कविता एक लांबचा प्रवास

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
3 Jun 2008 - 3:11 am

कविता वाचता वाचता कमीत कमी तीस एक वर्षं संपली. आधी गाणी आवडायची म्हणून बर्‍याच कविता पाठ केल्या. नंतर लिहिण्याचे प्रयोग करून पाहीले. आवडत्या कवींची पुस्तकं पाठ झाली.हिंदी गाण्याच्या चालीवर बुद्धजयंतीच्या बार्‍यांमधे कविता लिहिल्या.भजनाच्या मंडळींमध्ये बसून शे दिडशे अभंग पाठ झाले. पण "वारीयाने कुंडल हाले" सारखी गवळण दहा वेळा गाउन त्यातल्या कवितेचा थांग मनाशी लागेना. पाटील बुवांना विचारलं "बुवा समजत नाही हो गवळण ".
बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?".पण मग एकचं नाद लागला कवितेला शोधण्याचा.पण प्रत्येक वेळेला हुलकावणी. परत मी गोंधळात्.आता राधा व्हायचं कसं?
कलायडोस्कोपच्या आतली सुंदर रांगोळी दिसावी पण हातात सापडू नये असं व्हायचं.
टपटपा गारा पडताना दिसाव्या आणि आपण हाताची ओंजळ करावी पण गार हातात येण्यापूर्वीच पाणी व्हावं असाच अनुभव.आमचे कलेचे सर म्हणाले एकरुपता जाउ द्या थोडसं साधर्म्य साधण्याचा तर प्रयत्न करा.मग ते म्हणाले "बघा विचार करा एखादी कल्पना तुमच्या हातातून , मनातून निसटली तर तुम्हाला कसं वाटतं ?"
मी साडीचा सेल्समन मी म्हणलो "शिफॉनचा पदर हातातून सुळकन हातातून निसटतो तसंच"
आणि मग लक्षात आलं हळूहळू...
मग पिक्चर बघण्याचा नाद लागला, गाणी म्हणता म्हणता कवितेची वळणं समजायला लागली.
"किसी और शायद कम होगी
मुझे तेरी बहोत जरूरत है"
हे समजलं प्रेमात पडल्यावर.
"तू न आये तो क्या , भूल जाये तो क्या ?
प्यार करके भूलाना ना आया हमे"
हे वर्षभरानंतर समजलं.पण सिनेमाचं थोडं वेगळंच होतं. समोर थोडी तरी चित्रं होती. मराठी कविता हातातून निसटतच जातेय असं वाटत होतं."विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे " मधुचंद्राच्या दुसर्‍या दिवशी रात्री कळलं.
(लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट)
पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली.
अनिल , वा .रा.कांत ,पु.शि. रेगे वेड लावत राहीले आणि मी जुगार्‍याच्या मस्तीत आणखी आणखी दान लावत राहिलो.
प्रोणिता दास शी ओळख वाढली तेव्हा रेग्यांची पुष्कळा कळली.(पुष्कळ पुष्कळ अंग तुझं)
एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला.
--------------------------------------------------------------------------------------------------
दोन दिवसा पूर्वी जलपैगुडी हून निघाल्यावर गाडी बंद पडली. आधी थोडी वाट पाहिली नंतर पायउतार झालो.समोर हिरव्यागार भाताची खाचरं मांडून ठेवली होती.मी न बोलता पुढे चालत होतो. संध्याकाळची चार साडेचारची वेळ असावी. ही माझ्या मागोमाग येत येत होती.दूर टेकड्यांना हलका निळा रंग चढत होता.रस्ता सोडून आम्ही दोघंही खाली उतरलो. समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो.
गवताच्या घरातून एक बाई बाहेर आली.काळीसावळीशी. हिरवटं रंगाची विटकी साडी .मला ती अळूच्या पानासारखी दिसली. काळसर जांभळा देठ आणि हिरवा पदर .तळ्याच्यापलीकडून आमच्याकडे पाहिलं आणि तिच्या कामाला लागली. आम्ही दोघंही तळ्यात आणि कमळात.डोक्यावर चतुर उडत होते.वारा पडलेला.मध्येच एका पक्षानं एक अनवट आवाज दिला. कमळाच्या पानाखालून पाणकोंबड्या फडफडून बाहेर आल्या ,दिसेनाशा झाल्या.घरून निघतानाच मनात होतं आता हा शेवटचा हिमालयाचा प्रवास ,पुढच्या वर्षी येउ की नाही ते काही सांगता यायचं नाही.यानंतर सगळा प्रवास मुलांच्या पाठीवरून.मनमुराद बर्फात खेळलो होतो .आता परतीच्या प्रवासाची संध्याकाळ. आम्ही एकएकटे संपवत होतो.गांतोक सोडताना दाबलेला हुंदका आता अंधारून डोळ्यातून तळ्याच्या तळाशी जमा होत होता.
गेल्यावर्षी मोठं घर घ्यायचं म्हणून वाडी विकली त्याची राहून राहून आठवण यायला लागली.कर्जाचा बोजा नको म्हणून विहीरसकट सगळी वाडी विकली. वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं.तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली.
तळ्यापलीकडे आता एक नागडं उघडं बाळही धावत आलं होतं.गळ्यात काळागंडा आणि कमरेला चांदीचा करगोटा. हिनं माझ्याकडे पाहिलं. मुलांची दगडाच्या डोणिवरची आंघोळ आठवायला लागली. विहीरीच्या शेवाळी पाण्याचा वास आपोआप नाकाशी आला.
लाखो रुपयांचा फ्लॅट पण दाराशी कमळाचं तळ नाही. वाडी विकताना आणलेल्या घंगाळात आता बांबूची झाडं आणि काचेच्या पेटीत मासे.
कमळाभवती फिरणारे चतुर आता उंच उडायला लागले होते. चतुरांना अंधाराची चाहूल आधीच लागली होती.मावळणार्‍या सूर्याची एक शेवटची तिरीप तळ्याच्या तळापर्यंत पोचली होती.टिटवीचा आवाज यायला लागला होता.कमळानी अंग आवरते घ्यायला सुरुवात केली. एक एक पाकळी मिटायला लागली होती. आम्ही दोघही एकमेकांशी बोलत नव्हतो पण तळ्याकाठी एकाचं आरशात आम्ही आमचं आयुष्य निरखून पाहत होतो.
चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता पण एकदा हिच्या हातावर मी मेंदीनी कमळंच कमळ काढली होती.त्यानंतरच्या वर्षात कमळं विसरूनचं गेलो होतो.कमळाच्या पाकळ्या तळ्यात उद्या उमलण्यासाठी बंद होत होत्या.आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता.
परत एकदा एक कर्कश टिटवीचा आवाज आला आणि आसपासच्या हिरव्या खाचरातून शेकडो पांढरे पक्षी आकाशाकडे झेपावले .एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला.
आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.
ड्रायवरनी आवाज दिला गाडी तयार झाली होती.
मी हात पुढे केला. हिनं घट्ट धरून ठेवला. दोघही वर आलो. कोण कोणाला आधार देत होतं ते कळत नव्हतं.
पण अचानक लक्षात आलं कवितेची एक ओळ आता समजली.

हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजताना
कमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात.
==============================================================
कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

3 Jun 2008 - 3:51 am | पिवळा डांबिस

मस्तच लिहिलंय!
काही काही लिखाण असं असतं की त्यावर सविस्तर प्रतिक्रिया न देता नुसतं शांत बसून ते संवेदावं असं वाटतं...
त्यापैकीच हे एक.

चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे
जियो! असेच लिहीत रहा!!

-पिवळा डांबिस

प्रास's picture

8 Nov 2011 - 10:18 pm | प्रास

सध्या इतकंच.

पिडांकाकांच्या इतकं पर्फेक्ट पीन-पॉईण्ट बोलणं जमणारच नाही मला म्हणून....

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jun 2008 - 4:03 am | बिपिन कार्यकर्ते

मलाही आवडले... तुमची रेंज छान आहे. आधी पिसिजेसि आणि आता हे... दोन्ही प्रकार तुम्ही छान हाताळले आहेत.

"बुवा समजत नाही हो गवळण ".
बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?".

(लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट)

एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला.

मस्त...

बिपिन.

मुक्तसुनीत's picture

3 Jun 2008 - 5:48 am | मुक्तसुनीत

असे दिवस असतात की कवितेला आपण पारखे होतो. दिवसाला जोडून दिवस निघून जातात ..दिन गेले काव्याविण सारे गेल्यासारखे. आणि कधी "भलत्या वेळी , भलत्या मेळी असता मन भलतीचकडे " असताना "आज अचानक गाठ पडल्या"सारखे होते. तसे हे तुमचे लिखाण. वेड्यासारखे धावणारे आयुष्य नि त्या आयुष्यामागे धावणारे आपण हे विसरतोच की ठायलयीत , संथ प्रवाहात आपल्याला पुन्हा काव्याचा सहवास घडू शकेल ... या सहवासाबद्दल लेखकाचे अनेक आभार . तुमचा हा लेख पुनःपुन्हा वाचला. जेव्हढा वाचला तेव्हढे शांत , तृप्त वाटले.

सन्जोप राव's picture

3 Jun 2008 - 7:09 am | सन्जोप राव

कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले.
सगळे शब्द सगळ्या संदर्भांसह समजले पाहिजेत या अट्टाहासाला कवितांच्या राज्यात अर्थ नाही. खानोलकर, रेगे, ग्रेस, रॉय किणीकर यांच्या कवितांचे (a+b)2 = a2+2ab+b2 असे विश्लेषण करता येईलच असे नाही. ते तसे करण्याचे गरजही नाही. एकेक कविता उशाला घेऊन झोपून जावे.
हळूहळू स्वतःच्या मनाच्या तळाशी सूर मारायला लावणारा लेख. एक गद्य कविताच.
सन्जोप राव

फटू's picture

3 Jun 2008 - 7:11 am | फटू

पुन्हा एकदा ज्युनियर कॉलेजमध्ये मराठीच्या तासाला बसल्यासारखं वाटलं... प्राध्यापक एखादा आशयघन ललीत लेख तन्मयतेने शिकवत आहेत... आणि आपणही अगदी त्या लेखामध्ये हरवून गेलो आहोत... अगदी असंच झालं तुमचा हा लेख वाचताना...

