बुद्धिमान व पराक्रमी पेशवे

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in जनातलं, मनातलं
30 Nov 2015 - 8:59 pm

पेशव्यांनी मराठेशाही बुडविली हे काही तितके खरे नाही. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस यांनी (1707 - 1800) 94 वर्ष मराठेशाही राखली. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर (1800) दुसरे बाजीराव पेशवे अपराक्रमी, कारस्थानी, विषयलंपट असल्यामुळे 1817 मध्ये मराठेशाही बुडाली. पहिले बाजीराव पेशवे व माधवराव पेशवे या दोघानां मिळून 50 वर्षाचे आयुष्य लाभले असते तर मराठेशाही आणखी 50 वर्ष जास्त राहिली असती.

बाळाजी विश्वनाथ पेशवे :-
औरंगजेबाचा 1707 मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र आजम बादशहा झाला. त्याने झीनतउन्निसा व जुल्फिकारखान यांच्या सल्ल्यानुसार मराठ्यांच्यात छत्रपती पदासाठी कलह निर्माण करण्यासाठी शाहूंची सुटका केली. शाहूंनी महाराष्ट्रात आल्यावर गादीवर हक्क सांगताच राजाराम पत्नी ताराबाईने त्याला विरोध करून लढाईची तयारी केली. बाळाजी विश्वनाथांनी केवळ स्वत:च्या शब्दप्रभूत्वावर ताराबाईच्या पक्षातील "धनाजी जाधव" व इतरांना शाहूंच्या पक्षात आणले. शाहूंनी धनाजी जाधवाच्या मदतीने ताराबाईचा लढाईत पराभव केला. 1708 मध्ये सातारा येथे शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले.
शाहू महाराजांचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी लढू शकतील हे आंग्‍ऱ्यांना बाळाजी विश्वनाथांनी पटवून त्यांना शाहू महाराजांच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधूं बरोबर तह घडवून त्यांच्याच मदतीने दिल्लीच्या बादशाहाला पदच्युत करून दिल्लीहून संभाजी महाराज पत्नी येसूबाईची सुटका करवली. 1707 पासून मृत्यूपर्यंत (1720) बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना 1713 मध्ये "पेशवेपद" दिले. बाळाजी विश्वनाथांनी धनाजी जाधव व कान्होजी आंग्रेच्या मदतीने शाहू महाराजांच्या स्वराज्यात वाढ केली. त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मोगलांशी करार करून मराठ्यांना दक्षिणेत चौथाई व सरदेशमुखीचा अधिकार प्राप्त करून दिला.
बाळाजी विश्वनाथांना पत्नी राधाबाईपासून पहिला बाजीराव, चिमाजीअप्पा ही 2 मुले व भिऊबाई, अनूबाई या 2 मुली झाल्या.

पहिला बाजीराव पेशवे : -
बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर (1720) पेशवेपद त्यांच्या थोरल्या पुत्रास पहिल्या बाजीरावास देण्यास दरबारात विरोध होता. शाहू महाराजांनी दरबारातील विरोधाला न जूमानता 1720 मध्ये पहिल्या बाजीरावांना "पेशवेपद" दिले. तरुण व शूर बाजीरावाबद्दल शाहू महाराजाना जबरदस्त अभिमान व खात्री होती. पहिल्या बाजीरावांनी 1720 पासून मृत्यूपर्यंत (1740) या 20 वर्षात अनेक लढाया केल्या आणि सगळ्याच लढाया जिंकल्या. वेगवान हालचाल करून शत्रू सावध होण्यापूर्वीच हल्ला करून शत्रूला प्रतिकारासाठी वेळ मिळू न देणे ही बाजीरावांची रणनीती होती. पहिल्या बाजीरावांनी शनिवारवाडा बांधवून सत्ताकेंद्र पुण्यात वसविले.
दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश याने बुंदेलखंडावर हल्ला करून छत्रसाल बुंदेल्याला कैद केले. त्यावेळेस बाजीरावांनी छत्रसाल बुंदेल्याच्या मदतीच्या याचनेनुसार 35-40 हजारांच्या फौजेनिशी वेगवान हालचाल करून मोहम्मद खान बंगेशचा पराभव केला. या मदतीने खुश होऊन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख व आपल्या एका उपपत्नीची मुलगी "मस्तानी" बाजीरावांना दिली. पुण्यातील कर्मठ ब्राह्मण, चिमाजीअप्पा व काशीबाईनी मस्तानी मुसलमान असल्यामुळे विरोध केला. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या दरार्यापुढे कोणाचे चालले नाही, त्यांनी मस्तानीसाठी शनिवारवाड्यात महाल बांधून घेतला.
बाजीरावांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा हे बाजीरावां सारखेच पराक्रमी होते. त्यांनी कोकण घाट आणि किनाऱ्यावर मराठी राज्याचा झेंडा फडकवला. बाजीरावांनी दिल्लीवर आणि चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांवर जरब बसवून मराठी सत्तेचा दबदबा दक्षिणेपासून रुमशेपर्यंत पसरवला. वसईची लढाई चिमाजीअप्पाला किर्तीच्या शिखरावर घेउन गेली.
पहिल्या बाजीरावांचा विषमज्वराने 1740 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी मृत्यू झाला. पहिल्या बाजीरावांना काशीबाईपासून नानासाहेब, राघोबादादा, जनार्दन हे 3 व मस्तानीपासून समशेरबहाद्दर उर्फ कृष्णराव अशी 4 मुले झाली.

