सारथी : स्वारी किल्ले प्रबळगड...,Prabalgad

ओंकार देशमुख's picture
ओंकार देशमुख in जनातलं, मनातलं
14 Jan 2009 - 8:22 pm

प्रबळगड आणि डावीकडे कलावंतीण
नमस्कार मित्रहो..
मगच्या रविवार - सोमवारी मि व माझा मित्र मोनिश पनवेल जवळच्या प्रबळगडावर गेलो होतो.
दोघेच होतो त्यामुळे गाडीवरच निघालो.सोबत तंबू ,शिधा ,भांडी-कुंडी , झोपायचं सामान घेतलं.
सधारण तीन साडेतीन तासानी ठाकूरवाडी म्हणजे पायथ्याच्या गावात पोचलो.मुंबई अगदी या गावापर्यंत येउन पोचली आहे. भल्या मोठ्या बंगल्यांच्या स्कीम्स , रेसोर्ट्स मुळे गावाला थोड्याच वर्षात शहरी लूक येइल हे नक्की.प्रबळगडजवळ कलावंतीण नावाचा सूळका आहे.बहूतेक ट्रेकर्स मध्ये गडापेक्षा हा सूळका त्याच्या दगडात कोरलेल्या पायय्रांमुळे प्रसिद्ध आहे.एक दीड तासाच्या पायपीटीनंतर आपण माचीवर पोचतो.पसारा ,उंची आणि कोकणातलं दमट हवामानमुळे प्रबळगडानी माझी तर पूरती हवा काढली.
गडाच्या माचीवर प्रबळगडमाची नावाचं १०-२० घरांचं गाव आहे.पूण्यापेक्षा मुंबईला हा गड जवळ असल्यामुळे तिथली लोकं जास्त भेटं देतात.
शिधा बरोबर नेला नसल्यास आगाऊ संगितलं तर या गावातली लोकं सूद्धा जेवणाची व्यवस्था करतात.फ़क्त अगदी पंचपक्वांनाची अपेक्षा करू नये.जेवाण झाल्यानंतर त्यांना पूरेसा मोबदला द्यावा.परंतू उगाच जास्त पैसे देउ नयेत.नाहीतर ते ताडी पिउन उडवतात.आम्हाला भेटलेले १,२ सोडले तर सगळे फ़ूल टल्लीच होते.
दूपारी पोचल्यावर कलावंतीणीवर चढायला सुरवात केली.चार साडेचार ला वरती पोचलो.
अंधार पडायच्या आत फोटो काढून घेतले. प्रबळगडच्या माहीतीचा छोटा विडीओ घेतला.जातानाच चूलीसाठी वळलेली लाकडं घेउन वर गेलो.पोचलो तेव्हा वारा पडला होता. थोडा वेळ विश्रांती घेउन मॅगी करायला घेतली.अग्नीदेव फारच लवकर प्रसन्न झाल्यामुळे पोटपूजा लवकर संपली.
तंबू टाकून मुंबईला जाणाय्रा विमानांकडे पाहात बसलो ,गप्पांनंतर झोपलो.तंबू कड्यापासून १ फ़ूटावरचं होता कारण दूसरी सपाट जागाच नव्हती. कडा पण चांगला एक दीड हजार फ़ुट होता.रात्री झोपताना वारा अगदी शून्य होता. कशाला स्वेटर आणले असं वाटल.आभाळ आल्यामूळे जास्तच गरम होत होतं.तंबूच्या जाळीतून ढगांच्या मागून पळणाय्रा चंद्राला बघत झोप लागली.पण रात्री असा काही वारा सूटला की काय सांगायचं. तंबू वाकून अगदी चेहय्राला टेकत होता.दार वाय्रावर फ़डा फ़डा वाजत होतं.मधेच बाहेर राहीलेली बाटली गडगडत गेल्याचा आवाज आला.आम्ही दोघे कुंभकर्ण तसेच दडपुन झोपुन राहीलो.६ ला पुढे चालू लागायचं असं झोपताना ठरवून साडेआठला उठलो.वारा पळत होताच.शेवटी मी उठलो.चेन उघडून बाहेर डोकं काढलं.सूर्य अजून ढगातच होत.मोन्याला म्हणजे मोनिश ला हलवून मि बाहेर पाउल टाकून बूट घालत होतो तेव्हड्यात जोरात वारा आला आणि तंबू मोन्याला घेउन कड्याकडे सरकला. उडी मारून तंबू धरला ,मोन्यापण धक्क्यानं जागा झाला आणि बाहेर येउन बसला.तो बाहेर आल्यावर तर तंबू अजून जोरात हालू लागला.तसचं त्याला गूंडाळलं आणि सामान आवरलं.

