वाटसरूच्या पाऊलखुणा
******************
वाटसरू रे, पाऊलखुणा -
त्यांनाच म्हण "पाऊलवाट".
वाट अशी नसतेच म्हणा -
तूच चालून बनते वाट.
वाट बनते तूच चालून -
मागे बघ - ती बघशील
वाट नवी; पण वळून,
कधी पुन्हा तुडवशील?
वाटसरू! नसतेच "वाट"-
फक्त नावेमागची लाट.
मूळ कवी : आंतोनियो माचादो (१८७५-१९३९); मूळ भाषा स्पॅनिश
Campos de Castilla संग्रहातील "म्हणी आणि गाणी - क्रमांक २९" मधील या ओळी सर्वात प्रसिद्ध आहेत.
अनुवाद : धनंजय
प्रतिक्रिया
18 Dec 2008 - 3:46 am | विकास
आवडली!
18 Dec 2008 - 3:58 am | धनंजय
येथे सापडेल.
http://www.cha.uga.edu/bjc/machado.htm
(पण इंग्रजी भाषांतरही शब्दाला शब्द धरून नाही.)
18 Dec 2008 - 3:58 am | मीनल
अनुवाद आवडला.
मीनल.
18 Dec 2008 - 7:04 am | मनीषा
वाटसरू रे, पाऊलखुणा -
त्यांनाच म्हण "पाऊलवाट".
-----
नसतेच "वाट"-
फक्त नावेमागची लाट.
खूपच छान ...
अनुवाद आवडला ..
18 Dec 2008 - 8:44 am | घाटावरचे भट
मस्त आहे अनुवाद. थोड्या शब्दांत केवढं काही सांगितलं आहे....
18 Dec 2008 - 10:35 am | चित्रा
कवितेत "वाट" ही प्रतिमा ऐकली गेली असल्याने (ही वाट दूर जाते, 'सुस्त कदम रस्ते' वगैरेतून) आता 'मळल्यासारखी' झाली आहे, त्यामुळे आधी नाविन्यपूर्ण असे वाटले नाही.
पण नंतर असे वाटले मागे वळून पाहताना वाट न दिसणे, किंवा त्यावर पुन्हा चालता येण्याची साशंकता हे सगळे कवीला अगदी कमी शब्दांत मांडता आले आहे.
असे वाटते.. अर्थ चुकीचा लावत असले तर ती अनुवादकर्त्यांची चूक नाही. मला कविता समजतात असा गैरसमज नाही.
18 Dec 2008 - 5:19 pm | विसोबा खेचर
कविता बिलकूल कळली नाही, पूर्णत: डोक्यावरून गेली..
कवीला नक्की काय म्हणायचे आहे हेच मुळी जाम समजत नाहीये/समजले नाही...
धन्याशेठ, साध्या सोप्या परंतु तितक्याच सुरेख कवितेचे हे एक उदाहरण पाहा आणि प्रामाणिकपणे सांगा कशी वाटली ती कविता!
च्यामारी, अनुवादातून वगैरे अश्या साध्या, सोप्या, मनाला आनंद देणार्या साहित्याचे दर्शन घडवा की आम्हाला! :)
कठीण किंवा अगम्य असते ते सुंदर किंवा सुरेख असतेच असे नाही हे लक्षात घ्या. आपली वरील कविता त्यापैकीच एक.
असो, प्रामाणिक मत. राग नसावा...
तात्या.
18 Dec 2008 - 5:36 pm | लिखाळ
तात्यांशी अगम्याच्या टिप्पणीबाबत सहमत आहे.
कविते सरळ विचारावर असली तरी शब्दांच्या आणि वाक्यरचनेच्या इतक्या कोलांट्या मारते की जे समजले आहे ते खरेच समजले आहे की नाही असा भ्रम होतो आहे.
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 6:08 pm | सहज
अचुक लक्ष्यभेद.
18 Dec 2008 - 10:36 pm | धनंजय
हे असे असावे.
> कठीण किंवा अगम्य असते ते सुंदर किंवा सुरेख असतेच असे
> नाही हे लक्षात घ्या.
सहमत. कठिण आणि अगम्य म्हणून काहीतरी सुरेख वाटू नये.
पण दुसर्या कोणाला एखादी कलाकृती आवडली, तर ते प्रामाणिक मत असू शकते, असा विचार करावा. "ती मला अगम्य वाटली. म्हणून ती अगम्य-म्हणून-सुरेख-नाही-पैकी-एक आहे. तुलाही सुरेख वाटू नये." असे म्हणणे जरा टोकाचे वाटते.
