'ध' चा 'मा' होवुन पुर्वी एक खून पुण्यात पडला होता. इथे अमेरिकेत 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचे रोज खून पाडले जायचे. '' आय वान्त तू बीसीत रंडन अँड लोम''....हे नेहमीच.
एकीकडे जपानी लोकांची इंग्रजीशी अशी हाणामारी चालली होती तिथे मी सुद्धा आपल्या परीने जपानी भाषेची मन लावून ऐसी की तैसी करत होते.
'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा. एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती. या बाईला अचानक वेडाचा झटका आला की काय म्हणून पार हबकुन गेले बिचारे....
बरीच वर्षे या लोकांच्या सहवासात राहूनसूद्धा मी काही नीट जपानी शिकले नाही. याला एक कारण असे होते की मला सुरुवातीला वाटलं होतं की या लोकांशी बोलून बोलून माझी भाषा छान पक्की होईल. पण हे लोक त्यांचा इंग्रजीचा सराव व्हावा म्हणून माझ्याशी इंग्रजीतच बोलायचे. आता माझं इंग्रजी त्यांना कुठल्या दृष्टीने सुंदर वाटायचं कोण जाणे. पण अमेरिकन लोकांशी बोलतांना मी "हाय, हाउ आर यू?" किंवा "इट्स अ ब्यूटिफुल डे टुडे" सारखी कठीण वाक्य सटासटा बोलत असल्यामुळे बहुतेक त्यांना तसं वाटत असावं.
जपान जरी मागे राहिलं असलं तरी आमचे जपानी ऋणानुबन्ध मात्र अजुन सुटले नव्हते उलट पुढल्या काही वर्षात ते आणखीच पक्के होणार होते.
या टिपिकल अमेरिकन मिडवेस्टर्न खेडगावात तीन- चार जपानी कंपन्यांचे कारखाने होते. सगळ्या कारखान्यांचे मिळून जवळ पास तीसेक एक्सपॅट जपानी कुटुंबे इथे राहात होती. आमच्या कंपनीचे आम्ही बारा जपानी कुटुंबे होतो. आता जरी जन्माने नसलो तरी आमची गणना तिथे " वुई झापानीझ फॅमीरिस" अशीच व्हायची.
कारखाना अमेरिकेत होता तरी इथे काम करण्याची पद्धत मात्र जपानी. ऑफिस मधे सगळ्या कर्मचार्यांना गणवेश असायचा. सी. ई. ओ. पासून शॉप फ्लोर वरच्या ऑपरेटर पर्यंत सगळे सारख्याच कपड्यात. कोणालाही क्यूबिकल वगैरे ही ऐश नाही. सगळ्यांची टेबलं लाईनीत शाळेतल्या वर्गासारखी, ओपन लेआऊट. बॉसचे टेबल सगळ्यात मधे त्यामुळे त्याचं सतत सगळीकडे लक्ष. या जपानी सी. ई. ओ. ची शिस्त असायची, ती म्हणजे तो स्वत: आणि त्याच्याबरोबरचे हेड ऑफीसचे बारा लोक ह्यांनी सगळ्यांपेक्षा एक तास आधी यायचं आणि सगळे गेल्यानंतर तीन तासांनी जायचं. जपानचं वर्क कल्चर त्याने आपल्या टीम पुरतं तसंच ठेवलं होतं, पण स्थानिक कर्मचार्यांना मात्र त्याचा त्रास नव्हता. तसेही जपानी लोकांना कमीत कमी तेरा तास ऑफिस मधे बसलं नाही की अक्षरश: ताण येतो, मनात अपराधी भावना येते. त्यांच्या बायका तर त्यांच्यापेक्षा वरताण. इतक्या की, नवरा जरा बर्यापैकि वेळेवर घरी आला की हा असा कसा लवकर आला? आता शेजारीपाजारी काय म्हणतील हे टेन्शन त्यांना येतं.
आमचा मैत्रिणिंचा ग्रूप मस्तं जमला होता. त्यापैकी काही जणी इंग्रजी चांगलं बोलायच्या. अर्थातच त्यांच्याशी माझी भाषेमुळे जास्ती मैत्री झाली. सगळ्याजणी छान अगदी साध्या होत्या. ही सगळी कुटुंबे इथे साधारण चार सहा वर्षांसाठी यायची आणि मग पुन्हा जपान ला परत. आधी आपला देश सोडतांना भयंकर कुरकुरणारे हे लोक इथे आले आले की इथल्या अमेरिकन ऐसपैस आयुष्याला भलतेच सरावायचे.
