(सूचना : या लेखातली सर्व चित्रे आंतरजालावरील वेगवेगळ्या स्रोतातून साभार घेतलेली आहेत)
आतापर्यंत, म्हणजे अगदी गेल्या काही आठवड्यांपर्यंत सबळ शास्त्रीय पुराव्यांनी मान्य असलेली मानवाची कुळकथा आपण इथे पाहिली होती. अर्थातच ही Australopithecus afarense या आदिमानवापासून पासून ते Homo sapiens sapiens या आजच्या आधुनिक मानवापर्यंतची कुळकथा लक्ष-दशलक्ष वर्षांच्या मोजमापाने मोजली जाते. याचा स्पष्ट अर्थ असा या कथेत बरेच आतापर्यंत न सापडल्यामुळे गाळलेले दुवे आहेत.
त्या कालखंडातील Homo नावाच्या कुटुंबाचा Homo habilis पासून सुरू झालेला एकूण भाग अंदाजे २० लाख वर्षांचा आहे ! या कुटुंबातल्या Homo ergaster (१५ लाख वर्षांपूर्वी); Homo heidelbergensis (५ लाख वर्षांपूर्वी) आणि Homo neanderthalensis (२ लाख वर्षांपासून ते ३०,००० वर्षांपूर्वीपर्यंत) याच्याबद्दल आपल्याला बर्यापैकी माहिती आहे (निदान, आपला तसा आतापर्यंतचा समज आहे :) ). मात्र या सर्व Homo कुटुंबातील इतर सभासदांपेक्षा आपण Homo sapiens sapiens इतके वेगळे आहोत की या सर्व नातेवाईकांशी आपण कसे जोडलेले आहोत याबद्दल आपले ज्ञान १००% खात्रीचे नाही तर केवळ सैद्धांतिक आहे. म्हणजेच आपल्याला इतरांशी जोडणारे अनेक दुवे/साखळ्या अजून नक्की माहीत झालेल्या नाहीत.
हा इतिहास अनेक दशलक्ष वर्षांच्या मोठ्या कालखंडावर विखुरलेला असल्याने, त्यातील बरेच पुरावे निसर्गाच्या आघातांनी पुसून गेले आहेत किंवा अस्पष्ट झालेले आहेत. याशिवाय, इतक्या मोठ्या पृथ्वीतलावर इटुकल्या मानवाचे लक्षावधी वर्षांच्या नैसर्गिक आघातांनी मोडतोड झालेले, सांदीकोपर्यात लपून बसलेले, पिटुकले अवशेष कुठे असतील हे सांगणे म्हणजे गवताच्या गंजीत लपलेली सुईच्या जागेचा अंदाज बांधण्यापेक्षा अनेक पटीने जास्त कठीण आहे हे सांगायला नकोच.
या पार्श्वभूमीवर, जेव्हा जेव्हा अपघाताने मानववंशातील नातेसंबंधातली एखादी कडी सापडते तेव्हा तिचे महत्त्व लक्षात येणे कर्मकठीण असते. असेच काहीसे २०१३ मध्ये झाले. दक्षिण आफ्रिकेतील जोहानेसबर्ग येथील विटवॉटर्सरँड (Witwatersrand) विद्यापीठातल्या ली बर्गर नावाच्या प्रोफेसरच्या घरी एका रात्री एक हौशी गुहा धुंडाळत फिरणारा (amateur caver) भूगर्भशास्त्रज्ञ त्याला सापडलेला जबड्याच्या जीवाश्माचा (fossil jawbone) तुकडा घेऊन आला. बर्गर नॅशनल जिओग्राफिकचा Explorer-in-Residence आहे. त्याने याआधी २००८ मध्ये Australopithecus sediba ही प्रजाती शोधून काढलेली आहे. हा जीवाश्म महत्त्वाचा आहे असा बर्गरचा प्राथमिक अंदाज होता. परंतू तो इवलासा तुकडा मानवाच्या जीवनकथेत मोठे मानाचे स्थान मिळवेल आणि त्याचबरोबर मानवाच्या इतिहासाबद्दल अजून काही प्रश्न निर्माण करेल असे त्याला वाटले नव्हते.
जोहानेसबर्गच्या जवळ असलेल्या रायझिंग स्टार नावाच्या गुहेत (Rising Star Cave) तो जीवाश्माचा तुकडा मिळाला होता. ही गुहा असलेला भाग पुरातन मानवी अवशेषांनी इतकी समृद्ध आहे की त्याला "Cradle of Humankind world heritage" असे ओळखले जाते.
त्या गुहेतील अवशेषांवर दोन वर्षे केलेल्या संशोधनाच्या आधारे बर्गरच्या संघाने मानवाच्या Homo कुटुंबातील एक नवीन प्रजाती शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रजातीला होमो नालेदी (Homo naledi) असे नाव दिले आहे.
रायझिंग स्टार गुहेची जागा
.
रायझिंग स्टार गुहा लांबलचक असून तिच्यामध्ये अनेक कक्ष आहेत. त्यांना जोडणारे मार्ग काही ठिकाणी केवळ सात इंच (१७-१८ सेमी) रुंद आकाराचे आहेत. अर्थातच या गुहेतले अवशेष शोधणे आणि त्यांना जमा करून बाहेर आणणे हे बरेच धोकादायक काम आहे.
