अनवहाणी चालणं.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
28 Oct 2015 - 11:21 am

मला आठवतात ते दिवस.

"गै वयनी,कालचां काय शिळांपाक्यां असलां तर वाढ गे!"

माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या अंगणाच्या बाहेरून दगडूमहाराचा( दगडूमहार ह्याच नांवाने तो ओळखला जात असल्याने तसं नाईलाजाने म्हणावं लागतं.) हा आवाज ऐकल्यावर माझी आजी मांगरात जाऊन अंगावरचं लुगडं सोडून मांगरातून जूनं लुगडं-त्याला कोकणात बोंदार म्हणायचे-नेसून यायची.ते झाल्यानंतरच दगडूमहाराच्या करटीत-नारळ फोडून नारळातलं खोबरं काढून झाल्यावर उरलेले कडक आवरणाचे दोन भाग.त्यातल्या अर्ध्या भागाला करटी म्हणायचे-आम्ही लहान मुलांनी खाऊन झाल्यावर उरलेली पेज आणि फणसाची भाजी,त्याच्या करटीत वरून टाकायची .करटीत टाकलेली पेज पिऊन झाल्यावर फणसाची भाजी त्या करटीत टाकायची.टाकायची म्हणण्याचा उद्देश खरंच वरून वाढायची. दगडूमहाराला कसलाच स्पर्श होऊ नये हा उद्देश असायचा.चुकून स्पर्श झाल्यास "आफड" झाली असं म्हणून आंघोळ करावी लागायची.दगडूमहार निघून गेल्यावर आजी "बोंदार" बदलून घरातलं लुगडं नेसायची.अंगावर पाणी शिंपडून मग घरात यायची.

त्यावेळी आमच्या त्या लहान वयात,अवलोकनापलीकडे,आमच्या डोक्यात, हे बरं की वाईट,स्पृश्य-अस्पृश्यता,हा माणसा माणसातला वागण्यातला फरक,ह्याला माणूसकी म्हणायचं काय? असले विचार येत नसायचे.आता भुतकाळात मागे वळून पाहिल्यावर त्याची आठवण येऊनही लाज वाटते.

त्याचं असं झालं,दगडूमहाराचा पणतू,रघू, मला भेटायला घरी आला होता.मी थोडे दिवस आजोळी रहायला गेलो होतो.मी आल्याचं त्याला कुणीतरी सांगीतलं.हा रघू, चांगला शिकून आता गावातल्या शाळेत हेडमास्तर म्हणून काम करतो.त्याला त्याचे पंजोबा-दगडूमहार-निटसा आठवत नव्हता.
इकडची,तिकडची चर्चा झाल्यावर मी रघूला म्हणालो,
"मला माझ्या एका कुतूहलाचं तू उत्तर द्यावंस.गावातले बरेच लोक अजून अनवहाणी चालतात, ह्याचं कारण काय असावं?. गरीबी हे एक कारण असू शकतं. बायका तर वहाणं घालतच नाहीत आणि बरेचसे पुरूषही अनवहाणी चालतात."

मी त्याच्या वडलांची, ह्याबाबतीत, चौकशी केल्यावर आपल्या वडलांबद्दल तो सांगायला लागला,
"जितकं जमेल तितकं माझ्या वडलांना अनवहाणी चालायला आवडायचं.असं केल्याने त्यांचा त्यांच्यावर चालण्याच्या क्रियेत ताबा आहे आणि त्याशिवाय हे त्यांना आरामदायक आहे असं वाटत असायचं. लहानपणी त्यांनी कधीच वाहाणा वापरल्या नाहीत.
"लहानपणी शाळेत जातानासुद्धा.पायात वहाणा घातल्यावर माझ्या मनावर थोडा ताण यायचा,आणि जखडल्यासारखं वाटायचं.त्यामुळे इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करायला जरा कठीण व्ह्यायचं."असं ते म्हणायचे.
वहाणा बहिषकृत करायला हव्या होत्या अशातला काही भाग नाही. फक्त त्यांना वाटायचं त्याची जरूरी नव्हती."

"गावात हे सर्व चालतं.कुणी एव्हडं लक्ष देत नाहीत.पण शहरात वहाणांची फार जरूरी असते. वाहाणांशिवाय चालणं अप्रशस्त समजलं जातंच,त्याशिवाय गर्दीत कुणाचा जड बुटांचा पाय कुणाच्या अनवहाणी पायावर पडला तर पायाची कळ मस्तकात गेल्याशिवाय रहाणार नाही."
मी रघूला म्हणालो.

