वांग्याच्या लेखावरून वाडीचा उल्लेख आला आणि आमचा पौर्णिमाक्रम आठवला. बरेच लोक वाडीला नरसोबाची वाडी म्हणतात पण इकडे सगळे नुस्त वाडीच म्हणतात. म्हैसूर डोसाला म्हैसूर मधे नुस्ताच डोसा म्हणतात त्यातला प्रकार. दर पौर्णिमेला वाडीला जाउन यायचे हा बर्याच जणांचा क्रम. मीही वडिलांच्या बरोबर म्हणून बर्याचदा जात असे. अगदी लहानपणीची वाडी आठवते ती म्हणजे खेळणी, ताजे पेढे आणि कवठाच्या बर्फी साठी. बरेच धार्मिक कार्यक्रम वाडीलाच व्हायचे, मग वाडीच्या पुजार्यांची मोठी मोठी थोड्या जुन्या प्रकाराची घरे, त्यांच्याकडच्या त्या तृप्त जेवणावळी आणि कृष्णेत मनसोक्त मारलेल्या डुबक्या. ऐन पावसाळ्यात गेलात तर देव वरती एखाद्या पुजर्याकडे ठेवलेले असतात. कॄष्णेच्या महापुराच्या वेळी मी जेव्हा गेलो होतो, आख्खी वाडी पाण्यात गेलेली. शिरोळ जवळून जाताना एखाद्या समुद्रातुन रस्ता काढलाय काय असे वाटत होते.
असो. तर वाडीला जायचे म्हणजे दिवसातला सगळा क्रम एक्दम पक्का, झोपेतून जागे केले तरी सांगता येईल असा. दुपारचे उन टाळण्यासाठी सकाळी ८ वाजता गाडीला किक, अर्ध्या पाऊण तासात वाडी. मग नेहमीच्या ठिकाणी गाडी लाउन जायचे सुखदेव कडे. प्रत्येकाचा पेढेवाला ठरलेला, तसे आमचे सुखदेव. तर मग तिकडं आधिच्याच ढिगार्यात चपला काढून (ठेवा इथच कुठ जात नईत) त्याच्याकडून नारळ, पावशेर ताजे पेढे (वाडीत दुकान सांभाळणे म्हणजे दुकानात पेढे करत बसणे), खडीसाखर, उदबत्ती आणि मोठा कापूर घ्यायचा आणि मंदिराकडं चालायला लागयचं. उनातून येउन मंदीरातल्या गार गार फरशांवर पाय ठेवले कि जे काही वाटत त्याची सर दुसर्या कशाला नाही. सरळ खाली घाटाच्या पायर्या उतरून नदीकडं जायचं आणि हात पाय मनसोक्त धुऊन दर्शनाला न जाता जायचं उदबत्त्या आणि धुप जाळायला मुख्य मंदिराच्या अगदी समोर टोकाकडच्या जागी. इथुन अशी काही नदि दिसते कि अगदी जलतरण तलावात उंचावरून उडी मारयला केलेल्या फळीवरच उभारल्यासारखं वाटतं. पुढे मुख्य मंदिराच्या मागपर्यंत आलेल्या रांगेत उभ रहायचे. मग पादुका जवळ आल्या कि पहिला शेंदरी रंगात रंगवलेला गणपती, इकडे थोडे पैशे पेटीत टाकयचे आणि पादुकांसमोर यायचे. हातातले सगळे उरलेले पुजारर्याकडे देउन पादुकांसमोरच्या पायरीवर नतमस्तक व्ह्यायचं. पुजारी थोडी खडीसाखर काढुन घेईल नारळावर पुजेतली काही फुलं ठेवेल, परत करेल; बाई असेल तर ओटीत देईल. मग प्रदक्षीणा चालू करयची. सगळ्यात पहिला दक्षिण द्वारासमोर येउन नमस्कार. मग मागच्या बाजुला नरसिह सरस्वतींच्या फोटो च्या इथलं तिर्थ घ्यायचे; कोणि तिर्थासाठी बाटली दिली असेल तर ती भरून घ्यायची. मग तिकडच्या ओळीत असणर्या देवांच्या पाया पडयचे, पुढे अन्नपुर्णा; प्रदक्षिणा पुर्ण. अशा आपल्याला पाहिजेत तितक्या प्रदक्षिणा घालायच्या. गुरूचरित्रात सांगितले आहे म्हणे कि एखादी गरोदर बाई जसे चालते तशा प्रदक्षिणा घालाव्यात, काही लोक त्या बाईचे मुल आता धाउ लागले आहे