या वाटेवर
इथून पुढे जरा जपून.
तरबेज प्रेमी पण
हलकेच पाउल टाकतात.
दिवसाउजेडी.
रापलेले भोई पण
घाबरतात
पालखी वहायला
या वाटेवर.
ती,
फुलदाणी
तो
चंद्र
ती
शिशी
ग्राईप वॉटरची.
ते
तांबडे तावदान
तो आयना
ती काकणं
ते सगळं काही
जे फुटतं
लाखो बधीर तुकड्यात.
विकीरान्नासारखं.
ते डंख करेल टाचेखाली.
हलकेच.
साप्ताहीक भविष्यासारखं.
सहज.निर्धोक.
वरवर चाळता.
चालता ?
जरा जपून
अपूर्ण कवितांचा असह्य ठणका
पहाटेसच जोर धरतो.
प्रतिक्रिया
27 Dec 2008 - 7:14 pm | लिखाळ
आणि
न समजलेल्या कवितांची
बोच
झोप लागू देत नाही.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
28 Dec 2008 - 12:45 am | धनंजय
अनेक वाचने लागतील.
खतरनाक प्रेमाचे भग्नावशेष विकीरान्नासारखे बोचतील ही अफलातून कल्पना आहे. अगदी हळूहळू पटते आहे.
*(उपमा गजबज करून एकमेकांना शह देत आहेत, असे मला वाटले - माझ्यासाठी बधीर/डंख वगैरे विरोधाभास किंचित रसभंग करणारा होता.)*
28 Dec 2008 - 12:19 pm | अवलिया
अनेक वाचनांनी पण समजणार नाही.
अंत पाहु नका... समजावुन सांगा
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
28 Dec 2008 - 1:35 pm | रामदास
तरबेज प्रेमी, रापलेले भोई =जगण्याचे बहुतेक अनुभव पचवणार्या व्यक्ती.
ग्राईप वॉटरची शिशी,आयना ,काकणं ,फुलदाणी=वेगवेगळ्या टप्प्यात पूर्णं न होउ शकलेली स्वप्न.
विकीरान्न= श्राध्द प्रसंगी नवजात ,अपूर्ण दिवासाचे गर्भ, इत्यादींना घातलेला भाताचा घास.इथे प्रेमाच्या अपूर्णत्वाची अत्युच्च पातळी या अर्थानी ही प्रतीमा वापरली आहे.हे सगळे अनुभव मनात साठत जातात पण साप्ताहीक भविष्यासारखे हलकेच घेतल्याने वास्तवीक जीवनात त्यांचा जागेपणी डंख जाणवत नाही
या अनुभवाचे रुपांतर अपूर्ण कवितांमध्ये झाल्याने परत एकदा थिटेपणाची जाणीव.त्यासाठी हा नविन माणसांना वैधानीक इशारा.
मी कविता लिहीली असली तरी ती व्यवस्थीत समजावणे मला जमले नाही.तज्ञांनी भर घातली तर आनंद वाटेल. आभारी आहे.
28 Dec 2008 - 2:21 pm | विनायक प्रभू
फॉर्म बदलला वाटते. साध्या सोप्या वरुन एकदम क्रिप्टीक. साथ आली की काय?
28 Dec 2008 - 11:42 pm | अवलिया
रामदास - समजले असावे (असे वाटते)
विप्र - तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
30 Dec 2008 - 11:14 am | विनायक प्रभू
पहाटेला कसला तरी जोर धरतो एवढच कळले.
29 Dec 2008 - 11:55 pm | चित्रा
ग्राईपवॉटरची शिशी हे वाचून वेगळे वाटले होते. अर्थ उलगडून सांगितल्याबद्दल आभारी आहे.
लहानशा कवितेत खूप काही आशय आहे,
विकीरान्न माहिती नव्हते, डंख करणारे विकीरान्न नसावे असे वाटले, पण ते इथले तज्ञच सांगू शकतील. तरी कवितेत "दम आहे" असे म्हणावेसे वाटते, पण हे लहान तोंडी मोठा घास होईल.
28 Dec 2008 - 4:03 pm | वेताळ
मला प्रथम वाटले होते ते लग्न झालेल्या माणसाचे गीत आहे .
वेताळ
30 Dec 2008 - 12:25 am | पिवळा डांबिस
खाली टीपा दिल्यात तेंव्हा थोडंफार समजलं हो!!
(स्वगतः यांच्या कविता ह्या ज्ञानेश्वरीप्रमाणे सटीप अभ्यासाव्या लागणार बहुतेक!!)
:)
30 Dec 2008 - 7:40 am | रामदास
पुरुष दैवाचे नाही ना.अंगे भिजली जलधारानी ऐशा ललना वगैरे वगैरे.तस्मात ड्रायव्हींग इन्स्ट्रक्शन काय
आणि तळटीपा काय .ह.घ्या .
30 Dec 2008 - 10:40 am | पिवळा डांबिस
हे, हे बरं नाय हां!!!:)
ह्याला चीटींग म्हणतात!!!:)
-हॅरॉल्ड रॉबिन्स (गावठी व्हरायटी)
30 Dec 2008 - 2:30 am | संदीप चित्रे
त्यामुळे प्रांजळपणे सांगतोय की कविता नीट्शी समजली नाही.
>> अपूर्ण कवितांचा असह्य ठणका
>>पहाटेसच जोर धरतो.
हे मात्र खास आहे आणि १०० काय १०१% पटलं :)