जपानपेक्षा महागाई कमी आणि पगार जास्ती. मग काय? शॉपिंग म्हणू नका, गोल्फ म्हणू नका, मोठ्या गाड्या म्हणू नका आणि मोठाली घरं म्हणू नका - थोडक्यात जीवाची अमेरिका करून घ्यायची पाच वर्षात, असा यांचा हिशोब. पण एक समस्या मात्र होती. भाषेची समस्या. पुरूष मंडळी बाहेर काम करतांना जरातरी भाषेचा सराव करून घ्यायचे पण बायकांना मात्र घरी राहून असे करणे कठीणच. म्हणजे त्या इंग्रजीच्या शिकवणीला वगैरे जात असत पण प्रगती बर्यापैकी मंद असे. याचा परिणाम असा की हे सर्व लोक नेहमी एका समुहात राहात असत. एखाद्या पाण्यात असलेल्या बेटासारखे ! त्या समुहात, त्या ग्रूपमधे त्यांना सुरक्षित वाटत असे. सगळयांचे एकमेकात खूप छान संबंध होते. या लोकांच्या उपजत कळप प्रियतेची अत्यंत चांगली बाजू ही की या आमच्या ग्रूप मधे कोणालाही अगदी रात्री दोन वाजता जरी काही मदत लागली तरी हे लोक धावत येत असत. आता हीच गोष्ट जपान मधे करतील का ते माहीत नाही पण इथे परदेशात मात्र हे लोकं देश, भाषा आणि कंपनी याची बांधिलकी जिवापाड जपायचे.
अमेरिकेत आल्यावर जपानी पुरूष का कोण जाणे पण स्वत:चं नाव बदलून सोपं अमेरिकन नाव घ्यायचे. उदा. फुमिओ चं जेफ, हिरोशी चं मार्टिन पण बायका मात्र आपलं तेच नाव राहू द्यायच्या. माझ्या बहुतेक सगळ्या मैत्रिणिंची नावं चिकाको, एरिको, नात्सुको, शिएगो, आकिको अशी सगळी 'को' नी संपणारी.
दिसायला, वागायला, बोलायला जपानी लोक फार मृदू असतात. रांग सोडणे, नियम मोडणे किंवा वचवचा बोलणे यांच्यासाठी अशक्य आहे म्हणजे सामाजीक जीवनात ! आता त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात त्यांचे नैसर्गिक मानवी गुण दोष अर्थात दिसणारच.
जपानी स्त्री ही अस्ताव्यस्त अवतारात, गबाळ्या कपड्यांमधे बाहेर कधीच दिसणार नाही. नेहमी फिक्या, नाजूक रंगाचे आणि अत्यंत क्लासी कपडे. परफ्यूम्स अगदी मंद सुवासाची. केस नेहमी छान कापलेले, सेट केलेले. हसणार तरी नाजूक. आपले दात दिसणार नाही अशा बेताने खुदुखुदु, तोंडावर हात ठेवून. मेकअप ची प्रचंड आवड. तो केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवणे म्हणजे यांच्या दृष्टीने भयानक वाईट समजल्या जाणारी गोष्ट. स्त्री असो की पुरूष, यांचं वैशिष्ठ म्हणजे हे सगळे लोक दिसायला आपल्या वयाच्या दहा-पंधरा वर्षे कमीच दिसतात. अंगाने अत्यंत सडपातळ आणि चपळ. तुरुतुरु करत सगळी कामं पटापट करत असतात. दिसण्यावरून, हालचालींवरून यांच्या वयाचा अंदाजच येत नाही.
स्त्रीयांची एक मजेशीर लकब सांगते. या बायका फोन वर जेव्हा बोलतात तेव्हा अतिशय गोड, नम्र आवाजात लाडीक पणे बोलायला सुरू करतात. आता हा गोड आवाज म्हणजे जरा अतीच असतो. अगदी तीस, चाळीस, पन्नास, साठ वय काहीही असो या स्त्रिया फोनवर बोलतांना सोळा, सतरा वर्षाची तरुणी कशी बालिश, लाडीक आवाजात बोलेल त्या आवाजात बोलतात. फोन उचलता क्षणी अगदी लाजत, मुरकत, बावरत बोलणं सुरू होतं..." मोशी, मोशी, हे अमक्या अमक्या चं घर आहे बर्र का, काय काम आहे हो आपलं? सांगा बरं..." साधारण या सुरात.
