अ‍ॅडमिट किडा - कथा

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
6 Feb 2016 - 11:01 pm

--- अ‍ॅडमिट किडा ----- कथा --- काल्पनीक --------------

"अ‍ॅडमिट किडा !!!! "
"किसका घर ???? "
"मेरा घर ? मेरा घर ? तो झोपाळा !!!"
वाड्याच्या आवारामध्ये मुलांचा खेळ अगदी रंगात आला होता . या खेळात ज्याच्यावर राज्य आहे त्याने एखादी जागा किंवा ठिकाण घर म्हणुन सांगायचे आणी मग इतरांनी त्याला चुकवत त्या जागेपाशी जायचे . यामध्ये जो पकडला जाईल त्याच्यावर पुढचे राज्य यायचे . मुले या खेळात अगदी गुंग झाली होती. दुपार झाली , उन वाढू लागले तरी मुलांना त्याचा पत्ता नव्हता .
वाड्याच्या गेटपाशी उभे राहुन एक अनोळखी मुलगा खुप वेळ हा त्यांचा खेळ टक लावुन बघत होता . अखेरीस न राहवून त्याने विचारले "अरे मलाही तुमच्या खेळामध्ये घ्या ना" .

आतल्या मुलांनी चमकून त्या गेटबाहेरच्या मुलाकडे बघितले . खेळात रंगल्यामुळे इतका वेळ त्यांच्यापैकी कुणाचेच त्या मुलाकडे लक्ष गेले नव्हते . त्या मुलाचे कपडे फारच साधे आणी चुरगाळलेले दिसत होते. तो थोडा चमत्कारीकच दिसत होता . अशा या अनोळखी मुलाला आपल्या खेळात घ्यावे का नको याबद्दल सर्वांनी एकदा एकमेकांकडे पाहिले . अखेर त्यांच्यातला एकजण पुढे झाला . त्याने गेटचे दार उघडले आणी त्या अनोळखी मुलाला आत घेतले .

"काय रे , तुझे नाव काय ? " सर्वांनी त्या नवीन मुलाला विचारले .
"माझे नाव रघु . आणि तुमचे ? " रघुने त्यांना उत्सुकतेने विचारले .
"मी शिरू , हि वैजू , हा किशा आणी हा जनु" त्या वाड्यातल्या मुलांपैकी एकाने त्याला आपली आणी इतर मुलांची ओळख करुन दिली .
"तु कुठे राहतोस ?" वैजुने रघुला विचारले . रघु थोडा दचकला .
" मी त्या ..त्या पलीकडच्या गल्लीमध्ये राहतो ." त्याने बाहेर कुठेतरी अंदाजाने हात दाखवत उत्तर दिले .

ओळख झाल्यावर परत मुलांचा खेळ सुरु झाला . या मुलांबरोबर खेळताना रघुही चांगलाच गुंगुन गेला . अ‍ॅडमिट किडा हा खेळ त्याने पुर्वी कधी खेळला नव्हता , त्यामुळे त्याला हा नवीन खेळ खेळताना खुप मजा येत होती . वाड्यातली मोठी माणसे बाहेर कामाला गेली आहेत असे त्याला या मुलांनी सांगितले , त्यामुळे पुर्ण वाड्यावर दिवसभर या मुलांचेच राज्य होते . त्यांचाच धुडगुस वाड्यात सगळीकडे चालत होता . अधुनमधुन बदल म्हणुन मुले लपाछपी , चोर पोलिस , शिवणपाणी खेळत होती . त्यांचे खेळ वाडयामध्येच चालत असत . एकदा रघुने सहज बाहेर खेळण्याबद्दल सुचवले , तर सगळी मुले कावरीबावरी झाली .

" बाहेर नकोरे .. मोठी माणसे रागावतील . त्यांनी आम्हाला वाड्यात खेळण्याबद्दलच बजावुन सांगितले आहे ." शिरुने थोडे घाबरुनच सांगितले . रघुनेही मग जास्त आग्रह केला नाही . हा वाडाही तसा खुप मोठा होता . आतमध्ये अनेक दारे , खोल्या , जोडवाटा आणी जिने होते. दिवसभर वाड्यात खेळुन रघुलाही सर्व खोल्या , आतल्या वाटा माहित झाल्या होत्या . अशा मोठ्या ठिकाणी भरपुर खेळायला मिळाल्याने तो खुप खुश होता .

संध्याकाळ झाल्यावर त्यांचा खेळ थांबला . उन उतरले होते आणी संध्याकाळचा गारवा हवेत पसरु लागला होता .