रायझिंग स्टार गुहेचे मानचित्र
.
हे खास काम करण्यासाठी बर्गरने सामाजिक माध्यमांच्या मदतीने सडपातळ शरीरयष्टीच्या "भूगर्भातल्या आकाशवीरांसाठी (underground astronauts)" जाहिरात दिली. आलेल्या अर्जदारांतून आवश्यक संशोधनाबद्दल माहिती असलेल्या आणि गुहेच्या सात इंची मार्गांतून जाऊ शकणार्या लहान चणीच्या सहा तरुणींची निवड केली गेली...
"भूगर्भातल्या अवकाशवीर" तरुणी
.
"भूगर्भातल्या अवकाशवीर" काम करताना
.
त्याच्या शरीरयष्टीमुळे बर्गर स्वतः चिंचोळ्या जागांतून गुहेच्या शेवटपर्यंत जाऊ शकत नव्हता. पण इथे आधुनिक तंत्रज्ञान कामी आले ! रियल टाइम मॉनिटर्स वापरून तो सतत या संशोधनाचे मार्गदर्शन करत होता. हा प्रकल्प नोव्हेंबर २०१३ पासून मार्च २०१४ पर्यंत चालू होता.
गुहेच्या तोंडापासून ९० मीटर आत आणि जमिनीखाली ३० मीटर असलेल्या एका कक्षात बालके आणि तरुण व वृद्ध, पुरुष व स्त्रियांच्या हाडांचे जवळ जवळ १५०० अवशेष सापडले. आतापर्यंत १५ वेगवेगळ्या व्यक्तींची हाडे वेगळी केली गेली आहेत. पण ही केवळ सुरुवात आहे आणि अधिक हाडे सापडण्याची खात्री संशोधकांना आहे. कक्षात विखुरलेल्या जीवाश्मांवर पाय न देता ते गोळा करणे हेच संशोधकांपुढे सर्वात मोठे आव्हान होते/आहे...
गुहेत सापडलेल्या जीवाश्मांपैकी काही
.
या अवशेषांवर मृत्युपूर्वी हल्ला झाला असल्याच्या अथवा अपघाताच्या खुणा सापडत नाहीत. त्याअर्थी ते नैसर्गिक कारणांनी अथवा आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींचे अवशेष असावेत. एकाच ठिकाणी याप्रकारचे इतके अवशेष असल्याने, बर्गर गटाच्या मताने हा कक्ष मृतांच्या शरीरांना ठेवण्यासाठी / पुरण्यासाठी वापरली जाणारी जागा (burial ground) आहे. मृतांसाठी अशी प्रथा केवळ आधुनिक होमो प्रजातीतच सापडते. या अर्थाने, ही प्रजाती इतर मानवांच्यापेक्षा जास्त विकसित आणि म्हणून आधुनिक मानवाच्या अधिक जवळची आहे.
आतापर्यंत सापडलेले सर्वात जुने थडगे १,००,००० (एक लाख) वर्षे जुने आहे. या नवीन अवशेषांचे वय ठरवण्याचे काम सुरू आहे. ते एक लाखापेक्षा जास्त असेल की कमी याकडे शास्त्रीय जगत कुतूहलाने लक्ष ठेवून आहे.
होमो नालेदी प्रजातीचे महत्वाचे गुणधर्म खालीलप्रमाणे होते:
१. मेंदू ५६० घन सेमी म्हणजे आधुनिक मानवाच्या मेंदूच्या निम्म्यापेक्षा लहान आकाराचा होता.
होमो नालेदी कवटी आणि तिची आधुनिक मानवी कवटीशी तुलना
.
२. दात आणि जबड्यांचा आकार सुरुवातीच्या आदिमानवांच्या जवळपास होता.
होमो नालेदी जबडा
.
३. उंची आधुनिक मानवापेक्षा कमी म्हणजे साधारण ५ फूट होती.
४. पायांची रचना आधुनिक मानवाच्या पायांशी मिळतीजुळती आणि ताठ उभे राहून दूरवरचे अंतर चालून जावू शकेल अशी होती.
५. हातांची रचना आधुनिक मानवाच्या हातांसारखी, अवजार (tool) बनवणे व उंचीवर चढणे यासारख्या कामाला योग्य होती.
६. टोळीच्या मृत सभासदांच्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी निवडलेली खोलवरची आणि जाण्यास कठीण जागा पाहता; या कामासाठी खूप विचारपूर्वक श्रम करून धोका पत्करण्याइतकी प्रथा विकसित झाली होती असे म्हणता येते.
थोडक्यात, या प्रजातीमध्ये अगदी सुरुवातीच्या आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतच्या गुणधर्मांची सरमिसळ आहे. आतापर्यंत केवळ आधुनिक मानवातच असलेले काही गुणधर्मही या प्रजातीत दिसून येतात. बर्गर गटाने केलेले दावे जर अधिक संशोधनाने सिद्ध झाले तर ही प्रजाती आतापर्यंत न सापडलेली "आदिमानव आणि आधुनिक मानवाला जोडणारी एक कडी" होईल. असे झाले तर हा मानवंशशास्त्रातला एक फार मोठा पडाव ठरेल.
