Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत.. पाऊस डोक्यात भिनलाय, जुन्या आठवणी दाटायला लागतात अशा दमट वातावरणात बुरशीसारख्या.. मग आपोआप आत अडकायला होतं
ठाकुर्लीची शाळा आठवते,सातवीपर्यंत तिथेच होतो.गावच्या एकदम कडेला उतारावर एकमजली.मस्त मोठं मॆदान.एक मोहाचं आणी एक कडुनांबाचं झाड.खाली अजुन उतार मग आगर्यांची भाताची शेतं नजर जाइल तिथवर, मग एक डोंगर दिसायचा, त्यापलिकडे कल्याण.दणाणा पाउस पडायचा. वीजा चमकायच्या. आजी मला तिसरीपर्यंत शाळेत सोडायला यायची.काय काय प्रसंग कायम मनावर कोरले जातात,त्यातलाच एक.सकाळपासुन पाऊस पडत होता.. तेव्हाचं ठाकुरली म्हणजे खेड्च. त्यात शाळा पार टोकाला.मी ओरडत भिजत, बोंबा मारत धावत होतो, आजी ओरडत होती अरे नको भिजुस, ताप भरेल.. तेवढा मी जास्त चेकाळत होतो. रस्त्याच्या बाजुने मस्त पाण्याचे ओहोळ वाहायचे,मी मुद्दामुन त्यातुन उड्या मारत जात होतो.अचानक एक मोठठा खड्डा असावा, जेमतेम अडिज तीन फुट उंची असेल माझी , मी पार गळ्यापर्यंत गाळात गेलो, आजी ने जो काय हंबरडा फोडलाय. एक कोणतरी माणुस चाललेला त्याने घपकन दोन्ही खांद्यांना पकडुन बाहेर काढलं, आणी आजीवर आवाज चढवत निघुन गेला, आजीने सटासटा माझ्या थोबाडीत मारल्या.. आणी चिखलाने बरबरटलेल्या मला तशीच उचलून त्या मुसळधार पावसात त्या मोकळ्या मेदानात ती आणि मी कितीतरी वेळ रडत होतो.
शाळा म्हणजे सर्वस्व होतं माझं तेव्हा.पावसातले ते इतिहास,भुगोल,मराठीचे तास अजुनही आठवतात. मी खिडकीजवळ बसायचो. शाळा अख्खी गळायची तेव्हा. बेंच ओले व्हायचे,खाली पण पाणी भरायचं. वेगवेगळे, लिबलिबीत किडे बाहेरच्या रानातुन वर्गात यायचे.तरीसुद्धा लय भारी वाटायचं.त्या गुढ पावसात इतिहासातले हड्डपा संस्क्रुति, मानवाची उत्क्रांती असले विषय सुरु झाले की भान हरपुन जायचं. ते combination च भन्नाट होतं.चित्रकलेच्या तासाला सर पाउस हाच विषय द्यायचे,मग बघायलाच नको,माझ्या कल्पनाशक्तीला अजुनच धुमारे फुटायचे.त्यातल्या त्यात माझी चित्रकला बरी असल्याने वर्गात माझा भाव जास्त असायचा.चायला विद्याविहारला पाणी ट्रॅकवर आलय सांगतायेत, बोंबला जे होइल ते होइल मी काही आता हलणार नाही , दोन माणसं उतरुन चालत गेली पुढे.अता मोजुन तीन उरलीत,कसातरीच दिसतोय अख्खा रिकामा डबा.भकास.शिळा.
हा तर मी कुठे होतो? शाळेत येस. पावसाळ्यातली मधली सुट्टी हा भन्नाट विषय असायचा.धरण बांधणे हा आमचा आवडता खेळ. शाळा तशी उतारावर असल्याने पाण्याचे लोटच्या लोट वाहत असायचे. एखादा वहाळ आम्ही पकडायचो आणी दगड टाकायला सुरवात करायचो. दगड रचुन झाले की साइडला मस्त माती कालवायचो, आणी धरण पॅक करुन टाकायचो अख्खा वर्ग धरण कामाला डेडीकेटेत असायचा ,मग प्रोजेक्टपण तसच असायचं ना मोठं. तोवर मधली सुट्टी व्हायची, आम्ही परत शाळेत धुम ठोकायचो.खरी गम्मत शाळा सुटली की धावत जाऊन धरणाचं इन्सपेक्शन व्हायचं.तोवर धरणाने टिकाव धरला असेल तर आजुबाजुला धरणक्षेत्र साॅलिड वाढलेलं असायचं. मग दणादण सगळे मिळुन माथा मारुन ते पाडुन टाकायचो. एवढं साचलेलं पाणी भस्क्कन वाहुन गेलं की आम्हाला कोण आनंद व्हायचा. एकदा अशाच एका धरणात लाल पाणसाप अडकलेला , हातभर फाटलेली सर्वांची. पुढे सातवीनंतर जोशी हायसकुल ला आलो,आणी हा,खास पावसाळा संपला.
