प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
8 Dec 2015 - 8:14 am

आधीच्या लेखांच्या लिंक्स -

भाग १ - http://www.misalpav.com/node/33804
भाग २ - http://www.misalpav.com/node/33845
भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873
भाग ४ - http://www.misalpav.com/node/33927

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

राजेंद्र चोल (पहिला) याने दक्षिण भारत आणि उत्तर-पूर्व भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली हे आपण मागील भागात वाचले. या भागात आपण पुन्हा सम्राट राजेंद्र चोल याच्या बरोबर आग्नेय आशियाच्या दिग्विजयी प्रवासाला निघूया.

चोल साम्राज्याचे आग्नेय आशियामधील सर्व सत्तांशी वादविवाद होत होते हे आपण मागील भागात वाचलेच. त्यातच, सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याने स्वत:चा पत पुरावा म्हणून, चोल हे त्यांचे मांडलिक राज्य असल्याचे चीनच्या सम्राटाच्या दरबारात घोषित केले.

हे वृत्त राजेंद्र चोल याला समजल्यावर तो गप्प बसता तरच नवल! त्याने बलाढ्य नौदलाची उभारणी केली आणि तो विश्व दिग्विजयासाठी निघाला.

श्रीलंका, मालदीव (माला-द्वीप किंवा द्वीप माला) यांवर विजय मिळवून तो ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया, दक्षिण विएतनाम (चंपा) असे प्रदेश पादाक्रांत करित मलेशियाला पोहोचला. त्यावेळची श्री-विजय साम्राज्याची मांडलिक असलेली गंगानगर, लंकासुख आणि ताम्रालिंग ही राज्ये घनघोर युद्धात पराभूत करून त्याने सुमात्राच्या श्री-विजय साम्राज्याला आव्हान दिले. पुढे तुंबळ युद्ध होऊन श्री-विजय साम्राज्याचा पराभव झाला आणि संपूर्ण आग्नेय आशिया चोल साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली. केवळ आरमाराच्या सहाय्याने राजेंद्र चोल याने केलेला हा पराक्रम सिकंदर, चेंगीज खान या तथाकथित जग्गजेत्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे असे मला वाटते.

चोला rajyavistar

एका सयामी चित्रकाराने रंगविलेले राजेंद्र चोल याच्या कडाह स्वारीचे चित्र:

कडाह स्वारीचे chitr

याच पराक्रमामुळे तत्कालीन तमिळ कवींनी त्याला "कडारम कोंडण " म्हणजे "कडारम" किंवा "कडाह" (सध्याच्या मलेशिया देशातील एक प्रमुख प्रांत) देशाचा स्वामी या नावाने भूषविले आहे.

ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत चीनी सम्राटांच्या दरबारी या सर्व घडामोडींची बारीकसारीक नोंद केली गेली, परंतु बलाढ्य चीनी साम्राज्याने या सर्व राज्यांशी सलोख्याचे संबध ठेवले होते. केवळ व्यापारी फायदा लक्षात घेऊन तत्कालीन चीनी सम्राटांनी यात कुठलीही ढवळाढवळ केली नाही याबद्दल मला त्यांचे विशेष कौतुक करावसे वाटते आणि सध्याच्या चीनी राजवटीने यातून खूप शिकण्यासारखे आहे.

पुढे अकराव्या आणि बाराव्या शतकापासून अंतर्गत दुहीमुळे त्याचप्रमाणे अरब, तुर्की, अफगाणी, इराणी आणि मोंगोल (मुघल) अशा परकीय आक्रमणांनी भारतातील सत्ता खिळखिळ्या झाल्या आणि त्यांची आग्नेय आशियातील पकड सुटली.

त्याचबरोबर आग्नेय आशियामध्ये अनेक सत्ता नव्याने उदयास आल्या. त्यामध्ये पुन्हा पुनर्स्थापित झालेले सुमात्रामधील 'श्री विजय' हे बौद्ध साम्राज्य, तर जावा आणि बाली येथील 'सिंह श्री' आणि 'मजाहिपत' ही हिंदू राज्ये ही मुख्य होत.

सिंगापूरच्या आख्यायिकेतील प्रसिद्ध 'संग निला उतामा' (संघनील उत्तम; म्हणजेच संघनील पहिला) हा या पुनर्स्थापित श्री विजय साम्राज्यातील राजापुत्रांपैकीच एक बरं का!