आता फोन वर जर नवरा असला तर तो आपल्या कमावलेल्या तुसड्या स्वरात सांगतो '' अगं ए बाई,..पुरे झालं...मीच आहे " मग बायको सुद्धा नवर्याच्या मॅचिंग टोन मधे लग्गेच त्याच्यावर खेकसते '' हं...क्कायेय आहे...बोल लवकर, हज्जार कामं पडलीयेत माझी.."
यांच्या अंगात उपजत कला असते . बोटात जादू असते. कुठलीही गोष्ट मग स्वयंपाक करणे असेल, वीणकाम, शिवणकाम, पियानो वाजविणे असु दे नाहीतर अगदी गोल्फ खेळणे असु दे. कुठल्याही गोष्टीत अफाट जीव ओतून काम करतील. ज्या प्रीसीजन ने गोल्फ खेळतील तेच प्रीसिजन इतर सर्व कामांमधे. साधं गिफ्ट पाॅकिंग इतकं सुरेख करतात की त्यांनी दिलेलं गिफ्ट उघडवसंच वाटू नये.
हे लोक नेहमी एका विशिष्ट चाकोरीत, आखलेल्या मार्गात चालतात. प्रत्येक गोष्टीला एक ठरवलेली पद्धत, एक सिस्टम असते. या सिस्टिम च्या बाहेर काही वेगळं करायला या लोकांना मानवत नाही. एखादी नेमुन गोष्ट, आखून दिलेला नियम मात्र हे लोक अगदी इमाने इतबारे पाळतात. इम्पल्शन, सर्प्राइज़ हे शब्द यांच्या शब्द कोषात नाहीत. या लोकांना कुठलीही गोष्ट एकदम पटकन मनात आले म्हणून केली अशी जमत नाही. सगळं नीट ठरवून, वेळापत्रक बनवून.
या पद्धतीला आमचा ग्रूप पण अपवाद नव्हता. काही बेत ठरवायला भेटायचे असेल किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर तर एक विशिष्ठ प्रणाली ठरलेली होती.
तो काळ होता २००० च्या सुरुवातीचा. तेव्हा लॅंडलाइन वापरायचा जमाना होता. आमची एक लिस्ट होती. प्रत्येकीला एक नंबर नेमुन दिलेला असायचा. आता समजा मी पाच नंबरवर आहे आणि काही निरोपा निरोपी करायची असेल तर चार नंबरवाली मला फोन करणार आणि मी सहा नंबर वालीला. सीक्वेन्स हा ठरलेला, वर्षानुवर्षे. कुठे बाहेर जेवायला जायचे असल्यास कोणाची गाडी चालवायची पाळी आहे हे सुद्धा ठरलेलं, कोण कोणाला आणि कधी पिक अप करणार हे सुद्धा मिनिटाच्या हिशोबाने. एकीला सहाला, दुसरीला सहा वाजून चार मिनिटाने तर तीसरीला सहा वाजून आठ मिनिटाने, जेणे करून सहा पंधराला रेस्टोरेंट च्या पार्किंग लॉट मधे सगळे हजर. कुठेही गोंधळ नाही आणि चुक नाही.
आता बिल भरण्याची पद्धत तर सगळ्यात अल्टिमेट होती. म्हणजे अशी की सगळ्यांच्या जेवणाचे एक बिल बनणार. मग त्या बिलाचा किती टक्के हिस्सा कोणी भरायचा हा या आमच्या नवर्यांच्या पदावर अवलंबुन होता. म्हणजे सीइओ ची बायको सगळ्यात जास्ती बिल भरणार आणि मग उतरत्या भाजणीने बाकी सगळ्या. शिस्तीत कॅल्क्युलेटर नी सटासट हिशोब व्हायचे मग हिने १०डॉलर अकरा सेंट्स द्यायचे, तीने सतरा डॉलर दोन सेंट्स अशी अगदी काटेकोर विभागणी व्हायची.
