बंडयादादाची फेफे - कथा

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
10 Jan 2016 - 1:59 am

----------बंडयादादाची फेफे - कथा ------------

"चला , विद्याभवन शाळेचा स्टॉप आला. ए पोरा, तुला इथच उतरायचं आहे ना?" कंडक्टरचा आवाज बसमध्ये घुमला. देवीदास गडबडीने बसमधून उतरला . बराच वेळ बस प्रवास झाल्याने तो जरा कंटाळून गेला होता . पण समोरची विदयाभवन शाळेची भव्य ईमारत पाहून त्याचा कंटाळा पळून गेला . आज तो या शाळेमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी आला होता . त्याने एकदा खिशामधले घरातून निघताना आईने फीसाठी दिलेले पैसे तपासले . व तो गेट मधून शाळेच्या आवारामध्ये शिरला .

शाळेमध्ये तुरळक शिक्षक , विद्यार्थी व पालक यांची लगबग चालू होती . शाळेचे वर्ग सुरु झालेले दिसत नव्हते . "अ‍ॅडमिशनसाठी कोणाकडे चौकशी करावी?" असा देवीदासला प्रश्न पडला . शाळेच्या आवारातच एका बाजूला काही मुले गप्पा मारीत उभी होती . त्यांच्या मागेच त्यांनी आपल्या सायकली उभ्या केल्या होत्या . देवीदास त्यांच्यापाशी गेला आणी त्याने विचारले "ईथे अ‍ॅडमिशनचे ऑफीस कुठे आहे ? मला अ‍ॅडमिशन घेण्यासाठी जायचे आहे ."
"ट्टॉ़क , अ‍ॅडमिशन घेण्यासाठी ? आणी तु आज आला आहेस ? शाळेतल्या अ‍ॅडमिशन्स तर दोन दिवसापुर्वीच संपल्या." त्या ग्रुपमधल्या एका चौकडी चौकडीचा शर्ट घातलेल्या मुलाने त्याला उत्तर दिले .
" तु एवढा उशीरा का आलास ? दोन , तीन दिवस आधी आला असतास तर .. ?" ग्रुपमधल्या दुसरया एकाने विचारले .

देवीदासचा चेहरा खरकन उतरला . तो आणी त्याचे वडील खरे तर दोन , तीन दिवस आधीच अ‍ॅडमिशन घेण्यासाठी येणार होते . पण अकस्मात त्याच्या वडीलांची तब्येत बिघडली. त्यांच्या आजारपणामध्ये हे दिवस गेले . देवीदासचे वडील हे गावातल्या देवीच्या देवळाचे गुरव होते . आपल्या मुलाने शहरामध्ये , तेही विदयाभवनसारख्या नावाजलेल्या शाळेमध्ये शिकावे अशी त्यांची खुप ईच्छा होती . त्यामुळे अखेर देवीदास एकटाच आज शाळेमध्ये आला होता .

