अखेर चंद्रास्तं झाला!
कधी ना कधी तरी हे होणारच होतं म्हणा! तशी चिन्हं तर गेल्या वर्षभरापासून दिसत होती. पण तरीही कुठेतरी असं वाटत होतं की हे चंद्राला लागलेलं तात्पुरतं ग्रहण आहे. आजवर अनेकदा अशा छाया-प्रकाशाच्या खेळातून तो तावून-सुलाखून बाहेर पडला होता. त्याला ते अजिबात अशक्यं नव्हतं! प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजूबाजूला फडफडणार्या मिणमिणत्या दिव्यांच्या तुलनेत ग्रहण लागलेला चंद्र कधीही श्रेयस्कर, कारण कधी ना कधी तरी तो छायेतून बाहेर येऊन पुन्हा एकदा तो पूर्ण तेजाने तळपून उठेल अशी किमान आशा तरी करता येते!
काळ ही अशी एक गोष्टं आहे जी कधीही कोणासाठी थांबत नाही. क्रिकेटसारख्या खेळात तर नाहीच नाही! आजकालचे खेळाडू तर जेमतेम एक-दोन सिरीज खेळल्यावर काही ना काही कारणाने जायबंदी होऊन टीमबाहेर जातात आणि मग कधी आत कधी बाहेर असा त्यांचा सतत खेळ सुरु राहतो. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टीव्ह फिन हे याचं मूर्तिमंत उदाहरण! अशा परिस्थितीत वीसपेक्षा जास्तं वर्ष इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विलक्षत सातत्याने खेळत राहणं आणि रन्स काढत राहणं आणि आपला फिटनेस राखणं हे येरागबाळ्याचं काम नाही! टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर गेल्या तीस-चाळीस वर्षांत एक सचिन तेंडुलकरच अपवाद वगळता (त्यालाही टेनिस एल्बोने छळलंच!) हे साध्यं झालेला एकमेव खेळाडू म्हणजे शिवनारायण चँडरपॉल!
१९९४ च्या मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध चँडरपॉल आपली पहिली टेस्ट खेळला तेव्हा तो फक्तं १९ वर्षांचा होता! गयानाच्या या तरुण बॅट्समनची वेस्ट इंडीज संघातली निवड ही काहीशी अनपेक्षितच होती. परंतु आपल्या पहिल्याच इनिंग्जमध्ये ६२ रन्स फटकावत ती चुकीची नव्हती हे त्याने सप्रमाण सिद्धं केलं! पोर्ट ऑफ स्पेन, ब्रिजटाऊन इथल्या दोन्ही टेस्टमध्येही त्याने अर्धशतक झळकावलं, पण त्याच्यातला पेशन्स दिसून आला तो अँटीगाच्या पाचव्या टेस्टमध्ये!
अँड्र्यू कॅडीक, अँगस फ्रेझर, क्रिस लुईस, फिल टफनेल यांची साफ कत्तल करत ब्रायन लारा वर्ल्ड रेकॉर्ड ३७५ रन्स फटकावत असताना लाराप्रमाणेच फटकेबाजीच्या मोहात न पडता शांत डोक्याने स्ट्राईक रोटेट करत तो एका बाजूला ठामपणे उभा होता! लाराबरोबर २२१ रन्सच्या त्याच्या पार्टनरशीपमुळेच लाराला वर्ल्ड रेकॉर्ड फटकेबाजी करता आली असं म्हटलं तर ते फारसं चुकीचं ठरु नये, कारण त्याच्यानंतर केवळ विकेटकिपर ज्युनियर मरे आणि अॅम्ब्रोज, दोन बेंजामिन आणि वॉल्श हे बॅट्समन बाकी होते!
