प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .
वरकी = बटर
डबरा= खड्डा
डोस्क = डोके
इस्कुट = खेळ खंडोबा
बाउ = मटण
वज्ज = ओझे
शिप्पारस = शहाणपणा
गबस = गप्प बस
लांबड = साप
कानुला = करंजी
आदुगर = आधी
आडग = वेडा
निवद = नैवैद्य
गुलमाट = गोड
हाणबडिव = मार
धाम्पी = फांदी
शिस्तात = हळु
कड कडन सुट = परत जा
बारडी =बादली
दाम्ब = खांब
गुडघ्यात मेंदू = अर्धवट
रिक्स = रिस्क
काय टाटाय लागलैस = माज दाखवायला लागला आहेस
लज्गरि = आराम बस
ताम्यातु = टोमेटो
हरकने = आनंदी होणे
हरकुन टूम = खूप आनंदात
टक्कुर = डोके
साळूता = झाडू
वळक बगु = ओळख पाहु
डोस्क्यात यीना = आठवत नाही
घुमीव = फिरव
रगात = रक्त
गप गार = अगदी शांत
लय रागु वानी बोलू नगस = जास्त मस्का मारू नकोस
बुंडू कला = अगदी छोटा
हेंगाड = वेडपट
भसका =भगदाड
हुडक = शोध
सावधगिरीची सूचना : काही शंका असल्यास ब्याट मन साहेब परस्पर उत्तर देतील .
मी मिपा वरील सगळे धागे वाचलेले नसल्यामुळे जर पुनरावृत्ती झाली असेल तर आधीच क्षमस्व . आणि टंकायला जी मेल वापरली असल्याने काही चुका असतील तर समजून घ्या .
प्रतिक्रिया
28 Aug 2015 - 3:38 pm | गॅरी ट्रुमन
या लीस्टमधले बरेचसे शब्द वाचून मी सांगलीमध्येच ५ वर्षे होतो की अन्य ठिकाणी असे वाटायला लागले आहे. हे सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले शब्द का?तसे असल्यास माहित नाही.
मी सांगलीत बघितलेले काही खास शब्द (माझ्यासारख्या मुळातल्या ठाणेकराला सुरवातीला हे शब्द जड गेले होते):
१. मापं काढणं : थट्टा उडविणे
२. उप्पीठः उपमा. उपम्याला उप्पीठ पश्चिम महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी म्हणतात
३. वठ्ठः अजिबात. एखादी गोष्ट अजिबात हलत नसेल तर म्हणणार "वठ्ठ हलत नाही"
४. थटणे: अडकणे. एखादी गोष्ट जिन्यावरून वगैरे उतरवताना वाकडी करून उतरवावी लागत असेल तर "ते तिथं थटतय बघ. जरा वाकडं कर की" असे म्हणणार
५. नारळ वाढविणे: नारळ फोडणे म्हणत नाहीत तर नारळ वाढविणे म्हणतात
६. केशवः एखाद्या मनुष्याला तो बावळट आहे असे म्हणायचे असेल तर म्हणणार--"काय केशव आहे बघा"
सांगलीत बघितलेली एक कातिल अदा म्हणजे सर्व वाक्य ही कायम "कन्टिन्युअस टेन्स" मध्ये बोलाली जातात. म्हणजे "असे काय करतोस" असे विचारणार नाहीत तर "असं काय करायला लागलास" असे विचारणार. यालाच विदर्भात "असं काय करून राहिला" असे विचारतात. आणि दुसरे म्हणजे सांगलीत मुंबईला "मुंबई" असे बहुदा म्हटले जात नाही.मराठी माणसेही मुंबईला बहुतांश वेळा "बॉम्बे"च म्हणतात.
जसे आणखी लक्षात येईल तसे लिहितोच.
28 Aug 2015 - 3:54 pm | विशाखा राऊत
उपमा आणि उप्पीठ वेगवेगळे असते
28 Aug 2015 - 4:05 pm | गॅरी ट्रुमन
पण मुंबईत ज्याला उपमा म्हणतात त्यालाच उप्पीठ असे म्हणताना बघितले आहे. अर्थात ही माहिती चुकीची असू शकेल. खाण्यापिण्यातले मला फारसे कळत नाही. अनेकदा एकच भाजी मी वेगवेगळ्या नावांनी खाल्लेली आहे आणि अनेक वेगवेगळ्या भाज्याही एकाच नावाने खाल्लेल्या आहेत.शेवटी नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणून गेलाच आहे :)
28 Aug 2015 - 4:09 pm | मांत्रिक
उपमा व उप्पीट दोन्ही एकच!
