टॉम ग्रेव्हनी - महा 'हलकट' माणूस!

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
11 Nov 2015 - 2:45 am

१९५१ सालचा डिसेंबर महिना...

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर भारत - इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती...

दिल्लीला झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली असली तरी पहिल्या इनिंग्जमध्ये सदु शिंदेंच्या (शरद पवारांचे सासरे!) लेगस्पिनने इंग्लंडला २०३ मध्ये गुंडाळलं होतं. विजय मर्चंट (१५४) आणि विजय हजारे (१६४*) यांच्या २११ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर (आठवा अमिताभचा नमक हलाल मधला अजरामर सीन!) भारताने ४१८ / ६ वर इनिंग्ज डिक्लेअर केली होती. दुसर्‍या इनिंगमध्ये अ‍ॅलन वॉटकिन्स (१३७*) आणि डोनाल्ड कार (७६) यांची १५८ रन्सची पार्टनरशीप आणि भयानक कूर्मगतीने खेळल्यामुळे (२२१ ओव्हर्समध्ये ३६८ रन्स!) इंग्लंडने मॅच कशीबशी वाचवली होती!

मुंबईच्या दुसर्‍या टेस्टमध्ये मर्चंट लवकर बाद झाले असले तरी हजारेंचा धडाका सुरूच होता. यावेळी हजारेंचा (१५५) साथीदार होता पंकज रॉय (१४०). रॉय - हजारेंची १८७ रन्सची पार्टनरशीप आणि नंतर सी डी गोपीनाथ (५०) च्या फटकेबाजीमुळे भारताने ४८५ पर्यंत मजल मारली होती!

इंग्लंडची सुरवात अडखळतीच झाली. रंगा सोनीच्या बॉलवर विकेटकीपर माधव मंत्रीनी फ्रँक लॉसनचा (५) कॅच घेतला तेव्हा इंग्लंडच्या जेमतेम १८ रन्स झाल्या होत्या!

लॉसन आऊट झाल्यावर एक उंचापुरा, काटकिळा बॅट्समन खेळायला आला. अपचनामुळे आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहवं लागल्यामुळे दिल्लीच्या पहिल्या टेस्टमध्ये तो खेळू शकला नव्हता!

दुसर्‍या दिवसाअखेरीला २ रन्स काढून नॉटआऊट असलेला तो काटकिळा माणूस तिसर्‍या दिवसाअखेरीसही नॉटआऊट होता!
१२० रन्स काढून!

अन्नाचा एकही कण पचत नव्हता त्यामुळे दर अर्ध्या तासाने लिंबू पिळलेलं पाणी तेवढं तो पोटात ढकलत होता!

रंगा सोनी, लाला अमरनाथ, विनू मंकड आणि पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडची वाताहत होण्यास कारणीभूत सदू शिंदे, सगळ्यांना आपल्या दुसर्‍याच टेस्टमध्ये कमालीच्या जिद्दीने तोंड देत!

सुदैवाने चौथा दिवस हा मॅचचा रेस्ट डे होता!

पाचव्या दिवशी लंचनंतर अखेर सदू शिंदेंच्या बॉलवर हेमू अधिकारीच्या हाती कॅच देऊन अखेरीस तो परतला तेव्हा सव्वा आठ तासात काढलेल्या १७५ रन्स त्याच्या नावावर होत्या!

हा उंचापुरा काटकिळा तरूण बॅट्समन म्हणजेच नुकताच ख्रिस्तवासी झालेला टॉम ग्रेव्हनी!

१६ जून १९२७ या दिवशी नॉर्थम्बरलँडजवळच्या रिडींग मिल या लहानशा खेड्यात टॉम ग्रेव्हनीचा जन्म झाला. लहानग्या टॉमला क्रिकेटची तोंडओळख करुन दिली ती त्याच्या वडिलांनी. परंतु आपला मुलगा मोठा क्रिकेटर झालेला पाहणं हे त्यांच्या नशिबात नव्हतं. टॉम सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं.

लहानग्या टॉमवर आणि त्याच्या मोठ्या भावावर - केन वर क्रिकेटचे संस्कार केले ते त्यांच्या सावत्र वडिलांनी. ब्रिस्टल ग्रामर स्कूल या शाळेत असतानापासूनच टॉम क्रिकेट, रग्बी, हॉकी आणि चक्क गोल्फही उत्तम प्रकारे खेळत असे! शाळा सोडल्यावर सुरवातीचे काही दिवस अकाऊंटंट म्हणून काम केल्यावर केनच्या पावलावर पाऊल टाकून १९४६ मध्ये टॉम सैन्यात भरती झाला. सेकंड लेफ्टनंट म्हणून तो ग्लॉस्टरशायर रेजिमेंटबरोबर सुएझमध्ये गेला.
शाळेत असताना टॉम एक चांगल्यापैकी लेगस्पीनर म्हणूनच प्रसिद्ध होता. परंतु सुएझमध्ये असताना इजिप्तमधल्या सिमेंटच्या विकेट्सवर खेळताना आपली उंची आणि टेक्नीक याचा पुरेपूर वापर करुन त्याने बॅटींगमध्ये जोरदार प्रगती केली! सुएझमधल्या कामगिरीवर त्याला कॅप्टन म्हणून बढतीही मिळाली! १९४७ मध्ये सुटीवर इंग्लंडला परतला असताना एव्हाना ग्लॉस्टरशायरसाठी नियमितपणे खेळणार्‍या केनच्या सूचनेवरुन ग्लॉस्टरशायरने टॉमला काही प्रदर्शनीय सामन्यांत भाग घेण्यासाठी आमंत्रण दिलं. त्या सामन्यांतील त्याचा खेळ पाहून अनेकजण प्रभावित झाले होते.

चार्ली बार्नेट हा ग्लॉस्टरचा अनुभवी ओपनिंग बॅट्समन. टॉमच्या खेळाने प्रभावित झालेल्या बार्नेटने त्याच्या पुढच्या योजनेबद्दल आस्थेने चौकशी केली.

"पुढे काय करायचा विचार आहे तुझा?"
"मला आर्मीतलं आयुष्यं आवडतं! बहुतेक आर्मीतच राहीन!"
"नो! तू खूप चांगला बॅट्समन आहेस! एक उत्तम क्रिकेटर होऊ शकतोस तू!" बार्नेट ठामपणे म्हणाला!

बार्नेटच्या सूचनेवरुन ग्लॉस्टरशायरने टॉमशी प्रोफेशनल खेळाडू म्हणून करार करण्याची तयारी दर्शवली. त्याला वर्षाला २०० पौंड इतकं मानधन देण्यास ग्लॉस्टरशायर तयार होतं! टॉमला खरंतर लष्करी शिस्तीतलं आयुष्य मनापासून पसंत पडलं होतं. परंतु तरीही ग्लॉस्टरची ऑफर त्याने स्वीकारली!