तर भेटा आपल्या पूर्वजांच्या चुलत कुटुंबातील एका व्यक्तीला...
जीवाश्मांवरून बनवलेला होमो नालेदीचा अर्धपुतळा
==================================================================
संदर्भः
Homo naledi: New species of human ancestor discovered in South Africa
http://edition.cnn.com/2015/09/10/africa/homo-naledi-human-relative-spec...
Homo naledi: New species of ancient human discovered, claim scientists
http://www.theguardian.com/science/2015/sep/10/new-species-of-ancient-hu...
Fossil first: Homo naledi may have buried its dead
http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/Fossil-firstHomo-...
Homo naledi
https://en.wikipedia.org/wiki/Homo_naledi
==================================================================
प्रतिक्रिया
12 Sep 2015 - 1:47 am | एस
अरे वा! कालच होमो नालेदीबद्दल माहिती वाचली होती आणि तुमच्याच लेखमालेची आठवण झाली होती. आज हा लेख वाचला. फार माहितीपूर्ण आणि समयोचित हेवेसांनल.
ही खरोखरच मानवाची आत्तापर्यंत अज्ञात असलेली नवीन प्रजाती आहे की नाही ह्याला अजून शास्त्रीय दुजोरा मिळायचा असला तरी तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे आत्तापर्यंत अज्ञात असलेल्या काही साखळ्या / दुवे सांधायला ह्या संशोधनाची नक्कीच मदत होऊ शकेल असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही.
फोटो काही दिसले नाहीत. कदाचित इतरांना दिसत असावेत.
12 Sep 2015 - 2:00 am | कपिलमुनी
+१
13 Sep 2015 - 11:33 am | पैसा
गेल्या काही दिवसात क्रोमवाल्यांनी काही बदल केले आहेत त्यामुळे पीसी/लॅपटॉपवर क्रोम वापरत असाल तर लेखकाने गूगल्/पिकासावर ठेवलेले फोटो गूगलवर लॉग्ड इन असलेल्या पुण्यवंतानाच दिसतात. फोटो बघण्यासाठी दुसर्या टॅबमधे जीमेल लॉग इन करा आणि मिपा पेज रिफ्रेश करा. अचानक चमत्कार होऊन फटु दिसायला लागतील. अँड्रॉईड मोबल्यावर गूगलवर लॉग्ड इन असल्याने हा प्रॉब्ळम येत नाही.
13 Sep 2015 - 6:21 pm | खटपट्या
खूप उपयुक्त टीप दीलीत. सर्व फोटो छान दीसू लागले.
12 Sep 2015 - 2:04 am | प्यारे१
वाटेची रुंदी वाचतानाच श्वास कोंडला. असं धाडसाचं संशोधन करणाऱ्या लोकांना सलाम.
लेख नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि अत्यंत सोपा करून सांगणारा असं लिहीणं म्हणजे सचिन चांगला खेळायचा म्हणण्यासारखं आहे.
बाकी हाच का आमचा पूर्वज???? देखणा आहे हो!
12 Sep 2015 - 7:23 am | पीके
पण ते "HOMO" होते!!! लोल.....
12 Sep 2015 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे
बाय द वे, तुम्हीपण Homo (sapiens sapiens) च आहात* ;)
* याचे शास्त्रीय कारण : जीवांच्या अथवा निर्जीवांच्या इतर कोणत्याही जाती-प्रजातीने आंतरजाल वापरल्याचा पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. :)
12 Sep 2015 - 12:46 pm | प्यारे१
विनोदाचा दर्जा थोडा उंचवायला हवा. प्रयत्न करा. जमेल.
13 Sep 2015 - 11:26 am | असंका
अगदी सहमत....
16 Sep 2015 - 10:12 pm | पीके
गोंधळ्या; विस लाख वर्षे HOMO तरी पण यांचा वंश कसा काय वाढला?
;D..>>> PJ ...
12 Sep 2015 - 3:44 am | पद्मावति
....अगदी हेच म्हणायचे आहे.
12 Sep 2015 - 5:02 am | रुपी
खूपच माहितीपूर्ण लेख!
बातम्यांमध्ये थोडंफार वाचलं, पण तुम्ही छान, सोप्या भाषेत मांडल्यामुळे बरीच माहिती मिळाली. आधीची मालिका मी वाचलेली नाही, त्याचा दुवा दिल्याबद्दल आभार!
त्या चिंचोळ्या जागेतून जाणार्या तरुणींना सलाम! मला तर फोटो पाहूनच घाम फुटला. (मलाही फोटो लॅपटॉपवर दिसत नाहीयेत, पण मोबाईलवर दिसले.)
12 Sep 2015 - 8:22 am | योगी९००
खूपच माहितीपूर्ण लेख!बातम्यांमध्ये थोडंफार वाचलं, पण तुम्ही छान, सोप्या भाषेत मांडल्यामुळे बरीच माहिती मिळाली.
+१
बाकी रामायणात वानरसेना "होमो नालेदीं"ची असावी असे वाटून गेले तो फोटो पाहिल्यावर..!!
12 Sep 2015 - 6:38 am | स्रुजा
फोटो ज्यांना दिसत नाहीत त्यांच्यासाठी: मिसळपाव क्रोम वर ओपन करुन, क्रोम वर गूगल लॉगिन करा. जीमेल किंवा नुसतं गुगल साईन इन काहीही चालेल. मिसळपाव टॅब मग रीफ्रेश केला की फोटो दिसायला लागतील.