पण कधी कधी वेळेवर कुठे जायचा बेत ठरला की मग जरा पंचाईत व्हायची. कारण पटकन कोणीतरी निर्णय घेणे आणि मुख्य म्हणजे तो बोलून दाखविणे हे यांच्यासाठी सोपं नसतं. त्यामुळे आधी ठरलेलं नसतांना वेळेवर जेवायला जाऊ असे ठरले की मग आमच्या गावात मोजून पाचच्या प्रचंड संख्येत असलेल्या रेस्टोरेंट्स पैकी कुठल्या एकात जायचं यावर सगळ्या जणी एकमेकींना तू सांग, तू सांग म्हणून सुमारे पंचवीस मिनिटे घोळ घालणार. एखादीच्या घरासमोर, टळटळीत उन्हात गोल घोळकयात उभे राहून यांचं पहेले आप, पहेले आप सुरू झाले की मग मात्र माझा पेशंस संपायचा. तेव्हा मी तोंडात येइल त्या रेस्टोरेंट नाव घेऊन कुठे जायचं हे ठरवून टाकायचे आणि त्यांच्या या घोळाच्या भाजीत भस्सकन पाणी ओतायचे. .....
क्रमश:....
प्रतिक्रिया
15 Oct 2015 - 4:49 pm | जातवेद
मस्त वाटतं वाचायला. छान लिहलं आहे.
पुलेशु
15 Oct 2015 - 4:57 pm | रुस्तम
पु भा प्र...
15 Oct 2015 - 5:09 pm | एस
खुसखुशीत!
15 Oct 2015 - 5:14 pm | बॅटमॅन
मोशी मोशी, वाताशिवा बॅतमॅनदेस.
लेख आवडला एकदम.
15 Oct 2015 - 5:16 pm | रेवती
लेखन आवडले. किती ती शिस्त आणि काटेकोरपणा!
फोनवरील आवाज कानात ऐकू आले. ;)
15 Oct 2015 - 5:30 pm | मित्रहो
लेख आवडला. जपानी लोकांच्या शिस्तीबद्दल, काटेकोरपणाबद्दल छान माहीती दिलीय.
'Thank you for working hardly.' हे वाचल्यावर मी गारद झालो होतो. ते आठवले
15 Oct 2015 - 6:00 pm | द-बाहुबली
सुमिको निशीमुरा नावाच्या क्लायंटसोबत जवळपास ५ महिने काम केले असल्याने जपानी भाषा औपचारीक पातळीवर जुजबी का होइना पण थांग लागण्या इतपत समजते. तिलाही भारतीय संस्कृती रोचक वाटली. तिला कॉलेजमधे वर्ल्ड लँग्वेजमधे संस्कृत हा ही एक ऑप्शन होता(जो तिने अर्थात घेतला नाही). समवयस्क असल्याने अवांतर गप्पा भरपुर व्ह्यायच्या जसे अवतार चित्रपट भारतात जपानच्या १ आठवडा आधी कसा रिलीज झाला वगैरे वगैरे वगैरे....
एकदा ती ऑस्ट्रेलिया वरुन फिरुन आली (चुकीच्या सिजनमधे) तर प्रचंड उन्हाळा होता, मी प्रश्न विचारला हाउ वाज ऑस्ट्रेलिआ ? फटकन म्हणाली इट वाज फकिंग हॉट... मग जरा शांत झाली आणी करेक्शन केले इट वाज वेरी हॉट. मी रिप्लाय दिला इट्स ओके, आय वाज कंफर्टेबल विद "फकिंग हॉट". यावर ति पुन्हा हसली (स्माइली अॅडवली) व म्हणाली कधी कधी काम करतान अनौपचारीक भाषा तोंडात येउन जाते. मला ती कधीच पारंपारीक जपानी गृहीणी टाइप ( औपचारीक गुडी गुडी ) व्यक्तीमत्व वाटली नाही. विषेशतः जपानी लोक इंग्रजी बोलताना प्रचंड गोधळतात (आपल्यापेक्षाही.) पण तीचे इंग्रजीवर प्रभुत्व (अगदी उच्चारांसकट) उत्तम होते. अगदी नेटीव इग्लीश बोलणार्या व्यक्तीचाच भास व्हावा.