मजाहिपत राज्य

बाली बेटावर आजही हिंदू संस्कृती टिकून आहे हे आपण सर्व जाणतोच. मजाहिपत साम्राज्य हे यातील सर्वात प्रभावी साम्राज्य होते. त्यांनी जावा, सुमात्रा, बाली आणि बोर्निओ, तसेच फ़िलिपाइन्स या सर्व बेटांवर आधिपत्य गाजवले आणि अनेक हिंदू मंदिरांचे निर्माण केले. बाली बेटांवर असलेली प्रसिद्ध हिंदू मंदिरे आणि त्यांचे विशेष स्थापत्य हे मजापहित राजवटीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

मजाहिपत मंदिर स्थापत्य शैली; काही चित्रे:

मजाहिपत मंदिर शैली

उलुवातु मंदिर

तेराव्या शतकात मोंगोल सम्राट चेंगीज खानचा पणतू कुब्लाई खान याच्या सैन्याने जावा बेटावर आक्रमणाचा असफल प्रयत्न केला. मजाहिपत साम्राज्याचा तत्कालीन सम्राट विजय याने हा प्रयत्न गनिमी काव्याने परतवून लावला. पण चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अंतर्गत दुहीमूळे हे साम्राज्य लयाला गेले.

परंतु कुब्लाई खानाच्या आक्रमणाच्या वेळी मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत मुस्लिम धर्माचा शिरकाव झाला. पुढे चौदाव्या आणि पंधराव्या शतकात अरब आणि इतर देशांतून आलेल्या मुस्लिम धर्मप्रसारकांच्या वाढत्या प्रभावाखाली सर्व लहान सहान राजांनी आणि प्रजेने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि बाली बेट वगळता इतर सर्व ठिकाणी हिंदू धर्माचा उरला सुरला प्रभाव लयाला गेला. असो. कालाय तस्मै नम: ।। दुसरं काय?

आपल्या संस्कृतीचा आग्नेय आशियाई देशांतील विस्तार म्हणजे आपला पण एक प्रकारचा 'वसाहतवाद'च नाही का?

फिलिपाइन्स देशात नवव्या शतकापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण झाला. मागील भागांमध्ये उल्लेख असलेल्या ‘चंपा’ राज्यातील नागरिकांनी आपले बस्तान नवव्या शतकापासून फिलिपाइन्स येथे बसविले होते. त्यानंतर कंबोडियाचे ‘ख्मेर’, श्री विजय, आणि मजाहिपत अशा अनेक सत्तांनी फिलिपाइन्स येथे राज्य केले. त्यामुळे मलय भाषेप्रमाणेच फिलिपिनो ‘तगालोग’ भाषेमध्ये तमिळ आणि संस्कृत शब्दांची रेलचेल दिसून येते. पुढे ब्रिटीश वसाहतीच्या काळात फिलिपाइन्स मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आणि बहुतांश फिलीपिनोंनी ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केला.

या भागात आपला प्राचीन भारतीय संस्कृतीबरोबरचा दक्षिण-पूर्व आशिया खंडातला प्रवास पूर्ण झाला. पुढच्या भागापासून आपण पश्चिमेकडील प्रवासाला सुरुवात करूया, कसे?

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

8 Dec 2015 - 9:43 am | माहितगार

मुख्य म्हणजे अनेक प्रसंगी हा प्रसार कुठलेही राजकीय आक्रमण न करता झाला
* संदर्भ: "प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती" - भाग १

ही राज्ये घनघोर युद्धात पराभूत करून ....... पुढे तुंबळ युद्ध होऊन.....चा पराभव झाला आणि संपूर्ण आग्नेय आशिया ..... साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली. केवळ आरमाराच्या सहाय्याने ........ याने केलेला हा पराक्रम ..... या तथाकथित जग्गजेत्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे असे मला वाटते.
* संदर्भ: प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

१) या वरून मला ज्या काळात शॉर्टवेव्ह रेडीओवर विवीध देश आपापला प्रचार करत त्यात इराणी रेडीओवरून इस्लामचा प्रसार कसा शांततामय पद्धतीने झाला आहे याचा प्रचार ऐकल्याची आठवण झाली. त्या त्या देशातल्या त्या त्या धर्मातल्या सर्व सामान्य जनतेला नेहमीच आपला धर्म कसा शांतताप्रीय आहे आणि काही युद्धे झाचीच तर ती केवळ त्यांच्या केवळ सकारात्मक बाजू ऐकण्यास आवडते. केवळ सकारात्मक बाजू किंवा केवळ नकारात्मक बाजू असे नसावे. युद्धांना वास्तव म्हणून स्विकारावे लागते.

