आमच्या घराबाहेरच्या आवारात ५-६ ढोली असलेले आंब्याचे पुरातन झाड आहे. खंड्या, हळद्या, कोकिळा, कावळे, हॉर्नबिल यासारखे अनेक पक्षी सकाळची कोवळी उन्हे अंगावर घ्यायला, तसेच निवांत व्हायला ह्या झाडावर बागडत असतात. तसं पाहील तर ह्या झाडाला साळुंखी पक्षांची वसाहत म्हणू शकतो. कारण झाडावरच्या ढोलीमध्ये साळुंखी पक्षांची कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत असतात. हे पक्षी इतरत्र वावरतानाही जोडीने किंवा घोळक्याने दिसतात. क्वचित एखादा भरकटून किंवा भांडून-रागावून एकटा फिरताना दिसतो.
माझ्या निरीक्षणानुसार वेगवेगळ्या मूडनुसार ह्या पक्षांच्या आवाजात चढ-उतार असतो. सकाळी चांगल्या मूड मध्ये असले की त्यांचा संवादातून गोड आवाजाची कुजबुज ऐकू येते. काही वेळाने बहुतेक त्यांचा ऑफिस टाइम झाल्यावर घाई-गडबडीचा आवाज येतो. ह्यावेळी आवाजाची पट्टी बेताची पण घाई-गडबड चालू असल्यासारखे वाटते. दिवसभराच्या पोटापाण्याची सोय करण्याची लगबग ना ह्यावेळी. कधी कधी कर्कश्यही आवाज काढतात. ह्यांच्याच वसाहतीतली भांडणे अजून काय? ह्यांचा कोणी दुश्मन आला की मात्र एकदम कर्णकर्कश्य आवाज काढतात.
एक दिवस रविवारी घरी होते तेव्हा ह्या पक्षांचा कर्कश्य किलकिलाट ऐकू आला. नक्कीच काहीतरी गडबड आहे काहीतरी वेगळे टिपायला मिळणार असे वाटून कॅमेरा उचलून मी पाहायला गेले तर एका ढोलीच्या भोवती ४-५ साळुंखी जमा होऊन त्यात टोकवून पुन्हा वर मान करून एकमेकांशी भांडत होते. ढोलीत एक गोणपाटाचा तुकडा होता. त्यावरूनच काहीतरी भांडण चालू असावे. मी जवळ जाऊन फोटो काढू लागले. मला वाटलं मला पाहून घाबरतील आणि वर्गात टिचर आल्यावर शाळेतली मुलं जशी एकदम गप्प बसतात तशी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून घाबरून बसतील. पण मला तीळभरही न घाबरता ह्या जिथल्या तिथे भांडत होत्या. मला कितीही वाटले की ह्यांचे भांडण आपण आटोक्यात आणावे तरी त्यांचा संवाद समजायला हवा ना. आपण काहीच यांच्यात लुडबूड करू शकत नाही हे जाणून मी आपले त्यांचे फोटो काढण्याचे काम करू लागले. काही वेळाने तर कहरच झाला भांडण वाढून दोन साळुंख्यांची उडत उडत पंख फडफडवत हवेत कुस्ती चालू झाली. हवेत तोल न राहिल्याने दोघी जमिनीवर पडून लढू लागल्या. मग आपोआप शांत झाल्या. त्यांच्यापैकी कोणी जिंकले-हरले की त्यांनी समझोता केला माहीत नाही. पण बर्याचदा असा चिवचिवाटही असतो ह्यांचा. भांडणात कर्कश्य आवाजही काढतात ह्या मध्येच.
