आधीच्या दोन भागांमधून आपण भारतीय संस्कृतीचा प्रसार दक्षिण व पूर्व आशियातील म्यानमार, चीन, कोरिया, जपान, थायलंड इत्यादी देशांत कसा झाला ते पाहिले. आता आपण कंबोडिया, विएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमधील भारतीय संस्कृतीची वाटचाल पाहू.
आतापर्यंत आपण पाहिलेल्या इतिहासात, कंबोडियातील राज्यसत्तेला भारताबाहेरील भारतीय संस्कृतीचे अत्यंत गौरवशाली आणि वैभवशाली पर्व असे म्हणता येईल. ख्रिस्त पश्चात पहिल्या शतकापासून ते पंधाराव्या शतकापर्यंत एका सहस्त्रकापेक्षा जास्त काळ भारतीय राजवशांनी मीकाँग नदीच्या फुनान (याचा चीनमधील सध्याच्या फु-नान प्रांताशी संबंध नाही) आणि कंबोडिया (कम्बु-स्वयम्भुव: ~ कम्हुज ~ काम्भोज ~ कम्पुचिया ~ कंबोडिया) या सुपीक खोऱ्यामध्ये राज्य केले.
एका आख्यायिकेनुसार "कौंडिण्य" नावाच्या ब्राह्मण राजपुत्राने स्वप्नातील आदेशाप्रमाणे मंदिरातील दैवी धनुष्य बाणाच्या सहाय्याने फुनान प्रांतावर स्वारी करून, तेथील "लिऊ यी" (चीनी भाषेतील नाव) या नाग राजकन्येचा पराभव करून तिच्याशीच विवाह केला आणि व्याधपूर या नावाने आपले राज्य तेथे वसविले.
त्यानंतर तब्बल चौदा शतके वेगवेगळ्या राजवंशांनी येथे राज्य केले आणि राज्य विस्तारही केला. त्यामध्ये लाओस, विएतनाम (चंपा), उत्तर थायलंड आणि उत्तर मलेशिया या प्रदेशांचा समावेश होतो. यामध्ये भारतातील पल्लव आणि गुप्त घराण्यांमधील राजांचाही समावेश होता असे मानले जाते.
या राजसत्तेला चीनच्या तत्कालीन सम्राटांनी विशेष मान्यता दिली होती असे दिसून येते.
त्या त्या राजवंशानुसार जरी धर्मानिष्ठेचे पारडे कधी हिंदू तर कधी बौद्ध धर्माकडे झुकत असले, तरी एकंदरीत समाजव्यवस्थेवर आणि राज्यव्यवस्थेवर हिंदू वैदिक जीवनपद्धतीचा पगडा होता असे म्हणता येईल.
या सर्व काळात या राजांनी किंवा सम्राटांनी या भागात श्रेष्ठपूर, यशोधरापुर, ताम्रपुर, ध्रुवपुर, विक्रमपूर आणि अंगकोर अशी शहरे वसविली.
बाराव्या शतकातील राजा दुसरा सूर्यवर्मन याच्या काळात हे साम्राज्य आपल्या उत्कर्षाच्या कळसाला पोहोचले होते असे म्हणता येईल.
दुसरा सूर्यवर्मन यानेच जगप्रसिद्ध " अंगकोर वाट" म्हणजे "वैकुंठ धाम" या मंदिराचे आणि शहराचे निर्माण केले. सुमारे ५०० एकर ( २०० हेक्टर) इतक्या अवाढव्य क्षेत्रफळाचे हे मंदिर असून त्याभोवतीच्या शहरात सुमारे एक दशलक्ष नागरिक वस्ती होती. आजवरच्या कुठल्याही परिमाणाने, औद्योगिक क्रांतीच्या आधी अस्तित्वात असलेल्या शहरांमध्ये हे शहर जगातील सर्वात मोठे शहर होते असे सिद्ध झाले आहे.
त्यानंतरच्या राजांनी सुद्धा अंगकोर वाटच्या बांधकामांमध्ये भर टाकली. अशा प्रकारे पुढच्या तीन शतकांपर्यंत अंगकोर वाटचे निर्माण चालूच राहिले असे म्हणता येईल. अंगकोर वाटचे हे विष्णू मंदिर आपल्या अद्भुत वास्तूस्थापत्य शास्त्रीय चमत्कारांसाठी आधुनिक स्थापत्य शास्त्रज्ञांकडून अभ्यासले जाते.