२) हा धागा लेख वाचून तत्कालीन भारतीयांची युद्धाची दिशा या एवजी पश्चिमेस असतीतर असा एक विचार मनात येऊन गेला (अर्थात जर-तरला प्रत्यक्षात फारसा अर्थ नसतो हे खरे)

३)

परंतु बलाढ्य चीनी साम्राज्याने या सर्व राज्यांशी सलोख्याचे संबध ठेवले होते. केवळ व्यापारी फायदा लक्षात घेऊन तत्कालीन चीनी सम्राटांनी यात कुठलीही ढवळाढवळ केली नाही याबद्दल मला त्यांचे विशेष कौतुक करावसे वाटते आणि सध्याच्या चीनी राजवटीने यातून खूप शिकण्यासारखे आहे.

यात धागा लेखकास नेमके काय म्हणावयाचे आहे, हे समजून घेणे आवडेल ? बाय द वे, १९४७ उत्तर काळात चिनी साम्राज्याला भारता विरुद्ध चुचकारण्यासाठी पाकीस्तान चीनला दक्षिण पूर्व आशियातील भारतीयांचा ऐतिहासीक प्रभाव वगैरेची भिती घालण्यास उपयोग करत आला असावा असे वाटते. असो

तळटिप: या धागा लेखासाठीही नेहमी प्रमाणे धागालेखक संदर्भ दुवे उधृत करतील असा विश्वास आहेच. मी धागा लेखांसाठी केवळ संदर्भ मागायचे काम करतो आहे, पडताळतो आहे असे नव्हे ते काम इतरांवर सोडतो आहे.

भानिम's picture

8 Dec 2015 - 11:59 am | भानिम

वेळोवेळी योग्य प्रमाणात मीठ टाकून मालिकेचा स्वाद वृद्धिंगत केल्याबद्दल आभार... :) :)

प्रतिसाद मुद्दा 1 -

लेखमाला ही नि:पक्षपाती, वास्तवनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातूनच लिहिली आहे याकडे पुन्हा लक्ष वेधु इच्छितो. यासाठीच हेतूपूर्वक 'अनेक प्रसंगी' असा शब्दप्रयोग केला आहे. मालिकेच्या सुरवातीच्या भागांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा ज्ञानप्रसाराच्या मार्गाने आणि व्यापारी वसाहतींच्या स्वरुपात झाला ते विशद केलेच आहे. त्यानंतरच्या पल्लव, पाल, गुप्त आणि चोल यांच्या आक्रमणांना 'आपला वसाहतवाद' असेच म्हंटले आहे. राजेंद्र चोल याच्या आक्रमणाची थोडीशी भलामण केली आहे त्यामागे उद्देश दोन - वैभवशाली दाक्षिणात्य संस्कृतीची वाचकांना ओळख व्हावी आणि (विशेषतः) तमिळ लोकांना त्यांच्या भाषेचा व संस्कृतीचा एवढा अभिमान का याची पार्शभूमी कळावी (ज्यांना माहित नसेल त्यांना), आणि आपले राज्यकर्ते व सैन्य पराक्रमात कमी नसुन दुहीच्या शापामूळे आपले नुकसान कसे झाले(आणि आजही होतेच आहे, नाही का?) हे अधोरेखित करावे.

भानिम's picture

8 Dec 2015 - 11:59 am | भानिम

वेळोवेळी योग्य प्रमाणात मीठ टाकून मालिकेचा स्वाद वृद्धिंगत केल्याबद्दल आभार... :) :)

प्रतिसाद मुद्दा 1 -

लेखमाला ही नि:पक्षपाती, वास्तवनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातूनच लिहिली आहे याकडे पुन्हा लक्ष वेधु इच्छितो. यासाठीच हेतूपूर्वक 'अनेक प्रसंगी' असा शब्दप्रयोग केला आहे. मालिकेच्या सुरवातीच्या भागांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा ज्ञानप्रसाराच्या मार्गाने आणि व्यापारी वसाहतींच्या स्वरुपात झाला ते विशद केलेच आहे. त्यानंतरच्या पल्लव, पाल, गुप्त आणि चोल यांच्या आक्रमणांना 'आपला वसाहतवाद' असेच म्हंटले आहे. राजेंद्र चोल याच्या आक्रमणाची थोडीशी भलामण केली आहे त्यामागे उद्देश दोन - वैभवशाली दाक्षिणात्य संस्कृतीची वाचकांना ओळख व्हावी आणि (विशेषतः) तमिळ लोकांना त्यांच्या भाषेचा व संस्कृतीचा एवढा अभिमान का याची पार्शभूमी कळावी (ज्यांना माहित नसेल त्यांना), आणि आपले राज्यकर्ते व सैन्य पराक्रमात कमी नसुन दुहीच्या शापामूळे आपले नुकसान कसे झाले(आणि आजही होतेच आहे, नाही का?) हे अधोरेखित करावे.