"आपल्याला थांबले पाहिजे . आता मोठी माणसे येण्याची वेळ झाली. " किशा संचित होउन म्हणाला .
" अरे हो . मलाही आता घरी गेले पाहिजे . आमच्याकडेही मोठी माणसे येण्याची वेळ झाली." रघु गडबडीने म्हणाला आणी गेट उघडून लगेचच बाहेरही निघुन गेला. तो थोडा चमत्कारीकच वाटत होता .

पुढलेही दोन दिवस, दुपार झाली की रघु न चुकता त्या वाड्यामध्ये येत असे . आणी वाड्यातील मुलांबरोबर मनसोक्त खेळत असे . शिरु , वैजु , किशा आणी जनु यांच्याबरोबर त्याची आता चांगली दोस्ती झाली होती . संध्याकाळ झाली की मात्र रघु गडबडीने निघुन जात असे .

आज थोड्याच वेळात संध्याकाळ होणार होती . आपला येथील मुक्काम संपत आला आहे याची रघुला कल्पना आली होती .तेव्हा त्याने आज काहितरी वेगळेच ठरवले होते . आज नेमके त्याच्यावरच राज्य आले होते .

"अ‍ॅडमिट किडा !!!! " रघुने विचारले
"किसका घर ???? " सर्व मुले ओरडली .
"मेरा घर ? मेरा घर ? या वाड्यातली विहिरीची तळाची पायरी " रघुने आज मनाशी ठरवलेले उत्तर दिले . त्याच्या चेहरयावर चलाखीचे हसु खेळत होते . बाकीची मुले मात्र एकदम गप्प झाली . एकमेकांकडे पाहु लागली .

"हे रे काय रघु ? आपण कधी विहिरीपाशी जातो का ? तू असं का करतोस ? विहिरीपाशी गेलो तर मोठी माणसे रागावतील . तु दुसरी कुठलीतरी जागा सांग ना ? " शिरु , वैजु , किशा आणी जनु एका सुरात ओरडले .

" नाही . रोज रोज त्याच त्याच जागा सांगुन आणी शोधुन मला कंटाळा आला आहे . संध्याकाळ होण्याला आणी मोठी माणसे येण्याला अजुन वेळ आहे . तेव्हा मी विहिरीची तळाची पायरी हिच जागा सांगणार . मान्य नसेल तर हरलो हे कबुल करा ." रघुने ऐटीत उत्तर दिले .

अखेर निरुपायाने ती मुले वाड्याच्या एकदम मागच्या टोकाला असलेल्या विहिरीच्या दिशेने वेगाने पळाली . रघुही त्यांना पकडायला जोरात त्यांच्या मागे विहिरीच्या दिशेने पळु लागला .

---------------------------------------------------------------------------------------
"अहो पर्वते काका , काकु , आमच्या रघुला तुम्ही पाहिलं का कुठे ? रघु हा माझ्या मावसभावाचा मुलगा . शाळेला सुट्टी होती म्हणुन तो चार पाच दिवसांसाठी आमच्याकडे आला होता. गेले दोन तीन दिवस तो न चुकता संध्याकाळ झाली की घरी यायचा . आज मात्र सात वाजुन गेले तरी त्याचा पत्ता नाही . आम्ही आसपास चौकशी केली पण काही उपयोग झाला नाही . तुम्ही त्याला कुठे पाहिले का ? " रघुचे काका कळवळुन शेजारच्या घरामध्ये विचारत होते . रघुचे काका आणी काकु हे दोघेही गावातील शाळेत शिक्षक होते . ते दोघेही सकाळी शाळेला निघत ते संध्याकाळ पर्यंत घरी येत असत .

" अहो गुरुजी , आत्ता तरी मी रघुला पाहिले नाही . पण तुम्हाला रघुबद्दलच एक महत्वाचं सांगायचं होतं . मी रोज दुपारी कामाला जाताना त्या जुन्या वाड्यासमोरील रस्त्यावरुन जातो .गेले दोन तीन दिवस मी रघुला त्या वाड्यामध्ये पाहिले आहे . तो एकटाच त्या वाड्यामध्ये इकडुन तिकडे धावत होता . काहितरी बडबडत होता . जोरजोरात हसत काय होता . मी तुम्हाला कालच सांगणार होतो . पण मला नेमके कामावरुन यायला रात्र झाली . आणी हे सांगायचे राहुन गेले . त्या जुन्या वाड्याची माहिती , तिथल्या घटना तुम्हाला ठाउकच आहे . कोणच तिथं जायला , राहायला धजावत नाही . तेव्हा तुम्हाला सावध करणार होतो . आताही आपल्याला रघुसाठी एकदा तिकडे तपासाला गेले पाहिजे" पर्वते काकांनी माहिती दिली .