कोणत्याही लेफ्टहँड बॅट्समनला रन्स काढण्याच्या दृष्टीने सर्वात आवडता प्रतिस्पर्धी संघ कोणता असं विचारलं तर ९९% बॅट्समन नि:संशयपणे एकच नाव घेतील ते म्हणजे भारत! अगदी लॉईड, कालीचरण, डेव्हीड गावर, अॅलन बॉर्डर, सनथ जयसूर्या, सईद अन्वर, जिमी अॅडम्स, अँडी फ्लॉवर ही काही चटकन आठवणारी नावं! (त्यातल्यात्यात लाराच भारताविरुद्ध टेस्टमध्ये तुलनेने कमी यशस्वी झाला! त्याच्या ३० पैकी केवळ २ शतकं भारताविरुद्धं आहेत!). चँडरपॉलतरी याला कसा अपवाद ठरणार? भारतीय बॉलिंगचा खरपूस समाचार घेत त्याने अखेर आपलं पहिलं शतक झळकावलं ते १९ व्या टेस्टमध्ये!
सुरवातीच्या काळात अनेकदा त्याच्या फिटनेसबद्द्ल प्रश्नचिन्हं उभं राहत होतं. विशेषतः वन डे मध्ये त्याचा फिटनेस कमी पडतो आहे आणि तो कमजोर आहे असं वेस्ट इंडीजच्या अनेक कोचचं मत होतं! वन डे मध्ये स्ट्राईक रोटेट करण्यात त्याला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी अनेकदा त्याच्यावर वन डे साठी अनफीट असा शिक्का मारला गेला! त्यातच ब्रायन लाराच्या छायेत खेळत असल्यामुळे सुरवातीच्या काही वर्षांत तो बर्याच अंशी झाकोळलाही गेला. अर्थात त्या दरम्यान त्याच्या स्वत:च्या खेळात असलेला सातत्याचा अभाव आणि शतकांचा दुष्काळ याला तितकाच कारणीभूत होता. २००० पर्यंतच्या ३७ टेस्ट्समध्ये त्याने केवळ दोन वेळा शतकी मजल मारलेली होती! इतर कोणत्याही देशात इतक्या बेभरवशाच्या खेळाडूला कधीच डच्चू मिळाला असता, परंतु वेस्ट इंडीज क्रिकेटची तेव्हाची अवस्था अशी होती की लाराच अपवाद वगळता आणि काही प्रमाणात जिमी अॅडम्स वगळता किमान पन्नास रन्स करणारे बॅट्समनही दुर्मिळ होते!
२००० मध्ये त्याच्या पायावर करण्यात आलेल्या ऑपरेशन मध्ये त्याच्या पायातून हाडाचा तुकडा (फ्लोटींग बोन) काढण्यात आला. यानंतर मात्रं त्याच्या खेळात बर्यापैकी सातत्यं दिसून येऊ लागलं. अर्थात अद्यापही शतक झळकावणं त्याला जमत नव्हतं, पण तो सातत्याने पन्नाशी पार करुन जाऊ लागला होता!
एखादा खेळाडू फॉर्मसाठी झगडत असेल तर त्यासाठी भारतासारखा प्रतिस्पर्धी शोधून सापडणार नाही असं अनेकदा म्हटलं जातं! भारतीय बॉलिंगच्या मर्यादा पाहता ती वस्तुस्थिती आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही. २००२ मध्ये वेस्ट इंडीजच्या दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाने चँडरपॉलच्या शतकांचा दुष्काळ संपवला! भारताविरुद्धच्या त्या सिरीजमध्ये त्याने चार टेस्ट्समध्ये ३ शतकं झळकावली!
त्यानंतर मात्रं त्याने मागे वळून पाहिलं नाही!
१९९४ मध्ये वेस्ट इंडीजच्या संघात चँडरपॉलची निवड झाली होती ती एक आक्रमक आणि फटकेबाज बॅट्समन म्हणून! सुरवातीच्या या काळात ड्राईव्ह आणि पूलचे शॉट्स मारत तो मिड-ऑफ ते मिड-विकेट या 'व्ही' च्या पट्ट्यात खेळत असे. अर्थात या काळातही त्याला आऊट करणं हे सोपं नव्हतं! परंतु वेस्ट इंडीजच्या बॅटींगला लागलेली उतरती कळा आणि ब्रायन लारा रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीज बॅटींगची खांद्यावर येऊन पडलेली जबाबदारी यामुळे त्याने आपल्या आक्रमक खेळाला मुरड घातली! अर्थात त्यानंतरही त्याच्या रन्स काढण्याच्या सातत्यात तसूभरही फरक पडला नाही! बॉलचा अँगल आणि वेग याचा कमालीच्या चाणाक्षपणे वापर करत ऑफ आणि लेगला बॉल 'पुश' करुन तो पूर्वीइतक्या सातत्याने आणि पूर्वीपेक्षाही जास्तं सुरक्षितपणे रन्स काढत राहीला!