भानिम's picture

8 Dec 2015 - 12:32 pm | भानिम

प्रतिसाद मुद्दा 2 - पुढे चर्चा करुच...

प्रतिसाद मुद्दा 3- कम्युनिस्ट क्रांतीनंतरचे चीनचे दुटप्पी आणि आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये ढवळाढवळ करणारे धोरण आपणा सर्वांना ज्ञात आहेच. उदाहरणे -

1. स्वतः कम्युनिस्ट असुनही (रशियाला विरोध म्हणून) अमेरिकेला कम्युनिस्ट उत्तर विएतनामच्या विरोधात केलेली छुपी मदत (1964-69)
2. भारतावरिल आक्रमण
3. कुप्रसिद्ध 'ख्मेर रुज' या अत्याचारी कम्युनिस्ट क्रांतीला केलेली मदत
4. विएतनामवरिल आक्रमण (1979)
5. कम्युनिस्ट उत्तर कोरियाला मदत
6. फिलीपाइन्सशी वैर
7. थायलंडशी कुरबूर
8. ईशान्य भारतात कायम ढवळाढवळ
9. पाकव्याप्त काश्मिरात ढवळाढवळ.

या सर्वांमुळे आग्नेय आशियातील चीनची प्रतिमा अत्यंत खराब आहे. परंतु प्राचीन चीन ही चार हजार वर्षांपासुनची एकसंध सत्ता असुन त्यांनी व्यापारी तत्त्वावर स्वतःची भरभराट घडवली होती. अनेक महत्वाचे शोध जसे कागद, चलन, व्यापारी पतव्यवस्था(बँकींग) हे चीनमध्ये लावले हे आपण जाणतोच.

भारताच्या नेभळट नेतृत्वामुळे गेल्या पन्नास दशकांमधील चीनच्या या खराब प्रतिमेचा आपण पाहिजे तसा राजकिय लाभ उठवू शकलो नाही. प्रस्तुत लेखात माझ्या कुवतीनुसार चीनवर जाता जाता केलेली ही टिप्पणी आहे.

भानिम's picture

8 Dec 2015 - 12:35 pm | भानिम

टाकतोच.... सध्या काही कारणाने लॅपटाॅप हाती नसल्याने विलंब अपेक्षित आहे...

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2015 - 12:42 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2015 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

बराच मोठ्या कालखंडाचे (जवळ जवळ २००० वर्षे) चेंगिचखानाच्या (;) वेगाने वर्णन केल्याने तो फार त्रोटक आणि जरासा विस्कळीत झाला आहे. हा इतका महत्वाचा काल जरा विस्तारने लिहिला असता तर त्याला जास्त चांगला न्याय मिळाला असता व काही संभ्रमित भाग जास्त स्पष्ट झाले असते.

एक सुधारणा...

पुढे ब्रिटीश वसाहतीच्या काळात फिलिपाइन्स मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला

फिलिपाइन्स हा देश प्रथम स्पेन व नंतर अमेरिकेची वसाहत होता.

भानिम's picture

8 Dec 2015 - 9:32 pm | भानिम

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे डाॅ. साहेब. अगदी कमी काळ फक्त मनिला शहरावर ब्रिटिशांची हुकुमत राहिली असली तरी फिलीपाइन्स देश बहुतांश काळ स्पेन व नंतर अमेरिकेची वसाहत होता. काही चुकीच्या संदर्भामुळे लेखात 'ब्रिटिश वसाहत' असे नमुद झाले त्याबद्दल क्षमस्व.

भानिम's picture

8 Dec 2015 - 10:00 pm | भानिम

पुन्हा एकदा नमुद करावेसे वाटते की मूळच्या माध्यमामध्ये मर्यादा असल्याने लेखांचे स्वरुप त्रोटक झाले आहे व माहिती विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे. पुढेमागे जमल्यास एका एका देशावर सविस्तर लिखाण करुयात.

प्रचेतस's picture

8 Dec 2015 - 11:05 pm | प्रचेतस

माहितीपूर्ण लेखन.

मोगा's picture

10 Dec 2015 - 10:16 am | मोगा

हिंदूदेखील साम्राज्यवादी , वसाहतवादी होते की !

चौलराजाने त्या बेटांवरुन कुठला कोहिनुर हिरा आणला असेल तर तोपरत करायचा काय ?