नानासाहेब पेशवे : -
पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर (1740) त्यांच्या थोरल्या पुत्रास नानासाहेबास शाहु महाराजांनी "पेशवेपद" दिले. नानासाहेबांनी पुण्याला शहराचे रूप देऊन सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती व लकडी पुल बांधून घेतले. नानासाहेबांनी व्यवस्थापन चोखपणे बजावले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (1749) नानासाहेब मराठा साम्राज्याचे सर्वसत्ताधीश झाले. शाहू महाराजांचा वारस रामराजा सातारा येथे नामधारी छत्रपती होता. नानासाहेब व रामराजे यांच्यात 1750 मध्ये सांगोला येथे झालेल्या करारानुसार नानासाहेबांनी छत्रपतीनां दरवर्षी 65 लाख देवून दौलतीचा कारभार करण्याचे ठरले.
नानासाहेबांचा धाकटा भाऊ राघोबादादांनी अटकेपार झेंडा फडकवला. राघोबादादांची पाठ फिरताच दिल्लीतील शहा अहमदशहा अब्दालीशी संधान साधू लागले. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सदाशिवरावभाऊनी शिंदे, होळकर, गायकवाड, मेहेंदळे हे सरदार घेउन जाट, शिख व रजपुतांच्या मदतीने दिल्लीवर आक्रमण करून दिल्ली ताब्यात घेतली.
दिल्ली आपल्या ताब्यात रहावी म्हणून अब्दालीने दिल्लीच्या दिशेने कुच केले. सदाशिवरावभाऊ व अब्दालीच्या सैन्याची पानिपत येथे लढाई झाली. त्यात दोन्ही बाजुचे खूप नुकसान झाले. पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला. एक लाखापेक्षा जास्त सैन्य, "विश्वासराव" व "सदशिवरावभाऊ" मारले गेले. पानिपतच्या लढाईनंतर अब्दाली दिल्लीकडे परत कधी फिरकला नाही.
थोरला पुत्र विश्वासराव व चिमाजीअप्पाचा मुलगा सदाशिवरावभाऊ यांच्या मृत्यूचे दु:ख जिव्हारी लागून नानासाहेबांचा 1761 मध्ये मृत्यू झाला. नानासाहेबांना गोपिकाबाईपासून विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही 3 मुले झाली.

