दोन वर्षांपूर्वी नणंद म्हणाली,”हल्ली न् बऱ्याच वेळा मी माच्छिन्द्रगडावर जाऊन आले. खूप छान वाटतं तिथे.”
“म्हणजेकुठे ग?” या माझ्या पृच्छेवर तिने सविस्तर उत्तर दिले.
“अहमदनरच्या पुढे आष्टी तालुक्यात मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तिथे. अग, ठाण्यात घर घेतलं तेव्हा साबांनी दिराच्या मित्राशी बोलायला सांगितलं होतं, तो नवनाथ उपासक आहे. त्यावेळी मी खूप कठीण काळातून जात होते.त्याने मला नवनाथ कथासार वाचायला सांगितलं होतं. तो वास्तूशी संबधितही जाणकार आहे. त्याच्याबरोबर तो काही लोकांना तिथे घेऊन जातो. तशी मी आणि माझ्या काही मैत्रिणी त्या लोकांबरोबर जात असू. मग काही काळाने एका मैत्रिणीच्या सोबत मी बापूंकडे जाऊ लागले. तेव्हा त्याने मला एक दिवस सांगितलं, मी आता तुला तिथे नेऊ शत नाही. खूपवेळा त्याला माझ्या अडचणी आपोआप कळत आणि तो बायकोसोबत माझ्या मदतीला धावून येत असे. तुला कसं कळलं?असं विचारलं की, तो म्हणत असे ,”मायबांचा आदेश.”(मायबा हे त्यांचे प्रेमाचे माव. मलाही फार आवडले.) जवळजवळ तीन वर्षे मी जाऊ शकले नाही. नवनाथ कथासारातला एक अध्याय मात्र मी अजूनही नेहमी वाचते. त्याचा मला खूप छान अनुभव आहे. तर आता मला तिथे जाता येत नाही त्याचे मला फार वाईट वाटते. काल माझ्या स्वप्नात ते स्थान आले होते नि तुम्ही दोघे माझ्यासोबत होतात. तर मी ठरवलंय तुम्हा दोघांना तिथे घेऊन जायचं.”
“तू ठरवून काही उपयोग नाही, त्यांनीच ठरवलं आपण जाऊ शकतो.” मी सांगितलं.
त्यांनीच म्हंजे मच्छिन्द्र नाथानीच असे म्हणायचे होते. माझा मच्छिन्द्रनाथांशी संबंध आलेला तो लहानपणी. एक म्हणजे प्रभातच ‘मायामच्छिंद्र’ या चित्रपटामुळे आणि दुसरे म्हणजे श्रावणात ग्रंथवाचन असायचे मामाकडे. आम्ही राहायचो त्याच्या पुढच्या गल्लीत मामाचं घर आम्ही दररोज रात्री तिथे जायचो. दरवर्षी निराळा ग्रंथ असे. श्रीदेवीभागवत, श्रीज्ञानेश्वरी, श्रीदासबोध, श्रीगुरुचरित्र, श्रीसाईचारित्र, श्रीएकनाथीभागवत, श्रीसंतविजय श्रीसप्तशतीपुराण, श्रीपांडवप्रताप, श्रीहरीविजय, श्रीरामविजय, श्रीगणेशपुराण, श्रीशिवलीलामृत, श्रीकृष्णामृत, या साऱ्यांसोबत आणि इतरहि अनेक ग्रंथांसमवेत एका वर्षी श्रीनवनाथकथासार ऐकलेला होता. अर्थात् त्यावेळी फक्त गोष्ट ऐकायला मिळणार याचाच आनंद असे. त्यावेळेपासून गुरु शिष्य परंपरा कशी असावी, गुरूंवर विश्वास ठेवणे आणि गुरु चुकत असेल असेल तर त्यांनाही त्यांची चूक नम्रपणे सांगणे इ.गोष्टी मामाने आम्हाला समजावून सांगितलेल्या.
काही वर्षांनी आमच्या घरी ग्रंथपठण सुरु झाले, तेव्हा ग्रंथ वाचन व त्याचे निरुपण मीही करीत असे. अर्थात माझे निरुपण म्हणजे पद्यातल्या ओव्या वाचून गद्यात कथारूपाने सांगणे इतकेच होते. त्यानंतर संबंध आला तो, लग्न झाल्यावर घर घेतले तेव्हा. आम्ही तेथे लगेच राहायला जाणार नव्हतो. पण ताबा घेताना आईच्या सांगण्यावरून ताबा घेऊन घरात प्रवेश करताना गणपती, कलश यासोबत नावनाथांची तसबीरही होती. एकदा गाणगापूरला असताना आलेल्या अनुभवाने तिथे काही कार्ये घडवून आणण्यासाठी दरवर्षी पैसे पाठवित असे त्यात, श्रवणात श्रीनवनाथकथासाराचे पारायण असे.
या गेल्या दोन वर्षात खूपवेळा मच्छिंद्रगडावर जायचे ठरत असे, ठरून फिसकटत असे. यावर्षी ती राखीबंधनाला आली तेव्हा पुन्हा विषय निघाला. तिथल्या कथा सांगताना ती म्हणाली.,”असं मानलं जात की, रात्री बारा वाजता ते चैतन्य समाधीतून उठून बाहेर पडतं. खूप सुरेख सुवास पसरतो. एखादी सावली सरकते. जोराची वावटळ होते. पण प्रत्येकाचे अनुभव वेगळे, मलातर नुसताच सुवास आलाय.’’.आम्ही दोघे गप्पच होतो. ”तीच पुढे म्हणाली,”वहिनी, पंधरा येत्या दिवसातल्या शनिवारी-रविवारी जायचे का?”
“नवनाथ म्हणजे दत्तसंप्रदाय. तेव्हा तिथे गुरुवारी जाऊन थांबून पहिले पाहिजे.” असे उत्तर मी दिले. पुन्हा ती म्हणाली,”आणि तुम्ही काही खर्च नाही करायचा. मीच सगळा खर्च करणार आहे. ”तारखा ठरल्या. ३ किंवा १० सप्टेंम्बरला जायचे ठरले. आमचा नेहमीचा ड्रायव्हर राजेश; याची गाडी घेऊन आम्ही नेहमी सहली करतो; त्याच्याशी बोलून नक्की करायचे ठरले. त्याचवेळी नवऱ्याला आठवण झाली की, यावर्षीचे पारायणाचे पैसे पाठवायचे राहिले आहेत. दुसऱ्यादिवशी गुरुजींशी बोलून तेही पाठवून दिले. राजेशला निरोप गेला. आणि दोन्ही गुरुवारी नणंदेला आणीबाणीच्या कामांमुळे रद्द करावे लागले.
मागच्या सोमवारी पुन्हा तिचा फोन आला”.या गुरुवारी जाऊया का?दादाला विचारून सांग.”
“दादा घरात नाही, कामासाठी बाहेर गेलाय आणि ते काम आज होण्याची शक्यता कमी आहे, तर काही अंदाज नाही. तो घरी आला की त्याला सांगते नि तुला फोन करते.”
“मला अर्ध्या तासात त्या गाडीवाल्याला सांगायचे आहे.”असे तिने म्हटल्यावर मीही उत्तर दिले,” मग आत्ता तर काहीच सांगू शकत नाही.”