मला कविता अगम्य आहे म्हणून आवडलेली आहे असे नव्हे. ती सुरेख म्हणून आवडली आहे. मला सुरेख नसलेल्या अगम्य गोष्टी मुद्दामून आवडतात असा विचार ठीक नाही. असे तिरकस मन असे बहुधा कुणाचेच प्रामाणिकपणे नसावे, माझे तरी नाही. लोक प्रामाणिक असतात असे गृहीत धरायला हरकत नसते. ती कविता आवडली म्हणणार्याला कुठलातरी सुरेख पैलू दिसला असेल, असे मानावे.
भाषांतरकार अनुवादासाठी आपल्या आवडीच्याच गोष्टी निवडणार. कलाकृतींचा महासागर आहे, भाषांतर करणारे थोडेच आहेत. स्पेनमधील आपल्या गावाबद्दल आपुलकीची, अशी एखाद्या स्पॅनिश कवीची कवितासुद्धा कोणीतरी भाषांतरित करायला पाहिजे - सहमत आहे.
18 Dec 2008 - 10:52 pm | लिखाळ
मी माझे अनुमोदन कशाला आहे आणि ते कसे आहे ते माझ्या प्रतिसादात लिहिले आहेच.
यावर अजून काही तुमच्या खव मध्ये लिहिले आहे.
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 5:34 pm | लिखाळ
कविता नेहमी ऐकलेलेच विचार सांगते असे वाटले. पण शेवटच्या दोन ओळींमुळे छान वाटले.
मागे वळून पाहता एक जी नवी वाट दिसली (जी पूर्वी नव्हती) पण माझ्या चालण्यामुळे घडली त्या वाटेवर पुन्हा मी कशाला चालेन? असा अर्थ अभिप्रेत असेल तर
वाट नवी, पण फिरुन
कधी पुन्हा तुडवशील?
असे लिहिल्यास मला लवकर समजले असते. फिरुन या शब्दात शब्दशः फिरुन आणि पुन्हा अश्या दोन छटा असल्याने ते छान वाटेल.
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 6:10 pm | विसुनाना
आशयघन कविता आणि भाषांतर.
धनंजय, शेवटच्या दोन ओळी तर अशक्य!
भाषांतरात तर जास्त अशक्य...
(ख.व. पहावी.)
18 Dec 2008 - 7:06 pm | पॅपिलॉन
भाषांतर चांगले जमले आहे फक्त wanderer ला वाटसरू हा शब्द तितकासा चपखल वाटत नाही.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
18 Dec 2008 - 8:47 pm | धनंजय
मूळ कवितेत "कामिनान्ते" = "(वाट) चालणारा" असे आहे. माझ्या मते "वाँडरर" अनुवाद तितका बरोबर नाही, पण अगदी चूकही नाही.
18 Dec 2008 - 8:24 pm | मीनल
मला कळलेला अर्थ देते.
हा अनुवाद एका वाटसरूला उद्देशून आहे हे वेगळे सागायला नको.
कवी म्हणतो --
रस्त्यावरून जाताना त्यावरून आधी गेलेल्यांच्या काही खूणा दिसतील.त्या पावलांच्या खूणांनी ती वाट तयार झाली आहे अस तू म्हटलस तरीही तू चालूनच ती `तूझी` वाट ठरणार आहे.तू पुढे गेल्यावरच ते मागे पाहिलस तर ते तूला कळेल की ती फक्त तूझीच होती.
नाव जशी पाण्यावरून गेली की काही काळ त्यामागून लाटा जाता.पण पुन्हा पाणी होते तसे राहते. तसच तू चालून गेलास तरी ही त्या वाटेवर येणा-या नवीन वाटसरूला ती नवीनच राहील.म्हणजे तूझ्या चालण्याच्या खूणा त्याला दिसणार नाहीत.तू पुन्हा तिथून गेलास तर ती तूला ही नविनच वाटेल.
मला वाटत की या अनुवादाचे तात्पर्य असे आहे --
प्रत्येकाने आपला मार्ग आपण स्वतःच ठरवायचा /निवडायचा असतो.तो दुस-याने अवलंबला असेल तरीही तो स्वतःसाठी वेगळा असतो.