वेस्ट इंडीजची अवस्था ५० / ४ अशी झाली आहे आणि त्यातून सावरुन त्यांनी २५०-३०० रन्स काढल्या आहेत आणि चँडरपॉल ८०-९० किंवा १०० वर रन्स काढून नॉटआऊट आहे हे दृष्यं नंतर अनेकदा दिसून आलं!
चॅंडरपॉलच्या बॅटींगचं एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याचं बेल्स पीचमध्ये ठोकून गार्ड घेणं! पूर्वीच्या काळी बॉल खेळून झाल्यावर दोन ओव्हर्सच्या दरम्यान आणि अनेकदा दोन बॉल्सच्या दरम्यान बेल्सना हात लावण्याची सवय असलेला अॅलन नॉटसारखा खेळाडू जगाने पाहिला होता, पण गार्ड घेण्यासाठी बेल्स पीचमध्ये ठोकणं हा प्रकार सर्वस्वी नवीन होता! बेल्स पीचमध्ये ठोकून गार्ड घेण्याची त्याची पद्धत पुढे रामनरेश सरवानपासून कायरन पोलार्डपर्यंत अनेकांनी वापरली!
परंतु चँडरपॉल बॅटींग करत असताना सर्वात विस्मयकारक म्हणजे त्याचा तो बॅटींग स्टान्स!
सुरवातीच्या काळात चँडरपॉल सर्वसाधारण लेफ्टहँड बॅट्समनप्रमाणेच साईड-ऑन स्टान्सने खेळत असे. पण हळूहळू त्याने जाणिवपूर्वक त्यात बदल केला. विशेषतः २००० मध्ये पायाच्या ऑपरेशननंतर त्याचा स्टान्स जास्तीत जास्तं 'ओपन' होत गेला. अर्थात हा बदल सोपा नव्हता, यामागची नेट्समधली अपार मेहनत होती. आपल्या स्टान्समधल्या या बदलाबद्दल तो म्हणतो,
"When I started, I was very side-on but would work across the crease and struggle for balance, I gradually began to open up as I found I could balance a little better."
नंतरच्या काळात तर हा स्टान्स इतका 'ओपन' झाला की स्टान्स घेताना त्याचे दोन्ही पाय हे क्रीजला समांतर न राहता क्रीजशी काटकोनात राहू लागले! या स्टान्समधून बॉल खेळण्यासाठी किंवा सोडून देण्यासाठी पोझीशनमध्ये येणं ही तर अतिशय कठीण बाब, पण त्याला ते सहज जमत होतं!
मार्क निकोलस त्याच्या स्टान्सबद्दल एकदा म्हणाला होता,
"It started as a little tadpole, developed into crab and now has grown into full scaled lobster!"
मार्क निकोलसने व्यक्तं केलेलं मत म्हणजे जगभरातील क्रिकेट रसिकांचं प्रातिनिधीक मतंच होतं जणू! चँडरपॉलचा स्टान्स पाहिल्यावर एकच प्राणी आठवू शकत होता तो म्हणजे खेकडा!
या खेकड्याच्या नांगीने जगभरातील बॉलर्सना वर्षानुवर्ष घायाळ केलं!
स्वत:ची विकेट न गमावता आणि जेमतेम हातात बॅट धरता येणार्या बॉलर्सना बरोबर घेऊन अनेकदा तो वेस्ट इंडीजचा पराभव टाळण्यासाठी मैदानात झगडत राहिला! कधी अयशस्वी झाला तर कधी यशस्वी, पण त्याच्या प्रयत्नात कधीही कसूर दिसून आली नाही! त्याच्या जवळपास सगळ्या करीयरमध्ये आणि शेवटच्या दहा-बारा वर्षांत वेस्ट इंडीजविरुद्ध जिंकणं हे तुलनेने बरंच सोपं असलं तरी चँडरपॉलला गुंडाळणं महाकर्मकठीण झालं होतं!
