इंपॉसिबल मेलडी : ओपी !

विवेक ठाकूर's picture
विवेक ठाकूर in जनातलं, मनातलं
20 Jan 2016 - 11:42 pm

आज ओपींचा वाढदिवस. लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार. `आय एम म्युझिक इल्लीटरेट' असं मनमोकळेपणानं कबूल करून, शास्त्रीय संगीताचं कोणतंही शिक्षण नसतांना केवळ स्वतःच्या स्वरसौंदर्याच्या आकलनावर, एकसोएक बंदिशी बांधणारा हा अवलीया रसिकांना कायम मोहवत आला आहे.

कोणत्याही चांगल्या स्वर रचनेचे केवळ तीन घटक असतात, क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी. क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी हे सारखेच वाटणारे घटक दोन प्रकारे व्यक्त होतात, एक म्हणजे, दोन स्वरांमधलं अंतर आणि दुसरं, त्या अंतरामुळे ऐकू येण्यातली सुस्पष्टता. जर दोन स्वरातलं अंतर वाढलं तर ऑडिबिलीटी आणि क्लॅरिटी वाढते पण मेलडी बिघडते. दोन स्वरातलं अंतर कमी झालं तर मेलडी वाढू शकते पण क्लॅरिटी आणि ऑडिबिलीटी कमी होते. त्यामुळे स्वरसंयोजनात पहिल्या स्वरानंतर नेमका दुसरा स्वर कोणता घ्यावा आणि मग त्यापुढचा कोणता घ्यावा...अशा सांगितिक चिंतनातून संपूर्ण गाणं तयार होतं.

सगळं गाणं म्हणजे क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन पैलूंवर काम करत निर्माण झालेली एक धून असते. या धूनेवर मग शब्द आणि वाद्य यांची गुंफण होऊन आपण ऐकतो ते गाणं तयार होतं.

ओपींची खासियत म्हणजे त्यांची शब्दांवरची हुकूमत. एखादी सुरेख धून बांधल्यावर ओपी लिरीस्टला घेऊन एकेक शब्द तोलायचे, त्यामुळे ओपींची गाणी हृदयाला स्पर्शून जातात. ओपीचं गाणं लागलं की नकळतपणे आपलं लक्ष गाण्याकडे वेधलं जातंच.

आप यूं ही अगर हमसे मिलते रहे... असं नुसतं रफीनी म्हणायचा आवकाश की आपण गाण्याकडे ओढले जातो. आशानी, बलमा खुली हवामें...म्हटलं की आपल्याला मोकळ्या आकाशाखाली आल्यासारखं वाटतं. ओपींच्या गाण्यांची कडवी म्हणजे एकेसोएक शेर असल्यासारखी आहेत. त्यामुळे ओपीचं संगीत म्हणजे साध्या सोप्या शायरीलाच जणू स्वरसाज चढवलेला आहे.

इंटरल्यूड (म्हणजे गाण्यामधल्या म्युझिकसाठी) वाद्य निवडण्याचं ओपींचं कौशल्य हा तर क्लॅरिटी, ऑडिबिलीटी आणि मेलडी या तीन्ही पैलूंचा अप्रतिम आविष्कार आहे. मग ती बहुत शुक्रीया बडी मेहेरबानी मधली हार्मोनीयम असो, दिवाना हुवा बादल मधली सतार असो की एक परदेसी मेरा दिल ले गया मधली बीन असो; ओपींचं वाद्य निवडण्याचं कौशल्य अद्वितीय होतं.

ओपींचा रिदमसेन्स हा तितकाच कौतुकाचा विषय आहे. माझ्या मते ओपींनी अत्यंत साधे, पण एकदम उठावदार रिदमस वापरले. साध्या रिदमची खासियत अशीये की तो ऐकणार्‍याच्या हृदय-लयीशी समरुप होतो त्यामुळे ऐकणार्‍याला ते गाणं आपल्यालाही सहज गाता येईल असं वाटतं.

उस्ताद आमीर खां हे ओपींचे खास दोस्त, एकदा त्यांच्यावर नाराज झाले. ओपींना त्यांच्या नाराजगीचं कारण कळेना तेंव्हा ते आमीर खांना भेटायला गेले. उस्तादजी म्हणाले की तू शास्त्रीय संगीत शिकलायंस हे इतके दिवस माझ्यापासून लपवून का ठेवलंस? त्यावर ओपी म्हणाले, मला माझ्या गाण्यांची शपथ, मी खरंच शास्त्रीय संगीत शिकलेलो नाही. पण तुम्हाला असं का वाटतंय? त्यावर खांसाहेब म्हणाले की शात्रीय संगीत शिकल्याशिवाय असं गाणं करता येणंच शक्य नाही. ओपींंनी विचारलं कोणत्या गाण्याबद्दल म्हणतायं तुम्ही? तर खांसाहेब म्हणाले तुझं हे गाणं, देखो बिजली डोले बीन बादल की!

मधे मी आनंदजींची मुलाखत पाहात होतो तेंव्हा ते म्हणाले इस तालमें तो हमेभी गाना बांधना मुश्कील है, इसे आडा चौताल कहेते है.

आशा पारेखनी ओपींच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारलं होतं की `आखिर आपकी दिलकश मौसिकी का राज क्या है?' त्यावर ओपी हसून म्हणाले "बस एक ही चिज है, रोमान्स! मेरे गाने जबभी आप सुनेंगे तो आपका दिलभी उसी मोहोब्बतके रंगमे रंग जाएगा".

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

20 Jan 2016 - 11:47 pm | जयन्त बा शिम्पि

सहमत, अजुन इतरही बर्‍याच गाण्यांबद्दल लिहिता येणे शक्य आहे. तेही आले तर अधिकच आनंद वाटेल.

विवेक ठाकूर's picture

21 Jan 2016 - 12:08 am | विवेक ठाकूर

सिंथेसायजर शिकायला सुरुवात केल्यावर निव्वळ मेलडी या निकषावर हिंदी सिनेमातल्या सर्व संगीतकारांची मिळून साधारण २३० गाणी मी संग्रहित केली. संगीतकारांबद्दल मी बराचसा अनभिज्ञ होतो त्यामुळे कुठलं गाणं कुणी दिलंय याची मला फारशी कल्पना नव्हती. ही गाणी म्हणजे अल्फाबेटीकल अरेंजमंट आहे, ए टू झेड अशी लिरिक्सप्रमाणे ती स्टोअर केलीयेत, जेणे करून हवं ते गाणं, हव्यात्या वेळी चटकन लावता यावं. आज मी जेंव्हा ही लिस्ट बघतो तेंव्हा लक्षात येतं की ओपींचा हीट गाणी देण्याचा रेट सर्वोच्च आहे, म्हणजे त्यांनी दिलेली एकूण गाणी आणि त्यातली लोकप्रिय झालेली गाणी यांचं गुणोत्तर सर्वात अधिक आहे. त्यांच्या एकेका गाण्याचा इतका जवळून आभ्यास केलायं की एका गाण्यासाठी एक लेख लिहावा लागेल. तस्मात, लेखावर जसे प्रतिसाद येतील तसं आणखी लिहीन.

अभिजितमोहोळकर's picture

25 Jan 2016 - 7:47 am | अभिजितमोहोळकर

शिकण्याबाबत एक वेगळा धागा काढा अशी विनंती आहे.

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 10:34 am | विवेक ठाकूर

फक्त एकच स्केल धरुन, गुरुजींकडे एक सिंथ आणि माझ्याकडे दुसरा अशा पद्धतीनं एकेक गाणं आणि त्याचा इंटरल्यूड बसवून घ्यायचा. मग लिरिक्सच्या अंगानी गाण्याचा आणि त्यातल्या बारकाव्यांचा भरपूर रियाज करायचा. आणि एकदा गाणं बसलं की गुरुजी रिदम वाजवणार आणि मी सिंथ असा ऑर्केस्ट्रा करायचा!