माधवराव पेशवे : -
नानासाहेबांच्या मृत्यूनंतर (1761) त्यांच्ये धाकटे पुत्र माधवरावांना 1761 मध्ये "पेशवेपद" मिळाले. राघोबादादांना पेशवेपद हवे होते म्हणून माधवरावांच्या पेशवा बनण्याला त्यांचा विरोध होता. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत ठेवले. माधवरावांनी राक्षसभूवनच्या लढाईत निजामाचा दारुण पराभव करून 82 लाखांचा मुलुख व कर्नाटकवर 5 वेळा स्वारी करून शहाजीराजांच्या काळातील जहागिरीचा सर्व मुलुख परत मिळवला. 8 वर्षांच्या कारकीर्दित त्यांनी मराठी सत्तेचा गेलेला आत्मसन्मान परत मिळवुन दिला.
पानिपत लढाईतील अपयश धुवून काढण्यासाठी माधवराव पेशव्यांनी रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांची 50,000 फौज व शिंदे, होळकरांच्या सैन्याला उत्तरप्रदेशात धाडले. या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें त्रास दिलेल्या रोहिल्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली.
माधवराव पेशवे त्यांचे आजोबा पहिल्या बाजीराव सारखे पराक्रमी होते परंतू त्यांना अल्पायुष्य लाभले. माधवरावांचा 1772 मध्ये 28 व्या वर्षी मृत्यू झाला. माधवरावांची पत्नी रमाबाई सती गेल्या.

सवाई माधवराव पेशवे :-
माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर (1772) मध्ये त्यांचा धाकटा बंधू नारायणरावांना "पेशवेपद" मिळाले. पण राघोबादादांना स्वतःला पेशवेपद पाहिजे होते म्हणून त्यांनी आनंदीबाईच्या सल्ल्यावरून कट रचून नारायणरावांचा गारद्यांकरवी खून घडवून आणला. कारभारी नाना फडणविसांनी बाराभाईंचे राजकारण करून 1774 मध्ये "पेशवेपद" नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव यांना दिले. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूंणेनी नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून आनंदीबाईना धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले, तेथेच दुसर्या बाजीरावाचा जन्म झाला.
सवाई माधवराव कर्तबगार नसल्यामुळे सर्व कारभार नाना फडणवीस पहात. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीवर आपली पकड बसवली. दिल्लीच्या बादशहाने पेशव्यांना वजीर नेमल्यामुळे दिल्लीचा कारभार पेशव्यांच्या हातात आला. नाना फडणिसांनी इंग्रजांची 2-3 राजकिय व लष्करी आक्रमणे परतवून लावले.
सवाई माधवरावांचा 1795 मध्ये मृत्यू झाला. सवाई माधवरावांना पत्नी रमाबाईपासून मुलगी झाली.

दुसरा बाजीराव पेशवे :-
सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर "पेशवेपद" राघोबादादाचा पुत्र दुसरा बाजीरावांना (पळपुटा बाजीराव) मिळाले. दुसरे बाजीरावात युद्धकौशल्य व धडाडी नव्हती तसेच ते कारस्थानी व विषयलंपट होते.
नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर (1800) सत्तेसाठी यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला केला. लढाईत दुसर्या बाजीरावचा पराभव होऊन ते पुणे सोडून वाईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. 1803 मध्ये झालेल्या तहानुसार दुसर्या बाजीरावांनी इंग्रज फौजेच्या खर्चासाठी मोठा मुलुख देऊन इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली. परंतू तहानंतरही 1817 मध्ये खडकी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून त्याचे राज्य हिसकावून मराठेशाही बुडविली. दुसर्या बाजीरावांना वार्षिक 8 लाख रुपयांचे पेन्शन चालु करून त्याची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मवर्तास केली. इंग्रजांनी रायगड ताब्यात घेऊन सगळी हिशोबाची व दरबारी कागदपत्रे जाळली अाणि रायगडावरील मुख्य इमारती जमिनदोस्त केल्या.
दुसर्या बाजीरावांचा मृत्यू 1851 मध्ये झाला. दुसर्या बाजीरावांनी अनेक लग्न करूनही त्यांना मूल झाले नाही, शेवटी वेणगांव येथील माधवराव भटाच्या "गोविंद" नावाच्या मुलाला दत्तक घेतले. हेच ते स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" याशिवाय दुसर्या बाजीरावांनी बाळासाहेब व दादासाहेब ही 2 मुले दत्तक घेतली होती,

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

हेमंत लाटकर's picture

30 Nov 2015 - 9:04 pm | हेमंत लाटकर

कृपया अभ्यासपुर्ण प्रतिसाद करावेत.