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटींग चँडरपॉलबद्दल बोलताना एकदा म्हणाला होता,
"We could never work out how to dismiss him!"
शेन वॉर्नच्या मते तर,
"He is a bloke you needed to crowbar away from the crease.”
परंतु सर्वात भन्नाट कॉमेंट होती ती ८० च्या दशकातला ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर रॉडनी हॉगची. हॉग म्हणतो,
"If Chanderpaul had a live grenade in his pocket or a runaway train up his chaminda he would still leave the next delivery outside his off-stump!”
आता असा खडूस आणि चिकट बॅट्समन बॉलिंगवर तुटून पडतो आहे, ते देखील टेस्ट क्रिकेटमध्ये हे दृष्यं कल्पनेतही डोळ्यांसमोर आणता येईल का?
परंतु शेवटी सत्य हे अनेकदा कल्पिताहूनही अद्भुत अस्तं हेच खरं!
२००३ मध्ये जॉर्जटाऊन गयानाच्या आपल्या होम ग्राऊंडवर वेस्ट इंडीजची ४८ / ४ (आणि लगेच ५३ / ५!) अशी अवस्था असताना ब्रेट ली, जेसन गिलेस्पी, अँडी बिकेल, ब्रॅड हॉग, स्टुअर्ट मॅकगिल यांची मनसोक्तं धुलाई करत त्याने ६९ बॉलमध्ये शतक फटकावलं! त्यात १५ बाऊंड्री आणि २ सिक्सचा समावेश होता!
खेकड्याच्या नांगीचा असाच फटका श्रीलंकेला एकदा वन डे मध्ये बसला!
शेवटच्या दोन बॉलमध्ये १० रन्स हव्या असताना पहिल्या बॉलवर बाऊंड्री आणि दुसर्या आणि मॅचच्या शेवटच्या बॉलवर सिक्स मारुन वेस्ट इंडीजसाठी मॅच जिंकणारा चँडरपॉलच होता!
वेस्ट इंडीजच्या पडत्या काळात आणि लाराच्या राजिनाम्यानंतर काही काळ चँडरपॉल वेस्ट इंडीजचा कॅप्टनही झाला. परंतु हा काळ त्याच्यादृष्टीने बराच तणावपूर्ण गेला. तो म्हणतो,
"It was a very difficult period for me. As captain, I wasn't getting any support. A lot of things were happening on the field. I'd come to the ground worrying how I was going to deal with these things and I couldn't focus on my own game."
अखेर याची परिणीती त्याने कॅप्टनपदाचा राजीनामा देण्यात झाली! अर्थात कॅप्टन चँडरपॉलपेक्षा बॅट्समन चँडरपॉल वेस्ट इंडीजच्या दृष्टीने अमूल्यं होता!
गेल्या वर्षाभरात मात्रं या चंद्राला हळूहळू ग्रहण लागण्यास सुरवात झाली होती. दक्षिण आफ्रीका आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या सहा टेस्टमधील ११ इनिंग्जमध्ये मिळून त्याने फक्तं १८३ रन्स काढल्या. त्यातच एव्हाना चाळीशी उलटली होती. अर्थात अजूनही त्याच्यात तितकीच जिगर आणि तोच चिवटपणा पुरेपूर ठासून भरलेला होता, पण एव्हाना त्याने चाळीशी ओलांडली होती! वय हा महत्वाचा फॅक्टर त्याच्या विरोधात जाणारा होता! अर्थात त्यानंतरही तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळत होता. गयानाच्या टीममध्ये तर तो आपला मुलगा तेगनारायण याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या तोडीसतोड खेळत होता!
याच काळात कधी नव्हे तो चँडरपॉलचा रुद्रावतार पाहण्यास मिळाला. अर्थात याल कोच ओटीस गिब्सन जास्तं कारणीभूत होता. जेमतेम २ टेस्ट्स खेळलेल्या गिब्सनने दीडशेच्यावर टेस्ट्स खेळलेल्या चँडरपॉलच्या बॅटींगविषयी आणि कमिटमेंटविषयी शंका घेणं म्हणजे कावळ्याने गरुडाच्या भरारी घेण्याच्या क्षमतेविषयी शंका घेण्यासारखंच होतं! चँडरपॉलने गिब्सनला पत्रकारांसमोर सुनावणं यात काहीच आश्चर्याचं किंवा चुकीचं नव्हतं!