नवराही दुपारी येणार होता तो संध्याकाळी आला. त्याला निरोप दिल्यावर तो म्हणाला, तिला सांग. ”तू नक्की कर न् आम्हाला सांग.”
मी तिला संध्याकाळी फोन करुन कल्पना दिल्यावर ती म्हणाली.”अग तो आता दुसऱ्या भाड्यावर गेला. बघू कधी जमतेय ते?” मीही,’ ठीक आहे’ म्हात फोन बंद केला.
बुधवारी माझ्या मनात विचार आला आता आपण मच्छिंद्रगडावर जायची तयारी करत असतो, पण अजून आपला योग दिसत नाही तिथे जायचा. इतक्यात फोन आला. नणंदच बोलत होती,”उद्या जायचं का?राजेशला विचार ना त्याची गाडी मिळेल का?” नवऱ्याने राजेशला विचारून वेळ नि दर पक्का केला ए.सी. ११ रुपये कि.मी आणि नॉन ए.सी.१० रोपये कि.मी.दराने त्याची तवेरा पक्की केली. आणि आम्ही निघायची तयारी केली. रात्री म्हटलं नवऱ्याला,” आपण माळशेज घाटातून जाऊ शकतो का उद्या?”
“पुणेमार्गेच बरे पडेल.”नवऱ्याचे संक्षिप्त उत्तर.
सकाळी निघताना एक मोरपीस घेऊन बाहेर पडायचे ठरले. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे समाधीस्थानी जाताना मोरपीस घेऊन जायचे, ते तिथे वाहायचे किंवा समाधीला लावून परत आणायचे. खाली येऊन गाडीत बसलो आणि गाडीत मोरपीस दिसले. मी मोरपीस न घेता खाली उतरले याची जाणीव झाली. पण आता मागे न फिरता निघालोच.
मी पहिल्यांदाच नगरमार्गे जाणार असल्याने राजेशला विचारले,”अरे,पुण्याहून आपला मार्ग कसा काय?”
“मॅडम, आपण माळशेज मार्गाने गेलो तर बरे पडेल. साहेब चालेल ना?” राजेश मूळचा नगरचाच असल्याने आणि गाडी भाड्याने देत असल्याने त्याला रस्ते, अंतरे याची आमच्यापेक्षा जास्त कल्पना होती. नवऱ्याने होकार दिला आणि जगद्नियंत्रण करणारे कोणीतरी माझे बोलणे ऐकत असल्याची पुन्हा एकदा झाली नि या सहलीत खूप मजा येणार असल्याची खूणही पटल्याची जाणीव झाली.
वाटेत नणंद आणि तिची एक मैत्रीण यांना घेऊन आम्ही पुढे निघालो. सरळगावला चहापाणी झाले. माळशेज घाटाचे पहिले दर्शन विलोभनीय तर होतेच आणि पाऊस नसल्याने हवे तिथे थांबून फोटोही काढता येत होते.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
वाटेत एका ठिकाणी थांबून घावन-चटणी आणि फळे असा लंच उरकून आम्ही पुढे निघालो. गडावर राहायची फारशी सोय नाही तर जाता जाता नगरच्या सरकारी गेस्ट हाऊसवर जाऊन रूम मिळवली. गडावर पोचलो. नणंद याआधी बऱ्याच वेळा नियमित येत असल्याने, ओळखीच्या माणसाला शोधायला मैत्रिणीसह निघून गेली.
अजूनपर्यंत पावसाने दर्शन दिले नवते. आता मात्र डोक्यावर एक मोठा ढग ओथंबून आलेला दिसत होता. सूर्य पश्शिमेकडे झुकलेला. अचानक टप्पोरे थेंब पडू लागले. तीनचार मिनिटे धुआँधार पाउस कोसळला. एका बाजूने ऊन होतेच. गाडीतून उतरून पाहते तो काय? मायबांनी आमच्या स्वागताला इंद्रधनूचे तोरण पूर्ण आभाळभर बांधले होते. ते अर्धचंद्राकृती इंद्रधनुष्य त्यांच्या समाधीमंदिराच्या शिखराला वेढून पूर्ण आभाळभर पसरले होते. भानावर येऊन फोटो काढले.
११.
१२.
खाली उतरून पुढे चालू लागलो, पुन्हा एक सर आली पण अगदी हळुवार, जणू एखादी आई बाळाला नाहू घालतेय. एक माणूस येऊन सांगू लागला, गाडी आतच लावा. त्याने गेट उघडून गाडी आत घेतली. आत शिरताच दोहो बाजूला मोकळी जागा, त्यात एका बाजूला एसटी पार्किंग व दुसऱ्याबाजूला सुरेख बाग. समोर पुढे फर्लांगभर अंतरावर बांधकाम चाललेले, त्याच्या एका बाजूला मूळ समाधी मंदिराचा कळस दिसतोय, त्याआधी दोन छोट्या छोट्या पण वेगळ्याच आकाराच्या इमारती. त्याच्यांपुढे अजून एक इमारत. असे सारे पाहत आम्ही पुढे जात होतो. स्वच्छता मात्र वाखाणण्यासारखी.
इतक्यात नणंद एका मुलासोबत आली नि म्हणाली,”हा आपल्याला एक रूम देतोय. जेवणही यालाच सांगितलेय. आता आरती चालू होईल. आपण फ्रेश होऊन देवळात जाऊ.”
“अहं, आम्हाला मायबांनी आंघोळ घातलीय. मी आता आधी मंदिरातच जाणार,”तसे सगळेच मंदिराकडे वळले. मग बाळूच्या दुकानातच पूजासाहित्य खरेदी झाली. मी मात्र नगरच्या सरकारी अतिथीगृहाच्या बागेत मिळालेलं हिरव्या चाफ्याचं, अप्रतिम सुवासाचं, स्वत: तोडलेलं फुल वाहायचं ठरवलं होतं.
पण पोचेपर्यंत आरती चालू झाली. नवरा नि ड्रायव्हर आरतीत सामील होऊ शकले. पुरुष ना ते! आम्ही एका बाजूला उभ्या होतो. तिथे खूप बेभान लोक होते. पुरुष कमी नि स्त्रियामुली जास्त. प्रत्येकाचे काहीतरी वेगळेच चाललेय. कुणी नुसतेच घुमत होते, कुणी भेसूर आवाजात रडत होते, कुणी “आदेश, आदेश” म्हणून हात जोरजोरात जमीनीवर आपटत होते. कुणी नुसतेच जोरजोरात उचक्या देत होते, कुणी खदाखदा हसत होते. कुणी उड्या मारत होते, कुणी तारस्वरात “का? का?” असे ओरडत होते, कुणी नुसतेच “मायबा ,मायबा “असे पुटपुटत होते. कृश झालेले देह अशा काही ताकदीचे प्रदर्शन घडवू पाहत होते, की ही मनाची ताकद सत्कारणी लागली तर काय बदल घडून येईल या विचारात माझे मनही गुंतून गेले. या बदलालाच चमत्कार म्हणतात बहुधा. हा सगळा पसारा समाधी मंदिराच्या डाव्या आणि आपल्या उजव्या बाजूला असतो.