प्रचेतस's picture

30 Nov 2015 - 9:08 pm | प्रचेतस

आमचा तेव्हढा अभ्यास नाही ओ.

पीके's picture

30 Nov 2015 - 10:42 pm | पीके

वल्ली,
लेख कुठून चोपेस्त केलाय का तपासा.

हेमंत लाटकर's picture

1 Dec 2015 - 10:27 am | हेमंत लाटकर

वल्ली,
लेख कुठून चोपेस्त केलाय का तपासा.

अहो नंगे भाऊ, मिपा मध्ये टाईप करने अवघड होते म्हणून docs to go या android office app मध्ये टाईप करून मिपामध्ये पेस्ट केले.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2015 - 12:49 pm | टवाळ कार्टा

२०१५ मधला मिपावरचा सर्वात निरागस प्रतिसाद :)

कविता१९७८'s picture

30 Nov 2015 - 9:21 pm | कविता१९७८

प्रतिसाद करतात??? की देतात???

टवाळ कार्टा's picture

30 Nov 2015 - 10:16 pm | टवाळ कार्टा

होतात :)

प्रथमच तुम्ही एव्हढा मोठा लेख लिहिलात. त्याबद्दल अभिनंदन..

म्हणजे तुम्हि कोकिळ्व्रत केले नाहि वाटत्..आय माय स्वारी..म्हणजे तुम्हि कोकिळ्व्रता वरचा लेख वाचला नाही वाटत :)

लेख खुप आवडला. थोडक्यात पण मुद्देसूद.

धडपड्या's picture

1 Dec 2015 - 2:21 am | धडपड्या

का बिचार्याला बदनाम करताय? मुळात हा असा असण्याचं कारण नाना फडणवीसच होता.. जन्मापासून कैदेत असल्याने, युद्ध, राजकारण, समाजकारण याचं शिक्षणच नव्हतं त्याच्याकडे.. दुसर्या बाजीरावाने सुत्र हातात तर घेतली पण त्याच बालपण आणि नाट्यमयरीत्या मिळालेली पेशवाई असो ,ह्या सगळ्या राजकीय नाटकात त्याने बाराभाईंच पारपत्य करायला सुरुवात केली,आणी दौलतराव,सर्जेरावांच्या हातातलं बाहूलं बनत गेला..

शिंदे - होळकर वादात विठोजीला अत्यंत कृरपणे मारण्यात आलं, आणि मुळातच दुरावलेले हे सरदार आणखी लांब गेले.. अमृतरावाने होळकरांना हाताशी धरुन,शिंद्यांना शिकस्त द्यायचे प्रयत्न चालवलेले. ज्यातून एकमेकांचा मुलूख मारुन खाणे सुरु झाले.. म्हणजेच एकूणच सगळेच लोक स्वार्थाचाच विचार करत होते... रावबाजी जेव्हा पुणे सोडून गेला, तेव्हा होळकरांनी नंतर अमृतरावाच्या मुलाला पेशवा करायचा प्रयत्न केला. पण पेशवे अजून पदावर आहेत ते परत येवू शकतात त्यामुळे हे करणे अयोग्य आहे असे ठरवण्यात आले,यातच बाजीरावावर पळपुटा म्हणुन केलेला आरोप किती चुकिचा आहे हे सरळ सरळ सिद्ध होते.

इकडे शिंद्यांनी बाजीरावाला जाउ नये, असे सल्ले द्यायला सुरुवात केली. मात्र त्यांचे होळकरांविरुद्धचे अपयश समोरच असल्याने, रावबाजीने ईंग्रजांकडे मदत मागीतली.. होळकरांचे सैन्य जेव्हा कोकणात उतरले, तेव्हा बाजीरावाने तैनाती फौजेचा तह केला.
या तहाने, ईंग्रजांचा मराठा राजकारणात प्रवेश जरी झाला, तरी तो लिमीटेड होता. स्वराज्याचे हक्क कायम होते. पुढे जेव्हा एल्फिन्स्टन आला, तेव्हा बाजीरावाला आपली चूक उमगली.. मग त्याने त्रिंबकजी डेंगळेंना कारभारी नेमलं.. हा अत्यंत हुशार होता. त्यांना प्रती नाना समजलं जाई.. त्यांनी गोखले, पानसे, विंचूरकर, पुरंदरे,मराठे वगैरे सरदारांना एकत्र आणलं..मात्र त्यांना पण एल्फिन्स्टनने गायकवाडांचा वकिल, पटवर्धन यांच्या खुनात गोवलं, आणि कैद केलं...

