बाबांचा 'सैगल'

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
2 Sep 2015 - 7:36 pm

माझे मनगट घट्ट पकडून बाबा गर्दीतून वाट काढत भरभर चालत होते. मी रेंगाळतोय असे वाटले की बाबा मला पुढे ओढायचे, त्यांच्या वेगाने मला चालता येत नव्हते, पळावे लागत होते. फोर्टचा परिसर माझ्याकरता जादुनगरीच होती, फुटपाथावरील ते स्टॉल, त्यावरील इलेक्ट्रोनिक वस्तू, कॅमेरे, रिमोटवर चालणारी गाडी,हवेत उडणारे प्लॅस्टिकचे हॅलिकोप्टर,पाण्याच्या टबमध्ये फिरणारी बोट काय बघू नि काय नको अशी माझी अवस्था झाली होती. बाबा जरा हळू चालले असते तर मला प्रत्येक वस्तू नीट बघता आली असती, परंतु बाबाच्या चालण्यावरून त्यांना ह्या गोष्टींमध्ये काही रस होता असे वाटत नव्हते, त्यांची नजर वेगळेच काहीतरी शोधत होते.

बाबा एका कॅसेटच्या स्टॉलजवळ थाबले, क्या चाहिये अंकल? स्टॉलवरील मुलाने विचारले.सैगलचा अल्बम आहे का? बाबांनी मराठीतून विचारले.(बाबा कुठेही हिंदीत बोलत नाही, मराठीतच बोलतात) आहे ना, त्या मुलाने मराठीतून सांंगितले. तीन चार कॅसेट बाबांकडे दिल्या, बाबांनी त्या निरखून बघितल्या, त्या कॅसेट बाबा सैगलच्या होत्या. टीव्हीवर तेव्हा बाबा सैगलने चांगलाच धुमाकूळ घातला होता, मलाही त्याची गाणी आवडायची.घरी गेल्यावर मस्तपैकी 'बाबाची' गाणी मोठ्या आवाजात ऐकायची धमाल नाचायचे असे मनातल्या मनात मांडे खात असताना .. अरे हा सैगल नको, तो जुना सैगल पाहिजे,बाबा म्हणाले. तो मुलगा गोंधळला, जुनावाला सैगल ... असा पुटपुटत खाली वाकला व त्याने एक कॅसेट बाबांसमोर ठेवली. हाच ना? त्या कॅसेटवर कृष्ण धवल रंगात एका माणसाचा फोटो होता, जुन्या काळातला वाटत होता. बाबा जरा वैतागून म्हणाले, नाव तरी नीट वाच की.. हा सैगल नाही, इंग्लिश गायक सीगल आहे हा. आणि मला हिंदी सिनेमातल्या जुन्या सैगलच्या गाण्यांचा अल्बम हवाय... असा अल्बम नाही आला अजून, बाबांच्या हातातून कॅसेट घेत थोड्या नाराजीने तो म्हणाला. अरे है ना अपने पास, तू ये कस्टमरको देख, असे त्याच स्टॉलवरील एक सफेद दाढीवाला वयस्कर माणुस बाबांकडे वळून म्हणाला. थोडावेळ त्याने एका खोक्यात शोधाशोध केले व पाच कॅसेटचा संच बाबांसमोर ठेवला....