१९४८ च्या मोसमात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीविरुद्ध टॉम ग्रेव्हनीने फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच मॅचमध्ये तो शून्यावर आऊट झाला! सुरवातीच्या काही सामन्यांत त्याची कामगिरी यथातथाच होती, परंतु मोसमाच्या उत्तरार्धात मात्रं त्याने संघातलं आपलं स्थान पक्कं करण्यात यश मिळवलं होतं.

१९४८ च्या त्या मोसमात डॉन ब्रॅडमनच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. ब्रॅडमनच्या जोडीला या संघात अनेक धुरंधर खेळाडू होते. लिंड्से हॅसेट, आर्थर मॉरीस, सिड बार्न्स, इयन जॉन्सन, डॉन टॅलन, सॅम लॉक्स्टन, पोरसवदा नील हार्वे आणि ते दोन जबरदस्तं बॉलर्स - रेमंड रसेल लिंडवॉल आणि कीथ मिलर! संपूर्ण दौर्‍यात एकही मॅच न गमावणार्‍या या संघाला यथार्थ नाव पडलं...

द इन्व्हिन्सिबल्स!

तिसर्‍या अ‍ॅशेस टेस्टपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियनांच्या ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या मॅचमध्ये टॉम ग्रेव्हनी १२ व्या खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर ग्लॉस्टरचे खेळाडू मैदानात उतरले. ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये ही बातमी कळवण्याची जबाबदारी आली ती टॉमवर. हॅसेटला टॉमने ही सूचना दिल्यावर मॉरीस आणि बार्न्स बॅटींगला निघाले. हॅसेट त्यांना म्हणाला,

"We don't want this fellow - Goddard."

टॉम गोडार्ड हा कौंटीमध्ये गाजलेला ऑफस्पिनर होता. त्या मोसमात त्याने आतापर्यंत २३८ विकेट्स काढल्या होत्या. तिसर्‍या टेस्टसाठी त्याचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं!

आर्थर मॉरीस आणि विशेषतः सॅम लॉक्स्टन यांनी गोडार्डवर पद्धतशीरपणे हल्ला चढवला! मॉरीसने २९० तर लॉक्स्टनने नाबाद १५९ रन्स तडकावल्या! नील हार्वे (९५) आणि कॉलिन मॅक्कूल (७६) यांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले! ७ विकेट्सच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल ७७४ रन्स ठोकून काढल्या आणि ग्लॉस्टरला २७९ आणि १३२ मध्ये गुंडाळून टाकलं!

टॉम गोडार्डच्या ३२ ओव्हर्समध्ये १८६ रन्स झोडपून काढण्यात आल्या!

गोडार्डच्या नावावर अर्थातच सिलेक्टर्सनी फुली मारली!

तरूण टॉमवर या घटनेचा खूप प्रभाव पडला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ती जिगर आणि निष्ठूरपणा त्याने पुरेपूर आत्मसात केला!

१९४९ च्या मोसमात टॉम ग्रेव्हनीने १७८४ रन्स फटकावल्या. १९५० चा मोसमही त्याला चांगला गेला होता. इंग्लंडच्या सिलेक्टर्समध्ये त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली होतीच! लेन हटन आणि डेनिस कॉम्प्टनच्या जोडीला चांगल्या बॅट्समनच्या शोधात असलेल्या इंग्लिश सिलेक्टर्सनी १९५१ मध्ये दक्षिण आफ्रीकेविरुद्ध मँचेस्टरच्या दुसर्‍या टेस्टमध्ये जखमी कॉम्प्टनच्या जागी टॉम ग्रेव्हनीची वर्णी लावली. पहिल्या इनिंग्जमध्ये टॉमने १५ रन्स काढल्या, परंतु कॉम्प्टन परतल्यावर पुढल्या मॅचमधून त्याला डच्चू देण्यात आला! ग्रेव्हनीचं टेक्नीक कमजोर आहे असं सिलेक्टर्सचं मत पडलं!

अर्थात हार मानेल तो टॉम ग्रेव्हनी कसला!

ग्लॉस्टरला परतल्यावर इंग्लिश टीममध्ये परत यायचंच या जिद्दीने पेटलेल्या ग्रेव्हनीने समोर येईल त्या टीमची धुलाई करण्यास सुरवात केली! १९५१ चा काऊंटी मोसम संपेपर्यंत त्याने २२९१ रन्स ठोकून काढल्या होत्या! अर्थातच भारताच्या दौर्‍यासाठी त्याची निवड झाली!

मुंबईच्या दुसर्‍या टेस्टमध्ये १७५ रन्स ठोकल्यावर कलकत्त्याच्या तिसर्‍या टेस्टमध्ये त्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. दोन्ही वेळेला व्यवस्थित सेटल झाल्यावर (२४ आणि २१) रमेश दिवेचाने त्याला चकवलं होतं! कानपूरच्या चौथ्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये विनू मंकडने त्याची दांडी गुल केली. चौथ्या इनिंग्जमध्ये इंग्लंडला विजयासाठी फक्तं ७६ रन्स आवश्यक होत्या. मंकडने रिचर्ड स्पूनरला बोल्ड करुन इंग्लंडला सुरवातीलाच हादरवलं होतं, परंतु तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या ग्रेव्हनीने आक्रमक पवित्रा घेत ४८ रन्स फटकावल्या. त्यात ९ चौकार होते! इंग्लंडने ८ विकेट्सनी ती मॅच आरामात जिंकली!

पाचवी टेस्ट मद्रासला होती. या टेस्टमध्ये मात्रं विनू मंकड आणि गुलाम अहमद यांच्यापुढे लॉसन, रॉबर्ट्सन, स्पूनर, कार, वॉटकिन्स, ग्रेव्हनी कोणाचंच काही चाललं. नाही! विनू मंकडने मॅचमध्ये १२ विकेट्स उडवल्या!

भारताने इंग्लंडचा इनिंग्ज आणि ८ रन्सनी दणदणीत पराभव केला!
टेस्ट क्रिकेटमध्ये भारताने मिळवलेला हा पहिला विजय!

'फटकेबाजी' या क्रिकेटवरील आपल्या कार्यक्रमात या मॅचचं वर्णन करताना शिरीष कणेकरांनी आपल्या आजोबांची एक फर्मास आठवण सांगितली आहे, लहानग्या नातवाने एक बॅट्समन बाद झाल्याची बातमी धावत येऊन सांगितल्यावर एरवी सतत 'पुढचं ऐकून ये!' असं खेकसणारे आजोबा रिलॅक्स होऊन म्हणाले,

"गेला का ...! महा हलकट माणूस!"

हा महा हलकट माणूस म्हणजे टॉम ग्रेव्हनी!

अर्थात महा हलकट हे शेलकं विशेषण त्यांनी ग्रेव्हनीला लावलं होतं ते त्याचा दुर्दम्य आशावाद, खेळावरील हुकूमत, झुंजार वृत्ती आणि कमालीचा चिवटपणा यासाठी!