अंतर्गत दुही आणि परकीय आक्रमणे यांमुळे चौदाव्या शतकाच्या अखेरीस खिळखिळे झालेले हे एके काळचे वैभवशाली साम्राज्य पंधराव्या शतकाच्या सुरवातीला लयास गेले आणि अंगकोर वाटचे हे अंधारात गेलेले वैभव पुन्हा जगासमोर यायला एकोणिसावे शतक उजाडावे लागले.
कंबोडियामधून आता आपण विएतनाममध्ये प्रवास करुया.
विएतनामचे लोक कट्टर लढवय्ये आहेत हे आपण विएतनाम-अमेरिका युद्धाच्या प्रसंगी पाहिलेच. हे लढवय्येपणाचे बीज फार पुरातन काळापासूनच विएतनामी लोकांच्या रक्तात भिनलेले असले पाहिजे. विएतनामचा हा चिंचोळा प्रदेश प्राचीन काळापासूनच युद्ध आणि अस्थिरतेच्या छायेत राहिला आहे.
सांस्कृतिक दृष्ट्या विएतनामचा विचार नेहमीच दोन भागांत करावा लागेल. दक्षिण विएतनाम आणि उत्तर विएतनाम. दक्षिण विएतनाममध्ये इंडोनेशियाच्या जावा आणि सुमात्रा मधून स्थलांतरित झालेल्या "चाम" लोकांनी त्यांचे "चम्पा" राज्य प्रस्थापित केले होते. हे लोक इंडोनेशियामधून भारतीय संस्कृती घेऊन आले होते. ते कोण व कसे हे आपण पुढे आपल्या इंडोनेशियाच्या प्रवासात बघूच. त्याच बरोबर भारतातून आलेल्या व्यापारी आणि ब्राह्मण लोकांनीदेखील "पुरातन मसाल्याच्या मार्गावरून" चीनपर्यंत प्रवास करताना दक्षिण विएतनाममध्ये स्थलांतर केले. या सर्वांनी मिळून हिंदू आणि काही प्रमाणात बौद्ध धर्मावर आधारित लोक संस्कृती निर्माण केली.
चीनचा प्रथम सम्राट 'चीन श हुआंग' याच्या काळात चीनने सध्याच्या उत्तर विएतनाम प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले परंतु दक्षिण विएतनाममध्ये राज्य स्थापित करण्याचा चीनच्या सेनापतींचा प्रयत्न नेहमीच असफल राहिला. ख्रिस्त पूर्व दुसऱ्या शतकापासून ते ख्रिस्त पश्चात नवव्या शतकापर्यंत या भागात चीनची सत्ता होती आणि या भू प्रदेशाला "आन-नाम" असे नवे दिले गेले होते. परंतु या सर्व काळात विएतनामी लोकांनी सतत बंड करून चीनी सेनापतींच्या नाकी नऊ आणले होते. अखेरीस नवव्या शतकाच्या सुरवातीस विएतनामी लोकांनी सशक्त उठाव करून आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यानंतरचे चीनी सम्राटांचे आक्रमणाचे सर्व प्रयत्न बहुतांशी असफल राहिले.
दरम्यान चम्पा राज्यातील चाम लोकांनी व्यापाराच्या बळावर आपले राज्य भरभराटीस आणले आणि इंद्रपूर, अमरावती, विजय, कौथर आणि पांडुरंग (आत्ताचे विएतनामी भाषेतील नाव "फा-रांग") अशी शहरे स्थापन केली आणि हिंदू देवदेवतांची अनेक मंदिरे बांधली.
उत्तर विएतनामी आणि कंबोडियातील "ख्मेर" साम्राज्याच्या सतत आक्रमणांना तोंड देऊनही हे राज्य चौदाव्या शतकापर्यंत टिकून होते.
अखेरीस "आन-नाम" च्या प्रबळ आक्रमणाने हे राज्य लयास गेले आणि चाम लोकांचा अभूतपूर्व असा नरसंहार केला गेला. नरसंहाराच्या भीतीने बहुतांश चाम लोक कंबोडिया, उत्तर थायलंड, उत्तर मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत स्थलांतरित झाले.
आज विएतनाम मध्ये आणि इतर सर्व देशांमध्ये चाम जनसमुदाय अल्पसंख्यांक म्हणून दारिद्र्यावस्थेत जगत असून सध्याच्या विएतनाम राष्ट्राच्या स्थापने दरम्यान म्हणजे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या दरम्यान चाम लोकांवर खूप अन्याय झाला. कंबोडियाच्या कुप्रसिद्ध "ख्मेर रूज" क्रांतीच्या काळात देखील कंबोडियातील अल्पसंख्यांक चाम लोकांना अत्याचार आणि नरसंहाराला तोंड द्यावे लागले आहे. काही प्रमाणात चाम लोकांनी हिंदू संस्कृती जपली असली तरी आज अनेक चाम लोकांनी नाईलाजास्तव मुस्लिम धर्म स्वीकारला आहे.