" बापरे , काय सांगताय काय ? " गुरुजी एकदमच घाबरुन , गडबडुन गेले .

अखेर गल्लीतीलच चार पाच जणांना बरोबर घेत , सोबत काठ्या , विजेरी घेउन गुरुजी ,पर्वतेकाका त्या वाड्यामध्ये गेले . रात्रीच्या अंधारामध्ये तो निर्मनुष्य , पडझड झालेला वाडा अधिकच भीतीदायक वाटत होता . त्या सुनसान वाडयाचे गंजलेले गेट उघडताना झालेला करकर आवाज ऐकुन सर्वांच्याच उरात धडकी भरली .

आतमध्ये जाउन प्रत्येकजण तिथल्या खोल्या , दारे , जोडवाटा आणी जिने धुंडाळत होता . रघुच्या नावाने हाका मारणे चालु होते . अखेर एकाला दुरवर , वाड्याच्या एकदम मागच्या टोकाला असलेली विहीर दिसली . दोघं तीघं मिळुन त्या विहिरीपाशी गेले आणी त्यांनी आतमध्ये विजेरीचा झोत टाकला .

विहिरीच्या तळाच्या पायरीजवळ अंगाचे मुटकुळे करुन पडलेला रघु त्यांना दिसला . सुदैवाने तो तळाच्या काठाशी पडलेला होता . पाण्यात बुडाला नव्हता . सर्वांनी एकमेकांच्या मदतीने रघुला अलगद उचलुन विहिरीबाहेर काढले . नक्की काय घडले होते ते एक रघुला , त्या वाडयाला आणी त्या विहिरीलाच ठाउक .

सर्वजण देवाचा धावा करत रघुला गुरुजींच्या घरी घेउन आले . गल्लीतीलच एका डॉक्टरांनी रघुला तपासले .
" थोडा मुका मार लागला आहे . पण त्याच्या जिवाला काही धोका नाही . त्याला अतिश्रमाने , खुप खेळल्याने थकवा येउन बेशुद्ध झाला आहे असे दिसते . मी काही औषधे देतो . ती घेतल्यावर त्याला बरे वाटेल . तो शुद्धीवर आल्यावर त्याला जास्त काही विचारु नका आणी रागावुही नका . त्यामुळे परत ताण वाढेल " डॉक्टरांनी सुचना दिल्या .

गुरुजींनी सर्वांचे आभार मानले . सर्वजण आपापल्या घरी निघुन गेले .

थोड्या वेळाने रघु शुद्धीवर आला . औषधे घेतल्यावर आणी थोडे खाल्ल्यावर त्याला बरे वाटु लागले .

"काका , त्या वाडयातल्या मुलांबरोबर खेळताना खुप मजा आली . गेले दोन तीन दिवस आम्ही रोज खेळतो . पण ती मुले जरा भित्री भागुबाईच वाटत होती . म्हणुन आज माझ्यावर राज्य आल्यावर मी मुद्दामुन त्यांना विहिरीच्या पायरीकडे जायला सांगितले . पण त्यांना पकडण्याच्या नादात माझाच शेवटच्या पायरीवरुन पाय घसरला आणी मी काठावर पडलो . नक्कीच त्या मुलांनी तुम्हाला कळवले असणार म्हणुन तुम्ही मला तिथुन घेउन आलात . बरोबर ना काका ?" रघुने घडलेला प्रकार सांगुन हसत हसत विचारले .

"हो हो . बरोबर . तु झोप आता शांतपणे . आपल्याला उद्या सकाळची लवकरची एस्टी पकडुन आई बाबांकडे जायचे आहे . तुझी शाळा लगेचच सुरु होणार आहे असा बाबांचा आज मला फोन आला होता ." गुरुजींनी सांगितले .
"अरेरे .. उद्या सकाळी लवकर ? पण मग माझे त्या वाडयातल्या मित्रांचा निरोप घेणे राहुनच जाणार ?" रघु थोडा निराश झाला .

" तु काळजी करु नकोस . तुझ्या वतीने मी तुझ्या मित्रांना तुझा निरोप कळवीन . मग तर झालं . झोप आता ." गुरुजींनी त्याची समजुत काढली . तेव्हा कुठे रघु झोपी गेला . पण आपले काका काकु सारखे आकाशाकडे आणी देवघराकडे पाहात हात का जोडत आहेत हे काही त्याला समजले नाही .