लेन हटनच्या मते ग्रेव्हनी आक्रमक फटकेबाजीच्या मोहात पडून आपली विकेट गमावणारा उतावळा बॅट्समन होता! १९५३ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना इंग्लंड १४३ / १ अशा सुस्थितीत होते. टी टाईमनंतर ग्रेव्हनीने आक्रमक पवित्रा घेतला होता. ऑस्ट्रेलियन बॉलर्सची दमछाक झाल्याचा फायदा घेत दिवसभराचा खेळ संपण्यापूर्वी शतक पूर्ण करण्याचा त्याचा इरादा होता! परंतु हटनने ग्रेव्हनीला आक्रमक पवित्रा घेण्यास सक्तं मनाई केली!

दिवसाच्या उरलेल्या तासाभरात केवळ ३४ रन्स निघाल्या!

दुसर्‍या दिवशी सकाळी ताज्यातवान्या ऑस्ट्रेलियन बॉलर्सपुढे हटन आणि ग्रेव्हनी दोघंही एकही रनची भर न घालता आऊट होऊन परतले!

इंग्लंडने सिरीज जिंकून अ‍ॅशेस परत मिळवल्यामुळे याची फारशी चर्चा झाली नव्हती!

१९५३-५४ च्या वेस्ट इंडीजच्या दौर्‍यातही हाच प्रकार झाला!

पोर्ट ऑफ स्पेनच्या टेस्टमध्ये ग्रेव्हनीने सलत तीन बाऊंड्री मारत आक्रमक सुरवात केली होती. परंतु हटनने त्याला फटकेबाजीला मुरड खालण्याचं बजावलं!

"You have to grind this out!"

पॅव्हेलियनमधून हटनने त्याला निरोप पाठवला आणि वर कॉम्प्टनलाही ग्रेव्हनीला वेसण घालण्याची सूचना केली! कॉम्प्टन परतल्यावर आलेल्या स्पूनरलाही ग्रेव्हनीला बजावण्याची आठवण देण्यास हटन विसरला नाही! टी टाईमनंतर हटनच्या अतिबचावात्मक खेळण्याच्या सूचनेमुळे ग्रेव्हनी ९२ वर आऊट झाला!

१९५४-५५ च्या अ‍ॅशेसमध्ये तर हटनने अति आक्रमकपणामुळे ग्रेव्हनीला दोन टेस्टमधून वगळलं होतं! सिडनीच्या शेवटच्या टेस्टमध्ये हटन लवकर आउट झाल्यावर ग्रेव्हनीने हटनच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि लिंडवॉल, मिलर, अ‍ॅलन डेव्हीडसन, इयन जॉन्सन, रिची बेनॉ या सगळ्यांची धुलाई करत १५७ बॉलमध्ये १११ रन्स फटकावल्या!

या इनिंग्जमध्ये ग्रेव्हनी ८५ वर असताना, कीथ मिलरच्या एका ओव्हरमधे त्याने लागोपाठ ती बाऊंड्री मारल्या. ९७ वरुन त्याची सेंच्युरी पूर्ण व्हावी म्हणून मिलरने त्याला लेगस्टंपवर हाफ व्हॉली टाकली, परंतु त्याचा फायदा उठवण्यात तो अपयशी ठरल्यावर मिलरने पुढचा बॉलही लेगस्टंपवर हाफ व्हॉलीच टाकला! यावेळी मात्रं ग्रेव्हनीने त्याचा योग्य फायदा घेतला!

मिलरच्या या दिलदारपणाबद्द्ल ग्रेव्हनी कायम कृतज्ञ राहिला! तो म्हणतो,
"It was a different game in those days and sometimes you did someone a favour. Keith Miller once did me a favour when I opened with Hutton in Australia. After I got to 85, I drove him for three fours and then he bowled a slow long hop down leg side after I had missed a similar one the previous ball, to get me to the hundred. He was a great man, a great friend."

हटनच्या मते ग्रेव्हनीची ही इनिंग फारशी महत्वाची नव्हती, कारण इंग्लंडने आधीच अ‍ॅशेस जिंकल्या होत्या!

१९५५ ची दक्षिण आफ्रीकेविरुद्धची सिरीज मात्रं ग्रेव्हनीला अगदीच सपक गेली. १९५६ च्या अ‍ॅशेस मध्ये पहिल्या दोन टेस्ट्सनंतर त्याला नारळ देण्यात आला! नंतरच्या दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठीही त्याची निवड करण्यात आली नाही!

ग्रेव्हनीची त्यावर प्रतिक्रीया मासलेवाईक होती.
"Beating the Chairman of selectors, Gubby Allen in a round of gold had cost me tour to South Africa!" तो विनोदाने उद्गारला!

ग्लॉस्टरशायरला परतल्यावर काऊंटीमध्ये ग्रेव्हनी जोरदार फॉर्मात आला. १९५७ सालच्या काऊंटी मोसमातही त्याने सर्वाधिक रन्स फटकावल्या होत्या! इंग्लंडला ग्रेव्हनीकडे अधिक दुर्लक्षं करणं आता शक्यं नव्हतं. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सिरीजमध्ये ग्रेव्हनी पुन्हा इंग्लिश संघात परतला.

... आणि लॉर्ड्सच्या पहिल्या टेस्टमध्ये रॉय गिलख्रिस्टच्या बॉलवर एलबीड्ब्ल्यू झाला!

शून्यावर!

स्वत: ग्रेव्हनीच्या मते त्याच्या जोरदार फॉर्मबरोबर आणखीन एक गोष्टं याला कारणीभूत होती!

डग् इन्सोल हा एमसीसीचा व्हाईस कॅप्टन होता. चांगल्यापैकी बॅट्समन असलेल्या इन्सोलला सनी रामाधिनचा एकही बॉल खेळता येत नव्हता! रामाधिनने अनेकदा त्याचा अक्षरश: मामा केला होता! एजबॅस्टनच्या पहिल्या टेस्टनंतर इन्सोलने सिलेक्टर्सची भेट घेऊन त्यांना सांगितलं,

"Don't pick me if [Sonny] Ramadhin's playing!"

नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज ग्राऊंडवर झालेल्या दुसर्‍या टेस्टमध्ये मात्रं ग्रेव्हनीने लॉर्डसचं अपयश धुवून काढलं!

गिलख्रिस्ट, अ‍ॅटकिन्सन, सनी रामाधिन, आल्फ व्हॅलेंटाईन, गॅरी सोबर्स, कॉली स्मिथ आणि फ्रँक वॉरेल या सगळ्यांचा समर्थपणे मुकाबला करत ग्रेव्हनीने २५८ रन्स फटकावल्या! त्यात ३० दणदणीत बाउंड्रीजचा समावेश होता! पीटर रिचर्ड्सन (१२६) बरोबर २६६ आणि पीटर मे (१०४) बरोबर २०७ रन्सची पार्टनरशीप त्याने उभारली! अखेर कॉली स्मिथचा बॉल ड्राईव्ह करण्याच्या नादात तो बोल्ड झाला!

(वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी कार अ‍ॅक्सीडेंटमध्ये ज्याचा दुर्दैवी अंत झाला तोच हा कॉली स्मिथ).

गॅरी सोबर्स म्हणतो,
"Tom was unstoppable! We tried everything that was possible but he was bloody brilliant!"