इतक्यात आरती तिथून बाहेर पडून उजवीकडच्या मारुतीमंदिरात शिरली. तिथून धुनिपाशी, मागच्या बाजूच्या औदुबारापाशी, मागच्या बाजुला असलेल्या घोडेस्वार झालेल्या मायबांपाशी जाऊन मागच्या बाजूने मंदिरात शिरली. मधेच कधीतरी बाळू आम्हाला त्या पसाऱ्यातूनच मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या कार्यालयापाशी घेऊन आलेला. आम्हाला किल्ली देत तो म्हणाला. ”आता बाहेरूनच दर्शन घ्या कारण आता बायकांना आत जाता येत नाही. सकाळच्या आरती नंतर आत जाता येईल. ”असे बाळूने सांगितले. थोडी हिरमुसलेच. पण दर्शन धेतले, यावेळी समाधीमान्दिरात कोणालाही जाता येत नाही.
पण मागचा दरवाजा अजून उघडा होता. त्याच्या बाहेरून दर्शन घेताना एकच प्रार्थना केली, ”तुझ्या आसऱ्याला आलेल्या या अभागी जीवांना त्यांच्या दुख:तून सोडव. त्यांना माणूस म्हणून जगू दे. आणि काय मायबा तुम्हाला भिक्षा वाढायला बायका चालायच्या ना? मी एवढी बारा तास प्रवास करून मी आले नि तुम्ही इतक्या लांबून भेटताय.?”
माझ्या शेजारी उभी असलेली बाई मला दटावणीच्या पण हलक्या स्वरात म्हणाली, ”अस बोलू नये बाई. ते चैतन्य बायकांच्या कुडीला सहन होत नाही.”
“पण ते मायबा ना?”मग त्यांनी थोड्या प्रेमाने भेटायला काय हरकत आहे?’ या माझ्या फुरंगटून केलेल्या तक्रारीवर तीही हसली.
आम्ही दिलेल्या खोलीत गेलो. एक मोठी खोली, त्यात दोन मोठमोठ्या चटया पसरलेल्या. अटॅच्डॉयलेट, बाथरूम. पण आत पाणी नाही. पाणी बाहेरच्या नळावरून आणण्याचे. त्यामुळेच बहुधा अस्वच्छ. आधी चार बदल्या आणून ओतल्या. आवरून खोलीबाहेर पडलो.
वातावरण मोठे आल्हाददायक होते. हवेत गारवा जाणवत होता. अष्टमीचा चंद्रही दिसू लागला होता. मंदिराच्या आजूबाजूला फिरता येत होते. मघाशी बेभान झालेले जीव थकून पडले होते. काहीजण अजूनही त्यातच होते, पण हालचाली मंद झालेल्या होत्या. अजूनही मागचा दरवाजा उघडाच होता. मंदिराच्या उजव्या बाजूने पायऱ्या खाली गेल्या होत्या. तिथे खालच्या बाजूला धोंडाई मंदिर, पाताळगंगा नदी, अमृतेश्वर मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिर असल्याचे दर्शविणारी पाटी होती. पण आता रात्रीच्या वेळी उतरायला नको म्हणून तिथेच आजूबाजूला फिरत होतो. आजूबाजूचे लोक कुजबुजत होते, “का दरवाजा उघडा आहे अजून, कोणीतरी मायबांचा लाडका भक्त यायचा असणार बघा.”
नवऱ्याने एकदोघांना विचारल्यावर त्यांनी सांगितले,”असं बरेचदा घडतं, कोणीतरी बडे बाबांच्या जवळचा भक्त यायचा असेल. त्या पुजाऱ्याला दृष्टांत होतो, दार बंद न करण्याचा.”
“पण त्याला कसं कळणार की, भक्त कोण नेमका?” माझा थोडा आगाऊपणा.
“ते बी कळतंय द्रीष्टांताने. उगाच कुणीबी आत जाऊ शकत नाही.” हात जोडत कपाळाला लावत ते म्हणाले.
मी म्हटलं,”चला जेवायला, आपण ते नसणार बहुतेक.” आम्ही मंदिराकडून बाळूकडे जेवायला निघालो. तर तो दुसऱ्या बाजूने धावत आला. नणंदेला म्हणाला,”ताई, तुमच्या वैनी कुठे आहेत?”
“ती काय पुढे चाललीय.” तिने माझ्याकडे हात दाखवला.
तो पळतच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “चला, मायबांनी बलावलाय तुमाला.”
”मला?” माझ्या डोक्यावर जणू कुणी बर्फाचे गार पाणी ओतले असावे अशी मी सुन्न झालेली.
“त्या पुजाऱ्याने तुम्हाला बोलवायला सांगितलंय.” बाळू अधिरतेने बोलला.
“मलाच कशावरून?’’मी तरीही बोलले.
“पाच लोक, त्यात तीन बायका. दोघी देशी कपड्यात आणि एक विदेशी कपड्यात. तीच दिसतेय सारखी.”
बाळूने खुलासा केला. आम्ही राजेश धरून पाचजण होतो. नणंद पंजाबी पोषाखात, तिची मैत्रीण साडीत नि मी पॅंट-टॉपमध्ये. मी हादरलेच
.”तुम्हाला ताबडतोब आत जाऊन दर्शन घ्यायला सांगितलंय.” पुन्हा तो म्हणाला.
“अरे,पण ...” असे म्हणेपर्यंत तिथे जमलेले लोक मला आग्रह करू लागले, ”लवकर जा ,लवकर जा.”
“ए, तुम्ही पण चला माझ्याबरोबर.” असे म्हणून मी घाईने जाऊ लागले. बाकीचे लोक तिथेच थांबले, देवळाच्या डाव्या बाजूला. मी मागच्या दरवाज्यातून आत शिरणार तेवढ्यात एका बाईने, ”काय करतेस? यावेळी बायकांनी आत जायचं नसतं.” असं म्हणत माझा हात धरून ओढण्याच्या प्रयत्न केला आणि “आई ग” अशी किंकाळी मारून सोडलाही. मी तिथेच. इतक्यात पुजारी धावून आला. तिला म्हणाला,” त्यांना बडे बाबांनी बोलावलंय.”
“माझा हात भाजला.” ती कळवळत म्हणाली. मला पुन्हा आश्चर्य वाटले कारण मला तर तसे काही जाणवत नव्हते.
“अहो, पण माझी माणसं पण आली पाहिजेत.” मी त्यांना म्हटलं.
‘’आधी तुम्ही जा. बडे बाबांना सांगा, ते तुमचं ऐकतील.” पुजाऱ्यांनी सांगितलं.
मी आत पाऊल टाकलं, मधुर सुगंधाने गाभारा भरून गेला होता. मी समाधीला स्पर्श करून नमस्कार केला आणि डोळे मिटले. मला मीच दिसत होते, ती मघाचची प्रार्थना करताना. बाकी काही नाही. बाकी काहीच नाही. बाकी काही नाहीच. कसलीच विनंती नाही मगन नाही. हळूहळू मागे झाले नि भान आलं. ’माझ्या माणसांना बोलावते हं,’ पुटपुटत मी मागे वळून इशारा केला ‘”आत या’’, असा. पुजाऱ्यानेही त्यांना आत येऊ दिलं. स्वत:आले. दोन मिनिटांनी म्हणाले. आता सकाळच्या आरतीनंतर या.
काही सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. बाकी सगळे गप्प होते. नवऱ्याने हळूच हाताला धरून बाहेर आणलं. तिथल्या पायऱ्यांवर बसून मी मनसोक्त रडले. का रडतेय काही कळत नव्हतं. पण रडणं थांबवताही येत नव्हतं. थोड्यावेळाने शांत झाले. लोक लांबून माझ्याकडे पाहत होते त्याचंही भान नव्ह्तं.