दुसरया दिवशी प्रवासामध्ये रघु काकांना आपल्या वाडयातील शिरु , वैजु , किशा आणी जनु या मित्रां बरोबर केलेल्या गमतीजमती वर्णन करुन हसत हसत सांगत होता . आणी काका परत परत बाहेर आकाशाकडे पाहात हात जोडत होते.

पुढे यथावकाश रघुची शाळा सुरु झाली . शाळा , अभ्यास , खेळ यांत तो रमुन गेला . त्याच्या काका काकुंचीही दुसरया एका गावातील शाळेमध्ये बदली झाली . त्यामुळे परत कधी त्याचे त्या वाड्याकडे जाणे झाले नाही . पण अजुनही कधी कधी त्याला ते वाड्यातील दिवस आठवतात . वाडयातील शिरु , वैजु , किशा आणी जनु या मित्रां बरोबर केलेल्या गमतीजमती आठवुन रघुला हसु येते . आणी निघताना गडबडीत त्या मित्रांचा निरोप घेण्याचे राहुनच गेल्याची चुटपुटही लागुन राहते .

-------------------------समाप्त ------------ काल्पनीक----------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

7 Feb 2016 - 12:43 am | उगा काहितरीच

छान कथा. थोडीशी गुडीगुडी वाटते . पण छान आहे.

कपिलमुनी's picture

7 Feb 2016 - 12:53 am | कपिलमुनी

गुडीगुडी ??

एवढी भूते असून ?

उगा काहितरीच's picture

7 Feb 2016 - 1:11 am | उगा काहितरीच

भुते लहान होती ना ! म्हणून कदाचित . मोठी झाली की वाटेल भिती . ;-)

धन्यवाद . कथेच्या पुर्वार्धामध्ये रघुची इतर मुलांशी ओळख ,मैत्री ,खेळ अशा सरळ साध्या घटना घडतात . त्यामु़ळे तो भाग गुडीगुडी वाटु शकतो . अ‍ॅडमिट किडा हा खेळ इतर ठिकाणी कदाचित वेगळ्या नावाने ओळखला जात असल्याने त्या खेळाची थोडक्यात माहिती दिली आहे . कथेच्या पुर्वार्धामध्ये संशयाची सुई रघु आणी वाड्यातील मुले यांच्यावर समान राहाते . उत्तरार्धामध्ये कथेला गंभीरतेचे , भीतीचे वळण मिळते. शेवटी रघु आणी वाड्यातील मुले कोण यांचा उलगडा होतो .

लहान मुलांची भूते स्वभावाने चांगली होती का? रघूला इजा वगैरे झाली नाही ना?

विजय पुरोहित's picture

7 Feb 2016 - 6:38 am | विजय पुरोहित

रत्नाकर मतकरींची आठवण झाली...

सिरुसेरि's picture

8 Feb 2016 - 11:01 am | सिरुसेरि

धन्यवाद सर . आपल्याला कथा आवडली हे पाहुन खुप बरे वाटले . रत्नाकर मतकरी , नारायण धारप , सुशी हे सर्वच खुप मोठे सिद्धहस्त लेखक आहेत .

सिरुसेरि's picture

8 Feb 2016 - 10:39 am | सिरुसेरि

विहिरीच्या पायरीवरुन पाय घसरुन पडल्यामुळे रघुला थोडा मुका मार लागला . व थोडा वेळ तो बेशुद्ध झाला . धन्यवाद .

सिरुसेरि's picture

8 Feb 2016 - 11:14 am | सिरुसेरि

लहान मुलांची भूते हि या कथेमधली एक शक्यता आहे .
अशीच एक दुसरी शक्यता म्हणजे अनोळखी गावामध्ये काका काकुंकडे आलेल्या रघुला पहिले एक दोन दिवस खेळायला कोणी भेटत नाही .त्यामुळे कंटाळलेला रघु त्या जुन्या वाड्यावरुन जात असताना , स्वताच्या कल्पनेनेच वाड्यामध्ये खेळणारी शिरु , वैजु , किशा आणी जनु असे मुलांचे काल्पनिक विश्व निर्माण करतो . व त्यात रममाण होतो . "वाड्याबाहेर जाउ नको" ,"विहिरीजवळ जाउ नको" ,"मोठी माणसे येण्याची संध्याकाळची वेळ झाली" , "मोठी माणसे रागावतील" हे सांगणारा शिरु म्हणजे प्रत्यक्षात रघुचे सुप्त अंतर्मनच आहे .

या दोन्ही शक्यता आपापल्या जागी योग्य आहेत .