लीड्सच्या तिसर्‍या टेस्टमध्ये ग्रेव्हनीच्या हाती फारसं काही लागलं नाही, परंतु ओव्हलच्या चौथ्या टेस्ट्मध्ये त्याने पुन्हा एकदा वेस्ट इंडीजची यथेच्छ पिटाई करत १६४ रन्स फटकावल्या! इंग्लंडने ४१२ पर्यंत मजल मारल्यावर वेस्ट इंडीजला ८९ आणि ८६ मध्ये गुंडाळलं! सोबर्सचा अपवाद वगळता वॉरेल-वीक्स-वॉलकॉट हे तीन 'डब्ल्यूज्', रोहन कन्हाय कोणालाही टोनी लॉकचा मुकाबला करता आला नाही! लॉकने तब्बल ११ विकेट्स काढल्या!

वेस्ट इंडीज विरुद्ध दणदणीत पुनरागमन केल्यावर १९५८ च्या न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमध्ये मात्रं ग्रेव्हनी साफ अपयशी ठरला! १९५९ च्या अ‍ॅशेस दौर्‍यात आणि त्याला जोडून असलेल्या न्यूझीलंडच्या दौर्‍यातही त्याच्या हाती काहीच लागलं नाही. याचा परिणाम अपेक्षितच होता! ग्रेव्हनीची पुन्हा एकदा हकालपट्टी झाली!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि पत्रकार जॅक फिंगल्टनच्या मते ग्रेव्हनीचा खेळकर स्वभाव एमसीसीच्या ढुढ्ढाचार्यांना पसंत पडत नव्हता! त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता! फिंगल्टनचं हे मत फारसं चुकीचं नसलं, तरी ग्रेव्हनीच्या खेळात आतापर्यंत सातत्यं असं नव्हतंच!

ग्लॉस्टरशायरला परतल्यावर ग्रेव्हनी एका नवीन वादात सापडला!

१९५९ च्या मोसमात ग्लॉस्टरशायरने ग्रेव्हनीची कॅप्टन म्हणून नेमणूक केली होती. परंतु ग्लॉस्टरशायरची कामगिरी मात्रं अगदीच खालावली. १९६० मध्ये ग्रेव्हनीला कॅप्टनपदावरुन हटवून टॉम पगची नेमणूक झाली. वास्तविक पगचं रेकॉर्ड अगदीच सुमार होतं. तो कॅप्टन नसता तर टीममध्येही राहिला नसता असं 'टाईम्स' ने जाहीरपणे छापलं होतं! ग्रेव्हनीची कॅप्टन म्हणून नेमणूक करतानाच १९६० मध्ये त्याच्या जागी टॉम पगची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला गेला होता हे समजल्यावर ग्रेव्हनीने ग्लॉस्टरशायर सोडून वूस्टरशायरची वाट धरली!

परंतु...

ग्लॉस्टरशायरशी असलेल्या त्याच्या काँट्रॅक्टमध्ये मध्येच काउंटी सोडून गेल्यास वर्षभर दुसर्‍या कोणासाठीही खेळण्यास बंदी घालणारं एक कलम होतं! परिणामी १९६१ चं संपूर्ण वर्ष ग्रेव्हनी घरी बसून होता!

१९६२ च्या कौंटी मोसमात ग्रेव्हनी जोरदार फॉर्मात होता. वूस्टरशायरकडून खेळताना त्याने खोर्‍याने रन्स काढल्या होत्या. परिणामी तीन वर्षांनी पुन्हा त्याला एमसीसीने आवतण दिलं! पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्ये बर्मिंगहॅमला (एजबॅस्टन) त्याची सेंच्युरी थोडक्यात हुकली (९७) असली तरी लॉर्ड्सला १५३ रन्स ठोकून काढत त्याने त्याची पुरेपूर भरपाई केली! लीड्सच्या अपयशानंतर पुन्हा ओव्हलवर त्याने सेंच्युरी ठोकली होती! आतातरी तो संघात कायमची जागा निर्माण करेल अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा अ‍ॅशेसमधल्या अपयशामुळे त्याच्यावर सिलेक्टर्सची कुर्‍हाड कोसळली!

वूस्टरशायरला परतल्यावर ग्रेव्हनी पुन्हा फॉर्ममध्ये आला! १९६४ मध्ये वूस्टरशायरने प्रथमच काऊंटी चँपियनशीप जिंकली त्यात ग्रेव्हनीचा सिंहाचा वाटा होता! याच मोसमात त्याने आणखीन एक पराक्रम केला!

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १०० शतकं काढण्याचा!
दुसर्‍या महायुद्धानंतर असा पराक्रम करणारा तो पहिलाच बॅट्समन होता!

त्या प्रसंगाचं वर्णन करताना तो म्हणतो,

"In the match in which I became the 15th batsman to 100 first-class hundreds, when I was on 99, Keith Andrew said from behind the stumps, "You don't want us to give it to you, do you?" I would have loved to have said yes. David Larter had bowled a very good over and ended it with a bouncer, which I went to pull only to get a bottom edge. It bounced over short leg and I ran a quick single!"

१९६५ मध्ये पुन्हा वूस्टरशायरनेच काऊंटीचं जेतेपद राखलं. यावेळी ग्रेव्हनीच जेतेपदाचा शिल्पकार होता! त्याच्या जोडीला होता त्याचा जिगरी दोस्त आणि पुढे क्रिकेटमधल्या एका अत्यंत वादग्रस्तं प्रकरणाचं नायकत्वं ज्याच्या कपाळी लिहीलं होतं तो बेसिल डॉलिव्हिएरा!

१९६६ मध्ये गॅरी सोबर्सच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजची टीम इंग्लंडच्या दौर्‍यावर होती. स्वतः सोबर्स, कॉनरेड हंट, रोहन कन्हाय्, बेसिल बुचर, सेमुर नर्स असे एकापेक्षा एक महारथी बॅट्समन टीममध्ये होतेच, पण खरी धडकी भरवणारे होते ते दोन बॉलर्स - वेस्ट हॉल आणि चार्ली ग्रिफीथ!

पहिली टेस्ट वेस्ट इंडीजने आरामात जिंकल्यावर इंग्लंडला आठवण झाली ती गेली तीन वर्ष जोरदार फॉर्मात असलेल्या टॉम ग्रेव्हनीची!

ग्रेव्हनी एव्हाना ३९ वर्षांचा झाला होता. सलग तीन वर्षे खोर्‍याने रन्स काढूनही सिलेक्टर्सनी त्याच्याकडे काणाडोळा केल्यामुळे पुन्हा इंग्लिश संघात आपली निवड होईल याची त्याला अपेक्षाच नव्हती! तो म्हणतो,

"I was the best batsman between 1964 and 1966, but the selectors just would not pick me up! When the England recall came in 1996, it came totally out of the blue!"