शेतात फिरायला जाणे हा अजुन एक कार्येक्रम असायचा. तासंतास आम्ही शेतातुन गुढघाभर पाण्यातुन खेकडे पकडत हिंडत असु.कधीकधी आगरी मित्र खाडिवर धेउन जात.खाडीच्या काळ्या पाण्यावर बेभान होउन बरसणारा पाऊस बघताना आमचही भान हरत असे. हळुहळु शहरीकरण झाले, आगर्यांनी जमिनी विकल्या त्यात शेतही गेली.आणि आमचा विरंगुळाही.
काॅलेज मध्ये असताना पावसासारखा दुसरा मित्र नसायचा. त्यावर सगळ्यांचेच एकमत असेल आणी अनुभवपण.त्यातच २६ जुलॆ २००५ चा दिवस आहे,मित्र मित्र म्हणणारा पाऊस सॆतानाने पछाडल्यासारखा पिसाटला होता.मी fybcom ला होतो त्यावेळी आणी ठाण्याला टॅक्सेशन चा डिप्लोमा करत होतो.२५ला दुपारपासुनच लक्षण ठीक दिसत नव्हती .भयंकर पाउस पडत होता.माझ्यासमोर दिव्याच्या खाडीत,प्रचंड आवाज करत वीज कोसळली.पण तरी मी मुर्खासारखा ठाण्याला गेलोच. संध्याकाळी परीस्थिती बिकट झाली , ट्रेन पुर्ण बंद झाल्या ठाण्याचे प्लॅटफ्राॅम पाण्यात होते. तेव्हा माझ्याकडे मोबाइल नव्हता आणी घरचा फोन पण लागत नव्हता.घरी कसं कळवणार, मग खालच्या फर्नांनडीस ना फोन करुन मी सुखरुप असल्याचं कळवलं. एक मित्र ठाण्याला कोळिवाड्यात राहणारा होता,तो म्हणाला की आज माझ्याकडे झोप उद्या जा घरी. म्हटलं ठीके,त्याचे कुटुंब मोठे होते.रात्री चायनीस खायला म्हणुन बाहेर पडलो, ते ठाणे मी विसरु शकत नाही सगळीकडे पाणिच पाणी, पाउस थांबायचं नाव नाही.दुकान,हाॅटेल सगळी बंद, तसेच आलो, झोपलो, रात्री मध्येच त्याच्या काकांनी आम्हाला जोरजोरात उठवलं, कारण ठाणे स्टेशनलगतचा जो तलाव आहे तो फुटलेला आणी अख्ख्या कोळीवाड्यात पाणी शिरलेले. आम्हा पोरांना त्याच्या घरच्यांनी वर पोटमाळ्यावर पाठवले.अख्खी रात्र कशीतरीच गेली, बिचार्याच्या घराची चिखल, गाळाने वाट लावली , तरी देखिल मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले लागतील म्हणुन.पाउस तर आता पुर्णच पेटलेला होता. आता घरी कसं जायच हा प्रश्न होताच. मग मध्येच बस,रिक्शा मग म्हापे ते डोंबोली चालत असं करत ठाकुरलिला संध्याकाळि पोचलो. घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली. मग परत बाहेर पडलो,माझी जुनी शाळा आणी पुढे पार कल्याणपर्यंत सगळा लाल पाण्याचा समुद्र दिसत होता, खाडिचे पाणी आत शिरलेले होते.त्या दिवशी किती नुकसान आणि,काय,काय झालं हे सर्वांना माहीत आहेच.आयुष्य पुढे जातच राहीलं
तरी पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं
त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले.
त्यानंतर मात्र मी त्याला मानायला लागलो.कित्ती ट्रेक केले असतील. त्याच्या साथीने एकटाही रानोमाळ भटकलो.मिपाकरांसोबत केलेला कोरीगड, लोहगड, प्रबळगड.. केवळ अविस्मरणीय.. पाऊस तोच पण अनुभुती दर वेळेला नविन या वर्षी रुसलाय खुप. लोकांनी शेवटी देव पाण्यात बुडवले.आत्ता कुठे वेशिवर आलाय..असो
२.३० वाजुन गेलेत..गाडी जेमतेम हलतेय.टॅबची बॅटरी संपत आलीये. खुप रॅडम आहे, लिहावसं वाटलं लिहिलं. पाउस काही थांबत नाहीये, आणी आठवणींचे उमाळे पण
-11/07/2014
प्रतिक्रिया
13 Jul 2014 - 4:43 am | नंदन
मनापासून लिहिलेला लेख. अतिशय आवडला.