फक्त मला तिचा फोटो का दाखवत न्हवती देवच जाणे. म्हणजे तिचा चेहरा व्यवस्थीत दिसेल असा हाय रिजुल्युशनवाला कधीच दाखवला नाही. एकतर स्काइप वर स्टँपसैज फोटो ठेवायची ज्यातही ती किमान निम्मी असायची. ज्यात ती नक्किच छान वाटत होती. म्हणून तिला ऑस्ट्रेलियामधील झालेल्या सहलीचे फोटो दाखव असा हट्ट केला ज्यावर तिने फोटो शेरिंगची लिंक रिप्लाय म्हणून दिली. क्लिक करताच एक से एक सुरेख निसर्गाचे फोटो टायटल व डीस्क्रीपशनसकट उलगडत होते. पण जेंव्हा जेंव्हा ति असायची कुटे तरी लांब उभी अथवा पाठमोरी. तिने कधीही अॅसेट्स लपवले न्हवते. तिचे अगदी बिकीनीसुट मधील बरेच फोटो त्यात होते ज्यात तीने चेहरा सोडुन बाकी सर्व हाय रिजोल्युश्नमधे कैद केले होते. त्याफोटोंवर खाली तिच्या फ्रेंड्सचे तारीफ दायक प्रतिसाद मात्र लिहलेले होते.... अन एकानेही कधी टॉवेलने केस पुसत आहे, कधी पाठमोरी कधी एखादे शहामृगमधे आले आहे कोणतेही कारण घडले असो एकानेही जवलपास ३० एक फोटोत तिने नेमका चेहरा(च) का लपवलाय याबद्दल साधा अवाजही उठवला न्हवता. काही कोडी खरच सुटत नाहीत.. नाही का ?
15 Oct 2015 - 6:03 pm | सानिकास्वप्निल
लेख आवडला, छान लिहित आहेस :)
15 Oct 2015 - 6:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चालली आहे लेखमाला. लिखाणाची खुसखुशीत पद्धत आवडली.
हाजिमेमाश्ते. आनातावा सुहास देस. दो झो योरोश्कू. :)
15 Oct 2015 - 6:20 pm | विवेकपटाईत
लेख आवडला, छान माहिती. जपानी लोकांच्या स्वभावाचे दर्शन घडले.
15 Oct 2015 - 6:20 pm | अजया
लेख आवडलाच.पुभाप्र
15 Oct 2015 - 6:29 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
15 Oct 2015 - 6:38 pm | स्वाती दिनेश
नेमकं लिहिलं आहेस. मुशी मुशी, कोन्निचिव्हा,सुमीमासेन, अरिगातो... ह्या भांडवलावर तर पहिले काही दिस निभले.
पोहोचलेच ग बाई मी मनाने कोबेमध्ये.. तुझ्या पहिल्या भागाबरोबरच. खूप खूप जपानी आठवणी आहेत त्या अशा मनाच्या तळातून अलगद बाहेर येत आहेत परत परत..
स्वाती
15 Oct 2015 - 7:00 pm | मधुरा देशपांडे
किती सुंदर लिहितेस गं. अगदी ओघवतं लेखन. तुझा प्रत्येक लेख खूप आठवणींना उजाळा देतो. लिहित राहा.
15 Oct 2015 - 7:23 pm | सूड
सुंदर लिहीताय, पुभाप्र.
15 Oct 2015 - 7:27 pm | प्रीत-मोहर
आरिगातो गोझाईमास... इतक मस्त आमच्यासाठी लिहिल्याबद्दल
:)
15 Oct 2015 - 7:31 pm | बबन ताम्बे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
जपान्यांना भारतात एव्ह्ढ्या भाषा बोलल्या जातात याचे फार कौतुक आहे.
16 Oct 2015 - 10:52 pm | सौन्दर्य
भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात हे ऐकून माझ्या अमेरिकन मित्रांना खुप आश्चर्य वाटत असे. इतकेच नाही तर आपण आडनावावरून ती व्यक्ती देशातील कोणत्या भागातील असेल हे बिनचूक सांगू शकतो हे ऐकून त्यांचा माझ्या विषयीचा आदर दुणावत असे.