वेस्ट इंडीजच्या सपोर्टर्सनाही ग्रेव्हनीची निवड अनपेक्षीतच होती! लॉर्ड्सच्या टेस्टमध्ये तो खेळायला आला तेव्हा प्रेक्षकांपैकी एकाने ओरडून विचारलं,

"Heh, Graveney, haven't they got a pension scheme in this country?"

लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये - तीन वर्षांनी पुनरागमन करताना - ग्रेव्हनीने पहिल्या इनिंगमध्ये ९६ रन्स फटकावल्या. वेस्ट हॉलचा चेंडू कट् करण्याच्या नादात विकेटकीपर डॉन अ‍ॅलनने त्याचा कॅच घेतला. परंतु ही टेस्ट गाजवली ती गॅरी सोबर्स (१६३*) आणि डेव्हीड हॉलफोर्ड (१०५*) यांच्या २७३ रन्सच्या पार्टनरशीपने!

ट्रेंटब्रीजच्या तिसर्‍या टेस्टमध्ये मात्रं ग्रेव्हनीने सेंच्युरी पूर्ण केली. १३ / ३ अशा अवस्थेतून ग्रेव्हनी आणि कॉलिन कौड्री यांनी १६९ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडची इनिंग्ज सावरली. या १६९ मधल्या १०९ रन्स ग्रेव्हनीच्या होत्या! हे दोघं परतल्यावर बेसिल डॉलिव्हिएराच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने पहिल्या इनिंग्जमध्ये लीड घेतला खरा, परंतु नंतर बेसिल बुचर (२०९) आणि सोबर्स (९४) यांनी इंग्लिश बॉलिंगची यथेच्छ धुलाई करत इंग्लंडपुढे ३९३ रन्सचं टार्गेट ठेवलं! जेफ बॉयकॉट (७१), ग्रेव्हनी (३२), कौड्री (३२) आणि डॉलिव्हिएरा (५४) यांच्याव्यतिरिक्त कोणालाच काही करता न आल्याने वेस्ट इंडीजने आरामात टेस्ट जिंकली!

लीड्सच्या चौथ्या टेस्टमध्ये मात्रं वेस्ट इंडीजने इंग्लंडला पूर्णपणे नामोहरम केलं! सेमुर नर्स (१३७) आणि सोबर्स (१७४) यांच्या २६५ रन्सच्या पार्टनरशीपच्या जोरावर वेस्ट इंडीजने ५०० रन्सची मजल मारली! इंग्लंडला दोन्ही इनिंग्ज मध्ये मिळून साडेचारशे रन्सही करता आल्या नाहीत! इंग्लंडतर्फ पहिल्या इनिंग्जमध्ये डॉलिव्हिएरा (८८) आणि केन हिग्ज (४९) आणि दुसर्‍या इनिंग्जमध्ये बॉब बार्बर (५५) आणि कॉलिन मिलबर्न (४२) यांच्याव्यतिरिक्त कोणीही हॉल-ग्रिफिथ-सोबर्स-गिब्ज यांच्यापुढे उभं राहू शकलं नाही. ग्रेव्हनीने दोन्ही इनिंग्ज मिळून २५ रन्स केल्या!

वेस्ट इंडीजने सिरीजमध्ये ३-० अशी आघाडी घेतली होती!
ओव्हलची पाचवी टेस्टही जिंकण्याची सोबर्सची इर्ष्या होती!

इंग्लिश सिलेक्टर्सवर चहूबाजूंनी टीकेचं मोहोळ उठलं होतं! तातडीचा उपाय म्हणून सिलेक्टर्सनी कॉलिन कौड्रीच्या जागी कॅप्टन म्हणून वर्णी लावली ती काऊंटी जिंकणार्‍या यॉर्कशायरच्या यशस्वी कॅप्टनची!

ब्रायन क्लोज!

पाचव्या टेस्टच्या आधी आपल्या सहकार्‍यांशी बोलताना क्लोज म्हणाला,

"I shouldn't be here if we hadn't made such a mess of the series. What's more, neither would a few of you. You are here because you are all fighters, and we are going to keep the pressure on and keep it on for five days."

रोहन कन्हाय (१०४) आणि सोबर्स (८१) यांच्या १२१ रन्सच्या पार्टनरशीपमुळे वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये २६८ रन्स केल्या. मात्रं वेस्ट इंडीजला इतक्या कमी रन्समध्ये रोखल्याचा इंग्लंडचा आनंद व्यर्थच ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बॉयकॉट (४) लवकर परतल्यावर बार्बर (३६) आणि जॉन एड्रीच (३५) यांनी इंग्लंडला ७२ पर्यंत नेलं, हे दोघे लागोपाठ परतल्यावर ग्रेव्हनीने डेनिस एमिससह ४१ रन्स जोडल्या, पण एमिस (१७) आऊट झाल्यावर इंग्लंडची घसरगुंडी उडाली! डॉलिव्हिएरा (४), क्लोज (४) आणि इलिंगवर्थ (३) एकापाठोपाठ एक परतल्यामुळे इंग्लंडची अवस्था १६६ / ७ अशी झाली होती!

टॉम ग्रेव्हनी मात्रं एका बाजूने ठामपणे उभा होता!
त्याच्या जोडीला आला विकेटकीपर जॉन मरे!

वेस् हॉल आणि चार्ली ग्रिफीथचे बॉल भयानकरित्या उडत होते!
दोघांच्या जोडीला गॅरी सोबर्सही होता!
या तोफखान्यापासून जरा उसंत मिळाली तर ऑफस्पिनर लान्स गिब्ज आणि लेगस्पिनर डेव्हीड हॉलफोर्ड!

ग्रेव्हनीला मात्रं कशाचीच पर्वा नव्हती!

हॉल आणि ग्रिफीथला डेड बॅटने डिफेन्सिव खेळून कॅच देण्यापेक्षा ठोकून काढण्याचा त्याने पवित्रा घेतला होता! दोघांच्याही तुफानी वेगात आलेल्या शॉर्टपीच बॉल्सना तो बिनदिक्कतपणे फ्रंटफूटवर येत हूक आणि पूल करत होता! त्याचा परिणाम म्हणून लेंग्थवर आलेल्या बॉलवर त्याचा तो जगप्रसिद्ध कव्हर ड्राईव्ह!

जॉन मरे म्हणतो,

"Tom’s batting that afternoon was sheer artistry! Just like an artist uses his brush on the canvas, he was using his bat and the runs kept flowing! I consider myself so lucky for having best seat!"

दिवसभराचा खेळ संपला तेव्हा ग्रेव्हनी १३२ वर नॉटआऊट होता!
जॉन मरेने ग्रेव्हनीला समर्थपणे साथ देत ८१ पर्यंत मजल मारली होती! इंग्लंड ३३० / ७ !

"Bloody brilliant!" ग्रेव्हनी आणि मरे पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर ब्रायन क्लोज उद्गारला!

२१७ रन्सच्या पार्टनरशीपनंतर ग्रेव्हनी रनआऊट झाला तेव्हा त्याने १६५ रन्स काढल्या होत्या, तर जॉन मरे १०७ वर खेळत होता! मरे आऊट झाल्यावर केन हिग्ज (६३) आणि जॉन स्नो (५९) यांनी शेवटच्या विकेटसाठी १२८ रन्सची पार्टनरशीप करत वेस्ट इंडीजच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम पूर्ण केलं!

