुर्ण ईथे आहे वाचा आणि त्यातील तुअम्चा भागही वाचा साक्षात्कार होईल याची खात्री.

अक्सीर रामबाण इलाज हिमालयीन जडीबुटी दवाखाना नाखु