शेवटी १८१७ - १८ च्या युद्धात स्वत: बाजीराव उभे राहीले.. मात्र सरदारांनी घात केला.. शिंदे, होळकर, भोसले वतनासाठी अडून बसले. घोरपडे, रास्ते वगैरे फितूर झाले. गोखले, पानसे लढाईत कामी आले. पुरंदरे, डेंगळे आणि विंचूरकर हेच शेवटपर्यंत रावबाजींसोबत होते.

आता सांगा, त्याची काय चूक? त्याने वारसाच्या हव्यासाखातर ११ लग्ने केली होती. मात्र तेव्हा बहुभार्या पद्धत होतीच की!! पण कोणी एक लोकहितवादी नावाचा ईंग्रजांचा नोकर लिहीतो, म्हणून आपण त्याच्यावर स्त्रीलंपट शिक्का मारुन मोकळे.

बाजीरावाने शरणागती पत्करण्या आधिच १८१२ मध्ये छत्रपतिंनी तेच केले होते की! मग मराठेशाही बुडाली नेमकी केव्हा? छत्रपतिंनी शरणागती पत्करल्यावर, की पंतप्रधानाने?

गॅरी ट्रुमन's picture

1 Dec 2015 - 10:28 am | गॅरी ट्रुमन

कॉलिंग पुण्याचे पेशवे.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2015 - 8:28 pm | llपुण्याचे पेशवेll

दुसरा बा़जीराव अर्थात बाजीरायी हा वरील राजकारणात असफल ठरल्यामुळेच फक्त बदनाम आहे अशातला भाग नाही. उगा त्याची काय चूक वगैरे विचारू नका. शिवाजी महाराजांनी वतनदारी थांबावी व स्वराज्य फेडरल स्टेट व्हावे म्हणून वतने जहागिर्‍या बन्द केल्या. पुढे त्या अन्य लोकांनी पुन्हा चालू केल्या परंतु त्याचा घृणास्पद कळस बाजीरायीच्या काळात झाला जेव्हा पुण्याची कोतवाली (कोतवाल म्हणजे नुसता सुव्यवस्था राखणारा नव्हे तर गुप्तहेर खाते पूर्ण ताब्यात ठेऊन स्वराज्याचे प्रोअ‍ॅक्टीव संरक्षक असणारा असे पद होते) लिलाव करून विकली. तसेच अन्य अनेक गोष्टींबाबत केले गेले. पेशवाईच्या कुशासनाचा हा कळस होता. राजा परागंदा झाला तरी त्याप्रती निष्ठा ठेवणारी प्रजा असते ती पेशवाईला लाभली नाही ती या कारणामुळे. पेशवाई लोकांच्या नजरेतून उतरली. त्यापेक्षा पांढर्‍यापायांचे गोरे बरे असे वाटण्याचे कारण बाजीरायीची काऱकीर्दच होय. राजकारणात अयशस्वी नानासाहेब पेशवे पण झाले होते. रंगढंग त्यांनी पण केले होते पण बाजीरायी बदनाम असण्यचे कारण म्हणजे या वर लिहीलेल्या गोष्टी. राहीला प्रश्न बाईलबाज पणाचा तर ११ लग्ने हा वादाचा मुद्दा नाही. बाजीरायीची आई आनंदीबाई म्हणते १६ वर्षाच्या बाजीरावनी स्वत:च्या ९ वर्षाच्या पण न्हाणं नं आलेल्या वधू सोबत बळजबरी संभोगाचा प्रयत्न केला. ही घटना कळल्यावर आनंदीबाईने बाजीरायीला लाथांनी तुडवला. आणि ही वॄत्ती उत्तरकाळातही श्रीमंत झाल्यावर पण कमी झाली नाही. राज्यस्थापनेसाठी लगबग करणे दूर आहे ते टीकवण्यासाठी पण लगबग केली नाही हा मात्र दोष आहे आणि तो बा़जीरायीच्या माथी आहे .