15 Oct 2015 - 7:35 pm | मदनबाण
ओघवती आणि सुरेख लेखन शैली... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
15 Oct 2015 - 8:52 pm | श्रीरंग_जोशी
जपानी लोकांच्या वागण्या बोलण्याबाबतचं वर्णन मी प्रथमच वाचतोय.
जपान्यांच्या कल्पक व्यवस्थापन कौशल्याला तोडच नाही. व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात बहुतेक वेळा जपानी पद्धती व उदाहरणे अंतर्भूत असतात ते उगाच नाही.
पुढील भागाची उत्सुकता आतापासूनच आहे.
15 Oct 2015 - 9:31 pm | आतिवास
ओघवता लेख.
15 Oct 2015 - 11:02 pm | प्यारे१
सकस लिखाण. प्रत्येक वेळी प्रतिसाद देणं नाही होत. पण लेखन वाचतोय. खूप मस्त निरीक्षण नि ते उत्तमरित्या पोचवण्याची खुबी.
पु भा प्र
16 Oct 2015 - 6:16 am | सुधीर कांदळकर
खुसखुशीत, खमंग. चित्रदर्शी वर्णनाला निरीक्षणाची मस्त जोड लभली आहे. सिक्वेन्सिन्ग, घोळात पाणी ओतणे आवडले.
व्व्व्वा! पुभाप्र.
16 Oct 2015 - 7:17 am | चाणक्य
पुभाप्र
16 Oct 2015 - 7:40 am | मनीषा
जपान आख्यान छान रंगलय .
पहिला भाग सुद्धा छान होता .
वाचते आहे.
16 Oct 2015 - 7:51 pm | पैसा
खूप खुसखुशीत!
16 Oct 2015 - 9:15 pm | बाप्पू
जपान बद्दलचा हा लेख देखील आवडला.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
16 Oct 2015 - 9:22 pm | उपाशी बोका
छान लिहिले आहे. पुढील भागाची वाट बघत आहे.
16 Oct 2015 - 9:25 pm | पद्मावति
धन्यवाद मंडळी.
जपान, जपानी आणि मी च्या दोन्ही लेखांवरील तुम्ही सर्वांनी देलेले प्रतिसाद आणि कौतुकासाठी तुमचे मन:पूर्वक आभार. तीसरा आणि अंतिम भाग लवकरच टाकिन.
16 Oct 2015 - 9:42 pm | इडली डोसा
हा भाग पण छान झाला आहे. पुभाप्र.
16 Oct 2015 - 10:28 pm | दा विन्ची
खुसखुशीत!पुढील भागाची वाट बघत आहे.
16 Oct 2015 - 10:54 pm | सौन्दर्य
अतिशय छान लेख, प्रचंड आवडला. तिसऱ्यातच निरोप घेणार हे काही आवडले नाही. अजून येऊ द्यात.
17 Oct 2015 - 12:08 am | रातराणी
खूप छान! हाही भाग आवडला.
22 Oct 2015 - 6:36 pm | बोका-ए-आझम
तिसऱ्यातच नका हो संपवू. अजून लिहा!
22 Oct 2015 - 7:56 pm | Sanjay Uwach
आतिशय सुंदर लेख. या आधी कसा काय वाचायला राहून गेले कुणास ठाउक. जपानी लोकांच्या बद्दल आणखीन आपण लिहावे असे मला खुप वाटत होते .लिहण्याची खुसखुशीत शैली, क्रम , बारीक निरीक्षण अप्रतिम.
26 Oct 2015 - 4:41 pm | Mrunalini
लेखाचे दोन्ही भाग आवडले. पु. भा. प्र.
12 Jan 2018 - 5:08 pm | विनिता००२
एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती.>>> हे वाचून खदाखदा हसले
लेखमाला सुरेख!!
12 Jan 2018 - 8:52 pm | निशाचर
मस्त लिहिलंय! जपान्यांची ओळख आवडली.
12 Jan 2018 - 9:03 pm | सानझरी
'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा." >> म्हणजे?? मराठीत मूर्ख, बावळट, ईडियट असा अर्थ होत नाही?? मला वाटलेलं 'मूर्ख, बावळट, ईडियट'चं gist म्हणजे 'अहो', म्हणून बायका नवर्याला अहो म्हणतात.. असो.. वाचतेय सगळे भाग.. झकास लिहीलंयस..