मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच, पण अनेकदा आधुनिक म्हणवणारेही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, असं दिसतं. ऑफिसात, घरी, बाहेर, थिएटरमध्ये, सार्वजनिक ठिकाणी...इत्यादी इत्यादी.
मोबाईलचं आगमन झाल्यानंतर अनेक वर्षं तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच होता. अगदी आमच्या ऑफिसातही ऑफिसच्या खर्चाने काहींना मोबाईल मिळाले, तेव्हा आम्हाला त्याचं कोण अप्रूप होतं! मीटिंग रूमवर एक नोटीस लिहिलेली असायची..."मीटिंग चालू असताना मोबाईल बंद ठेवा, अथवा "सायलेंट'वर ठेवा.' ही "सायलेंट'ची काय भानगड, ते कळायचं नाही. विचारण्याची गरजही वाटली नाही. नंतर कधीतरी स्वतः मोबाईल घेतला, तेव्हाच त्याविषयी कळलं.
सांगण्याचा उद्देश काय, की मोबाईल घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कुठेही, कधीही मोबाईल अवेळी वाजू दिला नाही. मीटिंगमध्ये गंभीर चर्चा चाललेली असताना अचानक कुणाच्या तरी मोबाईलवर "ऐका दाजीबा' नाहीतर "ऐरणीच्या देवा तुला', "गणनायकाय गणदैवताय' असली काहीतरी ट्यून वाजते किंवा एकदम कोंबडाच आरवतो! किंवा ढोलबिल वाजायला लागतो. मग पॅंटच्या खिशात, चोरखिशात, जाकिटाच्या कप्प्यात, शर्टाच्या खिशात, जिथे कुठे मोबाईल आहे, तो शोधून काढण्यासाठी या नरपुंगवाची धावपळ सुरू होते. बरं, मोबाईल वाजला म्हणून अपराधी वाटून घेऊन हा सद्गृहस्थ मोबाईल कुणाचाही असो, तातडीने बंद करेल, असं नाही! तो आधी "हॅलो' म्हणतो. मग कोण बोलतंय, ते विचारतो. अनोळखी नंबर असेल, तर हा संवाद वाढतो. मग चार-पाच वाक्यानंतर "मी मीटिंगमध्ये आहे, थोड्या वेळाने करा' असा सल्ला देतो. मला असं वाटतं, बहुधा या मंडळींना पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींसारख्यांचेच फोन येत असावेत. त्याहून कुणाचे महत्त्वाचे फोन असूच शकत नाहीत!
थिएटरमध्ये तेच. चित्रपटातल्या ऐन रहस्याचा, सर्वाधिक उत्कंठेचा, परमोच्च तणावाचा, किंवा गेला बाजार हिरो-हिरॉइनच्या प्रणयाचा सीन चालू असताना कोणीतरी बाबा किंवा काकूचा कर्णकर्कश आवाजातला मोबाईल वाजतो. "हॅलो...हॅलो...हॅलो'ची जपमाळ धरल्यावर थोड्या वेळानं त्याला किंवा तिला पलीकडून कोण बोलतंय याचा साक्षात्कार होतो. मग "हां...अगं बेबी काय म्हणते? बारशाला येणारेय ना ती? जपून ये म्हणाव. हल्ली गाड्यांना गर्दी पण असते ना!' असलं, नाहीतर "गण्या कुठाय रे? मला काल येतो बोललावता! मग कदी येनारे? हां...पिच्चर बगतोय....गजनी गजनी!! ...बरा आहे. संध्याकाळी भेटतोस ना मग?' असले काहीतरी मंजुळ, नाजुक आवाजातले संवाद ऐकू येतात. थिएटरातल्या डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टिमचा आवाजही भेदून ते आपल्या कानात थयथयाट करतात.
सिनेमाचं एकवेळ जाऊ द्या. तिथे बराच ढणढणाट तरी असतो. मोबाईलवरचा एखाद-दुसरा संवाद खपून जातो. लोग नाटक चालू असतानाही मोबाईलवर बोलतात. विक्रम गोखले, मिलिंद इंगळे यांनी नाटक मध्येच थांबवून स्टेजवरून सर्वांना सूचना दिल्याचं मी पाहिलंय. अक्षरशः खजील होण्याशिवाय आपण काही करू शकत नाही अशा वेळी. काही म्हाताऱ्या-कोताऱ्यांचा तर वेगळाच त्रास असतो. त्यांना घरची कडी लावलेय का, उद्या कमलला कडूलिंब आणायला सांगितलंय का वगैरे गोष्टी आठवतात आणि मग ते स्टेजवरच्या कलाकारांनाही ऐकू जाईल अशा आवाजात त्याविषयी कुजबुजत राहतात.