त्याचा रडवेला चेहरा बघुन तो चौकडीचा शर्ट घातलेला मुलगा त्याला थोड्या समजुतीच्या सुरात म्हणाला " अरे , हे बघ. असा निराश होउ नकोस . तु एक काम कर . समोर पहिल्या मजल्यावर अ‍ॅडमिशनचे ऑफीस आहे . तिथे जाउन सुर्वे सरांना भेट . शाळेतल्या अ‍ॅडमिशन्सची कामे तेच बघतात . तेव्हा तुला योग्य ती मदत , माहिती त्यांच्याकडुनच मिळेल."
हे ऐकुन देवीदासचा चेहरा परत आशेने उजळला . तो घाईघाईने समोरील जिन्याकडे जाउ लागला . अचानक जिन्याच्या दाराशी त्याला कोणीतरी अडवले. एक फाटक्या अंगाचा माणुस दाराशी उभा राहुन त्याच्याकडे रोखुन पाहात होता .
"काय रे ए पोरा , कुठं चालला आहेस एवढ्या घाईनं " तो माणुस देवीदासवर गुरकावला .
"अं ..अ‍ॅडमिशन घेण्यासाठी..." त्या अचानक आलेल्या माणसामुळे आणी त्याच्या गुरकावण्यामुळे कावराबावरा झालेल्या देवीदासने कसाबसे उत्तर दिले . त्या माणसाने राखाडी रंगाचा शर्ट आणी त्याच रंगाची पँट घातली होती . हा कोणीतरी शाळेतील स्टाफपैकी असावा असा देवीदासचा समज झाला . तो माणुस परत रेकुन बोलला .
"अ‍ॅडमिशन घेण्यासाठी ? पण पोरा , त्यासाठी आधी नोंदणी करावी लागेल . ती केली आहेस का ?"
"न..नाही." देवीदास चाचरत म्हणाला .
"पोरा , तुला नोंदणीसाठी पाच हजार रुपये भरावे लागतील . आणले आहेस का ?"
"नाही हो . माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी फक्त अ‍ॅडमिशन घेण्यापुरते पैसे आणले आहेत." देवीदास गांगरुन म्हणाला . पाच हजाराचा आकडा ऐकुन त्याला धडकीच भरली . त्या माणसाने देवीदासकडे एकदा तुच्छतेने पाहिले . या गरीब पोराकडुन आपल्याला काही फायदा होणार नाही हे त्याने ओळखले . त्याच वेळी समोरुन एक गॄहस्थ आपल्या मुलाला घेउन जिन्याकडे येताना त्याला दिसले . एकंदर कपड्यांवरुन ते कोणीतरी मालदार असामी असावेत हे त्या फाटक्या अंगाच्या माणसाने बरोबर ओळखले . तो परत देवीदासवर त्याला हुसकावण्यासाठी ओरडला .
"ए पोरा , नोंदणीचे पैसे नसतील तर तुला अ‍ॅडमिशन मिळणार नाही . चल निघ येथुन . नमस्ते शेठजी . काय काम होतं ? " हा शेवटचा नमस्कार त्या आलेल्या मालदार असामींसाठी होता .
" नमस्ते साहेब . आमच्या मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन घ्यायची होती ." शेठजींनी उत्तर दिले .
"शेठजी , तुम्हाला इथे नोंदणीसाठी दहा हजार रुपये भरावे लागतील . आणी मग अ‍ॅडमिशनची फी पहिल्या मजल्या वरच्या ऑफीसमध्ये भरावी लागेल ." त्या माणसाकडे पाहुन हा कोणीतरी शाळेतील स्टाफपैकी असावा असेच शेठजींनाही वाटले . त्यांनी थोडा विचार करुन खिशातुन नोटांची बंडले काढली आणी त्या माणसाकडे दिली. त्या नोटा झटकन मोजुन त्या माणसाने आपल्या खिशात ठेवल्या. दुसरया खिशातुन एक मळकट डायरी काढुन त्यात काहितरी नोंद केल्यासारखे केले . मग तो शेठजींना म्हणाला
" ठिक आहे शेटजी. तुम्ही आता पहिल्या मजल्यावर जा . तिथे अ‍ॅडमिशनची फी भरा ."

शेठजी हसतमुखाने आपल्या मुलाला घेउन जिन्याच्या पायरया चढु लागले . त्यांचे काम आज भराभरा झाले होते .
इकडे त्या फाटक्या माणसाने हळुच तिथुन काढता पाय घेतला . व तो शाळेच्या गेटकडे बाहेर जाण्यासाठी जाउ लागला.
त्या माणसाने हुसकावल्यामुळे थोडा मागे आलेला देवीदास हा सर्व प्रकार अचंबित होउन पाहात होता. त्याने एकदा मागे वळुन पाहिले , तर तो मगाचा मुलांचा ग्रूप त्याच्याकडेच पाहात होता.
" आपण इथे नवीन आहोत , म्ह्णुन या मुलांनी आपल्याला बनविले तर नाही ना ? हि नोंदणी फीची माहिती त्यांनी आपल्याला सांगितली नाही . त्यामुळे फुकट आपल्याला त्या माणसाचा ओरडा खावा लागला. आणी हि मुले लांबून गंमत बघत बसली " असा त्याच्या मनात विचार तरळुन गेला . तो गोंधळुन तिथेच उभा राहिला . "काय करावे ? इथे थांबावे की घरी परत जावे?" त्याला काहिच सुचेना .