आनि त्यामागून आपण पळतोय (मुलाच्या) असं चालतात. असो. मग भल्या मोठ्या अंगार्याच्या पेटीतून अंगार्याच्या पुड्या बांधून घ्यायच्या आणि देवासमोरच्या मोकळ्या जागेत येउन स्वस्थ बसायचं. हातातल्या पिशवीतले एक दोन पेढे तोंडात टाकायचे; एखादा बाजुने फिरण्यार्या कुत्र्यांना टाकायचा आणि देवाला साष्टांग नमस्कार करून उठायचे. मग पायर्या चढुन पुन्हा वर यायचे आणि मारूती, पुढे रामचंद्र स्वामी समाधी, नारयण स्वामी, गोपाळ स्वामी करून टेंबे स्वामींच्या मंदिरात. ईथे टेंबे स्वामी, गुळवणी महाराज आणि रंगावधूत महराज. इकडे बसून घरी देण्याएवढे पेढे ठेउन बाकी संपवून टाकायचे. मग मंदिराबाहेर येउन हळद कुंकू विकत घेउन सुखदेव कडे हिशेब करयला (आणि चपला घ्यायला). मग तिकडून म्हादबा पाटिल महाराजंच्या समाधी मंदिरात. इकडे बसुन परत वाटले तर पेढे.
आता यापुढे वाडीच्या बाजारात वांगी वगैरे घ्यायला (अवांतर: तशी कराडला पण फार चांगली मिळतात). हरभर्याचा सिझन असेल तर गाडिच्या मागे बसून खायला सोलाणा. मग त्या स्टंड बाहेरच्या हॉटेल मधे चहा, भूक लागली असेल तर मिसळ नाहितर वडा पाव. परत गाडिला किक मारून घरी जेवायला.
प्रतिक्रिया
5 Apr 2014 - 12:46 am | रामपुरी
लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यात. "नदीत पोहणे" या एकमेव आकर्षणामुळे वाडी फार आवडायची. पेढे हे दुसरं आकर्षण.
(हल्ली वरच्या बाजूला नदीत सांडपाणी सोडतात हे कळाल्यापासून नदीत पाय सुद्धा टाकवत नाही)
5 Apr 2014 - 8:52 am | जातवेद
सांडपाण्याचं काय घेउन बसलात, अहो अख्खी पंचगंगा नदित सोडतात :)
5 Apr 2014 - 1:13 am | यसवायजी
आठवणी..
उन्हात पाय पोळत असताना ते गार पाणी... आहाहा..
नावेतून नदी पार करुन पलीकडच्या त्या मंदीरात जायला फार आवडायचे. आता आठवत नाही, कसलं मंदीर आहे हो ते??
5 Apr 2014 - 2:14 am | प्यारे१
स्मृतिरंजन आवडलं. कृष्णेच्या पाण्याची चवच सुंदर आहे.
5 Apr 2014 - 2:28 am | अमोघ शिंगोर्णीकर
प्रकाशचित्रे... नरसोबाची वाडी...
http://www.maayboli.com/node/19676
5 Apr 2014 - 8:18 am | पैसा
एकदा सांगलीहून धावत पळत गेले होते. मुळात खूप सुंदर ठिकाण असावं. मात्र प्रचंड गर्दीमुळे देवस्थानचं दर्शन घेता आलं नाही आणि माशा आणि एकूण बकालपणा पाहून पेढे, खवा घ्यायचंही धाडस झालं नाही.
5 Apr 2014 - 8:20 am | प्रचेतस
सहमत आहे.
खिद्रापूरच्या भेटीच्या निमित्ताने वाडीला भेट द्यायचा योग आला होता.
बाजार मांडलाय नुसता.
5 Apr 2014 - 9:09 am | जातवेद
आमच्या सवयीचा भाग आहे म्हणून कदचीत वाटत नसेल. पण क्वचित जाणर्यांनी शक्यतो गर्दिच्या दिवशी जाणे टाळावे बराच फरक पडतो.
5 Apr 2014 - 8:25 am | पालव
मस्त
5 Apr 2014 - 8:47 am | कंजूस
इथून गाडीला किक मारली की पाऊण तासात .कुठून ? जरा सांगली मिरज कोल्हा० रे स्टे /बस डेपोचे अंतर लिहाल का ?
भुतं काढण्याचा प्रकार आता तिकडे चालू आहे का ?त्याबद्दल ऐकले आहे .