माझे बाबा के. एल. सैगलचे भक्त, त्याची गाणी म्हणजे त्यांचा जीव का प्राण. आज त्यांच्या समोर सैगलच्या गाण्यांच्या एक नव्हे तर पाच कॅसेटचा अल्बम होता. बाबांना हाच अल्बम हवा होता, त्या कॅसेटवरील तिरकी टोपी व तलवार मिशीवाल्या सैगलकडे बघून खुश होऊन बाबा म्हणाले. त्या दाढीवाल्या विक्रेत्याच्या चेहऱ्यावरील खुशी बघून मला वाटले, त्या लाकुडतोड्याच्या गोष्टीतील देवासारखा हा दाढीवालापण बाबांना आधी दाखवलेले दोन्हीही अल्बम फुकट देऊन टाकेल,परंतु तसे काही झाले नाही.बाबांनी पैसे विचारले. एका कॅसेटचे १८ रुपये. सगळ्या हव्यात का? दाढिवाल्याने विचारले. १८ रुपये? इतके कमी कसे ? बाबांनी आश्चर्याने विचारले. गेली बारा ते तेरा वर्ष ह्या कॅसेट माझ्याकडे पडून आहेत एकाही गिर्हाइकाने ह्या कॅसेटची विचारणा केली नाही, तुम्ही पहिले आहात विचारणा करणारे. (कॅसेट १९८४ ची होती.) बाबांनी पाचही कॅसेट खरेदी केल्या. बाबांचा व त्या दाढीवाल्या विक्रेत्याचा चेहरा खुशीने फुलला होता.

बाबांचे काम आटोपले होते. बाबा खुशीत रमत गमत फुटपाथावर खरेदी करत होते. स्वतःकरता जुनी मासिके,पुस्तके कि-चेन विकत घेतली. माझ्या बहिणींना पेन व सेंटची बाटली घेतली. माझ्यासाठी सेलवर चालणारी गाडी घेतली. शेवटी कॅनॉनची पावभाजी खावून ठाण्याची लोकल पकडली.

प्रत्येकाला काहितरी वस्तू आणल्यामुळे घरातले सगळे खुश होते. माझ्यासाठी काय आणले? आईने विचारले. आणलय की, पहिले चहा कर मग दाखवतो. आईला सर्व प्रकारच्या संगीताची आवड असल्यामुळे घरात नाट्यसंगीत, जुन्या नव्या हिंदी व मराठी चित्रपटगीतांच्या भरपूर कॅसेट होत्या. किचनमध्ये एक छोटा FM रेडिओ होता, ज्यावर आई स्वयंपाक करताना गाणी ऐकायची. जितुराज हा तिचा आवडता आर.जे. होता. आई किचनमध्ये चहा ठेवायला गेली, बाबांनी बॅगेतून कॅसेट काढल्या व बेडरुममधील टेपमध्ये यातील एक कॅसेट टाकली. शोधून बाबांनी 'ते' गाणे लावले. सैगल गाऊ लागला .. एक बंगला बने न्यारा.... आई किचनमधून कडाडली... पहिले ते गाणे बंद करा. अग तुला जुनी गाणी आवडतात म्हणून तुझ्यासाठी हे सरप्राईज आणले, बाबा गांगरून म्हणाले. आईच्या चिडण्याचे नेमके कारण ना आम्हा भावंडांना कळले ना बाबांना कळले. त्यदिवसापासून ना आईने कधी 'त्या' कॅसेट लावल्या ना बाबांना कधी लावून दिल्या आणि न लावण्याचे कारणही सांगितले नाही.

एवढी शोधाशोध, पायपीट करून मिळवलेल्या कॅसेट बाबांना ऐकायला मिळत नव्हत्या. बाबांनी त्यावर तोडगा काढला. बाजारातून एक हेडफोन आणला व टेपच्या बाजूला बसून सैगल ऐकू लागले. एके दिवशी सैगलचे 'मै क्या जाणू क्या जादू है ... इन दो मतवाले नैनो मै क्या जादू है' हे गाणे गुणगुणत बाबा आईला चिडवण्यासाठी किचनमध्ये गेले ,परंतु हे गाणे ऐकून आई गालातल्या गालात हसली ते पाहून बाबांची भीड चेपली व त्यांनी 'एक बंगला बने न्यारा' हे गाणे म्हणायला सुरवात केली, आईने गरकन मागे वळून बाबांकडे डोळे वटारून बघितले... आणि बाबांनी, 'दो नैना मतवारे तिहारे, हम पर जुल्म करे ... हे गाणे म्हणत किचनमधून पळ काढला.