आपल्या नंतर पुन्हा तोच मार्ग कोणी पत्करला तर तो त्याच्यासाठी ही वेगळा असतो.आपल्यासाठी ही वेगळ्या वेळी/काळी तो वेगळा ठरू शकतो.
प्रत्येकाच्या जिवन मार्गातले अनुभव ,अडथळे ,सहजता वेगळी असते.
थोडक्यात -- प्रत्येक क्षण नविन असतो.
धनंजय ,मला कळलेले बरोबर आहे का?
इतर वाचकांनाही आपले मत कळवावे.अधिक अर्थबोध होईल.
मीनल.
18 Dec 2008 - 10:08 pm | धनंजय
माझी चूक :
"वाटसरू, तुझ्या पाऊलखुणा -"
असे असायला हवे होते. म्हणजे आशय आणखीच खुलतो.
> त्यावरून आधी गेलेल्यांच्या काही खूणा दिसतील.
असे नसून, वाटसरू चालल्याशिवाय आधी गेलेल्यांच्या (कुठल्याच) खुणा दिसणार नाहीत.
19 Dec 2008 - 12:20 am | मीनल
आधिचे चूकीचे वाटत नाही आहे.
पण तुम्हाला अभिप्रेरित ते नव्हते.
"वाटसरू, तुझ्या पाऊलखुणा -" या बदलामुळे तुम्हाला अभिप्रेरित आहे तो अर्थ स्पष्ट होईल.
मीनल.
19 Dec 2008 - 12:42 am | विसोबा खेचर
चला, म्हणजे एकंदरीत मला एकट्यालाच ही कविता दुर्बोध वाटली असे नव्हे! :)
तिचा अर्थ जुळवता जुळवता बर्याच मंडळींची नकळत दमछाक झालेली दिसते आहे. बरं, जळ्ळं त्यातूनही फार मोठ्ठा गहन अर्थ या कवितेत सांगितलेला आहे असेही वाटत नाही..
असो..
तात्या.
19 Dec 2008 - 2:17 am | चित्रा
दुर्बोध म्हणण्याचे कारण नाही, कवितेचे कधीकधी वेगळे वेगळे अर्थ लागू शकतात.
पण कवीला अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा असू शकतो.
अर्थ लावताना दमछाक करून घेण्याचा प्रश्न नाही. पण लागलेला अर्थ बरोबर आहे का असे विचारले म्हणून काही वाईट नाही.
काहीजणांच्या नशिबात असावे की त्यांना लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत राहावी लागतात. अशा वेळी दया येते, कुठून कविता टाकली असे वाटत असले तरी आश्चर्य नाही.
19 Dec 2008 - 6:01 am | सहज
सुरवातीला नक्की अर्थ लावताना गोंधळ झाला तरी इतर लोकांचे प्रतिसाद, लेखकाने दिलेले स्पष्टिकरण यातुन सुरवातीला अगम्य, दुर्बोध वाटणारी कविता बर्यापैकी समजते.
हीच तर "फोरमची" खरी मज्जा.
कविता चांगली आहे.
19 Dec 2008 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे
काय हाय अदुगर वाट च नस्तिया. कुनितरी यखांदा पैला जानार. त्याच्या खुना कुठतरी उमाटनार. मंग दुसरा ते पघनार. त्येला बी जावस वाटल कि मंग त्यो बी त्येचा माग काडत जानार. मंग अजुन खुना दमदार व्हनार. मंग तिसरा अस करत करत वाट तयार व्हनार. आता यखांदा वाट सोडुन गेला कि फापालनार. पन त्येच्या पाउलखुनांनी दुसरा तिसरा आला कि त्ये फापालन बी मार्गदर्शन व्हनार. वाटेव काटंकुट असत्यात तव्हा व्हाना घालुन जावा. आमाला व्हाना घालायची सवं नसायाची.बाकीची प्वॉर बी न्हाई घालायची. कुड हरावली म्हजी शोदाशोद. पन मंग काय व्हायच कि यक त ग्वॉत तरी पाय भरायाचा न्हाई त मंग बाबळीचा काटा घुसायचा पायात. आता ग्वॉत भरला त मातीत फर फर करुन चाल्ला फुड. पन काटा भरला कि चाल्ला लंगडत.आमी मंग व्हाना घालायला शिकलो. तुमी बी घाला. आन कंच्या बी वाटेन जावा. वांदा नाय.
(पांडु चंभाराच्या व्हाना घातलेला)
प्रकाश घाटपांडे