दत्ताचे सर्वात रम्य ठिकाण (अजूनही)भिलवडी स्टेशन जवळ आहे .येथून जवळच सात किमिवर तासगावातले चांगले गणपतीचे देऊळ आहे .
5 Apr 2014 - 9:01 am | जातवेद
इथून म्हणजे ईचलकरंजी. तिकडे अंतर वेळेतच मोजतात :) मी तर कधी भुतं काढण्याच्या प्रकाराचं ऐकलं नाही. तुम्ही गाणगापुर संदर्भात ऐकलं असेल.
8 Apr 2014 - 12:02 am | खेडूत
भिलवडी जवळ आहे ते औदुंबर.
खरेच अतिशय शांत आणि रम्य आहे!
भुते वगैरे प्रकार तिथे नसतात :)
8 Apr 2014 - 9:08 am | यशोधरा
हो, औदुंबर खरेच खूप सुरेख आहे.
8 Apr 2014 - 8:52 am | पोटे
वाडीला भुतं काड्।अत नाहीत.
ते गाणगापूरला होते.
5 Apr 2014 - 8:58 am | मदनबाण
मला सर्वात जास्त आवडणारे ठिकाण. मी जवळपास ३० वर्ष सातत्याने या जागी येतो आहे,आणि मी या बाबतीत स्वतःला फार भाग्यवान समजतो. :) या जागेशी माझे अतुट नाते आहे.लहानपणा पासुन ते आत्ता पर्यंतचा सगळा बदल मी पाहिला आहे. माझ्या नशिबाने अनेक विद्वान आणि प्रेमळ आणि आचरण संपन्न लोकांचा सहवास मला इथे झाला. त्यातलेच एक म्हणजे रामचंद्र नारायण जेरे-पुजारी {रामशास्त्री} यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृतातला कालिदास पुरस्कार देण्यात आला होता.
माझ्या लहानपणी यांचे बोट धरुन मी देवपुजेसाठी जात असे.. संपूर्ण वाडी-गावाला शिस्त आणी नियम घालुन दिले ते यांनीच.त्याकाळी संपूर्ण गावात दगडांचे रस्ते होते, डांबराचे रस्ते कुठेच नव्हते. दगडांच्या रस्त्यांवरुन अनवाणी चालताना त्यावेळी पाय फार भाजायचे. पवमान {विष्णु स्तुती}ऐकायला मला फार आवडते आणि तेही इथेच देवा समोर बसुन ऐकण्याचा आनंद वेगळाच. इथे अनेक उत्सव आणि विधी पहायला आणि अनुभवायला मिळाले... कन्यागत पर्वात सुद्धा इथे काळ व्यतित करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
गायक अजित कडकडे यांचे सुद्धा वाडीशी जिव्हाळ्याचे नाते आहे,आणि लहानपणी कॄष्णेच्या पाण्यात बुडता-बुडता ते वाचले होते अशी त्यांची आठवण ते सांगतात. तसेच त्यांनी अनेक गाणी दत्त प्रभुंवर आणि वाडीवर गायली आहेत, त्यातली मला दत्त दत्त मुखे म्हणा, पावना दत्त्त आणि नरसोबाच्या वाडीला जाउ चला ही गाणी विशेष आवडतात.
ही गाणी इथे ऐकता येतील :-
http://www.smashits.com/datt-mukhe-mhnna/songs-23271.html
5 Apr 2014 - 2:53 pm | जातवेद
माझे अवधुत म्हणजे आकाशासारिखा हे फेवरेट
5 Apr 2014 - 9:42 am | यशोधरा
वाडी अत्यंत आवडते ठिकाण. मस्त लिहिले आहे.
5 Apr 2014 - 10:19 am | चावटमेला
दत्तगुरूंच्या तीन प्रमुख ठिकाणांपैकी वाडी (हो नुसती वाडीच :)) हे माझे सर्वांत आवडते ठिकाण. लहानपणी बाबा नेहमी स्कूटरने घेवून जायचे. वाडीचा पेढा छानच, एकूणातच कृष्णाकाठी दुधाचे पदार्थ चांगलेच मिळतात. वरील एका शंकेला उत्तर
सांगली ते नरसोबावाडी अंतर - २० किमी, कुरुंदवाड यष्टी पकडावी.
मिरज ते नरसोबावाडी (सर्वांत जास्त सोयीचे) - १५ किमी, दर अर्ध्या तासाला कुरुंदवाड सिटी बस मिरज स्टँड वरून असते.
