हजाराच्या सात नोटा त्यानं मोजुन पाकिटात ठेवल्या आणि बाबुच्या टपरिवर येऊन उभा राहिला.
"भाऊ, एक 'बार' मळा बर् आपल्याला"
"पगार झाली दिस्ती आज?" बाबुने खोचकपणे विचारले.
त्याचं लक्ष नव्हतं.
तालुक्याच्या बस स्टॅंडवर ति मैत्रिणींच्या घोळक्यात उभी होती. तो तिच्यावरच नजर लाउन उभा होता.
अर्धा बार तोंडात टाकला आणि अर्धा व्यवस्थित पाकिटात ठेऊन तो तिथेच उभा राहिला. बाबु आणखी काहीतरी बोलला पण त्याचे ध्यान 'ति'कडेच लागलेले.
थोडयावेळाने टपरीच्या पायावर पिचकारी मारून, तोंडातला बार चघळत आणि छाती पुढे काढत तो तिच्या जवळ येऊन उभा ठाकला. तिना मान फिरवली. खरे तर ति घाबरलेली पण शांत उभा होती.
दोन्ही हात खिशात घालत त्यानं जमिनीवर एक पिचकारी मारली आणि तिला "आय ला ब्यु" म्हणाला ति जास्तच टरकली. मैत्रिणी बिचकल्या. त्यानं खिशातून एक चिठ्ठी काढली, बळेचतिच्या हातात कोम्बली आणि पुन्हा टपरीवर जाऊन उभा राहिला.
तो पहात होता, ति खाली मान घालुन उभा होती. तेवढ्यात बस आली मैत्रिनिंसोबत ति बस मधे चढली. सगळ्या शांत होत्या. तो रोज तिला पहायचा, सकाळीच टपरिवर येऊन उभा राहायचा, रोज स्टॅण्डपासून कॉलेज पर्यंत तिच्यावर पाळत ठेवायचा. पण आज त्यानं कहरच केलेला. बस स्टॅण्डवर गावातली बरीच लोक होती. तिला रडायला आले. ति मांडीवरच्या बॅग मधे तोंड लपवुण बसली. बस चालु झाली. तिना मोकळा श्वास घ्यायला मान वर केली तेवढ्यात तो गपकन खिड़कित आला. सिगारेटच्या खोक्याचा तुकडा तिच्या अंगावर टाकत बोलला;
"चिट्टित मोबाइल नंबर लिवायचा इसरलु! हेव घी अन् रातच्याला रिंग मार!"
बस निघुन गेली. तो खोलीवर आला. येताना बियरची बाटली, चिकन फ्राइड राइस आणि एक सिगारेट पाकिट घेऊन आला. चिट्ठी दिल्यापासूनचा त्याचा सगळा टाइम फूल टेंशन मधे चाललेला. साडे आठ नउच्या दरम्यान त्याला एक बारीक मिसकॉल आला. मोबाइल त्याच्या हातातच त्यानं लगेच वापस फोन केला.
"हेलो, ....मी बोलत्याय..."
"हा..हा.. अगं म्याच् बोलतुय...कव्हाधरणं तोह्याच् फोनची वाट बघतुय.." त्याला खुपच मोकळं वाटु लागलेलं.
"मी पण फोन लावन म्हणते किती वेळा पासुन पण ..जाऊ दे.. बोल ना?"
"लाइफ मदि पैल्यान्दा तूहा आवाज ऐकतुया.. तू आयला ब्यु मन ना एक बार.."
"बर बाबा ..आय लव यु.."
दोघे बराच वेळ बोलत होती. ति "उद्या कुठेतरी फिरायला जाऊ" म्हटल्यावर तो "हो" म्हणाला. भेटायची वेळ व ठिकाण फिक्स करुन त्यानं फोन कट केला आणि दुसरा नंबर डायल केला.
"हालो, राजाभौ.. उद्याच्याला कामाव् यायला नै जमनार"
"सालं तुमच्या पगारिच नै काराय पायजी. खिशात उलशिक पैसा आला की डिंगरता"
"भौ घ्या न् उद्याच्या दिस अड़जस करुन.."