13 Jul 2014 - 9:24 am | अत्रुप्त आत्मा
13 Jul 2014 - 9:40 am | आतिवास
पाऊस सोबत अशा अनेक आठवणी घेऊन येतो - सुखाच्या आणि दु:खाच्याही.
मनापासून लिहिलेला लेख मस्त उतरला आहे ...
13 Jul 2014 - 2:41 pm | मृगनयनी
सुन्दर रे.. स्पावड्या..... व्हेरी टची!!!!
14 Jul 2014 - 3:27 pm | पियुशा
स्पावड्या़ ...... खुप दिवसानी लिहीता झालास रे !
लय भारी :)
13 Jul 2014 - 9:55 am | अनुप ढेरे
खूप आवडला लेख.
13 Jul 2014 - 9:57 am | मदनबाण
केवळ अप्रतिम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Independent Women Part 1" (With Lyrics) :- Destinys Child
13 Jul 2014 - 10:03 am | किसन शिंदे
अतिशय सुंदर लिहिलंय रे स्पावड्या!!
13 Jul 2014 - 11:12 am | खटपट्या
मस्त !!!
13 Jul 2014 - 11:30 am | प्रभाकर पेठकर
फार सुंदर तर्हेने व्यक्त झालाय पाऊसमित्र.
>>>>मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन.
>>>>घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली.
>>>>तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी, जेव्हा ती मला सोडुन गेली, तेव्हा पठ्ठ्या हजर झाला.
ही वाक्य मनाला विशेष स्पर्शून गेली.
13 Jul 2014 - 11:49 am | वाडीचे सावंत
+११११
13 Jul 2014 - 12:19 pm | अजया
मस्त लिहिलंय ,मनापासून.आवडलं.
13 Jul 2014 - 2:25 pm | ठक
खुप आवड्ले .
13 Jul 2014 - 2:34 pm | कवितानागेश
:)
13 Jul 2014 - 2:45 pm | स्वाती दिनेश
सुरेख लिहिलं आहेस स्पा..
स्वाती
13 Jul 2014 - 2:56 pm | सुहास झेले
स्पा सहीच लिहिलंय यार... अगदी मनापासून :)
13 Jul 2014 - 3:35 pm | जोशी 'ले'
निव्वळ अप्रतिम.. .. _/\_
13 Jul 2014 - 3:39 pm | प्यारे१
___/\___
क्लास्स्स्स.
बाकी काही गोष्टी मागच्या मागं सोडून देणं रास्त ठरतं. वर्तमान हाती धरण्यासाठी भूतकाळ सोडावाच लागेल. विशेषतः काहीच करणं आपल्या हाती नस्तं तेव्हा ते श्रेयस्कर देखील ठरतं.
13 Jul 2014 - 7:24 pm | मुक्त विहारि
+१
13 Jul 2014 - 8:23 pm | वपाडाव
तेच तर धुवुन-पुसुन टाकावं म्हणौन पौस येतो ना, प्यारेकाका...
स्पावड्या टच असलेला... चिंब
(चिंब या शब्दावरुन इंट्या आठौला)
13 Jul 2014 - 3:55 pm | बॅटमॅन
आई शप्पथ....लयच भारी लेख रे. तुफ्फान आवडला.
13 Jul 2014 - 4:00 pm | कंजूस
शब्दच नाहीत .पुन्हा पुन्हा वाचतोय .तुझा पाऊस सुखदु:खांनी दाटलाय .एकदम ते सर्व अनुभव उफाळून आलेत . धरण फुटलंय .खोट्या बेगडी उपमा न लिहिता खरंखुरं मनाला भिडणारं गेल्या वर्षभरातलं सर्वोत्तम शब्दचित्र आहे स्पा .
13 Jul 2014 - 4:10 pm | सुबोध खरे
स्पा साहेब
तुमच्याच शब्दात "आयुष्य पुढे जातच राहीलं".
तस म्हणतो आता "आपली" कोणीतरी शोधा म्हणजे पावसाचा अर्थ परत नव्याने कळेल (किंवा नवीन अर्थ.
लेख सुरेख आहेच पण कुठेतरी एकटेपणाची जाणीव करून देतो असे वाटले( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).