आमच्या आजूबाजूच्या परिसरात हिरवाई, गवत आहे त्यामुळे काही सापांच्या जातीही इथे आपल्या पोटापाण्यासाठी हिंडत असतात. पावसाळी,हिवाळी बेडूक-उंदीरांची मेजवानी संपली की पक्षांच्या अंड्यांसाठी हे साप विशेषकरून धामण सारखे जनावर झाडांवर लक्ष ठेवून असतात. आमच्या आवारात जेव्हा हे साप भक्ष्याच्या शोधात येतात तेव्हा साळुंख्यांच्या नजरेस पडताच त्या कर्णकर्कश्य ओरडू लागतात. ५-६ साळुंख्यांच्यामध्ये एखादा कावळाही काव-काव करत असतो. असा आवाज आला की साप आला हे आम्ही लगेच समजतो. ह्या साळुंख्या इतक्या धीट असतात की साप मोकळा दिसताच त्याला टोचायला जातात. आपल्या चोचीने सरपटत्या जनावरावर हल्ला चढवीत असतात. सापही ह्या साळुंख्यांना घाबरून आड जाऊन लपतात. उन्हाळ्यात असे दृश्य आम्ही वारंवार पाहतो.
पण मागच्या उन्हाळ्यात एक वेगळेच दृश्य पाहिले. एक धामण जातीचा साप साळुंख्यांच्या ढोलीजवळ २-३ दिवस येत होता. साळुंख्या त्याला टोचून टोचून पिटाळून लावायच्या. हे झाड आमच्या घराच्या शेजारीच असल्याने आम्हीही धास्तावलोच होतो. घराच्या खिडक्या-दरवाजे कायम बंदच ठेवत होतो. असे साप अगदी घराच्या जवळ असले की आम्ही लगेच सर्प मित्रांना बोलावतो. पण एक दिवस रात्रीच हा साप ढोलीच्या झाडावर आला. सर्पमित्रांना फोन केला तर सर्प मित्र त्या दिवशी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साळुंख्यांचा आक्रोश चालू होता. आम्ही घरातील लहान-थोर सगळेच खिडकीजवळ धास्तावून टॉर्च च्या साहाय्याने धामणीवर नजर ठेवून होतो. साळुंख्याच्या चोचींचा वार हुसकावत धामण सरकत सरकत ढोलीत गेली. त्या ढोलीची मालकीण आता मात्र अधिकच उग्र रूप धारण करून डायरेक्ट त्या धामणीच्या तोंडाजवळ वार करायला लागली. हे दृश्य पाहताच आमच्या घरातील काही मंडळी त्या धामणीला त्या ढोलीपासून परावृत्त करण्यासाठी बाहेर आवाज करू लागली. ढोली खालीही नाहीत जरा उंचच आहेत त्यामुळे काठी वगैरे मारणेही शक्य नव्हते. काही केल्या धामण आणि साळुंखी दोन्ही जागचे हालेनात. दोघांच्या झुंजीमध्ये शेवटी धामणीने त्या साळुंखीला तोंडात पकडले. आता तर कोणीतरी त्या धामणीवर दगडही मारण्याचा प्रयत्न केला ती साळुंखी त्याच्या तावडीतून सुटावी म्हणून, पण सगळे प्रयत्न व्यर्थ होते. इतरवेळी माणसाची चाहूल लागताच दूर पळणारे हे साप आज इतका आवाज आणि दगड झेलूनही आपल्या भक्ष्यापासून परावृत्त होत नव्हता. शेवटी त्या धामणीने त्या वीर साळुंखीला शेपटीपासून डोक्यापर्यंत हळूहळू गिळलेच. आम्हा सगळ्यांचा हे दृश्य पाहताना थरकाप उडाला.
त्या रात्री आम्ही शांत झोपू शकलो नाही. मनात सारखे येत होते का ती साळुंखी उगाच त्या धामणीशी भिडायला गेली. पण लक्षात आलं की त्या साळुंखीचा जीव त्या ढोलीत अडकला होता, कदाचित तिची पिले किंवा अंडी त्यात असतील. शेवटी प्राणापेक्षा प्रिय आपली पिले असणारी आई होती ती. काही दिवस ह्या घटनेने मन खूप अस्वस्थ होत. आम्ही खूप दूषणे लावली त्या धामणीला पण नंतर विचार केला, सापासाठी ते भक्ष्य अन्न होते. उन्हाळ्यात जमिनीवरचे बरेचसे भक्ष्य कमी झाल्याने हे साप आपली उपजीविका चालविण्यासाठी हा मार्ग अवलंबतात. निसर्गचक्रातील अन्नसाखळी पुस्तकात वाचलेली त्याचे प्रात्यक्षिक पाहीले.