5 Apr 2014 - 11:46 am | सस्नेह
अजूनही महिन्या दोन महिन्यातून एकदा वाडीला जाते. दत्तगुरूंना दंडवत घालते अन पेढे घेऊन येते.
आणि हो, सोमणांकडचे जेवण विसरलात काय ?
ती वांग्याची भाजी, भरपूर नारळ अन कढीपत्ता घातलेली आमटी, बातात्त्याची भाजी, काकडीची गोडसर कोशिंबीर अन गाजराचे लोणचे ! वर ताजे ताक ! स्स्स !
5 Apr 2014 - 2:51 pm | जातवेद
सोमणांकडे फार कमी वेळा जेवलोय पण जेवण मात्र उत्त्तम असते. जेवणासाठी तिकडे हॉटेल म्हणजे सोमणच!
6 Apr 2014 - 12:49 pm | चैदजा
+११११
सोमणांकडचे जेवण, आणि त्यांचा तो आग्रह करुन वाढणे.
5 Apr 2014 - 8:44 pm | भाते
फेब्रुवारी महिन्यात शुक्रवारी पौर्णिमेला माझा वाडीला जायचा योग आला. सह्याद्रीने मी मुंबईहुन कोल्हापुरला गेलो. देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर मी कोल्हापुरहुन एसटीने वाडीला गेलो.
पायावर पाणी घ्यायला मी खाली कृष्णा नदीच्या पायरीशी गेलो. बाजुला अर्ध्या फुटावर साबण लाऊन कपडे धुवत असलेल्या पाण्यात चुळ भरणारे भक्त मी तिथे पाहिले. नंतर ते साबणमिश्रित पाणी पिणारे हेच भक्त बसमध्ये बसल्यावर बाटलीतल्या शुद्ध पाण्याचा आग्रह करताना पाहुन मला नवल वाटले.
वाडीला प्रचंड गर्दीत कसेबसे दर्शन घेऊन झाल्यावर मी कोल्हापुरला परत जाण्यासाठी सुमारे दोनच्या सुमारास बस स्थानकावर आलो. पुढल्या दोन तासांत किमान ५० बस येऊन गेल्या आणि त्यापैकी ३० कुरुंदवाडसाठी होत्या. (माझ्या सुदैवाने) चारच्या सुमारास कोल्हापुर बस आली. बसमध्ये चढायला अक्षरश: मारामारी करावी लागली. रात्रीची महालक्ष्मी चुकते कि काय अशी भीती मला वाटत होती. पण माझ्या सुदैवाने मला महालक्ष्मीमधुन मुंबईला परत यायला मिळाले.
तेव्हापासुन पौर्णिमेला कोल्हापुर आणि वाडीला जायचे नाही असे मी ठरवले.
6 Apr 2014 - 11:25 am | जातवेद
तुम्हाला महालक्ष्मीच पकडायची होती तर तुम्ही जयसिंगपूर नाहितर मिरजेला ला जायला हवे होते. ते बरे पडले असते आणि एका तासाच्या वेळेबरोबर मारामारी पण वाचली असती :) उगाच उलटे फिरून गेलात.
5 Apr 2014 - 8:51 pm | आत्मशून्य
6 Apr 2014 - 5:12 am | कंजूस
धन्यवाद चावटमेला .भुतांची वाडी ही नाही तर .मला एक शंका आहे .दत्तावतार ,दत्त फक्त महाराष्ट्रातच (आणि गिरनार ,अबुला )आहे .दक्षिणेत त्रिमुर्ती आहे पण दत्तमहाराज ,अनुसुया इत्यादि ऐकिवात नाही .
6 Apr 2014 - 11:12 am | जातवेद
श्रीपाद श्रीवल्लभ या पहिल्या दत्तावतारांचे क्षेत्र पीठापूरम् आणि कुरवपूर ही आंध्र प्रदेश मधली ठिकणे आहेत. प.पू. वासुदेवानंद सरस्वति टेंबे स्वामी महाराज आणि रंगावधूत महाराज यांचे बरेच कार्यक्षेत्र गुजरात मधे आहे. एखादा संप्रदाय किती ठिकाणी जास्त पसरला आहे त्याच्यावर त्याची योग्याता ठरत नाही. बाकी भारतात एवढे खंडीभर देव, त्यांचे अवतार आणि त्या त्या संप्रदायातले महाराज आहेत कि सर्वांनी सगळिकडे प्रसिद्ध असण्याची आवश्यकता नाही.