इकडे पहिल्या मजल्यावर आलेले शेठजी अ‍ॅडमिशनच्या ऑफीस मध्ये शिरले . तिथे असलेले सुर्वे सर त्यांना ओळखत होते . "बोला शेठजी . नमस्कार . काय काम होतं ?" सुर्वे सरांनी त्यांना विचारले .
"ते आमच्या मुलासाठी अ‍ॅडमिशन घ्यायची होती ."
"पण माझ्या माहिती प्रमाणे तर सगळ्या अ‍ॅडमिशन्स संपल्या आहेत . तरी थोडं थांबा . मी आमच्या क्लार्कना विचारतो . काय हो दिवेकर , शाळेच्या अ‍ॅडमिशन्सचं सध्या काय स्टॅटस आहे ?" सुर्वे सरांचा स्वभाव मदत करण्याचा असल्याने त्यांनी या बाबतीत अ‍ॅडमिशनच्या ऑफीसमधील दिवेकर यांना विचारले .
"सर , एका विद्यार्थ्याच्या वडीलांची अचानक दिल्लीला बदली झाली . त्यामुळे त्यांनी कालच संध्याकाळी भेटुन आपल्या मुलाची अ‍ॅडमिशन रद्द केली आहे . म्हणजे सध्या एक सीट रिकामी आहे ." दिवेकरांनी सांगितले .
"ठिक आहे शेठजी . तुम्ही अ‍ॅडमिशन फॉर्म आणी फी भरा . तुमच्या सुदैवाने एक जागा रिकामी आहे " सुर्वे सरांनी सांगितले व शेठजींकडे फॉर्म भरायला दिला . शेठजींनी फॉर्म भरायला सुरुवात केली .

इतक्यात " एक मिनीट सर .. थोडं थांबा.." असा आवाज सर्वांना ऐकु आला . जिन्यावरुन तो मगाचा चौकडीचा शर्ट घातलेला मुलगा धापा टाकत जोरात पळत येत होता . त्याने एका हातात देवीदासचा हात धरला होता , तर दुसरया हाताने तो सुर्वे सर व इतरांना थांबायचे हातवारे करत होता . सर्वजण चकीत होउन हा मध्येच घडणारा प्रकार पाहात होते .
"बनेश फेणे , हा काय प्रकार आहे ? तुझ्या बरोबर हा मुलगा कोण? आणी तु आम्हाला थांबायला का सांगत आहेस ?" सुर्वे सरांनी अचंबित होउन विचारले .
"सर , त्या अ‍ॅडमिशनवर या मुलाचा पहिला हक्क आहे . हा मुलगा या शेठजींच्या आधीच अ‍ॅडमिशनसाठी इथे येत होता . पण एका भामट्याने त्याला जिन्यातुन वर येउ दिले नाही . कारण त्या भामट्याला देण्यासाठी या गरीब मुलाकडे पैसे नव्हते. " बन्याने धापा टाकत , दम खात थोड्या वेळापुर्वी घडलेला सर्व प्रकार सरांना सांगितला .
" काय सांगतोस काय , बनेश ?" सुर्वे सर हा प्रकार ऐकुन चांगलेच चकीत झाले .
"हो सर . हवे तर तुम्ही शरद शास्त्री , सुभाष देसाई , उत्तम ट्ण्णु यांना विचारा . आम्ही सर्वांनीच हा घडलेला प्रकार पाहिला आहे . त्या भामट्याने शेठजींकडुन दहा हजार रुपये थापा मारुन उकळले . आणी तो पसार झाला ."
सुर्वे सरांना हा अजुन एक धक्का बसला . ते शेठजींना म्हणाले " काय हे शेठजी , तुम्ही एवढे सुशिक्षित ,मग असे कसे त्या भामट्या , अनोळखी इसमाकडुन फसला ? तुमच्यामुळेच अशा गुन्हेगारांचे फावते ."
शेठजी चांगलेच खजील झाले . आता त्यांना आपल्या दहा हजार रुपयांची काळजी वाटु लागली .