या मोबाईल निरक्षरांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा तरी किती सांगाव्यात! आपण बिझी असताना, कुणाचा मोबाईल आला, तर ते डायरेक्ट कट करत नाहीत. फोन घेऊन, "नंतर करतो' किंवा "कर' किंवा तत्सम काही सांगून त्याच्या एका कॉलचे पैसे वाया घालवतात. आपण एखाद्याला फोन केल्यावर, तो "कट' करतोय, म्हटल्यावर एसएमएस पाठवत नाहीत. त्याऐवजी पुनःपुन्हा, थोड्या थोड्या अंतराने कॉलच करत राहतात.
जेवताना मोबाईल घेतला नाही, तर जणू यांना फाशीचीच शिक्षा होणार असते! काही जणांना तर जेवतानाच दुसऱ्याला फोन करण्याची हुक्की येते. मग रवंथ करत करत, घास तोंडात घोळवतानाच ते वाक्य थुंकत राहतात. पलीकडून ऐकणाऱ्याला तरी पेशन्स कसा असतो कुणास ठाऊक!
एसएमएस निरक्षरता, हा एक वेगळाच आजार आहे! मला तर भलेमोठे, लांबलचक आणि भरपूर विरामचिन्हं वगैरे वापरून एसएमएस पाठवायला भयंकर आवडतात! लिखाणाची भरपूर खुमखुमी त्यातून जिरवता येते. फोन शक्यतो टाळून मी एसएमएसच पाठवतो. त्यासाठी जादा बिल पडलं तरी बेहत्तर! पण आपण प्रेमानं, मेहनतीनं पाठवलेल्या लांबलचक एसएमएसला "हो' किंवा "नाही' असं अल्पाक्षरी उत्तर आलं, की टाळकंच फिरतं. आमच्या (इथे आमच्या म्हणजे "माझ्या'. नसत्या शंका घेऊ नका!) सहधर्मचारिणीला एसएमएस टाइप करण्यात फारसं स्वारस्य नाही. नाइलाज म्हणून ती करते. मग त्यात कुठे कुठे विरामचिन्हं आवश्यक होती, कुठे भाषा कशी बदलता आली असती, वगैरे सुधारणा करून मी तोच मेसेज तिला परत पाठवून देतो. त्याला ती कचऱ्याची टोपली दाखवते, हे सांगणे न लगे!
एक खासगी किस्सा सांगण्याचा मोह इथे आवरता येत नाही. मी काहीतरी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो आणि रेल्वेने पुण्याला परतत होतो. वाटेत मैत्रिणीच्या मोबाईलवरून मला बायकोचा एसएमएस आला. "कॉंग्रॅट्स! तू काका होणार आहेस.- हर्ष.' मेसेज मराठी भाषेत, पण रोमन लिपीत होता. मला काही कळेचना. "काका'च्या ऐवजी मी "बाबा' वाचलं. कसं, कुणास ठाऊक! च्यायला! म्हटलं, आपल्याला काहीच माहिती नाही आणि हे सत्पात्री दान अचानक कसं काय पदरात पडणार आहे देव जाणे! मी अस्वस्थ झालो. उत्तर पाठवून विचारणा केली, तेव्हा कळलं, की आमच्या मेव्हणी आणि साडूच्या संसारवेलीवर त्यांच्या परिश्रमांचं फूल उगवणार होतं! माझा जीव पिंपात पडला!!
तर असे हे मोबाईल मॅनियाचे किस्से! तुम्हाला आहेत असे काही अनुभव?
प्रतिक्रिया
4 Jan 2009 - 1:38 am | मनोज बागूल
लोकांना भ्रमणध्वनीच्या बाबतीत साक्षर होण्याची गरज आहे... निदान कार्यालयिन चर्चेत , नाट्यग्रुहात, चित्रपटग्रुहात, रुग्णालये इत्यादी ठिकाणी भ्रमणध्वनी कसे वापरावे हे लोकांना कळले पाहीजे...
