शिक्षणाच्या आई चा घो !

मीउमेश's picture
मीउमेश in जनातलं, मनातलं
4 Nov 2015 - 8:19 pm

काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते.

शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले.

मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल.

सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी )

दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी.

एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो. बरोबर मुलगी आणि आम्ही दोघ शाळेत पोहचलो.

नमस्कार चमत्कार झाल्यावर लगेच मुद्यावर हात घातला.

टीचर : तुमची मुलगी साधारण आहे, तिच्यात काही असाधारण असं काहीच नाही, तुम्ही दोघा हि सुशिक्षित आहात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या स्पर्धेच्या युगात तुम्ही मुलांना तयार केले पाहिजे, तुमची मुलगी कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेत. जेवढा विचारले जाते तेवढंच उत्तर देते. स्वताहून काही करायला मागत नाही.

मी टीचर शी चर्चा( वादविवाद ) करण्यास सुरुवात करताच बायको नि आम्हालाच तंबी दिली. बरोबर बोलताहेत टीचर. मी उद्या पासून अजून जास्त अभ्यास घेत जाईन.

मला खरच कळत नव्हत मी हसू कि रडू, काय चाललाय हे , ३ वर्षाच्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायच्या. त्यांनी सर्धेत भाग घ्यायचा.

आणि या स्पर्धा म्हणजे कसल्या ड्रोईग आणि स्टोरी टेलिंग, क्राफ्ट आणि बडबड गीते.

या पूर्वी जिंगल स्पर्धेत मुलीने जॉनी जॉनी म्हटलं तर बाई म्हणल्या हि प्ले ग्रुप मधली कविता आहे, नर्सरी ला याहून अधिक आलं पाहिजे.

या पूर्वीच्या मीटिंग मध्ये बाईनी नी सांगितल ज्या मुलांच्या घरात मराठी मध्ये बोललं जातं त्या मुलांना फोनिक्स च्या क्लास ला घाला, त्याचं इंग्लिश लवकर सुधारतं म्हणे, उच्चार स्पष्ट होतात … मग काय लगेच आमच्या सौ गुगल करून कुठे चांगला फोनिक्स क्लास बघून अडमिशन करून आली मुलीसाठी ( फी महिना २२०० ),

मी शाळेत बाकी पालकांसोबत चर्चा केली, सगळी कडे हेच …. मुलांना आता पासूनच आता पासूनच रेस मध्ये पाळण्यासाठी तयार केलं जातंय.

सकाळी शाळा, दुपारी शिकवण्या, संध्याकाळी आई घरी अभ्यास घेणार, शनिवारी ड्रोईग किंवा कत्थक…. सगळ्या पालकांना आपल्या मुलांना सुपरमेन बनवायचं. दहावी बारावी चे निकाल ऐकावे तर ९९% एवढे मार्क एका मुलाला ?? , गरिबाचे दोन तीन पोरं पास होतात तेवढ्या मार्कात.

मला कळतंय स्पर्धेचं युग आहे पण किती आणि कधी पासून…. लहान लहान मुलांचं बालपण हरवत चाललय. काय हा अनाठाई हट्ट, काय साध्य करतोय आपण.

मला आठवतंय मला ५वीत इंग्रजी विषय पहिल्यांदा आला तेव्हा परीक्षेत माय नेम इस उमेश असा लिहिताना may name is umesh असा लिहिल होतं , भोपळा मिळाला होता त्या प्रश्नाला, ५वीत इंग्रजी विषयाला सुरुवात करूनही आमचं काही बिघडलं नाही, ३ वर्षांच्या मुलांकडून काय आणि किती अपेक्षा ठेवायच्या.

३ वर्षाची असताना जर तिला नाही कळाला कि भेंडी ला लेडी फिंगर म्हणतात तर कुठे बिघडलं.शिकेल ती आज नाही तर उद्या, भेंडी ला लेडी फिंगर नाही म्हटलं तरी भेंडीच राहणार, त्याचा बटाटा नाही होणार.

संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत काहीतरी काम करत होतो , कन्या बाहुबली चित्रपट बघत होती , अचानक धावत आली म्हणाली " बाबा बाहुबली नि त्या काकुंचे कपडे काढले " ( चित्रपटात एक गाणं आहे त्यातला काही रोमेंटिक सीन सुरु होता )

मी तिच्या चेहर्याकडे एकटक बघत राहिलो. काय बोलावं काही सुचेना.

माझं मन म्हणत होतं अजून आभाळ फाटायचं बाकी आहे. !!

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

5 Nov 2015 - 12:15 pm | वेल्लाभट

तुमच्या मुलीत असाधारण असे काहीच नाही" हे ठरवायचा अधिकार टीचरला कुणी दिला? तीन वर्षांची मुलगी स्पर्धेत भाग घेत नाही, काहीच करत नाही हे तीला खूप भयावह वाटतंय यात काहीच गंभीर नाही?

बेस्ट बोललात. हेच कळत नाही अनेकांना.

वेल्लाभट's picture

5 Nov 2015 - 12:29 pm | वेल्लाभट

नाही, मला यात तुमचं थोडं बरोबर आणि चूक वाटतं.

सगळे धावतात म्हणून आपल्या मुलाने धावावं, चूक.
असं होत नाही म्हणून शिक्षकांनी आपल्या मुलाला सामान्य ठरवावं, त्यांचा जॉब, पण चूक.
त्यांनी तसं म्हटलं म्हणून तुम्ही पॅनिक होऊन काहीतरी करावं, चूक.