"सर , शेटजी , तुम्ही काळजी करु नका . आम्हाला त्या इसमाचा संशय आला , तेव्हा त्याच्या मागे सुभाष , उत्तम , शरद हे सगळे गेले . आता तो इसम काहि शाळेच्या गेटबाहेर जाउ शकणार नाही. इकडे या मुलावर अन्याय व्हायला नको म्हणुन मी सर्वांना सावध करायला आलो . ती मंडळी इकडे येतच असतील आता ." बन्याने माहिती दिली.
तोपर्यंत जिन्यावर अनेकजणांचे बोलण्याचे , पावलांचे आवाज ऐकु येउ लागले . सर्वजण बघताहेत तर काय , त्या भामट्याला जेरबंद करुन सुभाष , उत्तम, शरद हे वीर येत होते .शाळेतील काही शिक्षकही त्यांच्या बरोबर होते .
"त्या भामट्याला गेटपाशीच पायात पाय घालुन जोरात पाडला " उत्तम ट्ण्णुने डरकाळी फोडली .
"आणी मग या सुभाष देसाईने त्याच्या पाठीवर वजनदार बैठक मारुन त्या भामट्याला अर्धमेला केले" सुभाषने गर्जना केली.
"नंतर शाळेतील शिपाई काकांच्या मदतीने त्या चोराची गठडी वळली आणी त्याला इकडे घेउन आलो." शरदने या साहसकथेला पुस्ती जोडली. शिक्षकांपैकी एकाने त्या भामट्याच्या खिशातुन या धावपळीत पडलेली नोटांची बंडले उचलुन ती शेठजींकडे परत दिली . आपले अक्कलखाती गेलेले दहा हजार रुपये परत मिळाल्याने शेठजी खुश झाले .
"शेठजी , मला माफ करा . पण हा बन्या म्हणतो ते खरे असेल तर , मी तुम्हाला अ‍ॅडमिशन देउ शकत नाही . कारण नियमाप्रमाणे हा मुलगा देवीदास तुमच्या आधी आला होता . तेव्हा या अ‍ॅडमिशनवर पहिला हक्क त्याचाच आहे." सुर्वे सरांनी सांगितले .
"अहो सर , लहान पोरांचे काय ऐकता ? त्यातुन मला या शाळेसाठी खुप काही करायची इच्छा आहे " शेठजी सुचक अर्थाने म्हणाले . भरीस भर म्हणुन त्यांनी आपल्या कोटाच्या खिशातुन चेकबुकही काढले .
आता मात्र सुर्वे सरांच्या चेहरयावर आठ्या पडल्या . ते कडक आवाजात म्हणाले .
"शेठजी , मागच्या वर्षी आमच्याकडे अ‍ॅडमिशन मधील फसवणुकीच्या खुप तक्रारी आल्या होत्या. तेव्हा या वेळेला एक खबरदारी म्हणुन शाळेनेच बनेश , सुभाष , उत्तम , शरद अशा काहि निवडक मुलांना स्वयंसेवक म्हणुन लक्ष ठेवण्यासाठी नेमले आहे . माझा या मुलांवर पुर्ण विश्वास आहे . तसेच सुदैवाने शाळेची सद्य आर्थिक स्थिती चांगली आहे . तेव्हा तुम्ही तुमचे चेकबुक खिशात ठेवले तर बरे होईल. तुमच्या दानशुरतेसाठी आभारी आहे. "
शेठजी निमुटपणे निघुन गेले .

