बायको: पोह्यात मीठ विसरले, चव का तुम्हाला कळत नाही,
खाताय कि चरताय, तुमचं काही खरं नाही.
नवरा: अॉफिसला उशिर होतोय, क्षणाचीही उसंत नाही,
जीवनच माझं चवदार केलंस, पोह्यांची मला तमा नाही.
बायको: वायफळ बडबड थांबवा, वेळेत तुम्ही कधी निघत नाही,
एवढं डोकं आहे तर, हेल्मेट का बरं वापरत नाही.
नवरा: नेहमीची तुझी कटकट, मला मुळीच पसंत नाही,
मनातली तुझी प्रेमळ चिंता, मला कधीच कळत नाही.
बायको: अॉफिसमधून लवकर आलात, तब्ब्येत तर बिघडली नाही,
दुर्मिळ क्षण साजरे करु, जेवायला बाहेर का नेत नाही.
नवराः कामाच्या घाईगडबडीत, अशी वेळ मिळतच नाही,
पुष्पगुच्छ देऊन तुझ्या, डोळ्यांत कधी पाहिलंच नाही.
बायकोः तुम्हाला अचानक काय झालं, मला मात्र कळत नाही,
इतकी वर्ष गेली पण, तुम्ही असं कधीच वागले नाही.
नवराः अपेक्षांच्या भाऊगर्दीत, निर्मळ प्रेम कधी केलंच नाही,
आज हृदयाचा संदेश देण्यास, वेलंटाईनची वाट मी पहात नाही.
बायकोः गडे, तुम्ही मनमोकळं बोलत नाही, स्वतःहून कसं कधीच मागत नाही,
कामात नेहेमीच गाडून घेता, स्वतःकडे देखील पहात नाही.
नवराः भाव जुळता आज मनांचे, शब्दांची गरज भासत नाही,
देण्यातला आनंद आज कळला, मागण्यात काही मजा नाही.
बायकोः कळायला खूपच उशीर झालाय, आता काही सांगत नाही,
सकाळी लवकर उठायचंय, आत्ता नाही म्हणजे नाही.
प्रतिक्रिया
2 Mar 2016 - 12:15 pm | निशांत_खाडे
आवडली..