गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली...
आता हे बघ..जप्त केलेली मालमत्ता विकून आलेल्या पैशात "तुला बी घेना"सारखी कर्ज योजना आणता येईल. कर्ज घेणा-यासाठी अट एकच... कुठल्याही बँकेचं किमान एक कर्ज बुडविल्याचं प्रमाणपत्र. शिवाय कर्ज परतफेडीची गरज नाही. बँकने कर्ज फेडण्यासाठी विचारणा केलीचं तर एकचं उत्तर द्यायचं...देतोना...लंडनला थोडचं पळून चाललोय....
दारू उद्योगातील जप्त केलेल्या बाटल्या ह्या "दारूसोडा" या कल्याणकारी योजनेंतर्गत रेशनवर गरिबांसाठी सवलतीच्या दरात वाटता येईल. दोन-दोन घोट रोज पोटात गेले कि गरिबांना देखील आपण "किंग " असल्या सारखं वाटेल..मित्र मला मधेच थांबवत म्हणाला ."दारूसोडा" म्हणतो...रेशन वर पण वाटायची म्हणतो..काय ते नीट सांग. मी मग दारू वर सोडा फ्री...म्हणून "दारूसोडा" योजना असं सांगताच आता इथून पुढे फक्त सोड्याबरोबर असे काही विचार मित्राच्या चेहऱ्यावर दिसू लागले ...
जप्त केलेली विमानं एस टी ला देउन "किंगफीस" सेवा या नावाने विमानं खेडोपाडी जमिनीवर पळवता येतील. तशी हि विमानं आधीच ग्रावुन्ड झालेली असल्याने आकाशात उडाली तर जमिनीवर उतरतील म्हणून शंकाच आहे. शिवाय गरीब जनता देखील नंतर म्हणू शकेल कि मोदिजींच्या काळात एवढे चांगले दिवस आले होते कि आम्ही विमानाने प्रवास करत होतो.
मल्यांनी जमा केलेल्या तलवार , मोटारी , गांधीजींच्या वस्तूंचे त्यांच्या जहाजावर संग्रहालय करून त्यातून उत्पन्न मिळवता येईल. मित्र म्हणाला म्हणजे तुमच्या या "मलाबी दयाना" योजनेचा मलिदा सरकारलाच ...मी म्हटलं यातला काही हिस्सा कर्ज देउन कर्जबाजारी झालेल्या बँकांना पण द्यायचा...
मित्र म्हणाला त्या घोड्याचं काय करायचं... मी म्हटलं तो घोडा देखील बांधता येईल संग्रहालयात...खूप देखणा आहे म्हणे तो. मित्र म्हणाला ..घोडा गावच्या जत्रेत , वरातीत,वारीत नाचवता येईल. .रेस मध्ये पळवून जुगार सुद्धा खेळता येईल....मी मग बाकी तुझं म्हणणं ठीक आहे पण त्या घोड्याला रेसमध्ये पळवून उपयोग नाही , मालकासारखा तो सुद्धा रेस सोडून पळून जाऊ शकतो असं म्हणताच मित्राने होकारार्थी मान डोलावली...
मित्राला देखील या योजनेत काही दम आहे असं वाटलं ..त्याने मग पुढचा प्रश्न केला.. त्या कॅलेंडरच काय करता येईल...म्हटलं त्या कॅलेंडर वर छापायचे कर्ज देण्याऱ्या बँका,गावाकडच्या जत्रा,मल्ल्या पलायन दिन...मागच्या पानावर कर्ज काढायचे कसे..बुडवायचे कसे..सगळं छापायचं... खेडोपाडी वाटून टाकायचे कॅलेंडर.... .हाच विषय पुढे नेत मग मित्रांन प्रश्न केला..आणि त्या कॅलेंडर वरच्या पोरी ? मी मात्र मग विषय बदलत ह्या वर्षी आपल्या गावच्या जत्रेत काही तमाशा वगैरे आहे का नाही याची चौकशी सुरु केली. मित्र मात्र माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी कॅलेंडर वरच्या पोरी आणि तमाशाची सांगड घालत स्वप्नरंजनात धुंद झाला होता.
प्रतिक्रिया
24 Mar 2016 - 7:48 pm | पैसा
मजेशीर लिहिलंय!
28 Mar 2016 - 3:39 pm | प्रियाजी
गंमतीशीर लिहिलय. आवडले. यात अजून भर घालता येईल.
28 Mar 2016 - 3:42 pm | सस्नेह
कायप्पावर एक फॉरवर्ड वाचला होता सेम या अर्थाचा...