रविवार सुट्टीचा दिवस ....माझा मुलगा , पप्पा पप्पा आवाज देत दरवाजाची बेल वाजवत होता...काय झाले असेल म्हणून मी सुद्धा धावत येत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मुलाने सुरवात केली... खाली चला लवकर ..सोसायटीतील सर्व लोक खाली जमा झालेत...लहान मुलांनी खेळताना साप पाहिला असं बोलतायेत..मी सुद्धा उत्सुकतेपोटी लगेच खाली गेलो..खाली जमा झालेली गर्दी पाहून आपल्या सोसायटीत एवढी लोकं राहतात यावर विश्वास बसेना.
तीन चार कावरी-बावरी छोटी मुले आणि त्यांना प्रश्न विचारणारी गर्दी. नेमकं काय झालंय याचा अंदाज येत नव्हता. शेजारी उभ्या एका अनोळखी व्यक्तीशी मी बोलू लागलो..नवीन दिसता सोसायटीमध्ये? नाही हो ,गेल्या तीन वर्षापासून येथेच राहतो..त्याच्या या उत्तराने मी पुढचा प्रश्न केला..पण आजच पहिल्यांदा दिसला तुम्ही सोसायटीमध्ये ..यावर ती व्यक्ती म्हणाली..साप देखील आजच निघाला पहिल्यांदा..मी मनात म्हटलं तुमचं बरोबर आहे..साप निघायला थोडा उशीरच झाला.
आमच्या चर्चेत अजून एक जन सामील होत सांगू लागला...अहो मागे एका सापाचं पिल्लू तर थेट आमच्या तिसऱ्या मजल्यावर चढून आले...मी
म्हटलं जिने कोण चढतय हल्ली..लिफ्ट मधून आला असेल..अजून एक जन माझ बोलणं ऐकताच म्हणाला ..काहीही सांगता तुम्ही...साप कसा घुसेल लिफ्टमध्ये. यावर मी म्हटलं आपल्या लिफ्टच्या दरवाज्याला एवढी फट आहे की त्यातून सापाचं पिल्लूच काय, अजगर सुद्धा जाऊ शकतो..दुस-याने माझ्या बोलण्याला सहमती दाखवत लिफ्टचा दुरुस्तीचा विषय काढला..कुणीतरी म्हटलं की सोसायटीतील दिव्यांमध्ये बल्ब बसवा..यावर एकाने हे सर्व दिवे सुरु आहेत, पण दिव्याच्या झाकनामध्ये एवढे किडे आहेत की प्रकाशच बाहेर येत नाही अशी नवी माहिती दिली. सोसायटीत पार्क केलेल्या बऱ्याच बेवारस गाड्या बाहेर हटवण्याच ठरलं. माळ्याला बोलावून वाढलेलं गवत कापण्याचा निर्णय झाला .
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून घरी आलो तर आपल्याच सोसायटीत आलो कि चुकलो अशी शंका यावी एवढी स्वच्छता आणि प्रकाश. लिफ्ट दुरुस्त झालेली. मुलाने घरात घुसताच माहिती दिली. पप्पा..माळ्याने गवत काढताना साप पकडला..मी हि अधीर होत कोणता होता असे विचारले तर मुलगा म्हणाला..चायनीज ..खेळण्यातला साप होता तो. लहान मुलांनी तोच पहिला असेल. त्याच्या या माहितीने माझ्या मनात एक विचार चमकला..... स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत असे इंडिअन साप तयार करून प्रत्येक सोसायटीत सोडायला काय हरकत आहे..जेणे करून आपले प्रधान सेवक नंतर म्हणू शकतील...
मी जगाला हाक देउन मनातली बात केली होती.
मी साप हि सोडले होते, देशाने कात टाकली होती.
प्रतिक्रिया
6 Mar 2016 - 12:16 pm | एस
अरे वा! इकडे असा प्रकार झाला तर!
6 Mar 2016 - 1:14 pm | मनिमौ
कल्पना आहे
6 Mar 2016 - 5:51 pm | प्रणवजोशी
आमच्या सोसायटित हा प्रकार मी नक्की करुन बघणारे :-)
6 Mar 2016 - 7:57 pm | भाऊंचे भाऊ
:) :) :)