मला रघू म्हणाला,
"मी मास्तर झाल्यानंतर पायात वहाणा घालायला लागलो.
त्या अगोदर इतका अनवहाणी चालत असल्याने,उन्हाने तापलेल्या रस्त्यावर किंवा टोकदार दगडावरून चालल्यावर मला कसल्याच वेदना होत नव्हत्या.काही शहरी लोक हे अनवहाणी चालणं काहीतरी विलक्षण आहे असं समजतात,पण मला फायद्याचं वाटतं. लहानपणाचं मला आठवतं,एकदा शेकोटी करून वापर झाल्यावर विझत असलेल्या लाकडाच्या तुकड्यावरून मी चालत जात असताना ते पाहून पटकन उडी मारून दूर झालो आणि पायाला लागलेली जळती राख धुऊन टाकली.माझ्या तळव्यांना काही झालं नव्हतं.कारण माझे तळवे तेव्हडं सहन करण्याच्या स्थितीत होते."

हे ऐकून मी रघूला म्हणालो,
"जर का वैकल्पिक असतं तर नक्कीच बरेचसे पैसे वाचले असते.वहाणांचा शोध लागण्यापूर्वी लोक अनवहाणीच चालायचे.अनवहाणी असताना त्यांना अवतिभवतिचा चांगलाच बोध रहायचा.मी कुठेतरी वाचलंय की,पळत असतानासुद्धा काहींना वहाणा घालायला आवडत नाही.कदाचीत हे ऐकून विचित्र वाटत असेल पण असं सिद्ध केलं आहे की जर का तुम्ही अनवहाणी धावत असाल तर ते तसंच करीत रहा.अनवहाणी चालल्याने,आणि धावल्याने तुमच्या पायाच्या पोटर्‍या मजबूत होतात आणि खोटा कमी झिजल्या जातात."

"माझ्या वडीलाना वहाणा आवडत नसायच्या त्याचं कारण कदाचीत नदीत कमरेपर्य़ंत पाण्यात दिवसभर उभं राहून गळाला लागणार्‍या मास्यांची वाट पहाण्यात त्यांचा बराचसा वेळ जात असल्याने,त्यांना वहाणांची जरूरी भासत नसावी."
रघू मला म्हणाला.पुढे सांगू लागला,
"किंवा कदाचीत आमच्या हाडामासांत ते मुरलेलं असेल.मला आठवतं,माझी आजी तर अगदी लहानपणापासून नदीच्या किनार्‍यावरून किंवा रानातून चालायची अर्थात अनवहाणी.मी ऐकलंय की माझ्या आजोबांनी आयुष्यात कधी वहाणा वापरल्या नाहीत.शेवटी,शवटी त्यांना कापर्‍यावाताचा रोग झाला होता.ते म्हणायचे वहाणा घालून चालण्याने तोल सांभाळला न गेल्याने पडायची शक्यता असल्याने,ते अनवहाणीच चालायचे.तसंच अजून गावातल्या बायका चप्पल पायात घालून चालणं अप्रशस्त आहे असं समजतात."

मला रघूने दिलेलं,स्पष्टीकरण जरी पटलं नाही तरी मला गावातल्या लोकांच्या रीति-रिवाजाचा आदर करावा असं मनात आलं.अनवहाणी चालल्याने तळव्यांना होणारे अपाय वगैर सांगण्यात काही हाशील नव्हतं.आणि माझ्या कुतूहलाला त्याच्या दृष्टीने दिलेलं स्पष्टीकरण मला कळलं.

"दुर्भाग्याने,बरेचसे लोक अनवहाणी चालू शकत नाहीत कारण त्यांच्या पायाच्या नाजूक तळव्याना आरामदायी वाटत नसावं.पण तुझी ही कथा ऐकल्यावर मला वाटतं अनवहाणी चालण्याचं स्वातंत्र्य असावं."
असं म्हणून मी हा विषय बदलला.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफ्रनीया)

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

28 Oct 2015 - 12:38 pm | प्रभाकर पेठकर

एक तर अनवहाणी हा शब्द आवडला. आम्ही आजतागायत अनवाणी हा शब्दच वापरत आलो आहोत.
कथा चांगली आहे पण जरा त्रोटक वाटली.

अमृत's picture

28 Oct 2015 - 2:28 pm | अमृत

अनवाणी असच ऐकून/बोलून आहे.

एस's picture

28 Oct 2015 - 1:02 pm | एस

कथा आवडली. अनवहाणी/अनवाणी चालण्यामागची भौतिक कारणमीमांसा काहीप्रमाणात पटण्याजोगी असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने पादत्राणे नेहमी वापरणे श्रेयस्कर असते. दुसरे म्हणजे शूद्र आणि स्त्रियांनी गावातून चालताना अनवाणीच चालावे अशी समाजरीत तेव्हा होती. आजही अगदी खेडेगाव असेल तर अल्पशा प्रमाणात हे 'सेक्ल्युजन' सुरूच आहे! दुर्दैव. माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारण्याचा प्रकार...

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2015 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

पादत्राणे पायात न घालता चालण्याला "अनवाणी" चालणे असे म्हणतात. हा कदाचित अपभ्रंशित शब्द असेल पण वापरात प्रमाण झालेला शब्द आहे.

लेख एक अनुभव / कथा म्हणुन ठीक आहे. पण, ती वाचताना खालिलप्रमाणे वाटले...

अनवाणी चालणे यात "उच्च, चांगले अथवा शास्त्रिय" असे काहीच नाही. शास्त्रिय दृष्टीने पायांची नीट काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य बराच काळ योग्य राहण्यासाठी पादत्राणे वापरणे नक्कीच योग्य व फायदेशीर आहे.

काही विशिष्ट वर्गाला पादत्राणे वापरण्यास बंदी हे "सामाजीक असमानता" आणि "एका वर्गाचा दुसर्‍यावर वरचढपणा बिंबविण्याचा प्रयत्न" या मानसिकतेचे नि:संशय लक्षण आहे... जसे ते त्या व्यक्तीला "शिळेपाके" अन्न "न शिवता वरून टाकून देण्यात" आहे अगदी तसेच. दोन्हीही एकाच मानसिकतेची व तेवढीच निंदनीय लक्षणे आहेत.

असे प्रकार भूतकाळात घडले, त्यांचा सतत संदर्भ देत आजच्या लोकांवर त्याचा राग काढण्यात अर्थ नाही हे नक्की. पण, असे प्रकार भूतकाळात घडले आणि/किंवा ते आपल्याशी संबंधित लोकांनी केले म्हणुन त्या प्रकारांचे कळत/नकळत समर्थन/उदात्तीकरण करणेही योग्य नाही.

अश्या गोष्टींना (अ)शास्त्रिय कारणांचा अथवा (नसलेल्या) फायद्यांच्या दंतकथांचा मुलामा चढवण्याचे प्रयत्न म्हणजे "सत्य स्विकारण्यासाठी लागणार्‍या मानसिक धैर्याचा व नैतिकतेचा अभाव असल्याने केलेली सारवासारव" होय.

अश्या गोष्टींना (अ)शास्त्रिय कारणांचा अथवा (नसलेल्या) फायद्यांच्या दंतकथांचा मुलामा चढवण्याचे प्रयत्न म्हणजे "सत्य स्विकारण्यासाठी लागणार्‍या मानसिक धैर्याचा व नैतिकतेचा अभाव असल्याने केलेली सारवासारव" होय.

हे विशेष आवडलं.

गामा पैलवान's picture

28 Oct 2015 - 6:42 pm | गामा पैलवान

श्रीकृष्ण सामंत,

अनव(हा)णी वावरण्यावरून लहानपणीचा काळ आठवला. तेव्हा सगळा वेळ आम्ही बाळगोपाळ अनवाणीच हुंदडत असू. अगदी दगडधोंडे असोत वा काटेकुटे. त्याकाळी ठाण्यात खूप गर्दी नव्हती. भल्या पहाटे मासुंदा तलावाला धावत फेऱ्या मारत असू. तेव्हा पायांत चपलाबूट नसायच्या. मात्र दिवसाच्या इतर कोणत्याही वेळेस घराबाहेर पडलो तर मात्र चप्पल घातली जायची. तुम्ही म्हणता तसं अनवाणी हुंदडल्याने पायाचे घोटे मजबूत झाले होते. खेळतांना खूप वेळा धडपडलो असू, पण अगदी काँक्रीटवर पडूनही हातपाय कधी मोडला नाही. पुढे वय वाढल्यावर हुंदड कमी झाली आणि पायात कायम चप्पलबूट आले. मला वाटतं अनवाणी वावरणं हा सवयीचा भाग असावा.

आ.न.,
-गा.पै.

दिवाकर कुलकर्णी's picture

29 Oct 2015 - 1:20 am | दिवाकर कुलकर्णी

बरेच लोक देवाला जाताना अनवाणी जातात पण परत येताना मात्र
त्याच्या पायी वहाणा असतात, देव त्याना असा पाव तो