28 Aug 2015 - 4:15 pm | काळा पहाड
उप्पीट पिवळं असतं. उपमा पांढराफेक असतो.
28 Aug 2015 - 4:19 pm | प्यारे१
एवढाच फरक आहे काय?
28 Aug 2015 - 4:50 pm | नाखु
ज्याने अस्सल दाक्षीणात्य मठात / किंवा उडप्याकडे उपमा खाल्ला आहे त्याला नेमका फरक कळेल.
अगदी दोन्हीतील मूलभूत आधार घटक एकच असले तरी (उदा रवा,मिरची,शेंगदाणे,डाळ किंवा डाळं)
उप्पीट बर्याचदा जाडसर रव्याचे असते आणि बहुतांश कोर्डे ठक्क असते. चू भू दे घे.
पाककला निपुण यावर प्रकाश टाकतीलच तो पर्यंत ऐकू या.
सांजधाराप्रेक्षक नाखु
28 Aug 2015 - 4:54 pm | प्यारे१
ओक्के. म्हणजे उडप्याच्या हाटीलात असतो त्यों उपमा आनि घरच्या गंगीनं बनिवलेलं उप्पीट. ज़रा खरपूड वाड गं!
28 Aug 2015 - 8:00 pm | काळा पहाड
उपमा हा प्रकार थोडा जास्त लिबलिबीत असतो आणि शेवेशिवाय खाववला जात नाही.
28 Aug 2015 - 3:55 pm | वडाप
माम्लेदाराच्या पन्ख्याला इचारलं का? कावतील ते.
28 Aug 2015 - 4:03 pm | बॅटमॅन
वडाप हा शब्द वापरूनही लै दिवस झाले. _/\_
(अंमळ हळवा) बॅटमॅन.
31 Aug 2015 - 11:07 am | माम्लेदारचा पन्खा
बोला.....
28 Aug 2015 - 4:02 pm | बॅटमॅन
बहुतेक शब्द ऐकून माहिती आहेत, कोल्हापूरकडेही थोड्याफार फरकाने हेच शब्द वापरले जातात. पण हे ग्रामीण भागात जास्त. सांगली किंवा मिरज शहरात हे तितक्या फ्रीक्वेंटलि कानावर पडत नाहीत.
झालंच तर सिक्ससीटरला वडाप म्हणतात हे राहिलं. :)
बाकी ट्रूमन साहेबांच्या लिष्टीतली एक बारीक चूक म्हणजे वठ्ठ नसून वट्ट म्हणतात. बाकी तटण्याला थटणे हा तर अगदी काळजाला भिडणारा प्रयोग.
"त्यामुळे", देअरफोर , इ. म्हणायचे असेल तर "म्हणताना मग" हा एक शब्दप्रयोग कायम केला जातो, उदा.
"काल सुट्टी म्हणताना मग घरीच बसलो", इ.इ.
शिवाय खास मिरजेकडील मुसलमान बांधवांची भाषा तर एकदमच खास आहे. खुद्द पुलंनी म्हटल्याप्रमाणे मिरज आणि सावंतवाडी येथील उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि प्राण सोडला. =))
(मिरजकर) बॅटमॅन.
28 Aug 2015 - 4:12 pm | गॅरी ट्रुमन
तेच वाटलं होतं. दिलेल्यापैकी एकही शब्द माझ्या परिचयाचा नव्हता.
हो बरोबर. वट्ट!!
हो सहा आसनी रिक्षाला वडाप म्हणतात. पुण्यातही वडापच म्हणतात. मी सांगलीत असताना सहा आसनी रिक्षाला "षडासनी" म्हणायचो :)
28 Aug 2015 - 4:19 pm | बॅटमॅन
एकही शब्द परिचयाचा नव्हता? मग ते सर्कलवर अवलंबून असेल. बाकी गुढग्यात (असाच उच्चार असतो) मेंदू, साळोता, हुडकणे, भसका हे मात्र अगदी रेग्युलरली ऐकलेत. काही शब्द कोल्हापुरिझम्स असावेत, उदा. बादलीला बारडी म्हणणे. कोल्हापुरिझमचे अजूनेक उदा. म्हणजे चिमटा काढण्यासाठीचा "कोचणे" हा शब्द.
28 Aug 2015 - 4:48 pm | गॅरी ट्रुमन
हो बरोबर. माझ्या सांगलीत झालेल्या मित्रांपैकी बहुतांश मुळातले सांगलीतले नव्हते.ते केवळ कॉलेजपुरते सांगलीत आलेले होते.
