अलीकडे आपल्याला सोनारांची मोठी मोठी दुकानं,शोरूम्स, दिसतात.परंतु पूर्वी तसं काही नव्हतं. सोनाराच्या पेढ्या असायच्या.अजूनही कदाचीत खेडेगावात मी म्हणतो तशा पेढ्या असतीलही.
मी पूर्वी एकदा गोव्यात गेलो होतो,सोनाराच्या पेढ्यासंबंधाची मला आठवण आली.
तात्या पेडणेकरांची अशीच एक पेढी होती.घराच्या पुढच्या भागात पेढी आणि मागच्या भागात रहाण्या खाण्याची सोय असायची.पुढच्या भागातल्या ह्या पेढीत बैठकीच्या समोर एक भट्टीवजा शेगडी असायची. कोळसे पेटवून त्यात धगधगीत आग असायची.बैठकीवर तात्या बसायचे.हातात फुंक नळी,फुंकणी,घेऊन फुकून फुकून आग धगघगीत ठेवायचे.जवळच एक बीडाची वाटी असायची त्या वाटीचा सोनं गाळण्यासाठी उपयोग व्हायचा.
पूर्वी तयार दागिने मुळीच मिळत नसायचे.गिर्हाईक आपल्याकडचा दागिना घेऊन यायचं आणि दागिना नसल्यास सोनाराकडून सोनं घेऊन दागिना बनवून घ्यायचं किंवा आणलेला दागिना कढवून, वितळून, आपल्याला हवा तसा दागिना बनवून उरलेलं सोनं आपल्याकडे परत घ्यायचं.
ह्या व्यवहारात गिर्हाईक सोनारा समोरच बसून आपल्याला हव्या असलेल्या पाटल्या, बांगड्या, कानातलं, नाकातलं जे काय हवं असेल त्याची योजना सोनाराला समजावून सांगायचं.प्रत्यक्ष तयार झालेला दागिना एखाद्या महिन्यात मिळायचा.
सोन्याचे पैसे,दागिने बनवण्याची करणावळ त्याचे पैसे,वगैरे व्यवाहार होऊन जायचा.असं म्हणतात, सोनाराला थोडीशी आणखी मिळकत त्याच्या हातचलाखीतूनही मिळायची.ही मिळकत मासा,तोळा वजनात, किंवा सोन्याचा कस पहाताना,सोनं कढवताना,सोन्यावर कानस मारताना चलाखीच्या असलेल्या अनुभवातून मिळायची.
तात्या पेडणकरांचा पिढीजात पेढीचा धंदा असल्याने,ते त्यात कसलेले अनुभवी होते.तात्यांच्या दागिना करणावळीवरही गिर्हाईक खूष असायचं.तात्यासोनार एकूण व्यवहारात प्रामाणीक असल्याचा सर्व साधाराण गावातल्या लोकांचा भरवंसा असायचा.आणि ते खरंही होतं.पण हातचलाखी न करणारा आणि भट्टीजवळचा कचरा नीट निरखून,त्यात सोन्याचा कीस आहे की नाही हे पाहिल्याशिवाय टाकून देणारा सोनार,सोनार कसला.
आता आपलं वय झालंय.दिवसभर भट्टीजवळ बसणं कठीण होत आहे हे ज्यावेळी तात्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला,रामाला,ह्या धंद्यात प्रवीण करायचं ठरवलं.राम हा तात्यांचा एकुलताएक मुलगा होता.आतापर्यंत राम आपल्या वडीलांकडे, ते काम करीत असताना त्यांच्याकडे, निरखून पहायचा. पण एक दिवस रामाला भट्टीवर बसण्याची पाळी आली.तात्या पेडणेकराना सौम्य हार्ट ऍटॅक आल्याने विश्रांती घेणं क्रमप्राप्त झालं होतं.
दुकानाच्या खोलीच्या अर्ध्या भागात पडदा घालून तात्या एका खाटीवर झोपून असायचे.पण त्यांचे कान रामाच्या गिर्हाईकाबरोबर होणार्या व्यवहाराकडे रोखलेले असायचे.
एकदा काय झालं,असलेला दागिना कढवून,दुसरा दागिना करून उरलेलं सोनं घेऊन जाण्यासाठी सकाळीच एक गिर्हाईक आलं.राम सर्व व्यवहार नीट करील ना?
हातचलाखी जमेल ना? ह्याबद्दलचा विचार येऊन तात्यासोनार काळजीत,सैरभैर होते.
"रामारे! तुका रे, बाबा काळजी"
असं मधून मधून म्हणायचे.
