"जन्या , ए जन्या , आरं ती रीळं आली का न्हाई अजुन ?" राजाभाउ आपल्या मदतनीसावर खेकसले .
"न्हाई मालक . सदू गेलाय तालुक्याच्या गावाला , पन अजुन आला न्हाई" जन्याने उत्तर दिले .
राजाभाउ चिंतेत पडले . त्यांचा फिरत्या टूरींग टॉकीजचा व्यवसाय होता. खेडेगावांमध्ये जत्रेच्या दिवसांमध्ये मोकळी जागा पाहुन ओपन एअर तंबु ठोकायचा आणी रात्री चित्रपटांचे खेळ दाखवायचे असे या व्यवसायाचे स्वरुप होते . चार बाजुंनी कापडाच्या भिंती , आतमध्ये एका टोकाला सिनेमाचा पडदा आणी दुसरया टोकाला प्रोजेक्टर . मधे प्रेक्षकांसाठी बसायला मोकळी जागा. त्यातही एक बाजु स्त्री प्रेक्षकांसाठी आणी दुसरी बाजु पुरुष प्रेक्षकांसाठी . मागच्या बाजुला गावातील स्थानिक , इतर व्हिआयपी लोकांसाठी बसायला दोन चार बाकडी ठेवत असत . कधी पाउस पडु लागला तरच या तंबुला वरुन कापडाचे आच्छादन घालत असत . पण त्यांचा हा व्यवसाय पावसाळा संपल्यावरच चालु होत असल्यामुळे ती वेळ क्वचितच येत असे .
आजही राजाभाउंनी एका खेडेगावामध्ये जत्रेचा दिवस बघुन तंबु उभारला होता . रात्रीच्या खेळाची माहिती एका फळ्यावर लिहुन तो फळा तंबुपाशी तिकीटविक्रीच्या टेबलाजवळ ठेवला होता . खेळ रात्री साडेनवाला चालु होणार होता .
राजाभाउंचा दुसरा मदतनीस सदु हा एका नव्या सिनेमाची रीळे आणायला तालुक्याच्या गावी दुपारीच गेला होता. तिथल्या वितरकाच्या एजन्सीकडुन रीळे घेउन तो रात्री आठ वाजेतो परत येईल असा राजाभाउंचा कयास होता . पण रात्रीचे साडेनउ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता . इकडे तिकीटविक्री तर चालु केली होती . बरेच पब्लिक तंबुमध्ये जाउन बसले होते . राजाभाउंनी आपल्या स्टॉकमधील दोन , तीन इतर सिनेमांचे ट्रेलर्स , दोन , चार फिल्म डिवीजनच्या डॉक्युमेंटरीस , थोड्या स्थानीक तर थोड्या नेहमीच्या जाहिराती दाखवुन सव्वादहा होईतो वे़ळ काढला. शेवटी स्पीकरवर गाणी सुरु केली . पण रात्रीचे साडेदहा वाजायला आले तरी सदु अजुन आला नव्हता .
आत बसलेले प्रेक्षकही आता वाट पाहुन कंटाळु लागले होते . त्यांनीही ओरडा सुरु केला .
"आरं ए टाकीवाल्या , आम्ही काय इथं आकाशातल्या चांदण्या मोजायला आलोय काय ? आनं त्यापायी तुला रं कशाला पैका द्यायचा ? गुमान खेळ चालु कर आता "
"कुठाय तो तिकीटवाला ? टकुरंच फोडतो त्याचं " एक दोन जणं बाह्या सरसावत उठुही लागले .
"आनं हि गाणी कसली रं रडकी लावलीयास ? आम्ही काय हकडं मर्तिकाला आलोय काय ? जरा धिन च्याक गाणी लाव ती जुम्मा जुम्मा नाही तर मिठु मिठु . नाही तर तुझंच दहावं घालतो पग आता ."
राजाभाउंनी लगेच गाणी बदलली . त्यांची चिंता वाढु लागली होती . तेवढ्यात त्यांच्या ओळखीतला एक गाववाला धावत त्यांच्यापाशी आला , आणी त्याने माहिती दिली - " राजाभाउ , तालुक्याच्या रोडवर आरगिडे फाट्याजवळ लई मोठा ट्रॅफीकजाम झाला आहे . दोन्ही बाजुला गाड्यांची पार मोठी लाईन लागलीय .तुमचा सदु जर पलिकडच्या बसमध्ये असेल तर समदा गुंता सुटुन इथं यायला त्याला निदान दीड तास तरी लागतोय बघा."
सदुला यायला अजुन निदान दीड तास तरी लागेल हे ऐकुन राजाभाउंना चांगलाच घाम फुटला .
--------------काल्पनीक-----------------क्रमशः---------------------------------
प्रतिक्रिया
25 Sep 2015 - 10:46 pm | एस
पुभाप्र.
25 Sep 2015 - 11:14 pm | एक एकटा एकटाच
सुरुवात छान आहे
26 Sep 2015 - 8:36 am | मांत्रिक
सहमत!!! जुने दिवस आठवले!!! बाकी कथा मस्त!!!
26 Sep 2015 - 8:40 am | बाबा योगिराज
सुरुवात तर छानच आहे.
आण द्येओ, आण द्येओ.....
26 Sep 2015 - 11:32 am | चांदणे संदीप
सिरूसेरि भारी लिहिता!
पुभाप्र!
26 Sep 2015 - 1:27 pm | पद्मावति
छान सुरूवात झालीय. पु.भा. प्र.
27 Sep 2015 - 5:46 am | बहुगुणी
लवकर पुढचा भाग येउ द्या.
30 Sep 2015 - 1:50 pm | शित्रेउमेश
पुढचा भाग लवकर येऊ द्या...
30 Sep 2015 - 1:50 pm | शित्रेउमेश
पुढचा भाग लवकर येऊ द्या...
1 Oct 2015 - 10:54 am | सस्नेह
फारच छोटा भाग आहे. पुढचा थोडा मोठा टाकावा.
15 Nov 2015 - 5:35 pm | पैसा
चांगली सुरुवात