एक अप्रतीम लेख मिपाकराना देण्याबद्दल धन्यवाद...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर's picture

3 Jun 2008 - 7:41 am | अरुण मनोहर

>>>>चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता

तुम्ही सादर केलेले अप्रतीम गद्य चित्र पाहून असे वाटत नाही. तुमचा शब्द कुंचला ताकदवान आहे.

अरूण मनोहर

अरुण मनोहर's picture

3 Jun 2008 - 8:35 am | अरुण मनोहर

"मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे" हे फार आवडले.

विसोबा खेचर's picture

3 Jun 2008 - 8:26 am | विसोबा खेचर

रामदासराव, आपल्या लेखाचे कुठल्या शब्दात वर्णन करू?

अत्यंत उच्च दर्जा असलेले लेखन इतकंच म्हणेन. वाचून खूप समाधान वाटलं, तृप्त वाटलं..!

या लेखामुळे मिपाचा दर्जा अधिकच उंचावला आहे एवढं निश्चित म्हणेन...!

कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली.

क्या बात है! गाण्याचंही अगदी तसंच आहे. एखादा राग, एखादा स्वर आयुष्यभर पुरतो! आयुष्य पुरी पडतं परंतु यमनातला गंधार प्रत्येक वेळेला नव्यानेच भेटत राहतो...!

अवांतर -

पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली.

रागसंगीताचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा, आस्वाद वेगळा! बागेश्रीची ओढ आर्त निश्चितच असू शकते, परंतु त्यात मला तरी कधी गुढत्व जाणवलं नाही. अतिशय प्रसन्न स्वर आहेत बागेश्रीचे. शृंगाररस अगदी काठोकाठ भरला आहे बागेश्रीत! 'आर्त परंतु गुढ ओढ' ही मला प्रामुख्याने मारव्यातच दिसली/नेहमी दिसते. सोहनीतदेखील एक अनाकलनीय गुढत्व बर्‍याचदा अनुभवलं आहे!

असो, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येऊ द्या एवढीच विनंती...

आपला,
(तृप्त!) तात्या.

राजे's picture

3 Jun 2008 - 10:36 am | राजे (not verified)

निशब्द !!!!!

तात्या : १००% सहमत.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2008 - 8:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'कविता' समजावणारा सुरेख लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मानस's picture

3 Jun 2008 - 8:43 am | मानस

खरोखरच "नि:शब्द", कविता ही भोगावी असं म्हणतात ...... आम्हीतर अजुन कवितेतला "क" शोधतोय.

आज मनापासुन वाटतय, खूप खूप जगावं, जगायचय आणि त्या जगण्याचं प्रयोजन हे असले लेख व त्यामधुन व्यक्त केलेले विचार देत असतात.

इंदिरा संतांची "लिहिताना" कविता आठवली, ती इथे द्यायचा मोह आवरत नाही .................

अडखळे लिहिताना
हात कधी अवचित
आणि निरखून डोळे
पहातात अक्षरात

कानावेलांटीचा डौल,
मोड तशी अक्षराची
कधी द्यावी, कधी नाही
रेघ अक्षरावरची

नकळत उमटली
कुणाची ही काय तऱ्हा
इवल्याशा रेषेमाजी
भावजीवनाचा झरा

नव्हेतच अक्षरे ही;
स्मृतीसुमनांचे झेले
एकाएका अक्षरात
भावगंध दरवळे

म्हणूनीच लिहिताना
अवचित थांबे हात;
धुके तसे आसवांचे
उभे राही लोचनांत

शिव कन्या's picture

2 Oct 2015 - 8:30 am | शिव कन्या

वा! सुंदर.

वाचक's picture

3 Jun 2008 - 8:47 am | वाचक

प्रत्येक शब्द कसा अगदी एखाद्या लयित बांधून अलगद वार्‍यावर सोडून द्यावा असा... म्हणजे नकळत कधी कानी सूर आलेच तर ओळखीचा निदान भास तरी होउ शकेल.

उत्तम. निसर्ग वर्णन सुद्धा अगदी चित्रदर्शी.

खानोलकरांची कविता आहे ना 'माझ्या ह्या अजाण कवितेच्या वाटेला जाउ नका, ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या.... मोडून पडाल " किंवा 'कविता म्हणजे आकाशीची वीज - होरपळून घ्यायची तयारी हवी'

कोलबेर's picture

3 Jun 2008 - 8:58 am | कोलबेर

पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत खिळवून ठेवणारा लेख. मानसरावांनी दिलेली कविता देखिल शब्दांच्या पलीकडली..