समोर बसलेलं गिर्हाईक हे त्यांचं कण्हणं ऐकून त्यांच्या मुलाला विचारत होतं,
"तात्यांका खूपच अस्वस्थ वाटतां सा दिसतां. एकसारखो देवाचो धावो करतहत म्हणून म्हणतंय,तब्यत ठीक नाय काय?"
मुलगा म्हणाला,
"आतां म्हातार्यांचां वय झाला मां,अस्वस्थ ह्या वाटातालांच."
परंतु, गिर्हाईक बसलं असताना परत परत,
"रामारे!तुका रे,बाबा काळजी"
हे तात्यांच्या तोंडातून येणारे शब्द ऐकून मुलगा वैतागला.
वडीलांच्या मनात काय चालंय हे न कळायला तो तेव्हडा निर्बुद्ध नव्हता.
तो गिर्हाईकाला उद्देशून पण वडीलांना समज देत ओरडून म्हणाला,
"हो आनि कित्यांक बोंबालतां? रामान लंका केन्नाच जाळली."
हे वाक्य ऐकून तात्यासोनारचं कण्हणं बंद झालं.
थोड्यावेळाने गिर्हाईक निघून गेलं.एक महिन्याने येऊन दागिना घेऊन जाईन ह्या बोलीवर व्यवहार झाला.
पण घरी जाता जाता गिर्हाईकाच्या मनात येत होतं,
तात्यांचा मुलगा असं काय बोलला?खरं तर लंका हनुमानाने जाळली ना?
मग राम कसा लंका जाळील? का तात्याने मुलाला रामायण नीट समजावलेलं दिसत नाही.अशी त्या भोळ्या गिर्हाईकाने समजूत करून घेतली असावी.
पण,
"रामान लंका केन्नाच जाळली"
ह्याचा अर्थ समजायला तात्यासोनारपण तेव्हडा निर्बुद्ध नव्हता.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
19 Dec 2015 - 8:18 am | DEADPOOL
सोनाराला
थोडीशी आणखी मिळकत
त्याच्या हातचलाखीतूनही
मिळायची.ही मिळकत मासा,तोळा वजनात,
किंवा सोन्याचा कस पहाताना,सोनं कढवताना,सोन्यावर कानस मारताना
चलाखीच्या असलेल्या अनुभवातून
मिळायची.>>>>>>>>>>
यातून तुम्ही सरसकटीकरण करता आहात!
सोनार हा जातिवाचक शब्द वगळून, सुवर्णकार कारागिर हा शब्द वापरता आला असता!
19 Dec 2015 - 9:08 am | अगम्य
त्यांनी काय लिहिलंय ते नीट वाचा. "सोनार" हा शब्द त्या पेशाच्या अर्थानेच वापरलेला आहे. जातीचा संबंध काय?
19 Dec 2015 - 9:41 am | मार्मिक गोडसे
सांगून काही उपयोग नाही. नळी फुंकली सोनारे.....
19 Dec 2015 - 8:50 am | यशोधरा
आवडली! :)
19 Dec 2015 - 9:01 am | अरिंजय
भारी.
19 Dec 2015 - 9:55 am | उगा काहितरीच
यावरून एक किस्सा आठवला, आज्जीने सांगितलेला... आमच्या घराच्या बाजूला एक सोन्याचांदीचे दुकान होते. काळ स्वातंत्र्याच्या आसपासचा. त्या दुकानदाराची अशी ख्याती होती की तो चोरीचे दागिने घेत असे. एक चोर त्याच्याकडे विचारपूस करायला आला की दागिन्यांच्या बदल्यात पैसे हवेत दुकानदाराने त्याला संध्याकाळी बोलवले , व त्याने आणलेले जवळपास किलो दीड किलो दागिने वितळवु लागला . वितळता वितळता चोराचे लक्ष नाही असे पाहून दुकानदाराने जवळ असलेली जिवंत बेडूक त्यात टाकले. सोन सगळीकडे उडालं . दुकानदार चोराशी भांडु लागला की तू खोटं सोन आणलं . चोरच तो गेला पळून . .. त्यांनी म्हणे त्याकाळात चारचाकी घेतली होती या घटनेनंतार... आजही त्यांचे वंशज आमच्या बाजूला राहतात .
19 Dec 2015 - 11:49 am | कंजूस
गोष्ट राहिली बाजूला एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले.
19 Dec 2015 - 6:48 pm | एस
किस्सा आवडला! ह्या पेढ्या आता जवळपास नामशेष झाल्या आहेत.