"तु परा दिसी येऊ नगस मंग सांगतु तुला.." म्हणत राजाभाऊ ने फोन कट केला.
त्यानं दुसरा एक नंबर डायल केला.
"हालो, किरण्या.. आपल्याला तोह्यावाली गाड़ी पायजी हुती उद्याच्या पुरती.. जरा आयटम ला फिरुन अनायची..."
"अरं जा की घिउन मंग.. त्यात काय इचारायचं" किरण.
"सकाळच्याला येतु मंग..."
"पर थोडं लवकर यी...त्याचं काहे बग... गाडी लए दिस ची पडुन हाय.. थोडं टायर बियर तपासुन घी... गारेजातून.."
"बरं बघतु म्या.. पगार बी झालिया.."
पहाटे पाचलाच उठुन त्याने अवरा अवरी केली. गैरेजवाल्या पप्याला उठुन आणले. गाडीचे दोन्हीं ट्यूब बदलावे लागले, चैन कट करावी लागली, एक दोन वायर चे तुकडे बदलले. पप्याने सकाळी सकाळीच् ८५० रूपायाची बोहनी करुन घेतली. किरण्या म्हणाला "तोहयाचानि होत नसल त् पडु दे तशीच" मग दिले पैसे काढुन.
ठरल्या प्रमाणे तो वडगाव रोडवरच्या चिंचेखाली गाडी घेऊन उभा राहिला.
ठरलेली वेळ टळून गेलेली. ति अजुन आलिच नव्हती. टेंशन वाढले. मावा तोंडात टाकून तो चिंचेच्या बुडाशी पिचकाऱ्या हानत बसला. तेवढ्यात एक हिरवा पंजाबी घातलेली आणि तोंड रुमालाने गच्च आवळलेली मुलगी येताना दिसली. त्याच्या जीवत जीव आला. ति जवळ आली तो हसरा चेहरा करुन जोरजोरात मावा चघळत उभा राहिला. तिना तोंडावरचा रुमाल सोडाला. त्याची शीर सटकली. खाली पिचकारी मारून, तोंड घट्ट मिटवुन, भुत दिसल्यागत तो तिच्याकडे पाहु लागला. ति आलिच नव्हती. हि 'ति'ची मैत्रीण.
"तिला तू बिलकुल पण अवडत नाहीस. तिना काल बस मधेच तुझी चिट्ठी फाडली.."
"...अन मंग..रातच्याला मोबाइलवर कस। काय गुलु गुलु बोल्ली..?"
"राति मीच बोलत होते. मला तु खुप खुप अवडतोस. तु आमच्या मागे फिरायचास तेव्हा मीच तुझ्याकडे पहायचे. तिला तुझा खुप राग येतो..."
चिंचेच्या बुडावर पिचकारी मारून, तोंडातली तंबाखू-सुपारी थुंकुन तो एकदम मुड मधे येत बोलु लागला;
"... अर्र एकदम बराबर! तरि आपल्याला डाउट अल्ताच..त्या दिसच्याला त्वा वळून पायलं कि लगीच मनलं तोहि लाइन अपल्यावरच असणार... बर् झालं त्वा सांगुन टाकलं"
"जाऊ दी. ति खुप भित्री आहे आणि तिचे भाऊ पण खुप डेंजर आहेत"
"आता त्वा आपल्यावर जीव टाकला मंग कह्याला तिच्या मांगण् फिरू?"
दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले. नंतर तिच्या इच्छे नुसार मॉलमधे जायचे ठरले.
तिना परत चेहरा स्कार्फ़ने आवळला. त्यानं पाकिटातून उरलेला बार काढुन तोंडात टाकला.
"जानु, तू ते काय खातोस ना.. ते चावताना लै झाक दिसतोस... एकदम डेरिंगबाज.."
तोआतून खुश होत लाजला.
मॉलच्या पायऱ्या चढताना त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकला. तिना त्याला बाजुला सारले.