रामदास भौ खूप दिवसानी काहीतरी हातातुन निसटु पहणारे चांगले वाचायला मिळाले
एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला.
जमिनीवर आणले तुम्ही एका समाधीतुन.....
आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.
वाचताना माझ्याही डोळ्यात तळं जमा झाले.

प्राजु's picture

3 Jun 2008 - 10:43 am | प्राजु

काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहिये. खूप दिवसांनी इतका सुंदर लेख वाचला.
त्यातही..

समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो.
हे तर अप्रतिम.
चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे
खरंतर.... ही लेख म्हणजेच एक सुंदर "गद्य काव्य" आहे असे मी म्हणेन.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

3 Jun 2008 - 11:41 am | बेसनलाडू

मस्त लिहिले आहे. मुग्ध झालो वाचताना. छान. आवडले.
(संतुष्ट)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

3 Jun 2008 - 12:06 pm | स्वाती दिनेश

वरील सर्वांसारखीच माझीही अवस्था झाली आहे.प्रतिक्रिया लिहायला शब्द शोधते आहे पण सापडत नाहीयेत.
अप्रतिम गद्यकविता!
स्वाती

भडकमकर मास्तर's picture

3 Jun 2008 - 1:59 pm | भडकमकर मास्तर

लेख पुन्हा पुन्हा वाचला...
खूप छान...
आपण असेच लिहिते रहा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज's picture

3 Jun 2008 - 2:17 pm | सहज

पुन्हा पुन्हा वाचण्यात खरच मजा आली.

चतुरंग's picture

3 Jun 2008 - 3:31 pm | चतुरंग

पहाटे ५.३० वाजता आपल्या प्रतिभेचं बोट पकडून माझं मन कधी लेखात गेलं आणि तळ्याकाठी जाऊन कमळं बघायला लागलं समजलंच नाही!
टीटवीच्या शिट्टीनं सुद्धा भानावर यायचं नव्हतं. कवितेच्या शोधाच्या ह्या ललितानं मला आत नेलं. अनुभव इतक्या अकृत्रिम शब्दात मांडण्याची तुमची हातोटी काव्यच आहे.
माउलीनं 'एकेक ओवी अनुभवावी' म्हटल्याप्रमाणे तुम्ही कविता अनुभवलीत. असं एक कडवं समजलं धन्य झालात.
कुठल्या ओळींचा संदर्भ देऊ? संपूर्ण लेखच एक भरजरी वस्त्र आहे एखाद्या धाग्याला हात घातला तर उसवायची भीती वाटते. असेच शेले विणत रहा.
नकळत येऊन आम्ही आनंद घेत राहू.

चतुरंग

विवेक काजरेकर's picture

3 Jun 2008 - 3:32 pm | विवेक काजरेकर

रामदासजी,

फारच सुंदर लिहिलंय. तुमची लेखणी अगदी चित्रदर्शी आहे. उथळ पाण्यात सैरावैरा पळणारे मासे कैकदा पाहिलेत. पण "मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते" असं काही वाचलं की चित्र कसं स्पष्ट डोळ्यापुढे उभं रहातं.

कविता कळायला लागायला मनाची एक अवस्था यावी लागते हे स्वानुभवावरुन सांगू शकतो. एका ठराविक वयापर्यंत गाण्याच्या केवळ सुरावटीत अडकलेल्या मला जेंव्हा त्यातला गर्भितार्थ कळायला लागला तेंव्हा कळलं इतके दिवस आपण कोणत्या आनंदाला मुकत होतो ते.

असेच लिहित रहा

शितल's picture

3 Jun 2008 - 5:42 pm | शितल

परत परत वाचावे असे लिखाण आहे, वाचुन मन तृप्त होते.

रामदास's picture

3 Jun 2008 - 11:30 pm | रामदास

रामदास's picture

4 Jun 2008 - 7:36 am | रामदास

मिपा मुळे लिहावेसे वाटले. संधी उपलब्ध करून दिली.
वाचकांचे आभार. आपल्या प्रोत्साहनाची आवश्यकता कायम राहील.
अवांतर.. काल फोटो लोड करायला शिकलो.

मुक्तसुनीत's picture

4 Jun 2008 - 8:03 am | मुक्तसुनीत

तुमचे हे टिपण म्हणजे तुम्हालाच नव्हे तर मिसळपावलाही गौरवाचीही बाब आहे. तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल. आतापर्यंत अप्रकाशित राहिलेले तुमच्यासारखे टॅलंट प्रकाशात आणणे हे या स्थळाचे मोठे यश.

विसोबा खेचर's picture

4 Jun 2008 - 8:26 am | विसोबा खेचर

तुमच्यासारखे जितके जास्त गुणी लोक मिसळपाववर येतील आणि लिहीतील तितके ते मिसळपावला श्रेयास्पद ठरेल.