6 Apr 2014 - 11:35 am | सुहासदवन
जो दत्त अवतार तिन्ही प्रमुख देवांचे as a strategical representation ठरू शकतो तो केवळ महाराष्ट्रक्षेत्री का म्हणून प्रसिद्ध असावा.....
Practically सम्पूर्ण भारतात ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्या तिन्हींपैकी कोणाची एकाची तरी पूजा नक्कीच होते प्रत्येक राज्यात....
मार्केटिंगला अजूनही वाव असावा बहुतेक.....
6 Apr 2014 - 11:55 am | जातवेद
मार्केट लै सॅच्युरेट झालय ओ. सध्या आपापला जो महाराज पकडलाय तोच चालू द्या.
6 Apr 2014 - 1:53 pm | सुहासदवन
उत्तरेच्या खाटू शामबाबांपासून ते दक्षिणेच्या बालाजी सारखी इतर अनेक दैवते इथे पाप्युलर होतात तर मग आपण आपल्या दैवतांची पद्धतशीर मार्केटिंग कधी करणार.....
नाहीतर इथल्या cosmopolitan संस्कृतीप्रमाणे आपले देव देखील काही वर्षांनी cosmopolitan झालेले पाहावे लागतील.....
कृ. मी सहज बोलतोय, केवळ वादाला प्रतिवाद म्हणून नाही.....
7 Apr 2014 - 7:08 pm | कंजूस
बरोबर
7 Apr 2014 - 7:29 pm | जातवेद
पण मार्क मिळणार नाही :)
11 Oct 2015 - 10:46 pm | दत्ता जोशी
आपले देव, त्यांचे देव, दक्षिणेतले देव उत्तरेतले देव असा काही नसत. खातू श्याम बाबा काय, बालाजी काय, पांडुरंग काय, राम प्रभू काय सगळे श्री विष्णूच ( अवतार) . दत्त जन्माच्या वेळेला ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिघेही लहान बाळे झाले असले तरी पुढे ब्रह्म चंद्र आणि महेश दुर्वास रूपाने निघून गेले आणि दत्त+अत्री पुत्र ( ऋषी, सती अनुसूयेचे पती) म्हणून दत्तात्रेय . दत्तात्रय ( तिघे) नव्हे. दत्त महाराजांची भ्रमंती उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात ( नर्मदा परिसर) इथे झाल्याने त्यांची पूजा या भागात जास्ती होते. श्री दत्त गुरु हे नाथ संप्रदायाचे आदीगुरु. (गहनीनाथ - निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर माउली अशी परंपरा ऐकली असेलच )नवनाथ आणि दत्त गुरूंना शैव, बौद्ध आणि जैन धर्मातही आदराचे स्थान आहे. तसेच महानुभाव पंथातले आदिगुरु म्हणजे श्री दत्त गुरूच. मुस्लिम सुफी पंथ आणि दत्तगुरूंचे नातेपण तितकेच दृढ. थोडक्यात सांगायचा तर हा खूप मोठा संप्रदाय आहे आणि त्याचे बरेच पंथ आणि उपपंथ आहेत. असो.
12 Oct 2015 - 12:32 am | तर्राट जोकर
देव की गुरू.... नक्की काय?
12 Oct 2015 - 7:53 am | dadadarekar
.
12 Oct 2015 - 8:36 am | दत्ता जोशी
+१००.
12 Oct 2015 - 8:35 am | दत्ता जोशी
हा प्रश्न शंका म्हणून विचारला गेलाय असे गृहीत धरून उत्तर देतो.
शिव, विष्णू, राम. कृष्ण, विठठल, नृसिंह. त्याच प्रमाणे श्री दत्तात्रेय हे हि देवच. वेगवेगळे दत्तावतार, नाथ, सिद्ध, संत, गौतम बुद्ध यांनी गुरु शिष्य परंपरेने साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले ते गुरु. आणि या सगळ्यांचे आद्य गुरु हे श्री विष्णू किंवा श्री दत्तात्रेय किंवा दक्षिणामूर्ती ( म्हणजे गुरुरूपातील श्री शंकर). यातील कोणीही साधकाचा गुरु असू शकतो. गुरु-शिष्य हि एक सुंदर आणि महत्वाची भारतीय परंपरा आहे. इति लेखन सीमा.
16 Oct 2015 - 12:56 pm | तर्राट जोकर
अंमळ गोंधळ आहे. सविस्तर नंतर टंकतो.