4 Jan 2009 - 3:46 am | योगी९००
लोकांना भ्रमणध्वनीच्या बाबतीत साक्षर होण्याची गरज आहे
अगदी खरं..
आमच्या कंपनीच्या बसमधील एक मुलगी जाता-येता रोज सारखी कोणाकोणाशी बोलत असते..आणि बोलून बोलून काय बोलते..? आज मी कोणती भाजी केली, आज मी काय केले..आणि बोलताना पलीकडील व्यक्तीला " और बता..और बता .." असा आदेश . च्यायला आमची मात्र बसमध्ये झोपमोड..कोणी म्हणून तिच्या शेजारी बसायला तयार होत नाही.
परदेशात आल्यावर मात्र अशी व्यक्ती सुदैवाने नाही बघायला मिळाली.
खादाडमाऊ
4 Jan 2009 - 9:25 am | सुनील
लेख खुशखुशीत झालाय. शेवटचा किस्सा तर छानच!
असो, माझा मोबाईल नेहेमीच सायलेंट आणि वायब्रेशन मोडवर असतो, कार्यालयातच नव्हे तर घरीसुद्धा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Jan 2009 - 7:54 pm | आपला अभिजित
मी आणि मुलगी दुपारी दोन ते चार मस्त झोप काढतो. या वेळेत आम्ही घरचा फोन काढून ठेवतो, बेल बंद ठेवतो आणि मुख्य म्हणजे मोबाईल सुद्धा सायलेंटवर असतो. या वेळेत कुणा सेल्समनचा, क्रेडिट कार्ड बिर्ड वाल्यांना जीव घालवावासा वाटला, तर आमचा त्रास तरी वाचतो!
4 Jan 2009 - 9:34 am | पर्नल नेने मराठे
माझा हि मोबाईल नेहेमीच सायलेंट आणि वायब्रेशन मोडवर असतो. मला कोणाचाहि वाजला तरि डोक्याला ताप होतो.
चुचु
4 Jan 2009 - 12:52 pm | परिकथेतील राजकुमार
सही लिहिले आहे !
"गण्या कुठाय रे? मला काल येतो बोललावता! मग कदी येनारे? हां...पिच्चर बगतोय....गजनी गजनी!! ...बरा आहे. संध्याकाळी भेटतोस ना मग?
=)) =))
आम्ही ऐकलेला चित्रपट गृहातील एक संवाद :-
आमच्या शेजारी बसलेल्या 'अजय देवगणचा' फोन वाजला .. पलिकडे भवतेक 'काजोल' असावी. आपल्याला आपल्या सामानाचा 'फुन' आलाय हे बरोबरच्या ३ मित्रांना कळावे ह्या उद्देशाने त्याने 'स्पिकर्स' चालु केले.
तो :- (हेलो वगैरे बोलणे असंस्कृत वाटत असावे) हा बोल ग..
ती :- ये ऐक ना आत्ता कुथे तु ?
तो :- आगा मी एनॉक्स मंध्ये हाये
ती :- कोनाला याडमीट केलय ?
आजुबाजुला प्रचंड हशा आणी अजय देवगणचा चेहरा एकदम 'फोटु' काढण्यालयक.
तो :- तुझ्या बा ला ! (खाडकन फोन बंद केला गेला, बंद म्हणजे एकदम स्विच ऑफच)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
4 Jan 2009 - 7:47 pm | आपला अभिजित
ती :- कोनाला याडमीट केलय ?
हे भारीच!
बाकी, चंपीच्या मंगळागौरीची निमंत्रणं, पुतणीच्या डोहाळजेवणाची तयारी, भिशीच्या पदार्थांची यादी....कसलीही चर्चा होउ शकते थिएटरमध्ये!
4 Jan 2009 - 10:34 pm | कोलबेर
'एनॉक्स'वाला किस्सा भन्नाट!!!
=)) =))
5 Jan 2009 - 1:37 am | शितल
सहमत.
=)) =))
4 Jan 2009 - 2:39 pm | भिडू
माझा पण मोबाईल नेहेमीच सायलेंट आणि वायब्रेशन मोडवर असतो, २४*७.
काहि जण उगाचच रिंग टोनशी खेळत बसतात बस मधे. किंवा रात्रिचा प्रवास असेल तरि रात्रि १२-१ वाजता फोन वर गप्पा मारत बसतात.आपल्या मुळे बाकिच्या लोकंना त्रास होतो आहे हेच त्यांना कळत नाहि.तसेच जिम मधेहि ट्रेड मिल वर शाईंनिंग मारत धापा टाकत बोलत असतात.