आज सकाळी लवकर उठून आईची लगबग चालू होती.माझ्या थोरल्या बहिणी तिला पूजेच्या तयारीसाठी मदत करत होत्या. भरजरी शालू व केसात गजरा घालून आई तयार होती. बहिणींच्या सासरच्या कोणालाही आमंत्रण दिले नव्हते.अगदी घरगुती कार्यक्रम होता, आजीआजोबा आईबाबा व आम्ही तीन बहिण भावंडे एवढेच. भाड्याची गाडी करून आम्ही सर्वजण बाबांनी बांधलेल्या नवीन बंगल्याकडे निघालो. घरातील पुरुषवर्गाचा वास्तुशांतीसारख्या गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे आजी,आई व माझ्या बहिणी गृहप्रवेशाचे सगळे कार्यक्रम पार पाडत होत्या. बाबा व मी घरातील पाण्याच्या टाकीपासून नळापर्यंत सगळे ठिकठाक आहे कि नाही ह्याची खात्री करून घेत होतो.

किचनमध्येच आईसाठी एक छोटेसे देवघर बनवले होते. बाजुलाच शेगडीवर आईने एका छोट्या भांड्यात दुध गरम करायला ठेवले होत ,दुध उतू जावू दिले. बहिणीच्या एका मैत्रिणीने मोबाईलवरून पूजा सांगितली. सगळे आईच्या मनासारखे झाले होते. सर्वांना प्रसाद वाटला. आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो होतो परंतु आई अधूनमधून किचनमध्ये जायची. ती तेथे जावून काय करते हे बघायला आम्ही गेलो, तर आई डोळे मिटून देवासमोर हात जोडून शांतपणे उभी होती. बाबांनी आम्हाला खुणेनेच शांत रहायला सांगितले व स्वतः वरच्या मजल्यावर जायला निघाले व मोठ्याने गाऊ लागलॆ...'एक बंगला बने न्यारा...... आई ताडकन किचन मधून बाहेर आली, आम्ही घाबरून मागे सरकलो, जुन्या सिनेमातील नायिकांप्रमाणे दरवाजाच्या चौकटीला धरून आई गाऊ लागली... प्रेम नगर मै बनाऊंगी घर में .... प्रेम का आंगन, प्रेम कि छत और प्रेम के होंगे द्वार ... बाबांनी डोक्यावरचे चार केस मागे सारत जिन्यातून मागे वळून बघत... सच हुए सपने तेरे, झूम ले ओ मन मेरे.... हे आईचे आवडते गाणे गायला सुरुवात केली, आणि आईसकट आम्ही सगळ्यांनी 'एका बंगला बना न्यारा' हे गाणे म्हणून खर्‍या अर्थाने 'वास्तुशांती' केली..

मौजमजालेख

प्रतिक्रिया

एस's picture

2 Sep 2015 - 8:19 pm | एस

:-)

मस्त. नवीन बंगल्याच्या/घराच्या शुभेच्छा!

मांत्रिक's picture

2 Sep 2015 - 8:25 pm | मांत्रिक

छान! नवीन घराच्या शुभेच्छा!

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2015 - 9:27 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिले आहे :)
नवीन घराच्या शुभेच्छा !!

आम्ही सगळ्यांनी 'एका बंगला बना न्यारा' हे गाणे म्हणून खर्‍या अर्थाने 'वास्तुशांती' केली..
मस्त
नविन वास्तुच्या 'न्यार्‍या आणि प्यार्‍या'शुभेछा!

आम्ही सगळ्यांनी 'एका बंगला बना न्यारा' हे गाणे म्हणून खर्‍या अर्थाने 'वास्तुशांती' केली..
मस्त
नविन वास्तुच्या 'न्यार्‍या आणि प्यार्‍या'शुभेछा!

बहुगुणी's picture

2 Sep 2015 - 11:59 pm | बहुगुणी

वास्तूसौख्यासाठी शुभेच्छ!!

रेवती's picture

3 Sep 2015 - 12:51 am | रेवती

छान लिहिलय.

