(शाळेमध्ये असताना शांता शेळके यांची "पैठणी" खुपच आवडली होती. त्याचेच हे विडंबनामृत. लाभ घ्यावा. चुभुद्याघ्या)
फडताळात एक गठुडं आहे,
त्याच्या खाली अगदी तळाला
जिथे आहेत् भरपुर चिंध्या
मफलर चड्डी घोंगडं नाडा
त्यातच आहे अस्ताव्यस्त
बावरुन पसरलेला एक पायजमा
चटेरीपटेरी फुलबॉटम
रंग त्याचा काळपट भुरटा
माझ्या आज्ज्याने लग्नामध्ये
हा पायजमा घातला होता
पडला होता सा-यांच्या पाया
कमरेवर खेचत हाच पायजमा
पायजमाच्या अवती भवती
दरवळणारा उग्र वास
जाणीवे नेणीवेची ओळख
अजिबातच नाही त्यास
चिकन मटन खेकड्यांतुन
वरपत गेल्या किती गटारी
पायजम्याने पाहीले
ना शाकाहारी... ना मांसाहारी
मावा चुन्यात माखली बोटे
पायजम्याला केव्हाच पुसली
ढाब्या गुत्त्याची सुरेल मैफिल
टपरी आडुन दणकुन हसली.
वर्षा मागुन वर्षे गेली,
बाई बाटलीचा सराव झाला
नवा कोरा तंग कपडा
खपून मळून ढिला पडला
पायजम्याच्या चिरकुटातून
सगळे प्रताप उघडे पडले
विधुरपणी मरण आले,
आजोबा माझे एकदाचे खपले
कधीतरी हा पायजमा
हातात धरतो अगदी बावचळुन
खरबरीत सुकट स्पर्शामधे
आज्जा भेटतो मला जवळून
मधली वर्षे ऊडुन जातात
तारस्वरांचा जुळतो धागा
पायजम्याच्या चटेरी पट्ट्यांनो
आज्ज्याला माझा साष्टांग सांगा
प्रतिक्रिया
1 Oct 2015 - 9:29 pm | चांदणे संदीप
धन्य झाले मिपा, दिवस हा असाही उगवला
फडताळ्यातल्या पैठणीचा पायजमा झाला!
मस्त झालेय विडंबन!!
पायजम्याच्या चटेरी पट्ट्यांनो
आज्ज्याला माझा"ही" साष्टांग सांगा
____/\____
1 Oct 2015 - 11:59 pm | जव्हेरगंज
धन्यवाद संदीप:)
आनंद झाला..
1 Oct 2015 - 11:01 pm | दिवाकर कुलकर्णी
माफी असू द्यावी !
पायजम्याच्या चोर खिशात
भिकासा यमासा बिडी असणार
पहिला झुरका मारतेवेली
तीच त्यान शिलगावली असणार
सर ! आपलं विडबन आवडलं
1 Oct 2015 - 11:58 pm | अभ्या..
हाय हाय
काय आठवण काढली,
म्या भिकुसा बीडीचे रैपर पण केलाय बरका रीडिज़ाइन,
आमच्या गावचा ब्रान्ड,
2 Oct 2015 - 12:00 am | जव्हेरगंज
ही चारोळी थोरच आहे :-D:-D
2 Oct 2015 - 3:31 am | गावरान
तुमच्या माहितीकरता
मूळ कविता
पैठणी
फडताळात एक गाठोडे आहे;त्याच्या तळाशी अगदी खाली
जीथे आहेत जुने कपडे, कुंच्या,टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर,जरी चौकडी,रंग तीचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती
पडली होती सार्यांच्या पाया हाच पदर धरुन हाती
पैठणीनी अवती भवती दरवळणारा सूक्ष्म वास,
ओळखीची…अनोळखीची…….जाणीव ग़ूढ आहे त्यास
धुप..कापूर….उद्बत्यातून ल जळत गेले कीती श्रावण
पैठणीने या जपले एक तन एक मन…
खस-हीन्यात माखली बोटे पैठणीला केंव्हा पुसली
शेवंतीची, चमेलीची आरास पदरा आडुन हसली
वर्षामागून वर्षे गेली,संसाराचा स्राव झाला,
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले,माझ्या आजीचे सोने झाले
कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून
मऊ-रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात,काळपटाचा जुळतो धागा
पैठ्नीच्या चोक्ध्यानो आजीला माझे कुशल सांगा……
2 Oct 2015 - 6:52 am | दमामि
भारी!
2 Oct 2015 - 8:29 am | शिव कन्या
पैठणी तर सुंदर आहेच. पायजमा असाही असू शकतो...... धन्यवाद.
आवडले.
2 Oct 2015 - 8:39 pm | विवेकपटाईत
आवडली. पायजामाला लागलेले डाग लपविणे शक्यच नाही. चोरी पकडलीच जाते.
2 Oct 2015 - 8:51 pm | जव्हेरगंज
:)
2 Oct 2015 - 9:37 pm | पैसा
चांगलंय!
2 Oct 2015 - 11:48 pm | रातराणी
महान _/\_