मग आम्ही जेवायला गेलो. बाळूने बाकड्यावर बसायला सांगितलं. ”अरे, माझे पाय जमिनीला टेकत नाहीत. मला खुर्ची दे बसायला.” बाळूने विरुद्ध बाजूला खुर्ची टाकून दिली. मी बसले नि माझ्या नजरेला बाजूच्या पूजासामानाच्या दुकानातली मोरपिसे दिसली. ”या दुकानात मघाशी इतकी खरेदी केली तेव्हा कशी नाही दिसली.?” या विचाराने मला सतावून सोडले. मग मोरपिसे खरेदी करायची ठरवली. केलीही.
खोलीकडे पोचलो तर पुजारी उभे होते. म्हणाले, ”तुम्ही त्या खोलीत नका राहू. तुम्ही या खोलीत राहा. या खोलीत आतच पाणी आहे. खोली उघडून दिली न म्हणाले, मी प्यायचं पाणी आणतो, तुमच्या जेवणाचीही सोय करतो. ”ती त्यांची राहण्याची खोली होती.
आम्ही जेऊन आल्याचे सांगितले. ते चार बिसलेरीच्या बाटल्या घेऊन आले. पैसे घेतले नाहीत. ”सकाळी पाच वाजता तुम्हाला गरम पाणी आणून देईल कोणीतरी.” असे सांगून निघून गेले. खोलीत आलो तर आत आशीर्वाद देणारं मच्छिन्द्रनाथांचं सुरेखसं चित्र आमच्याकडे पाहून हसत होतं. पुन्हा डोळे अश्रुनी भरून आले. कुणीतरी आपले लाड करतंय या भावनेने मन भरून गेलं. पण तरीही मघाही मंदिरात मी काही वेगळं अपेक्षित होते का? हेही समजत नव्हतं.
१३.
पुन्हा आवरून जरा आराम करून साडे आकाराच्या सुमारास पायऱ्यांवर येऊन बसलो. आमच्याशिवाय कोणीही जागे नव्हते. ठिकठिकाणी लोक झोपले होते. हळू आवाजात गप्पा मारत होतो. बारा वाजले नि “टनण” असा मंदिराच्या पुढच्या घंटेचा आवाज झाला. एक वेगळाच सुवास पसरला, जो मघाशी गाभाऱ्यात होता. सगळेच पाहू लागलो. इतक्यात दोन मुलं नि एक मुलगी समोरच्या पायऱ्या उतरून खाली मंदिरात गेली. थोड्याच वेळात परत वर आली.
”चला आपण पण झोपायला जाऊया.” म्हणत आम्ही उठलो. मंदिराच्या समोर सहाजण बसले होते. तीन पुरुष नि तीन बायका, आणि ही तीन मुलं असे नऊजण आमच्या समोर होते. त्यातल्या सगळ्यात वयस्क पुरुषाने मला विचारलं, ”आता तरी खुश आहेस का?” ओळख ना देख हा माणूस मला असे का विचारतोय? त्या क्षणी अतिशय मिस्कील असलेले डोळे दुसऱ्या क्षणाला अनोळखी झाले. गोंधळून जात त्यांनीच मला विचारलं. ”आपण या आधी भेटलो आहोत का?’’ मी मागे वळून समाधीकडे पाहत नमस्कार केला. आणि म्हटलं. ”शेवटी भेटलात तर परिवारासहित.”
१४.
(हा मंदिरासमोरच झेंडा. याच्या खालीच ते गृहस्थ बसले होते. हा फोटो सकाळी काढला आहे.)
१५.
(हे रात्री चंद्र माथ्यावर आलेले मंदिर.)
ते लोक जायला उठले. ते गृहस्थ अजूनही गोंधळलेले होते. नवरा आणि नणंद त्याची चौकशी करत होते, ते घोटीचे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते, आणि अतिशय प्रेमाने मायबांची सेवा करीत होते. अचानक त्यांना वाटलं की, आताच दर्शनाला जायला हवं म्हणून ते इतक्या रात्री घोटीहून तिथे सगळ्यांना घेऊन आले होते. आले तसे गेलेसुद्धा.
आम्ही जाऊन झोपलो. सकाळी कोणीतरी भराभर पाच/सहा बदल्या पाणी आणून दिलं. आम्ही आवरून आरती संपल्यावर मंदिरात गेलो. समाधीमान्दिरात सूर्यप्रकाश भरून राहिला होता. पुजारी वगळता तिथे कोणीही नव्हतं. ते काल तोडलेलं फूल आणि मोरपिसे घेऊन मी मंदिरात गेले. पादुकांवर डोके टेकले. फूल वाहिले. मोरपिसे अर्पण करून सांगितलं, ”माझे सगले लाड पुरवल्याबद्दल धन्यवाद, माझी प्रार्थना लक्षात घ्या.” त्यातली काही मोरपिसे तिथे अर्पण करून बाकीची प्रसाद म्हणून परत आणली आहेत.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
थोड्या वेळाने निघालो, पुढच्या प्रवासाला. मी कधीही उपास, तापास, कर्मकांड यात गुंतलेली नाही. माणुसकी हाच माझा धर्म आहे. आलेला अनुभव माझ्या एकटीचा नाही. बाकीचेही त्याला साक्षीदार आहे. बाजार न झालेलं क्षेत्र म्हणून मला ते स्थान आवडलं. अतिशय शुद्ध हवा असल्याने प्रसन्नता लाभलीच. आज आठ दिवस झाले आहेत पण अजून या अनुभवाचे पृथक्करण मी करू शकत नाहीय. जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी विनंती करत आहे.
प्रतिक्रिया
30 Sep 2015 - 1:13 pm | वेल्लाभट
विलक्षण आहे.
30 Sep 2015 - 1:48 pm | प्यारे१
फोटो थोडे आणखी क्लिअर करता येतील का?
30 Sep 2015 - 2:22 pm | पैसा
अगदीच लहान आकाराचे, मोबाईलवर काढलेले फोटो वाटत आहेत. दुसरे मोठे असतील तर रिप्लेस करता येतील.
30 Sep 2015 - 2:53 pm | अजया
थंबनेलची लिंक दिली गेली आहे.त्यामुळे असे दिसत आहेत फोटो.
30 Sep 2015 - 2:14 pm | खटपट्या
वेगळाच अनुभव !!
30 Sep 2015 - 2:28 pm | द-बाहुबली
जाणकारांनी प्रकाश टाकलेला आहे असे लेख वाचुन वाटते.
30 Sep 2015 - 2:39 pm | मांत्रिक
व्वा! विलक्षण! अगदी अद्भुत!
तुमच्या लेखनाने मलाही आधार दिला. काही घरगुती कटकटीने आज स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला होता. अगदी चकरावलोच होतो. पण योगायोगानं इतका अद्भुत अनुभव वाचून पुन्हा मन प्रसन्न झालं. अगदी ओझं फटकन उतरल्यागत झालं.
तो आहे, याची खूण पटली.
30 Sep 2015 - 8:52 pm | द-बाहुबली
अहो जर का मी आहे तर तो ही असणारच ना ;) ?