उत्कृष्टं बॅट्समन उत्कृष्टं कॅप्टन असतोच असं नाही असं अनेकदा म्हटलं जातं. त्याचबरोबर उत्कृष्ट कॅप्तन आणि बॅट्समन हा उत्कृष्ट अॅडमिनीस्ट्रेटर असतोच असं नाही याचं वेस्ट इंडीज क्रिकेटमधलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे क्लाईव्ह लॉईड! अनेक अतार्कीक आणि चमत्कारीक निर्णय घेणार्या लॉईडच्य सिलेक्शन कमिटीने इंग्लंडविरुद्धच्या सिरीजनंतर चँडरपॉलला ड्रॉप केलं. बावीस वर्षांत वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी खस्ता खाणार्या खेळाडूला सन्मानपूर्वक निरोप देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नसावा! अर्थात वेस्ट इंडीजच्या भवितव्यात काहीच फरक पडला नाही, कारण पुढच्या सात टेस्ट्समध्ये त्यांच्या नशिबी दारूण पराभवच आला!
१९९० च्या दशकानंतर सुरु झालेल्या वेस्ट इंडीजच्या पडत्या काळात जगभरातील बॉलर्सची डोकेदुखी ठरलेला चँडरपॉल आपल्याच सिलेक्टर्सपुढे अखेर हताश झाला. काळाची पावलं ओळखून अखेर त्याने निवृत्ती स्वीकारली, पण जोपर्यंत क्रिकेटचा खेळ आहे, मैदानावर आणि टीव्हीवर मॅच पाहणारे लाखो-करोडो प्रेक्षक आहे, तोपर्यंत चँडरपॉल आणि त्याचा तो खेकडा-स्टान्स विसरणं हे निव्वळ अशक्यं आहे!
शिवनारायण चँडरपॉलच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा!
दोन्ही फोटोज इसपीएनक्रिकइन्फोवरून साभार.
*****************************************************************************************
जाता जाता -
माझं एक क्रिकेट स्वप्नं आहे. एका टीममध्ये ११ बॅट्समन आणि एका टीममध्ये अकरा बॉलर्स अशी एक मॅच व्हावी. ही मॅच टाईमलेस असावी आणि रन्स काढण्यापेक्षाही आऊट न होता जास्तीतजास्तं किती वेळ आणि बॉल्स बॅट्समन खेळून काढू शकतात आणि किती कमीतकमी वेळात बॉलर्स त्यांना गुंडाळू शकतात यावर मॅचचं यशापयश अवलंबून असावं.
बॅट्समनचा संघ - जेफ बॉयकॉट, क्रिस टावरे, राहुल द्रविड, शिवनारायण चँडरपॉल, ट्रेव्हर बेली, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, हनिफ महंमद, जिमी अॅडम्स, अँडी फ्लॉवर आणि केन बॅरिंग्टन!
बॉलर्सचा संघ - हॅरॉल्ड लारवूड, मायकेल होल्डींग, डेनिस लिली, अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, अॅलन डेव्हीडसन, वासिम अक्रम, शेन वॉर्न, बिशनसिंग बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना!
कोण जिंकेल?
अकरा बॅट्समनना आऊट करणं अकरा बॉलर्सना जमेल का?
प्रतिक्रिया
27 Jan 2016 - 1:05 am | श्रीरंग_जोशी
शिवनारायण चंदरपॉल (भारतीय उच्चारानुसार :-)) या गुणी खेळाडूच्या कारकिर्दीचा उत्तम आढावा आपण घेतला. अनेक धन्यवाद.
लेखाच्या शेवटची कल्पना खूपच रोचक आहे. खरंच एकदा असं काही (सध्याचे उत्कॄष्ट फलंदाज वि. सध्याचे उत्कृष्ट गोलंदाज) झालं तर खूप मजा येईल.