स्पर्धेला मुलांनी घाबरू नये, बरोबर.
पण ती स्पर्धा मुलांना करूदे, तुम्ही त्या स्पर्धेत उतरू नका. आणि न्यूनगंड तर मुळीच नको.

इंग्लिश शाळांमधे, कॉन्व्हेंट, आयबी नि काय काय असलेल्या शाळांमधे मॉंटेसरीत जी प्रोजेक्ट देतात ती कुठलाही मुलगा स्वतःची स्वतः करू शकत नाही अशी असतात. मग पालक बसतात रात्री जागत. एक जण कात्रणं करतो एक मुलाला/मुलीला थोपटतो. हे उदाहरण झालं. तसंच स्पर्धेचं. नसेल त्याला गाणं म्हणायचं... नसूदे. चित्र काढूदे. खेळूदे. त्याला रस असलेल्या गोष्टीत तो स्वतःहून जाईल, ढकलावं लागणार नाही.

जाऊदे मुद्दा खूप मोठा आहे. पण जाता जाता
https://www.facebook.com/MarathiShalaAapanachTikavalyaPaahijet/

इंग्लिश शाळांमधे, कॉन्व्हेंट, आयबी नि काय काय असलेल्या शाळांमधे मॉंटेसरीत जी प्रोजेक्ट देतात ती कुठलाही मुलगा स्वतःची स्वतः करू शकत नाही अशी असतात. मग पालक बसतात रात्री जागत.

अशाच एका पालक मित्राची सहज रिक्वेस्ट आली. ते चित्रकलेवर प्रेझेन्टेशन करुन द्यायचेय. दे की करुन. मी म्हणले कुणासाठी. अर्थात त्यांच्या मुलासाठी. मुलाला सांगा अन शिकवा असे सौम्य शब्दात सांगितले तर काय ते पैसे घे अन करुन दे असा मैत्रीपूर्ण हूकूम आला. मला काय. दिला करुन. चारच दिवसात एकेका पीपीटीला ५००-५०० मोजून देणारे दहा बारा पालक माझ्याकडे आले होते.

अर्थात माझी चित्रकलेची पहीली कमाई अशीच बी एड करणार्‍या मुलांचे तक्ते करुन देऊन झालेली. मास्तरच असे. त्यामुळे आजकाल वाईट वाटत नै. ;)

संदीप डांगे's picture

5 Nov 2015 - 12:58 pm | संदीप डांगे

हा हा हा....

माझी ही पहिली कमाई इंजिनिअर पोरांच्या ड्रॉइंग्स करून झालेली..... मिलाओ हाथ...

अभ्या..'s picture

5 Nov 2015 - 1:06 pm | अभ्या..

हाथ तो मिलेच है संदीपभौ.

पण तेंव्हापासूनच आपल्या कलेच्या जीवावर दुसर्‍यांची टांगटींग (बडेजावला सोलापुरी शब्द) होते. आपल्याला आपल्या कामाचा मोबदला मिळाला की गप्प बसायचे हे शिकलो. ;)

संदीप डांगे's picture

5 Nov 2015 - 1:12 pm | संदीप डांगे

बोलून चालून आपण कमर्शियल आर्टीस्ट. आपल्या कलाकृतीची मदर आपण असलो तर फादर दुसरे असतात. पोरांना फादरचेच नाव लागतं... मदरने वैट वाटून घ्येऊ नये.

सो, रुपिया अंदर इमोशन बाहर....

रातराणी's picture

5 Nov 2015 - 12:34 pm | रातराणी

कठीण आहे हे सगळं.

पिलीयन रायडर's picture

5 Nov 2015 - 12:54 pm | पिलीयन रायडर

माझ्या मुलाचा वय वर्ष २.५ असताना स्पोर्ट्स डे होता.
शनिवारी सकाळी मस्त उन्हात आम्ही एका लॉन वर गेलो. तिथे मुलांनी प्रतिकात्मक मशाल फिरवली. मग वयोगटा प्रमाणे खेळ होते. माझ्या मुलासाठी शिट्टी वाजली की पळायचं आणि समोर जे दोन टब ठेवले आहेत त्यातला एकातुन बॉल काढुन बाजुच्यात टाकायचा, ही स्पर्धा होती. २-३ राऊंड्स नंतर कुणीतरी जिंकलं. माझा मुलगा जिंकला नाही. पण सगळ्यांनाच प्रशस्तीपत्रक आणि मेडल मिळालं. माझा मुलगा त्या दिवशी भयंकर खुश होता. आजही ते मेडल दिसलं की तो फार खुश होतो.

माझा मुलगा त्यातुन काय शिकला? शिक्षकांनी एक महिना आधीपासुन तयारी करुन घेतली होती. (कोणत्याही गोष्टीला तयारी लाग्गते.. सराव लागतो), शिट्टी वाजली की पळायचं (एकाच दिशेने, सरळ रेषेत) बॉल उचलुन न पाडता टबात टाकायचा. (मोटर स्किल्स , नजरेची स्थिरता, वस्तुंवरची पकड) हे सगळं तर वर्गातही होतंच, पण स्पर्धा म्हणलं की एक डेडलाईन असते. गडबड उडते, पण तरी जमेल ते करायचं. आणि मग बक्षिस मिळतं, आपल्याला त्याचा आनंद होतो , त्याला अभिमानही म्हणतात.