30 Sep 2015 - 8:56 pm | मांत्रिक
हं!!! खरं आहे! माझ्यातच तो आहे. पण मी त्याला ओळखू शकत नाही. येथून पुढेच जगातील सर्व भांडणे चालू होतात. कारण मी त्याला समजून घेतलं तरी ओळखू शकत नाही.
2 Apr 2020 - 9:43 pm | Himmatarao Vitt...
स्त्रिया घालायच्या ना?....ह्या करुण प्रार्थनेने तर ह्रदय हेलावले, काळजाचाच ठाव घेतला.फरच छान.
30 Sep 2015 - 2:43 pm | अनिरुद्ध.वैद्य
अनुभवाबद्दल अभिनंदन!
30 Sep 2015 - 2:44 pm | नूतन सावंत
पैताई,हे फोटो मोबाईलचे नाहीत,माझी काहीतरी चूक झाली असावी.
द-बाहुबली, मला समजले नाही.
30 Sep 2015 - 2:51 pm | पैसा
आल्बमची लिंक देतेस का?
30 Sep 2015 - 10:42 pm | द-बाहुबली
अहो मच्छिंद्रगडावरची आपली अनुभूतीच जाणकारांनी आपल्या आयुश्यावर टाकलेला प्रकाश आहे. त्यावर आता मिपाकर काय बोलणार ? नाय तर मिपाकरांबाबतच्या अनुभुतीच्या चर्च्या मच्छिंद्रगडावर रंगल्या नसत्या काय ;)
तरीही चर्चा तर होनारच अट्टहास असेल तर मिपाकरांच्या याधागीय वर्तनावर (प्रतिसादांवर) नक्किच इवलासा प्रकाश टाकु शकेन. जसे..
१) नशीबवान आहात = तुमच्या बद्दल थोडीफार माहिती असणारे. व किंचीत सश्रध्द लोक्स.
२) हम्म सम्थिंग डिफरंट = तुमचा अनुभवाचा अनुभव याची देही याची डोळा मिस करता आला नसता तर खरे बरे झाले असते मानणारे लोक्स.
३) फोटो न पाहु शकणारे = गणेशा मोडवाले लोक्स.
४) आपल्या अनुभवावर काहीही भाष्य वा मत व्यक्त करण्यासारखे नाही असे मानणारे = ज्याच्यांबद्दल काही नेमकेपणाने सांगता येणं अवघड भासणारे लोक्स.
५) सुपर अमेजिंग, आउटस्टँडीग म्हणनारे = अतिशय सश्रध्द तसेच यातील काही कालोघात दिर्घकाळासाठी इश्वरावरुन श्रद्धा गमावुन पुन्हा स्थिर केलेले.
६) लिखाण मॅजीकल वाटणारे = आपले हितचिंतक.
७) वाचुन छान आहे म्हणनारे = सश्रध्द परंतु प्रचंड आधुनिकताही तितकीच रक्तात बाळगलेले (हे काय वाइट नाही हं श्री).
८) इतर = इतर.
30 Sep 2015 - 2:47 pm | अजया
हम्म.....
30 Sep 2015 - 2:54 pm | इशा१२३
तुमच्या लेखनात जादु आहे ताइ.प्रसन्न वाटल वाचुन.
30 Sep 2015 - 2:56 pm | पदम
सगळ्याना नाहि येत. लकि आहेस ताई तु.
30 Sep 2015 - 3:09 pm | कविता१९७८
विलक्षण अनुभव , लकी आहेस
30 Sep 2015 - 3:53 pm | मदनबाण
अनुभव कथन आवडले...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique Iglesias
30 Sep 2015 - 6:31 pm | पद्मावति
सुंदर अनुभूती. खूप छान वाटलं वाचून.
30 Sep 2015 - 8:58 pm | सानिकास्वप्निल
अद्भुत !!
लेखन आवडले.
30 Sep 2015 - 9:41 pm | दत्ता जोशी
सुंदर अनुभूती. काहीतरी पूर्वसंचीत असल्याशिवाय असं नाही होत. दत्त महाराजांची खूप प्रेमाने सेवा केलेली असणार तुम्ही.
1 Oct 2015 - 3:39 am | विशाखा राऊत
ताई विलक्षण अनुभव... वाचले पण सुन्न झाले
1 Oct 2015 - 8:54 am | नाखु
एक्डाव भेट द्यावी लागेल. तपशील्वार पत्ता मिळेल काय? आम्ही पिंचीमधून निघणार आहेत.
नेमस्त नाखु
1 Oct 2015 - 10:40 am | मार्गी
खूप खूप धन्यवाद हा अनुभव शेअर केल्याबद्दल! अत्यंत महत्त्वपूर्ण.
1 Oct 2015 - 11:17 am | सविता००१
सुरंगीताई, खरच फार लकी आहेस गं. मस्त लिहिला आहेस अनुभव.
सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं झटकन.
धन्यवाद
1 Oct 2015 - 6:19 pm | प्यारे१
सुधारित फोटो आवडले.
एका फोटोमध्ये इंद्रधनुष्य दिसतंय.
सगळ्यांना माहिती आहे सप्तरंगी असतं ते . खरंतर असे रंग असतात का?
थोडं ऊन, थोडा पाऊस, विशिष्ट कोन आणि आपण असणं या सगळ्या गोष्टी असल्या तर इंद्रधनुष्य दिसतं.
इंद्रधनुष्य नि दिसणारे रंग नि अनुभूतिचं काहीसं असंच नातं असावं.
विशिष्ट परिस्थिति, मनोभुमिका आणि आवश्यक ती दृष्टी असल्याशिवाय नाही जाणवायची ती.
1 Oct 2015 - 6:21 pm | नूतन सावंत
नाखुजी,
नगरच्या पुढे मच्छिंद्रगड,सरळगाव,आष्टी तालुका ,बीड जिल्हा असा तपशीलवार पत्ता आहे.तुम्ही पुणे-नगर रस्त्याने जाऊ शकता.
1 Oct 2015 - 7:52 pm | पियुशा
खरोखर विलक्षण , नशीबवान आहेस )==):)
1 Oct 2015 - 10:38 pm | शामसुन्दर
नगर बीड रोड वर नगर पासून साधारण ४५ किमी वर कडा गाव आहे गावात एंट्री करायची गरज नाही बाहेरच् नव्यानेच जिर्णोद्धार केलल महादेवाचे मंदिर आहे मंदिराच्या समोरील बाजूने रस्ता जातो डोंगरगण-दादेगाव- सावरगाव आणि मग मछिंद्रनाथगड म्हणजेच मायंबा तिथून दर्शन करुन तुम्ही तसेच खाली डोंगर उतरून वृद्धेश्वर म्हणजेच म्हातारदेव करू शकता आणि तिथून जवळच मढी म्हणजेच श्री क्षेत्र कानिफनाथ गड आणि मढी झाले की सरळ पाथर्डी नगर रोड ला मिळता तुम्ही जवळच मोहटा देवी मंदिर पण आहे पाथर्डी ते मोहटा नौ किमी असेल बाकी हे सगळे मंदिर मनाला प्रसन्नता देवून जातात
2 Oct 2015 - 8:33 am | नूतन सावंत
हो.सावरगाव .सॉरी,नाखुजी.धन्स,शामसुन्दर.