पूर्ण सहमत आहे!

रामदासरावांनी व्यासपिठाचा उल्लेख केला आहे परंतु त्याचं विशेष काही नाही. व्यासपिठं अनेक आहेत, आणि मराठी माणसाच्या वाढत्या आंतरजालीय वावरामुळे, नव्यानव्या तांत्रिक सुविधांमुळे यापुढेही अनेक व्यासपिठं उपलब्ध होऊ शकतील. तेव्हा 'व्यासपिठ मिळवून दिलं!' हे रामदासरावांच वाक्य मिपा केवळ कृतज्ञतेच्या भावनेनेच स्वीकारत आहे!

उलटपक्षी, मुक्तरावांनी मांडलेला मुद्दाच अधिक योग्य आहे. मिपावर सभासदांनी केलेल्या लेखनामुळेच मिपाचा गौरव आहे आणि मिपाचे सभासद हेच मिपाचे ऐश्वर्य आहे असेच मिपा मानते!

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

यशोधरा's picture

4 Jun 2008 - 7:58 am | यशोधरा

कसलं सुरेख लिहिलं आहेत!! खरोखर गद्य कविता केली आहेत!!

चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे

अतिशय सुरेख!

आनंदयात्री's picture

4 Jun 2008 - 2:38 pm | आनंदयात्री

नितांतसुंदर, कसदार लेखन !

भडकमकर मास्तर's picture

4 Jun 2008 - 9:37 am | भडकमकर मास्तर



______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

जयवी's picture

4 Jun 2008 - 2:20 pm | जयवी

रामदास, अहो वाचन तॄप्ती काय असते ते तुमचा हा अतिशय काव्यात्मक लेख वाचताना जाणावलं. अप्रतिम लिहिलंय.... पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आहे हा.
खूप दिवसांनी असं मनाला शांत करणारं , उल्हसित करणारं वाचायला मिळालं.......असेच लिहित रहा.

सुवर्णमयी's picture

4 Jun 2008 - 5:16 pm | सुवर्णमयी

लेख आवडला. कवितेचे वेड असेच वर्षानुवर्षे तिच्यामागे जावे असे आहे. खूप वाचायला मिळेल असे वाटत असतांना लेख एकदम संपला. त्याची हुरहूर वाटली.
(मी कालच प्रतिसाद दिला होता.. पूर्ण टिच़की द्यायची राहिली का? ..)

मनिष's picture

4 Jun 2008 - 9:00 pm | मनिष

काल घाईघाईत वाचला हा लेख आणि मनात रेंगाळत राहिला...आज निवांतपणे वाचला, आणि एक अस्वस्थता दाटून आली. माझे कवितेवर मनापासून प्रेम, गेल्या काही वर्षात मात्र अनेक कटू अनुभवानंतर, खूप ट्क्के-टोणपे खाऊन वाटत होते की आपले कवितेचे हळवे वय संपून गेले, कित्येक दिवसात, खर तर वर्षात उस्फुर्ततेने कविता लिहिताच आली नाही, कधीतरीच वर्षा-दोन वर्षात एखादी. हे वाचल्यावर मात्र आज जखम ओली झाली, बाहेरच्या जगासाठी चढवलेल्या ह्या कठीण अलिप्त वृत्तीच्या कवचामागे, एक हळवे, संवेदनशील मन आहे हे परत जाणवले. थोडे चैतन्य आणि खुपशी अस्वस्थता सळसळून गेली...ज्या जुन्या खडबडीत वाटेवर कवितेचा हळवा हात हळुच सोडला ते आठवले, पण कधी मी माझे हळवे, उत्कट प्रतिसाद विसरून व्यवहारी प्रतिसाद देऊ लागलो ते नाही आठवले. वाटत होते ते उत्कट अनुभवांचे, भावनांचे, उस्फुर्त प्रतिसादाचे कोवळे वय निघून गेले, तो उत्कटपणा आता फक्त आठवणीतच राहिल ... पण तुमच्या पन्नाशीतल्या ह्या तरल, काव्यमय लेखाने जाणवले की अजूनही तो उत्कटपणा अजूनही तीव्र आहे, राखेखालील निखारे अजून धगधगतात आहे...मनाचा तळ ढवळून निघाला, खुप काही हरवले आहे वाटणारे सापडले, एक सर्जनशील, संवेदनशील अस्वस्थता सळसळली...खूप छान वाटले त्या जाणीवेने...

रामदास, अजून काय लिहू? एका अप्रतिम, तरल आणि उत्कट अनुभवाबद्द्ल शतशः धन्यवाद!

आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.

हे वाचले आणि माझ्या डोळ्यातील तळ्यामुळे अक्षरे धुरकट दिसू लागली. माझ्या स्वतःच्या कविता पुन्हा उमलतील की नाही माहित नाही, पण इतर कवितांचा अनुभव पुन्हा उत्कटतेने घेईन, अगदी त्यांच्या त्या हळव्या ओळींचे अर्थ तितक्याच हळूवारपणे मनात उमलेपर्यंत...हया दीर्घ, अंर्तमुख, वेडावणार्‍या, पण जाणिवा समृध्द करणार्‍या प्रवासासाठी मीही उत्सुक झालोय....

