इतुकेच तूप घेताना वरणावर कळले होते
`अन्ना'ने केली सुटका, `अण्णा'ने छळले होते!
ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही
मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते
मेलेल्या आयुष्याचा त्रास गडे विसरूया
(पाऊल कधी वासाने `मेशी'कडे वळले होते?)
मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली
मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते
याचेच रडू आले की जमले न मला हसणेही
मी रंग त्याच्या कन्येसह कितीक उधळले होते!
नुकतीच त्या स्मरणांची जखम भळभळा वाहिली
दिसभर मग त्या विचारांनी पोट ढवळले होते
घर माझे शोधाया `ब्युरो'त वणवण केली
जे `फोन' मिळाले ते केव्हाच केले होते
एकटाच त्या रात्री बकाबका जेवत होतो
`मधू'सह आकाशात कितीक `चंद्र' उजळले होते!!
- अभिजित.
------------
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया
(पाऊल कधी वार्याने माघारी वळले होते?)
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी तीच कहाणी..
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते
याचेच रडू आले की, जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते
घर माझे शोधाया मी वार्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
- सुरेश भट
प्रतिक्रिया
11 Dec 2008 - 2:57 pm | दत्ता काळे
मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली
मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते
मस्त रे !
11 Dec 2008 - 3:05 pm | वेताळ
ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही
मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते
खरच मला खाणावळीत जेवल्यासारखे वाटतय. पण आमच्या अण्णाला कन्या न्हवती राव. तुमचे त्याबद्दल नशिब चांगल दिसतय.
वेताळ
11 Dec 2008 - 6:01 pm | अनंत छंदी
आवडले!!!,आवडले!!,आवडले!!!
11 Dec 2008 - 6:03 pm | सुनील
कल्पना चांगली आहे पण वारंवार यतिभंग होत आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Dec 2008 - 11:21 pm | आपला अभिजित
`यतिभंग' ही काय भानगड?
मला त्यातले काही कळत नाही. एखाद्या कवितेची छान वाट लावण्याजोगे शब्द सुचले, की लिहितो. नियम बियम झेपत नाहीत मला.