अभिजितमोहोळकर's picture

25 Jan 2016 - 6:58 pm | अभिजितमोहोळकर

ओके.

यशोधरा's picture

21 Jan 2016 - 12:11 am | यशोधरा

लेख सुरु होता होताच संपला. अजून लिहिलेले वाचायला नक्कीच आवडले असते.
कितीतरी गाण्यांवर लिहिता येईल. प्रसिद्ध झालेल्या गाण्यांबद्दल तर लिहिता येईलच पण काही गाणी फारशी लोकप्रिय होत नाहीत पण अनवट शब्द आणि सुरावट असेल तर मनात रुतून राहतात. अशा गाण्यांबद्दलही लिहावे, अशी विनंती.

प्रचेतस's picture

21 Jan 2016 - 7:01 am | प्रचेतस

क्या बात है संक्षी...!!
लेख आवडला.

अभिजितमोहोळकर's picture

21 Jan 2016 - 8:06 am | अभिजितमोहोळकर

स्वतःचा वेगळा रंग आणि ढंग टिकवून ठेवून, आपल्याच मस्तीत, आपल्याच धुंदीत नशीलं संगीत देत रहाणार्या ओपींना सलाम.

र्‍हीदम कींग हा खिताब त्यांच्यावर जरा अन्यायच करतो असं कधी कधी मला वाटतं. त्यांनी जितकी ठेकेबाज गाणी दिलीत तितकीच निव्वळ सुमधूर गाणी ही दिली आहेतच! काव्याची ऊत्तम जाण असलेल्या संगीतकारांपैकी एक. अनेक प्रतिभाशाली संगीतकारांच्या मांदियाळीतील या सम हा च.

ओपीवरील पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

मारवा's picture

21 Jan 2016 - 8:23 am | मारवा

संक्षी
फार सुंदर लेख
एक मागणी ओपींच्या संगीतात त्यांनी लोकगीतांमधुन जे कलात्मक कुशलतेने निवडुन वापरलेलं होत.
त्याचा कसा कुठल्या गाण्यात सुंदर वापर केला हे थोड सोदाहरण तुलनात्मकतेने दाखवल्यास
आनंद होइल
संक्षींचा जुना फॅन
धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

21 Jan 2016 - 9:34 am | प्राची अश्विनी

अतिशय सुरेख लेख! अजून वाचायला आवडले असते.

बोका-ए-आझम's picture

21 Jan 2016 - 9:48 am | बोका-ए-आझम

सभी तो लता के गुलाम है असं म्हणत ओपींनी आपली कारकीर्द गाजवली. प्रीतम आन मिलो, मै सोया अखियां मिचे, मुझे देखो हसरत की तस्वीर हूं मै, प्यार पर बस तो नही है - सगळी एकाएकी बढकर एक. रफी-आशा यांची ओपींनी दिलेली द्वंद्वगीतं, विशेषतः नया दौर आणि काश्मीर की कली मधली - हा तर ग्रंथाचा विषय आहे.
लेख आवडला. अजून या विषयावर वाचायला आवडेल.

मोगा's picture

21 Jan 2016 - 9:50 am | मोगा

ओपी , शंकर जयकिशन आहेत , म्हणुन सामान्य लोक इतके तणावाचे आयुश्यही सुखात जगत आहेत

मोगा's picture

21 Jan 2016 - 10:22 am | मोगा

ओपी , शंकर जयकिशन आहेत , म्हणुन सामान्य लोक इतके तणावाचे आयुश्यही सुखात जगत आहेत

तुषार काळभोर's picture

21 Jan 2016 - 10:41 am | तुषार काळभोर

शिवाजीमहाराजांपासून सचिनपर्यंत आणि लतापासून मोदीपर्यंत कोणाचीही भक्ती करू नये. कारण भक्ती आंधळी असते.
डोळसपणे प्रेरणा घ्यावी, आनंद घ्यावा आणि आपलं व इतरांचं जीवन अजून चांगलं बनवावं.

चौकटराजा's picture

21 Jan 2016 - 11:04 am | चौकटराजा

छ्या ! सं क्षी इतका तोकडा लेख ओपी नय्यर यांच्यावर लिहतीलसे वाटत नाही . ओपी हे शापित गन्धर्व होते इतकेच नमूद करतो. बास हेच वर्णन योग्य वाट्तेय !

विवेक ठाकूर's picture

21 Jan 2016 - 11:40 am | विवेक ठाकूर

ओपींचं एकेक गाजलेलं गाणं घेऊन ही मैफिल सुरू ठेवायची आहे. लेख संपन्न केला तरी मैफिल सुरु आहे.

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 11:20 am | प्रसाद१९७१

देखो बिजली डोले बीन बादल की! मधे मी आनंदजींची मुलाखत पाहात होतो तेंव्हा ते म्हणाले इस तालमें तो हमेभी गाना बांधना मुश्कील है, इसे आडा चौताल कहेते है.

संक्षी - हा साधासुधा त्रिताल आहे. आडा चौताल वगैरे काहीतरी फेकु नका ( उगाचच आनंदजींची बदनामी )

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 11:21 am | प्रसाद१९७१

लता मंगेशकरसारख्या स्वरसाम्राज्ञीच्या उपेक्षेवर बेदिक्कत मात करत स्वतःची संपूर्ण कारकिर्द घडवणारा हा एकमेव संगीतकार

सुगमसंगितात गाणार्‍याचे काँट्रीब्युशन ५-१० टक्क्या पेक्षा जास्त नसते. खरी दाद चाल लावणार्‍या संगीतकाराला आणि नंतर गीत लिहीणार्‍याला.

मराठी_माणूस's picture

21 Jan 2016 - 11:59 am | मराठी_माणूस

सुगमसंगितात गाणार्‍याचे काँट्रीब्युशन ५-१० टक्क्या पेक्षा जास्त नसते.

असहमत. असे असते तर गाणी कोणाच्याही आवाजात चांगली वाटली असती. रीमिक्स तर ऐकवत नाहीत.

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 12:14 pm | प्रसाद१९७१

असहमत. असे असते तर गाणी कोणाच्याही आवाजात चांगली वाटली असती. रीमिक्स तर ऐकवत नाहीत

अहो कोणाचाही नाही, कोणाच्याही हा अर्थ तुम्ही लावला. पण अबॉव्ह अ‍ॅव्हरेज आणि सुराला बरे असले की पुरते. चांगली चाल आणि शब्द असलेली गाणी आपण पूर्वी ऑर्केस्ट्रा मधुन आणि मराठी भावतीतांच्या कार्यक्रमांच्या मधुन आवडीने ऐकतच होतो. आणि गेल्या २० वर्षात "सारेगम/प" वगैरे कार्यक्रमात पण ऐकायला आवडतात स्पर्धकांच्या तोंडी.
टी सिरीज ची सुरुवातच गाजलेली गाणी नवोदीत गाणार्‍यांच्या कडुन गाऊन घेउन झाली होती.

कोणाच्याही नाही, पण लताच्या ऐवजी सुमन कल्यणपुर किंवा अनुराधा पौडवाल किंवा श्रेया घोषाल कोणीही चालेल. ही तर फारच चांगली नावे झाली पण मराठी सारेगमप मधल्या कोणीही शेवटच्या ८-१० स्पर्धकांनी गायली तरी मस्त वाटतात

भक्त प्रल्हाद's picture

28 Jan 2016 - 4:48 pm | भक्त प्रल्हाद

असहमत.

लता दिदींचे 'कही दिप जले कहि दिल' हे गाने ऐकुन पहा. या ताकदिने हे शब्द पहिल्यांदा गाणे महामुश्किल.
https://www.youtube.com/watch?v=Idz-tLqxtEY

शान्तिप्रिय's picture

21 Jan 2016 - 11:50 am | शान्तिप्रिय

उत्तम लेख.

विवेक ठाकूर's picture

21 Jan 2016 - 12:11 pm | विवेक ठाकूर

पण गाण्याच्या सुरुवातीला आणि क्लायमॅक्सला त्रिताल नाही. आनंदजींची बदनामी करण्याचं मला काही कारण नाही, जे ऐकलं ते लिहीलंय.