दिनांक ११ ऑक्टोबर, २०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशीत.
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/dholi/articleshow/493...
प्रतिक्रिया
13 Oct 2015 - 11:36 am | एस
फार छान निरीक्षण आहे. शेवटी 'जीवो जीवस्य जीवनम्' हेच खरं!
14 Oct 2015 - 3:10 pm | कपिलमुनी
"जीवो जीवस्य जीवनम्' हेच खरं!"
14 Oct 2015 - 9:07 pm | मदनबाण
अनुभव कथन आवडले. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
14 Oct 2015 - 9:30 pm | मांत्रिक
:( :( :(
निसर्गाचा क्रूर न्याय!!!
15 Oct 2015 - 10:59 am | जागु
एस, कपिलमुनी, मदनबाण, मांत्रिक धन्यवाद तुम्हाला लिखाण आवडल्याबद्दल.
खरच अजूनही ते आठवल की अस्वस्थ वाटत.
15 Oct 2015 - 11:56 am | जातवेद
निसर्गाचा नियम. त्याला आपण काय करणार. त्या साळुंख्या पण छोट्या किटकांना मारुनच जगत असतील ना?
15 Oct 2015 - 11:57 am | मार्मिक गोडसे
लेख आवडला.
निसर्ग व त्यातील घडामोडींचा आनंद तटस्थ राहुनच घ्यायचा असतो, हस्तक्षेप अजिबात करू नये, जो तुम्ही धामणीला तिच्या भक्षापासून दूर ठेवण्यासाठी आवाज करून, दगडाने, काठीने मारून केला. दिसला साप की मार अशी आपली मानसिकता, भले तो विषारी असो वा बिनविषारी. असे केल्याने निसर्गाचा असमतोल वाढण्यास मदत होते.
नशिबवान आहात, हॉर्नबिलसारखा दुर्मिळ पक्षी बघायला मिळतो तुम्हाला. त्याचा एखादा फोटो असेल तर बघायला आवडेल.
15 Oct 2015 - 12:20 pm | जागु
अहो गोडसे काठीने मारले नाही किंवा दगडाने मारले नाही. आपल्या डोळ्यासमोर घडत होते म्हणून हुसकावण्याचा प्रयत्न केला. वरच्या लेखात स्पष्ट लिहीलय की आम्ही नेहमी सर्पमित्रांनाच बोलावतो.
15 Oct 2015 - 12:32 pm | मांत्रिक
तुम्ही चूक केली असं मला तरी वाटत नाही. डोळ्यासमोर असलं पहायला नको वाटतं. आणि हो तुम्ही तुमच्या घरातच होतात. कुठे अभयारण्यात जाऊन प्राण्यांच्या जेवणात नक्कीच दखल देत नव्हतात. एक वर्शांपूर्वी एका मांजरीच्या २-३ महिन्यांच्या पिल्लाला चार पाच कुत्र्यांचं टोळकं जमून फाडून टाकायच्या बेतात होतं. त्यांनी त्याची पाठीचा कणा देखील फोडलेला होता. मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. सगळी कुत्री हाकल्ली. एक डॉ. स्वखर्चानं बोलवला. डॉ. नं इंजेक्शन व गोळ्या दिल्या पिल्लासाठी. पण सांगितलं ते जगणार नाही आता. पाठीचा कणा डॅमेज झालाय. रात्रीतूनच ते पिल्लू मेलं.
15 Oct 2015 - 12:26 pm | जागु
हा घरात आलेला. त्यालाही न मारता सर्पमित्राच्या स्वाधीन केला.