4 Jan 2009 - 7:51 pm | आपला अभिजित
नाईट ड्युटी संपल्यावर भिडे पुलाखालच्या गाडीवाल्यांकडे काहीबाही खायला जायचो. तिथे एक मित्र रात्री एक-दीड वाजताही कुणाशी तरी गुलुगुलु बोलत असायचा. बरं, त्याचं कुणाशी लफडं-बिफडं असण्याचीही सुतराम शक्यता नव्हती. कुणाशी बोलायचा कुणास ठाऊक!!
4 Jan 2009 - 7:53 pm | विनायक प्रभू
मला पण "वायब्रेटर" मोड आवडतो.
4 Jan 2009 - 10:29 pm | चतुरंग
तुमच्या मनात भलताच 'थरथराट' आलेला दिसतोय! ;)
चतुरंग
4 Jan 2009 - 6:17 pm | हरकाम्या
च्यायला हे मोबाइल म्हणजे एक लफ्ड्च आहे
5 Jan 2009 - 1:33 am | प्राजु
तू राजकारण सोडून दुसरं काहीतरी लिहिलंस हे बघून बरं वाटलं आणि मुख्य म्हणजे आलेल्या प्रतिसादांना तुझा लेख असल्यामुळे का होईना... पण प्रति प्रतिसाद केलेस हे बघून आनंद झाला. नाहीतर, तुझे प्रतिसाद , म्हणजे दुर्मिळ बाब आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jan 2009 - 6:31 pm | आपला अभिजित
एवढा कोकणस्थी खवचटपणा करायची काही गरज नव्हती! बघून घेइन तुला! तुझ्या पुढच्या लिखाणावर `कविता न पाडता आणि उमाळे-उसासे न टाकता वेगळं काही लिहिलंस, याबद्दल धन्यवाद!' अशी प्रतिक्रिया टाकतो की नाही, बघ!
असो.
राजकारण हा माझा अभ्यासाचा, जिव्हाळ्याचा आणि व्यासंगाचा विषय नाही; पण व्यवसायाचा भाग आणि कमाईचं एक साधन आहे. त्यामुळे त्यावर जास्त लिहितो. (पुन्हा) असो!!
तसा मी मिपा वर दर दिवशी सरासरी ४० मिनिटं असतो. सगळे लेख वाचून प्रतिक्रिया देणं शक्य होत नाही. आवर्जून द्याव्याशा वाटतील, तिथे देतो. आणि माझ्याच लेखावर आलेल्या प्रतिसादांवर औपचारिक धन्यवाद देणं टाळतो. विशेष प्रति-प्रतिसाद देण्यासारखा नसेल तर, त्याचबरोबर आपलाच लेख उगाचच पुन्हा वर येइल, या भयानंही टाळतोच टाळतो! (हे वाक्य फारसं जमलं नाहीये. समजून घे.)
5 Jan 2009 - 11:37 pm | प्राजु
तुझ्या पुढच्या लिखाणावर `कविता न पाडता आणि उमाळे-उसासे न टाकता वेगळं काही लिहिलंस, याबद्दल धन्यवाद!' अशी प्रतिक्रिया टाकतो की नाही, बघ!
खून का बदला खून!
वेल कम! चालेल मला.
काय आहे महितिये का.. मी जे लिखाण आवडते त्यावर आवर्जून प्रतिक्रिया देते. केवळ काहीतरी चूक सांगयाची म्हणून प्रतिक्रिया नाही देत. मिपावर उत्तमोत्तम लेख येताहेत.. त्यावर काहीही तू प्रतिक्रिया देत नाहीस म्हणून फक्त तसं लिहिलं.
आणि माझ्या लिखाणावर वरची प्रतिक्रिया देण्याचं म्हणत असशील तर.. मला चालेल.
आवांतर पुरे. काही अजून लिहायचे असेल.. तर ख व /व्य नि कर चालेल. तिथे बोलु.(भांडू नेहमी प्रमाणे) :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jan 2009 - 8:27 am | अनिल हटेला
एकदम खुसखुशीत लेख ....
आवडला...
ती :- कोनाला याडमीट केलय ?