सुगमसंगितात गाणार्‍याचे काँट्रीब्युशन ५-१० टक्क्या पेक्षा जास्त नसते. खरी दाद चाल लावणार्‍या संगीतकाराला आणि नंतर गीत लिहीणार्‍याला.

असं असतं तर कुणीही उठून गायक झाला असता. लिरिसिस्ट अत्यंत महत्त्वाचा आहे पण सर्व सुगम संगीत ही भावाभिव्यक्ती आहे आणि तो भाव, स्वरातून रसिकांपर्यंत पोहोचवणारे गायक महान ठरलेत. उगीच नाही आशा भोसलेला मदहोश भाव व्यक्त करणारी गाणी मिळाली आणि रफींना वर्सेटाईल सिंगर म्हणत किंवा लता मंगेशकरचा स्वर हृदयाला स्पर्श करून जात. नुसत्या वाद्यमेळातून अभिव्यक्ती होऊ शकली असती तर गायकांची गरजच भासली नसती.

लिरिसिस्टची शायरी म्युझिशियन स्वरबद्ध करतो आणि गायक ती वाद्यवृंदासमवेत, रसिकांपर्यंत पोहोचवतो. ही सगळी परिमाणं जुळून आली तरच गाणं लोकप्रिय होतं. तस्मात, गायकाचं काँट्रीब्यूशन नगण्य म्हणणं चुकीचं आहे.

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 12:19 pm | प्रसाद१९७१

जर गायकांचे काँट्रीब्युशन बर्‍यापैकी महत्वाचे असते तर ( अगदी ३३ टक्के ) आपल्याला सारेगमप मधे नवोदित गायकांची गाणी ऐकवली नसती.
ती आपण आवडीने ऐकु शकतो म्हणजे गायकांचे काँट्रीब्युशन फार नसते हे हायपॉथिसिस खरे ठरते.

असं असतं तर कुणीही उठून गायक झाला असता.

मी असे अजिबात म्हणले नाही. चांगला आवाज, आणि सुराला चांगला असणे बास आहे. प्रत्येक वेळेला लता, रफि नसले तरी चालतात.

मराठी_माणूस's picture

21 Jan 2016 - 12:27 pm | मराठी_माणूस

मदन मोहन ने जेंव्हा लताबाई उपलब्ध नव्हत्या तेंव्हा दुसर्‍याच्या आवाजात गाणे रेकॉर्ड करुन घेतले मात्र फायनल रेकॉर्डींग हे लताबाईंच्याच आवजात केले. हे असे का ?

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2016 - 12:39 pm | प्रसाद१९७१

त्यांची मर्जी. आणि लताबाई दुसर्‍या कोणाच्या आवाजातले मदनमोहन नी चाल लावलेले गाणे मार्केट मधे येउन देणार होत्या का? पैसे न घेता सुद्धा गायले असते त्यांनी ते गाणे.

आणि तेच गाणे तुम्ही दुसर्‍या कोणाच्या आवाजात सारेगम मधे नक्की ऐकले असेल.

१७८० - ८५ पासुन अत्यंत सुरेल आणि गोड आवाजाच्या खुप गायिका पुढे आल्या. अनुराधा पौडवाल, कविता, अलका याद्निक, साधना सरगम, सुनिती, श्रेया ही तर थोडी नावे.
पण १९६० च्या दशकात अश्या का कोणी पुढे शकल्या नाहीत हेच खरे कोडे आहे. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.

थोडा फार आवाज, रिदम सेन्स आणि गाणं उचलायच्या वेळी लागणारा नेमका स्वर या तीन गोष्टी जमल्या तर कराओकेवर पण गाता येतं, त्यासाठी तुम्ही घेतलेल्या नावांची सुद्धा गरज नाही.

प्रश्न पूर्णपणे अमूर्त स्थितीत असलेलं गाणं भावाभिव्यक्त करण्याचा आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण प्रत्येक संगीतकार हा त्याच्या गाण्यासाठी `योग्य आवाज' शोधतो. ओपींनी स्वतः म्हटलंय की माझ्या गाण्यांना आशाचा आवाज इतका जबरदस्त मॅच होतो की त्यातून मला हवा तो भाव व्यक्त करता येतो.

इतरांचं सोडा पण ओपींना, लता मंगेशकर नाही म्हटल्यावर इतर विकल्प होतेच, तरीही त्यांची सगळी सुरेख सोलो आणि ड्युएट्स आशानीच गायलीयेत यातच गायकाचं महत्त्व अधोरेखित होतं.

मराठी_माणूस's picture

21 Jan 2016 - 2:31 pm | मराठी_माणूस

ओपी ने काही काळ , काही कारणामूळे रफी ऐवजी महेंद्र कपुर कडुन गाणी गाउन घेतली होती. त्या गाण्या बद्दल त्याने स्वतः नाराजी व्य्क्त केली होती.

चौकटराजा's picture

21 Jan 2016 - 2:35 pm | चौकटराजा

जावेद अख्तर एक वाहिनीवर एक कार्यक्रम सादर करीत असत त्यातील एक भाग ओ पी नय्यर यांच्यावर होता. त्यामधे स्वत: आशा पारेख यानी कथन केलेला भाग होता.देखो बिजलीचे ध्वनिमुद्रण ज्या वेळी पारेख यानी ऐकले त्यावेळी सुरुवातीच्या तुकड्यामधला ताल हां 16 मात्रांचा नाही असे त्याना आढळून आले.त्यानी नय्यरना या बद्द्ल विचारले असता आपण ते तुकडे तयार करताना सहजच अनवट तालात ते बद्ध झाले असे नय्यर यानी सांगितले .बाकी गाणे हे 16 मात्राच्या त्रितालाच आहे.काहीच्या मते हां रामकली राग तर काहीन्च्या मते बसंत मुखारी .ओपी म्हणाले असते 'आपल्याला तो कोणता राग काय ठाव नाही बाबा !"

त्यात हा श्री राग आहे असं म्हटलयं.

मारवा's picture

21 Jan 2016 - 12:36 pm | मारवा

ते संक्षी संबोधन विसरुन जा
माझ्या मागणीचा विचार व्हावा ही पुन्हा एकदा आग्रहाची विनंती.
तुमचे गुरु संक्षी यांच्याशी माझे चांगले संबंध होते याची आठव्ण करुन देतो.

नया है वह's picture

21 Jan 2016 - 12:43 pm | नया है वह

अर्थात चांगली Copi केली आहे. पण बहुतेक त्याचे श्रेय गीतकरांना द्यावे लागेल.
कारण या गाण्यांमधे शब्द original आहेत. आणि तिच तर या गाण्यांची खासियत आहे.

English Songs Tunes Copied By O.P. Nayyar –

Movie Name - Shreemati 420 (1956)

Song Name - Yahan hum wahan tum
Copied from original Song - 1954 Billboard hit, 'The Little Shoemaker' by the Gaylords.But originally this song is French a hit in the year 1953, track name is'Le petit cordonnier', composed by Rudi Revil

Movie Name - Mujrim (1958)
Song Name - Chanda chandni
Copied from original Song - From Jim Lowe's 1957 hit Green Door.

Movie Name - Bhagam Bhag
Song Name - Hey babu, yeh hai zamana tera
Copied from original Song - 'Hay mambo, mambo italiano', covered by Rosemary Clooney

Movie Name - CID
Song Name - Yeh hai Bombay meri jaan
Copied from original Song - 'My darling Clementine'.

Movie Name - Aar paar
Song Name - Babuji dheere chalna
Copied from original Song - 'Perhaps perhaps perhaps' covered by Doris Day, and others.But this is not original song; originally this is a Mexican Song ‘Quizas quizas quizas'.Copied by so many I find it difficult to find the first singer and composer who sang this song.

Movie Name - Kismat (1968)
Song Name - Lakhon hai yahan dilwale
Copied from original Song - western classic 'Red River Valley’, “The Bright Sherman Valley”

- See more at: http://www.realityviews.in/2010/05/know-about-op-nayyar-and-his-copied.h...

चौकटराजा's picture

21 Jan 2016 - 3:06 pm | चौकटराजा

ओ पी च नव्हे तर सर्वच भारतीय संगीतकार हे कॉपी करणारे आहेत अन त्याबद्दल आन्जावर मोठी यादी आहे.अर्थात याचा अर्थ हे सर्व जण केवळ वादक या लायकीचे होते काय ? तर याचे उत्तर "नाही त्रिवार नाही" असेच येतें .शेवटी एस जे , ओपी ,सलीलदा, नौशाद यांचे वाद्यवृन्द ख़ास वेग्वेगळे होते यात काय दुमत असावे ? ओपी ना रिदम किंग म्हटले जाते त्यावेळी सुरान्चा बादशहा हे बिरूद ज़रा मागे पडते हे मात्र एक चाहता म्हणून माझे दु :ख आहेच.मी नय्यर ना आपले सांगीतिक गुरूच मानत आलेला आहे पण त्यांच्या यशाचे श्रेय ते गीताकाराना सर्वात जास्त देतात ते मला मान्य नाही.शैलेन्द्र,हसरत,साहीर या गीतकारा विषयी ते असे म्हटले असते तर एक वेळ ठीक होते.

सह्मत! पण मग संगीतकार आणि संगीत संयोजक यांत काय फरक? मग आजकाल रिमिक्स/ रेमेक करण्यांना पण संगीतकार म्हणायचे का!

चौकटराजा's picture

21 Jan 2016 - 4:26 pm | चौकटराजा

हरेक संगीतकार एक माणूस -रसिक माणूस या नात्याने लहा पणापासून काही ऐकत असतो.अशा श्रवण भक्तीचे सांगीतिक संस्कार घेत त्याच्या मूळ स्रुजन शक्तीला कच्चा माल मिळत असतो.अलिकडेच एका मुलाखतीत अजय अतुल यानी असे कथन केले की संगीतकारालाच सर्व व्याप करायला लागतो असा त्यांचा गैरसमज चक्क संगीतकार होईपर्यंत कायम होता.आता ओपी ना चाली सुचल्या असतील,काही वेळेस त्यानी उचलेगिरी केली असेल पण त्यांची इंट्रो ,ईण्टर्ल्युड ई चे श्रेय जी एस कोहली ना ही दिले पाहिजे.ओपीनी ते मोकळे पणाने दिल्याचे स्मरत नाही.पण आता अजय अतुलाच्या या गौप्य्स्फ़ोटाने ते आपण जी एस ना म्हणजेच अरेंजराला द्यायला हवे.माझ्या अंदाजाने ओपीच्या गाजलेल्या काळात सेबेस्टॆयन डीसूजा पेक्षा जी एस कोहली हेच जास्त वेळा त्यांचे अरेंजर होते.

विवेक ठाकूर's picture

21 Jan 2016 - 7:25 pm | विवेक ठाकूर

१. Yahan hum wahan tum, २. Chanda chandni, ३. Hey babu, yeh hai zamana tera, ४.Yeh hai Bombay meri jaan, ५. Babuji dheere chalna, आणि ६. Lakhon hai yahan dilwale

या पैकी शेवटची तीन लोकप्रिय आहेत. इतर यादी मी पहिली नाहीत पण तुम्ही सुद्धा अगदी डायरेक्ट साधर्म्य असणारी गाणी निवडली असणार हे उघड आहे.

माझ्या मते ही तीन गाणी ओपींच्या अत्यंत मेलोडियस गाण्यांपुढे काहीच नाहीत. कदाचित माझे प्रतिसाद वाचून तुम्हाला ओपींच्या मेलडीची कल्पना येईल.

नया है वह's picture

21 Jan 2016 - 7:40 pm | नया है वह

मला एवढच वाटते की श्रेय हे फक्त संगीतकाराच असु शकत नाही. ते त्याला तेव्हाच देता येईल जेव्हा शब्द छान नसताना सुद्धा संगीत छान वाटते.

तुम्हाला कल्पना नसेल, पण पूर्वीची गाणी अजूनही मोहवतात याची चार कारणं आहेत.

१. पूर्वीच्या काळी आधी डिरेक्टर, संगितकार आणि लिरिसिस्टला सीन समजावून सांगायचा. मग त्या बरहुकूम लिरिसिस्ट गाणं लिहायचा. याला फक्त नृत्यप्रधान गाण्यांचा अपवाद आहे, तिथे आधी धून आणि मग शब्द अशी पद्धत असायची.

२. लिरिसिस्टच्या गाण्याला कोणती स्वराभिव्यक्ती, डिरेक्टरला अपेक्षित असलेली भावाभिव्यक्ती करू शकेल हे अत्यंत मोलाचं काम संगीतकार करायचा. नाही तर शायरी कितीही उत्तम असली तरी तिचा योग्य स्वराविष्कार झाल्याशिवाय नेमका परिणाम कसा साधणार? तस्मात, संगीतकाराशिवाय गाणं निर्माण होणंच अशक्य आहे.

३. एकदा शब्द आणि धुन यांचा मेळ बसला की अरेंजर वाद्य संयोजन आणि (बरेच वेळा) इंटरल्यूडची कारिगरी करायचा. यात ओपी अत्यंत दर्दी होते कारण हवी ती अभिव्यक्ती होत नसेल तर ते शायरी बदलायला लावायचे आणि नेमका परिणाम साधत नसेल तर वाद्यसंयोजन बदलायचे. हरिप्रसाद आणि शिवकुमारजीं सारखे दिग्गज आणि त्याच तोडीचे रिदमिस्ट ओपींच्या वाद्यवृंदात होते.

४. एवढं सगळं जमलं की मग ओपी गायकाच्या टोनल वॅल्यूचा विचार करायचे, म्हणजे कोणतं गाणं कोण गाऊ शकेल (गीता दत्त, शमशाद बेगम की आशा आणि अर्थात रफी) हे ठरवायचे.

मग लिरिसिस्ट, वाद्यवृंद, गायक आणि स्वतः ओपी असा माहौल जमून, फक्त एक आणि एकच टेक व्हायचा, कारण रिटेकमधे पुन्हा तो रंग जमत नाही अशी ओपींची ठाम धारणा होती. तस्मात, तुम्हाला वाटतंय तितकी गाणं निर्माण करण्याची प्रोसेस सोपी नाही. आणि ओपींच्या बाबतीत तर नाहीच नाही. मी स्वतः शिवकुमारजींकडून ओपींची काम करण्याची पद्धत ऐकली आहे. त्यांची गाणी म्हणजे रसिकांच्या जीवनाला लाभलेलं अहोभाग्य आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2016 - 11:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला एकदम आधी Perhaps perhaps perhaps ऐकताना दोन्ही गाण्यांमधलं साम्य जाणवलेलं.

अर्थात बाबुजी धीरे चलना सुद्धा छान गाणं आहे. भारतीय सुरावटी जागोजागी जाणवतात.

किसन शिंदे's picture

21 Jan 2016 - 1:11 pm | किसन शिंदे

अतिशय सुरेख लेख! बेहद्द आवडला.

छान आहे लेख.आवडला.ओपीची गाणी मनात गुणगुणायला लागली! मग गाना.काॅमवर ओपीच आज!

विवेक ठाकूर's picture

21 Jan 2016 - 1:52 pm | विवेक ठाकूर

जगाच्या अंतापर्यंत हिट राहिल असं ओपींनी दिलेलं, हे गाणं आहे.

सतार, सारंगी, बासरी आणि वायोलीन ही वाद्य; साधा वन-टू, वन-टू असा रिदम, अप्रतिम शायरी आणि रफी समवेत आशाचा आवाज....ओपींनी जो काय माहौल जमवलायं त्याला तोड नाही.

ओपींनी सतार आणि सारंगीच्या संयोजनानी, सुरुवातीलाच गाण्यातला आलप आणि बंदीश वाजवलीये. सतारीवर आलाप आणि सारंगीवर `ये देखके दिल झुमा, ली प्यार ने अंगडाई या ओळी! वाद्यांची अचूक निवड आणि कमालीचं लोभस मिश्रण, सतार आणि सारंगीच्या जुगलबंदीतून झालंय. सतार मोहवून घेत असते तोपर्यंत सारंगी हृदयाचा ठाव घेते.... आणि सारंगीवर गाण्याची साधलेली सम `ली प्यारने अंगडाई' तर निव्वळ कमाल आहे.

आणि मग रफीच्या आवाजात तो आलाप आणि शब्द ऐकल्यावर गाण्याचा माहौल पुरता जमून येतो.

इंटरल्यूडला भरदार सतार आणि तारस्वरातल्या नोटससाठी बासरीचा गोडवा वापरून, पुन्हा समेवर यायला सतार वाजवलीये. याला कडव्याचा पीक-अप म्हणतात, तो गायकाला त्याचं सर्वोत्तम द्यायला उद्युक्त करतो. आणि मग रफीचा सदाबहार आवाज..... ऐसी तो मेरी तकदीर न थी तुमसा जो कोई मेहेबूब मिले...

त्यानंतर पुन्हा एकदा `दिल आज खुषीसे पागल है' नंतर.. ग, दोन्ही धैवत आणि रेंनिंसां असा सतारीचा जबरदस्त फिलर आहे. आणि रफी जेंव्हा समेवर येतो...`दिल क्यूं ना बने पागल' ...तिथे ओपींचा आवडता वन-टू वन-टूचा रिदम जणू काही अचानक सुरू होतो आणि सगळं गाणं उचलून घेत, पुन्हा रोमँटिक करतो.

या गाण्याबद्दल जितकं लिहीन तितकं कमी आहे. त्यातल्या आशाच्या ओळींसाठी अजून एक प्रतिसाद लिहावा लागेल.

काश्मीरचा नजारा, शम्मी आणि लाजर्‍या शर्मिलाचा दिलकश अभिनय आणि ओपींची धून... तरुणाईच्या प्रेमाची अत्यंत उत्कट अभिव्यक्ती ऐकणार्‍याच्या तारुण्याला पुन्हा एकदा साद घालते. आणि मग आपण सुद्धा नकळत गुणगुणायला लागतो,.... ये देखके दिल झुमा, ली प्यारने अंगडाई.

वॉव. मला संगीतातले जास्त काही कळत नाही. जुने गायक आणि संगितकार ऑळखू येत नाहित. पण सर्च केले तर कळले अरे हिच गानी ऐकत तर आपन मोठे झालो. वडिलांजवळ ओपी नय्य्यर नाव काढले तर ते थांबायचे नावच घेईनात. एकाहुन एक गानी सांगु लागले. सगळी मला माहीत होती. धन्यवाद ठाकुरसाहेब.
आज आमच्या रेडिओवर ओपी नय्यर वाजेल अर्धा दिवस तरी.

ए ए वाघमारे's picture

21 Jan 2016 - 3:09 pm | ए ए वाघमारे

छान...अजून लिहायला हवे होते..थोडक्यात उरकल्यासारखे वाटले.

ओपीच्या गाण्यांमध्ये एक अजीबसी कसक आहे.एक ओढलेपण आहे.मध्यंतरी आलेल्या एका बातमीप्रमाणे भारतीय खाद्यव्यंजनांच्या युनिक चवींचे रहस्य त्यात योग्य प्रमाणात वापरल्या जाणार्‍या निरनिराळ्या विरूद्ध प्रकृतींच्या घटकपदार्थांमध्ये आहे असे संशोधन कुणीतरी केले आहे. ओपीचे संगीत मला तसे वाटते. आपण किंवा तत्कालीन संगीतकार आणि श्रोते कल्पना करू शकणार नाहीत अशी वेगवेगळी वाद्ये एकाच गाण्यात वापरण्याचा प्रताप ओपीच करूच जाणे.

ओपीने तेचतेच ठेके-ताल वापरले, पाश्चात्य चाली चोरल्या इत्यादी आरोप कितिही खरे असले तरी ओपीची गाणी देत असलेला अस्सल आनंद कोणी नाकारू शकणार नाही हेही तितकेच खरे.पंजाबी,काश्मीरी लोकसंगीताचा अत्यंत सुरेख वापर ओपीने केला. काश्मीर की कली मधील वर उल्लेखलेले 'दीवाना हुआ बादल' हे मूळ काश्मीरी लोकसंगीत आहे. ओपीने जशेच्या तसे उचलले आहे.मूळ गाणे मी खूप वर्षांपूर्वी एका दुपारी'विविध भारती'च्या (बहुधा सुवर्णमहोत्सवी विशेष) कार्यक्रमात ऐकलेले आठवते.

काही प्रयोग ओपीने रिपीट केले पण बोअर केले नाहीत.उदा. दोन गायिकांना एक पुरूष आणि एक महिला कल्पून बनवलेली ड्युएटस. जसे शमशाद बेगम आणि आशाची 'रेशमी सलवार कुडता जालीका...'आणि 'कजरा महोब्बतवाला..' अशी युगुलगीते.

ओपीवर खूप बोलण्यासारखे-लिहिण्यासारखे आहे.शेवटी एक किस्सा लिहून थांबतो. परवा विडीयोवर 'दो उस्ताद' पाहिला.'रूक रूक कहां चली दिवानी...ओके...' सारखी फडकत्या चालीची ओपीची एकाहून एक सरस गाणी यात आहे.आणि शेवटी चित्रपट संपल्यावर एक पाटी येते. 'Remember, Sheikh Mukhtar Movies will always have Music Maestro O P Nayaar'
ओपीचा त्या काळात काय 'माहोल' असावा हे कळायला एवढे पुरेसे असावे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2016 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. थोडक्यात लेख आटोपला याच्याशी सहमत.
लिहिते राहाच.

-दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर's picture

21 Jan 2016 - 6:27 pm | विवेक ठाकूर

मी तर प्रतिसादातून ऐकेका जादूगिरी करणाऱ्या गाण्यांविषयी लिहीतोच आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2016 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादात जादु आहे हो.. धाग्यात पण अजून भर पाहिजे होती एवढेच.
लिहिते राहा. :)

-दिलीप बिरुटे

राघवेंद्र's picture

21 Jan 2016 - 9:57 pm | राघवेंद्र

लिहिते राहा. :)
वाचत राहु. :)

ओपींनी दिलेला हा अद्वितीय भांगडा.

हे गाणं म्हणजे फँटास्टीक लिरिक्स, रफी आणि आशाच्या आवजातून साकारलेली उत्कट भावाभिव्यक्ती आणि अत्यंत वेधक मेलोडी यांचा अनुपम संगम आहे.

सुरुवातीला आणि इंटरल्यूडला, बीन आणि मेंडोलीन बरोबर टाळ्यांचा केलेला अप्रतिम वापर हे या गाण्याचं वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे ओपींच्या स्वरसंयोजनाला पुन्हा दाद द्यावी लागते. गाण्याला वापरलेला ठेका ते बेफाम खुलवतो आणि तरीही तुमचं लक्ष वेधून आशयाला ओवर पॉवर करत नाही हे त्याचं वैशिष्ठ्य !

गाण्याच्या शेवटी आशाची आणि रफीची आलापी तुम्ही कदाचित ऐकली नसेल आणि क्लायमॅक्सला तर ते दोघेही असे काही सुटलेत की `मेरी जां बल्ले_हो__बल्ले!' त्यावेळी जो काही रेकॉर्डींग स्टुडिओ हादरला असेल त्याचे पडसाद अजूनही या गाण्यातून उमटतात. आणि आपल्याला वाटतं किती कमालीचं रोमँटीक असेल ओपीचं हृदय हे असलं सुचायला, माशल्ला!

आशाचं दरवेळी येणारं `हाय रे हाय' निव्वळ कलेजा खलास करणारं आहे. ती जे काय म्हणते..

हाय रे हाय, यही जजबात रहे दिन रात, तो फिर क्या बात,
मेरी जां बल्ले, बल्ले

ते आयुष्य भर प्रणय रंग उधळत राहायला पुरेसं आहे.

या गाण्याची शायरी सुद्धा दिलखेचक आहे.

तेरे घर शहेनाई जिस रात बजेगी, तेरी मेरी जोडी क्या खूब सजेगी..
पूरे होंगे दिलके अरमान हमारे, आंचलमें भर लेंगे हम चांद-सितारे..
तेरे आगे चांद सितारे, ओ गोरी क्या चिज है...

हाय रे हाय, ये मेरे हाथमें तेरा हाथ, नये जजबात,
तो फिर क्या बात मेरी जां बल्ले, बल्ले

एक मागणी ओपींच्या संगीतात त्यांनी लोकगीतांमधुन जे कलात्मक कुशलतेने निवडुन वापरलेलं होत.
त्याचा कसा कुठल्या गाण्यात सुंदर वापर केला हे थोड सोदाहरण तुलनात्मकतेने दाखवल्यास
आनंद होइल
हाय रे हाय, ये मेरे हाथमें तेरा हाथ, नये जजबात,
तो फिर क्या बात मेरी जां बल्ले, बल्ले

चौकटराजा's picture

22 Jan 2016 - 10:01 am | चौकटराजा

हे गाणे वृन्दावनी सारंग रागावर आधारित. गायकाकडून आलापी करून घेण्यासाठी सिनेमात मैफलीची सिच्वेशन असायची गरज नाही असा ओपीन्चा फंडा असावा.शेवटच्या आलापीत सारंग रागाचाच मावस भाऊ शामकल्याण रागाचे सूर आपल्याला ऐकू येतील. आशा कडून आलापी करून घेणे याचे आणखी मस्त उदाहरण बसंत मधील रफ़ी आशाचे "चोरी चोरी एक इशारा हो गया है " हे पहाड़ी रागावर आधारित व दीप चन्दि तालातील गीत ऐकाच !

एक गायक आणि गायिकेचं गाण्यातलं महत्व अनमोल आहे. संगितकाराला अपेक्षित असलेला भाव गळ्यातून प्रथम उमटवणं याला अप्रतिम टोनल क्वालिटी, मेलोडीचं उत्तम ज्ञान आणि जीवनाचा उत्कट अनुभव लागतो. ज्या पद्धतीनं आशा `हाय रे हाय' म्हणते, ती तिनं स्वतःच्या प्रतिभेनं प्रियकराला घातलेली साद आहे. तीचं ऐकून नंतर तसं गाणं, आवजाची देणगी असेल तर अवघड नाही. पण नुसत्या शब्दांना, अगदी प्रथम, भावपूर्ण स्वररुप देणं हे दिग्गजच करु जाणे. तस्मात, गायक आणि गायिका हा गाण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

दुसरी गोष्ट, ओपींनी चाली उचलल्या त्यामुळे त्यांच्या गाण्यांना कमी लेखणं या गैरसमजाला शह देणारं, त्यांच्या अनेक गाण्यांपैकी, हे एक गाणं आहे. या गाण्यातून त्यांचं अद्वितीयं सांगितीक सौंदर्याकलन दिसून येतं. ओपी कुड किएट मेलोडी ऑन हीज ओन, आणि ते सुद्धा शास्त्रीय संगीताच काहीही ज्ञान नसतांना. त्यामुळे ओपींना रागांच्या पॅटर्नचं सुद्धा बंधन नव्हतं, त्यांचा फोकस केवळ मेलोडीवर होता मग भले तो स्वर किंवा स्वरसंयोजन त्या प्रस्थापित रागात वर्ज्य का असेना.

आणि तीन, ओपींच्या `ओन्ली वन अँड फायनल टेक' या, केवळ त्यांच्या आणि त्यांच्याच रेकॉर्डींग प्रणालीमुळे, ते गाण्याचा संपूर्ण उत्सफूर्त आणि फ्रेश मूड कॅच करू शकले. रिपीटीशनमधे उत्सफूर्तता संपते, एकदा हे बरोबर तर ते चूक असं होत होत, शेवटी त्यातल्या त्यात चांगला परफॉर्मन्स निवडावा लागतो. ओपींनी तो प्रश्नच निकालात काढला. त्यांची गाणी सदाबहार असण्याचं हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. द मूड कम्स टू यू, डिरेक्टली फ्रॉम दी इंपॅक्ट क्रिएटेड फॉर द फर्स्ट अँड लास्ट टाइम, इन द स्टुडिओ!

चौकटराजा's picture

23 Jan 2016 - 9:58 am | चौकटराजा

ओपी नय्यर यांचे गुणगान करताना त्यानी लताबाईंचा आवाज वापरला नाही व ते शास्त्रीय संगीत शिकलेले नसताना सुद्धा मेलोडियस गाणी करू शकले या दोन गोष्टीचा उल्लेख केला जात असतो.

ओपीनी लताबाईचा आवाज वापरला नाही यात वेगळे काही नाही मादकता नसलेला बेस कड़े न झुकणारा असा आवाज नय्यरच्या शैलीला योग्य नव्हताच .त्यानी तलत ला न वापरता रफ़ी लाच ते चिकटून बसलेच ना ? लता व तलत हे आवाज कितीही मधुर असोत ते ओपी साठी योग्य नव्हतेच .आता मुद्दा राहिला त्यानी शास्त्रीय संगीत शिकण्याचा.या बाबत असे दिसते की संगीतात पी एच डी केलेल्याना स्वरान्शी नवनव्या उपजा करीत खेळ्ता येतेच असे नाही. एखादी अर्धी ओळ स्फ़ुरणासाठी घेऊन ओपी साहेबानी पूर्ण गीत केले अशी उदाहरणे आहेत.यात त्यांची नैसर्गिक प्रतिभा दिसून येते.उतार वयात ही प्रतिभा ओपी ना काहीशी सोडून गेल्याचे दिसून येते.त्यात त्याचे आशा,रफी व् जी एस कोहली हे भागीदार सोडून गेल्याने शेवटी भट्टी जमली नाही हे खरेच .

जव्हेरगंज's picture

22 Jan 2016 - 11:37 pm | जव्हेरगंज

सं क्षी?? ते तुम्हीच का?

लेख आवडला

ही क्लिप पहा
ह्यात ओपी साहेबांनी कृतज्ञपणे असे म्हटले आहे की माझ्या यशामागे गीतकार, गायक आणि वादक ह्यांचा मोठा हात आहे. त्यांच्याविना असे यश मिळाले नसते.
गाण्याला माणसाची उपमा देत ते म्हणतात की गाण्याचे बोल हे माणसाच्या आत्म्यासारखे आहेत, शरीर हे संगीत आहे आणि कपडे हे गायकासारखे आहेत. उत्तम गाणे बनायला हे तिन्ही गुण योग्य प्रमाणात लागतात आणि ते एकमेकांना पूरक असावे लागतात नाहीतर चांगले गाणे निर्माण होत नाही.
असे म्हणून त्यांनी संगीत आणि गीत ह्या दोघांना थोडा वरचा दर्जा असतो असे सुचवलेले आहे हे माझे मत.

अर्थात सर्वसामान्य लोक एखादे गाणे आवडले तर त्याचे बरेचसे श्रेय गायकाला देतात कारण तो किंवा ती सर्वात जास्त ऐकू येतो किंवा येते. ते संगीत निर्माण करताना वा गीत लिहिताना ज्या प्रमाणात आपली प्रतिभा संगीतकाराने वा गीतकराने पणाला लावली असेल ते बहुतांश दृष्टीआड रहाते.
ज्या सुवर्णयुगात ओपी नय्यर वावरले तिथे गीत आणि संगीत ह्या दोघांचे जबरदस्त प्रस्थ होते. आणि मलाही त्या दोघांचे पारडे गायक वा वादकांच्या तुलनेत जड वाटते.

अभिजितमोहोळकर's picture

25 Jan 2016 - 7:45 am | अभिजितमोहोळकर

तूनळीवरील ह्या दुव्यात नय्यरांची काम करण्याची पद्धत थोडीशी दिसते. दुर्दैवाने असे व्हिडेओ फार उपलब्ध नाहीत. असते तर एक वगळा खजीना आपल्याला ऊपलब्ध झाला असता.

ओपी शब्दांबद्दल अत्यंत सिलेक्टीव होते त्यामुळे त्यांच्या गाण्यातून नेमका भाव व्यक्त होतो असं मी आधी लिहीलं आहेच. त्यांची इतर लोकप्रिय गाणी, त्यांच्या वैशिष्ठ्यासह, वेळ मिळेल तशी टाकणार आहेच.

अभिजितमोहोळकर's picture

25 Jan 2016 - 7:59 am | अभिजितमोहोळकर

अजून गाणी आणि त्यावर विष्लेषण येउ दे

मुक्त विहारि's picture

25 Jan 2016 - 10:51 am | मुक्त विहारि

आमच्याच प्रोफाईल मधील एक वाक्य परत कॉपी-पेस्ट करतो....

"ओ.पी, एस्.जे, सलीलदा, पंचमदा,एस्.डी., गुलाम मुहम्मद्,सी.रामचंद्र,हेमंत कुमार आणि वसंत देसाई.

ही नवरत्ने, जे काही ठेवून गेले आहेत, ते सात जन्म पुरून उरेल ह्यावर माझा ठाम विश्वास आहे.आमच्या दरबारात ह्यांचीच हजेरी असते."

ह्या नवरत्नात "ओपी" आहेतच.

ओपींची मला आवडलेली गाणी....

१. देखो कसमसे (तुमसा नहीं देखा.----लागोताठ, दररोज ५ दिवस पाहिलेला पहिला सिनेमा...पुढे तो विक्रम "इव्हिनिंग इन पॅरीस" ने मोडला...)

२. छुपनेवाले सामने आ (तुमसा नहीं देखा.)

३. तारीफ करु क्या उसकी. (काश्मिर की कली)

आता माझी बाहेर जायची वेळ झाली.(बायको मागे लागली आहे.असो, लग्न झालेल्या पुरुषांची कुचंबणा)

जमेल तशी पुढची गाणी टाकीनच.

होबासराव's picture

25 Jan 2016 - 4:29 pm | होबासराव

लगता है आप भि हमारी हि तरह ओ.पी. के साथ साथ शम्मि कपुर के फैन हय.

काय गाण आहे राव ते...वाह
है दुनिया उसि कि जमाना उसि का
मोहब्बत मे जो हो गया है किसिका

तो शम्मि चा अभिनय, कर्नल च्या चेहेर्‍यावरचे हावभाव आणि ह्या सगळ्या गोष्टि नां पुरुन उरलेला तो सेक्साफोन.

मुक्त विहारि's picture

25 Jan 2016 - 4:59 pm | मुक्त विहारि

तुमसा नही देखा मुळे, असे माझे मत.....

आणि

सर पे टोपी पासून आपला शम्मी जो सुटला ते......थेट "आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे है जबा़न पर" ह्या ब्रह्मचारी सिनेमापर्यंत..असे माझे मत....(ह्या गाण्यात "मुमताज उरली ती फक्त" संध्या टाइप मुंडी हलवायला....

(हवे असेल संध्याची गाणी (विशेषतः "दो आंखे बारा हात मधील...https://www.youtube.com/watch?v=wDXoqAUca98.... आणि मुमताजचा ह्या....https://www.youtube.com/watch?v=E7Fw8eM749E... सिनेमातील डान्स बघा....मुमताजची मुंडी जोरात हलते इतकाच काय तो फरक..... )

शम्मी कपूर नंतर हिंदी सिनेमात नाच नामक प्रकार संपून सुरु झाले ते फक्त पतंग नाच आणि कवायती....असे माझे मत.....

असो,

उगाच नाही आम्ही आजकाल हॉलीवूडच्या नादी लागलो...

सुरुवातीचा रफीचा आलाप, त्याला आशानी दिलेली दाद आणि मग मजहूर सुल्तानपुरींची दिलकश शायरी असं हे गाणं सुरु होतं.

`इशारों इशारोंमे' या शब्दांना आशान दिलेलं, तालानुरुप वजन आणि तिचं `बता ये हुनर तूने सिखा कहांसे' या विचारणेतलं आर्जव थक्क करणारं आहे.

गाण्यातल्या प्रत्येक ओळीवर ओपींनी तयार केलेली काऊंटर मेलडी अप्रतिम आहे. एकेक ओळ लक्षपूर्वक ऐका.

ओ, मेरे दिलको तुम भा गये ....

मेरी क्या थी इसमे खता ....

मुझे जिसने तडपा दिया, यही थी वो जालीम अदा....

यही थी वो जालीम अदा..... आणि यानंतर गाणं समेवर आणणारी, सतारीची सुरेख सुरावट!

कडव्यां मधल्या इंटरल्यूडसाठी ओपींनी सतार आणि घुंगरू अशी लाजवाब वाद्य योजना केली आहे. सतारीचं तालानुरुप तुकड्या-तुकड्यानं वाजणं आणि त्याला घुंगराच्या तालानं दिलेला उठाव भन्नाट आहे.

शायरी तर जीव ओवाळून टाकावा अशी आहे त्यावरनं, ओपींचा शब्दांसाठीचा अट्टाहास पुन्हा जाणवतो!

बघा :

.....ये रांझा की बातें, ये मजनू के किस्से
अलग तो नहीं हैं मेरी दास्ताँ से.

किंवा आशाचं हे कडवं -

मोहब्बत जो करते हैं वो मोहब्बत जताते नहीं
धड़कने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं
मज़ा क्या रहा जब के खुद कर दिया हो
मोहब्बत का इज़हार अपनी जुबां से

आणि शेवटी रफीनं केलेला हा कहर !

माना के जान-ए-जहां लाखों में तुम एक हो
हमारी निगाहों की भी कुछ तो मगर दाद दो
बहारों को भी नाज़ जिस फूल पर था
वही फूल हम ने चुना गुलसिता से

गाण्यावर शम्मीनं आणि शर्मिलानं जी काय लयबद्ध अदाकारी पेश केलीये त्याला तोड नाही.

विवेक ठाकूर's picture

26 Jan 2016 - 12:18 pm | विवेक ठाकूर

शायरी एस एच बिहारींची आहे.

मराठी_माणूस's picture

27 Jan 2016 - 9:00 pm | मराठी_माणूस

ह्या गाण्यातील अजुन एक उल्लेखनिय गोष्ट : कडव्याच्या प्रत्येक ओळी नंतर टाकलेले मेंडोलीन आणि व्हायोलीन चे अप्रतीम फीलर्स. रफी च्या कडव्या मधे मेंडोलीन चे मंद्र मधे आणि आशाच्या कडव्यात व्हायोलींचे काहीशे उंच.

विवेक ठाकूर's picture

27 Jan 2016 - 10:22 pm | विवेक ठाकूर

मनःपूर्वक धन्यवाद !

हुप्प्या's picture

26 Jan 2016 - 11:04 pm | हुप्प्या

नया दौर हा प्रचंड गाजलेला सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा ओपीसाहेब म्हणाले "ये नया दौर नही ये तो नय्यर दौर है!" त्या सिनेमाच्या गाजण्यात दिलीप कुमार, वैजयंतीमाला आणि बाकी नटांबरोबर संगीताचाही मोठा वाटा होता हे खरे आहे. पण अशा वागण्यामुळे बी आर चोप्राने पुन्हा हा संगीतकार वापरला नाही.

तीच गोष्ट नसिर हुसेनची. तुमसा नही देखा ह्या सिनेमाचे संगीत अफाट लोकप्रिय होते. पण असे असूनही हुसेनने ओपीला पुन्हा कधीही आपल्या सिनेमासाठी संगीतकार बनवले नाही. कारण ओपी खूप शिवराळ आणि उर्मट आहे असा नसिर हुसेनचे मत बनले होते.
शमशाद बेगम ही गुणी गायिका ओपी नय्यरने जुन्या सिनेमात अनेकदा निवडली. आरपार, सीआयडी, ५५ असे अनेक. पण आशा भोसलेंशी सूत जमल्यावर शमशाद बेगमला विसरला (अगदी थोडे अपवाद). हे शल्य ती शेवटपर्यंत बाळगून होती. कारकीर्दीच्या सुरवातीला लाहोरमधे ओपी, शमशाद एकत्र काम करत असत. ओपी वयाने लहान होता त्यामुळे शमशाद बेगमसारख्या लोकांची त्याच्यावर (प्रेमळ) दादागिरी चालत असे. उन्हाळ्यात त्याला आईसक्रिम आणण्यासाठी पिटाळण्यात यायचे. तोही सायकलवर टांग मारून आईसक्रीम आणायला जायचा अशा आठवणी सांगितल्या गेल्या आहेत.

चौकटराजा's picture

27 Jan 2016 - 4:12 pm | चौकटराजा

तो बहुतेक साधना चित्रपट असावा. नया दौर च्या यशात आपला मोठाच वाटा आहे.याचा अन्दाज असल्याने आपण आपली किमत वाढविली असे नय्यर सांगतात . अर्थात त्या अहंकारानेही तेल ओतले असे नय्यर यानी स्प्ष्ट केल आहे. एका मोठ्या बॅनर शी सख्य जुळण्याची अमोल सन्धी त्यानी घालविली.

प्रदीप's picture

27 Jan 2016 - 6:05 pm | प्रदीप

ती कथा नया दौरच्या संदर्भातच वाचली आहे. 'साधना'चे संगीतकार एन. दत्ता होते.

चौकटराजा's picture

27 Jan 2016 - 9:23 pm | चौकटराजा

मानधन वाढवून मागण्याची ही बात नया दौर च्या यशानंतरच बी आर च्य्या पुढच्या फिल्म वेळी घडली व बलदेव साहेबानी नय्यर यांचा अंदाज चुकविला. हे सर्व ओपीनी युनुस खान यानी घेतलेल्या मुलाखतीत विशद केले होते.

आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया,
मै तो आगे बढ गयी, पिछे जमाना रह गया

केवळ आणि केवळ आशासाठी केल्यासारखं हे गाणं.... पाण्याचा अवखळपणा संतुरच्या दिलखेचक सुरावटींनी टिपलेला, मदहोशी आणायला सतार आणि समेवर यायला वापरलेली सारंगी यांचा अनोखा मेळ साधणारं ओपींचं हे सुरेख गाणं. त्यावर तारुण्यानं बहरलेल्या मुमताजची बेहेतरीन अदाकारी म्हणजे भन्नाट संगीताच केलेलं तितकच भन्नाट पिक्चरायजेशन.

एस एच बिहारींची शायरी, तारुण्याच्या भावना स्त्री देहात उमटतांना होणार्‍या बदलांचं किती यथार्थ वर्णन करते :

चिरकर पत्थर का सीना झूमकर झरना बहा
जिसमे एक तूफान था, सौ करवटे लेता हुआ
आज मौजों की रवानी में किनारा बह गया,
इक किनारा बह गया.....

मै तो आगे बढ गयी, पिछे जमाना रह गया.

दुसर्‍या कडव्यापूर्वीच्या इंटरल्यूडला ओपींनी सतारीचा जो कमाल पीस दिलायं तो पुन्हापुन्हा ऐकावासा आहे. आणि संपूर्ण गाण्याला असा काही ठेका लावलायं की, जलप्रपातात विहार करणार्‍या ललनांना तो अनाहूतपणे देहांची लयबद्ध हालचाल करायला भाग पाडतो. आज सुद्धा एखादी गौरांगना पहिल्यांदा प्रेमात पडेल, तर तिच्याही ओठात याच ओळी येतील :

आज कोई प्यारसे दिलकी बाते कहे गया,
मै तो आगे बढ गयी, पिछे जमाना रह गया

चौकटराजा's picture

28 Jan 2016 - 9:54 pm | चौकटराजा

अशाबाईंच्या करियर मधील पहिल्या दहात मी याची गणना करीन . एस पी कॉलेज समोरील दीपक म्युझिक सेन्टर मधे बंद काचेत बसून हे गीत त्याला परत परत लावायला लावणे हा एक स्मरणीय अनुभव. एका पुस्तकात शिवकुमार शर्मा म्हणतात
"या एका बाजूला २५ वायलिन्स व एका बाजूला मी सन्तुर घेऊन असा त्याचा इन्ट्रो चालू होतो. एका ठिकाणी तबल्यावर ठाक असा आवाज होऊन व्होकल चालू होते. दरम्यान ती वायलिन्स व मी जणु एकमेकाशी संवाद करतो आहोत असा तो इन्ट्रो." बाकी रईस खान साहेब विलायतखानी घराण्यातले . त्यांचे व ओपी साहेबांचे जणू गेल्या जन्माचे ऋणानुबंध. या गीताचे चित्रिकरण पाण्यात चिंब भिजताना झालेय हे रईस खान सतारीतून व्यक्त कसे करतात ते सगळ्च स्वर्गीय !

अवांतर - या गीतातील एक्ट्रा मधे एक ओळखीचा मराठी चेहरा दिसतो का पहा ! ती पुढे एक यशस्वी निर्माती तर झालीच व इम्पाची अध्यक्ष सुद्धा !

मोगा's picture

1 Feb 2016 - 8:20 am | मोगा

पहिल्यांदाच ऐकले.

सारखे सारखे ऐकुन झाले दोन दिवस.

आता तो मुखडा गुणगुणून लगेच दुसरा मुखडा आठवतो.... हो .... नभ उतरु आलं.

दोन्ही आशाचीच गाणी , पहाडी राग.

दोन्ही सलग म्हणायला मजा येते.

संदीप डांगे's picture

1 Feb 2016 - 10:13 am | संदीप डांगे

खरंच मनात रुंजी घालतंय हे गाणं गेले दोन दिवस... पहिल्यांदाच ऐकलं इथे शेअर केले तेव्हा. धन्यवाद ठाकूरसाहेब!

पैसा's picture

28 Jan 2016 - 9:35 pm | पैसा

मस्ती चॅनेलवर ९० मिनिटे ब्रेक फ्री मधे ओ पी नैय्यरची गाणी लागली आहेत.

दिल चाहता है मेरा बहकना इधर उधर...

पुन्हा एकदा एस. एच. बिहारींची शायरी आणि आशाचा आवाज आपल्याला मोकळ्या आकाशाखाली आणतो. एखाद्या प्रेयसीनं आपल्या प्रियकराला बेधुंद होऊन दिलेलं निमंत्रण म्हणजे हे गाणं. नुसती शायरी वाचली तरी आपण मदहोश होतो.

पग पग चलू बलखाती, खुद भी न जानू कहाँ
कहता है ये दिल मतवाला, आज अपना है सारा जहाँ.

गाण्याला ओपींनी लावलेला रिदम, त्यात इंटरल्यूडला वाजवलेली सतार आणि कडव्यात आशाच्या आवाजाशी जुगलबंदी करणारी सारंगी केवळ लाजवाब आहेत.

गाण्याच्या शेवटच्या, या ओळीत .....

छुन छुन बोले मेरी पायल, आजा कहे सजना
आजा के ये सारे नजारें, सैय्या फिके हैं तेरे बिना

आशानं जो काय रंग जमवलायं आणि `ओहो हो हो' असा चढता आलाप घेत, ती जे काय समेवर येते त्याला तोड नाही. प्रत्येक प्रियकराला, एकदा तरी आपल्या प्रेयसीनं अशी साद घालावी असं आयुष्यात वाटलं नसेल तर नवल!