15 Oct 2015 - 12:31 pm | जागु
हा घ्या हॉर्नबिल उर्फ धनेश

15 Oct 2015 - 12:34 pm | मांत्रिक
हा पक्षी फार गंमतीशीर आहे. रात्रीचा झाडावर बसलेला असला आणि नवख्या माणसाला माहित नसला तर त्याच्या मोठ्या आकाराने एखादे भूतच बसल्याचा भास होतो. झाडात त्याची अचानक झालेली रात्रीची खसफस हालचाल देखील नक्कीच डोळे पांढरे करणारी असते.
15 Oct 2015 - 12:53 pm | मार्मिक गोडसे
माफ करा
असे लिहिल्यामुळे माझा तसा समज झाला.
धामणीला जिवे मारण्याचा तुमचा हेतू नसेल परंतू साळुंखीला धामणीच्या तोंडातून सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू होते ज्यामुळे धामणीला ईजाही होऊ शकत होती. कुठल्याही प्रकाराचा हस्तक्षेप करू नये, अशावेळेस सर्पमित्राला बोलावणेही चुकीचे वाटते.
15 Oct 2015 - 1:03 pm | मार्मिक गोडसे
होर्नबिलचे फोटो मस्तंच .
होर्नबिलचे वास्तव्य हे निसर्गाचा समतोल असल्याचे लक्षण मनले जाते.
15 Oct 2015 - 1:22 pm | जागु
निसर्गाचा समतोल असल्याचे लक्षण ही माझ्यासाठी नविन माहीती आहे. धन्यवाद.
तुमचा समज होणे सहाजीक आहे. कारण तो झेलून हा शब्द मी आवाजासाठी वापरायला हवा होता. काठीनेही त्याला मारले नसते. पक्षी सोडवण्याचा प्रत्यत्न केला असता.
मांत्रिक खरे आहे. त्याचा मोठा आकार आणि रुप अंधारात तस दिसू शकत.
अरेरे बिचारी मांजर.
15 Oct 2015 - 8:49 pm | मार्मिक गोडसे
धनेश संरक्षणाचे आव्हान हा लेख वाचा.
16 Oct 2015 - 9:07 am | नूतन सावंत
रविवारी लेख मटामध्ये वाचला होता.छान निरीक्षण आहे जागुताई तुझे.
16 Oct 2015 - 9:34 am | सौन्दर्य
निसर्गात, 'जीवो जीवस्य जीवनम' हेच सत्य आहे त्यामुळे कितीही वाईट वाटले तरी मनुष्याने हस्तक्षेप करू नये ह्या मताचा मी आहे. धामणीसाठी साळून्कीची अंडी किवा पिल्ले (किंवा इतर पक्षी) अन्नच आहे, आणि भूक लागल्याशीवाय निसर्गात कोणताही प्राणी दुसऱ्यावर हल्ला करीत नाही. अपवाद फक्त मेटींग अथवा जागेच्या मालकीहक्काची भांडणे. साप ज्यावेळी उंदीर मारतो त्यावेळी आपण त्यात हस्तक्षेप करीत नाही, पण तोच साप जेव्हा एखाद्या पक्षाचा घास घायला जातो त्यावेळी मग आपण का त्याला अडवायचा प्रयत्न करतो ? सापाच्या दोन्ही क्रियेत भूक भागवणे हाच एक उद्देश असतो ना ? जागू जी, तुमचा लेख अतिशय छान आहे, तुमचे निरीक्षणही सुंदर आहे, फक्त तुमच्या मनाच्या झालेल्या घालमेलीने तुम्हाला नकळत निसर्गात हस्तक्षेप करायला लावला, असे वाटते. मी देखील काही महिन्यापूर्वी एका कासाविणीला तिच्या अंडी देण्याच्या जागेपासून उचलून आणून पुन्हा पाण्यात सोडले होते. त्यावेळी, ती कासवीण चुकून भलतीकडेच भटकली असे मला वाटले होते पण नन्तर चूक ध्यानात आली.
16 Oct 2015 - 10:38 am | जागु
सुरंगी, सौन्दर्य धन्यवाद.
गोडसे वाचते लेख. धन्यवाद.