लेख खुप छान, नेहमीसारखाच माहितीपूर्ण. बातमी वाचल्यावरच वाटलं की तुमच्याकडुन ही लेख आला तर बरं होईल. आधीची मालिका सुद्धा किमान २ वेळा मी वाचुन काढली आहे :)
12 Sep 2015 - 9:43 am | नाखु
संशोधकांच काम चिकाटीचं आणि अभ्यासाचा ध्यास असलेलं
फोटो दिसण्यासाठी सांगीतलेल्या युक्तीबद्दल मंडळ दणकून आभारी आहे.
(फोटो दिसल्यामुळे आनंदी झालेला नाखुस)
12 Sep 2015 - 11:52 am | फुलथ्रॉटल जिनियस
छान लेख आहे म्हात्रे साहेब.
12 Sep 2015 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
या लेखाचा विषय मानववंशशास्त्रात इतका महत्वाचा आहे की त्यासंबधी पहिली बातमी १० सप्टेबरला आल्यावर त्यावर गडबडीने लेख लिहीला. अनेक छोटेमोठे मुद्दे राहिलेत, ते नंतर कधीतरी लिहीता येतील. पण, गुहेतील बरियल ग्राउंडचे मानचित्र नजरचुकीने टाकायचे राहिले होते. ते खाली देत आहे. या चित्राने या प्रकल्पामधल्या धोक्यांची आणि त्याचबरोबर त्याच्या शास्त्रीय महत्वाची जास्त चांगली कल्पना येऊ शकेल...
रायझिंग स्टार गुहेतला थडगे कक्ष (burial ground)
.
12 Sep 2015 - 12:44 pm | अजया
माहितीपूर्ण लेख.त्या गुहेत शिरलेल्या स्त्रियांची पण कमाल आहे!
12 Sep 2015 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा साडेतीन मिनिटांचा लघूचित्रपट होमो नालेदी प्रकल्पाची छोटीशी झलक दाखवतो...
15 Sep 2015 - 8:29 pm | वगिश
हनुमान सारखे दिसत आहे.
16 Sep 2015 - 2:10 pm | कपिलमुनी
रामायणामध्ये रावण वधानंतर रामाने आफ्रिकेची निसर्गरम्य भूमी वानरांना बक्षीस म्हणून दिली. तिथे हे हनुमानाचे भाउबंद गुहेमधे राहत होते. याचा उल्लेख पुनायणात आहे.
आम्हाला हे आधीच माहिती होते :)
12 Sep 2015 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिळालेल्या तुटपुंज्या अवशेषांचा अभ्यास करून होमो नालेदीचा पुतळा कसा बनवला ते या व्हिडिओत दिसेल...
12 Sep 2015 - 1:19 pm | द-बाहुबली
13 Sep 2015 - 7:20 am | मुक्त विहारि
धन्यवाद....
13 Sep 2015 - 7:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मानवाच्या ह्या पुर्वज कडीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. स्टोन केर्न्स पद्धतीची थडगी कुठल्या पातळीवरच्या मानवानी बांधण सुरु केलं असावं?
विंडोज एक्स पी मधला स्टोन केर्न्सचा सर्वपरिचित वॉलपेपर.
13 Sep 2015 - 11:12 am | काळा पहाड
मानवांनी?
13 Sep 2015 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या प्रतिसादातील चित्रात इंग्लंडमधील विल्टशायर येथील जगप्रसिद्ध आणि युनेस्कोमान्य जागतिक वारसा ठेवा असलेले स्टोनहेंज (Stoneheng) दिसत आहे. रेडिओकार्बन डेटिंगप्रमाणे यातले सर्वात जुने दगड इ स पूर्वी २४०० ते ३००० वर्षांपूर्वी उभारलेले आहेत. पुरातत्वशास्त्र पुरावेही हे सर्व दगड इ स पूर्व ३००० ते २००० या कालखंडात उभारले गेले आहेत असेच सांगतात. या रचनेमागे धर्म, प्रथा (रिचुअल्स), देवूळ, इत्यादींपैकी एक अथवा अनेक कारणे असू शकतात, पण अजून त्याबद्दल कोणतेही सबळ पुरावे मिळालेले नाहीत. आजूबाजूला या दगडांपेक्षा जास्त जुने असलेले अवशेष सापडले आहेत. ही दगडांची रचना कशासाठी केली गेली आणि त्याबरोबरच इतक्या पूर्वी इतक्या अवजड दगडांची ही मांडणी कशी काय शक्य झाली याचे नक्की उत्तर अजूनही सापडलेले नाही... अधिक माहिती येथे मिळेल.
आपण सोडून होमो जीनसमधली युरोपमधली शेवटची स्पिसिज होती, होमो निअॅन्डरथालेसिस (Homo neanderthalensis), जी साधारण ४०,००० वर्षांपूर्वी नष्ट झाली. त्यानंतर युरोपमध्ये फक्त Homo sapiens sapiens आस्तित्वात राहिले आहेत. म्हणजे हे दगड आधुनिक मानवाने (Homo sapiens sapiens, म्हणजे तुमच्या-आमच्या प्रजातीने) रचलेले आहेत.