तुमचा शरणागतीचा तांत्रिक प्रश्न योग्य आहे पण मग राज्यकर्ते म्हणून राजे जेव्हा नाममात्र होते तेव्हा त्यांच्या शरणागतीला कितीसे महत्व द्यायचे?

टीप - लोकहितवादींचे यासंदर्भातील लेखन मी वाचलेले नाही.

धडपड्या's picture

10 Dec 2015 - 2:06 am | धडपड्या

धन्यवाद सर.. आपल्या प्रतिसादाबद्दल.. यातले बरेचसे मुद्दे माहित होते, नव्हते...

रावबाजी हे राजकारणात पारंगत नव्हतेच.. त्यांनी बापाचा बदला घ्यायच्या नादात, बर्याच चुकिच्या गोष्टि केल्या, चुकिच्या गोष्टिंना प्रोत्साहन दिले... जातीवाद तर याच्या काळात कळसावर पोहोचला होता.. त्यातूनच पुढे शूद्रांच्या गळ्यात मडकं अडकवणे, घटकंचुकी वगैरे खोट्या नाट्या गोष्टि पसरवल्या..

माझा मुद्दा फक्त त्याला एकट्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे चूक आहे, एवढाच आहे.. त्यावेळी सगळेच जबाबदार होते राज्य बुडण्याला... ह्याचे कौतुक एवढ्यासाठीच, की हा लढत राहीला..

बाकी, ते लोकहितवादी वाचण्याच्या लायकीचे नाहीच..

महासंग्राम's picture

1 Dec 2015 - 9:46 am | महासंग्राम

दुसरे बाजीराव पेशवे अपराक्रमी, कारस्थानी, विषयलंपट

हे तुमचं विधानाचा संदर्भ काय ????

हेमंत लाटकर's picture

1 Dec 2015 - 10:17 am | हेमंत लाटकर

काही गोष्टी जन्मजात असाव्या लागतात. बाळाजी विश्वनाथ एक सामान्य कारकून पण बुद्धिच्या जोरावर पेशवे झाले. माधवराव 16 व्या वर्षी पेशवे झाले सर्व कारभार राघोबादादाकडे होता. बुद्धिमान माधवरावांनी सुक्ष्म अवलोकन करून सर्व गोष्टी आत्मसात करून घेतल्या. आपल्या 8 वर्षाच्या अल्पकाळात पानिपतमध्ये मराठ्यांचे नुकसान भरून काढले. नाना फडणवीस होते म्हणून मराठेशाही 1817 पर्यंत राहिली. दुसरा बाजीराव चंचल राघोबादादा व कारस्थानी आनंदीबाईच्या पोटी जन्मले.

महासंग्राम's picture

1 Dec 2015 - 10:25 am | महासंग्राम

माफ करा, पण आपण जेव्हा इतिहासाबद्दल बोलत असतो तेव्हा संदर्भ दिला तर लिखाण अत्यंत विश्वासार्ह होते आपण दुसरा बाजीराव यांना जी विशेषण लावलीत त्याचा संदर्भ आपण दिला नाहीत.

ref

र च्या क ने : ''बुद्धिमान पेशवे'' ही द्विरुक्ती आहे काय ?

हेमंत लाटकर's picture

1 Dec 2015 - 11:11 am | हेमंत लाटकर

''बुद्धिमान पेशवे'' ही द्विरुक्ती आहे काय ?

यात द्विरुक्ती काय. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिला बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, नाना फडणवीस बुद्धिमान होते.

पगला गजोधर's picture

1 Dec 2015 - 11:28 am | पगला गजोधर

अहों कांकां तेंचं तंरं म्हंण्तोंयं नं मीं !