निवांत उठून परत तोच मॅगी चा नाश्ता केला.काल येताना एका ठाकराने वरती पाण्याचे टाकं असल्याचं सांगीतलं होतं , पाण्याची एकचं बाटली शिल्लक होती म्हणून टाकं शोधायचं ठरवलं . तूम्हाला जमणार नाही अस त्यानी आम्हाला सांगीतलं होतं.पण आमच्या अंगात कीडे आणि अडवायला ही कोणि नसल्यामुळे टाकं शोध सुरू केला.सूळक्याच्या उत्तरेला वाट खाली खिंडीत उतरत होती.मधे-मधे पायय्रा खोदलेल्या होत्या.
पण रेती आणि गवतामुळे वाट निसरडी झाली होती.खाली घसरलो तर सरळ यमाकडे पोच पावती मिळायची.
तसेच कड्यवरून खंद्यावर पाय ठेवत उतरून खिंडीत आलो.दोन्ही बाजूला खोल दरी होती ,दरीत जंगल आणि पायाखाली घसरडी माती.खिंड अगदी ताशीव आहे,टाकीचे घाव कातळावर दिसतात.तिथे उतरल्यावर डाव्या बाजूल खाली सधारण अडीच बाय अडीच फूटची गूहा दिसली.वाकून बघितल्यावर गूहा बरीच खोल असल्याची जाणीव झाली.आत काळाकुट्ट आंधार होता.मोन्यानी दोन चार दगड आत टाकून बघून आत काही आहे का ते बघितल. थोडा विचार करून आत जाउया असं ठरलं,टॉर्च नव्हताच मग मोन्यानी त्याचा मोबाइल काढला.त्याच्या अंधूक प्रकाशा गूढग्यावर रांगत आत शिरलो.आत कूबट वास पसरला होता.पण तो वट्वाघळांचा नव्हाता.रांगत रांगत १०’ आत गेलो वाट डावीकडे जाउन परत उजवीकडे वळली होती.पुढे जाउच असं ठरवून परत आत सरकलो.पुढे पाहतो तर वाट परत डावीकडे वळली होती.अंधार,वास आणि थोडी भिती मुळे जोरदार घाम फूटला होता.डवीकडे ,उजवीकडे करत २५’-३०’ आत आलो होतो.सुदैवाने आत काही हालचाल जाणवत नव्हती.तसेच पुढे सरकलो ,वाट काहीशी संपल्यासारखी वाटली.खालचे खडे गुढग्याला टोचत होते.वाट संपली, मोबाईलच्या प्रकाशात आत बघितले तर चांगली २५’लांब १५’ रुंद ४’उंच दगडात कोरलेली खोली होती. चारही बाजूला क्षारांचे पंढरे ओहोळ दिसत होते.कोपय्रात थोडी लाकडं जमा केलेली दिसली.थोडा वेळ थांबून चारही बाजूला काय काय आहे ते पाहीलं आतपर्यंत हवा पोचत नसल्यमुळे घुसमट होत होती.घामानी अंग भिजलं होतं.गुहेत कोंडल्यासारख वाटत होतं मग लगेच रांगत बाहेर पडलो.बाहेर आल्यावर एकदम भारी वाटलं,मोकळ्या हवेच महत्व पटलं.