होमो नालेदी प्रजाती या काळाच्या खूप मागे होऊन गेली आहे. सद्याच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे ती २५ लाख वर्षांपूर्वी आस्तित्वात होती... रायझिंग स्टार गुहेत सापडलेल्या हाडांचे वय ठरवल्यावर तिचा कालखंड नक्की करण्यास मदत होईल.
13 Sep 2015 - 7:33 pm | द-बाहुबली
आवं ह्या फारिनच्या सातिआसरा हायत्या ;)
13 Sep 2015 - 10:52 am | पियुशा
अतिशय माहीती पुर्ण लेख :)
13 Sep 2015 - 11:10 am | बोका-ए-आझम
एक्काकाकांचा लेख म्हणजे प्रश्नच नाही. रच्याकने, ज्या विद्यापिठाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे ते Witwatersrand विद्यापीठ हे मानववंशशास्त्राच्या क्षेत्रात एकदम जबरदस्त मानलं जातं - अगदी गणितासाठी केंब्रिज किंवा तंत्रज्ञानासाठी एम.आय.टी. आहेत तसे.जगद्विख्यात मानववंशशास्त्रज्ञ डाॅ.रेमंड डार्ट हे तिथे प्राध्यापक होते.
13 Sep 2015 - 11:35 am | सतिश गावडे
अतिशय सहज सोप्या शब्दांतील माहितीपूर्ण लेख.
चित्रे काही मला अजूनही दिसली नाहीत. मात्र मी National Geographic हा लेख वाचला. बर्गर National Geographic चा "explorer-in-residence" असल्याने अतिशय सविस्तर वर्णन आहे या शोध-मोहिमेचे.
या विषयात रुची असणार्यांनी युवल हरारीचे "Sapiens: A Brief History of Humankind" हे पुस्तक वाचावे. पाचशे पानांचा हा ठोकळा एकदा हाती घेतला की खाली ठेवावासा वाटत नाही. मानववंशशास्त्राची तोंड ओळख इतका माफक हेतू असणारे हे पुस्तक शेवटाकडे जाताना भांडवलशाही, चंगळवाद अशा मुद्द्यांना हात घालतो. आपल्याच अस्तित्वाविषयी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.
पुस्तकाचा गार्डियन रिव्ह्यू
13 Sep 2015 - 11:50 am | पैसा
उत्तम माहितीपूर्ण लेख! मानवी इतिहासाच्या अजून अज्ञात कालखंडाबद्दल काही माहिती उजेडात येते आहे असे वाटते. त्या संशोधकांची चिकाटी जबरदस्त आहे.
13 Sep 2015 - 12:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
पेपरात बातमी वाचल्या पासुन या विषयावरची उत्सुकता चाळवली होती.
पण तुम्ही यांना चुलत कुटुंब असे का म्हटले आहे? म्हणजे ते सध्याच्या मानवाचे पुर्वज नाहीत का?
तसे असेल तर ते का नामशेष झाले याची काही कारणे आहेत का?
तो पुतळा बनवताना त्वचेचा रंग डोळ्यांचा रंग केसांची रचना कशी ठरवली जाते? (म्हणजे विचारण्याच उद्देश असा की तो पुतळा खर्या होमो नालेदीच्या कितपत जवळपास जाणारा असावा?)
रच्याकने :- ती सात इंचाची गुहा बघुन मला पुण्याजवळच्या कानिफनाथांच्या मंदिराची आठवण झाली तिथे सुध्दा मुख्य गाभार्यात जायचा रस्ता असाच / एवढाच चिंचोळा आहे. पण तिकडे गाभार्यात स्त्रियांना प्रवेश नाही आणि इकडच्या गाभार्यात मात्र केवळ स्त्रियाच जाऊ शकल्या.
पैजारबुवा,
13 Sep 2015 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण तुम्ही यांना चुलत कुटुंब असे का म्हटले आहे? म्हणजे ते सध्याच्या मानवाचे पुर्वज नाहीत का?
नाही. आपले कोणते तरी पूर्वज आणि नालेदींचे पूर्वज एकाच प्रजातीचे असू शकतील (किंवा वेगळ्या शब्दांत : कोण्या एका अतीप्राचीन प्रजातीतून आपले आणि नालेदींचे पूर्वज निर्माण झाले असावेत व पुढे स्वतंत्र स्पेसिजमध्ये विकसित झाले असावेत).
थोडक्यात रुपक वापरून सांगायचे तर "होमो (जीनस)" नावाच्या झाडाच्या खोडावर "नालेदी" आणि "सेपिएन्स (आपण आधुनिक मानव)" या दोन फांद्या आहेत असा अंदाज आहे. म्हणूनच शिर्शकातला त्यांचा उल्लेख "आपल्या पूर्वजांचे चुलत कुटुंब" असा केला आहे. या फांद्या एकमेकापासून किती दूर आहेत याबाबतीत निर्णय करण्यासाठी संशोधन चालू आहे.
तो पुतळा बनवताना त्वचेचा रंग डोळ्यांचा रंग केसांची रचना कशी ठरवली जाते? (म्हणजे विचारण्याच उद्देश असा की तो पुतळा खर्या होमो नालेदीच्या कितपत जवळपास जाणारा असावा?)