गुडघ्यात मेंदू असणे हे मुंबईतही वापरतात.पण गुढघ्यात नाही :) साळोता, भसका हे शब्द पहिल्यांदाच ऐकत आहे. म्हणजे काय?
शोधण्याला हुडकणे म्हटलेले ऐकले आहे. आणखी एक म्हणजे खिळ्याला मोळा म्हणतात.सगळ्यात पहिल्यांदा मोळा हा शब्द ऐकल्यानंतर ते नक्की काय असेल हे समजायला थोडा वेळच गेला होता.
28 Aug 2015 - 5:26 pm | बॅटमॅन
वर दिलेय ना. साळुता/साळोता = छोटा मिनीसाईझ झाडू.
भसका = भगदाड.
बाकी मोळा हा शब्द युनिव्हर्सली वापरत असावेसे वाटायचे, नंतर लक्षात आले की ते तसे नाही. :)
30 Aug 2015 - 11:30 am | प्रदीप
हे मुंबईतही वापरतात.---अगदी पूर्वापार!
ब्रेबॉर्नवर अथवा वानखेडेवर मुंबई- दिल्ली रणजी सामन्यात मदनलाल बॉलींगला आला, की मुंबईकर हेच म्हणत ह्याची आठवण झाली.
28 Aug 2015 - 4:09 pm | पगला गजोधर
नळाला 'चावी' असं म्हणतात.
उदा. चावीला पानी आलाय का बग ।
28 Aug 2015 - 4:24 pm | पगला गजोधर
उदा. दुपार्धार्ण लैन नै
28 Aug 2015 - 4:09 pm | प्यारे१
काकडी आणि त्यापेक्षा लांब असलेल्या एका प्रकाराला वाळकं.
नवऱ्याला मालक बहुतेक ठिकाणी म्हणतात.
काय करायला लागलास पेक्षा काय करायलायस.
बाकी वाक्य फाष्टात बोलत पूर्ण उच्चार न करणे आणि इंग्रजी शब्दांमधले सायलेंट शेवट स्पष्ट बोलणे हे सुद्धा सांगली कोल्हापुरकरांचं वैशिष्ट्य.
28 Aug 2015 - 4:14 pm | मांत्रिक
वाळुक हा शब्द मला वाटतं संस्कृत ऊर्वारुक या शब्दावरून आला असावा. ऊर्वारुकमिव बन्धनात् मृत्योऽर्मुक्षीय मामृतात् हा मृत्युंजय मंत्राचा उत्तरार्ध.
28 Aug 2015 - 4:11 pm | पगला गजोधर
समोरच्याला 'ल्येका' 'मर्दा' असेही म्हणतात बोलताना…
'उन्डगीच्या' ही शिवीही तिथलीच …
28 Aug 2015 - 4:14 pm | बॅटमॅन
उं/हुंडगे/गा हिंडणे हा वाक्प्रचारही आमच्याकडचाच.
28 Aug 2015 - 4:18 pm | पगला गजोधर
चल आता दुपारच्या येळला देवल जवळच्या शिवाप्पा कडचा चा पेणार काय, माझ्यासंग ?
28 Aug 2015 - 4:22 pm | बॅटमॅन
आहाहाहा....देवल आणि शिवशंकर ही मिरजेतली "ष्ट्यांडर्ड" थेटरे. त्याजवळच्या शिवाप्पात क्वचितच गेलोय - पण थेट्रांची आठवणच न्यारी. पायरेट्स, द ममी, अॅनाकोंडा पासून ते सोल्जर, डीटीपीएच, डीडीएलजे, हम आपके है कौन इ. समस्त पिच्चर तिथेच पाहिले. टायटॅनिक तेवढा शिवशंकरला पाहिला. लय मज्जा राव.
(२५ रु. चे तिकीट कोणे एके काळी लै वाटणारा) बॅटमॅन.
28 Aug 2015 - 4:36 pm | पगला गजोधर
अमर ला नै पाहिलं का काही ? ते पण "ष्ट्यांडर्ड" आहे.
