खाद्ययात्रा कल्याणची!!

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Jan 2016 - 1:26 pm

बर्‍याच दिवसांनी मागच्या आठवड्यात कल्याणला गेलो होतो. थोडी घरची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि असेच कायकाय मनात होते. सकाळीच पोचलो आणि घरी पोचायच्या आधीच भुकेची जाणीव झाली. आता ईतक्या सकाळी काय बरे खावे? बरं दुपारी एका ठिकाणी जेवायचे आमंत्रण होते, त्यामुळे फार जास्त खाउन चालणार नव्ह्ते.
पाय आपोआप पारनाक्यावर ताम्हणकर यांच्या श्री उपहारगृहात वळले. खरेतर तिथे बसायलाही फार जागा नाहिये, पण तिकडे वर्षानुवर्षे मिळणार्‍या एकाच खास चवीच्या ओल्या नारळाच्या कचोर्‍या खाण्यासाठी खवैय्यांची गर्दी असते. सकाळची वेळ, आचारीकाका शांतपणे कचोर्‍यांचा एक एक घाणा काढत होते. जशी ऑर्डर येईल तसेच , कारण गार कचोर्‍या कशा आणि कोण खाणार? लोकही चुळबुळत का होईना पण धीर धरुन आपला नंबर येण्याची वाट पहात होते. याला म्हणतात मोनोपॉली. काय बिशाद गिर्‍हाईक दुसरीकडे जाईल.
असेच दुसरे ठिकाण म्हणजे वझे बंधु यांचा खिडकी वडा. मला आठवतंय लहानपणी आई ऑफिसमधुन येताना खिडकीवडा घेउन यायची तेव्हा आम्हा भावंडांना काय आनंद व्हायचा. अनेक वर्षे उलटली पण वड्याची चव अजुनही तीच.आणि सकाळ संध्याकाळ दुकानासमोर होणारी गर्दी पण तशीच.

गांधी चौकात लागणारी हरी विट्ठला पांडुरंगा ची गाडी मिसळीसाठी फेमस. चहासुद्धा फक्कड असतो तिथे.

सकाळी सकाळी पोटभर नाश्ता आणि मित्र मंडळीना भेटायचे अजुन एक ठिकाण म्हणजे बाजारपेठेतले दिवाकर भट यांचे क्षुधा शांती गृह. इडली चटणी खावी तर ईथलीच.

लहानपणी दुपारच्या मधल्यावेळी काय खावे असा प्रश्न पडला तर सरळ टिळक चौकात ठ्क्करच्या दुकानात रवाना होणे. खमण ढोकळा, समोसा,शेव फरसाण खावे तर ठक्करकडे. एकदा हे दुकान शॉर्ट सर्कीटमुळे पुर्ण जळले होते, पण पुन्हा पहिल्यासारखे उभे केले ठक्करने. आता त्यांचा मुलगा दुकान चालवतो.
संध्याकाळी फिरायला बाहेर पडले किंवा सुभाष मैदानात क्रिकेट खेळुन बाहेर आलो कि फेमसची मुगभजी खाणे होणारच. आता अत्रे रंगमंदीर झाल्यापासुन हि गाडी तिकडे लागते कि नाही माहित नाही.
रविवारी किंवा सणासुदिला कल्याणकरांना आठवण होणार ती अनंत हलवाईच्या श्रीखंडाची. म्हणजे ईतर मिठाई सुद्धा तिथे मिळते पण अनंताचे श्रीखंड म्हणजे खासच. पहिले बाजारपेठेत असलेले दुकान रस्ता रुंदीकरणात छोटे झाले आणि मग देवीच्या देवळासमोर नवीन मोठे दुकान त्यांनी उघडले. शिवाय स्टेशनजवळ एक अजुन शाखा आहेच.
जेव्हा घरोघरी फ्रिज नव्हते तेव्हा आइस्क्रीम खाणे म्हणजे मोठीच पर्वणी असे.आणि डोक्यावर पाटी घेउन घरोघरी आइस्क्रीम विकणारे तायडे बंधू सगळ्यांच्या परीचयाचे होते. मग त्यांनी बाजारपेठेत एक दुकान घेतले आणि तिथे आइस्क्रीम विकायला लागले. ते आइस्क्रीमचे वेगळेच ग्लास आणि चमचे आणि त्यात असणारा सिंगल किंवा डबल स्कुप म्हणजे आम्हा मुलांना पर्वणीच. यांनीही नंतर रामवाडीजवळ दुसरे दुकान काढले आणि ज्युस बार चालु केले. पण ती पहिली आइस्क्रीमची मजा काही औरच.
अजुन एक काळाच्या पडद्या आड गेलेले दुकान म्हणजे अहिल्यादेवी चौकातले महाराष्ट्र कोल्ड्रिंक्स. फालुदा, चॉकलेट शेक, कसाटा आइस्क्रीम हे फक्त तिथेच मिळणार.
कल्याण पालिकेसमोरचे गणेश आणि क्रुष्ण रसवंती उन्हाळ्यात थंडावा द्यायला एकदम बेस्ट.