2 Oct 2015 - 2:09 pm | गामा पैलवान
मायंबा इथे आहे :
विकीम्यापिया : http://wikimapia.org/9567835/मच्छिंद्रनाथ-गड-मायंबा
गूगल म्याप्स : https://goo.gl/maps/8VmPmfrFq7o
-गा.पै.
2 Oct 2015 - 6:16 pm | दुर्गविहारी
कराड जवळील मछीन्द्रगडावरसुद्धा मछीन्द्रनाथान्ची समाधी आहे. कराड तासगाव रस्त्यावर असलेला हा मछीन्द्रगड

2 Oct 2015 - 7:38 pm | दत्ता जोशी
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण त्या गावाचे नाव येडे मछिन्द्र असे आहे. सांगली जिल्यातील वाळवा तालुक्यात कराड सगाव रस्त्यावर हे गाव आहे. कृष्णामाईच्या आशीर्वादाने पाण्याने सुजलाम सुफलाम असलेल्या भागातील हा डोंगर पहिला आहे पण अजून तिथे गेलो नाही. तिथे समाधी आहे? कारण मछिन्द्र नाथ समाधी मंदिर माझ्यामाहिती प्रमाणे मढी- सावरगाव इथेच आहे. सासवड पुणे जवळ पण एक सुंदर कानिफनाथ मंदिर आहे. हे बहुदा कानिफनाथ साधना स्थळ असावे. डोंगरावरील एका गुहेवर हे मंदिर बांधले आहे. गुहेत जाण्यासाठी जेमतेम एका वेळी एक माणूस पालथा सरपटत जाऊ शकेल इतकेच मोठे द्वार ( opening ) आहे. सरपटत आत जायचे आणि तसंच उलटं सरपटत यायचे. इतर नाथ मंदिरांप्रमाणे इथे पण स्त्रीयांना भुयारात प्रवेश नाही.
अवांतर : कराड पासून तासगाव कडे निघाल्यावर मछिन्द्र गदाहून थोडे पुढे गेलो उजव्या बाजूला कि संभाजीनगर (इस्लामपूर) फाटा आहे. तो घेतल्यावर सुमारे १२ किमी वर क्षेत्र कोळे नरसिंगपूर नावाचे भुयारातील श्री ( उग्र) नृसिंह महाराजांचे एक सुंदर देऊळ आहे. तिथली शळिग्रमचि ५ फुटी नृसिंह मूर्ती पाहत राहावी अशी आहे.
2 Oct 2015 - 7:38 pm | पैसा
मनाला शांतता देणारा वेगळी अनुभव! तुझी लिहिण्याची शैली तर नेहमीच आवडते.
2 Oct 2015 - 7:55 pm | दत्ता जोशी
अत्यंत सुबक कोरीव काम आणि Details असलेली दहा हातांची उग्र नृसिहांची मूर्ती येथे पाहू शकता.
http://jwalanarsimha.blogspot.in/
2 Oct 2015 - 8:00 pm | यशोधरा
अफाट सुरेख!
2 Oct 2015 - 8:02 pm | पैसा
+१
2 Oct 2015 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
अद्भुत् अनुभव !
2 Oct 2015 - 8:12 pm | नूतन सावंत
अतिशय सुरेख.
2 Oct 2015 - 8:25 pm | चतुरंग
नगरपासून ही समाधी जवळच आहे परंतु कधी जाणे झाले नाही. शाळेत असताना डोंगरगणला सहलीला वगैरे गेलेलो आठवते आहे तिथूनच पुढे ही समाधी असावी असे दिसते.
तुमचा अनुभव अतिशय अद्भुत आहे! आपल्या काही अनुभवांना तार्किक स्पष्टीकरण मिळतेच असे नाही परंतु ते अगदी सच्चे अनुभव असल्याने नाकारणेही शक्य नसते.
सातवीत असताना आमच्या शाळेची ट्रिप नेपाळला नेलेली होती. जाताना कलकत्ता देखील बघितले होते. तिथल्या बेलूरमठात रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांची भव्य तैलचित्रे आहेत. त्या तैलचित्रांसमोर बसल्यानंतर माझ्या संपूर्ण अंगावर शहारे फुलले, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. सातवीच्या वयात अध्यात्मिक पुस्तके वगैरे वाचलेली नव्हती, किंबहुना रामकृष्ण आणि विवेकानंद यांची थोरवी कळण्याचे देखील ते वय नव्हते परंतु हा विलक्षण अनुभव माझ्या अगदी लक्षात आहे आणि त्याचे कारण मला सापडू शकले नाही. तुमचा अनुभव वाचून ही आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.
2 Oct 2015 - 8:37 pm | मांत्रिक
ताई! तुम्हाला जर उपासनेची आवड असली तर थोडी शाबर मंत्रांबाबत माहिती देईन व्यनीद्वारे. शाबर मंत्र आजच्या काळात वरदान आहेत. कलियुगात सामान्य माणसाची परिस्थिती, आवाका लक्षात घेऊनच श्री नाथांनी या मंत्रांची रचना केली आहे. अगदी सामर्थ्यवान मंत्र व फार कमी वेळात आणि कमी कष्टांत सिद्ध होतात. दैनंदिन व्यवहारातील अडचणी दूर करण्यापासून ते थेट नवनाथांची, देवीदेवतांची अलोट कृपा सुद्धा प्राप्त करुन देतात. माझ्या वडिलांना उत्तम अनुभव आहेत या साधनेचे. पण श्रद्धा नक्कीच लागते.
2 Oct 2015 - 8:58 pm | यशोधरा
शाबरी स्तोत्र आणि हे मंत्र वेगळे की एकच?
2 Oct 2015 - 9:00 pm | मांत्रिक
शाबरी स्तोत्र मी तरी वाचले नाही. तुम्हाला शाबरी कवच म्हणायचेय का? या दोन्ही अगदी वेगळ्या गोष्टी आहेत.
2 Oct 2015 - 9:05 pm | मांत्रिक
शाबर विद्येंतर्गत काही स्तोत्रे ही मंत्र म्हणूनच प्रसिद्ध आहेत. तुमचा रोख त्याकडे आहे का?
2 Oct 2015 - 9:18 pm | मांत्रिक
शाबर म्हणजे खरेतर शबर किंवा भिल्ल लोकभाषेतील मंत्र. पण काळाच्या ओघात हे मंत्र अनेक स्थानिक भाषांत रचले गेले. पण कुठल्याही भाषेत का असेना ते काम करतात!
या मंत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी विचित्र, अर्थहीन भाषेत मंत्र निर्मिती! कारण हे मंत्र मुख्यतः ध्वनीप्रधान आहेत. वैदिक व पौराणिक मंत्रांसारखे अर्थप्रधान नाहीत. म्हणूनच विचित्र वाटले तरी जसे आहेत तसेच उच्चारले तर फल देतात. तिथे बुद्धीपेक्षा श्रद्धेचे काम आहे. उदा.
ओम निरंजन जटस्वाही तरंग र्हाम र्हीम स्वाहा
हा मंत्र गहिनी नाथांच्या दर्शनासाठी आहे.
तारावरुन आला दैत तो गेला सितोबाच्या कुळी
हा मंत्र अघोरी शक्तींच्या आवाहनाचा आहे.
या मंत्रांतून अर्थबोध होत नाही पण ते काम करतात.