(आशा, नँशनल माहिती नसलेला पग़. )
28 Aug 2015 - 4:39 pm | बॅटमॅन
हो पाहिलंय ना, एखाददुसरा बाँडपट पाहिल्याचे स्मरते. ते सोडून मग मंगल टॉकीजलाही सन्नीदेओलचा जीत नामक पिच्चर पाहिलाय. माधव आणि आशा तेवढे राहिले. :(
अमर थेटरवरून अमरखड्ड्याची आठवण झाली. नावाला जरी छत्रपती शिवाजी स्टेडियम असले तरी समस्त जन्ता अमरखड्डा म्हणूनच ओळखते. ते उल्का पडून तयार झाले अशी दंतकथा काही काळ भलतीच मशहूर होती.
30 Aug 2015 - 2:32 pm | अभ्या..
म्या आशामधी पाह्यलाय पिच्चर. घराच्या मागेच होते. माधव राह्यले. सांगलीत फक्त प्रतापला एक पिच्चर पाह्यल्याचे आठवते. वर्गात एक ईच्चलकरंजीचा नग होता. त्याच्याकडून "मर्दा आमच्यात कसल्या मोठ्या टाक्या असतेत, एसी टाक्या असतेत" असे डॉयलॉग एकल्यावर टाकी म्हण्जे थेटर हे पहिल्यांदा लक्षातच आले नव्हते. शिवाय मूव्ही टायटलला 'पाट्या पडणे' हा खास शब्द.
सांगलीच्या भाषेची मज्जा शब्दात नाही तर जो हेल अथवा टोन आहे त्यात जास्त. कोल्हापूरापेक्षा बराच मृदू आणि प्रेमळ असा आहे तो टोन.
अस्सल सांगलीकर दर दोन वाक्या मध्ये 'मग, आणि काय विशेष' असे विचारणारच.
आपण काही सांगताना प्रश्नार्थक "व्हय" असा कॅटालिस्ट येणारच.
मिरजेत त्यातल्या त्यात ब्राह्मणपुरीत ५ वर्शे काढल्याने मिरजस्थित नातेवईकांची बोलताना अजून तोंडात तीच भाषा अन टोन येतो.
31 Aug 2015 - 3:00 am | बॅटमॅन
हाण्ण्ण तेजायला. जबरीच!
28 Aug 2015 - 4:16 pm | प्यारे१
रांडंच्या पण सांगलीत वापरतात. रांडया ही वेगळी शिवी. हे शब्द वापरण्याचं पथ्य म्हणजे नेहमीच्या बोलण्यात कितीही वापरा नो प्रॉब्लेम पण 'भांडताना वापरलास ना तं टक्कुरंच फोडिन सांगायलोय बग्ग.'
29 Aug 2015 - 2:10 pm | सस्नेह
यापेक्षा जरा प्रेमळ हाक म्हणजे 'सुक्काळीच्या !'
28 Aug 2015 - 4:15 pm | आदूबाळ
बाउ म्हणजे मटण??
बाकी माझ्या एका सांगली/मिरज/जयसिंगपुरकर मित्राच्या तोंडचे शब्दः
- उभारलायस
- हुडकतो
- तरपट (म्हणजे सामान्यतः "तिरपीट" जवळचा अर्थ, पण कारक अर्थानेही वापरला जातो. उदा० "भारी तरपटवलं राव त्या पेपरने")
हा आणि एक चिपलूनचा पोरगा घट्ट मित्र होते. त्यांचं संभाषण ऐकून आमची बोली फारच कोरडी वाटायला लागायची.
28 Aug 2015 - 4:20 pm | बॅटमॅन
तरपट हा शब्द तितका कधी ऐकलाच नाय. तुलनेने तराट/तर्राट हा ऐकलाय, अर्थ आहे "जोरात पळत सुटणे". उदा. आम्ही तिथून तराट पळत सुटलो.
28 Aug 2015 - 5:44 pm | आदूबाळ
हो तर्राट तर होताच.
आणखी म्हणजे उच्चारांची / बोलताना विशिष्ट अक्षरांवर दाब द्यायची पद्धत.
उदा० मिरजंला, जैसिंग्पुरात.
(हे प्रांतीय वैशिष्ट्य असतंच. एक नगरचा मित्र "आमच्या अह्म्म्दनगरला..." असं ठसक्यात म्हणतो. म्हणजे अ, ह, दोन म आणि द यांचं एकत्र जोडाक्षर.)