कल्याण म्हणजे हिंदु मुस्लिम पुर्वापार एकत्र आणि बर्‍यापैकी शांततेने राहणारे शहर. सगळे हिंदु लोक दुध नाक्यावर दुध आणायला जाणारच आणि सगळा दुधाचा धंदा कोकणी मुस्लिमांच्या हातात. दुधाचा भाव रोज ठरणार. इदला दुध स्वस्त होणार आणि दसरा दिवाळीला महाग. तर पहाटे २.३० ला दुधाचा धंदा सुरु झाला कि नाक्यावरचे एकमेव हॉटेल उघडणार आणि रात्रपाळीचे रिक्षावाले ,गणपतीच्या सजावटीसाठी जागणारी मुले तिथे एक खास डिश खायला रांग लावणार ती म्हणजे मलईपाव. एक बशीभर साय, त्यावर मुठभर साखरआणि पाव ...आहाहा. सकाळी ६ वाजेपर्यंत ही डिश संपणार. बाकी सामिष वाल्यांसाठी पायापाव, खिमापाव आहेतच.
संध्याकाळी मशिदीजवळ अजुन एका गाडीवर शीग कबाब. आणि बाजुच्या एका दुकानात "अफलातुन" या नावाने मिळणारी भयंकर गोड मिठाई पण जबराट.

असो. ताम्ह्णकरांनी कचोरीतळेपर्यंत कुठपर्यंत पोचलो बघा मी. आता हे सगळे पदार्थ पुन्हा चाखायला कल्याणच्या अजुन फेर्‍या करायला लागणार. पण हरकत नाही. जीभ आणि पोटासाठीच तर जगतो आपण..काय म्हणता?

जीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Jan 2016 - 1:44 pm | मुक्त विहारि

खिडकी वडा खायला...

नातेवाईकांना भेटणे हे फक्त निमित्तमात्र...

मोठा मुलगा कल्याणला जातो ते फक्त मलई-पाव खायला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Jan 2016 - 9:03 pm | निनाद मुक्काम प...

आता डोंबिवलीची खाद्ययात्रा लेख येऊ दे
सुरु करा
वडा खायचा त ठाकूर चा ....................................

प्रचेतस's picture

24 Jan 2016 - 2:06 pm | प्रचेतस

खाद्ययात्रा आवडली.
सुभाष मैदानात असलेल्या रिक्रिएशन व्यायामशाळेच्या इमारतीतच आत्या राहायची. तिचे यजमान व्यायामशाळेचे प्रमुख आणि राज्य वेटलिफ़्टींग महासंघाचे अध्यक्ष होते त्यामुळे कल्याणला भरपूर वेळा येणं झालंय.
शिवाजी चौकातच मनोऱ्याला लागून भेळपुरीची गाडी असायची. त्याच्याकडची भेळ, शेवपुरी लै भारी लागायची. अजून एक डबलरोटीची गाडी लै फेमस होती. ती नेमकी कुठे लागायची ते आता आठवत नाही. कल्याणमध्ये तेव्हा कच्छी दाबेलीला डबलरोटी म्हणत. कच्छी दाबेली ह्या नावाने प्रसिद्ध व्हायची आधीपासून कित्येक वर्ष अस्तित्वात असलेला हा प्रकार. दाबेलीची तशी चव नंतर कुठेच मिळाली नाही. अनंत हलवाईकडचे प्रकार खूप वेळा खाल्लेले आहेत. मात्र आम्हा मुलांना सुभाष मैदानात मिळणाऱ्या बर्फ गोळ्याचं आणि पेप्सीकोलाचं भारीच आकर्षण असे.