"जानु, प्लीज् मला टच नको करु. मी अजारी आहे. कसली तरि एलर्जी का काय ते झालय. कुणी टच केलं की आग आग होते"
"ओक्के डार्लिंग! आपुन नाय टच करणार... खुश?" म्हणत तो बाजुला झाला.
"जानु, प्लीज नाराज नाको ना होउस"
"नाय गं डार्लिंग.."
दोघे आंत शिरली. लेडीज़ वेअर च्या टॉप घातलेल्या पुतळ्या जवळ आल्यावर तिना पर्समधुन एक 'सेलो ग्रिफर' चा पेन काढुन त्याच्या हातात दिला.
"जानु, तुला माझ्याकडून पहिली भेट"
"हेव पेन? अन आपल्याला?" तो एकदम हळवा होत बोलू लागला; "डार्लिंग, लाइफमंदि आपल्याला पहिल्यांदा गिफ्ट भेटला...बोल तोहयासाटी काय घिउ?"
"जानु, मला काय नको..." म्हणत ति पूतळ्याला घातलेल्या टॉपचं कापड पाहु लागली.
त्यानं तिथल्या पोरिला तो टॉप पॅक करायला सांगितला. एका टॉपची किम्मत आठराशे रुपये! त्याला भवळच् आलेली पण कसेबसे तोंडावरचे भाव सांभाळत त्याने बिल भरले.
थोडावेळ इकडे तिकडे भटकुन झाल्यावर तिला भुक लागली. त्याने दोन वडापावची आर्डर दिली.
"थांब जानु, माझ्याकडे आहेत पैसे आपण पिझ्झा घेऊ" तिना पर्सची चैन ओढ़ायाचा प्रयत्न केला.
"डार्लिंग, म्या हाइना! " म्हणत त्यानं खसकन हजाराची नोट काढुन काउंटरवर ठेवली. वापस आलेले पैसे मोजताना त्याला समजले कि, तिना मागितलेल्या पिज्जाची किम्मत साढेचारशे आहे. दोघे बराच वेळ खात होते, ति सकाळपासुन उपाशी असल्यावानी आणि तो पिज़्ज़ा उरला तर पैसे वापस मिळणार असल्यावानी.
परतीच्या वाटेने एका चौकात ट्राफ़िक पोलिसला पाहुण त्यानं गाडीचा रेस वाढवला तर ति जोराने "थांब, थांब" म्हणुन ओरडली.
"डार्लिंग, काय झालं?"
"माझा मोबाईल टेबलवरच राहिला वाटतं..." पुटपुटत् ति पर्स चाफु लागली. तेवढ्यात पोलिसभाऊ जवळ येऊन उभा राहिले.
"अरे, आहे! चल आता" ति गाडीवर बसली. आणि पोलिसभाऊंनी गाडीची चावी हातात घेतली. जानु जवळ लायसेंस नव्हते, सायलंसर भरून धुर काढणाऱ्या गाडीचं पीयुसी नव्हतं, गाडीची अर्धी नंबर प्लेट पुसलेली. त्यानं घाबरत घाबरत शंभरची नोट काढुन साहेबांच्या हातात कोम्बली आणि सटकला.
"जानु, उदया किती वाजता भेटशील रे?" बसस्टॅंड वर उतरताना ति म्हणाली.
" डार्लिंग, डायरेक् संडेला भेटुना"
"हे काय रे, जानु? उद्या माझा बड्डे आहे" ति लाडात येत बोलली.
"बर् ठिकाय उद्याच्याला करतु मैनेज... खुश?"
खोलीवर गेल्यावर त्यानं पहिला राजाभाऊ ला फोन लावला.राजाभाऊ कसेतरी सुट्टी द्यायला तयार झाले पण "परादिसच्याला कामावर नै दिसला त् कायमचा घरीच ठुइल" म्हणाले.