ह्यात कुठे नक्की आहे ताण तणाव? ताण अपेक्षांचा असतो. मी किंवा शिक्षकांनी त्याला कधी म्हणलंच नाही की पहिला नंबर यायलाच हवा. त्याला मुदलात नंबर काढतात हेच समजलं नाही. पालकांनी जर नीट हाताळली, तर स्पर्धा ही प्रोसेस फार सुंदर आहे.

कुठल्याही गोष्टीत मी माझे प्रयत्न केले एवढंच पुरेसं नसतं. माझी क्षमता काय हे स्पर्धा तुम्हाला दाखवुन देते. एक ध्येय ठरवुन, त्यासाठी सराव करुन ते मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे स्पर्धा. निकाल काहिही असो, जर मी १००% प्रयत्न केले असतील तर मी समाधानी असेन. पण ते आयडीयल झालं. अनेकदा खेद वाटतो. निराशा येते. अजुन उत्तम. येऊ देत. मग तुम्ही पुढची खरी पायरी शिकाल की निराशेला कसं मॅनेज करायचं असतं. पराभवाला कसं सामोरं जायचं असतं.

जिंकलात तर हवा डोक्यात न जाउ देता कसं पुढे जायचं हे ही शिकावं लागतच ना.

मुळात पालकांनी केलेल्या अपेक्षांचा मुलांना त्रास होतो. पण मग अपेक्षा ठेवु नयेत का? जरुर ठेवाव्यात. आपल्याला आपल्या पाल्याची कुवत माहिती असते, त्याप्रमाणे अपेक्षा हव्यातच. उगाच पहिला नंबरच हवा हे ही नको आणि काहिही कर तू, मला चालेल हे ही नको. आपल्याला माहिती असतं की मुल हुषार आहे पण आळशीपणा करतं. तर आपल्या अपेक्षा त्यांना आळशीपणातुन उठुन काम करायला भाग पाडतात. सरते शेवटी निकाल काहिही असो, पालक पाठीशी आहेत हे समजलं की मुलांना किमान तो तरी ताण येत नाही. पण आपण वाट्टेल ते केलं तरी हे म्हातारे काही बोलत नाहीत असंही उपयोगाच नाही.

आणि ह्या खेरीज तयारीचा, त्या प्रवासाचा ताण येणारच. पण येऊ देत ना? ताण वाईटच असतो का? कधी ना कधी तो घ्यावाच लागतो ना? मग त्यापासुन दुर का ठेवता मुलांना? ताणाचे व्यवस्थापन शिकवा ना...

आज माझ्या मुलाला पहिला न दुसरा नंबर ह्या गोष्टी तेवढ्या प्रकर्षाने कळत नाहीत. उद्या कळतील. मग तो त्वेषाने प्रयत्न करेल. कधी जिंकेल, कधी आपटेल. त्याला हरल्यानंतरही विजेत्यासोबत बोलावं लागेल. अशावेळेस तो खुल्या दिलाने ते करु शकला पाहिजे. त्याने समजुन घ्यायला हवं की हार जीत तेवढयपुरतीच असते.

तो आणखीन थोडा मोठा होईल, स्पर्धेत राजकारण येईल, डावपेच येतील.. त्याला ते ही यायला हवेत. आयुष्यात त्याला सगळं एकट्याला निभवायचं आहे. त्याला सगळं यायला हवंच.

आणि जाता, लहान मुलांमधल्या तुलने बाबत.

मी नेहमी माझ्या मुलाच्या वयाची मुले काय करता, कशी खातात, कशी बोलतात हे सतत पहात असते. कारण तीच माझा फ्रेम ऑफ रेफर्न्स आहेत. ह्यातुनच मला समजलं होतं की माझा मुलगा उडी अजिबात मारत नाही. बाकी मुलं मारतात. मग त्यावर आम्ही विचार केला. त्याला मुदाम असे खेळ दिले की उड्या माराव्या लागतील. त्याचय सोबत नाचलो. हाताला धरुन उड्या मारत पायर्‍या उतरलो.. आज मुलगा न घाबरता उडी मारतो.

आप्ल्याला घरात बसुन सर्व काही आलबेल आहे असंच वाटतं, पण समजा अमुक वयाच्या मुलाला रंग ओळखता येणं ही गरज असेल तर बाकीच्या मुलांकडे पाहुन हा अंदाज येऊ शकतो की आपल्या मुलाला जमतय ना? त्याला डोळ्यांचा काही त्रास नाही ना? हे लहान सहान इंडिकेशन्स मला आजुबाजुच्या मुलांकडेच पाहुन मिळतात.

तुलना आवश्यक असते. कशी न केव्हा करायची हे समजलं पाहिजे.

एवढा सूक्ष्म अन गहन विचार करणारे पालक. बाब्बौ....

ज्या मुलांचे पालक असा विचार करु शकत नाहीत अशांसाठी ३० टक्के आरक्षण मागायला हरकत नै. ;)

जातवेद's picture

5 Nov 2015 - 4:55 pm | जातवेद

तुम्हाला सगळ्यांचेच विचार गहन वाटून रायलेत आजकाल.

मोदक's picture

5 Nov 2015 - 5:14 pm | मोदक

टाळ्या...!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2015 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रतिसाद ! विचारी व सजग पालकाची लक्षणे !

प्रदीप's picture

9 Nov 2015 - 8:50 pm | प्रदीप

तुमचे दोन्ही प्रतिसाद, तसेच प्रभाकर पेठकरांचे प्रतिसाद आवडले.