"सर , आम्हालापण तुमचे आणी शाळेचे आभार मानायचे आहेत " बन्या म्हणाला ." तुम्ही आमचा उत्साह ओळखुन आम्हाला आवडेल अशी कामगिरी सोपविली . गेले काहि दिवस आम्ही गळ लावुन बसलो होतो , त्यांत आज हा मासा सापडला . तोही रंगेहाथ " आणी बन्याने त्या भामट्याकडे पाहिले . त्या भामट्याच्या हाताच्या दोरया आता थोड्या सैल झाल्या होत्या.
तो भामटा बन्याकडे पाहात गुरगुरला " काय रे ए पोरा , मगाधरनं पघुन राहिलोय , तुझी जीभ लई वळवळ करतीय . या बंड्यादादाला मासा म्हणतोस ? थांब तु बाहेर भेट . तुला हिसकाच दावतो या पठ्ठ्याचा "
मित्रांनो , आपला बन्या कितीही साहसी असला तरी त्या टग्या बंड्यादादापुढे तो एक लहान शाळकरी मुलगा.त्यामुळे या अचानक आलेल्या धमकावणीमुळे तो एक क्षणभर बावरला . पण एक क्षणच. बंड्यादादाच्या या "उलटा चोर कोतवालको डांटे" प्रकारामुळे बन्याचा चेहरा रागाने लाल झाला . हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या . तरीही आवाज जमेल तेवढा शांत ठेवत बंड्यादादाला डिवचायला बन्या म्हणाला "अहो बंड्यादादा , काय मिटवायचय ते आजच मिटवा ना . जरा आम्हालाही बघुदेकी तुमचा हिसका ."
हे ऐकुन रागारागाने बंड्या ओरडला " चालिंज , या बंड्यादादाला चालिंज ?" आणी तो बन्याच्या अंगावर धाउन गेला . बन्याने एकदम बाजुला सरकत त्याला झुकांडी दिली. तसेच बाजुला सरकताना बन्याच्या वाळकुड्या हाताची मुठ जोरदारप णे बंड्याच्या नाकाडावर बसली. आता मात्र रक्ताने माखलेले नाक हाताने झाकुन बंड्या गपगुमान खाली बसला.
थोड्याच वेळात इन्स्पेक्टर बखले आणी दोन हवालदार आले . बंड्याला ताब्यात घेउन ते निघुन गेले . जाता जाता त्यांनीही बन्याला " काय फाफे , आजच्या दिवसाचा कोटा पुर्ण झाला का ?" असा शेरा हसत हसत मारला .

हा सर्व प्रकार आटोपुन बन्या आणी त्याचे मित्र शाळेच्या आवारात आले . तेव्हा देवीदास कॄतज्ञपणे बन्याला म्हणाला " बनेश , बन्या आय मीन फाफे फास्टर फेणे . तुला सगळेजण याच नावाने ओळखतात ना . आज तुझ्या मुळेच मला या शाळेत अ‍ॅडमिशन मिळाली . मी तुझा आणी सर्व मित्रांचा खुप आभारी आहे . " बन्याने त्याच्याशी हात मिळविला . "दोन वर्षांपुर्वी मी सुद्धा अशाच एका धनदांडग्याला मागे टाकुन अ‍ॅडमिशन मिळविली होती . आज तुझ्यामुळे माझ्या त्या आठवणी ताज्या झाल्या".
"बन्या , आजच्या या आपल्या कामगिरी बद्दल मला दोन ओळी सुचल्या आहेत . त्या अशा " शरद शास्त्रीने बोलायला सुरुवात केली .
" शास्त्रीबुवा दोनच ओळी सांगा , पण त्या सर्वांना समजेल अशा भाषेत सांगा" सुभाषने तेवढ्यात फुसकुली सोडली.
"अरे ऐका तरी . त्या ओळी अशा आहेत -
विद्याभवनचे वीर आम्ही , दोस्त आमचा फाफे
एका दणक्यात कशी उडवली , बंडयादादाची फेफे "

---------समाप्त ------- काल्पनिक------------------------------

कथेबद्दल - प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत व त्यांचा साहसी मानसपुत्र फास्टर फेणे सर्वांचेच आवडते आहेत. शाळकरी मुलेसुद्धा समाजातील अन्यायाला प्रतिकार करु शकतात हे त्यांनी फाफेच्या कथांमधुन सांगितले आहे . या कथेद्वारे या दोघांना मानवंदना देण्याचा हेतु आहे .
-----------------------------------------

कथालेख

प्रतिक्रिया

एस's picture

10 Jan 2016 - 5:01 am | एस

छान कथा! आवडली.