सेमूर नर्स (७०) आणि बेसिल बुचर (६०) यांच्याव्यतिरिक्त कोणालाच स्नो-इलिंगवर्थ-बार्बर यांच्यासमोर उभं राहणं जमलं नाही! वेस्ट इंडीजला दुसर्‍या इनिंग्जमध्ये जेमतेम सव्वादोनशे रन्स करता आल्या!

इंग्लंडने इनिंग्ज आणि ३४ रन्सनी मॅच जिंकली!

कॅप्टन ब्रायन क्लोजच्या आक्रमकपणाला यशाची जोड दिली ती टॉम ग्रेव्हनीच्या अफलातून खेळीने आणि जॉन मरेबरोबरच्या त्याच्या पार्टनरशीपने!

वेस्ट इंडीज विरुद्धच्या या सिरीजनंतर ग्रेव्हनी इंग्लिश संघात स्थिरावला!

१९६७ मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर आलेल्या भारतीय संघाविरुद्ध लीड्सची पहिली टेस्ट गाजवली ती मात्रं बॉयकॉटने! तब्बल साडेनऊ तासात २४६ रन्स काढणार्‍या बॉयकॉटने केन बॅरिंग्टन (९३), ग्रेव्हनी (५९) आणि डॉलिव्हिएरा (१०९) यांच्याबरोबर भल्यामोठ्या पार्टनरशीप्स उभारत इंग्लंडला साडेपाचशेची मजल मारुन दिली! फरुख इंजिनिअर (४२) आणि पतौडी (६४) यांचा अपवाद वगळता कोणीच काही करु न शकल्याने भारताची पहिली इनिंग्ज १६४ वर आटपली! फॉलो ऑन करताना इंजिनिअर (८७), अजित वाडेकर (९१), हनुमंत सिंग (७३) आणि पतौडी (१४८) यांच्यामुळे भारताने ५१० रन्स केल्या, परंतु पराभव टाळणं भारताला शक्यं झालं नाही!

लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्ये मात्रं ग्रेव्हनीने वचपा काढलाच!

जॉन स्नो - डेव्हिड ब्राऊन - डॉलिव्हिएरा यांच्यासमोर भारताची इनिंग्ज दीडशेमध्ये आटपली! एड्रीच (१७), एमिस (२९, इंग्लंड ७९/२) तसे लवकर परतल्यामुळे इंग्लंडला लवकर गुंडाळण्याची पतौडीला आशा वाटत होती. परंतु...

टॉम ग्रेव्हनी!

बेदी - चंद्रा - प्रसन्ना यांची मनसोक्त धुलाई करत ग्रेव्हनीने बॅरिंग्टन (९७) सह ७६ आणि डॉलिव्हिएरा (३३) सह १२२ रन्सची पार्टनरशीप उभारली! अखेर बेदीच्या बॉलवर इंजिनिअरने त्याला स्टंप केलं तेव्हा २० बाऊंड्री आणि २ सिक्सर्ससह त्याने १५१ रन्स झोडपल्या होत्या!

भारताची दुसरी इनिंग्ज ११० मध्ये संपुष्टात आली! बुधी कुंदरनचा अपवाद वगळता रे इलिंगवर्थला खेळणं कोणालाच जमलं नाही!

(या मॅचमध्ये कुंदरन केवळ बॅट्समन म्हणून खेळला होता! दिलीप सरदेसाई जखमी असल्यामुळे दुसर्‍या इनिंग्जमध्ये इंजिनिअर - कुंदरन असे दोन विकेटकीपर्स सलामीला आले होते!)

बर्मिंगहॅमच्या तिसर्‍या टेस्टमध्ये मात्रं ग्रेव्हनी लवकर आऊट झाला होता. भारतापाठोपाठ आलेल्या पाकिस्तानविरुद्धही तो चांगलाच फॉर्ममध्ये होता. मात्रं लॉर्ड्स (८१) आणि ओव्हल (७७) दोन्ही टेस्टमध्ये चांगली सुरवात करुनही तो शतक गाठण्यात अपयशी ठरला.

१९६८ च्या वेस्ट इंडीजच्या दौर्‍यात पोर्ट ऑफ स्पेनच्या पहिल्याच टेस्टमध्ये पुन्हा एकदा हॉल - ग्रिफीथ - सोबर्स - गिब्ज यांना फटकावून काढत त्याने ११८ रन्स फटकावल्या, परंतु उरलेल्या चारही टेस्ट्समध्ये त्याच्या हाती काहीच लागलं नाही. त्याच वर्षी अ‍ॅशेस सिरीजमध्ये मँचेस्टर आणि लॉर्ड्सला तो लवकर बाद झाल्यावर त्याला ड्रॉप करण्याबद्दल सिलेक्टर्समध्ये मतमतांतरं होती, परंतु बर्मिंगहॅमच्या तिसर्‍या टेस्टमध्ये आक्रमक ९६ रन्स फटकावत त्याने टीकाकारांची तोंडं बंद केली! ओव्हलच्या पाचव्या टेस्टमध्ये त्याने ६३ रन्स काढल्या खर्‍या, परंतु या सिरीजमध्येही तो शतकापासून दूरच होता!

ओव्हलची ही टेस्ट सुरू असतानाच क्रिकेटच्या इतिहासातील एका कुप्रसिद्ध प्रकरणाला हळूहळू रंग चढू लागला होता..

डॉलिव्हिएरा अफेअर!

वर्णभेदी दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाणार्‍या संघातून ओव्हल टेस्टमध्ये दीडशे रन्स फटकावणार्‍या डॉलिव्हिएराला वगळण्यात आल्याची बातमी जाहीर झाली तेव्हा ग्रेव्हनी आणि डॉलिव्हिएरा ससेक्सविरुद्धच्या मॅचमध्ये खेळत होते! डॉलिव्हिएरा नुकताच १२८ रन्स काढून परतला होता. रेडीओवरील बातमी ऐकल्यावर उध्वस्तं झालेल्या डॉलिव्हिएराला कसाबसा आधार देत ग्रेव्हनीने त्याला ड्रेसिंग रुम बाजूच्या खोलीत आणलं, तेव्हा डॉलिव्हिएराच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती!

"गोर्‍या दक्षिण आफ्रीकनांना हरवणं कोणालाही शक्यं नाही टॉम!" डॉलिव्हिएअरा विशादाने जिवलग मित्रं असलेल्या ग्रेव्हनीला म्हणाला!

एमसीसीच्या या निर्णयावर सडकून टीका झाली यात काहीच आश्चर्य नव्हतं!