चित्रगुप्त's picture

3 Sep 2015 - 3:49 am | चित्रगुप्त

व्वा. छानच. अतिशय भावपूर्ण लेख. नवीन बंगल्याचा फोटो पण द्या.
आता पुढले काही दिवस सैगलची गाणी ऐकणे आले. बरी आठवण करून दिलीस मित्रा.
.

स्रुजा's picture

3 Sep 2015 - 3:52 am | स्रुजा

:) खुप छान लिहिलंय.

यशोधरा's picture

3 Sep 2015 - 3:53 am | यशोधरा

मस्त लिहिले आहे. :)

मैं

क्या जानू क्या जादू है ... इन दो मतवाले नैनोंमें.. जादू है

सुंदर गाणे आहे हे. लई आवडते आणि बाबुल मोराचा आर्त स्वर कोण विसरेल?

अनुप ढेरे's picture

3 Sep 2015 - 10:03 am | अनुप ढेरे

छान लिहिलय!

अदि's picture

3 Sep 2015 - 10:19 am | अदि

गोड!!

भिंगरी's picture

3 Sep 2015 - 10:28 am | भिंगरी

सैगलचा अलार्म
पुर्वी रेडीओवर (विविध भारती) सकाळी ७.३० ते ८.०० जुनी गाणी लागत असत.(आताही लागत असतील पण आता रेडीओ ऐकणे होत नाही)त्यात ७.५५ ला शेवटचे गाणे सैगल यांचे असे.माझ्या छोट्या बहीणीची शाळेची गाडी ८.०० वाजता येत असे सैगलचे गाणे लागले की आम्ही तिला घाई करत असू आता सैगल लागला,गाडीची वेळ झाली. नंतर तीही अनुभवाने सैगल लागला की दप्तर घेऊन बाहेर पडत असे.
सैगलच्या गाण्याचा आम्ही अलार्म म्हणून उपयोग करायचो.

खेडूत's picture

3 Sep 2015 - 11:06 am | खेडूत

आवडले...

आता रेडिओ सिलोन ऐकतो...!

कंजूस's picture

3 Sep 2015 - 11:17 am | कंजूस

वावावा!

अमृत's picture

3 Sep 2015 - 11:20 am | अमृत

आम्ही घर बांधल्याच्या व वडीलांच्या आठवणी दाटुन आल्या.

चांदणे संदीप's picture

3 Sep 2015 - 11:50 am | चांदणे संदीप

इथे थांबून आवर्जून प्रतिसाद द्यावा वाटला असा सुंदर लेख!

स्वत:च नवीन घर असे सुंदर क्षण घेऊन येते, ज्यांची शिदोरी आयुष्यभर पुरते! आणि अशा क्षणांत एक कुटुंब छान संगीतमय होऊन जाते हे दृश्यही मनाला फारच भावविभोर करणारे आहे!

नवीन घर तुमच्या आयुष्यात असे क्षण भरभरून आणो ही सदिच्छा!

नवीन घर ताब्यात मिळायच्या प्रतीक्षेत असलेला
Sandy

जे.पी.मॉर्गन's picture

3 Sep 2015 - 11:55 am | जे.पी.मॉर्गन

आहाहा.... क्या बात है! एखाद्या गाण्याच्या ओळी कधी कधी आयुष्यातले काही क्षण अविस्मरणीय करून जातात - त्यातलाच हा एक.

मस्त वाटलं वाचून!

जे.पी.

मितान's picture

3 Sep 2015 - 11:57 am | मितान

सुंदर लेखन !!

नीलमोहर's picture

3 Sep 2015 - 1:15 pm | नीलमोहर

छान लिहिलेत,

प्यारे१'s picture

3 Sep 2015 - 1:28 pm | प्यारे१

सुंदर नि मार्मिक लिहिलंय ओ मार्मिकराव!

नाखु's picture

3 Sep 2015 - 1:45 pm | नाखु

लेख आणि आल्हाददायी.

नवीन घराचे हसरे खेळते गोकुळ होवो हीच शुभेच्छा !!!

नाव आडनाव's picture

3 Sep 2015 - 2:03 pm | नाव आडनाव

:) भारी.