14 Jul 2014 - 3:09 pm | बॅटमॅन
मनाचेच खेळ असतील तर कालिदासाच्या मनाचेही असेच खेळ होते. तो मेघदूतात नेमके हेच म्हणतो:
"मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेतः
कण्ठाश्लेषप्रणयिनिजने, किं पुनर्दूरसंस्थे????"
"आकाशात एकदा ढग दाटून आले की सुखी माणसाचेही चित्त सैरभैर होते आणि आपल्या कंठाला मिठी मारणार्या प्रिय व्यक्तीची आठवण येते. प्रिय व्यक्तीपासून दुरावलेल्यांची तर काय गत होत असेल??"
13 Jul 2014 - 4:23 pm | भिंगरी
वा! स्पा,
मन पाऊस,पाऊस झालं
डोळ्यातून वाहू गेलं
13 Jul 2014 - 4:48 pm | मितान
खूप नॉस्टॅल्जिक लेखन ! आवडले !
13 Jul 2014 - 5:35 pm | आदूबाळ
यह बात
13 Jul 2014 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. आणि
पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले.
ये यार...असं नै लिहायचं मला त्रास होतो. पाऊस दाटला ना भो....!
-दिलीप बिरुटे
13 Jul 2014 - 7:22 pm | मुक्त विहारि
आवडला....
13 Jul 2014 - 7:32 pm | प्रचेतस
निव्वळ अप्रतिम.
13 Jul 2014 - 8:01 pm | यशोधरा
छान लिहिलंय स्पा, खूप आवडलं. :)
13 Jul 2014 - 8:12 pm | टवाळ कार्टा
एक्दम "दिल से"... \m/
13 Jul 2014 - 8:20 pm | धन्या
छान लिहिलं आहेस रे. भावस्पर्शी.
13 Jul 2014 - 9:21 pm | राही
सुंदर लेख. २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.
14 Jul 2014 - 6:59 pm | सखी
सुंदर लेख स्पा! सुखदुखा:त बघितलेला छान उतरला आहे लेखणीतुन.
राहीजी: २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.- हे कळले नाही, २६ जुलै ज्यांनी अनुभवलेला आहे त्यांना परत तसा नकोच यायला अशी भावना असेल असे मला वाटत होते.
13 Jul 2014 - 10:01 pm | वेल्लाभट
क्लासच ! क्लासच! पावसासारखे कोसळलेत शब्द.... मस्त!
13 Jul 2014 - 10:11 pm | सूड
खास स्पा स्टाईल !! आवडलं हेवेसांनल !!
13 Jul 2014 - 11:58 pm | पैसा
वाचताना तू टॅबवर टाईप केलं आहेस हे लक्षात आलंच. पाऊस असतोच. मात्र तो सगळ्यांना भेटतो असं नाही. तुला भेटलाय तो, नशीबवान आहेस! पावसाळी पाखरं येतात आणि जातात पण उन्हापावसात घर बांधणारी चिऊ भेटेलच कधीतरी. पावसाला मात्र विसरू नको.
14 Jul 2014 - 4:00 am | कंजूस
उन्हा पावसात घरटं बांधणारी चिऊ भेटेलच .खरंच आणि सजवेलही .हेच म्हणतो .
14 Jul 2014 - 1:04 am | नगरीनिरंजन
लेखन खूप आवडले. बाहेर धो-धो पाऊस पडताना मनात दाटून आलेले मळभ लेखात अलगद उतरले आहे. त्यामुळे लेखाला कातरवेळच्या पावसाची एक हुरहुर लावणारी डूब मिळाली आहे. मस्त!
14 Jul 2014 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार
लै भारी,
मस्त लिहिल आहेस दोस्ता. अगदी मनापासुन.
पैजारबुवा,
14 Jul 2014 - 10:25 am | ब़जरबट्टू
मस्तच रे मित्रा...
चला, सोमवार पदरी पडला... :)
14 Jul 2014 - 11:23 am | प्रसाद गोडबोले
खुपच सुंदर !
14 Jul 2014 - 11:42 am | प्रभो
मस्त रे!!
14 Jul 2014 - 12:01 pm | सविता००१
कसलं खल्लास लिहितोस तू.. जाम आवडलं.
14 Jul 2014 - 12:25 pm | मराठी कथालेखक
पाऊस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाच्या आठवणी आणि दाटून येणार्या भावना मात्र निराळ्या.
अर्थात पुढे मागे ही भावूकता कधी कमी होवू लागते. मग असा एखादा सुंदर लेख आठवणी आणि भावना जागवतो.
