विसरून पार गेलो, मीही असे लिहीत
आकाश अक्षरांचे दिनरात रंगवीत
शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच
पण आतच वसंता बसलोच आळवीत
केव्हातरी यशाची येई झुळूक मंद
स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत
शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार
घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत
झेपावतो कळेना कोठे शकुंत आता
अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
त्या अनुभवामृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत
बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
--अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
19 Sep 2007 - 8:27 am | धनंजय
कारण काही ओळी कशा म्हणायच्या मला पटकन कळत नाही -
> पण आतच वसंता बसलोच आळवीत
> ...
> अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
> ...
> त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची
हे गूढरम्य मात्र खास - चित्र डोळ्यासमोर विरता विरता येते, मग येता येता विरते
> बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
> मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
19 Sep 2007 - 3:51 pm | विसुनाना
शब्दातल्या कळ्यांना नव्हते फुलायचेच
पण आतच वसंता बसलोच आळवीत
केव्हातरी यशाची येई झुळूक मंद
स्वच्छंद लेखनाचे तारू तरंगवीत
शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार
घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत
या कल्पना चांगल्या.
पण काही मिसरे -
गागालगालगागा गागालगालगाल
तर काही -
गागालगालगागा गागालगालगागा
असे आहेत.
याला गझल ऐवजी गेय कविता - मराठी नज्म म्हणणे योग्य वाटते.
चु.भू.दे.घे.
19 Sep 2007 - 4:08 pm | टीकाकार-१
झेपावतो कळेना कोठे शकुंत आता
अश्वत्थ शांत मौनी पाने थरारतात
त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदीत
बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
यान्ना काय अर्थ आहे?
सुमार कविता वाटली. पण डेटाबेस ला बेस आहे ! :)
19 Sep 2007 - 4:51 pm | अशोक गोडबोले
सर्व वाचकांचा मी आभारी आहे.
19 Sep 2007 - 6:20 pm | विसोबा खेचर
शाली नकोत आता ना पुषगुच्छ हार
घेई लपेटुनी मी मधुचांदणे पुनीत
बिलगून अक्षरांना फुटती झरे अनंत
मग धुंद रान गाई वेडे विहंगगीत
सुंदर ओळी..
तात्या.
20 Sep 2007 - 11:49 am | अप्पासाहेब
एकडाव दोनडाव बरे वाट्ले पण तोचतोच पणा यायला लागला आहे, फार्म बद्ला आता,
'त्या अनुभवमृताला सीमा असीमतेची
मी नादरूप वेडा सगुणी सणासुदी''
ह्याला काय अर्थ आहे? उगा शब्द्च्छल करण्यात काय ह्शील? कवितेची अशी 'पाडापाडी' करु नका.
20 Sep 2007 - 11:52 am | आजानुकर्ण
तुमच्या प्रतिसादातही तोचतोच पणा येत आहे असे वाटते.
22 Jul 2010 - 8:37 pm | क्रेमर
छान रचना!
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुला काय कळतं रे कवितांमधलं?
अदिती
22 Jul 2010 - 10:11 pm | क्रेमर
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 11:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
फोन करून सांगते अशोक गोडबोलेंना उद्या सकाळी! ;-)
अदिती
23 Jul 2010 - 12:01 am | क्रेमर
कौतुक त्यांच्यापर्यंत जरूर पोचवा.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
23 Jul 2010 - 12:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नक्कीच!
(अशोक काकांची मानलेली पुतणी/मैत्रीण) अदिती