पिलीयन रायडर's picture

5 Nov 2015 - 12:59 pm | पिलीयन रायडर

लहान मुलांना दिल्या जाण्यार्‍या प्रोजेक्ट्स बद्दल मला काही ठाउक नाही. कधी तशी वेळ आली नाहीये. पण मला एखादी गोष्ट पटली नाही तर मी शाळेत जाऊन बोलुन येते. जर असं काही झालं तर तेव्हाही बोलेनच.

चौकटराजा's picture

5 Nov 2015 - 2:11 pm | चौकटराजा

मी एका गतिमंद मुलीचा पालक आहे .दूसरी मुलगी सामान्य आहे व इंग्लिश मधे शिकलेली आहे.पत्नीने 30 वर्षे इंग्लिश माध्यामाच्या शालेत नोकरी केली आहे.सबब मी निरनिराळ्या शाळा पाहिल्या आहेत.शाळा हे शिकण्याचे जसे ठिकाण असते तसे ते चालवण्याचे ही ठिकाण असते.अत: अनेक अनावश्यक गोष्टी तिथे असतात .याला राजकारणी,तथाकथित शिक्षण तदन्य व मुलाच्या सर्वाङ्गिण प्रगतीच्या तापाने ग्रस्त झालेले महत्वाकांक्षी आचरट पालाकही जबाबदार आहेत. desire capacity व संधी या तीनांचा संगम होऊन माणूस घडत असतो. यात नैसर्गिक ठेवा किती महत्वाचा आहे व शाळा ,क्लास ,पालक याना किती महत्व द्यायचे हे ज्याने त्याने आपापल्या वकूबानुसार समजून घ्यावे.

पिलीयन रायडर's picture

5 Nov 2015 - 2:12 pm | पिलीयन रायडर

अजुन एक बारिकसा मुद्दा लिहायचा राहिलाय...

"आमच्या वेळेस असं नव्हतं"च्याच चालीवर "आमचं नाही कुठे अडलं.." हा सुरही आजकाल फार दिसतो.

आपण आपल्या बालपणी, २५-३० वर्षांपुर्वी, जे काही, ज्या परिस्थितीमध्ये केलं, तेच आज कसं काय लागु असेल? आपण ५ वीत इंग्रजी शिकलो आणि १२ वीत मोबाईल पहिल्यांदा पाहिला. पण ही मुलं जन्मल्यापासुन स्मार्टफोन्स पहात आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या नसतील का?

आपण आपल्या आई वडीलांसारखंच आयुष्य जगलो का? ते जे आणि ज्या वयात शिकते ते आपणही त्याच वयात, तसंच शिकलो का? मग आपल्याही मुलांना आपले फंडे कामाचे असतीलच ह्याची काय खात्री?

वेल्लाभट's picture

5 Nov 2015 - 2:41 pm | वेल्लाभट

बारीकसा नाही
हा मिलियन डॉलर मुद्दा आहे. आजच्या युगाचा सगळ्यात कळीचा मुद्दा.

लेख वाचून वाईट वाटले. माजलेत हे कोन्वेन्टवाले. यांना फक्त काहीतरी कारणे सांगून आपला मेहनतीचा पैसा हवा.

संदीप डांगे's picture

5 Nov 2015 - 5:08 pm | संदीप डांगे

प्रत्येक मूल हे वेगळ्या पद्धतीने वाढतं, वय वर्ष तीनच्या मुलांना स्पर्धेच्या दृष्टीने तयार करण्यात काहीच चूक नाही हे मत गंभीर आहे. ज्याची त्याची विचारपद्धत म्हटली तरी निसर्ग बदलत नाही. ४० वर्षांआधी भले आजच्यासारखे गॅजेट नसतील पण तेव्हाच्या बाळांसाठीही ते जग आजच्या बाळांसारखं वेगळं असेल. उत्क्रांत होत जाणे सॄष्टीचा नियम आहे. तिरकमठ्यांपासून तोफा बंदुकांच्या जगात येईपर्यंत प्रत्येक पिढीने स्थित्यंतर भोगलंय. पण बायोलॉजी, चाइल्ड सायकोलॉजी बदलत तर नाही. बदलत असेल तर बालमानसशास्त्रज्ञांनी प्रकाश टाकावा.

२.५ वर्षाच्या मुलावर स्पर्धेने जे संस्कार केले ते कितपत टिकतील पुढच्या आयुष्यात? एवढ्या कोवळ्या वयात, प्रेपरेशन, डेडलाईन, वैगेरे मुलांना कळतं तरी का? जरा उशीराने हे सर्व मुलांना दिले तर नेमकं काय बिघडतं ते समजत नाही. अनेक मुलं बघितली आहेत जी शाळेत असतांना फार पुढे असायची, स्पर्धा गाजवायची. नंतरच्या आयुष्यात सामान्य आयुष्य जगतायत, त्याउलट अगदी ढ समजल्या जाणार्‍यांचे आताचे प्रताप ऐकून आम्हालाच विश्वास बसत नाही.

असो. वय वर्ष दोन ते पाच हे स्पर्धेत ढकलायचं वय नाही एवढंच माझं मत. बाकी प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच.

चौरा काकांच्या मताशी बाडिस.

पिलीयन रायडर's picture

5 Nov 2015 - 5:27 pm | पिलीयन रायडर

माझ्यामते स्पर्धा ह्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा आणि माझा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. माझ्यामते आपण दोघेही मुलांवर performance pressure टाकु नये ह्या मताशी सहमत आहोतच. पण माझ्यासाठी निरनिराळ्या स्पर्धा ह्या निरनिराळ्या गोष्टी शिकण्याची संधी आहे. त्या निमित्ताने काहीतरी नवीन मुल करतं. मजा येते..

अर्थातच इतक्या छोट्या मुलांना डेडलाईन कळत नसते.. ते तसे वागत पण नाहीत. तुम्ही लाख मागे लागा, तेच टेन्शन घेत नाहीत. त्यामुळेच उलट ही सगळ्यात सुंदर वेळ आहे काय वाट्टेल त्यात भाग घेण्याची.. पोरांना जिंकणं / हरणं काही समजत नाही.. ते फकत बागडत असतात.

वरच्या लेखात बाईंचा जो सुर आहे, त्याबद्दल मी काही कुठे लिहीलच नाहीये कारण आजकाल शाळा बाजारु होत चालल्या आहेत. नक्की काय अजेंडाने आपल्याशी बोलत असतात ठाऊक नाही. त्यामुळे तिकडे मी तरी फार लक्ष दिलेलं नाही.

एकंदरीत "स्पर्धा" ह्या मुद्द्यावर माझ्याकडुन इतकंच. माझ्या मुलाकडुन मी जितपत त्याची कुवत आहे तितपत अपेक्षा ठेवते. तेवढं त्याने करावं. म्हणुन मग स्पर्धेतही मला आजुबाजुला काय घडतंय ते दिसत नाही. माझा मुलगा काय करतोय हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. शेवटी आम्ही त्याला खुप शाबासकी देतो. फोटो बिटो काढतो.. पोरगा खुष.. आम्ही खुश.. स्पर्धा तर तशीही संपलेलीच असते..!

बालमानसशास्त्र..
आजुबाजुची परिस्थिती बदलतेय, मुल्य बदलतायत, घडणार्‍या घटनांचे अर्थ आणि संदर्भ बदलताएत.. मुलांवर ह्या सगळ्याचा होणारा परिणामही वेगवेगळाच असणार.. त्यामुळे मुलांचे मानसशस्त्र पिढीगणिक निश्चित बदलत असावे असे माझे मत आहे.

ही पिढी वेगळीच आहे. त्यांचे Strength / Weakness ही वेगळे आहेत. समस्याही वेगळ्याच आहेत. शिक्षणही गोष्ट तशीही यशाशी तेवढी निगडित नसतेच. काही असेलच तर माणसाचा Attitude. माझा विचार हा त्या दृष्टीने असतो, स्पर्धा किंवा शैक्षणिक यश ह्या मर्यादित अर्थाने नाही.

चांगली चर्चा झाली.
धन्यवाद!

संदीप डांगे's picture

6 Nov 2015 - 8:34 pm | संदीप डांगे

तुमच्याशी सहमत आहेच! आपल्या दोघांचे विचारबीज नेहमी एकच असते फक्त अवतार वेगळा होतो. बाकी काही नाही.
चर्चेबद्दल धन्यवाद!
विशेषतः ह्याबद्दलः

आजुबाजुची परिस्थिती बदलतेय, मुल्य बदलतायत, घडणार्‍या घटनांचे अर्थ आणि संदर्भ बदलताएत.. मुलांवर ह्या सगळ्याचा होणारा परिणामही वेगवेगळाच असणार.. त्यामुळे मुलांचे मानसशस्त्र पिढीगणिक निश्चित बदलत असावे

pradnya deshpande's picture

5 Nov 2015 - 5:28 pm | pradnya deshpande

माझ्या मुलाला मी ५ वर्षाचा झाल्यावर बालवाडीत घातले. ६ पूर्ण होऊन ७ वे लागल्यावरच पहिली मधे टाकले. मुद्दाम के जी सिनियर के जी म्हणत नाही. कारण मी त्याला सातवी पर्यंत मुद्दाम मराठी माध्यमातून घ्र्च्याच्याचा विरोध पत्करून शिकवले\ त्यानंतर सेमी इंग्लीश मधून त्याचे शिक्षण केले. लहान असताना त्याला मातीत मनसोक्त खेळू दिले. विटी दांडू पासून आजच्या क्रिकेट पर्यंत सगळे खेळ खेळू दिले. त्याची निरीक्षण शक्ती वाढावी या साठी त्याला कधी प्रश्न विचारण्यापासून अडवले नाही. अनेकदा आम्हा पती पत्नीची स्थिती बोर्णविटाच्या जाहिराती मधील काजोल सारखी झाली. तिच्या सारखे आम्ही कल बताऊ असे म्हणत असू. त्याचे फळ आज मिळत आहे. मुलगा चवकस बुद्धीचा झाला आहे. त्याचे बालपण त्याला मनसोक्त उपभोगू दिले.

सुबोध खरे's picture

5 Nov 2015 - 6:15 pm | सुबोध खरे

आमची आई शाळेची मुख्याध्यापक म्हणून निश्वृत्त झाली. मी स्वतः नेव्हल पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनातील एक विश्वस्त म्हणून काम केल्यावर आलेले काही अनुभव-- काही उर्ध्वगामी पालक मुलांची दर आठवड्याला चाचणी घ्या आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा दर महिन्याला आम्हाला शिक्षक पालक बैठकीत द्या अशी मागणी करून आले होते. साधारण ५०० पालक, शिक्षक आणि आम्ही दहा पदाधिकारी असा तो पालक शिक्षक मेळावा होता. ऊर्ध्वगामी पालकांचे म्हणणे असे होते कि मुलांना सुटे सोडायचेच नाही. त्यांना सतत काही तरी नवनिर्माण( CREATIVE) असे करायला प्रकल्प द्या. मी स्पष्टपणे हे म्हणालो कि जे प्रकल्प मुलांना स्वतःला पूर्ण करत येणार नाहीत ते आम्ही त्यांना देणार नाही.आम्हाला (व्यवस्थापन किंवा शिक्षक) यांना सामान्य मुलांच्या कुवतीचाही विचार करायला लागतो. फक्त हुशार मुलांन प्रोत्साहन देण्यासाठी कठीण प्रकल्प दिले तर सामान्य मुलांची सोपे प्रकल्प दिले तर हुशार मुले कंटाळतात. कुठेतरी सुवर्णमध्य काढायलाच लागतो.
इतर बर्याच पालकांचा त्याला विरोध होता. यात दोन तट स्पष्ट होते. व्यव्स्थापनाचे लोक कुंपणावर बसायची कसरत करीत होते.
मी लोकांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्री जयंत नारळीकर यांचे उदाहरण दिले.
त्यांना पत्रकाराने विचारले, " तुम्ही एवढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ तुमच्या मुलांना आपण पण बोर्डात यावे प्रसिद्ध व्हावे असे वाटत नाही का?
त्यावर हा महान शास्त्रज्ञ म्हणाला, शर्यतीत धावून पहिले यावे अशी कोणत्याही घोड्याची इच्छा नसते. ती त्याच्यावर बसलेल्या स्वाराची इच्छा असते . तेंव्हा आपल्या इच्छा मुलांवर लादून त्यांना पळवायला लावणे मला पटणारे/ जमणारे नाही.
बर्याच वेळेस शाळेतील शिक्षक किंवा व्यवस्थापन सरकारी नियम, "असे" पालक आणी मुख्याध्यापक अशा तीन जणांच्या कात्रीत असतात. प्रत्येक जण आपल्या दृष्टीने बरोबर असतो.
अर्थात तो मेळावा कोणताही ठोस निर्णय न घेता संपला. कारण दोन्ही बाजू आपली भूमिक्स सोडायला तयार नव्हत्या.
तात्पर्य -- आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपल्या मुलाला शिक्षण घेऊ द्यावे.

धागा मिसला होता. आता वाचला. प्रतिसादही वाचले. तुमच्या मुलीची शाळा मनोरंजक आहे. ;)

शाळेतले प्रोजेक्ट कशासाठी असतात कोण जाणे.
माझ्या मुलाचे बहुतेक सगळे प्रोजेक्ट त्याची आईच करत बसते. शाळेत विचारले तर बहुतेक जणांच्या घरी हीच स्थिती.
मुलाने एकदा मला पावसावर कविता मागितली. मी "श्रावणमासी हर्ष मानसी." कविता लिहून दिली.
मुलाला त्याचा अर्थही सांगितला. मुलाने ती कविता एका कागदावर रम्गीतपेनने उतरवून काढली आणि शाळेत नेली.
दुसर्‍या दिवशी त्याला त्या कवितेचे काय झाले हे विचारले. माझी अपेक्षा होती की शिक्षीका त्याला ती कविता किमान वर्गासमोर वाचून दाखवायला सांगतील तो अर्थ सांगेल वगैरे वगैरे.......... मुलाने सांगितले की टीचरने तो कवितेचा कागद गठ्ट्यात टाकला.
जर निव्वल खानेसुमारीसाठी प्रोजेक्ट कशाला करायचे? आणि मुलाना त्या प्रोजेक्ट मधून काहीच उपयोगाचे ( अगदी मनोरंजन सुद्धा) मिळणार नसेल तर ही थेरें हवीतच कशाला?
मुलांच्या दप्तराचे ओझे पाहिले तर त्यात अभ्यासाची पाठ्यपुस्तके कमी आणि वर्कबुके जास्त असतात.
हे आपणच मुलांवर लादत असतो.
ह्या सगळ्या पालकाना आणि मास्तराना "तोत्तोचान" वाचायला द्या ..........

हे प्रोजेक्टस म्हणजे डोक्याला ताप असतो. माझ्या मुलीला मातीचा पोर्क्युपाईन (साळींदर) बनवून आणायला सांगीतले होते. एखादा पट्टीचा मुत्रिकारच हे करु शकतो. तरी मला जमेल तसा मी बनवून दीला. तर त्यावर शिक्षकांनी "हुबेहुब झाला नाही परत बनवा" असे सांगून परत पाठवला. आता मी शिक्षकाकडे जाउन, त्याला येतो का बनवायला ते विचारणार आहे.

संदीप डांगे's picture

6 Nov 2015 - 7:59 pm | संदीप डांगे

जातांना जीवंत साळींदर घेऊन जा.... :-)

प्यारी २'s picture

6 Nov 2015 - 5:51 pm | प्यारी २

सगळ्याचेच विचार पटतात.

असंका's picture

6 Nov 2015 - 6:25 pm | असंका

मलापण!!!
द्या टाळी!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2015 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या आयाडीच्या जवळपास शब्द असलेली आजून एक आयडी असल्याचे अंधूकसे आठवतेय ;) :)

बॅटमॅन's picture

6 Nov 2015 - 6:35 pm | बॅटमॅन

अहो अलीकडे डुआयडी लैच बोकाळलेत मिपावर. बोलतात खोटे निखालस, म्हणवतात मात्र सालस =))

कपिलमुनी's picture

6 Nov 2015 - 11:11 pm | कपिलमुनी

मज्याशी मयतरी कर्नार कं ?

स्वाती२'s picture

6 Nov 2015 - 7:37 pm | स्वाती२

>>तुमची मुलगी साधारण आहे, तिच्यात काही असाधारण असं काहीच नाही, तुम्ही दोघा हि सुशिक्षित आहात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. या स्पर्धेच्या युगात तुम्ही मुलांना तयार केले पाहिजे, तुमची मुलगी कोणत्याही स्पर्धेत भाग नाही घेत. जेवढा विचारले जाते तेवढंच उत्तर देते. स्वताहून काही करायला मागत नाही.>>

प्रत्येक मुलं हे स्पेशल असते. त्या मुलातील विशेष गुण हेरुन त्याचे कौतुक करणे, मुलाला उत्तेजन देणे आणि असे करताना ज्या गोष्टीत मूल दुबळे आहे त्या गोष्टीत सुधारणा घडवून आणणे हे मोठ्यांचे काम! एवढी साधी गोष्ट तुमच्या मुलीच्या टिचरला कळत नसेल तर कठीण आहे. त्यात मुलीच्या देखतच तिच्या काही असाधारण नाही असे म्हणणे फारच गंभीर ! याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोला. स्पर्धेत निभाव वगैरे दुरच्या गोष्टी. जेवढे विचारले तेवढेच उत्तर देते हे देखील ३ वर्षाच्या मुलाच्या मानाने चांगलेच आहे ना. नसेल घेत स्वतः पुढाकार. बुजत असेल. पण तिच्या काहीही असाधारण नाही असा नकारात्मक शिक्का मारुन टिचर तिला अजूनच निरुत्साही बनवतेय. तुमच्या मुलीबद्दल काहीही सकारात्मक गोष्ट टिचरला सांगता येत नसेल तर प्रश्न तुमच्या मुलीचा नाही टिचरचा आहे. वर्ग बदलून मिळेल का? मुलं खूप पर्सेप्टिव असतात. नुसत्या बॉडी लँग्वेजमधूनही टिचरची नकारात्मकता त्याच्या पर्यंत पोहोचते. 'माझ्यात काहीच चांगले नाही' असे वाटून अजूनच मागे पडतात.

मला 'गणपती काढला' हा उल्लेख खटकला. दुसरे म्हणजे तीन वर्षाची निरागस मुलगी. तिला बाहूबली वगैरे एक्सपोझर नको. मुळात अनसुपरवाईज्ड टिवी टाईम नको. मुलाचे कार्यक्रम माफक प्रमाणात आणि तेही मोठ्यांबरोबर एकीकडे गप्पा मारत असकर्करता आले तर बरे होइल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Nov 2015 - 8:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेंचुरी बद्दल श्रीउमेश ह्यांचा फिजिक्स ची १२वी ची दोन पुस्तकं, अ‍ॅप मेकचं एक पुस्तक आणि लिहायच्या असाईनमेंटचा एक गठ्ठा देउन करणेत येत आहे.

वय वर्षे अडीच ते साडेचार. दोन वर्ग आहेत. अ‍ॅडमिशन देतानाच आई सांगते की लिहायला शिकवणार नाहीये. वाचायला सुरुवात करावी यासाठी वयानुरूप अक्षरओळख करुन दिली जाईल.
रंग ओळखणे, वास आणि चवी ओळखणे, आकारांचे ज्ञान, स्पर्शज्ञान, जरा मोठ्या मुलांना वस्तू मोजण्यातून अंकगणिताच्या सोप्या कल्पना, घड्याळात किती वाजलेत हे शिकवणे, सर्वांना स्वच्छतेच्या सवयी - केस, नखे कापलेली असणे, डोळे चेहेरा स्वच्छ असणे, डब्यात केक बिस्किटे, फरसाण असे जंक फूड नसणे अशा अनेक बारीकसारीक गोष्टींची/सवयींची तयारी करुन घेतली जाते (बर्‍याचदा पालकांचीच! ;)). चपला बूट काढून ठेवताना कसे ठेवावेत, बुटांच्या नाड्या कशा बांधाव्यात, भाजी कशी निवडावी, चिरावी, याचे खेळतखेळत शिक्षण होते. सुरी, कातरी सुरक्षितपणे कशी वापरावी, निरुंद तोंडाच्या भांड्यात पाणी कसे ओतावे (मोटर स्किल्स), अरुंद फळीवरुन तोल सांभाळत कसे चालावे, रिंगमधून चेंडू कसा टाकावा (त्रिमित गोष्टींचे अंदाज).
स्वयंपाकघरातील छोटीछोटी उपकरणी आणि साधने उदा. किसणी, खलबत्ता, कसे वापरेल जातात हे शिकवले जाते.
जेवताना वदनिकवळ पासून सुरुवात करायची हे शिकवले जाते. सोपी स्तोत्रे, प्रार्थना शिकवल्या जातात. शाळेत गणपती आणि सगळे छोटेमोठे सण होतात. फॅन्सी ड्रेस काँपिटिशन असते. मुलं शाळेत यायला उत्सुक असतात.
स्पर्धा असतात परंतु कोणालाही कमीपणा न आणता त्या घेतल्या जातात. मुलांना न्यूनगंड येता कामा नये हे बघितले जाते.
शाळेची वार्षिक सहल कोणत्यातरी शेतावर जाते. मातीत पाण्यात खेळायला दिले जाते. शाळेतही रंगकाम, मातीकाम होते, मुलं चिखल करुन यथेच्च खेळतात. संपूर्ण वर्षभर त्यांना फळांच्या बिया गोळा करायला सांगितल्या जातात. एप्रिल मध्ये शाळा संपण्यच्या सुमारास सगळ्या बिया एकत्र करुन माती आणि बियांचे छोटे गोळे करुन मुलांना वाटून दिले जातात. ती जिथे कुठे सुट्टीत गावाला जाणार असतील तिथे हे गोळे प्रवासात टाकत जातात किंवा जमिनीत पेरतात. मुलांना फार आवडतात हे प्रकार.
खूप मजेदार आठवणी आहेत. एका पालकांनी सांगितले की ते सगळे कोठेतरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी गेले होते. मुलगा दारापाशीच थांबला आणि आलेल्या सगळ्यांचे चपला, बूट व्यवस्थित जोडीजोडीने जमवून नीट ठेवायला लागला. आईवडील आश्चर्यचकित! तेव्हा हा म्हणतो "शाळेत बाईंनी शिकवले आहे की चपला अशा कुठेही टाकायच्या नाहीत!" लहानगे मोठ्यांना शिकवतात ते असे! :)
२०१२ साली शाळेचा रौप्यमहोत्सव माजी विद्यार्थ्यांनीच केला. ती सगळी मुलं मुली जवळपास तिशीतले होते. ज्यांना मुलं होती ते सगळे छोट्यांना घेऊन आले होते. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आज ही मुलंमुली आहेत सगळे अजूनही बालवाडीची आठवण काढत असतात. असो. सांगायचा मुद्दा असा की मुलं त्यांचीतीच शिकत असतात आपण फक्त अडथळे न आणता उपलब्धता करुन द्यायचे हे महत्त्वाचे.
शिक्षकाची कल्पनाशक्ती हीच फक्त शिकवण्याची सीमा असते! मुलं काहीही शिकायला तयारच असतात! :)

-रंगा

संदीप डांगे's picture

6 Nov 2015 - 9:35 pm | संदीप डांगे

मस्त वाटले प्रतिसाद वाचून. माझ्या मुलाची शाळा अशीच आहे डिट्टो.

नाखु's picture

7 Nov 2015 - 11:03 am | नाखु

आपल्या माऊलीला दंडवत.

पुस्तकी संस्कार नसलेला पण अनुभवी नाखुस

चतुरंगः तुमच्या मातोश्रींच्या शाळेची, तिथल्या कार्यपद्धतिची चित्रफीत करून प्रसारित केली पाहिजे!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Nov 2015 - 7:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठे आहे ही बालवाडी? ह्याच्यावर खरचं एक लेख येउद्या.

मी त्याच शाळेत शिकलेली आहे :)

नमकिन's picture

10 Nov 2015 - 5:01 pm | नमकिन

लेखक: पक्षी उमेश च्या विषयाची सौंची बाजू मांडण्याचे काम 'पिरा' ने चोख बजावलेय (कानाखाली गणपती काढल्यागत), म्हणूनतर अशी वेळ आलीय आज बापुड्या बापावर.
धागा विषय खरंतर प्रातिनिधीक म्हणावा असाच आहे त्याकरिता अभिनंदन.

बालसंगोपनावरील विषयक्षेत्र असलेली मराठी /इंग्लिश भाषेतील उपलब्ध पुस्तके वाचून आपली व पक्षी शाळेची जबाबदारी कितपत,(डॅा लता काटदरे) स्पर्धा कितपत ठीक (जीवन शर्यत- अनुवादित) याचे भान येऊ शकेल. मुळात ही वेळ लहान मुलांवर ओढवतात ते त्यांचे जन्मदाते ईर्षा या रिपु ला बळी पडून.
बालपण हिरावून घेऊन आज हाती काही लागणार नाहीं परंतु जर तेवढेच लक्ष मुलांच्या पोषक आहाराकडे (वंशवेल) दिले तर नक्कीच बालकाचे भावी आयुष्य सुखकारक होईल हे निश्चित. ( बर्वे- व्यथा बालकंच्या, कथा पालकांच्या), डॅा चित्रा सोहोनी- बालकांशी सुसंवाद कसा साधावा.
एकंदर सामाजिक स्तर राखण्याच्या नादात एक नवीन जातिव्यवस्था आपण पुरस्कृत करतोय मुलांना अत्युत्तम /अत्युच्च ते देण्याच्या गोंडस नावाखाली. मुलांमध्ये दुही/वर्गवारी/विषमता पसरवतोय का तर मला परवडतेय किंवा हल्ली हेच "स्टॅडर्ड" आहे.
मुलांना खरी गरज मायेची ऊब, प्रेमाचा ओलावा, नात्यांचा जिव्हाळा,संस्करांचे सुगंध , जीवनमुल्याची शिकवण, सामाजिक जाणिव व पोषक आहार इ आहे.
शेवटी चित्रवाणी संच रोज ३०मिनिट पेक्षा जास्त पाहू नये -लहान असो वा मोठे, कार्यक्रम कुठला ते वयोमानानुसार ठरवा.