मृत्युन्जय's picture

3 Sep 2015 - 3:03 pm | मृत्युन्जय

नविन घरासाठी अभिनंदन

घटना यांची अविस्मरणीय गाठ बसून जाते. नवीन घराच्या शुभेच्छा...

अभ्या..'s picture

3 Sep 2015 - 5:55 pm | अभ्या..

सुरेख लिहिलय. आवडले
असे एखादे गाणे आयुष्याला कसे जुळून जाते सांगता येत नाही.
अप्रतिम.

चित्रगुप्त's picture

3 Sep 2015 - 5:57 pm | चित्रगुप्त

@ मार्मिकः तुम्ही वडिलांबरोबर जाऊन सैगलच्या कॅसेटी आणल्या, तो प्रसंग आणि नवीन घराची वास्तुशांत यात, आणि त्यानंतर हा लेख लिहिला यात ... मधे किती किती वर्षे प्रत्येकी गेली, याचा काही अंदाज लागत नाही लेखावरून. जरा सांगाल का? सहज कुतुहल म्हणून विचारतोय.

बोका-ए-आझम's picture

4 Sep 2015 - 1:05 am | बोका-ए-आझम

हा चमत्कार होता. रफी, किशोर,मुकेश, तलत - सगळे सैगलसाहेबांच्या प्रभावाखाली होते. अजूनही सैगलचे दिवाने आहेत आणि त्यांच्या गृहप्रवेशासारखे सोहळे सैगलच्या आवाजाने साजरे होत आहेत हे छानच. लेख आवडला.

मार्मिक गोडसे's picture

5 Sep 2015 - 11:40 am | मार्मिक गोडसे

प्रथम सर्वांचे वास्तूसौख्यासाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

@चित्रगुप्त,
कॅसेट्स अंदाजे ९७-९८ साली खरेदी केल्या.
गृहप्रवेश जुन २०१४

बंगल्याला अद्याप बाहेरुन रंग दिलेला नाही, रंग देण्यापुर्वी बंगल्याचा फोटो मिपावर टाकुन मिपाकरांच्या पसंतीची रंगछटा देण्याचा विचार आहे.

तुर्तास आमच्या बंगल्याच्या 'वास्तुपुरुषाचा' फोटो देतो.
.

पद्मावति's picture

5 Sep 2015 - 11:07 pm | पद्मावति

मस्तं लिहिलय. खूप गोड आठवण.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2015 - 10:36 am | अनिरुद्ध.वैद्य

मस्त लिहिलेय :) असे गाणे प्रत्येक प्रसंगासाठी असतेच!!

ऋतुराज चित्रे's picture

11 Sep 2015 - 12:24 pm | ऋतुराज चित्रे

सैगलचा असा अल्बम येउन गेला हे मला माहितच नव्हते. ८० च्या दशकात एखाद्या गायकाचे किंवा कलाकारचे अल्बम बाजारत येत असत. मित्रांकडून असे अल्बम घेउन त्यातील आवडती गाणी निवडुन एका ब्लँक कॅसेटमध्ये (टिडिके/सोनी) ठाण्यातील 'सिंफोनी'त रेकॉर्ड करून घ्यायचो. सैगलची गाणी एकाही मित्राकडे नसल्यामुळे सैगलच्या गाण्यांचा असा एकत्रित संग्रह करता आला नाही.काळाच्या ओघात विसरुनही गेलो. आता एका क्लिक्वर हवे ते गाणे ऐकता येते. लेखाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

लेख उत्तम जमलाय. सैगलचा अल्बम छान जपलाय. तुमच्या बंगल्याच्या 'वास्तुपुरुषाचा' कल्पक फोटो आवडला.

नवीन घरासाठी शुभेच्छा.

सैगल : http://indiamp3.com/music/index.php?action=song&id=46159

पैसा's picture

11 Sep 2015 - 4:48 pm | पैसा

खूपच छान! बंगला झाला की मस्तपैकी! रंग वगैरे होईल हळूहळू!