7 Apr 2014 - 6:25 pm | बॅटमॅन
वाडीला जायचं तर मिरजेहून वट्ट १५ किमी अंतर आहे. सांगलीसनं सुद्धा जवळच आहे.
अन बकालपणाबद्दल सहमत आहे. बाजार मांडलेला आहेच-पण गर्दी नसते तेव्हा जावं, छान वातावरण असतं. अर्थात नदी प्रदूषित आहेच म्हणा.
बाकी लेख वाचून वाडीच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. मिरजेहून सायकल ताबडवत मित्र मिळून तिथे जायचो घरनं डबे घेऊन, मग कुठेतरी जागा मिळेल तसे खायचो. पेढे घेऊन, एखादी बासुंदी मारून मग परत फिरायचो. लै मज्जा.
7 Apr 2014 - 9:44 pm | रामदास
श्री.म. माट्यांचा जसे लोक तसे त्यांचे देव हा लेख वाचला होता त्या लेखाची आठवण झाली.
"जसे लोक तशी त्यांची देवस्थाने "
खंत आहेच.
11 Oct 2015 - 9:18 pm | मांत्रिक
अरे मस्त लिहीता राव तुम्ही!!!
झकास राजे!!!
11 Oct 2015 - 9:44 pm | जातवेद
धन्यवाद
11 Oct 2015 - 9:31 pm | dadadarekar
आमचं गाव कुरुंदवाड
11 Oct 2015 - 9:51 pm | तर्राट जोकर
सगळं आध्यात्म हे स्लो मध्येच आहे. लोक त्याचंही भजं करून टाकतेत....
11 Oct 2015 - 10:00 pm | दत्ता जोशी
जाऊ द्या हो, लै विचार करून डोस्क शिणवू नका.
11 Oct 2015 - 10:08 pm | बोका-ए-आझम
वाडी फारच लहानपणी पाहिली होती. पण हा लेख वाचून एकदा परत जावं अशी इच्छा झाली. बाकी बकाल कुठलं तीर्थक्षेत्र नाहीये? काही जास्त काही कमी!
11 Oct 2015 - 10:11 pm | बिपिन कार्यकर्ते
वाडीला एकदाच गेलो आहे. जेव्हा गेलो तेव्हा बर्यापैकी गर्दी होती. पण, एक नदीतली घाण सोडल्यास अनुभव चांगलाच होता. एका घरात जेवलो. करदंट खाल्लं. पेढे घेतले. बासुंदी प्यायलो मनसोक्त. तुम्ही बासुंदीचा उल्लेख केला नाहीत. फारच अप्रतिम होती. जिथे जेवलो त्यांच्याकडे घरी बनविलेली होती. ती पण मस्त आणि मग बाहेर एके ठिकाणी दुकानात प्यायलो ती ही मस्त.
12 Oct 2015 - 12:23 am | दिवाकर कुलकर्णी
बासूंदी कुरूंवाडची फेमस,हे सुधा मूर्ति चं आजोल,
वाडीचे पेढे व कवठाची बर्फी,प्रसिद्ध क वठाची बर्फ़ी अन्य दुनियेत
कुठं मिलत नाही,
12 Oct 2015 - 12:25 am | Sanjay Uwach
श्री नृसिंह सरस्वती यांनी, हे ठिकाण कधी काळी आपल्या तपश्र्चर्या साठी योग्य वाट्ल्याने निवडले होते . हे ठिकाण त्या काळी १ निर्जन ठिकाण २ कृष्णा पंचगंगा यांचा संगम झालेले निसर्ग रम्य ठिकाण ३. अतिशय दाट जंगल असणारे, लोक वस्ती पासून दूर असणारे अशा स्वरूपाचे होते . इथेही त्यांना लोंकानी त्रास दिल्या मुळे, त्यांनी आपल्या तपश्र्चर्या चे ठिकाण बदलावे लागले. मात्र नृसिहवाडी इथे, एका भक्त मुस्लिम सरदाराने, त्यांचे मंदिर उभा केले आहे .त्या मुळे या मंदिराला शिखर नाही आहे. आता मंदिर म्हटले कि बऱ्याच गोष्टी आल्या.लोकांची गर्दी आली . व्यापारी आले, हॉटेलवाले आले,लॉज वाले आले, अर्थात त्यांची नावे थोडी गोंडस असू शकतील उदा: भक्त धाम वगैरे वगैरे . आपल्या वेगवेगळ्या हेतूने प्रेरित होऊन येणारे भक्त आले. मला मात्र लहान पणी वाडीला जायचे आकर्षण होते ते नदीत तासन तास डुबंण्याचे व मामा कडून मिळणाऱ्या गोड गोड साखरी पेढ्यांचे. श्री. पटवर्धन नावचे बेंगलोर मधिल एक तज्ञ डॉक्टर, आपले वैभव संपन्न घरदार, हॉस्पिटल सोडुन आगदी आपल्या मृत्यू प्रर्यंत त्या मंदिरात श्री दत्तगुरुच्या सेवेला राहीलेले मी पाहीले आहेत. आर्थात जसा भाव तसा देव.