भडकमकर मास्तर's picture

5 Jun 2008 - 12:07 am | भडकमकर मास्तर

मनापासून लिहिलेला अप्रतिम प्रतिसाद... =D>
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लिखाळ's picture

5 Jun 2008 - 2:09 am | लिखाळ

नमस्कार !
अतिशय ताकदवान लेख ! अभिनंदन.
जिव्हाळी लागणे, घंगाळ आणि बांबू, शाळा सुटलेले मासे, तळ्यापलिकडल्या बाईचे वर्णन, असे आणि बरेच काही अतिशय आवडले.

कथेच्या शेवटी कवितेच्या ओळी येतात त्या क्षणी अंगावर सरसरून काटा आला. तो भाग जबरदस्त साधला आहे. पुन्हा पुन्हा वाचावा असा.

यावरून मला नंदन यांच्या अनुदिनीवरील 'आता आमोद सुनासि आले।' (http://marathisahitya.blogspot.com/2006/06/blog-post_28.html) हा लेख आठवला.

पु. ले. शु.
-- लिखाळ.

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 7:54 am | भाग्यश्री

खूप सुंदर !!

शार्कुला's picture

6 Jun 2008 - 1:51 pm | शार्कुला

सुन्दर लेख ! अभिनंदन

सर्किट's picture

10 Jul 2008 - 2:14 am | सर्किट (not verified)

रामदास,

तुमचे सर्व जुने लेखन अधाशासारखा वाचत सुटलोय. एकापेक्षा एक सरस लेख. प्रत्येक वेळी, अप्रतीम, सुंदर, जियो, असे प्रतिसाद किती वेळा देणार ?

त्यामुळे, अशा उत्कृष्ट लेखनाला "रामदासी" लेख, असे नामाभिधान देतो.

आता यापुढे मिपा वर कुठले ही लेखन वाचताना त्याची ग्रेड "सर्किट-ते-रामदास" (१ ते १०) ह्यापैकी कुठली आहे, ह्याचा विचार नकळत होत राहील.

- सर्किट

केशवसुमार's picture

11 Jul 2008 - 3:16 pm | केशवसुमार

सहमत..
हेच म्हणतो..
(एक पंखा) केशवसुमार

मनीषा's picture

10 Jul 2008 - 8:32 am | मनीषा

तुम्ही तर कवितेचं शब्दचित्रं रेखाटलं आहे.
कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे.
खरं आहे...

धनंजय's picture

10 Jul 2008 - 9:31 am | धनंजय

मनाला भिडणारे लेखन.

आणखी प्रशंसा करून माझेच शब्ददारिद्र्य दाखवत नाही.

अनिल हटेला's picture

11 Jul 2008 - 3:02 pm | अनिल हटेला

अप्रतीम !!!!

कडकडीत उन्हातून घरात आल्याआल्या वाळा घातलेले माठाचे पाणी घटाघटा पिऊन उरलेले चेहर्‍यावर शिंतोडून तसेच डोळे मिटून पंख्याखाली पडून राहिल्यासारखे वाटले.

अगदी अशी अवस्था झाली.....

येउ देत अजुन लेख येउ देत.....

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

उल्हास's picture

28 Sep 2011 - 12:33 am | उल्हास

अतिशय सुंदर लेख

वाचुन मन तृप्त झाले.

मैत्र's picture

28 Sep 2011 - 12:44 pm | मैत्र

रामदास काकांचं हे गद्य काव्य निसटून गेलं होतं वाचनातून... वर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद !
कितीही कोलाहलातून शांत अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य किती वेगवेगळ्या तर्‍हेने विविध विषयांमधून दाखवतात हे रामदासी लेख...

एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला.

वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं. तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली.

आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता.

हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजताना
कमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात.
==============================================================
कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे

काय लिहावं ... ग्रेस च्या कवितेसारखं त्या अनाहतपणात थोडं हरवून जावं बस्स...

दंडवत फक्त..

श्रावण मोडक's picture

28 Sep 2011 - 12:58 pm | श्रावण मोडक

लेख वर आलाय म्हणून आता लिहितो. हा लेख तेव्हाच वाचला होता. प्रतिक्रिया द्यायला शब्दही सुचत नव्हते. आत्ताही पुन्हा वाचला. शब्दांतून मांडणं शक्य नाही, कारण हा मामला 'एक अधिक एक बरोबर दोन' असा नाही. विशेषणं आहेत, तत्सम उद्गार काढता येतात. पण वर सर्केश्वरानं म्हटलं तेच खरं. :)

स्पंदना's picture

7 Feb 2013 - 4:24 am | स्पंदना

नुसत भरुन आलय वाचताना.
श्रामो तुमचे शब्द नसते मिळाले तर अशीच परतले असते नि:शब्द! धन्यवाद!