28 Aug 2015 - 5:49 pm | गॅरी ट्रुमन
मिरजला नाही-- मिरजेत :)
28 Aug 2015 - 5:52 pm | बॅटमॅन
मिरजला आणि मिरजंला हे दोन्हीही एकच नव्हे ओ क्लिंटनसायेब. अंमळ इच्यार करा. :)
28 Aug 2015 - 6:00 pm | गॅरी ट्रुमन
:)
28 Aug 2015 - 4:37 pm | कहर
किउंड्या = बहिरा
आंबा पाडणे = एखाद्याकडून पार्टी उकळणे
सांच्याला = संध्याकाळी
लय / लई = खूप / भरपूर
नुस्कान = नुकसान
पेशल = स्पेशल
मायंदाळ = भरपूर
आणि आठवून टाकतो
हो रश्यातल्या मटणाच्या तुकड्यांना गरे/ गरं हा शब्द विशेष लक्षात राहिलेला
28 Aug 2015 - 4:40 pm | बॅटमॅन
किउंड्या हा शब्द लै दिवसांनी ऐकला. धन्यवाद. बाकी आंबा पाडणे हा कोल्हापुरिझम जास्त आहे असे वाटते.
29 Aug 2015 - 3:06 pm | एक सामान्य मानव
आम्बे पाडणे = टाइमपास / फालतू गप्पा मारणे ...
मिरजेत १ वर्श (सहावित विद्या मन्दिर प्रशाला) व सान्गलित नन्तर बी.इ. होइपर्यन्त (१९९७) होतो...
28 Aug 2015 - 4:54 pm | मराठी_माणूस
कोल्हापुर मधे ऐकलेले काही शब्द
येशेल->गोड तेल
शाळु->ज्वारी
धाभार (दहा भार)-> १०० ग्रॅम (१ किलोचा दहाव्वा भाग)
28 Aug 2015 - 5:01 pm | कहर
छटाक हा वजनाच्या प्रमाणासाठी पावारला जाणारा शब्द. अधिक आठवत नाही
28 Aug 2015 - 5:05 pm | प्यारे१
कोळवं,चिपटं, मापटं, पायली (पाच किलो- दळण न्यायला आणायला जायचो त्यामुळं ठाऊक), अधुली, शेर,मण असली काही मापं आठवतात.
3 Sep 2015 - 11:17 am | तुषार काळभोर
५० ग्रॅम
9 Mar 2018 - 6:10 am | चामुंडराय
अर्धा, पाव, आद-पाव, छटाक ....
या निमित्ताने आमचा वाणी छटाक म्हणजे ५० ग्रॅम देऊन किलोच्या एक सोळांश (१/१६) पैसे घेत असे ते आठवले.
9 Mar 2018 - 1:14 am | सतिश म्हेत्रे
इचलकरंजी मध्ये
28 Aug 2015 - 5:37 pm | दा विन्ची
च्यायला धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक.
जन्मापासून सांगलीत राहून एक हि चित्रपट मिरजेत पहिला नाही . माझ्या दृष्टीने त्यावेळी दर्गा, मिशन दवाखाना, किल्ला आणि ब्राम्हणपुरी एवढेच मिरज होते. वालचंद मधील जनता पण बहुतेक ब्राम्हणपुरीतीलच असायची. आम्ही बहुधा मिरजेला जर कमीच समजायचो. अर्थात डोमिसाईल साठी मिरजेशिवाय पर्याय न्हवता .
अवांतर : सांगली मिरजेशी संबंधित मंडळी कोण कोण आहेत ?
28 Aug 2015 - 5:50 pm | बॅटमॅन
आम्हीही जन्मापासून मिरजेत राहून एक हि चित्रपट सांगलीत पहिला नाही त्या मल्टिप्लेक्स थेट्राअगोदर.
बाकी आयर्विन पुलानंतर हळू हळू इतरही काही कारणांमुळे सांगलीचा उत्कर्ष होत गेला आणि मिरज मागे पडले. नायतर शिलाहार काळापासून उल्लेख सापडतो तो मिरजेचाच. सांगलीचा शिवपूर्वकालीन उल्लेख माझ्या पाहण्यात नाही, जरा पाहिले पाहिजे.
28 Aug 2015 - 7:51 pm | काळा पहाड
माझ्या पहाण्यात मिरज फक्त दोन वेळा वापरात यायची: वेड्याचं इस्पितळ आणि लग्न मुंजीसाठी मंगल कार्यालयं. दोन्ही मध्ये फार फरक नसतोच म्हणा.