ग्रेव्हनी एव्हाना इंग्लिश क्रिकेटमधला अत्यंत सिनीयर आणि आदरणीय बॅट्समन झाला होता. त्याने एमसीसीच्या या निर्णयावर सडकून टीका केली. कॅप्टन कॉलिन कौड्रीला पत्रं लिहून त्याने आपली नाराजी स्पष्टं शब्दांत व्यक्तं केली. इतकंच नव्हे तर डॉलिव्हिएराची निवड न केल्यास आपल्या नावाचाही दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी विचार करु नये असं त्याने कौड्रीला खडसावलं! इतकंच नव्हे तर सिलेक्शन कमिटीचा चेअरमन आणि भूतपूर्व इंग्लिश फास्ट बॉलर अ‍ॅलेक बेडसरलाही सुनावण्यास त्याने कमी केलं नाही!

(टॉम कार्टराईटने माघार घेतल्यावर अखेर डॉलिव्हिएराची निवड झाली. दक्षिण आफ्रीकन सरकारने त्याला खेळू देण्यास सक्तं विरोध दर्शवल्यावर दक्षिण आफ्रीकेला क्रिकेटमधून हद्दपार करण्यात आलं ते १९९१-९२ पर्यंत!)

दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्द झाल्यामुळे घाईघाईने एमसीसीने पाकिस्तानचा दौरा आयोजित केला!

१९६९ मध्ये पाकिस्तानात असलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे (बांग्लादेशाची स्वातंत्र्याची मागणी) ग्रेव्हनी पाकिस्तानच्या दौर्‍यावर येण्यास तसा नाखूशच होता. लाहोरच्या पहिल्या टेस्टमध्ये इन्तिखाब आलमच्या बॉलिंगवर त्याला संशयास्पद रितीने कॅचआऊट दिल्यामुळे तो अधिकच वैतागला! पाकिस्तानी अंपायर्सच्या जगप्रसिद्ध 'चिकीखाऊ'पणाचे त्याने जाहीर वाभाडे काढले! अगोदरच इंग्लिश संघाविरोधात असलेल्या वातावरणात ग्रेव्हनीच्या जाहीर वक्तव्यामुळे आणि वेळोवेळी त्याने पाकिस्तानातील सुरक्षेबद्दल उपस्थित केलेल्या शंकांमुळे भरच पडली होती!

ढाक्क्याची दुसरी टेस्टही कमालीच्या संथ बॅटींगमुळे ड्रॉ झाली! पहिल्या इनिंग्जमध्ये ग्रेव्हनीने ४६ रन्स काढल्या त्या अवघ्या तासाभरात, परंतु परवेज सज्जादचा बॉल कट् करण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला! या टेस्टच्या दरम्यान मैदानात हुल्लडबाजी करणार्‍या प्रेक्षकांवर त्याने टीकेची झोड उठवली!

खरा कळस झाला तो कराचीच्या तिसर्‍या टेस्ट्मध्ये!

कॉलिन कौड्रीने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर कॉलिन मिलबर्न आणि जॉन एड्रीचने ७८ रन्सची सलामी दिली. एड्रीच बाद झाल्यावर मिलबर्न आणि ग्रेव्हनी यांनी १५६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर दुसर्‍या दिवशी आसिफ मसूदच्या बॉलवर वासिम बारीने मिलबर्नचा (१३९) कॅच घेतला. ग्रेव्हनी आणि कौड्रीने ५२ रन्सची भर घातली, परंतु ते खेळत असताना अनेकदा प्रेक्षकांच्या दगडफेकीमुळे आणि हुल्लडबाजीमुळे मॅचमध्ये व्यत्यय येत होता. लंच नंतरतर कीथ फ्लेचरच्या कमालीच्या कूर्मगती बॅटींगला वैतागलेले काही प्रेक्षक मैदानात धावून आले, परंतु त्यांचा खरा रोख होता तो टॉम ग्रेव्हनीवर!

हुल्लडबाज प्रेक्षकांना आवरणं मैदानात आलेल्या पोलिसांना आणि पाकिस्तानी खेळाडूंना कठीण जात होतं. दंगेखोरांपैकी दोघंजण ग्रेव्हनीच्या अंगावर धावून गेले...

ग्रेव्हनीने काय करावं?
हातातल्या बॅटचा योग्य तो वापर करत त्याने दोघांचेही पार्श्वभाग सडकून काढले!

शांतता प्रस्थापित झाल्यावर अखेर ग्रेव्हनीने आपली ११ वी सेंच्युरी पूर्ण केली! १०५ रन्स काढल्यावर इंतिखाब आलमच्या बॉलवर आसिफ इक्बालने त्याचा कॅच घेतला!

तिसर्‍या दिवशी प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा कहर झाला!

इंग्लंडने आपली इनिंग्ज डिक्लेअर करावी अशी बहुधा पाकिस्तानी प्रेक्षकांची अपेक्षा असावी. कौड्रीने मात्रं इनिंग्ज डिक्लेअर करण्याचा विचार केला नव्हता! त्याचा हिशोब सरळ होता. पहिल्या दोन्ही टेस्ट ड्रॉ झाल्यावर तिसरी टेस्ट गमावण्यास त्याची तयारी नव्हती. दुसर्‍या दिवशी आधीच जवळपास ३० ओव्हर्स वाया गेल्या होत्या, त्यामुळे तिसर्‍या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा अ‍ॅलन नॉट आणि जॉन स्नो बॅटींगला उतरले!

भडकलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकांनी लंचपर्यंत कसंबसं थोपवून धरण्यात पोलिसांनी यश मिळवलं...
परंतु अखेर कितीतरी हुल्लडबाज प्रेक्षक मैदानात घुसलेच!

बेभानपणे मैदानात आलेल्या या प्रेक्षकांनी स्टंप्स उखडून फेकल्या!
अनेकांनी पीचवर धिंगाणा घालण्यास सुरवात केली!
काहीजण तर चक्कं कुदळ आणि फावडी घेऊन आले होते!
त्यांनी पीचचा काही भाग खणून आणि उखडून टाकला!

केवळ सुदैवानेच एकही पाकिस्तानी खेळाडू आणि नॉट आणि स्नो नंतर आलेला डेव्हिड ब्राऊन काहीही इजा न होता बचावले होते!

अ‍ॅलन नॉट ९६ रन्सवर नॉटआऊट होता!
पहिल्या टेस्ट सेंच्युरीपासून केवळ ४ रन्सनी मागे!

इंग्लंडला परतल्यावर पाकिस्तानी प्रेक्षकांच्या पार्श्वभागावर फटके देण्याबद्दल कोणीतरी छेडल्यावर ग्रेव्हनी उत्तरला,

"They were the two best strokes I made on the whole tour!"

पाकिस्तानहून परतल्यावर ग्रेव्हनी एका वादात सापडला.

१९६९ हा ग्रेव्हनीचा बेनिफीट सिझन होता. वूर्सेस्टरशायरने त्याच्या मदतीसाठी अनेक महत्वपूर्ण मॅचेसचं आयोजन केलं होतं. यातलीच एक महत्वाची मॅच होती ती म्हणजे भूतपूर्व ऑस्ट्रेलियन कॅप्टन बॉबी सिम्प्सनच्या एका टीमविरुद्धची - टॉम ग्रेव्हनी ११ विरुद्ध बॉबी सिम्प्सन ११! ही मॅच नेमकी वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या रेस्ट डे ला होती! टेस्ट मॅचमध्ये खेळत असलेल्या ग्रेव्हनीने ही मॅच खेळू नये असं बहुतेक सर्व सिलेक्टर्सचं आणि विशेषत: चेअरमन अ‍ॅलेक बेडसरचं ठाम मत होतं!