यासाठी वरची व्हिडिओ क्लिप पहा.
तसे असेल तर ते का नामशेष झाले याची काही कारणे आहेत का?
एखादी प्रजाती नामशेष का होते याबाबत केवळ अनेक अंदाज मांडता येतात. याला असंख्य कारणे असल्याने ते थोडक्यात सांगणे अशक्य आहे. यांचा थोडाबहुत उहापोह "पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" या लेखमालेत केलेला आहे.
13 Sep 2015 - 4:13 pm | इशा१२३
मस्त माहितीपुर्ण लेख.गुहेच्या चिंचोळ्या वाटेतुन जायचे म्हणजे धाडसाचेच काम.अजुन किती गोष्टी माहिती नसतील मानव इतिहासातील आपल्याला?अस वाटत रहात.
13 Sep 2015 - 5:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजुन किती गोष्टी माहिती नसतील मानव इतिहासातील आपल्याला?अस वाटत रहात.
हा शोध हीच गोष्ट अधोरेखीत करतो आहे ! "जर जोहानेसबर्ग सारख्या पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासाच्या जागतिक केंद्रापासून काही किलोमीटरवर अंतरावर आणि अनेक दशके संशोशन सुरू असलेल्या जागेवर असा क्रांतीकारी शोध लागण्यासारखे अवशेष सापडले आहेत तर आफ्रिकेच्या दूरदराज कानाकोपर्यात काय काय रहस्ये दडून राहिली असतील ?" हाच प्रश्न संशोधकांना सतत सतावत असतो !
13 Sep 2015 - 7:32 pm | कानडाऊ योगेशु
तेव्हापासुनच माणासाच्या कपाळावर अठी आहे तर!
लेख आवडला.
13 Sep 2015 - 7:45 pm | काळा पहाड
म्हणजे हा बाबा पुण्यातला असणार. थोडक्यात, पुण्यातले लोक तेव्हा सुद्धा साउथ आफ्रिकेला ऑनसाईट जॉब करत होते.
13 Sep 2015 - 11:01 pm | प्रचेतस
माहितीपूर्ण लेख आणि तितकेच माहितीपूर्ण प्रतिसादही.
14 Sep 2015 - 8:53 pm | जेपी
लेख आवडला.
14 Sep 2015 - 8:56 pm | मराठे
खूप छान माहिती. आता माझे काही अडाणी प्रश्नः
१. एखाद्या ठिकाणी जीवाश्म मिळतील हे शास्त्रज्ञांना कळतं कसं?
२. तुम्ही म्हटलंय की, " टोळीच्या मृत सभासदांच्या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी निवडलेली खोलवरची आणि जाण्यास कठीण जागा पाहता; या कामासाठी खूप विचारपूर्वक श्रम करून धोका पत्करण्याइतकी प्रथा विकसित झाली होती असे म्हणता येते." पण जेव्हा त्या जागी मृतशरीरे पुरली गेली तेव्हा कदाचीत ती जागा एवढी खोल नसावी, आणि नंतर नैसर्गिक कारणांमुळे जमिनीवर नविन लेयर बनले असावे किंवा इतर तत्सम कारणांमुळे गुहा खोलवर गेली असावी, असंही असेल. अर्थात ही शक्यता शास्त्रज्ञांनी आधीच पडताळून पाहिली असणारच म्हणा.
15 Sep 2015 - 12:21 am | डॉ सुहास म्हात्रे
एखाद्या ठिकाणी जीवाश्म मिळतील हे शास्त्रज्ञांना कळतं कसं?
(अ) हे बहुदा अपघातानेच कळते. प्राणी पृथ्वीवर मोकळेपणे फिरत असतात / होते. त्यामुळे, जीवाश्म पृथ्वीवर कोठेही विखूरलेले असू शकतात; त्यासाठी काही विशिष्ट नियम असू शकत नाहीत.
(आ) एखाद्या जागी महत्वाचे जिवाश्म सतत सापडतात अश्या जागेमध्ये शोध चालू ठेवणे जास्त फायद्याचे असते. रायझिंग स्टार गुहेच्या आजूबाजूचा प्रदेश याबाबतीत प्रसिद्ध आहे. पण तरीही अश्या शेकडो चौ किमी प्रदेशात नक्की कुठे कोणते अवशेष असतील हे सांगणे कठीण असते. अर्थातच, गुहांसारख्या आडोश्याच्या जागांत माणसे राहण्याचे आणि त्यांचे अवशेष इतर प्राण्यांपासून व नैसर्गिक आघातांपासून सुरक्षित राहण्याचे प्रमाण जास्त असू शकते, इतकेच.
जेव्हा त्या जागी मृतशरीरे पुरली गेली तेव्हा कदाचीत ती जागा एवढी खोल नसावी, आणि नंतर नैसर्गिक कारणांमुळे जमिनीवर नविन लेयर बनले असावे किंवा इतर तत्सम कारणांमुळे गुहा खोलवर गेली असावी, असंही असेल. अर्थात ही शक्यता शास्त्रज्ञांनी आधीच पडताळून पाहिली असणारच म्हणा.
एखाद्या जागी अवशेष मिळतात तेव्हा त्या परिसराचा भूगर्भशास्त्रिय अभ्यासही कसून केला जातो. त्या अभ्यासाचा अवशेषांच्या सद्याच्या स्थितीची कारणे आणि अवशेषांचे वय ठरवण्यात फार मोठा उपयोग होतो.