29 Aug 2015 - 1:41 pm | अनंत छंदी
:))
28 Aug 2015 - 5:51 pm | प्यारे१
पेठ नाक्यावरनं डावीकडं वळलं की सांगलीचं वारं जाणवायला लागतं. ईस्लामपूर सांगली रस्ता तास सव्वातासाचा. आष्टा डिग्रज गेलं की सांगली जवळ आलं असं वाटतं. सांगलवाडीचं (हे असंच म्हणायचं) भारती चं कॉलेज आणि पाठोपाठ आयर्विन पूल. कृष्णा नदी, नदी म्हणून इथे दिसते. आमच्या पाचगणी वाईला कृष्णा छोटी मुलगी वाटते आणि सांगलीला ती घरातली कर्ती बाई म्हणून सर्वार्थानं ।यही झालेली दिसते. आयर्विन पुलावरून दिसणारे कृष्णेचे घाट त्या शांत आणि छान पवित्र वातावरण दाखवतात. पूल संपला की देवल स्मारक मन्दिर नि पुढे गणपती मन्दिर. अप्रतिम. सांगलीत शिरलो. मनानंच. फार छान वाटतं.
28 Aug 2015 - 5:55 pm | बॅटमॅन
यत्ता धाव्वीत अस्ताना मराठीचा चौदावा धडा होता 'सुंदर' म्हणून. सांगली संस्थानच्या सुंदर गजराज या हत्तीबद्दल. काय आवडलेला तो धडा, आहाहाहा. त्यानंतरच्या बबलू हत्तीला बघायला खूपवेळेस गेलेलो आहे सांगलीच्या देवळात. सांगलीच्या देवळाबद्दल मटा की लोक्सत्ताच्या पुरवणीत स्थल-काल नामक सदरात अरुण टिकेकर यांचे लेखन वाचलेले आहे, कसे १८११ ते १८४१ पर्यंत देवळाचे बांधकाम सुरू होते वगैरे वगैरे....
28 Aug 2015 - 6:30 pm | आदूबाळ
श्री० दा० पानवलकरांची कथा. जबरदस्त कथाकार होता तो.
28 Aug 2015 - 7:17 pm | बॅटमॅन
इंडीड! सूर्य नामक कथासंग्रह लैच जबरी आहे. त्यातही ती हवालदार बाप अन हवालदार पोराची कथा लै म्हंजे लैच उच्च आहे.
30 Aug 2015 - 8:07 am | बोका-ए-आझम
ओम पुरीचा अर्धसत्य त्याच कथेवर आधारित आहे.
29 Aug 2015 - 3:24 am | रातराणी
प्यारे१ काका घेऊन गेलात सांगलीला!
29 Aug 2015 - 1:13 pm | संजय पाटिल
मी... माझं आजोळ मिरज आहे तसेच मिरजेला विध्यामंदीर ला मी ११ वी, १२ वी केली आहे.
मिरजेत ४-५ वर्षे काढलीत. आम्ही बच्चन चा नवीन पिक्चर बघायला सयकलीने सांगलीला स्वरुप आणी त्रिमुर्ती ला जायचो
28 Aug 2015 - 5:43 pm | दा विन्ची
मारामारी = एक साधा + एक स्पेशल चहा एकत्र
जडी बुटी किंवा हळदी कुंकू म्हणजेच तंबाखू चुना
28 Aug 2015 - 6:10 pm | बोका-ए-आझम
आता अगदीच थोडं आठवतंय.हळदीला भगवती म्हणतात हे एक . पण सांगली गाव बाकी मस्त.
29 Aug 2015 - 3:07 pm | एक सामान्य मानव
हळदिला नाही टिखटाला म्हणतात..
28 Aug 2015 - 6:21 pm | सरल मान
सामान्यपणे आपण "काय मग!" असे विचारतो, पण इकडे "काय काय" असे विचारतात....
28 Aug 2015 - 6:37 pm | कपिलमुनी
तोटा/ तोटे म्हणजे फटाके
28 Aug 2015 - 6:53 pm | स्वधर्म
‘मारणे’ म्हणजे अॉफिसला वगैरे दांडी मारणे, हे सगळीकडेच वापरतात. पण सांगलीकरांचे ‘मारणे’ हे खास क्रियापद अाहे.
चहा - मारणे (पिणे)
गाडी - मारणे (चालवणे)
हवा - मारणे (सायकलीत)
रंग - मारणे
इतकंच काय, ‘अालेच जरा लघवी मारून’ असंही काॅमन अाहे.
28 Aug 2015 - 6:58 pm | कंजूस
सर्व शब्द ऐकले आहेत. मामा तासगावचा त्यामुळे माहीत झाले.बॅटमॅनची दुरुस्ती बरोबरे.काही शब्द साठ सत्तरीत नव्हते उदा मारामारी चहा.किउंड्यापेक्षा ऐकू येत नाही, केवंड्यागत काय करतोस?