(सदर मंत्र अस्सल असून केवळ उदा. दाखल दिलेले आहेत. त्यांचा अविचारी वापर करु नये.)
2 Oct 2015 - 9:10 pm | यशोधरा
होय बरोबर. शाबरी कवच म्हणायचे आहे.
2 Oct 2015 - 9:21 pm | मांत्रिक
ते पूर्ण वेगळे आहे. मला तरी त्याचा अनुभव नाही. ते पूर्ण संस्कृत मध्ये आहे. शाबर वाटत नाही.
रचयाकने: त्याचा मुख्य हेतु स्वरक्षण हाच आहे.
2 Oct 2015 - 9:24 pm | यशोधरा
बरोबर.
2 Oct 2015 - 9:18 pm | नूतन सावंत
मांत्रिकभाऊ,व्यनि केला आहे.
2 Oct 2015 - 9:26 pm | मांत्रिक
धन्यवाद! माहिती देतो.
2 Oct 2015 - 9:32 pm | मांत्रिक
ताई व्यनी केलाय! त्याप्रमाणे करा! काही कन्फ्यूजन असेल तर व्यनी करा! नक्कीच सांगेन.
उपासना निवडण्याबाबत गोंधळ होत असेल तर व्यनी करा. नक्कीच चर्चा करू. माझ्या वडिलांना चांगले अनुभव आहेत या उपासनेचे. गुरु नसताना देखील ही उपासना नक्कीच फळ देते.
बिनधास्त करा. अनुभव घ्या व शेअर देखील करा अनुभव!!!
3 Oct 2015 - 7:14 am | मांत्रिक
या माहितीनंतर अनेक जणांनी व्यनी करुन शाबर उपासनेविषयी माहिती विचारली आहे. शाबर उपासनेची साधारण रुपरेषा कशी आहे याबाबत स्वतंत्र धागा काढून माहिती देईन. त्यात शाबर उपासनेची पूर्वतयारी व घरगुती सोपी हवनपद्धती याविषयी माहिती व जमल्यास व्हीडिओ टाकेनच.
5 Oct 2015 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुनही लोक तंत्र मंत्र यावर कसे विश्वास ठेवायला तयार होतात त्यावर चर्चा करूच. लोकांनी अशा थोतांडावर विश्वास ठेवू नये या मताचा मी आहे. बाकी अजुन काय बोलू ? :(
-दिलीप बिरुटे
2 Oct 2015 - 11:38 pm | रातराणी
अनुभवकथन आवडले.
3 Oct 2015 - 2:02 am | स्रुजा
अफाट अनुभव ताई. शांत वाटलं एकदम !! तुझ्या शैली बद्दल तर बोलायलाच नको.
3 Oct 2015 - 8:12 am | रेवती
अनुभव वेगळा नक्कीच आहे. त्यातून आपण जर फार देव देव करणार्यातले नसलो व असा अनुभव आला तर त्याची संगती काय लावावी समजत नाही.
3 Oct 2015 - 8:29 am | मुक्त विहारि
त्यामुळे, तुम्ही खरोकरच भाग्यवान आहात.
3 Oct 2015 - 3:26 pm | कौशिकी०२५
ताई, विलक्षण अनुभव.
लेख खुप आवडला..
3 Oct 2015 - 3:38 pm | सस्नेह
विलक्षण अनुभव.
3 Oct 2015 - 10:23 pm | शिवोऽहम्
असे उत्कट अनुभव तुम्हाला यावे यामागे गुरूकृपा आणि पूर्वकर्मांचे पाठबळ आहे यात शंका नाही. लेख फार आवडला!
4 Oct 2015 - 8:13 pm | एस
माझ्या नास्तिक मनाला हे सर्व अंधश्रद्धा आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास हास्यास्पद वाटते. स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नका.
रच्याकने एक लेख म्हणून शैली प्रवाही व सहज वाटली. असो.
4 Oct 2015 - 8:46 pm | प्यारे१
माझ्या आस्तिक मनाला हे सर्व श्रद्धेचे भोळे प्रकार वाटतात.
स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नका.
दर्शन/सहलीला जाण्याचे योग जुळून येणं,
ज्या मार्गानं जावंसं वाटत आहे तसंच जायला मिळणं ,
अनोळखी बाईकडं आपलं मनोगत व्यक्त केल्यानंतर त्या व्यक्तीनं पुजार्याला सांगितल्यामुळं दर्शन घडणं, अनेक प्रकारच्या सुगंधी द्रव्यांमुळं सुवास येणं, प्रकाश दिसणं वगैरे अनेक शक्यता व्यक्त करता येतात.
सगळ्या गोष्टी विनासायास होणं, सुवास येणं इत्यादि साधनेचे टप्पे मानले गेले असले तरी ते आले म्हणजेच बरोबर आणि ते आले नाहीत तर घोळ असं काहीही सांगता येत नाही.
अनुभूति हा प्रांत पूर्णतः वेगळा मानावा. बाकि लेख प्रवाही
4 Oct 2015 - 8:20 pm | एकजटा अघोरी
मुळीच अंधश्रद्धा नाही.
मुळीच हास्यास्पद नाही.
दैवी अनुभव हे वैयक्तीक असतात.
आपल्या अनुभवाला आले नाहीत म्हणून किमान दुसर्याचे अनुभव खोटे म्हणू नयेत.
@ सुरंगी ताई : जे अनुभवलंत ते १००% सत्य आहेच.
अजिबात गैरसमज मानू नका. ज्यानं दार ठोठावलंय त्याला दार उघडा. बाकी दुर्लक्ष करा ही कळकळीची विनंती.
ईश्वरी अनुभूती फार कमी लोकांना अनुभवास येतात.
4 Oct 2015 - 9:14 pm | एकजटा अघोरी
आपली श्रद्धा नष्ट करायला आपलंच पूर्वकर्म किंवा आपल्या विरोधातील दुष्ट शक्ती कार्यरत असतात. आपण त्याला बळी पडलो तर ते आपले दुर्दैव!
4 Oct 2015 - 8:21 pm | अभिजित - १
सुंदर अनुभव ...
4 Oct 2015 - 8:35 pm | मांत्रिक
काही विरोधी सूर बघून आश्चर्य वाटले. मला एखाद्या गोष्टीचा अनुभव नाही, पण दुसर्याला त्याचा अनुभव येतो म्हणून ते झूठ कसे?
मला क्रिकेट चांगले खेळता येत नाही पण ते सचिनला येते! तो त्यात मास्टरी करतो! म्हणून तो चूक का? बरे इथे उदा. भौतिक दिले म्हणून टीका होणार! पण मग मी म्हणतो, एखाद्याची श्रद्धा तुम्ही खोटी कशी ठरवू शकता. त्या पडावा पर्यंत जायला तुम्ही काहीच प्रयत्न केले नसतील. पण दुसरा करतोय. मग का उगाच त्याचा तेजोभंग?
ताई! तुम्ही अजिबात गोंधळू नका. ही एक परीक्षाच समजा.
त्यातही उत्तीर्ण व्हा. सारं जग जरी तुमच्या श्रद्धेला नावं ठेवत असलं तरी तुमची श्रद्धा डळमळू देऊ नका!!! पुढेच जा!!!
मागे येऊ नका!!!