इनू's picture

10 Jan 2016 - 8:15 am | इनू

बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.(तसा मी अजूनही लहानच आहे.)
फाफेच्या इतर कथाही येऊद्यात.
धन्यवाद.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jan 2016 - 8:41 am | कैलासवासी सोन्याबापु

बन्या!!! \m/("O")\m/

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jan 2016 - 9:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी भा.रा. ष्टाईल जमलयं :)!!! फा,फे, च्या पुस्तकांसाठी जीव टाकायचो लहानपणी. हल्लीच्या किंवा रादर २००० नंतर जन्मलेल्या पिढिला फाफे, चिंगी, गोट्या वगैरे अनुभवायची संधी कधी मिळणार कोण जाणे, जो उठतोय तो शिंच्या शिनचान आणि डोरेमॉन फोरेमॉन च्या मागे पळतोय :(!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jan 2016 - 10:18 am | कैलासवासी सोन्याबापु

+११११११११ कप्तानसाब,

चिंगी चे पराक्रम किंवा खडकावरल्या अंकुरातल्या पंडित चा लढ़ा किंवा गोट्याची अचाट पर्सनालिटी म्हणजे एक अनमोल ठेवा होता, गोष्टीरूपात मधेच काहीतरी तत्वे शिकवण्याची अन भरपुर हसवण्याची ताम्हणकरांची शैली तिच्या सम तीच!!

पैसा's picture

10 Jan 2016 - 10:31 am | पैसा

फाफे नव्या अवतारात आवडला.

सिरुसेरि's picture

10 Jan 2016 - 2:12 pm | सिरुसेरि

आपल्या प्रतिसादांसाठी सर्वांचे मनापासुन आभार . या कथेमधुन फाफे आणी त्याचा कंपु यांच्या आठवणींना उजाळा मिळाला हे पाहुन खुप बरे वाटले . फाफे , बिपिन बुकलवार , चिंगी , गोट्या , खडकावरला अंकुर , राजु प्रधान (लेखक - सुधाकर प्रभु ), वसंत ( वि.वि. बोकिल) या सर्वांचे कारनामे म्हणजे एक वेगळीच मजा होती .

आदूबाळ's picture

10 Jan 2016 - 2:18 pm | आदूबाळ

एक नंबर. आवडलीच!

फक्त त्या टग्याला ही शाळकरी पोरं जेरबंद करू शकतील हे काही पटलं नाही.

अवांतर: हा देवीदास म्हणजे "देवीचा हार"वाला का?

सिरुसेरि's picture

10 Jan 2016 - 3:10 pm | सिरुसेरि

आपल्या प्रतिसादासाठी खुप आभार. आपल्याला हि कथा आवडली हे वाचुन छान वाटले.
त्या टग्याला ही शाळकरी पोरे शाळेतील शिपाईकाकांच्या मदतीने जेरबंद करतात .
---"नंतर शाळेतील शिपाई काकांच्या मदतीने त्या चोराची गठडी वळली आणी त्याला इकडे घेउन आलो." शरदने या साहसकथेला पुस्ती जोडली.---
हा देवीदास म्हणजे "देवीचा हार"वाला का? - हो. हा तोच तो देवीदास गुरव .
"देवीचा हार" - ज्यामध्ये फाफे "देवीचा हार" देवीदासच्या सायकलच्या टुलबॉक्समध्ये ठेवुन वाचवतो .
"देवीचा हार" - ज्यामध्ये फाफे देवीदासच्या वडीलांनी नदीतील बेटावर ठेवलेला देवीचा हार व देवीचे दागिने शोधतो .
-- मध्यंतरी एका फाफे / भा. रा. भागवत विशेषांकामध्ये आपण लिहिलेला लेख वाचला होता . तो खुप मस्त होता .

