नटनट्यांची आत्मचरित्रे म्हटली की ती खमंग मसालेदार गॉसिपने भरलेली असणार असा एक रूढ समज आहे. काही अंशी तो खरा असेलही. पण त्याच्याशी फक्त अभिनेता असण्या-नसण्याचाच संबंध नसतो. प्रामाणिकपणा आणि वाचनीयता हे दोन गुण कोणत्याही आत्मचरित्रात असावे लागतात आणि सगळ्यांना ते जमत नाही. परिणामी ती रटाळ, नीरस आणि लबाड होऊन जातात. खासकरून राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे.
सत्यकथनाची हिम्मत नसेल तर फिल्मी आत्मचरित्रेही "फ्लॉप" होऊ शकतात. उदा. देव आनंदचे 'Romancing The Life' हे पुस्तक. ही त्याच्या आयुष्यातील अगोदरच सर्वविदीत असलेल्या घटनांची निव्वळ जंत्री आहे. लहानपणीचा काही काळ वगळता नवे हाती काहीच लागत नाही. कदाचित तो आधीच इतका बेफाम प्रसिध्द असल्यामुळे त्याच्याकडे नवे काही सांगायला राहिले नसेल. पण त्याचा अस्सल 'आवाज' काही त्या पुस्तकातून ऐकू येत नाही. जो ऐकू येतो, तो पटत नाही. समकालीन कलाकार, चित्रपट यांचे तो मूल्यमापन करू जात नाही. स्वतःबद्दलही तो फार परखड होत नाही. त्याच्या अनेक अजरामर व्यावसायिक चित्रपटांपैकी एखाद्याची घडण कशी झाली ही प्रक्रिया कुठे विस्ताराने सांगितली जात नाही. सिनेजगतात इतकी दशके काढून, इतका मोठा स्टार होऊनही देव आनंदची कलाविषयक समज ही सुमार राहिली, हेच त्या पुस्तकातून दिसून येते. म्हणजे सुबोध मुखर्जी, गुरुदत्त आणि विजय आनंदसारखे दिग्दर्शक नसते, तर देवबाबाचे काही खरे नव्हते! त्याहून पुढे जाऊन असेही म्हणता येईल की देव आनंदची सामूहिक कल्पनाविश्वातील प्रतिमा इतकी सशक्त होती -आहे- की स्वतः देव आनंदच तिला बळी पडला आणि त्याला आपले असे अस्तित्वच उरले नाही.
पडद्यावर परिपूर्ण, अतिरंजित, काल्पनिक महाव्यक्तिमत्वे रंगवणारा कलाकार हा वास्तवात तुम्हाआम्हांसारखा गुणदोषांनी युक्त असा मृत्तिकाचरण माणूस असतो. पण बहुतेक यशस्वी कलाकारांकडे हे मान्य करण्याची हिम्मत, नजर आणि प्रांजळपणा शिल्लक रहात नाही. याला एक स्वागतार्ह अपवाद म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले नसीरुद्दिन शाहचे आत्मचरित्र "And Then One Day".
शाह हा देव आनंदइतका लोकप्रिय अभिनेता नसला, तरी तितका प्रसिद्ध नक्कीच आहे. आपली मते व्यक्त करण्यास न कचरणारा अशी त्याची ख्याती आहे. जिथे आयुष्य काढले त्या हिंदी चित्रपटसृष्टीला आणि चित्रपटांनाही त्याने पूर्वी बिनधास्तपणे शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. शिवाय एक चतुरस्र, अभिरुचीसंपन्न कलाकार म्हणून त्याला कितीतरी जास्त मान्यता आहे. त्यामुळे हे पुस्तक हाती घेताना उच्च अपेक्षा निर्माण होतात.
हे एक स्वच्छ अंतःकरणाने आणि ठाम भूमिकेतून लिहिलेले मनोगत आहे. प्रसंगी उद्धट, प्रसंगी भावुक पण क्वचितच आदरयुक्त. 'वाचनीयता' या मापकावर शाहला पैकीच्या पैकी गुण मिळतात. पुस्तक हाती घेतले की आपण न थांबता पुढे वाचत जातो. शाहची लेखनशैली थेट आणि प्रवाही अशी आहे. इंग्रजी भाषेवर त्याची उत्तम मांड आहे. (पुस्तक त्याने स्वतःच लिहिले असून पिशाच्च-लेखक वापरलेला नाही असे प्रस्तावनेतून ध्वनीत होते). त्याची बुद्धिमत्ता, मूल्ये आणि कलाविषयक दृष्टिकोन हे पुस्तकातून व्यवस्थितपणे परावर्तित होतात.
सर्वात महत्वाचे म्हणजे तो हातचे राखून न ठेवता, भीडभाड न बाळगता, लोक काय म्हणतील याची फिकीर न करता आपली जीवनकथा सांगतो. वयानुसार आणि अनुभवातून प्राप्त झालेल्या परिप्रेक्ष्याचा (Perspective) योग्य वापर करत तो आपले भूतकाळातील वर्तन आणि निर्णय यांचे कठोरपणे परीक्षण करतो. मोजक्या व्यक्तींची नावे वगळता इतर काही तो लपवून ठेवत नाही. उत्तर प्रदेशातील सरंजामी कुटुंबातले बालपण, ओसरत्या सरंजामशाहीचे दिवस, वडिलांचा धाक आणि त्यामुळे निर्माण झालेले अंतर, निवासी शाळेतला काळ, शैक्षणिक अपयशामुळे घरात निर्माण झालेले तणाव हे सर्व वर्णन अतिशय ओघवत्या भाषेत येते. शालेय जीवनात प्रत्येकाला खाणारी मानसिक असुरक्षितता आणि अपरिमित न्यूनगंड हे त्यालाही भासत होते. मोठे भाऊ हुशार व अभ्यासू निघाल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होती! (एक भाऊ सेनादलात जनरल पदापर्यंत चढला.)