4 Oct 2015 - 9:07 pm | मांत्रिक
माझे ईश्वराविषयी विचार:-
१. जगात दुःख अपमान अडचणी विघ्ने क्लेश आहेत म्हणून तो रद्दबातल कसा होतो? निरीश्वरवादी देखील ते दूर करु शकले नाहीत!!!
२. एखाद्याला ईश्वरावरील विश्वास जर आश्रय देत असेल तर आपणास तो नष्ट करायचा काय अधिकार आहे?
३. एडिसनने लाइट बल्ब तयार करण्यासाठी शेकडो प्रयोग केले. आपण ईश्वराला शोधण्यासाठी किती प्रयत्न करतो?
6 Oct 2015 - 3:07 am | रामपुरी
डिस्क्लेमरः हा प्रतिसाद तुमची मते/श्रद्धा झूठ ठरविण्यासाठी नाही. फक्त प्रश्न उपस्थित केले म्हणून उत्तरे देण्याचा प्रयत्न. पटलंच पाहिजे असा आग्रह नाही.
१. जर ईश्वर असेल आणि तो चांगला असेल तर इतक्या वाईट गोष्टी कशा होऊ देतो? उदा. काही महिन्यांच्या लहानग्यांवर अत्याचार. आता याला पूर्वकर्म, पूर्वजन्मीचे भोग वगैरे स्पष्टीकरणे हास्यास्पद आहेत.
२. जसे लेखिकेने लेख लिहून त्यांचे मत मांडले तसे इतरांनी आपापली मत मांडली आहेत. कुणीही "हे सर्व सोडून द्या" असा आग्रह केलेला दिसत नाही. तेंव्हा आपापली मते मांडण्यास काही हरकत नसावी.
३. "बल्ब तयार होऊ शकतो" हे पदार्थविज्ञानाच्या अभ्यासावरून नक्की सांगता येते/ सिद्ध करता येते. तसे मी अमूक तमूक गोष्ट केली तर ईश्वर नक्की भेटेल हे सांगता येते का? एडीसनने जसा बल्ब तयार केला तशीच कॄती मी केली तर मी सुद्धा बल्ब तयार करू शकतो. तसंच जर समजा तुम्हाला ईश्वर सापडला तर मी तीच कॄती केली असता मलापण तो सापडेल याची खात्री देता येईल काय?
6 Oct 2015 - 12:56 pm | गामा पैलवान
रामपुरी,
>> तसंच जर समजा तुम्हाला ईश्वर सापडला तर मी तीच कॄती केली असता मलापण तो सापडेल याची
>> खात्री देता येईल काय?
तुमच्या या प्रश्नाचं उत्तरर खणखणीत हो आहे. :-)
हाच प्रश्न विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला होता. त्यांनीही असंच होकारार्थी उत्तर दिलं होतं. ईश्वर सापडायला जी कृती करायला लागते तिला साधना म्हणतात. प्रत्येक माणसाची साधना वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन माणसांच्या कृती तंतोतंत एक नसतात. फक्त साधकाच्या मनात ईश्वरप्राप्तीची तीव्र इच्छा हवी.
आ.न.,
-गा.पै.
6 Oct 2015 - 10:23 pm | रामपुरी
"प्रत्येक माणसाची साधना वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन माणसांच्या कृती तंतोतंत एक नसतात"
असं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर "खणखणीत हो" कसं बरं येईल? :)
6 Oct 2015 - 10:33 pm | आनन्दा
उत्तर "खणखणीत हो" असेच आहे, फक्त लागणार्या वेळात फरक पडू शकतो. म्हणून मार्ग वेगवेगळे आहेत. पद्धत तीच, पण प्रत्येकाच्या पातळीनुसार तपशीलात फरक पडू शकतो इतकेच.
7 Oct 2015 - 12:59 am | रामपुरी
बरं बरं
:)
असो...
6 Oct 2015 - 10:36 pm | प्यारे१
साधना वेगळी असली तरी साध्य एक एकच असतं म्हणण्यापेक्षा त्या जागी पोचल्यावर ते लक्शात येतं असं म्हणावं लागतं.
पुण्याहून गोव्याला जाताना कुठंतरी गोव्याच्या अलिकडे सगळे आंबा घाट, आंबेनळी घाट, कोल्हापूरचा घाट, अणुस्कुरा घाट संपून एकच एक मार्ग शिल्लक राहतो ना? तसंच. आधीची वाटचाल कुणाची आधी कुणाची नंतर सुरु होते. एका टप्प्यानंतर सगळ्या गोष्टी समान असतात.
5 Oct 2015 - 1:19 pm | तुडतुडी
सुंदर . फक्त बसायला खुर्ची दिली . पाणी उद्या ५ वाजता येईल अशी irrelative वाक्यं गाळली तर अजून छान होईल
जालिंदरनाथांनी मैनावती आणि तिची मुलगी चंपावतीला नाथपंथाची दीक्षा दिली होती . सगळे नवनाथ स्त्रीयांकडून भिक्षा स्वीकारत . नवनाथ पारायणाचे स्त्रीयान्नासुधा सुंदर अनुभव येतात . नाथपंथीयांमध्ये स्त्रिया सुधा आहेत . तेव्हा वरच्या २ हि केवळ अफवा आहेत हे सिद्ध होतं . बायकाच बायकांना मागे ओढण्यात पुढे असतात . बायकांनी असं करायचं नसतं अन बायकांनी तसं करायचं नसतं असं सांगितलं कि लगेच मान्य करतात . पण का ? हे मात्र कधी विचारात नाहीत .
जावूदे . अनुभव खूप सुंदर आहे
5 Oct 2015 - 11:05 pm | प्रियाजी
सुरंगी, खरोखरच नशीबवान आहेस. लेख अन फोटोही खूप छान आहेत.
6 Oct 2015 - 4:47 pm | शिलेदार
काय बोलायचे अद्भुत अनुभव आहे आपला.
ते नाथ आहेत....
मी तर म्हणेन की या सारख्या प्रसंगांनी आपली श्रद्धा दृढ होते.
लीनता वाढीस लागते. त्यांचे अस्तित्व जाणवले म्हणजे त्यांचे आपल्यावर लक्ष आहे याची प्रचीती येते.
आणि आनंद आणि शांती लाभते.
6 Oct 2015 - 10:51 pm | जव्हेरगंज
_/ \_
साधारण पुण्यापासून किती कि.मी. वर आहे हे?
जाणारचं!!
7 Oct 2015 - 10:48 am | नूतन सावंत
राम पुरी,प्रत्येकाची साधना वेगळी हेच खरे.मी जे काही करते त्याला रूढ अर्थाने साधना म्हणणे चुकीचे होईल.कारण माझा नमस्कारही नित्यनियमाने असत नाही.पण रस्त्यात पडलेल्या माणसाला मी ओलांडून जाऊ शकत नाही.मग तो माझा कट्टर वैरी असला तरी.बाकी बरेच काही मी माणूस धर्म पाळून करते,त्यात मग जिवावर बेतण्याचे प्रसंग आले तरी मी मागे हातू शकत नाही किंवा तो परमेश्वर मला मागे हटू देत नाही.आणि त्याला काय आवडेल याचा जिम्मा कोणी घ्यावा.थोडी कल्पना येण्याद्साठी हे वाचा. http://www.misalpav.com/node/31680
शिवाय आपण जे करतो त्यालाच परमेश्वर साधना समाजात असेल का?