प्रसाद१९७१'s picture

1 Dec 2015 - 4:53 pm | प्रसाद१९७१

लाटकर काकांना फक्त प्रतिवाद करायचे माहिती आहे. त्यांना कोण कोणाच्या बाजुनी बोलतय वगैरे ह्याच्याशी काही घेणेदेणे नसते.
कोणी काहीही लिहीले की त्याचा उलटा प्रतिवाद करायचा

महासंग्राम's picture

2 Dec 2015 - 11:08 am | महासंग्राम

+१११११११११ अगदी हेच म्हणतो मी…. काकांचा मेन प्रॉब्लेम आहे की काका गोंधळलेले आहेत

सत्याचे प्रयोग's picture

5 Dec 2015 - 4:47 pm | सत्याचे प्रयोग

कारकूनला सामान्य समजू नका हो एकाद्या सरकारी आफिसात जावून बघा कसला पावरफुल माणूस असतो तो.

हेमंत लाटकर's picture

1 Dec 2015 - 11:00 am | हेमंत लाटकर

मराठेशाही बुडाली नेमकी केव्हा? छत्रपतिंनी शरणागती पत्करल्यावर, की पंतप्रधानाने?

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर 1750 मध्ये छत्रपती रामराजे हे नामधारी होते. 1750-1800 पर्यंत नानासाहेब, माधवराव, नाना फडणवीस यांनी मराठेशाही राखली.

बॅटमॅन's picture

1 Dec 2015 - 4:33 pm | बॅटमॅन

बायदवे हे रूमशाम नक्की कुठेशीक आलं हो.

प्रचेतस's picture

1 Dec 2015 - 4:42 pm | प्रचेतस

अगदी हेच. :)

बॅटमॅन's picture

1 Dec 2015 - 4:55 pm | बॅटमॅन

लाटकर काका उत्तर द्या. अख्खे मिपा आपल्याकडे नजर लावून आहे.

संध्याकाळच्या रुम मध्ये बसून देणारेत उत्तर. घाई कशाला?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2015 - 10:14 am | बिपिन कार्यकर्ते

शामकू रूममे बैठके उत्तर देणार आहेत..... असं म्हणायचंय का तुला?

अभ्या..'s picture

2 Dec 2015 - 10:50 am | अभ्या..

वईच वइच. अब आपको सब्बीच तो पता है मिया. जरा उनो समज लिए तो अच्ची बात.

गॅरी ट्रुमन's picture

1 Dec 2015 - 4:54 pm | गॅरी ट्रुमन

बायदवे हे रूमशाम नक्की कुठेशीक आलं हो

हाच प्रश्न मी मागे फेसबुकवरील इतिहासावरील एका ग्रुपमध्ये विचारला होता. त्याला एका सदस्याने रूमशाम म्हणजे इस्तंबूल (कॉन्स्टॅन्टिनोपल) असे उत्तर दिले होते. खरेखोटे माहित नाही.

मालोजीराव's picture

1 Dec 2015 - 5:07 pm | मालोजीराव

इस्तंबूल रे

हेमंत लाटकर's picture

2 Dec 2015 - 12:58 pm | हेमंत लाटकर

बॅटमॅनच्या व्यनिवरून गुगलवर चेक केले. रूमशाम म्हणजे इस्तंबूल उर्फ कॉन्स्टंटिनोपल.

हेमंत लाटकर's picture

2 Dec 2015 - 1:01 pm | हेमंत लाटकर

बाळाजी विश्वनाथ नसते तर काय झाले असते.

तुम्हाला ही जिल्बी पाडता आली नसती.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Dec 2015 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला ही जिल्बी पाडता आली नसती. >> मेलो मेलो रे हराम्या! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif लट्टू काकां च मार्केट यार्ड उठवलस रे अगदी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

सिरुसेरि's picture

2 Dec 2015 - 1:26 pm | सिरुसेरि

--"रावबाजी जेव्हा पुणे सोडून गेला, तेव्हा होळकरांनी नंतर अमृतरावाच्या मुलाला पेशवा करायचा प्रयत्न "--
हा अम्रुतराव कोण ?

मृत्युन्जय's picture

3 Dec 2015 - 1:29 pm | मृत्युन्जय

अमृतराव राघोबादादांचा दत्तक पुत्र. हा दुसर्‍या बाजीरावापेक्षा मोठा होता. माधवराव पेशव्यांच्या करकीर्दीत याला पेशवा बनवण्याचा घाट घातला गेला होता असे ऐकुन आहे.