गुहेच्या बाहेर परत वाटेवर आलो.पुढे वाट टाक्याकडे जात होती.डावीकडे वळून कड्याला चिकटून गवत पायात दाबत पुढे चालू लागलो.खाली खोलवर प्रबळगड्माची गाव दिसत होतं,गावतून येणारे आवाज दरीमध्ये घूमत होते.३०,४० पावलं पुढे गेल्यावर टाकं लागलं पाणी एकदम हिरवगार ,शेवाळ्यान भरलेलं निवळीचे किडे मधेमधे फ़िरत होते.कड्याच्या इतक्या कडेला टाकं कसं खोदलं असेल यचं आश्चर्य वाटत होतं. १० १५ मिनीट बसलो.बय्राच वेळानी सावली मिळाली.
टाक्यापर्यंत आलेली वाट पुढे दरीकडे कातळाला चिकटून उतरत होती.मोन्या म्हणाल मी २ मिनिटात बघून येतो.तो गेला आणि मी खालच्या दरीतलं जंगल बघत बसलो.धनगर आणि त्याची जनावरं बारीक ठिपक्यासारखी दिसत होती. तो बहुधा मला हात दाखवत होता.काही कळत नव्हतं.१० १५ मिनिट झाली मोन्या परत आलाच नाही.मग हाका मारायला सुरूवात केली.दरीतून आवाज घुमून परत मलाच ऐकू येत होता.पण मोन्याच्या काही रीप्ल्याय नाही.५-१० मिनिटं गेली. हाका चालूच होत्या.मग मी पण ती वाट उतरू लागलो. पहिल्यांदा दगडातल्या काही २’-२.५’ पायय्रा लागल्या. वाट कड्याला चिकटून गोल फिरत पुढे जात होती.मोन्याचा पत्ताच नव्हता शेवटी मी खाली दरीत कुठे दिसतोय ते बघयला लागलो.धनगर माझ्याकडे बघत उभा होता.मधेच हात हलवत होता.वाट हळूहळू लहान लहान होत होती.दगडं संपून गवत चालू झालं.दोन्ही हातांनी डावीकडच्या कातळाला धरून मी पुढे जात होतो.वाट इतकी लहान झाली होती की पावलं शेजारी शेजारी मावत नव्हती.खाली तर दरी होतीच.आता मी मोन्याला हाका मारणं पण बंद केलं.फक्त खाली दरीत बघत होतो.पण जंगलाशिवाय काहीच दिसत नव्हत.आतापर्यंत बराच पुढे आलो होतो.
सूळक्याला जवळजवळ पाउण प्रदक्षीणा झाली होती आणि वाटचं संपली. मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता.इकडे तिकडे बघितलं , हात जिथ टेकला होता तीच खोबण होती तीच्या वरती अजुन एक अशा वरती जाणाय्रा दगडातल्या पायय्रा दिसल्या.जेमतेम आपला चवडा मावेल इतक्या. एक एक पायरी वरती चढू लागलो.मध्येच वाय्रानी तोल जात होता.डोळ्यात धूळ भरत होती.चढत चढत १५ ’-२०’ वरती आलो आणि पुढच्या पायय्राच दिसेनात.गवतात सगळ गडप झालं होतं. जास्त पाय ताणला असता तर पायात गोळे येतात म्हणून तेही करत नव्हतो , पायात गोळा आल तर थेट खालीच.पाच दहा मिनिट तसाच एका जागी थांबलो.घामानी अंग भिजलं होतं आणि भितीनं पाय लटपटत होते.दोन्ही हात दगडाच्या फटीत घातले होते.उजवीकडे थोद्या लांब एक दगड होता,त्यावर गवत माजलं होतं.पाय थोडा ताणून तिथं टेकवला.स्थिर झालो.