रायझिंग स्टार गुहेचे भूगर्भशास्त्रिय मानचित्र येथे दिले आहे त्यावरून हा अभ्यास किती खोलवर केला जातो याची प्राथमिक कल्पना यावी.
हे अवशेष आहेत तिथे नैसर्गिक कारणाने आले असावेत की मानवी हस्तक्षेपाने आले असावेत आणि तेथिल दगड-माती का आणि कशी आली असावी / आहे याचा पुरेपूर उहापोह झालेला आहे. हे केवळ मूळ संशोधक म्हणतात म्हणून खरे मानले जात नाही. त्यांना हे संशोधन इतर मान्यवर संशोधकांपुढे (ज्यात बहुदा पाठीराख्यांपेक्षा विरोधकच जास्त असतात) प्रदर्शित करून आपल्या म्हणण्याचे सबळ शास्त्रीय पुरावे द्यावे लागतात. हे सगळे होऊनही सर्व संशोधन सर्वमान्य होण्यासाठी इतर अनेक सबळ शास्त्रिय पुरावे पुढे यावे लागतात. हा प्रवास लांब काळाचा असतो. या लेखातले अवशेष २०१३ मध्ये मिळालेले आहेत आणि त्यासंबंधीचे अनेक निर्णय अजून लागलेले नाहीत आणि / अथवा सर्वमान्य झालेले नाहीत.
14 Sep 2015 - 9:38 pm | प्रसाद गोडबोले
ठार खोटे !!
माणुस असा माकडा पासुन उत्क्रांती पावणे शक्यच नाही , इश्वराने जगाची निर्मीती केली ७ दिवसत अन शेवटी माणुस घडवला , हे असले गैरसमज पसरवणे सारे काफीरांचे कारस्थान आहे . सच्च्या एकमेव धर्माच्या अनुयायांच्या धर्माच्या विषयीच्या श्रध्दा विचलीत करण्यासाठी केलेली एक खेळी आहे .
एक पुरोगामी म्हणुन मी सर्व अल्पसंख्य बंधुभगीनींतर्फे ह्या असल्या प्रचाराचा निषेध करतो .
अधिक चांगल्या अब्यासाकरिता हा लेख पहावा : डार्विन च्या माकडांचा नंगानाच
16 Sep 2015 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
खी खी खी...
पण कोण म्हणतेय की माणूस माकडापासून उत्क्रांत झालाय ? हा अज्ञानी लोकांचा गैरसमज आहे ! :)
डार्विन आणि इतर शास्त्रज्ञ तर तसे अजिबात म्हणत नाहीत... शास्त्रज्ञांच्या मते माणसाचा फार्फार प्राचीन (म्हंजे बगा अंदाजे ७० लाख वर्षांपूर्वीचा) पूर्वज आणि चिंपॅझीचा त्या वेळचा पूर्वज हे दोघे एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत.
16 Sep 2015 - 8:35 pm | प्यारे१
७० लाख वर्षापूर्वीचा माणसाचा आणि माकडाचा पूर्वज त्यांच्या आधी च्या कुणापासून तरी आले म्हणजे आणखी मागं न्यायची म्हणता गाडी?
आणि माणूस माकडा पासून जन्मला नाही तर हे सगळे गुण आले कुठुन मग?
14 Sep 2015 - 10:06 pm | मांत्रिक
डाॅक! माझे एक निरीक्षण नोंदवतो. जेवढे म्हणून प्रगत समाज आहेत ते मृतदेहाला फार घाबरतात. परंतु काही आदिम समाज मात्र मृतदेहांचा आपल्या वस्तीजवळच अंतिम संस्कार करतात. आणि ते स्थळ अतिशय पवित्र मानतात. असं का असावं? मनुष्य प्रगत होत गेला की तो मृत्यु, आजारपण, संकटं, दारिद्र्य यांना घाबरत असावा का? आदिम समाज मात्र या गोष्टी फार सहजतेने घेतात.
15 Sep 2015 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
याच्याशी प्राचीन किंवा आधुनकतेचा संबंध नसून मानसिकतेशी आहे. लहानपणापासून आपल्या मनावर काय बिंबविले गेले आहे (चाईल्डहूड प्रायमिंग) त्यानुसार आपण पुढच्या आयुष्यात जग बघतो... किमान आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपल्या चुकीच्या संकल्पना झटकून टाकेपर्यंत तरी.
बाली या हिंदुबहुल (९२%) असलेल्या इंडोनेशियातील राज्यात कुटुंबातल्या मृत माणसाच्या समाध्या घराच्या आवारात देवळांच्या स्वरूपात आणि त्याच आवारातल्या देवाच्या देवळांच्या जवळ बांधतात...