कोल्हापूर सांगली /मिरज तासगाव १६ ते २२ किमी अंतर असले तरी कोल्हापुरकर ज्या पद्धतीने उच्चारतात ती ढब दुसरीकडे बहुतेक नाही.
कारण --करण, आवाज-अवाज
कोल्हापुर--कुल्लापुर, पोरवडा--पुरवडा,
घेतो---घितो, ठेवतो--ठिवतो.
मोठ्या रिक्षा,जिपांचा सुळसुळाट ९८ नंतरचा तेव्हा वडाप शब्द घुसला असावा.
राग आला की टक्कुर फोडण्याबरोबर घासच घैन होतं.
लग्न झालं नाही -माघारी { मेल्यावर याच्या नावे रडायला } कोणी नाही; माघारी कोणी आहे का?
लहान फावडं--खोरं.
कर्हाडला ?आमचे एक पौणे आहेत.भाची दिलीय तिकडे.
28 Aug 2015 - 7:56 pm | काळा पहाड
खोरं हाच खरा शब्दः "खोर्यानं पैसे ओढतो" नाही का? फावडं हा शब्द मी फार नंतर ऐकला. "साहब फावडा लाना है, पैसे दिजीए" लोकांकडून आला असावा काय?
28 Aug 2015 - 8:03 pm | बॅटमॅन
दाढीच्या पारंपरिक नॉनजिलेटी डिव्हाईसकरिताही खोरं असाच शब्द ऐकलाय.
28 Aug 2015 - 7:06 pm | वगिश
वालचंद चे आहे का कुणी ईथे?
28 Aug 2015 - 7:14 pm | प्यारे१
सांगलीकर वॉलचंद म्हणतात. वालचंद नाही.
FE civil 1997-98 वालचंद
28 Aug 2015 - 7:15 pm | चावटमेला
+७८६. फुल्लच आंग्लाळलेला उच्चार
28 Aug 2015 - 7:58 pm | काळा पहाड
आईगं. ते वॉलचंदच आहे अशी माझी समजूत अजूनपर्यंत होती.
29 Aug 2015 - 1:14 am | प्यारे१
सेठ वालचंद हीराचंद यांच्या नावानं आहे ते. HCC चेअरमन असतात त्यांच्या मुख्य कमितीमध्ये. 97 98 ला पन्नास वर्ष झाली वालचंद कॉलेज ला.
29 Aug 2015 - 10:44 am | गॅरी ट्रुमन
अरे मी पण त्याच बॅचचा. पण चारही वर्षे वालचंदमध्येच होतो.वालचंदचा सगळ्यात बत्थड इंजिनिअर होतो मी. पहिल्या वर्षी बेसिक सिव्हिल इंजिनिअरींगच्या ओरलमध्ये मुन्नावल्ली सरांनी "मशीनचा पाया आणि इमारतीचा पाया यामध्ये फरक काय असतो" असा प्रश्न विचारला होता त्यावर "मशीन फाऊंडेशनसाठी सॉईलची बेअरिंग कपॅसिटी मोजायची गरज नसते पण इमारतीच्या पायासाठी सॉईलची बेअरिंग कपॅसिटी मोजायची गरज असते" असे उत्तर द्यायची विद्वत्ता बाळगून होतो.
मिपावर वालचंदचे बरेच जण आहेत हे बघून चांगले वाटले.बाकी व्य.नि मध्ये बोलूच.
29 Aug 2015 - 1:39 pm | प्यारे१
तू mechanical ना?
गिरीश मणियार, सुरेन्द्र दळवी, अमित झोपे, जितेन उतकर वगैरे लोक माहिती असतील.
29 Aug 2015 - 4:04 am | शिवोऽहम्
'पाक' च्या काळात, गोळे सरांसमोर मंदीरात 'ही माझी बहीण, मी हीचा भाऊ' म्हणालेला.. एफ ई १९९२ (कॉम्प्युटर)
28 Aug 2015 - 7:14 pm | चावटमेला
मोळा = खिळा
दळप = दळण
एखाद्याला लावून द्या म्हणजे एखाद्याला पाठवून द्या. बाकी "शिप्पारस" हा शब्द कोल्लापूरकरांकडून जास्त ऐकलाय
29 Aug 2015 - 12:41 am | रेवती
येस्स! मोळा म्हणजे खिळा हेच सांगायला आलेवते.
28 Aug 2015 - 8:00 pm | मयुरा गुप्ते
मी सांगलीची नाही तरीपण कानुला= कानवला असचं म्हणतो आम्ही घरी.