या मॅचमधून ग्रेव्हनीला किमान १००० पौंडांची प्राप्ती होणार होती! वूर्सेस्टरशायरकडून प्रोफेशनल खेळाडू म्हणून त्याला वर्षाला ८५० पौंड मिळत होते! अर्थातच ग्रेव्हनीच्या दृष्टीने ही मॅच महत्वपूर्ण होती. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या इनिंग्जमध्ये ७६ रन्स फटकावल्यावर ठरल्याप्रमाणे ग्रेव्हनीने या मॅचमध्ये भाग घेऊन अप्रतिम ८० रन्स काढल्या!

अ‍ॅलेक बेडसर आणि इतर सिलेक्टर्सनी अर्थात ग्रेव्हनीवर टीकेची झोड उठवली! ग्रेव्हनीला ही मॅच खेळू नये अशी आपण अगोदरच सूचना दिली असल्याचा बेडसरने दावा केला. ग्रेव्हनीने त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या दृष्टीने ही मॅचचं महत्वं विषद करतानाच वाटल्यास वेस्ट इंडीजविरुद्ध टेस्टमध्ये आपला विचार करण्यात येऊ नये असं आपण आधीच सिलेक्टर्सना कळवलं होतं असं स्पष्टपणे ठणकावलं!

बेडसर आणि सिलेक्टर्सनी ग्रेव्हनीवर ३ टेस्ट्सची बंदी घातली!

४२ व्या वर्षी ही बंदी घातली गेल्यावर ग्रेव्हनीची टेस्ट करीअर अर्थातच संपल्यात जमा होती!

ग्रेव्हनी पुढे १९७० पर्यंत वूर्सेस्टरशायरसाठी खेळत होता! १९७१ च्या मोसमात तो ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँडसाठी खेळला, परंतु आता वयोमानपरत्वे त्याच्या हालचाली - विशेषतः फिल्डींग मंदावली होती!

१९७२ मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमधून ग्रेव्हनी रिटायर झाला तेव्हा त्याने ४७७९३ रन्स फटकावल्या होत्या! त्यात १२२ सेंच्युरी होत्या! दोन वेगवेगळ्या काऊंटीसाठी दहा हजाराच्यावर रन्स काढणारा तो एकमेव बॅट्समन आहे!

१९७७ मध्ये ग्रेव्हनीने बीबीसीबरोबर क्रिकेट कॉमेंट्रीला सुरवात केली! त्यानंतर १९९४ - ९८ या काळात तो वूर्सेस्टरशायरचा प्रेसिडेंट होता. २००४ मध्ये एमसीसीच्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली! अशी निवड होणारा तो पहिलाच 'प्रोफेशनल' खेळाडू होता.

सुप्रसिद्ध क्रिकेट लेखक आणि समिक्षक नेव्हिल कार्डस म्हणतो,

"If everything disappeared from this earth with only Tom Graveney left, I could reconstruct the game from the way he played and he behaved!"

स्वतः ग्रेव्हनीला मात्रं हे मंजूर नव्हतं!

"माझ्या खेळण्याच्या पद्धतीचा विचार करता कार्डसने अतिशयोक्ती केली हे स्पष्टंच आहे! मी कधीच बॅकफूटवर खेळलो नाही! इजिप्तच्या सिमेंटच्या विकेट्सवर प्रत्येक बॉल फ्रंटफूटवर खेळण्याची मला सवय लागली! अगदी हॉल आणि ग्रिफीथविरुद्ध खेळतानाही मी फ्रंटफूटवरच हुक आणि पूलचे शॉट्स खेळत असे! आता विचार केला तर एखादा बॉल लागून माझं टाळकं फुटलं कसं नाही याचंच आश्चर्य वाटतं!" ग्रेव्हनी प्रांजळपणे उद्गारला!

केन बॅरिंग्टन म्हणतो,

"Tom was the most elegant batsman I have ever come across in my life! He never hit the ball too hard. He just timed it so perfectly that it simply run away! His batting was simply poetic! I have never ever seen a better cover drive than Tom’s!"

स्वतः ग्रेव्हनीचं मत मात्रं वेगळंच होतं!

"In recent years, Michael Vaughan had a wonderful cover drive, so did Rahul Dravid, but for me Wally Hammond's was the best!"

वयाच्या ८८ व्या वर्षी आपल्या भावाच्या - केनच्या - पाठोपाठ अवघ्या पंधरा दिवसात ख्रिस्तवासी झालेल्या टॉम ग्रेव्हनीला श्रद्धांजली वाहताना टाईम मासिकाने म्हटलं आहे,

"He was one of the game's great stylists; a batsman whose name became synonymous with elegance and whose perfectly executed cover drive will live long in the memory of those who saw it!""

टॉम ग्रेव्हनीला श्रद्धांजली!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

11 Nov 2015 - 6:30 am | चाणक्य

आवडला हे वेगळं सांगायची गरज नाहीच्चे. तुमचा लेख आवडतोच नेहमी

बहुगुणी's picture

11 Nov 2015 - 7:58 am | बहुगुणी

आवडला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Nov 2015 - 8:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान लिहिलयं.

माम्लेदारचा पन्खा's picture

11 Nov 2015 - 9:57 am | माम्लेदारचा पन्खा

खूप मोठा माणूस.....!"

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 10:02 am | बोका-ए-आझम

टाॅम ग्रॅव्हनीच्या कव्हर ड्राईव्हसारखा लेख!

एक एकटा एकटाच's picture

11 Nov 2015 - 1:06 pm | एक एकटा एकटाच

जबरदस्त लेख

अजिंक्य विश्वास's picture

11 Nov 2015 - 1:42 pm | अजिंक्य विश्वास

कणेकरांच्या क्रिकेट-वेध आणि फटकेबाजी नंतर इतके सशक्त व्यक्तिचित्रण क्वचितच वाचायला मिळाले आहे.
दिवाळीच्या ह्या सुरेख भेटीबद्दल धन्यवाद!

स्वप्नज's picture

11 Nov 2015 - 4:11 pm | स्वप्नज

सहमत.

श्रीगुरुजी's picture

11 Nov 2015 - 2:38 pm | श्रीगुरुजी

मस्त लेख! खूप नवीन माहिती मिळाली. टॉम ग्रेव्हनी बद्दल पूर्वी फारसे वाचले नव्हते. आज त्याच्या निमित्ताने इतरही बरीच माहिती मिळाली.

पैसा's picture

14 Nov 2015 - 5:20 pm | पैसा

त्या काळात इतका आक्रमक खेळणारा खेळाडू किती लोकप्रिय असेल याची कल्पनाच करवत नाही!