उगा काहितरीच's picture

3 Dec 2015 - 1:26 pm | उगा काहितरीच

लेख आवडला.

रोहन अजय संसारे's picture

3 Dec 2015 - 3:32 pm | रोहन अजय संसारे

लेख आवडला.
"माधवराव पेशवे यान्च नाव आले व " पहिले बाजीराव पेशवे व माधवराव पेशवे या दोघानां मिळून 50 वर्षाचे आयुष्य लाभले असते तर मराठेशाही आणखी 50 वर्ष जास्त राहिली असती "
हे वाचुन खुप समाधान मिलाले.

हेमंत लाटकर's picture

5 Dec 2015 - 10:56 am | हेमंत लाटकर

बाळाजी विश्वनाथ झाले नसते तर....
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांच्या मनात मोगलाविषयी प्रचंड राग होता. त्याचा फायदा राजाराम पत्नी ताराबाईला झाला. सर्व मराठे सैन्य व सरदारांनी मिळून मोगलांना दक्षिणेत आले असताना सळो की पळो करून सोडले. आैरंगाबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांना मराठ्यांत सत्तेसाठी कलह व्हावा म्हणून मोगलांनी त्यांची सुटका केली. जेव्हा शाहू महाराजांनी गादीसाठी हक्क मागितला तेव्हा ताराबाई व शाहूंमध्ये भांडणे सुरू झाली. धनाजी जाधवाच्या सहाय्याने ताराबाईनी शाहूं बरोबर लढाई करण्याची तयारी केली. बाळाजी विश्वनाथ नसले असते तर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात आले नसते लढाईत शाहूंचा पराभव झाला असता. तारबाई शाहूंच्या भांडणाचा निजामाने फायदा उठवला असता. मराठेशाही 1750 मध्येच संपली असती.

शेखरमोघे's picture

5 Dec 2015 - 12:07 pm | शेखरमोघे

लेख आवडला.दुसर्‍या बाजीरावांनी दत्तक घेतलेला "गोविंद" किन्वा स्वातंत्र्यसेनानी "नानासाहेब पेशवे" हे १८५७ नन्तर नेपाळमध्ये गेल्याचे म्हटले जाते. इतर दोन दत्तक बाळासाहेब व दादासाहेब यान्च्याबद्दल काही पुढे माहिती मिळते का? सध्या बाजिराव-मस्तानी चित्रपटाबद्दल सुरू झालेल्या वादात "पेशव्यान्चे वन्शज" आहेत. ते या बाळासाहेब वा दादासाहेब यान्च्या पुढील पिढीतले का?

पर्ण's picture

5 Dec 2015 - 1:57 pm | पर्ण

वाह मस्त लेख...

हेमंत लाटकर's picture

7 Dec 2015 - 10:51 pm | हेमंत लाटकर

बाजीरावांचे व्यक्तिमत्व :
बाजीराव हे ६ फूट उंच होते, उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झा्ले होते. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.

रावबाजी (दुसरा बाजीराव पेशवे ) हे खुप रागीट होते . अशी कथा आहे की - एकदा ब्रम्हावर्तला ते नदीमध्ये पुजा करीत असताना , इंग्रज अधिकारी त्यांचा सालाना तनखा घेउन आले . तेव्हा , पुजेमध्ये व्यत्यय आला म्हणुन त्यांनी रागारागाने ते सोन्याच्या मोहरांनी भरलेले ताट नदीत भिरकावुन दिले . अजुनही तेथिल नदीमध्ये कधी कधी त्या मोहरा सापडतात . नंतर इंग्रजांनी त्यांना निमुटपणे नव्याने तनखा दिला .

हेमंत लाटकर's picture

8 Dec 2015 - 11:47 am | हेमंत लाटकर

युद्धाच्या वेळी मात्र पळून जात म्हणून पळपुटे बाजीराव हे नाव पडले.

पद्मावति's picture

8 Dec 2015 - 11:51 am | पद्मावति

छान लेख. आवडला.

वेल्लाभट's picture

8 Dec 2015 - 12:10 pm | वेल्लाभट

चांगला लेख; उत्तम माहिती.