12 Oct 2015 - 12:39 am | पद्मावति
वाह, सुंदर लेख.
नरसोबाच्या वाडीचं इतकं छान वर्णन तुम्ही केलंय की तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा होतेय.
12 Oct 2015 - 5:23 am | कंजूस
"करदंट खाल्लं"- कर्नाटक, केरळातलं गुळ सुक्यामेव्याची चिक्कीसारखं "करदन" मिळतं तेच का?
12 Oct 2015 - 10:15 am | दत्ता जोशी
सुकामेवा, गुळ यांची खाऊच्या डींकात बनवलेली पौष्टिक मिठाई.
12 Oct 2015 - 9:25 am | प्रचेतस
लोक वाडीला जातात पण तिथून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरला जात नाहीत याचं मला नेहमीच नवल वाटतं.
12 Oct 2015 - 10:08 am | बिपिन कार्यकर्ते
आम्ही उलटा प्रवास केला. आधी खिद्रापूर आणि मग वाडी.
12 Oct 2015 - 10:06 pm | प्रचेतस
ब्येस्टच.
खिद्रापूर खूपच निवांतपणे पाहण्यासारखं आहे.
मागचं जैन मंदिर पाहिलंत का?
12 Oct 2015 - 10:18 pm | बिपिन कार्यकर्ते
आपण लवकरच एकत्र जाणार आहोत ना, तेव्हकरता ठेवलं आहे ते बाकी! :ड
12 Oct 2015 - 10:22 pm | प्रचेतस
तिकडे यायला कधीपण तयार. :)
12 Oct 2015 - 10:12 am | दत्ता जोशी
तोड्फोडीतून वाचलेले खिद्रापूरचे मंदीर अजूनही अप्रतीम सुंदरच. पण खिद्रापूर हे एक पर्यटन स्थळच ( site seeing )किंवा वास्तुशिल्प कला अभ्यास करण्याचे स्थळ म्हणून बघितले जाते. ( किंवा जायचे आता तिथेही यात्रा वगैरे भारत असली तर माहिती नाही) . नृसिंह वाडीला जाणारे भक्त/ भाविक असतात त्यांचा उद्देश वेगळा असतो असे मला वाटते. लहानपणी सुटीत खिद्रापूर, कोल्हापूर ज्योतिबा, पन्हाळा हि असताना ग्रुपने सायकल सहलीची ठिकाणे होती. वाडी मात्र कधीही कधी मित्रांबरोबर काही एकटा.
अजूनही सांगलीला गेलो कि नृसिंह वाडी, तुंगाचा मारुती क्वचित कोल्हापूरची महालक्ष्मी हि भेटीची ठिकाणे. खिद्रापुरला जाने झाले नाही खूप वर्षात. चांगली आठवण करून दिलीत. पुढच्यावेळी सहकुटुंब खिद्रापुरला भेट नक्की.
अवांतर : औदुंबर पासून हरिपूर पर्यंत सध्या मगरींचा सुळ्सुळत झालाय. भेटी देणार्यांनी खात्री केल्याशिवाय पोहायला उतरू नये. तसेच वाडीला घाटावर बर्याचदा शेवाळे असते. पाय घसरून अनेक अपघात होतात. तसेच देवळासमोर कृष्णेचा मोठा "डोह" आहे. उत्तम पोहता येत असल्याशिवाय फार आत जाणे धोकादायक.
बाकी भेट देणार्यांनी बासुंदी, पेढे, मळीची ( कृष्ण काठच्या सुपीक मातीतली) देशी वांगी ( आता मिळत असली तर) नक्की आस्वाद घ्यावा. पण बासुंदीची क्वालिटी ( दाटपणा) पूर्वीप्रमाणे राहिली नाहीये असे मला वाटते. पूर्वी अगदी रबडी सारखी दाट मिळायची.