निवासी शाळेच्या दिनक्रमानुसार, आठवड्यातून एक इंग्रजी चित्रपट दाखवला जाई. त्या आभासी कृष्णधवल जगतात रममाण होणे शाहला आवडू लागले. नाट्यकलेच्या प्रसाराला वाहून घेऊन भारतभर गावोगाव फिरणारा नाटकवेडा जेफ्री केंडाल आणि त्याची 'शेक्स्पीअरवाला' थेटर कंपनी यांची शाहला विद्यार्थीदशेतच भुरळ पडली होती. त्यातून पुढे त्याने शालेय नाटकात भाग घेतला आणि जे व्यसन जडले ते कायमचेच. हा मानसिक प्रवास पुस्तकात फारच सुंदररीत्या आणि बारकाव्याने चितारला गेला आहे. हा धागा पुढे पुन्हा पकडत शाह विभिन्न अभिनयशैली, रंगमंचतंत्रे आणि नाट्यशास्त्राची सूत्रे या विषयांवर थोडक्यात पण नेमके, वेधक बोलतो.
अर्थात शाहच्या मते हिंदी सिनेमा हा तेव्हाही (६०च्या दशकात) कलादृष्ट्या एक हीन प्रकार होता. व्यावसायिक हिंदी चित्रपट पाहणे हा आपल्याला आजतागायत एक वैतागवाणा अनुभव वाटत आलेला आहे हे तो नमूद करतो. ("त्यामुळे की काय, मला बॉलीवूडमध्ये कधीही कुणाबद्दल आदर वाटलेला नाही. एकमेव अपवाद म्हणजे राजकुमार. अभिनेता म्हणून फारच भयंकर असला तरी तो आख्ख्या इंडस्ट्रीला फाट्यावर मारून स्वतःला हवं तेच करायचा आणि तरीही लोक त्याच्या विनवण्या करकरून त्याला आपल्या चित्रपटात घ्यायचे. या कारणामुळे मला त्याचा अपार आदर वाटत आलेला आहे", ही खास शालजोडीतली भेट!)
शाहला चित्रपटात सुखासुखी यश मिळाले नाही. त्याअगोदर वर्षानुवर्षे त्याने खस्ता खाल्ल्या. अभिनयाची ओढ आणि मनातील स्वप्न याशिवाय हातात काहीच नव्हते. सुरुवातीला तो हजारो तरुणांसारखा रिकाम्या खिशावर मुंबईला आला. जुजबी ओळखीवर एका प्रस्थापित अभिनेत्याच्या नातेवाईंकाकडे (नटाचे नाव गुलदस्त्यात! वाचकांनी अंदाज बांधावेत) बेशरमपणे ठाण मांडून (त्याच्याच शब्दात!) काही महिने राहिला. गर्दीच्या सीनमधे एक्स्ट्राची कामे करत संधी शोधण्याचे प्रयत्न केले. काही काळ त्याने चक्क दिलीपकुमारच्या बंगल्यात आऊटहाऊसमध्ये काढला ("पुढे अनेक वर्षांनंतर मी त्याच्याबरोबर एका गल्लाभरू पिक्चरमधे काम केलं"). खिमापाववर दिवस काढले. लोकलमध्ये बिनतिकीट प्रवास केले. अखेर निभाव लागेना म्हणून घरी परतला.
अर्थात नोकरीधंदा करून पोट भरणे ही कल्पना एव्हाना अशक्य झालेली होती आणि अभिनय हेच आपले भागविधेय आहे ही त्याची खात्री पटलेली होती. त्यामुळे त्याने दिल्लीच्या एन एस डीत प्रवेश मिळवला. तिथलाही अभ्यासक्रम अर्धा सोडून तो पुण्याला एफ टी आय आयमध्ये गेला.
ओम पुरी हा शाहचा नाट्यशालेतील सहपाठी. अभिनेता म्हणूनही तो समकालीन. दोघांचे oeuvre (मराठी प्रतिशब्द सुचवावा. 'कलासंपदा'..?) समदर्जाचे. या माणसाबद्दल शाह फार आपुलकीने बोलतो. पुरीने एन एस डीमध्ये केलेल्या एका जपानी नाटकाचे वर्णन "मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयापैकी एक" असे करतो. व्यक्ती म्हणूनही त्याची प्रशंसा करतो.
शाह एफ टी आय आयमध्ये असताना तिथे विद्यार्थ्यांचा एक मोठा संप झाला. शाह त्यात सामील होता. हा संप 'विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी' असा होता. तो अपयशी होणार हे ठरलेलेच होते. तसा तो फुटला आणि शाहला 'तत्वे' सोडून माघार घ्यावी लागली. सध्या चालू असलेल्या एफ टी आय आय वादाच्या पार्श्वभूमीवर हा भाग मुद्दाम वाचावा असा आहे. अर्थात शाहने केलेल्या रोखठोक मीमांसेसकट.
शाहने कलात्मक आणि तद्दन धंदेवाईक अशा दोन्ही प्रकारचे चित्रपट केले आहेत. तो अजूनही कलाक्षेत्रात सक्रीय आहे. (गेल्याच आठवड्यात त्याचा अनिल कपूर- नाना पाटेकरसोबतचा एक उथळ विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला). पण आपली व्यावसायिक चित्रपट-कारकीर्द तो फारशी अभिमानास्पद मानत नसावा. 'निशांत' या आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल तो जरा विस्ताराने बोलतो (पहिल्या चित्रपटाशी पोचेपर्यंत अर्ध्याहून अधिक पुस्तक संपते). पण त्यापुढच्या पानावरच 'शोले'ची चांगली बिनपाण्याने करतो (दोन्ही सिनेमे १९७५मधलेच). अमिताभ, धर्मेंद्र आणि संजीवकुमार या सुपरस्टारबद्दल तो टीकात्म लिहायला कचरत नाही (मात्र 'शोले'च्या संदर्भात नव्हे). 'जुनून' आणि 'मंथन'मधील शाहचे काम सर्व रसिकांना भावले असले तरी त्याला स्वतःला ते आवडत नाही. 'सुनयना'चीही तो धिंड काढतो. 'स्पर्श' आणि 'मासूम'बद्दल जिव्हाळ्याने बोलतो पण 'कथा'ला जवळजवळ अनुल्लेखाने मारतो.
शाहची कलाविषयक मते विपुल प्रमाणात, सढळहस्ते येतात. ती सगळी प्रत्येकाला पटतील असे नाही. पण जेवढी परखड टीका तो इतरांवर करतो, त्याहून नखभर जास्तच स्वतःवर करतो. आपले पहिले लग्न आपल्या निर्दयी, अन्यायकारक व बेजबाबदार वागण्यामुळे धुळीला मिळाले हे तो धैर्याने मान्य करतो. त्या काळातल्या आपल्या वर्तनाची अंतर्बाह्य चिकित्सा करतो. वडिलांसोबतचे अस्वस्थ नाते व उडालेला पहिला भडका, मित्रांसोबत केलेले अंमली द्रव्यांचे प्रयोग, सहकलाकारांसोबतचे वाद हे सर्व तो सांगतो. वाढत्या तारुण्याच्या दिवसात आपण अनेकदा वेश्यागमन केले हेही निखळपणे वदतो. आयुष्यात आलेल्या अन्य स्त्रियांबद्दल (अर्थात त्यांची नावे न घेता) सांगतो. नाट्यशालेतील त्याचा जिवाभावाचा मित्र जसपाल हा पुढे त्याचा जन्माचा वैरी झाला. शाहवर खुनी हल्ला करण्यापर्यंत त्याची मजल गेली. हा भागही पुस्तकात संदर्भांसहित येतो. आपण व्यावसायिक हिंदी चित्रपटात अपयशी का ठरलो, याचा शाह सखोल विचार करतो आणि निर्भयपणे तो कागदावर उतरवतो.
हे सारे निर्भीड, व्यक्तिगत सत्यकथन वाचताना आपण आपली पांढरपेशी मूल्ये लावणे योग्य होणार नाही हे उघड आहे. पण पुस्तक वाचून संपल्यावर चित्रपटांच्या झगमगत्या दुनियेचा देखावा तितकासा आकर्षक रहात नाही. लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर पोचलेले कित्येक नटनटी, निर्माते, लेखक, दिग्दर्शक आपल्याला माहीत असतात. शाहची जीवनकथा वाचल्यावर आपल्यासमोर, या सर्वांनी आयुष्यात कायकाय पाहिले असेल, स्वतःला कसे विकले असेल, कसले कडू घोट गिळले असतील आणि कोणत्या तडजोडी केल्या असतील असे प्रश्न येऊ लागतात. कदाचित कुणाच्या मनातला शाहबद्दलचा आदरही कमी होण्याची शक्यता आहे.
पण ते एकतर्फी आणि अन्यायकारक होईल, नाही का? एकटे चित्रपटविश्वच नव्हे, तर बाकीच्या कमी चकाकत्या अशा सामान्य नोकरी-धंद्यातही माणसे पदोपदी लज्जास्पद तडजोडी करत असतात, इतरांच्या डोक्यावर पाय देऊन वर चढतात. ते एक उघड गुपीत मानले जाते आणि कुणी त्याचा उल्लेखही करीत नाही.
स्वतःच्या आयुष्याचा स्पष्ट लेखाजोखा इतक्या निष्पक्ष, त्रयस्थ नजरेने आणि सुरस भाषेत मांडल्याबद्दल शाह अभिनंदनास पात्र आहे.
प्रतिक्रिया
16 Sep 2015 - 2:00 am | रामपुरी
वाचायला पाहिजे.
चांगला पुस्तकपरिचय...
16 Sep 2015 - 2:10 am | स्रुजा
फार च छान परिचय करुन दिलात. तुमचं स्वतःचं परिक्षण आणि निरीक्षण दोन्ही लाजवाब. नक्की वाचेन हे पुस्तक.
16 Sep 2015 - 9:46 am | चलत मुसाफिर
धन्यवाद
16 Sep 2015 - 2:33 am | रेवती
पुस्तकपरिचय आवडला. कदाचित हे पुस्तक वाचणार नाही कारण आत्मचरित्रे वाचल्यावर कोणीतरी नको इतके माहित होते व विचित्र वाटत राहते. काही गोष्टी, खासकरून ज्या न कळल्यामुळे आपल्या जीवनात फारसा फरक पडत नाही त्या आजकाल वाचायला जात नाही. काही नटनट्यांचे अंत विदारक पद्धतीने होतात. ते पाहून तर यांचे आयुष्य म्हणजे किती वाईट असे वाटते. तरी प्रामाणिकपणे आत्मचरित्र लिहिलेय हे चांगलेच आहे.
16 Sep 2015 - 3:26 am | बहुगुणी
माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एकाच्या आत्मचरित्राचा सखोल परिचय, पुस्तक घेऊन त्याच्या विषयी वाचायला आवडेल इतका चांगला परिचय आहे. नसीरुद्दीन शहाची ही मुलाखतही वाचनीय आहे.
16 Sep 2015 - 5:06 pm | राजाभाउ
मुलाखत खुपच वाचनीय आहे. धन्यवाद.
16 Sep 2015 - 4:13 am | शिव कन्या
उत्तम!
16 Sep 2015 - 6:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्मचरित्र म्हणजे तद्दन भंपकपणा हे एका सो कॉल्ड थोर थोर भारतीय नेत्याचे पुस्तक वाचुन झालेला समज असल्याने आत्मचरित्र ह्या प्रकारापासुन लांबच रहातो. चायला इथे मला दोन दिवसापुर्वी कसली भाजी खाल्ली ते आठवत नाही ह्या लोकांना बरं लहानपण आठवतं (रेफरन्स-पु.लं.).
बाकी ओळख छान करुन दिली अहात. किप इट अप.
16 Sep 2015 - 1:08 pm | होबासराव
हे एका सो कॉल्ड थोर थोर भारतीय नेत्याचे पुस्तक वाचुन झालेला समज
16 Sep 2015 - 7:10 am | विशाखा पाटील
ऑ! मागच्या वर्षी प्रसिद्ध झाल्याबरोबर हातात आले तेव्हा वाचले होते- आवडले नाही. एकतर, पुस्तकाचा बराचसा भाग लहानपण कसे गेले यावर आहे.(त्यात मला रस नाही.) एफटीआयआयच्या संपामुळे तो संदर्भ असलेला भाग आज कदाचित वाचनीय वाटू शकतो. कलाकार म्हणून ते भूमिकांचा कसा अभ्यास करायचे, त्यांचे वेगवेगळ्या भूमिकांचे सखोल विवेचन, त्याचे दिग्दर्शक (सई परांजपे हा एक अपवाद), सहकलाकार असे फारसे काही हाती लागत नाही.
साधेपणे, कुठलाही आव न आणता लिहिलेय, एवढे मान्य.
16 Sep 2015 - 10:06 pm | चलत मुसाफिर
हिंदी चित्रपट हा शाहचा फारसा आवडता विषय नाही हे पदोपदी पुस्तकात जाणवतेच. पण अल्काझी, सत्यदेव दुबे शबाना आझमी यांची तो वाखाणणी करतो. त्यांच्या कलागुणांवर दीर्घ विवेचन करतो.
एक गोष्ट वर लेखात लिहायची राहून गेली. तत्कालीन मराठी नाट्यकर्मींबद्दल शाहला फार आदर असल्याचे दिसून येते. मोहन आगाशे, भक्ती बर्वे, निळू फुले, लागू, सुलभा आणि अरविंद देशपांडे, चंद्रकांत काळे या लोकांचा तो गौरवपूर्ण उल्लेख करतो.
16 Sep 2015 - 8:09 am | एस
छान परिचय आहे.
16 Sep 2015 - 8:21 am | राही
पुस्तक वाचलेले नाही, पण परीक्षण आवडले. मृत्तिकाचरण (फीट ऑव्ह क्ले) आणि पिशाच्चलेखक (हा तसा आहे प्रचारात) आणि 'कमांड'ऐवजी 'मांड' वापरलेले आवडले. मांड' चपखल वाटले.
नसीरुद्दिन च्या अनेक मुलाखती पाहिल्या/ऐकल्या आहेत आणि त्यांतला त्याचा उद्धट परखडपणा आवडला होता.
छान लेख.
16 Sep 2015 - 9:45 am | चलत मुसाफिर
पुस्तक आवडल्यामुळे लिहिण्याची प्रेरणा मिळाली, इतकेच.
16 Sep 2015 - 9:41 pm | शिव कन्या
हेच म्हणायचे होते....
शब्द चपखल.
16 Sep 2015 - 8:57 am | बोका-ए-आझम
हा तसा सोयीस्कर प्रकार आहे. सर्वसाधारणपणे लोक आत्मचरित्र साठी-सत्तरीत लिहितात. (खेळाडू हा अपवाद.) लहानपणी तुम्हाला ज्यांनी पाहिलंय ते हयात असण्याची आणि असले तरी वाद घालण्याची शक्यता फारच कमी. नासिरुद्दीन शाहचं आत्मचरित्र वाचलं पण एक गोष्ट आवडली नाही ती म्हणजे व्यावसायिक चित्रपटांना शिव्या घालणे. टिपिकल film institute मनोवृत्तीे आहे ही. एवढं जर आहे तर दुसरं काहीतरी करा यार. तुमच्यावर कोणी सक्ती तर केली नव्हती ना. आणि अभिनेता म्हणून तो जबरदस्त आहे पण अमिताभकडे असलेली एक गोष्ट त्याच्यात नाही. अमिताभ अत्यंत मूर्ख आणि टुकार सीन्स आणि चित्रपटही झकास करतो. त्याच्या कामाबद्दल कधीच प्रश्न नसतो. नसिरुद्दीनचं तसं नाहीये. तो जर दिग्दर्शक आणि प्रसंग छान असेल तर अप्रतिम काम करतो पण तसं नसेल तर त्याचा गोंधळ उडतो - कथा, मंडी, पेस्तनजी, स्पर्श, सरफरोश, इक्बाल, अ वेडनस्डे यातला नसीर अप्रतिम होता कारण दिग्दर्शकही जबरदस्त होते किंवा निदान त्यांनी विषय चांगला फुलवला होता. पण तहलका, चमत्कार, चाहत, क्रिश आणि आताचा वेलकम बॅक यामधला नसीर हा वाया घालवलाय असं वाटतं. तसं अमिताभचं नाही. तो हृषिकेश मुखर्जी, यश चोप्रा, बाल्की, संजय लीला भन्साली, राजकुमार संतोषी, गोविंद निहलानी, रमेश सिप्पी यांच्याकडे आणि मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, टिनू आनंद यांच्याकडेही तेवढाच प्रभावी असतो.
16 Sep 2015 - 9:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
चमत्कार बाबत असहमत.
16 Sep 2015 - 9:48 am | बोका-ए-आझम
म्हणजे मासूम. त्यात त्याच्या चेह-यावरचा अपराधी भाव अाणि पत्नी आणि दोन मुली एकीकडे अाणि विवाहबाह्य संबंधांतून झालेला मुलगा दुसरीकडे आणि त्यात अडकलेला नायक त्याने अप्रतिम साकारलेला आहे. पण तिथे दिग्दर्शक शेखर कपूर होता. चमत्कार मध्ये त्याने चांगलं काम केलंय, पण मजा नाही आली. अर्थात हे माझं मत. तुमचं मत वेगळं असू शकतं.
16 Sep 2015 - 9:14 am | नाखु
बर्याचदा हे जाणवते हे खरे.
सन्नी ला जीव ओतून अभिनय घायल आणि दामीनी ने दिला त्यात संतोषीचा सिंहाचा वाटा होता हे सन्नीनेच पुढच्या इतर सिनेमात पाट्या टाकून सिद्ध केले.
देवगण कंपूगिरीत न अडकता "झा-संतोशी" प्रभुतींच्या सिनेमात काम करताना त्याच्या अभिनयाचा खरा कस लागला. त्याचा परिणाम म्हणून "खाकी मध्ये कलाकार मांदीयाळीतही दुय्यम भूमीकाही स्विकारली तरी स्वतःची अशी छाप उमटवणीरी अद्कारीही लक्षात राहीली.
नसरूद्दीन शाह हुशार असेलही पण चतुरस्त्र म्हणणे जरा धाडसाचे ठरेल.
पुस्तक परीक्षण भन्नाट.
वाचक नाखु
16 Sep 2015 - 9:42 am | चलत मुसाफिर
अमिताभ ज्याप्रकारे सुमार, मूर्ख दृश्यांमध्ये प्राण फुंकू शकतो, ती ताकद माझ्याकडे नाही हे शाह मान्यच करतो. शेवटच्या काही पानांत हा भाग येतो
16 Sep 2015 - 9:51 am | चलत मुसाफिर
हिंदी व्यावसायिक चित्रपटांना शिव्या घालताना शाह त्याची विस्तृत कारणे देतो. इतकेच नव्हे तर समांतर सिनेमाच्या नंतर झालेल्या अधोगतीवरही कोरडे ओढतो.
कारणे पटत नाहीत असे म्हणणे वेगळे. पण टीकाच करू नये हे पटत नाही. उद्या भारतीय समाजावर कुणी टीका केली, तर त्याला इथे राहू नका ना यार, असं सांगणार का?
16 Sep 2015 - 12:21 pm | बोका-ए-आझम
असा जर गैरसमज झाला असेल तर माफ करा. माझ्या म्हणण्याचा उद्देश हा होता की जर टीका ही सुधारण्यासाठी केलेली असेल तर चांगलं आहे पण नसीरची टीका ही तशी विधायक वाटत नाही. एवढं सगळं करुन त्याने स्वतः जो चित्रपट काढला - तोही काही खास नव्हता आणि चाललाही नाही. टीका जरुर करावी पण तिचा उद्देश सुधरवण्याचा असावा. तुम्ही म्हणता तशी टीका श्याम बेनेगलही करतात पण ती संतुलित असते. त्या टीकेला - बघा आम्ही कसे हुच्चभ्रू आणि तुम्ही हे असले चित्रपट पाहणारे फालतू - असा सूर नसतो, जो नसीरसाहेबांच्या टीकेत जाणवतो.
16 Sep 2015 - 2:43 pm | चलत मुसाफिर
हिंदी सिनेमात कदापि सुधारणा होणार नाही असे कदाचित त्याला वाटत असावे. व्यक्तिशः माझी हिंदी सिनेमाची आवड शाम बेनेगल ते डेव्हिड धवन अशी व्यापक आहे. पण शाह हिंदी चित्रपटांच्या सरासरी दर्जाहीनतेबद्दल जे म्हणतो ते मला पटते.
तुमचा मुद्दा समजला. पण शेवटी तो माणसामाणसातला फरक आहे. काही लोकांना मोजूनमापून मतप्रदर्शन करणे मान्य नसते, त्याला कोण काय करणार?
16 Sep 2015 - 5:18 pm | बोका-ए-आझम
यांचं एक मत आठवलं - आपल्याकडे दोनच प्रकारचे चित्रपट बनतात. वाईट आणि अतिशय वाईट!
16 Sep 2015 - 5:11 pm | कपिलमुनी
कमर्शियलला शिव्या घालून हे कलाकार पुन्हा असे चित्रपट का करतात ?
26 Oct 2015 - 1:06 am | निनाद मुक्काम प...
अमिताभ चे लाल बादशहा अकेला आज का अर्जुन गंगा जमुना सरस्वती मधले काम पाहिले की दिग्दर्शक व पटकथेच्या शिवाय हा इसम किती पांगळा अभिनय करू शकतो ह्याची कल्पना येते मग अश्यावेळी त्याचे लेकरू धूम च्या सिरीज मध्ये आपल्या कुवती नुसार पाट्या टाकतो त्या बद्दल आदर व्यक्त होतो,
नासीर ने त्रिदेव ते कर्मा अश्या व्यावसायिक सिनेमात सुद्धा आपली छाप सोडली
त्याचा जलवा हे वेगळे प्रकरण होते
मात्र व्यावसायिक सिनेमांच्या वर तोंड सुख घेण्याचा त्याला अधिकार नाही
भारतीय व्यावयासिक सिनेमे भारतीय मातीत भारतीय लोकांच्या मानासिकेता ग्रुहितेके ह्यांच्यावर आधारीत आहेत त्यांना वेस्टन फुट पट्टी लावून तुलना करणे गैर आहे
ह्या लोकांचे पोषण शेक्सपियर वैगैरे परकीय संकल्पना व नाटकांच्या वर झाले आहे म्हणूनच शशी जेव्हा उत्सव सारखा सिनेमा करतो त्यात नासीर नसतो ,
खुद नासीर ला आंतराष्ट्रीय स्तरावर ओम व इरफान च्या तुलनेत फुटकळ भूमिका मिळाल्या,
16 Sep 2015 - 9:47 am | दमामि
नासिरचा आइनस्टाइन अफलातून होता.
16 Sep 2015 - 9:58 am | सुबोध खरे
आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये
इति -व्यंकटेश माडगूळकर
16 Sep 2015 - 10:00 am | मदनबाण
परिक्षण आवडले. नसीरुद्दिन शाह चा जाने भी दो यारो चित्रपट सगळ्यात जास्त आवडतो. एक अभिनेता म्हणुन मला ते आवडले, पण Wednesday सारखा चित्रपट करुन सुद्धा याकुब मेननला वाचवण्यासाठी पिटीशनवर सही करुन मोकळा झाला आणि हा माणुस माझ्या मनातुन कायमचा उतरला !
आपके घर मे कॉक्रोज आता है तो आप क्या करते है ? आप उसको पालते नही मारते है !
अशाच एका याकुब मेमन नावाच्या कॉक्रोजला वाचवायला हे नसीरुद्दिन शाह पुढे सरसावले ! शेम ऑन यू नसीरुद्दिन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||
16 Sep 2015 - 4:45 pm | अविनाश पांढरकर
+१
16 Sep 2015 - 11:01 pm | मास्टरमाईन्ड
याच्याशी एकदम सहमत
बाकी व्यावसायिक कलाकाराने अभिनय केलेल्या चित्रपटाच्या विषयाशी तो/ती कलाकार सहमत असतीलच असं नाही. आपण तशी अपेक्षा करावी कां?
17 Sep 2015 - 8:02 am | मदनबाण
बाकी व्यावसायिक कलाकाराने अभिनय केलेल्या चित्रपटाच्या विषयाशी तो/ती कलाकार सहमत असतीलच असं नाही. आपण तशी अपेक्षा करावी कां?
समाजात आदर्श व्यक्तींची गरज का असते ? जिथे अभिनेत्यांच्या डॉयलॉग पासुन त्यांच्या हेअर स्टाइल पर्यंत प्रत्येक गोष्टींची समाजात नक्कल आणि अनुकरण केले जाते, तिथे त्यांच्या कडुन समाज / देश विघातक कॄतीचे / वागण्याचे समर्थन केले गेल्यास त्यांची ही कॄती समाजात अयोग्य संदेश देत नाहीत का ? म्हणुनच मी म्हंटले की Wednesday सारख्या चित्रपटात अतिरेक्यांना संपवण्याची डॉयलॉग बाजी करणार्याने आणि त्यांच्या विरुद्ध वर्तन करणे हे निश्चितच अपेक्षित नाही तर निषेध करण्या योग्यच आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sur Niragas Ho... :- Katyar Kaljat Ghusl
16 Sep 2015 - 10:06 am | प्रभाकर पेठकर
नसुरुद्दीन शहा, एक कलाकार म्हणून खुप आवडतो. पण ज्याच्या कृत्यामुळे २५७ निष्पाप लोकांचे बळी गेले, कित्येक कुटुंबे उध्वस्त झाली, कित्येक मुले अनाथ झाली, कित्येक निष्पाप बालकांचे भवितव्य काळवंडून गेले त्या याकूब मेमन ह्या दहशतवाद्याची फाशी वाचावी म्हणून शाहने केलेले अपिल मनाला टोचून गेले.
16 Sep 2015 - 11:13 am | सुबोध खरे
पेठकर साहेब
म्हणून तर मी वर लिहीले आहे कि
आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये
16 Sep 2015 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर
मिठाई आणि कारखान्याची सांगड न घालता मिठाई आवडतेच हे नमूद करून कारखान्यावर टिका केली आहे.
अर्थात, आपल्याला त्रास करून घ्यायचा नसेल तर आपण म्हणता ते पटते आहेच.
16 Sep 2015 - 10:07 am | प्रचेतस
उत्कृष्ठ परिक्षण.
16 Sep 2015 - 11:00 am | पद्मावति
खूप छान पुस्तक ओळख. आवडली.
16 Sep 2015 - 11:07 am | आदूबाळ
एक नंबर पुस्तक परीक्षण. नक्की वाचणार.
16 Sep 2015 - 11:31 am | स्वाती दिनेश
पुस्तक परिचय आवडला, नसिरुद्दिन शाह आवडतोच त्यामुळे पुस्तकही वाचणार..
स्वाती
16 Sep 2015 - 11:59 am | मृत्युन्जय
पुस्तक परीक्षण सुंदर जमले आहे.
नसीरुद्दीन शाह चांगला अभिनेता खरा. खाजगी आयुष्यात आतंकवाद्यांची बाजू घेणारा माणूस अ वेन्ज्डे सारख्य चित्रपटात "आपके घर मे कॉक्रोज आता है तो आप क्या करते है ? आप उसको पालते नही मारते है !" हा संवाद किती प्रभावीपणे बोलतो आठवतय ना? अभिनय अभिनय म्हणतात तो हाच असावा
16 Sep 2015 - 12:24 pm | मनिष
पुस्तक खरंच वाचनीय आणि निर्भीड/प्रांजळ आहे. अमिताभ कुठलाही प्रसंग निभावून नेतो हे खरे असले तरी त्याची ह्या मध्यमाची जाण नसिरुद्दीनच्या तुलनेत कमी आहे. जर 'जादूगर', 'लाल बादशाह', 'तुफान' सारखे चित्रपट अमिताभ उत्तरार्धात करत राहिला असता तर त्याला कित्येक वर्षांआधीच पॅकअप करावे लागले असते.
नसिरच्या अभिनयाबाबत वेगळे लिखायची गरज नाही. तो एक अतिशय बुध्दिमान आणि स्वतंत्र विचारांचा कलकार आहे. त्याची ह्या माध्यमाची समज, स्वत:च्या कामाकडे पाहण्याची दृष्टी अफलातून आहे - त्या संदर्भात हे पुस्तक मुळातुनच वाचावे आणि चिंतन करावे. मी माझ्या ब्लॉगवर ह्याबद्द्ल सविस्तर लिहिले होते. त्यातलेच थोडे इथे देतो (इंग्रजीत आहे म्हणून, नाहीतर पुर्ण लेखच आधीच इथे दिला असता) -
The most beautiful part and in my opinion the essence of this book is his own discovery, exploration and conviction about his love for acting and quite a few insightful reflections/questions on the process of acting. He is undoubtedly one of the most intelligent & thinking actors we have today and his choice of (most of his) films demonstrate his views on the kind of cinema he wanted to get associated with. Though he was full of inferiority complex, self-doubt as a kid and teenager, it is wonderful to see how he developed conviction to say that if my brothers can decide about their life and joining NDA, IIT at the age of 16-17, why can’t I? It is amazing to see that how his loneliness and being withdrawn helped him in developing as an actor and how he blossomed with confidence when he had teachers and friends to encourage him in his own pursuits. His inevitable combination of self-doubt and arrogance is also understandable as he narrates his growing up and strained relationship with his father. He loved acting and wanted to do that all his life, and was thrilled to know that at NSD he could not only pursue this but would also get Rs. 200 per month for doing that. Yet, as he got into NSD first, FTII later and then during his acting days, his dissatisfaction and ultimately questioning the methods of acting or the acting process itself make wonderful reading. He has brilliant insights and knowledge about his own acting, and even in some critically acclaimed films, he knows exactly what he has done wrong. Moreover, even while things were going smoothly and he was more or less happy with the kind of films he was doing, with a precision of a surgeon he incisively describes the cause of his dissatisfaction. You find such reflections spread throughout the book, and some of them go like this –
And he did not only reflect and contemplate about learning acting all the time, he in fact found a chance to meet Grotowski himself and travelled all the way to Poland to attend his workshop, which, as Naseer himself elaborates in some details, was quite enigmatic and most of it, did not make any sense whatsoever! He was completely disappointed and disillusioned by it and quit the workshop after 20 days!
16 Sep 2015 - 5:25 pm | बोका-ए-आझम
असले भयाण चित्रपट अमिताभने उत्तरार्धातच केले साहेब. आणि अमिताभची माध्यमाची जाण कमी अाहे? हे कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही ?
16 Sep 2015 - 5:36 pm | मनिष
ह्या उत्तरार्धातल्या चित्रपटांच्या निवडीच्या आधारावर! :-)
खरंच - त्याला नंतर चांगले चित्रपट मिळाले म्हणून नाहीतर त्याची स्वतःछी चित्रपटाची निवड फार काही चांगली नव्हती, खासकरून त्याच्यासारख्या टॉपच्या अभिनेत्याला जे करता येऊ शकले असते.
16 Sep 2015 - 9:33 pm | कानडाऊ योगेशु
अमिताभची चित्रपटाबाबतची जाण कदाचित त्या दर्जाची नसेल पण त्याची माणसे जोडण्याची कला मात्र वादातीत आहे.जंजीर शोले व्गैरे चित्रपट सलिम जावेदमुळे त्याने केले हे त्याने कित्येकदा मुलाखतीत सांगितले आहे. ( दिवार देखील.). इन फॅक्ट पडत्या का़ळातही काम मिळत नवह्ते व पूर्ण बरबाद होणारच होता तेव्हा यश चोप्रांकडे जाऊन काम द्य अशी विनंती केली. मग मोहबत्ते आला व नंतर कौन बनेगा करोडपतीनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहीले नाही. इतक्या उंचीवर जाऊन देखील इतका नम्र राहु शकण्याचे दुसरे एखादे उदाहरण ते ही बॉलिवुड सारख्या झगमगीत दुनियेत पाहण्यास मिळणे कठीण आहे.
16 Sep 2015 - 9:44 pm | मनिष
खरंय! अतिशय सुसंस्कृत आणि आदबशीर आहे अमिताभ!
16 Sep 2015 - 12:32 pm | मनिष
पुस्तकावर लिहिण्याच्या उत्साहात पुस्तक परिचयाविषयी लिहायचे राहून गेले. खूप उत्तम झालाय परिचय - आणि त्यातही पांढरपेशी मुल्य न लावत वाचण्याबाबत १००% सहमत!
बरेच जणांना आवडलेला 'वेनस्डे' माझ्या मते ठीक आणि अतिरंजित होता, पण त्यातल्या जन-भावनेला हात घालणार्या संवादांमुळे तो खूप लोकांना आवडला असावा असे वाटते. माझ्या मते, त्याच वेळेस आलेला 'मुंबई मेरी जान' त्याच्या मानाने बराच उजवा होता!
16 Sep 2015 - 1:42 pm | प्यारे१
पुस्तक परीक्षण असं असावं. (चित्रपट परिक्षण सुद्धा)
हल्ली पुस्तक/ चित्रपट सांगितला जातो.
बाकी नसिरुद्दीन शहा कलाकार म्हणून आवडत होता. हल्लीच्या याकुब च्या फाशीच्या निमित्तानं आणि त्यानंतर वेलकम बॅक च्या कामानं पार उतरलाय डोक्यातनं.
मुंबई मेरी जान छान आहे असं ऐकलंय. बघायचं राहून गेलंय.
16 Sep 2015 - 2:58 pm | इशा१२३
सुंदर परीक्षण!छान ओळख करुन दिलीत.
16 Sep 2015 - 4:30 pm | मारवा
माझा अत्यंत आवडता चित्रपट
जाने भी दो यारो
आणि गालिब टीव्ही सीरीयल
गालिब ची टीम ही ड्रीम टीम होती
अभिनय - नसिर
संगीत/ गीत/ - जगजित सिंग
लेखक- गुलजार
नसिर ने केलेली इस्मत चुगताई ची नाटकं पण ग्रेट आहेत,
16 Sep 2015 - 4:40 pm | आकाश खोत
परीक्षण आवडलं. माझ्या यादी मध्ये आहे हे पुस्तक. कधीतरी वाचेन नक्की.
फक्त एक बारकीशी शंका.
इथे खचितच म्हणायचंय का?
16 Sep 2015 - 5:44 pm | चलत मुसाफिर
शाहच्या लेखनाचा सूर 'घ्या नाहीतर सोडून द्या' असा बेदरकार आहे. म्हणून 'क्वचितच आदरयुक्त' असे म्हटले. :-)
16 Sep 2015 - 5:11 pm | राजाभाउ
आता हे वाचलच पाहीजे. छान परीक्षण आहे
16 Sep 2015 - 8:43 pm | अजया
पुस्तक मिळवून वाचेन.मग बोलेन!
16 Sep 2015 - 8:58 pm | जव्हेरगंज
छान परीक्षण...!!
पुस्तक वाचण्यास ऊत्सुक..
16 Sep 2015 - 9:00 pm | जव्हेरगंज
"पुढे अनेक वर्षांनंतर मी त्याच्याबरोबर एका गल्लाभरू पिक्चरमधे काम केलं"
म्हणजे कोणी कोणाबरोबर काम केलं? तुम्ही?
16 Sep 2015 - 9:54 pm | चलत मुसाफिर
पुस्तकातील विधान आहे. अवतरण चिन्हात टाकले आहे.
17 Sep 2015 - 12:08 pm | रातराणी
सुंदर ओळख करून दिली आहे.
19 Sep 2015 - 12:48 am | दिवाकर कुलकर्णी
पुस्तक विंग्रजीत हाय,तर कसं जमायचवाचायला।?
स्पर्श,वेन्सडे बेहतरीन
कॉक्रोच च्या लिंकन पुनप्रत्यायाचा आनंद दिला.अनेकवेला हा सीन पाहिला आहे तरीहि--------
19 Sep 2015 - 7:43 pm | पैसा
उत्तम पुस्तक परिचय. समांतर सिनेमातून या लोकांना नाव मिळतं पण पैसे व्यावसायिक सिनेमातून मिळतात. हे सत्य त्यांनी स्वीकारले तर व्यावसायिक सिनेमांबद्दल अशी तुच्छतेची भावना राहू नये. पटत नसेल तर मध्यममार्गी चित्रपट करावेत. शेवट माणूस आहे. अमिताभसारखे त्याच्यासाठी सिनेमे लिहिले किंवा बनवले गेले असते तर त्याला कदाचित एवढा कडवटपणा आला नसता.
23 Sep 2015 - 5:24 pm | तुडतुडी
+१११११११११
नसरुद्दिन शहा . वेन्सडे मध्ये १ आणि प्रत्यक्षात बरोबर उलटा
24 Oct 2015 - 4:05 am | हुप्प्या
हे पुस्तक मी मिळवले आणि वाचले. एक वाचनीय पुस्तक आहे ह्यात शंकाच नाही. साधारणपणे असे दिसते की सिनेतारे इंडस्ट्रीमधल्या अन्य लोकांबद्दल परखडपणे बोलणे टाळतात. सगळे कसे छान छान असा आव आणला जातो. तो खरा असणे शक्यच नाही. नासिरुद्दीन शाह असल्या भानगडीत पडत नाही. आपले आणि इतरांचे गुणदोष मुक्तपणे सांगतो. त्याच्या लेखनावर वुडहाऊसचा प्रभाव आहे की काय अशी कित्येकदा शंका आली. स्पर्शबद्दल इतके लिहिले पण कथा बद्दल काहीही लिहिलेले नाही. एक मराठी माणूस सादर करताना काय अनुभव आले ते सांगितले असते तर मजा आली असती.
त्याने लहानपणी घरातून पळून जाऊन मुंबईत आल्यावर अमन नामक एका पडिक सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम केले होते. (राजेंद्रकुमार, सायरा बानू. बलराज सहानी) . हा सिनेमा यूट्यूबवर बघू शकता. त्यातला शेवटचा प्रसंग जिथे त्या नायकाची अंत्ययात्रा दाखवली आहे तिथे नासिरुद्दीन शाह आहे पण मला सापडला नाही. तुम्हाला दिसला तर कळवा.
https://youtu.be/ncgPgF5roTM