कालांतराने यजमानांच्या निधनानंतर आत्या डोंबिवलीला आली. कल्याण सुटले ते तेव्हा. आता आत्याही नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jan 2016 - 4:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

काय सांगता वल्लीदा!! जोशी सर तुमचे नातेवाईक होते? अहो पारनाक्यावरच्या रिक्रिएशन मध्ये त्यांच्याकडुनच व्यायामाचे धडे घेतलेत. बेंच, स्कॉट आणि डेड्लिफ्ट अहो तिकडे येणारी आगरी मुलेपण त्यांच्यापुढे घाबरुन राहायची. २५-२५ चे सर्किट मारायला नको म्हणुन. आणि ते बालेवाडीच्या नॅशनल गेम्समधे पण पंच म्हणुन होते.
अजुन आठवतात एम ८० वर येणारे जोशीसर!!

प्रचेतस's picture

24 Jan 2016 - 4:35 pm | प्रचेतस

हो. तेच आत्याचे यजमान. रिक्रिएशनमध्ये वरच्या मजल्यावर टेबल टेनिसची टेबलं भरपूर होती. तिथे भरपूर टेटे खेळलोय. बालेवाडीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पाहायला त्यांच्याबरोबरच गेलो होतो. एकदम तगडा माणूस. वेटलिफ्टर्सची आख्खी एक पिढी त्यांनी उभी केली होती.

रुस्तम's picture

24 Jan 2016 - 8:29 pm | रुस्तम

कच्छी दाबेली ला कच्छ मध्ये डबलरोटी आधी पासून बोलतात. तिकडे डबल रोटीच जास्त बोलल जात.

पैसा's picture

24 Jan 2016 - 2:12 pm | पैसा

असे खूप ठिकाणी काय काय छान छान मिळत असते. सगळ्याची चवी घेणे काही शक्य नसते. म्हणून सगळीकडच्या खाण्याबद्दल असे लेख हवेतच!

आदूबाळ's picture

24 Jan 2016 - 2:21 pm | आदूबाळ

एक नंबर! अनंत हलवाई आणि महाराष्ट्र कोल्डड्रिंकच्या आठवणीने एकदम नॉस्टॅल्जिक वाटलं. कल्याणच्या आठवणी ढवळून वर आल्या.

पद्मावति's picture

24 Jan 2016 - 2:50 pm | पद्मावति

वाह, मस्तं लिहिलंय.

अजया's picture

24 Jan 2016 - 9:19 pm | अजया

अनंत हलवाई आणि तायडे आइस्क्रिम! किती वर्ष मागे गेलं घड्याळ!
दुधनाक्याला आजी रहात असे.पारनाक्यावरुन आजोबा भाजी आणत.येताना सिनेमाची तिकिटं.
आजीला मराठी सिनेमाचं वेड होतं.तिच्याबरोबर परत येताना तायडे आइस्क्रिमची लाच मिळत असे!
खिडकी वड्याच्या पार्सलांसोबत काकाच्या गांधी चौकातल्या घरात गप्पांच्या मैफिली भरायच्या!

फोटो टाका कुणीतरी.मिठाईवाले पूर्वी दुकानाच्या मागेच मिठाया करत आणि ते करताना पहाताही येत असे.परंतू आता महागाईमुळे,मुलांच्या आंबटचिंबट खाण्याच्या आवडीमुळे,वाढत्या डाइबेटिसमुळे हा धंदा पार बसला.ते आता विठ्ठलवाडी/उल्हासनगरातील तयार ( कशी ते विचारू नका)मिठाई ठेवतात.गुलाबजाम(!) तर कचरा गोळा करण्याच्या एकचाकी उघड्या ढकलगाडीतून आणून दुकानात देण्यापर्यंत धीट झाले आहेत.

मित्रहो's picture

24 Jan 2016 - 10:10 pm | मित्रहो

आता पुढच्या कल्याणवारीत खिडकी वडा आणि ताम्हणकर यांची कचोरी खानार.
पूर्वी खिमापाव खाल्लाय, तोही रमजानच्या काळात. मस्त होता. आता सामिष आहार बंद.

रेवती's picture

25 Jan 2016 - 5:52 am | रेवती

छान लिहिलय.

इरसाल's picture

25 Jan 2016 - 10:13 am | इरसाल

अजाण बालकाला "खिडकी वडा" म्हणजे काय असतं (नुसता बटाटवडा सोडुन्)हे कोणी समजावेल काय?

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 10:25 am | संदीप डांगे

खिडकी वडा म्हणजे खिडकीतून विकल्या जाणारा वडा...

क्रेझी's picture

25 Jan 2016 - 11:04 am | क्रेझी

लोल ;)

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 6:16 pm | संदीप डांगे

यु खॅन खॉल इट अ विन्डो-बर्गर...

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Jan 2016 - 12:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

वझ्यांनी वडे विकायला सुरुवात केली आपल्या वाड्याच्या पेशवाई टाईप खिडकीतुन..म्हणजे वरती अर्धा भाग मोकळा आणि खालती लाकडी गज. मग लोकांनीच खिडकी वडा म्हणायला सुरुवात केली आणि नंतर ते नाव रजिस्टर करुन ट्रेड मार्क बनले.
http://khidkivada.com/

हकु's picture

2 Apr 2016 - 5:21 pm | हकु

काही वर्षांपूर्वी त्यांच्याच एका भावाने बाजूला एक दुकान उघडले आणि नाव दिले, 'दरवाजा वडा'!!!
सध्या हा 'दरवाजा' बंद झालाय, पण 'खिडकी' मात्र उघडी आहे.

पिलीयन रायडर's picture

25 Jan 2016 - 12:40 pm | पिलीयन रायडर

खिडकी वडा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलपाशी सुद्धा मिळतो. मला तरी खुप आवडला.

लेख मस्त!

अनन्न्या's picture

25 Jan 2016 - 5:36 pm | अनन्न्या

खरच अशा लेखांचा खूप उपयोग होतो. मध्यंतरी एका धाग्यावर सोलापूरची अशी माहिती आली होती.डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाऊन आले तेव्हा बय्राच पदार्थांची चव घेता आली.

कल्याण मधे शिवाजीचौकातन पुढे गेल्यावर महाविर शाॅपिंग काॅम्प्लेक्सच्या समोरील गणेश आईसक्रीम वाला आपलं फेवरिट हाटेल होत . तिथे स्टीलच्या कपात मिळणारं पिस्ता आईसक्रीम स्कूप मला लय आवडायचे. रूंदीकरणात तुटली ती इमारत. रात्री जेवण झाल्यावर काकांबरोबर फिरायला निघायचो तेव्हा त्याच परिसरात हातगाडीवरती वजनकाट्यावर वजन करून आईसक्रीम विकात मिळायचं. पळसाच्या पानावर खायला मिळणार ते आईसक्रीम अजून विसरलो नाहीये. मी सुभेदारवाडा हायस्कुल मधला. शाळा सुटल्यावर जर पप्पा न्यायला आले तर त्यांच्या बाईकला हमखास एक किटली अडकवलेली असायची. तीत जवळच्याच अनंत हलवाईतुन 3 रूपये लिटर ने ताक न्यायचो ते आठवलं. दसर्याला अनंत हलवाई मधे रांग लावुन विकत घेतलेलं श्रीखंड ही आठवलं.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2016 - 8:27 am | अत्रुप्त आत्मा

कल्याणमस्तु.

पारनाक्याकडुन लालचोकी कडे जाताना उजव्या बाजुला एक डोसावाला आन्ना आहे.त्याच्याकडचा मैसुर डोसा ट्राय करा . उत्तम चव आणि कोळ्स्याच्या शेगडि वर बनवलेला.

विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 8:46 pm | विजय पुरोहित

मेहेंदळे सर.
झकास आहे माहिती.