ये भी सही.....=))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
5 Jan 2009 - 12:36 pm | केवळ_विशेष
च्यायला असले हे गणपे लै दिसतात आजूबाजूला...
मोठमोठ्यांनी 'गानी' लावून रस्त्यानी चालणारे, लोकल्/बस मध्ये दिसणारे 'लोक्स' अक्षरशः डोक्यात जातात
5 Jan 2009 - 12:49 pm | दिपक
खुमासदार आणि खुशखु्शीत लेख :)
हल्ली चायना मोबाईलमुळे हा त्रास जास्तच वाढला आहे. त्या मोबाईलचा आवाज फारच मोठा असतो. त्यात ट्रेन आणि बस मध्ये गाणी लावणारे पण सलुन मध्ये वाजवतात तसली हिमेशटाईप गाणी लावुन उबग आणतात..
5 Jan 2009 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण माझे विचार थोडे वायलेच हायेत, (मी पण तशी चक्रमच ना!) ;-)
आपला मोबाईल नंबर दुसर्याला दिला की काळ-वेळ न बघता लोकं फोन करतात. हापिसातून फोन फुकटच आहे तेव्हा पिडा (काका नव्हे) दुसर्याला अशी एक भावना. शिवाय आपला वेळ जात नाही तर दुसराही मजा मारत असेल असाही एक गैरसमज असतो. आपल्याकडे मोबाईल आहे याचा अर्थ कोणत्याही वेळेला कोणीही फोन करावा आणि आपण त्यांना उत्तर द्यायला बांधील आहोत असा लोकांचा समज असतो.
प्रसंग एकः
(एक मिपाकरच) एक-दोनदा कधीतरी फोनवर बोललो असू, पण सुटीच्या दिवशी फोन केला. मी कामात गर्क, तेव्हा माझी सगळी शक्ती, बुद्धी, इ.इ. संगणकाकडे. फोन वाजला, अनोळखी नंबर.
मी: हॅलो
समोरचा: हॅलो (आणि एक मोठा बाजपेयी पद्धतीच पॉज)
मी: हं, बोला (आलिया भोगासी, का उचलला फोन, केली ना चूक एकदा!)
स: ओळ्खलंस का?
मी: नाही.
स.: मग ओळख.
मी.: नाही येत, बोला. (च्यामारी, किती फूटेज खाणार? माझा भाऊ नाहीतर बॉयफ्रेंडही असल्या फडतूस 'गंमती' करायचे नाहीत)
स.: तू कोण?
मी: (आता मात्र पेशन्स संपला) च्यायला, फोन कुणी केलाय? तुला नाही कळलं, (भाड्या, हे मनात) कोणाला फोन केला ते? (कालची उतरली नाही का?)
स.: मला माहित्ये मी कोणाला फोन केला ते, पण मग मी कोण?
मी: तुलाही माहित नाही का? मलातरी माहित नाही. आणि हो, आय डोण्ट केअर हू यू आर! (फोन बंद)
यानंतर फोन दोन-तीनदा वाजला, मी सरळ स्वीच ऑफ केला आणि कामाला सुरूवात. आतून नवरा बाहेर आला माझं बोलणं ऐकून, "कोण हा वेडा, फोनवर कसं बोलतात तेही समजत नाही याला. बरं झालं फोन बंदच केलास ते!"
प्रसंग दोन:
(दुर्दैवाने पुन्हा दुसरा मिपाकरच!) मी नेहेमीप्रमाणे फोन हापिसातल्या खोलीत ठेवून खाली जेवायला कँटीनला गेले. इकडे तीनदा फोन वाजला होता आणि बंद. मला कल्पनाच नाही. जेवून आले, फोन ही अतिशय दुर्लक्षित वस्तू असल्यामुळे, त्याला तिकडेच पडू दिलं वामकुक्षीसाठी आणि पुन्हा मॉनिटर सुरु केला. मिपावर क्लिक केलं, एक व्यनी, "मी फोन करत होतो, उचलला का नाहीस?".
मी: जेवायला गेले होते म्हणून!
समोरचा: मग फोन नाही का बरोबर नेत?
मी: नाही
सः का?
मी: (च्यायला तुझी आणि माझी ओळख अशी किती, तुला का रे चोंबड्या, भोचक चौकशा?) नेला नाही म्हणून! तुझा जीव नाही ना गेला मी फोन उचलला नाही म्हणून? (मग उगाच कीर्तन करताना देवळाच्या कळसाला आग लागल्यासारखी का बोंब मारतोस?)