27 Jan 2016 - 2:45 am | खटपट्या
बॅट्समनच्या संघात सुनील गावस्कर पाहीजे होता असे वाटते.
27 Jan 2016 - 11:39 am | टवाळ कार्टा
हेच्च लिहिणार होतो....आणि बॉलर्समध्ये कबुतर (ग्लेन मॅक्ग्रा)
27 Jan 2016 - 11:39 am | टवाळ कार्टा
आणि मुरली :)
27 Jan 2016 - 9:24 am | उगा काहितरीच
लेख आवडला. वेस्ट इंडीजचे काही खेळाडू त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे काहीसे झाकोळले गेलेत. चंदरपॉल त्यापैकीच एक. त्याच्या स्टान्स बद्दल तर लहानपणापासून कुतूहल वाटत होत. (बॕट हातात घेऊन असं उभं राहून पहा अॉफला शॉट मारणे जवळजवळ अशक्य असते) शेवटची बॕट्समन आणी बॉलर यांचा मॕच ही कल्पना मस्तच आहे. पण त्यात लक्ष्मण आणी सचिन पाहीजेत.
27 Jan 2016 - 10:07 am | चौकटराजा
अनेक वेळा पलिकडे पडझड चालू असताना त्याने विन्डीजला सावरल्याचे स्मरते. सलाम !
वरील सामन्यात बोलर जिन्कतील असे म्हणालो असतो पण चन्द्राला बेदीला अनेक वेळा पिटलाय ! मुरलीधरन माकल्म मार्शल आवडले असते तिथे.
27 Jan 2016 - 2:47 pm | नाखु
फलंदाज धार्जीणे नियम आहेत तोपर्यंत तरी हे बोलर जिंकणार नाहीत.
27 Jan 2016 - 11:34 am | तुषार काळभोर
यापेक्षा चांगलं नाव लेखाला असूच शकत नाही.
चंदरपॉल कदाचित त्या शैलीचा व त्या पिढीचा शेवटचा खेळाडू असावा.
भारतात जे स्थान द्रविडचे, ते मागच्या १०-१५ वर्षात वेस्टइंडीजसाठी चंदरपॉलचे होते.
27 Jan 2016 - 11:40 am | चांदणे संदीप
शिवनारायण चंदरपॉल म्हटले की फक्त हेच शब्द आठवतात...
R . E . S . P . E . C . T .
___/\___
Sandy
27 Jan 2016 - 12:17 pm | जगप्रवासी
मला सर्वात जास्त त्याची भावणारी गोष्ट म्हणजे डोळ्याखाली वेस्ट इंडिज देशाचा असलेला स्टिकर, स्वतःच्या देशाबद्दल असलेला त्याचा पराकोटीचा अभिमान. छान लेख
27 Jan 2016 - 12:46 pm | नया है वह
27 Jan 2016 - 1:21 pm | बेकार तरुण
आवडला लेख
27 Jan 2016 - 5:12 pm | अजया
मस्त लेख.खरं तर क्रिकेट फारसा आवडीचा विषय नाही.पण स्पार्टा काय लिहितोय बघू करत वाचला आणि आवडला लेख!
27 Jan 2016 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगलं लिहिलंय. ब्याट्समनचा संघ आणि बॉलरचा संघ पटला नाही. अर्थात पसंद अपनी ख़याल अपना. :)
-दिलीप बिरुटे
27 Jan 2016 - 6:22 pm | भंकस बाबा
बॉलर मधे वकार यूनुस हवा(टो क्रशर),बेदी ,प्रसन्ना अनुकूल खेळपट्टीवर चालतील. पाट्यावर बॉयकॉट व् द्रविड़ त्यांचा घाम काढतील.
27 Jan 2016 - 8:08 pm | स्पार्टाकस
सर्वांचे आभार!
बॅट्समन विरुद्ध बॉलर्सच्या मॅचमध्ये बॉलर्सच्या संघात मॅकग्राथचा समावेश करणं मलाही आवडलं असतं. परंतु मॅकग्राथचं प्रमुख अस्त्रं हे त्याची लाईन-लेंग्थ आणि अचूकता हे होतं आणि मॅकग्राथच्या तुलनेत अँडी रॉबर्ट्स हा जास्तं अचूक आणि व्हेरीएशन्स असलेला बॉलर होता असं माझं मत आहे. (He would make you play 95% of the balls - गावस्कर). तसंच होल्डींग आणि गार्नर हे यॉर्करचे गुरु असताना वकार नसला तरी फारसा फरक पडत नाही. पाच राईटआर्म फास्ट बॉलर्स असल्यामुळे जॉन स्नो, रे लिंडवॉल, कीथ मिलर, इमरान, हॅडली, कपिल, बोथम या टीममध्ये नाहीत. बेदीला मार पडला तो पाकिस्तानविरुद्धच्या एकाच सिरीजमध्ये आणि ऑन एनी डे मुरलीपेक्षा प्रसन्ना आणि वेंकट हे उत्कृष्टं ऑफस्पिनर्स आहेत असं माझं मत! बॅट्समनच्या टीममध्ये निव्वळ विकेटवर उभं राहणं आणि बॉलर्सना दमवणं हेच एकमेव काम असल्याने गावस्कर, सचिन, लारा, ब्रॅडमन, मॅकेब, सोबर्स, लक्ष्मण असे स्र्ट्रोक प्लेअर्स नाहीत.
27 Jan 2016 - 9:22 pm | प्रचेतस
प्रसन्ना, वेंकट पेक्षा सुभाष गुप्ते खूपच उच्च दर्जाचा लेगस्पिनर होता असे क्रिकेटमधील दिग्गजांचे मत आहे..अगदी महान लेगस्पिनर शेन वार्नपेक्षाही सरस.
27 Jan 2016 - 8:19 pm | मुक्त विहारि
नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख...
27 Jan 2016 - 8:31 pm | भंकस बाबा
गावस्कर स्ट्रोक प्लेयर?
27 Jan 2016 - 8:37 pm | भंकस बाबा
माझ्या माहितिप्रमाणे गावस्कर व् द्रविड़ हे दोनच भारतीय फलदांज बॉउंसेर खेळण्यात तंत्रशुद्ध होते. त्यात गावस्कर जास्त. कारण त्याने वेस्ट इंडिजच्या सुवर्णकालात त्यांच्या विकेटवर पाय रोवून फलंदाजी केलि होती.
27 Jan 2016 - 8:43 pm | स्पार्टाकस
मोहींदर अमरनाथला कसे विसरलात हो?
28 Jan 2016 - 8:58 am | बेकार तरुण
+१
27 Jan 2016 - 9:57 pm | पैसा
छान लेख! चंदरपॉलच्या कारकीर्दीचा चांगला आढावा घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या पडत्या काळात पुढे आल्याने याची कारकीर्द नीट फुलली नाही असे वाटते.
28 Jan 2016 - 8:23 am | अत्रुप्त आत्मा
सुंदर लेख..
28 Jan 2016 - 10:08 am | सुहास झेले
जबरा... मस्त आढावा :) :)
29 Jan 2016 - 12:40 pm | श्रीगुरुजी
मस्त लेख! विंडीजच्या सध्याच्या संघातही एकापेक्षा एक तगडे खेळाडू आहेत. परंतु संघ म्हणून खेळताना त्यांची कामगिरी एकदम झाकोळते. चंद्रपाल हा बराचसा एकांडा शिलेदार होता. तब्बल २१ वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. परंतु त्याला म्हणावे तेवढे महत्त्व मिळाले नाही.
29 Jan 2016 - 8:34 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,चंद्रास्त हे शीर्षकही आवडले,
स्वाती
31 Jan 2016 - 6:22 pm | अभिजीत अवलिया
उत्तम लेख. लहान असताना मात्र खूप राग यायचा चंदरपॉलचा. कारण त्याचा तो भारताविरुद्धचा चिवट खेळ. अक्षरश: रडू यायचे मला तो आउट व्ह्यायचा नाही म्हणून. पण एक अतिशय गुणी खेळाडू होता. जसा राहुल द्रविड सचिनमुळे थोडाफार झाकोळला गेला तसेच काहीसे लारामुळे चंदरपॉलचे झाले असे वाटत राहते.