नमस्कार.
आत्ताच टीकाकार - १ यांनी माझ्या 'विहंगगीत' या रचनेला सुमार असे म्हटले आहे. मी या टीकेचे स्वागत करतो. टीकाकार -१ यांनी केलेल्या सुमार या परिक्षणामुळे माझ्याच रचनांबद्दल मला विचार करावासा वाटला आणि सहजच या चार ओळी सुचल्या त्या इथे लिहीत आहे. टीकाकार - १ यांचा मी आभारी आहे!
शब्द माझे सूर माझे
वाकुडे गाणेही माझे
परि सांभाळून घ्या हो
बोबडे हे बोल माझे.... धृ
गीत माझी प्रीत माझी
रीतही माझी जुनीच
ताल माझा चाल माझी
शाल माझी कांबळीत
आजही आकाश गाते
चांदण्याचे गीत माझे
परि सांभाळून घ्या हो
बोब हे बोल माझे... १
तान माझी गान माझे
रान सारे गुणगुणेल
गाव माझा शीव माझी
जीव माझा वणवणेल
पाउलांच्या संगतीला
पाखरांचे गीत माझे
परि सांभाळून घ्या हो
बोबडे हे बोल माझे...२
शीण माझा ताण माझे
प्राण वेडे गुंतलेले
वाद माझे वेद माझे
भेद आता संपलेले
भंगलेल्या राउळाला
जोडणारे मंत्र माझे
परि सांभाळून घ्या हो
बोबडे हे बोल माझे...३
रंग माझा राग माझे
संग हा श्रीरंग पायी
दूर नेती सूर माझे
पूर ये आनंददायी
नाचती बांधून पायी
मोरही घुंगूर माझे
परि सांभाळून घ्या हो
बोबडे हे बोल माझे...४
--अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
19 Sep 2007 - 4:42 pm | आजानुकर्ण
आपल्या प्रगल्भपणाचे कौतुक वाटते.
तुम्ही कोणत्याही टीकाकाराकडे लक्ष देऊ नका. ज्याला काही लिहिता येत नाही तो समीक्षक किंवा टीकाकार बनतो असे म्हटलेच आहे. कुणी म्हटले नसेल तर मी म्हणतो.
तुम्ही लिहित रहा.
19 Sep 2007 - 7:19 pm | जगन्नाथ
आपल्या प्रगल्भपणाचे कौतुक वाटते.
तुम्ही कोणत्याही टीकाकाराकडे लक्ष देऊ नका.
ह्यातील विरोधाभास व त्यातून निर्माण होणारा विनोद समजावून सांगा (१५ मार्क)
19 Sep 2007 - 4:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली !
सहज आलेल्या शब्दार्थाने तर कवितेतला गोडवा अधिकच वाढला आहे.
कविता कोणाला कशी वाटेल याचा तर कधी विचार करु नये !
लिहीत राहा !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
19 Sep 2007 - 5:04 pm | प्रकाश घाटपांडे
शीण माझा ताण माझे
प्राण वेडे गुंतलेले
वाद माझे वेद माझे
भेद आता संपलेले
भंगलेल्या राउळाला
जोडणारे मंत्र माझे
परि सांभाळून घ्या हो
बोबडे हे बोल माझे...३
मस्तच अशोकजी, आपली संवेदनशीलतेला कुण्या पिचकारीने धक्का पोचु नये ही सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे
19 Sep 2007 - 5:20 pm | टीकाकार-१
शब्दरचना छान आहे. शब्दान्चे जगलिन्ग मस्त. पण आशय पोचला नाहि.
तरी शीघ्र कविता असल्यामुळे कौतुकास्पद आहे.
19 Sep 2007 - 6:17 pm | विसोबा खेचर
वाद माझे वेद माझे
भेद आता संपलेले
भंगलेल्या राउळाला
जोडणारे मंत्र माझे
अतिशय सुरेख ओळी...
तात्या.
19 Sep 2007 - 10:11 pm | सर्किट (not verified)
या ओळींनी कविता वेगळ्याच प्रतलात जाते.
- सर्किट
19 Sep 2007 - 6:33 pm | रंजन
बोबडे बोल आवडले.
20 Sep 2007 - 2:19 pm | अशोक गोडबोले
सर्व वाचकांचा मी आभारी आहे.