या भागापुरता आपला प्रवास इथेच थांबवू आणि मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत पुढील भागात प्रवास करु.
प्रतिक्रिया
26 Nov 2015 - 9:17 am | भानिम
नेहमीच्या 'बादाकिंश्राक' शिरस्त्याप्रमाणे जिज्ञासूंसाठी लिंक्स पेष्टतो -
कौण्डिण्य आणि कंबोडिया - http://www.civilserviceindia.com/subject/History/prelims/funan-cambodia....
http://www.khmerangkortourguide.com/cambodia-history.html
(कम्बु-स्वयम्भुव: ~ कम्हुज ~ काम्भोज ~ कम्पुचिया ~ कंबोडिया) - http://www.worldlibrary.org/articles/sage_kambu_swayambhuva
http://khmerconnection.com/topic/kambojas-kambujas-kambodia-kampuchea-10...
https://books.google.com.sg/books?id=iDyJBFTdiwoC&pg=PA66&lpg=PA66&dq=ka...
अंगकोर वाट - http://video.nationalgeographic.com/video/ancient-mysteries/angkor-wat-t...
सूर्यवर्मन दुसरा - http://www.apsarasarts.com/blog/-/blogs/the-reign-of-suryavarman-ii-of-a...
चंपा राज्य आणि चाम लोक - https://www.youtube.com/watch?v=w_oVHuZyiDE
आननाम राज्य - http://global.britannica.com/place/Nam-Viet
https://books.google.com.sg/books?id=QKgraWbb7yoC&pg=PA932&lpg=PA932&dq=...
26 Nov 2015 - 10:56 am | माहितगार
रोचक आणि माहितीपूर्ण, पु.ले.शु.
26 Nov 2015 - 11:57 am | पद्मावति
खूप सुंदर लेखमालीका. वाचतेय.
26 Nov 2015 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान लेख. मात्र, आवरत घेत बरीच त्रोटक माहिती आहे. दक्षिणपूर्व आशियात दीड एक हजार वर्षे संपन्न भारतीय संस्कृती नांदत होत्या. जरा जास्त तपशील असता तर अजून मजा आली असती.
कंबोडीयातील हिंदू संस्कृती, ख्मेर साम्राज्य व तेथिल देवळांबद्द्ल अधिक माहिती इथे मिळेल :
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया
26 Nov 2015 - 1:38 pm | भानिम
आपल्या लेखाच्या दुव्याबद्दल आभार डाॅ.साहेब. मग तपशीलवार वाचतो. त्रोटक माहिती या प्रश्नासाठी कृपया प्रचेतस साहेब यांना दिलेला प्रतिसाद बघावा.
26 Nov 2015 - 12:52 pm | प्रचेतस
माफ करा. पण हा इतिहास खूपच त्रोटकपणाने चितारला जातोय.
प्रयेक देशासाठी किमान एखादा स्वतंत्र लेख हवाय.
26 Nov 2015 - 1:31 pm | भानिम
आपलं म्हणणं अगदी योग्य आहे. परंतु आधीच्या भागातील प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माहितीचा आवाका खूपच मोठा आहे. लेखमाला आधीच लिहिली आहे आणि मूळ लेखमालेचे प्रयोजन सगळ्या इतिहासाचे सर्वसमावेशक समालोचन करणे हे होते. तसेच मुळच्या माध्यमात आधी म्हंटल्याप्रमाणे शब्दमर्यादा सुद्धा होती. त्यामुळे ही लेखमाला होऊन जाऊदे. पुढे वेळ मिळाला की आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने प्रत्येक देशाबद्दल विस्तृत लिहिण्याचा प्रयत्न करिन..
26 Nov 2015 - 2:23 pm | एस
छान लेखमाला.
तुम्ही म्हणालात तशा विस्तृत भागांची वाट पाहतो.
26 Nov 2015 - 2:36 pm | प्रचेतस
धन्यवाद.
इतकं चांगलं लिखाण केवळ ओझरतं येऊ नये इतकाच उद्देश होता.
सविस्तर लिखाणाची अवश्य वाट पाहीन.
26 Nov 2015 - 1:39 pm | भानिम
सर्वांना धन्यवाद. ...
26 Nov 2015 - 2:03 pm | मदनबाण
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में कुडी अनजानी हुं... ;) :-Zor
26 Nov 2015 - 2:22 pm | sagarpdy
सुंदर लेखमाला. पु भा प्र