12 Oct 2015 - 12:58 pm | शामसुन्दर
दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले
१]
येथे मिळ्णारे मानसीक समाधान वेगळेच पेढे,बासुंदी नारळ्,हार वाले कधि घ्या घ्या म्हनुन माघे लागणार नाहीत
२]
३]
४]
५]
६]
12 Oct 2015 - 5:12 pm | दत्ता जोशी
"दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले"
खरं आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसणे शक्य नाही पण कृष्णेला पूर आला कि पाण्याची पातळी पहिल्या फोटोत दिसणाऱ्या गोलाकृती छतापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्ती वाढते. पाण्याची पालटली वाढू लागली आणि पाणी पादुकांवरून वाहू लागले कि दक्षिणद्वार सोहळा होतो. त्याही पेक्षा पाणी वाढू लागले कि देव वर गावात नेले जातात. पूर ओसरला कि मग विधीवत वेगवेगळ्या औषधी काढ्यांचा अभिषेक केला जातो. मस्त जुन्या आठवणी. धन्यवाद.
12 Oct 2015 - 3:46 pm | तुडतुडी
अजित कडकडे यांचे 'दत्त अवधूता , दिनाच्या नाथा , दूर अजून का रे तू सद्गुरु नाथा ' मस्त गाणं आहे . तू नळीवर एक से एक दत्त भक्तीपर गाणी आहेत . माझी सगळ्यात आवडती गाणी -
'सुखद सुमंगल शुभद सुकोमल वाजली पाऊले , दारी दत्त गुरु आले ' आणि 'राजा दत्तगुरू हृदयीचा '
@कंजूस
श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत . नरसिंह सरस्वती स्वामी महारष्ट्र आणि गुलबर्गामध्ये झाल्यामुळे कर्नाटक मध्ये दत्त संप्रदाय मोठा आहे . टेंबे स्वामी आणि रंगावधूत महाराजांमुळे गुजरात मध्ये दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे .नाथ संप्रदाय संपूर्ण देशामध्ये फैलावला आहे . आणि नाथ पंथ जाणनाऱ्या प्रत्येकाला दत्त माहित असतात . त्यामुळे दक्षिणेत दत्त माहित नाहीत हा तुमचा गैरसमज आहे . त्याचा प्रसार कदाचित कमी असेल तिकडे . कारण दत्त , अनुसया आश्रम महाराष्ट्रात माहूर मध्ये झालेत . आणि काही नको ते मार्केटिंग बिर्केतिंग आपलं शांत आहे तसंच असुदे .
दोन्हीही . तीच तर खासियत आहे
12 Oct 2015 - 3:50 pm | बॅटमॅन
आंध्रात कुठल्या गावी?
12 Oct 2015 - 3:52 pm | मांत्रिक
पीठापुरम बहुतेक.
12 Oct 2015 - 3:56 pm | बॅटमॅन
धन्यवाद!
12 Oct 2015 - 10:37 pm | याॅर्कर
बाकी,माझ्या गावापासून वाडी फक्त 22 किमी.
मानसिक समाधान देणारे ठिकाण(पौर्णिमा सोडून)
13 Oct 2015 - 12:57 pm | तुडतुडी
पिठापुरम मध्ये त्यांचा जन्म झाला होता . पण तिथल्या मूर्ख ब्राह्मणांनी धर्माचा जो चुकीचा अर्थ पसरवला होता त्याने त्यांची खूप निराशा झाली . अनेक वर्षे त्यांनी लोकांना खरा धर्म ,अध्यात्म समजावला . कोणाला समजून , कोणाला रागवून , कोणाला शिक्षा करून अनेक गैरसमज दूर केले. आणि धर्मस्थापना केली . त्यानंतर त्यांनी कुरवपुर हे त्यांचं कार्यक्षेत्र निवडलं .पिठपुरमच्या ब्राह्मणांना डावलून त्यांनी कुरवपुरच्या ताडी विकणाऱ्या लोकांना अध्यात्म दीक्षा दिली . त्यांच्या आईवडिलांनी स्वतः त्यांच्या घरात त्यांच्या पादुकांची स्थापना केली आहे आज त्याचं पिठापूर संस्थान झालं आहे . वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी कुरवपुरला समाधी घेतली .
का हो ? पौर्णिमेत असं काय आहे ?
13 Oct 2015 - 1:01 pm | बॅटमॅन
धन्यवाद.
13 Oct 2015 - 1:07 pm | याॅर्कर
आणि जिथे गर्दी तिथे........
"श्रीपाद वल्लभ दिगंबरा"__/\__