साबु's picture

28 Sep 2011 - 1:45 pm | साबु

.

त्यावेळी प्रतिक्रिया देता आली नव्हती.
आताही तशीच अवस्था.
तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल.

बाडिस.
रामदास काकांना पुनश्च एकदा दंडवत.
_/\_

तुमच्या लेखनाचा वेगळा विभाग केला तर आम्हाला त्यावर टिचकी मारून हवे तेंव्हा वाचन करता येईल.

हेच म्हणतो...

प्यारे१'s picture

9 Nov 2011 - 2:45 pm | प्यारे१

काय प्रतिक्रिया देऊ?
झळ्ळकन आलेलं डोळ्यातलं पाणी कसं दाखवू?
हंबरडा फोडून रडावंसं वाटतंय.

आपलेपणानं जपलेल्या गोष्टी, व्यक्ती बोटांमधून सुटून चाललेल्या वाळूसारख्या निसटताना दिसतात.
कधी काही करु शकत असून करता येत नाही, करत नाही. कधी काही करुच शकत नाही..... :( :(

कपिलमुनी's picture

29 Nov 2011 - 7:04 pm | कपिलमुनी

जी. ए. कुलकर्णीची आठवण झाली ..

रामदास काकांचे लेख कितीतरी वेळा परत परत वाचावसं वाटणारे असे तरिही तृप्तपणा येत नाही.. मंत्रमुग्ध करुन सोडणारे लिखाण

विजुभाऊ's picture

30 Nov 2011 - 1:39 pm | विजुभाऊ

मेरा मुझसे मिलना ना हुवा.
तेरी आंखो के सिवा
अब याद आती है मुझे वो नजर
अहसास कराती थी कभी.
मेरे अंदर जी रही उम्मीदकी

इनिगोय's picture

24 Aug 2012 - 5:27 pm | इनिगोय

शुचिच्या या धाग्यामुळे इथे पुन्हा एकदा आले, आणि पुन्हा एकदा मन प्रसन्न झालं.
का जगावं, या प्रश्नाचं उत्तर कधीकाळी चुकून हरवलंच तर इथे यावं, आणि पुन्हा जगायला लागावं..
..सप्रेम नमस्कार.

(सध्या लेखणीला विश्रांती दिली आहेत का?)

राघव's picture

25 Aug 2012 - 10:58 am | राघव

खूप छान वाटलं वाचून. :)

__/\__

राघव

कवितानागेश's picture

28 Aug 2012 - 3:54 pm | कवितानागेश

अप्रतिम! :)

sagarpdy's picture

31 Aug 2012 - 4:23 pm | sagarpdy

अतिशय सुंदर

कितीतरी ताजंतवानं .... खुप छान वाटलं वाचुन .आयुष्याच्या संध्याकाळला जोडीदाराची
साथ असनं .. खरच सुंदर अनुभव असावा .
थँक्स काका ...

दीपा माने's picture

7 Feb 2013 - 8:27 am | दीपा माने

तुमचं हे लिखाण खोल अंतःकरणातून आलंय त्यामुळे ते सहज सुंदर आणि आपल्या वैदिक धर्मात सांगितलेल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमी विचारांना धरुन आहे. हे गद्दकाव्य वाचताना नुकताच वाचनात आलेला व लिहुन ठेवलेला एक सुविचार असा, 'आपल्या रोजच्या अनुभवातुन मिळणार्‍या चिरंतर मुल्यांना आपण ओळखू शकलो तर जीवनातील उत्तम गोष्टींचा आनंद आपण लुटू शकू.' आपल्या पुढील लेखनाला शुभेछा.

सुरेख सुविचार. धन्यवाद दीपा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Feb 2013 - 10:08 am | मिसळलेला काव्यप्रेमी

काका, हे गद्यकाव्य मी ३०-४० वेळा वाचले असेल, पण अजुनही शब्द शोधतोय प्रतिसादायला.
शेवटी सोडून देतो आणि तसाच परत जातो.

अर्धवटराव's picture

2 Oct 2013 - 1:41 am | अर्धवटराव

डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए.
बुवा... आम्हाला तर तुमचं हे एक गद्य आयुष्यभर पुरेल.
म्हणुनी ठेवीली पायी डोई. __/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2013 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

या माणसाला परत लिहीता करा रे कोणीतरी... भन्नाट लेख !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Oct 2013 - 2:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कोण आहे रे तो? कोणी काढला हा जीवघेणा प्रकार वरती??
उगा जीवाला घोर!!! :-|

संदीप चित्रे's picture

3 Oct 2013 - 8:12 pm | संदीप चित्रे

हा लेख वाचणं... पुन्हा पुन्हा वाचणं हाच एक नितांत सुंदर अनुभव आहे!
लेखकाचं नाव 'रामदास' दिसलं की मी डोळे मिटून लेख वाचायला घेतो.. मनाची कवाडं आपोआप उघडायला लागतात!

विजुभाऊ's picture

15 Oct 2013 - 9:20 pm | विजुभाऊ

मिपावरच्या मला सर्वात आवडलेल्या लेखांपैकी हा एक लेख.

अद्द्या's picture

16 Oct 2013 - 12:22 pm | अद्द्या

__/\__

बांवरे's picture

18 Oct 2013 - 9:02 am | बांवरे

काय सुंदर लेख !!!
काय प्रतिक्रीया द्यायची काय कळंना,

जेपी's picture

13 May 2015 - 5:56 pm | जेपी

सुंदर..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Dec 2014 - 6:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कोण रे तो? कोणी काढला हा जीवघेणा प्रकार वरती????
:-|

वर अर्धवटराव म्हणाले तसं "डोळ्यात अश्रु आहेत. मनात सुखवणारी वेदना आहे. काय म्हणायचय कळत नाहिए."
अतिशय सुरेख, वाखु साठवली आहे, दडंवत स्विकारावा.
जेपी खोदकामासाठी अतिशय धन्यवाद, हे वाचायचे राहुन गेले होते.

बॅटमॅन's picture

2 Dec 2014 - 3:31 pm | बॅटमॅन

.............

विजुभाऊ's picture

2 Dec 2014 - 3:44 pm | विजुभाऊ

हा माणूस कधी कोणत्या प्रान्तात मुशाफिरी करेल साम्गता येणार नाही.
लेख वाचताना प्रत्येक वेळेस तितकाच तरल अनुभव येतो

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2014 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

__/\__

अमृत's picture

2 Jun 2015 - 9:40 am | अमृत

कित्येकदा वाचूनसुध्हा काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही.

रामदास काका पुस्तकाचं तेव्हडं मनावर घ्याच प्लीज.

नीलमोहर's picture

2 Jun 2015 - 11:06 am | नीलमोहर

अजुन वेगळे बोलण्यासारखे काही नाही..

सध्याच्या मिपावरच्या राजकीय धुळवडीत हा लेख म्हणजे ग्रीष्म्यातल्या वळवासारखा वाटला. रामदास, परा, इंद्रराज पवार, आदिती, टारझन, तात्या हे सगळे दिगज्ज मिपापासून दूर का झाले असावेत? त्यावेळच्या मिपाचा दर्जा काही औरच होता. कित्येकवेळा काही सामान्य दर्जाचे लेखदेखील त्यावरच्या इंद्रांच्या प्रतिसादामुळे वाचनीय वाटायचे.

गेले ते दिवस!!!

~~~~~~~~~~~~~ नॉस्टॅल्जिक गुलाम ~~~~~~~~~~~~~

100 वेळा वाचला असेल..दरवेळी काहतरी नविन सापडत या लेखात..

स्रुजा's picture

30 Jun 2015 - 12:15 am | स्रुजा

वाह वाह ! क्या बात हे.

मयुरा गुप्ते's picture

30 Jun 2015 - 1:14 am | मयुरा गुप्ते

त्या वेळीही सुचलं नव्हतं...आताही सुचत नाहीये, पण लेख पुनः वाचल्यावर बाकी थंड्,निर्जीव कमळाच्या तळ्यावर कोणीतरी अलगद तरंग उठवावेत आणि त्या लाटांच्या स्पंदनात स्वतःची धुरकट छबी दिसावी असं वाटलं.
ती छबी खुदकन हसली...तिला पकडायला गेले तर...छे, जमलंच नाही.
रामदास काका, कवितेच्या ह्या लांबच्या प्रवासा साठी शुभेछा.

--मयुरा.

एस's picture

30 Jun 2015 - 5:04 pm | एस

मात्सुओ बाशोचं हृदय लाभलंय तुम्हांला.

मधुरा देशपांडे's picture

30 Jun 2015 - 5:10 pm | मधुरा देशपांडे

अतिशय सुंदर!!

बोका-ए-आझम's picture

1 Oct 2015 - 9:37 pm | बोका-ए-आझम

रामदासकाका __/\__
कोण म्हणतं एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं असतं? हे असलं वाचलं की समजतं की एक शब्दसुद्धा हजार चित्रांच्या तोडीचा असू शकतो!

पिशी अबोली's picture

1 Oct 2015 - 9:49 pm | पिशी अबोली

तुषारांत बागडणाऱ्या चिमणीसारखं वाटलं. त्या पाण्याचं सौंदर्य तिच्याकडे नसतं आणि तिच्यात ते कळण्याइतकी कुवतही नसते. पण तरी त्यात नाचण्याचा आनंद मात्र तिला अफाट मिळतो. तसं काहिसं..

अप्रतिम गद्य पद्य. परत लिहिते व्हा.

रातराणी's picture

9 Oct 2015 - 8:55 am | रातराणी

काय लिहू?
शब्द संपले. _/\_

shree pavan's picture

16 Jan 2016 - 12:51 pm | shree pavan

ha lekh kitihi vela wacha, samadhan hotach nahi.