त्याचप्रमाणे देवासमोर नारळ हा नेहमी वाढवतातच्..फोडत नाहित. जसं मंगळसुत्र तुटलं न म्हणता 'मंगळसुत्र वाढलयं,दुरुस्त करुन आणलं पाहिजे' ह्या प्रकारचं.
सासुबाईंकडुन अजुन एक शब्द/ वाक्यप्रचार ऐकला होता- 'अमक्या तमक्या कडे बसायला जाउन येतो/ बैठकीला जाउन येतो'..मी आपलं बावळटासारखं म्हटलं कशाला? तर ओळखीच्या व्यक्ती कडे सुतकात भेटुन येणे ह्या साठी हा शब्दप्रयोग.
सांगलीकरांचे मजेशीर शब्द आहेत.
--मयुरा.
9 Mar 2018 - 12:36 pm | श्वेता२४
कोल्हापूरकडील काही ग्रामाण भागात सुतकाला भेटून येताना ..............त्याला किंवा तीला बोलवून येते (म्हणजे भेटून येते.) असे म्हणतात. तसेच सांडगे व पापड मध्ये भेद करत नाहीत. सरसकट सगळ्या तळणाऱ्या पदार्थांना पापडच म्हणतात व ते भाजले (म्हणजे तळले) जातात.
9 Mar 2018 - 1:01 pm | सस्नेह
बोलावून येणे नव्हे, बोलावून आणणे.
म्हणजे भेटून येणे नव्हे, तर मयताच्या नातेवाईकाला आपल्या घरी काही दिवस राहवून घ्यायचे अशी पद्धत आहे.
13 Mar 2018 - 5:40 pm | श्वेता२४
तेच तर म्हणतेय मी...... एखाद्याच्या घरी कोणी मयत झाला असेल तर त्याच्या नातेवाईकाला भेटायला जाताना असं नाही म्हणत की मी भेटून येते. तर असं म्हलं जातं की मी बोलवून येते (आणि हे असं फक्त मयत झालेल्या घरी भेटायला जातानाच म्हणतात). तुम्ही सांगत आहात तो थेट अर्थ आहे बोलावून आणणे.
28 Aug 2015 - 9:41 pm | Madhavi1992
माझे बाबा सांगलिचे. लग्न होएपर्यन्त दर वर्शी सुट्टीला जाण व्ह्यायच. खूप छान आठवणी आहेत सांगलिच्या.
28 Aug 2015 - 9:50 pm | शब्दबम्बाळ
यातले बरेचसे शब्द सगळ्याच खेडेगावांकडे वापरले जातात अस वाटतंय.
काही वेगळे वाटले...
बाकी फांदीला "ढापि" म्हणतात शक्यतो
माझ्या मित्रांची सवय म्हणजे ते नुस्त "काय चाललंय?"अस म्हणायच्या ऐवजी 'काय काय मग' असे विचारतात! :)
28 Aug 2015 - 10:42 pm | दा विन्ची
डी एम ई १९८७-९० वालचंद , सध्या प्राध्यापक वालचंद.आणि अजून ढीगान असतील.
28 Aug 2015 - 10:42 pm | दा विन्ची
डी एम ई १९८७-९० वालचंद , सध्या प्राध्यापक वालचंद.आणि अजून ढीगान असतील.
28 Aug 2015 - 11:04 pm | पगला गजोधर
Madan Kaulgud Sir Aahe ka ajun Walchand made shikwayla ?
28 Aug 2015 - 11:25 pm | दा विन्ची
मदन सर अधिकृतपणे निवृत्त झालेत पण सध्या वाढीव सेवेत आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी हवा आहे काय? जुन्या पैकी बहुलेकर सर वारले. इनामदार निवृत्त झाले. डहाके आणि जालीहाळ सर अजून सेवेत आहेत. मी पदवीकडे आहे पण या सर्वांचा विद्यार्थी आहे .
9 Mar 2018 - 12:04 pm | सस्नेह
इनामदार सरांची मुलगी वालचंदला प्राध्यापिका आहे बहुतेक.
किंवा ऐनापुरे सरांची असावी.
28 Aug 2015 - 11:25 pm | अकिलिज
"काय काय" असं विचारल्यावर उत्तर काय द्यायचं हे ही ठरलेलं.
"तुमच्याकडं"
अजून एक भरीला शब्द .... सांद्री = फट.
29 Aug 2015 - 12:33 am | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!!