दुसऱ्या दिवशी गडद निळी जीन्स आणि भड़क लाल शर्ट घालुन तो मावा चघळत चिंचेखाली बसला होता. समोरुण येणारा तोंड बांधलेल्या पोरींचा घोळका पाहुन तो उभा राहीला.
"यां माझ्या मैत्रिणी, यांची खुपच इच्छा झाली होती तुला पहायची" ति तोंडावरचा रुमाल सोडत बोलली. तो लाजुन इकडे तिकडे पाहु लागला.
"भावजी, तुमचा जोड़ा एक नंबर दिसतोय" एक मैत्रीण तोंडावरचा रुमाल न काढताच बोलली.
"भावजी, आज तुमच्या कडून पार्टी पाहिजे बर आम्हाला" सगळ्याच एका सुरात ओरडल्या.
"चला मंग हाटलित, आपली फूल तयारी हाय" तो एकदम फार्मात आलेला.
"जाऊ की भावजी दुपारुण, पहेल्ं बड्डे गर्ल ला गिफ्ट काय आनलं ते दाखवा" एक मैत्रीण.
"अगं, काल त्यांनी खुप छान टॉप घेतलेला पण काल माझ्याकडून बस मधेच विसरून राहिला" तिच्या या वाक्याचं सर्वात जास्त दुःख त्याला झालं. पण परत तोंडावरचे भाव सांभाळत "जौदे डार्लिंग परत दुसरा घिउ" म्हणाला.
तो गाडी पप्याच्या गैरेजवर लाउन आला. नंतर दोन स्पेशल रिक्शा करुन सर्वजन मॉलकड़े निघुन गेले. दुपारपर्यंत सर्व पार्टी वगैरे आटपुन तो खोलीवर पोहचला. त्याचं डोकं दुखायला सुरुवात झालेली. गोधड़ीवर पडून वरचे पत्रे न्याहाळत होता तेवढ्यात तिचा मिसकॉल आला. त्यानं बराच वेळ विचार केला अन मग फोन लावला.
"हेलो जानु, अरे ऐक ना.. मला 'हैप्पी बड्डे'चे खुप मेसेज येताय पण रिप्लाय करायला माझ्याजवळ बॅलेन्सच् नाही.. तेवढं पन्नास साठच् एक रिचार्ज मार ना... प्लीज.."
"ठिकाय" म्हणत त्यानं फोन कट केला.
काही वेळाने तिचा परत मिसकॉल आला. तो तसाच पडून राहिला. रात्रि पर्यंत तिचे सात आठ मिसकॉल पडले. पण तो तिकडे लक्षच देत नव्हता.
तिचे खुपच मिसकॉल येऊ लागले तेव्हा त्याने सिमकार्ड काढले त्याचे दोन तुकडे केले आणि दुसरे सिमकार्ड टाकून राजाभाऊला फोन लावला.
"राजाभौ, म्या उदया येतु कामाला.... हा हेव महा नवा नंबर.. नै नै ते कार्ड हरपले"
झोपताना परत एकदा त्यानं खिशातुन पाकिट काढले. दहा रुपयांच्या तिनच नोटा शिल्लक होत्या. त्या घडिकरुन पाकिटात ठेवल्या आणि डोक्याला रुमालाने घट्ट आवळून झोपी गेला.
त्यानं बसस्टॅंडवर हातात चिट्ठी दिल्या पासुन ति पार भेदरुण गेलेली. दोन दिवस ति कॉलेजला आलिच नव्हती. आजही ति भीत भितच बस मधुन उतरली. भीत भितच तिरप्या नजरेनं तिना टपरिकडे पाहिले. तिथे कुणीच् नव्हते. भीतीने जखडलेले तिचे शरीर अचानक सैल झाले. आपल्या, हिरवा पंजाबी घातलेल्या, बहिणीकडे पाहुन ति मोकळी हसली आणि दोघी एकमेकिंच्या हाताला घट्ट धरून कॉलेजच्या दिशेने निघाल्या.