बरं हे सगळं झाल्यावर पुन्हा एक खोटा आरोप: तुला काय ऑफिसातून फुकट फोन असतीलच.
मी: नाही. होते तेव्हाही मी स्वतःचाच फोन वापरायचे. ऑफिसचा फोन ऑफिसच्या कामासाठी. तू फुकटचे फोन करतोस तसे सगळेच करतात असं नाही.
सः (मग सपशेल माघार, शेपटावर पाय पडला ना!) नाही, सगळेजणच करतात म्हणून म्हटलं.
मी: मी करत नाही, उगाच काहीबाही बोलू नकोस. आणि तसंही आता अर्धा तास नाही आहे माझ्याकडे फोनवर फुकट घालवायला, तेव्हा बाय.
(त्यानंतर फारसे फोन आले नाहीत.)
हे सगळं झाल्यावर पूर्वी बाबा ओरडायचे ते किती योग्य होतं असं वाटतं. "फोन कुणीही केला असेल, गप्पा मारायला फोन नाही. गप्पाच मारायच्या असतील तर मित्र/मैत्रीणीच्या घरी जाऊन बस नाहीतर इथे बोलावून घे आणि गप्पा मार. नाहीतर पुस्तक वाच, अभ्यास कर, खेळायला जा, नाहीतर झोप सरळ."
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
5 Jan 2009 - 6:08 pm | आपला अभिजित
तुम्ही फारच आक्रमक लिहिता बुवा! आवडलं.
असो.
हे किस्से धमालच आहेत.
काही लोक मोबाईल करून पहिला प्रश्न `कुठे आहेस' विचारतात. काय संबंध?
मी मसणात असेन! तुझ्या बापाचं काय जातंय?
तुझं काम बोल ना! मी कुठे आहे, यावर तुझं काम ठरणार आहे का?
हां....काही खाजगी बोलायचं असेल आणि ऑफिसात आहेस की घरी हे विचारायचंय, तर `दोन मिनिटं वेळ आहे का' असं विचारून सुरुवात करता येतेच ना?
5 Jan 2009 - 7:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही फारच आक्रमक लिहिता बुवा! आवडलं.
नाहीतर काही लोकं फार छळवाद मांडतात. लांबच राहिलेलं बरं असतं, पण हे मोबाईल नंबरची दुर्बुद्धी सुचल्यानंतर समजतं!
काही लोक मोबाईल करून पहिला प्रश्न `कुठे आहेस' विचारतात. काय संबंध?
मी मसणात असेन! तुझ्या बापाचं काय जातंय?
=)) अगदी ... माझ्या मनातही हेच येतं.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
5 Jan 2009 - 7:13 pm | मनस्वी
+१
मोबाईलवर त्रासदायक रिंगटोन लावून तो तसाच डेस्कवर सोडून गेलेली मंडळीही डोक्यात जातात.
नुसता व्हायब्रेटरवर असेल तरी तो क्रॅ-क्रॅ-क्रॅ आवाज डोके आऊट करतो.
आणि मिटींग / सेमिनारमध्ये बिनदिक्कतपणे रिंगा वाजल्याने डोक्याला शॉट बसतो.
5 Jan 2009 - 1:51 pm | मॅन्ड्रेक
I strongly belive that
Mobile : an instrument for comunication and not for conversation.
5 Jan 2009 - 1:53 pm | विनायक प्रभू
हो म्हणुनच कम्युनिकेशन चे कम्युनिसेशन होते.
5 Jan 2009 - 6:13 pm | अमोल केळकर
मोबाईलचा उपयोग आज काल फक्त बोल्ण्यासाठी न करता इतर अनेक गोष्टीत केला जातो. त्याबाबत ही साक्षर होण्याची गरज आहे.
मोबाईल फोनचा उपयोग इतर गोष्टी ( गाणी, खेळ, कॅमेरा इ.) साठी न करता फक्त बोलण्यासाठी केला तर त्या मोबाईलचे आयुष्य ही वाढते हा एक माझा अनुभव
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
5 Jan 2009 - 6:15 pm | अवलिया
लेख छान आहे. आवडला.
* मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच ह्या वाक्यावर किंचित आक्षेप. *
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी