“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण
आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते
आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी
कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
23 Oct 2015 - 7:44 am | नाना स्कॉच
ह्याला काय अर्थ आहे! ?? उगाच काहीही, तुम्ही जो लोकांचाजळफळाट म्हणता आहात तो "जीव जळणे" प्रकार असतो हो साहेब!
23 Oct 2015 - 8:11 am | बिन्नी
तुमच्या मनातला नॉन शेतकरी लोकांबद्दलचा रावण दिसतोय ! त्याला जाळा आधी !
नाहीतर पाखंडी लेबल लागायचं !
23 Oct 2015 - 9:37 am | अविनाशकुलकर्णी
शेतकरी अनुदाने घेतो..कर्जमाफि घेतो...लुकसान भरपाई मिळते...कोटी रु किमतिच्या जमीनी असेट असते त्याच्या नावावर....मरतो शेत मजुर..त्याला कुणी वाली नसतो........
23 Oct 2015 - 10:02 am | अनुप ढेरे
शेतात सापडलेली सीता आणि शेतात उगवलेली पिकं यांची तुलना आवडली. कविता छानच आहे.
23 Oct 2015 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार
शेतमालाचे भाव पडले की
यांचा जळफळाट होतो...कारण
यांच्या मनात दडी मारून
बसला आहे एक दुर्योधन
यांच्या मनातल्या दुर्योधनाला
ग्राहकाचे वस्त्रहरण करायचे असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची किंमत करुन
यांना स्वतःची तुंबडी भरुन घ्यायची असते
त्यांची मानसिकता दुर्योधनाचीच
संधी मिळताच डाळींचे भाव वाढवणारी
दुधाचे भाव पडताच
ते रस्त्यावर ओतुन देणारी
रक्त पिपासू गोचिडी सारखी
आत्महत्यांचे ही राजकारण करणारी
फुकटची अनुदाने कर्जमाफी घेत, झुंड करुन
सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारी
कधी मरेल हा दुर्योधन
या स्वार्थांध लोकांच्या मनातला?
आणि कधी मोकळा श्वास घेइल
ग्राहकराजा या देशातला?
दुर्योधनी वृत्तीचा खातमा व्हावा
अशी पैजारबुवाची इच्छा आहे
त्यासाठी, शेवटचा उपाय म्हणून्,
शमीवरची शस्त्रे काढायला लागली तरी हरकत नाहीये
पैजारबुवा,
24 Oct 2015 - 8:25 am | मोगा
.
24 Oct 2015 - 4:23 pm | इरसाल
मोगा म्हणजे मोदींची गाय .
23 Oct 2015 - 2:52 pm | निनाव
मुळ काव्य आणिक पैजार बुआ ह्यन्चे प्रतिसाद .. सुन्दर. मुद्दा नाजुक आहेच. महागाइ आत्म हत्या , मध्यम वर्गियान्चि गळचेपि.
24 Oct 2015 - 10:18 am | विवेकपटाईत
मुटे कविता मनाला पटली. रावणा नंतर श्रीरामाने हि सीता आपल्या अधीन ठेवली. शेवटी जनतेनेच श्रीरामाला त्याची जाणीव करून दिली. सीता जमिनीत गुप्त झाली. शेतकरी, रानावनात राहणारे लोक सुखी झाले. तिथे शेतकरी सुखी तिथेच 'रामराज्य'.
24 Oct 2015 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा
ठरवून टाकली मोक्यावर जिल्बि
मोकळा केला भस्सकन कोठा
गाई पळाल्या राना वनात
ओरडू लागला मोकळा गोठा