प्रतिक्रिया
3 Jan 2016 - 3:13 am | फारएन्ड
मस्त आहे कथा! :)
4 Jan 2016 - 4:46 am | अत्रुप्त आत्मा
+१
3 Jan 2016 - 5:26 am | रेवती
हा हा हा...........
3 Jan 2016 - 6:41 am | एस
:-)
3 Jan 2016 - 10:09 am | रातराणी
कथा आवडली :)
3 Jan 2016 - 10:52 am | जुबेर बिजापुरे
:-):-)
3 Jan 2016 - 11:22 am | मुक्त विहारि
कथा आवडली....
3 Jan 2016 - 11:28 am | शलभ
खतरनाक.. ;)
3 Jan 2016 - 11:47 am | यशोधरा
मस्त कथा!
3 Jan 2016 - 1:58 pm | संदीप डांगे
ह्या मातीतल्या कथा... एक नंबर.
आनंदराव.. सलाम घ्या भऊ...!!!
3 Jan 2016 - 3:15 pm | आनंदराव
आनंदराव..
आमचापण सलाम घ्या भऊ...!!!
3 Jan 2016 - 3:28 pm | मन१
झकास
3 Jan 2016 - 4:18 pm | पिंगू
हाहाहा.. लय भारी..
3 Jan 2016 - 10:12 pm | कुसुमिता१
छान आहे गोष्ट!
3 Jan 2016 - 10:36 pm | सस्नेह
भारी !
3 Jan 2016 - 10:39 pm | शार्दुल_हातोळकर
एकदम दणदणीत कथा....
दिल खुश हो गया....
4 Jan 2016 - 1:39 am | उगा काहितरीच
अवघड आहे राव !
4 Jan 2016 - 11:02 am | तुषार काळभोर
;)
4 Jan 2016 - 11:40 am | अजया
लैच आवडली कथा!
4 Jan 2016 - 11:48 am | नाखु
आम्ची दाद
प्रयत्न करीत रहा
प्रतिसाद मात्र नाखु.
4 Jan 2016 - 2:27 pm | जेपी
कथा आवडली..
4 Jan 2016 - 2:31 pm | नाव आडनाव
भारी :)
4 Jan 2016 - 2:52 pm | तात्या विन्चू
झकास !
4 Jan 2016 - 3:25 pm | वेल्लाभट
कड्ड्डक ! ! ! ! सहीच्च्च्च
सॉलिड आवडली
4 Jan 2016 - 3:56 pm | पिलीयन रायडर
आवडली!!! शेवटी एकदम मस्त हसु आलं!!!
4 Jan 2016 - 5:15 pm | मोहनराव
लै भारी
4 Jan 2016 - 7:58 pm | जव्हेरगंज
वॉव.
भारी.
4 Jan 2016 - 9:16 pm | श्रीगुरुजी
मस्त स्टोरी आहे. खूप आवडली. मजा आली. कथेतील भाषा सुद्धा मजेशीर आहे.
5 Jan 2016 - 8:54 am | कंस
अतिशय आवडली
5 Jan 2016 - 10:05 pm | अंतु बर्वा
लय भारी!!! आवडली कथा :-)
6 Jan 2016 - 8:00 pm | वगिश
भारी
7 Jan 2016 - 8:51 pm | आनंद कांबीकर
'रिप्लेसमेंट' आवडल्याचं कळवल्याबद्दल धन्यवाद
7 Jan 2016 - 10:39 pm | फेरफटका
मस्त जमलीये कथा! मजा आली वाचताना.
7 Jan 2016 - 10:58 pm | आदूबाळ
एक नंबर कथा.
8 Jan 2016 - 9:43 am | कैलासवासी सोन्याबापु
हाहाहाहा लैच भारी
8 Jan 2016 - 10:35 am | दिनेश५७
एकदम मस्त. एकसोबीस तीनशे!!
8 Jan 2016 - 11:13 am | नीलमोहर
असंच पाहिजे :)
9 Jan 2016 - 5:19 pm | आनंद कांबीकर
______/\_____
13 Jan 2016 - 12:52 pm | अभिजीत अवलिया
मस्त ....