ओह हे शिपाईकाका नजरेतून सुटले होते. आणखी लिहा. फाफेला मिस करतो राव!

माझी फॅन फिक्शन आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद!

मध्यंतरी एका फाफे / भा. रा. भागवत विशेषांकामध्ये आपण लिहिलेला लेख वाचला होता . तो खुप मस्त होता .

+1
खरं तर लय मोठं अंडरस्टेटमेंट. कितीही प्रयत्न केला तरी ती कथा भारा भागवतांची नाही हे पटतच नाही...

मस्त.जुन्या आठवणी जाग्या झाल्या!
माझा मुलगा अजूनही आवडीने फाफे वाचतो.फाफेमुळेच पोरगं मराठी आवडीने वाचु लागलं!

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jan 2016 - 3:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझा मुलगा अजूनही आवडीने फाफे वाचतो.फाफेमुळेच पोरगं मराठी आवडीने वाचु लागलं!

कुठल्या वयात पोरांच्या हाती काय द्यायचे ह्याला फार महत्व असते ताई, तुम्ही ते फारच उत्तम रीत्या करताय अशी पोचपावती द्यायचा मोह टाळता आला नाही बघा मला.

आई आठवली एकदम, ५-८ च्या मधे तिनेच हाती चित्रे असलेली चाचा चौधरी दिली, ९-१० चा असताना चिंगी गोट्या अन फाफे सरकवले अन १२व्या वाढदिवशी "एक होता कार्वर" चित्र आले डोळ्यासमोर

अजया's picture

10 Jan 2016 - 5:45 pm | अजया

अगदी असंच.मुलाच्या दहाव्या वाढदिवसाला फाफे हातात दिले होते! आता सोळा वर्षाचा झाला तरी मध्येच लहर आली की फाफे निघतंच बाहेर!

असंका's picture

11 Jan 2016 - 9:21 am | असंका

छान जमलीये!

धन्यवाद!

सिरुसेरि's picture

31 May 2021 - 5:41 pm | सिरुसेरि

ख्यातनाम साहित्यीक मा. भा. रा. भागवत यांचा आज जन्मदिन . या निमित्ताने त्यांचा मानसपुत्र असलेल्या फाफेवर बेतलेली हि फॅफी ( फॅन फिक्शन ) वर काढत आहे .

गॉडजिला's picture

31 May 2021 - 6:43 pm | गॉडजिला

पुस्तकात हरवुन जाणे म्हणजे काय ते फाफे ने अर्थात भा रा भागवत काकांनीच शिकवले.. त्यांच्याकडुन कथा ऐकणे/वाचणे म्हणजेच बालपणाचे सार्थक होय _/\_

फाफे वर एक हिन्दी टिवि सिरीअल सुध्दा होती आपल्या ब्योमकेश बाबुंनी अर्थात रजत कपुरनी त्यात फाफेचा रोल केला होता काय ?

फाफे वर एक हिन्दी टिवि सिरीअल सुध्दा होती आपल्या ब्योमकेश बाबुंनी अर्थात रजत कपुरनी त्यात फाफेचा रोल केला होता काय ?
सॉरी सॉरी फाफे चा रोल बहुतेक सुमित रघवन ने केला होता

faster fene

गुल्लू दादा's picture

31 May 2021 - 6:59 pm | गुल्लू दादा

फाफे कधी वाचण्यात नाही आला. पहिलं दर्शन थेट चित्रपटातच घडलं. टॉक......;)

Bhakti's picture

1 Jun 2021 - 9:25 am | Bhakti

पहिलं दर्शन थेट चित्रपटातच घडलं. टॉक......;)
मी पण फाफे कधीच नाही वाचला.
कथा खुपचं छान लिहीली आहे.मस्त रंगतदार आहे.

कुमार१'s picture

1 Jun 2021 - 11:26 am | कुमार१

छान लिहीली आहे..

लेखन आवडले... मराठी चित्रपट अर्थातच पाहिला आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobs