दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||
मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!
मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||
मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...
मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||
मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...
मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||
मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!
मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||
टीप - ही अफलातून रचना माझी नाही. मला इमेल द्वारा ही ३-४ वर्षांपूर्वी मिळाली. मि.पा.करांना आस्वाद घेण्याकरता सादर केली आहे (कारण मी कधीच रिस्क घेत नाही!!;))))
प्रतिक्रिया
9 Jan 2008 - 12:45 am | प्राजु
सह्ह्हि...
मी खूप दिवस ही कविता शोधत होते..
एकदम भन्नाट आहे...
धन्यवाद..
- प्राजु.
9 Jan 2008 - 1:17 am | बिपिन कार्यकर्ते
कसं आवडली भन्नाट बुवा आहे.... माहिती आपल्याला लोकांना सुचतं काय.
सॉरी, सॉरी, सॉरी..... तोंडावर पाणी मारुन येतो...
भन्नाट आहे.... आपल्याला आवडली बुवा. कसं सुचतं लोकांना काय माहिती.
बिपिन.
9 Jan 2008 - 1:21 am | इनोबा म्हणे
झकास आहे...पण शिवाजी महाराजांचे नाव वापरण्यामागचे उद्दीष्ट काय,ते कळले नाही बुवा...
(आज न पिलेला) -इनोबा
9 Jan 2008 - 1:37 am | चतुरंग
ही एक कविता आहे, एका साध्यासुध्या तळीरामाबद्दल काही सांगणारी.
त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख घरात असलेल्या फोटोवरुन आलेला असावा इतकाच त्याचा अर्थ घ्यावा.
त्याजागी दुसराही कुठला फोटो असला तरी काही फरक पडत नाही.
मला तरी ह्यात काहीही वावगे दिसत नाही.
चतुरंग
9 Jan 2008 - 2:05 am | इनोबा म्हणे
साहित्याचा आस्वाद घेतला एवढं पुरेसं आहे...मनात शंका आली,म्हणून विचारले...
(इति'हास्य' प्रेमी) -इनोबा
10 Jan 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
मी देखील ही कविता एका पुढे ढकललेल्या इपत्रात वाचली होती...
आपला,
(सुधाकर) तात्या.
10 Jan 2008 - 12:12 pm | बहुरंगी
माझी सगळ्यात आवडती हास्य कविता आहे. कितीही वेळा वाचली तरी हसुन हसुन पुरे वाट लागते.
10 Jan 2008 - 7:30 pm | सुधीर कांदळकर
एकदा ३-४ वर्षापूर्वी होळीच्या दिवशी आम्ही सातआठजण पिकनिकला गेलो होतो. दापोलीजवळ एका गावी. चार कि.मी. च्या परिघांत आमच्याखेरीज कूणीहि नव्हते. ही कविता तेव्हा लोकसत्तामध्ये छापून आली होती. तेव्हा एकाने वाचली व इतरांनी श्रवणसुखाचा आस्वाद घेतला. त्या आठवणी अजून ताज्या आहेत. त्या आतां आणखी ताज्या झाल्या. मजा आली.
11 Jan 2008 - 1:10 am | टिउ
ही कविता कुणी लिहीली आहे? कुणाला काही कल्पना?
वर म्हटल्याप्रमाणे कितिही वेळा वाचली तरी हसुन हसुन पुरेवाट होते! :)
12 Jan 2008 - 1:39 pm | charudatta09
खुप छान!
12 Nov 2009 - 1:08 pm | बकुळफुले
ही कविता बरेच दिवस शोधून पाहिली आज सापडली
12 Nov 2009 - 1:17 pm | गणपा
मिपावर येण्यापुर्वी खुप आधी ही कविता वाचली होती.
मुळ कवी कोण आहे कुणाला माहीत आहे का?
12 Nov 2009 - 5:16 pm | सुमीत भातखंडे
मस्त!
12 Nov 2009 - 5:28 pm | स्वाती२
=)) =)) =))
12 Nov 2009 - 5:44 pm | सूहास (not verified)
मस्त ....
=)) =)) =)) =)) =)) =))
=))
=)) =)) =)) =))
सू हा स...
12 Nov 2009 - 9:40 pm | संदीप चित्रे
तीही पाठवतो .. जमेल तेव्हा लवकरच
13 Nov 2009 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे
वाचली होती. कुठे ते आठवत नाही. असो
हल्ली आमी बी लिवायची रिस्क घेत नाई. अस्तित्व नीमित्तमात्र असल्याची रिस्क मात्र आहेच :S
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
13 Nov 2009 - 2:57 pm | विजुभाऊ
ही कविता लोकसत्तेत एकदा वाचली होती.
कवितेचे जाहीर वाचन नेहमीच धमाल मज्जा आणते
14 Dec 2010 - 5:00 pm | मेघवेडा
=)) =)) =))
हाण्ण तेज्यायला! पुनरेकवार आनंद लुटला! हापिसात प्रिंटआऊटच लावून ठेवलाय! आता रोज धम्माल! :D
14 Dec 2010 - 6:39 pm | मितभाषी
हल्ली चतुरंग मिपावर दिसत नाहीत.
13 Sep 2015 - 9:14 am | मांत्रिक
चतुरंगराव, हे ओल्ड जेम तुमच्यामुळेच सापडले. मी पण काॅलेजात असताना वाचले होते. सहीच्च आहे.
13 Sep 2015 - 9:16 am | जव्हेरगंज
वाचली होती. प्रचंड आवडली.
सलाम त्या मुळ लेखकाला.
13 Sep 2015 - 1:56 pm | एस
http://misalpav.com/node/14084
१९६१ सालची आहे मूळ कविता.
13 Sep 2015 - 7:31 pm | बोबो
ही कविता एका परदेशी कवितेचा भावानुवाद असल्याचे काही वर्षांपूर्वी कुठेतरी(महाराष्ट्र टाइम्स?) बहुधा मूळ कवितेसोबत वाचल्याचे आठवते. मूळ कवितेत शिवाजी महाराजांऐवजी नेपोलियन होता बहुतेक.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
14 Sep 2015 - 12:00 am | एस
होय, तशी एक इंग्रजी कविता वाचली होती.
15 Sep 2015 - 12:35 pm | तुडतुडी
शिवाजी महाराजांना कशाला मध्ये घेतलंय ? स्वतःच्या वडिलांचा फोटो ठेवायचा कि तिथं . कारण शिवाजी महाराज मोठ्याने हसतात . शिवाजी महाराजांचा स्वयंपाक चालू आहे अश्या ओळी आल्या आहेत . भान ठेवावं जर लिहिताना
3 Aug 2016 - 11:19 am | टवाळ कार्टा
मोठ्ठ्याने हसणे हे वाईट?? आणि महाराज कधी गेलेच नसतील मुदपाकखान्यात असे का वाटते (जेवण बनवायची वेळ कधीच आली नसेल पण आज काय बेत आहे बघू तरी असे कशावरून झाले नसेल)?? उग्गीच अस्मितेची गळवे