उजव्या बाजूला आधार शोधत होतो तितल्यात पायाखालचा दगड खाली सरकला ,हाताला धरायला काहीच मिळालं नाही आणि दगडावर घासत ५-६ इंच खाली घसरलो.पण त्या छोट्या अंतरानी अगदी ब्रंम्हांड आठवलं , अगदी कपाळात जायची वेळ आली.एका क्षणात आयुष्याचा फ़्लॅशबॅक डोळ्यासमोरुन गेला.आइ बाबांची अगदी मनापासून आठवण आली.उद्याच्या पेपरामधली ’तरूण बेपत्ता’ची बातमी दिसू लागली.खाली पडलो तर तुकडे गोळा करायला NGS Commandosना बोलवायला लागलं असतं.तेही मिळाले असते का यात शंकाच आहे. मोन्याची काळजी होती.दोन मिनिट जागीच तडफडत पोटावर भार देउन उभा होतो.पायाखाली आधाराला काही नव्हतच.हाताला आधाराला थोडी जागा मिळाली.चित्रगुप्त माझ्या वहीत समाप्त असं लिहिणार तेव्हड्यात वरून मोनिश ची हाक ऐकू आली.मोन्या वरती १०’ वर उभा होता.हातात छोटी दोरी होती.मोन्याला बघितल्यावर एकदम जिवात जीव आला आणि परत त्याच दगडावर पाय देउन वरती सरकलो.थोडी सपाट आडवी जागा मिळाली.मोन्याच्या चेहय्रावर पण मी दिसल्याचं समाधान दिसत होतं.वरती जाउन कड्याला टेकून उभा राहीलो.पण वरती पायय्रा नव्हत्या.डावीकडे वाटच नव्हती.उजवीकडे नशीबानी पायवाट दिसली,१५ २० पावलं चालल्यानंतर सूकलेलं टाकं लागलं.चित्रगुप्तानं पेन खाली ठेउन वही मिटली.
मोन्या उतरून खाली आला होता.मग तिकडून पुढे मूख्य पायवाटेला लागलो.मागे वळून परत एकदा कड्याकडे बघितलं आणि मावळ्यानी आशा कड्यावर पायय्रा कशा खोदल्या आसतील असा विचार केला.१० १५ मिनिट दगडावर बसलो.पाय अजूनही हालत होते.मोन्याही त्याच वाटेनं वरती आला होता आणि त्याचीही परिस्थिती माझ्यासारखीच झाली होती.त्याचाही घसा हाका मारून कोरडा झाला होता.पण दोघांनाही कशा ऐकू आल्या नाहीत याचं खूप आश्चर्य वाटलं.मग दोघही माझी कशी फाटली हे दोघांना सांगू लागलो.त्याला पण मी कदाचीत खाली गेलो असं वाटून तो दोरी वगरे घेउन निघाला होता.मग परत पायवाटेनं सूळक्याच्या वरती गेलो.सामान तिथेच पडलं होतं.१५ मिनिट बसलो,एकमेकांचे किस्से ऐकले आणि खाली गावात निघालो.वेळ नसल्यामुळे गडावार जाण्याचं कॅन्सल केलं.

कलवंतीण आमच्याकडे बघून हसत असल्याचा भास होत होता.म्रूत्यूच भय काय असत ते जाणवलं.गावात थोडा वेळ थांबून कोरा चहा घेउन थेट खाली वडापाशी पोचलो.गाडीवर टांग मारून पूण्याकडे निघालो पण मनातून मात्र त्या कड्यावर तसाच लटकत होतो.....

प्रबळगडावरून कलावंतीण

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

चित्रा's picture

15 Jan 2009 - 7:02 am | चित्रा

मस्त अनुभव आणि वर्णन. "कलावंतीण" पाहून थक्क व्हायला झाले.

पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.

सहज's picture

15 Jan 2009 - 8:37 am | सहज

काय फोटो आहे.

पुढील मुशाफिरीला तसेच लिखाणाला शुभेच्छा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2009 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनेक वर्षांपूर्वी प्रबळवर गेले होते त्याची आठवण झाली.
ओंकारराव तुम्हाला आणि तुमच्या मित्राला सलाम! माझी तर अजिबातच हिंमत नाही कलावंतीण चढण्याची!! तुमचा हा किस्सा वाचूनच अंगावर काटा आला.

अवांतर माहिती: माथेरानच्या आधी ब्रिटीशांच्या मनात 'हिल स्टेशन' म्हणून प्रबळगडच भरला होता. पण उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे समोरचा माथेरानचाच डोंगर हिल स्टेशन म्हणून वापरात आला. अर्थात प्रबळवर इंग्रजांच्या खुणा नाहीत असं नाही, एक पडका बुरूज वगैरे इंग्रजांचीच करामत असावी. पण क्वचित असंही वाटतं की पाण्याच्या कारणामुळे प्रबळगड हा 'किल्ला' झाला नसावा आणि बांधकाम अर्धवट सोडलं असावं.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, गोड बोलण्यासाठी संक्रांतीची आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

रम्या's picture

15 Jan 2009 - 12:27 pm | रम्या

प्रबळगडावर अजूनही किल्ल्याचे बांधकाम भग्नावस्थेत आहे.
काही वर्षापूर्वी प्रबळगडावर गेलो होतो. माथ्यावरच्या दाट जंगलामुळे बांधकामाचे अवशेष लवकर सापडत नाही.
पण दगडात आंघोळीच्या टबासारखे खोदकाम केलेलं पाहिलेय. हौदात उतरण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या केल्या होत्या.
गडावरची इतर बांधकामे सुद्धा भग्नावस्थेत आहेत. पण शोध मात्र घ्यावा लागतो.

आम्ही येथे पडीक असतो!

विसोबा खेचर's picture

15 Jan 2009 - 12:59 pm | विसोबा खेचर

ओंकारराव,

लै भारी! येऊ द्या अजूनही...

तात्या.

सुमीत भातखंडे's picture

15 Jan 2009 - 2:37 pm | सुमीत भातखंडे

सॉल्लीड अनुभव कथन. खरच अंगावर काटा आला.

अनिल हटेला's picture

15 Jan 2009 - 2:55 pm | अनिल हटेला

सलाम तुमच्या मुशाफीरीला!!
काटा आला फोटो बघुनच...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पाषाणभेद's picture

15 Jan 2009 - 5:24 pm | पाषाणभेद

पाली येथील सरसगडावर आमची अशीच फजीती झाली होती त्याची आठवण झाली.
पुढील मोहीमेस शुभेच्छा!

-( सणकी )पाषाणभेद

वृषाली's picture

15 Jan 2009 - 6:20 pm | वृषाली

साहसी अनुभव कथन फार छान.

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

सुमीत's picture

16 Jan 2009 - 2:53 pm | सुमीत

खूप मोठे धाडस केले तुम्ही दोघांनी, अनुभव खुप छान लिहिला आहे.
अजून असे अनुभव आले असतील तर जरूर लिहि, पण त्या साठी जीवावर उदार होऊ नकोस.

मनस्वी's picture

16 Jan 2009 - 3:39 pm | मनस्वी

सॉल्लिड अनुभव आहे ओंकार.
कलावंतीण आणि प्रबळचा फोटो बघून तुम्ही केलेल्या साहसाची कल्पना येते.

भाग्यश्री's picture

17 Jan 2009 - 5:15 am | भाग्यश्री

बा...परे!! कसली घाबरले मी इथे.. डेंजर आहात तुम्ही दोघं!
बाकी, लिहीलंय मस्त.. डोळ्यासमोर आलं सगळं..

http://bhagyashreee.blogspot.com/