16 Sep 2015 - 2:36 am | शेखरमोघे
बालीतला हिन्दु धर्म आणि पद्धती आपण ज्या तर्हेने "हिन्दु" "सन्स्कार" " मन्त्रोपचार" वगैरे करतो/मानतो/पाळतो त्या पेक्षा बरीच वेगळी आहेत. मी इन्डोनेशियात अनेक वर्षे राहिलो असलो (आणि थोडी गीर्वाण भाषा पण पूर्ण "बहासा इन्डोनेशिया" जाणत असलो) तरी तिथल्या देवळात गेल्यावर काही पत्त्या लागायचा नाही की काय चाललेले आहे. देवळातले मन्त्रोच्चार थोडे लक्ष दिल्यावर थोडेबहुत समजत पण आपल्याकडच्या पूजेमधले "आवाहन", "आदर सत्कार", "स्मरण" इ इ काहीच असावेसे वाटले नाही.
पूर्वजान्चे स्मरण्/स्मारक हे काहीसे "सर्व देव नमस्कारम" पद्धतीचे (जसे बालीत सर्वत्र वावरणार्या चान्गल्या आणि वाइट दोन्ही तर्हेच्या शक्तीना केले जाते) आणि भीतीपोटी केले जात असावे असे वाटले. त्यामुळे अने़क कानाकोपर्यात लहान मोठ्या मूर्ती आणि त्याना ताम्बडे (शुभ शक्तीना वन्दन) किन्वा काळे (अशुभ शक्तीना "लाम्ब रहा रे बाबा" असे मागितलेले अभय) वस्त्र नेसवले जाते.
16 Sep 2015 - 11:17 am | डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
माझा बालीच्या हिंदू धर्मासंबंधी अभ्यास नाही. तेथे हिंदू धर्म भारतातून गेला हे तेथील लोक मानतात... किती वर्षांपूर्वी हे केवळ दंतकथांच्या स्वरूपातच सापडते. मात्र हे ऐतिहासीक सत्य आहे की बालीतील हिंदूं इंडोनेशियाच्या इतर मुस्लिम भागाने पूर्णपणे वेढलेले आहेत आणि त्यांचा शेकडो वर्षे भारताशी धार्मिक देवाणघेवाणीचा संबंध तुटलेला आहे. माझ्या वरवरच्या निरिक्षणाने बालीतील हिंदू धर्म हा प्राचीन पंचमहाभूतांच्या कल्पनेशी जास्त जवळ आणि भारतातील मूर्तीपूजा व (गेल्या हजार एक वर्षांत निर्माण झालेल्या) देवदेवता-कर्मकांडे यापासून खूपच दूर आहे. तेथे देवळात मूर्ती नसतात. गणेशालाही देवळाचा रक्षक म्हणून देवळाच्या व्दाराजवळ उभे केलेले दिसते. इतकेच नाही तर देवळांतल्या पुजार्यांना सोडून इतर हिंदूना गोमांस निषिद्ध नाही... किंबहुना सणासुदीला खास गोमांसाकरिता वाढविलेल्या गाईगुरांची विक्री होताना दिसते.
अवांतर : (अ) बालीतील हिंदू धर्माचा अभ्यास व (आ) तो भूभाग धार्मिकदृष्ट्या भारतापासून केव्हा अलग झाला, याचा दोन गोष्टींचा अभ्यास केला तर हे विभाजन होण्यापूर्वी भारतातील हिंदू धर्माचे स्वरूप कसे असावे याची कल्पना करायला मदत होईल.
15 Sep 2015 - 3:42 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख!
स्वाती
15 Sep 2015 - 4:21 pm | पिशी अबोली
फार आवडला लेख. अजून माहिती येईल तशी प्लीज लिहा. वाचायला खूप आवडेल.
हाडं म्हणजे गुलाबाची फुलं आणि बरियल साईट्स गुलाबाचे ताटवे वाटणार्या लोकांमध्ये राहणारी,
पिशी.
16 Sep 2015 - 2:13 am | शेखरमोघे
खूप छान, माहितीपूर्ण आणि विविध अन्गाने लिहिलेला लेख आवडला.
फोटो न दिसण्यावरचा उपायही अनायासे कळला.
16 Sep 2015 - 2:21 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख.
लेखाबाबत वरील प्रतिसादांत मांडल्या गेलेल्या विचारांशी सहमत.
16 Sep 2015 - 3:08 pm | नंदन
सहमत आहे. शिवाय माहितीचे संकलन, आकलन, सोप्या शब्दांत आणि वाचनीय सादरीकरण, आणि ते वेळोवेळी अद्ययावत करण्याची घेतलेली दक्षता - हे सारे टप्पेही अनुकरणीय!
16 Sep 2015 - 5:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे अनेकानेक धन्यवाद !
या शोधाबद्दल इतक्या जणांनी दाखवलेल्या कुतुहलामुळे मिपावर घाईघाईने हा लेख टाकल्याचे चीज झाले असेच म्हणावेसे वाटते.
या मानववंशशास्त्रात मैलाचा दगड ठरू शकणार्या संशोधनाच्या निष्कर्षांकडे शास्त्रिय जगताचे लक्ष लागले आहे. नालेदीचा कालखंड आणि त्यामुळे त्याचे समवयस्क असलेल्या/नसलेल्या इतर आदिमानव/मानव प्रजातींच्या कालखंडांच्या अभ्यासावरून एकूणच मानवाच्या उत्क्रांतीबद्दलच्या आपल्या सद्यकल्पनांना बरेच धक्के बसणार असेच दिसते आहे. या कारणाने नालेदी प्रजातिचा शोध "शतकातला एक" ठरण्याची शक्यता आहे.