बाकी "पाऊस दाटलेला" शिवाय दुसरं काही उत्तम शीर्षक होवूच शकलं नसतं. गारवातलं सगळ्यात अप्रतिम आणि वेड लावणारं गाणं. सौमित्रच्या आवाजात असलेल्या गद्दातल्या ओळी भारावून टाकत (पण आजकाल कधी कधी त्या ओळींची खिल्ली पण उडवतो.. वाढत्या वयाबरोबर हरवलेली भावूकता !!)
अजून लिहा...
14 Jul 2014 - 2:45 pm | सौरभ उप्स
व्वा सुपर्ब …।
दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने….
बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे…
अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….
14 Jul 2014 - 2:45 pm | सौरभ उप्स
व्वा सुपर्ब …।
दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने….
बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे…
अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….
14 Jul 2014 - 3:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
व्वाह!! मजा आ गया!! जियो स्पावड्या...
14 Jul 2014 - 3:09 pm | शिद
मस्तच लिहलंय... आवडलं.
आम्हीपण शाळेत असताना शाळेचा मागच्या बाजुला उतारावर धरण बांधायचो आणि वह्यांची पानं फाडून छोट्या होड्या बनवून त्यात सोडायचो. ज्या मुलाची कागदी होडी सगळ्यांत शेवटी बुडेल तो जिंकला...मस्त धमाल आठवणी.
14 Jul 2014 - 4:21 pm | माधुरी विनायक
ट्रेनच्या त्याच डब्यात बसून तुमच्याच तोंडून या आठवणी ऐकत असल्यासारखं वाटत राहिलं... खूप सहज सुंदर आणि उत्स्फूर्त... खूप आवडलं...
14 Jul 2014 - 7:16 pm | आदिजोशी
भारीच एकदम. पावसाशी निगडीत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या :)
23 Sep 2015 - 11:52 am | रातराणी
सुरेख! तुमच्याबरोबर भिजवलत पावसात!
24 Sep 2015 - 7:48 am | अभिजीत अवलिया
अतिशय सुरेख...
24 Sep 2015 - 8:18 am | सौन्दर्य
अतिशय सुंदर, हळवं करणारं लिखाण. उफाळलेल्या दर्यासारखा कोसळणारा पाउस देखील मनाचा ठाव घेतो. तुम्ही ते सर्व फार छान मांडलत.
24 Sep 2015 - 9:41 am | बोका-ए-आझम
पाऊस आवडत नाही, पण लेख अतिशय आवडला. मलाही २६ जुलैच्या पावसात भायखळा ते दादर चालत यावं लागलं होतं. तीवाठवण परत जागी झाली.
24 Sep 2015 - 11:07 am | प्यारे१
S-PA कुठे गायब आहेस?
24 Sep 2015 - 11:47 am | अत्रुप्त आत्मा
त्यानी स्थळ आणी संस्थळ हे विषय एकुणातच सोडल्याचं ऐकतोय सध्या! ;)
24 Sep 2015 - 11:44 am | शित्रेउमेश
खूप सुंदर... पाऊस असाच खूप सार्या आठवणी घेवून येतो....
29 Sep 2015 - 8:17 am | कविता१९७८
मस्तच
10 Oct 2015 - 11:54 pm | निशिकान्त
लय भारी
2 May 2016 - 5:04 pm | मराठी कथालेखक
पावसाच्या प्रतीक्षेत असताना, आज पुन्हा एकदा हा लेख शोधून वाचला.
असे काहिसे भावूक, नॉस्टेल्जिक लेख दुर्मिळच..
2 May 2016 - 5:33 pm | विजय पुरोहित
छान वाटले वाचून. मनाने विस्मृतीत गेलेल्या काही आठवणींशी संवाद साधला...
11 May 2016 - 7:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं रे स्पांडूऊऊऊ!!!
मुक्तक आवडलं. अशीचं पावसाची खरीखुरी आठवण गाठीशी आहेचं त्यामुळे लैचं भिडला.
11 May 2016 - 10:22 am | रोहन अजय संसारे
सुरेख ...................................................................................................
2 Jul 2018 - 6:42 pm | मराठी कथालेखक
दरवर्षी पाऊस येतो..दरवर्षी असं होतं
मिपावरील सौमित्रचा लेख पुन्हा वाचला जातो.
4 Jul 2018 - 9:17 pm | बरखा
मस्त लेख, आवडला. पाऊस सुरू झाला की आपोआप मन जुन्या आठवणीत हरवत जात. एका मागून एक आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात.