सर्व वाचकांचे मनापासून आभार. संपादक मंडळीने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे पण आभार
मागील दोन भाग प्रकाशीत केल्या नंतर थोडा विश्वास वाढला. पण अजून टंकलेखनाची सवय नसल्या मुळे एक वाक्य टंकायला दोन ते तीन मिनिटे लागतात. त्यामुळे ठरवून सुद्धा मोठा भाग टाकायला जमले नाही. त्याबद्दल क्षमस्व. आहे ते गोड मानूण घ्याल अशी अपेक्षा.
********************************************************************************
हे सगळं ऐकून कुणाला काय बोलावं तेच सुचेना. सर्व प्रथम प्रतिक्रिया बायकोची " अहो चार तोळ्यांच्या होत्या नं?" हे ऐकून आई पुन्हा रडायला लागली.
सर्वप्रथम मी स्वतः ला सावरलं. म्हंटलं " आई तू काळजी करू नकोस. कुठे जात नाहीत पाटल्या. तो गादीवाला माझ्या चांगला ओळखीचा आहे. मी आत्ता जातो आणि बघून येतो."
"अरे पण कारखान्यात जाता जाता वाटेत वगैरे पडल्या असतील किंवा त्याच्या कामगाराला वगैरे सापडल्या तर ते परस्पर गायब करणार. एकदम कडेला कोपर्यातच ठेवल्या होत्या मी." आई रडतच म्हणाली.
" अगं पण ती काय जागा आहे का अश्या वस्तू ठेवायची? आणि रडून काय परत येणार आहेत काय आता? आधी रडणं बंद कर" बाबा वैतागून बोलले.
मी जायला उठताच थांब, मी पण येतो.. असं म्हणत बाबा पण उठले.
आम्ही दोघे जेव्हा त्या कारखान्यात पोहोचलो तेव्हा जवळ जवळ ४.३० वाजत आले होते. भला मोट्ठा सात फुट उंचीचा लोखंडी दरवाजा, त्याला असलेला छोटा दिंडी दरवाजा ढकलून आम्ही आत प्रवेशलो. आत एका बाजूला ५-६ जुन्या गाद्यांचा ढीग दिसला. मी थांबून त्यात आमच्या गाद्या कुठे दिसतात का बघीतल्या. नव्हत्या!!
समोर एक छोटीशी शेड होती. त्यात २ बायका हातात भल्या मोठ्या सुया घेऊन गाद्या शिवायचं काम करत होत्या. एका बाजूला एक यंत्र होतं. त्यात एक माणूस एका बाजूने जुना कापूस टाकत होता आणि दुसर्या बाजूने पिंजलेला कापूस बाहेर उडत होता. एक माणूस गादीच्या आकाराची पिशवी घेऊन त्यात तो कापूस भरत होता.
त्या लोकांनी आमच्याकडे पाहिलं न पाहिल्या सारखं करून पुन्हा आपापल्या कामात मग्न झाले. नी पुढे होत एका माणसाला विचारलं " मालक कुठे आहेत?"
" दोघंबी नमाज पढायला गेलेत. आत भाभी असतील, बघा आवाज देऊन." त्यानं सांगितला. कारखान्याच्या आतल्या भागातच त्यांचे घर पण होते.
" नको. आम्ही नंतर येतो. किती वेळ लागेल त्यांना यायला?" मी काही बोलणार होतो, तेव्हड्यात मला थांबवत बाबा बोलले,
" अर्धा - पाउण तास तरी लागल"
" बरं, येतो आम्ही तोपर्यंत. चल" म्हणत बाबा मला घेऊन बाहेर पडले.
" अहो मी त्याच्या बायकोला पण ओळखतो. विचारलं असतं ना तिला" मी म्हणालो.
" अश्या गोष्टीची चर्चा बायकांशी नको करायला. आणि सहजासहजी जर हे लोक तयार नाही झाले तर आपण पोलिसांत जायची पण तयारी ठेवायला पाहिजे. थांब मी मझ्या एका मित्राला बोलवून घेतो. त्याच्या पोलिसात थोड्याफार ओळखी आहेत." मला कारखान्यापासून थोडं लांब आणत बाबा बोलले.
" ओ तसलं काही करावं लागणार नाही. मी यांना चांगल ओळखतो. याना सापडल्या असतील तर देतील ते आपल्याला. हा, आता आई म्हणाली तसं जर वाटेत पडल्या किंवा दुसर्या कुणाला, कामगाराला वगैरे सापडल्या तर अवघड आहे." मी त्या मालकाला खरच ओळखत होतो.
हा माणूस साधारण माझ्या वडलांच्याच वयाचा होता. दोन विवाहित मुली आणि माझ्या पेक्षा ४-५ वर्षांनी लहान असेल एवढा मुलगा. मुली त्यांच्या त्यांचा सासरी. इकडे हे दोघे नवरा बायको आणि मुलगा मिळून हा कारखाना चालवायचे. दोन वर्षापूर्वी हौसेने सेकंड हँड मारुती कार घेतली होती. तेव्हा किरकोळ दुरुस्तीसाठी आणायचा माझ्या गॅरेजला. थोडी ओळख वाढल्यावर एक दोनदा ईदीला घरी जेवायला पण बोलावलं होतं. आता आम्ही शुद्ध शाकाहारी ( घरातले बाकीचे सगळे) असल्यामुळे मी हे घरात कोणाला बोललो नव्हतो. त्यामुळे मी बोललेलं बाबानां काही पटत नव्हतं. ते आपले "अजून कुणाला तरी बोलव. आपण दोघेच नको जायला " असं सारखं म्हणत होते. पण मी जबरदस्तीने त्यांना गप्प बसवलं.
अर्धा पाउण तास झाल्यावर पुन्हा दोघे कारखान्यात शिरलो. या वेळी त्याचा मुलगा एका बाजूला खुर्ची वर बसलेला दिसला. मला बघताच उठून पुढे आला. " अहो तुमच्या गाद्या तयारच होतायत. तसाभरात पाठवतो घरी." असं म्हणत माझ्याजवळ आला.
" बरं बरं, ठीक आहे. पण तुझे वडील आहेत का घरी? मला त्यांच्याशी जर बोलायचं होतं" मी म्हंटलं
" आहेत ना. बसा तुम्ही, बोलवतो त्यांना" असं म्हणून दोन खुर्च्या आमच्या समोर ठेवल्या व आत गेला. बाबा सारखे अस्वस्थ होऊन चुळ्बुळ करत होते. नी त्यांना नजरेनेच शांत बसा असं खुणवत होतो.
" काय आज आमच्या गरीबखाण्याला पाय लागले तुमचे पाटिलसाहेब?" आल्या आल्या वडलांशी हात मिळवत म्हणाला व अजून एक खुर्ची ओढून आमच्या सोबत बसला व आत घरात ऐकू जाइल इतपत आवाजात मोठ्याने ओरडून " अरे सून, दो चाय लाना " अशी आर्डर दीलीं
माझे वडील काही त्याला ओळ्खत नव्हते. पण बहुदा माझे वडील म्हणून तो यांना ओळखत असावा. त्याचे आपुलकीने वागणे पाहून वडील थोडे शांत झाल्या सारखे वाटले. आणि त्याच्या नकळत "विचार ना " असं मला डोळ्याने खुणावू लागले.
" चाचा, एक विचारयचं होतं तुम्हाला" मी असं म्हणताच " हां? पुछो बेटा? गादी के बारेमे कुछ पुछ्ना है? शामतक पहुचादूंगा घरपे."
" ते झालच, पण अजून एक गोष्ट होती. परवा ज्या जुन्या गाद्या तुमच्या माणसाने आणल्या त्यामध्ये सोन्याच्या पाटल्या होत्या आईच्या. त्या सापडल्यात का तुम्हाला?" मी उगाच वाढाचार नको म्हणून थेट विचारून टाकलं.
हे ऐकताच तो एकदम स्तब्द झाला आणि दोन्ही हात छातीवर ठेवत " या अल्ला " असं म्हणत वर आकाशाकडे बघू लागला.
प्रतिक्रिया
29 Jul 2015 - 5:51 pm | जडभरत
अरेच्चा, काय छळ मांडलाय! पाटल्या तुमच्या आणि जीव आमचा टांगणीला लागलाय इकडं. काय झालं ते एकदा सांगून टाका की.
29 Jul 2015 - 5:53 pm | जडभरत
लिहायचे तंत्र चांगलेच अवगत आहे. आपण नवीन आहात असं वाटत नाही. असो भयकथा किंवा थरार कथा मस्त लिहू शकाल. त्या दृष्टीने विचार करा.
29 Jul 2015 - 5:59 pm | संजय पाटिल
ओ नाही ओ.. खरच पहिल्यांदा लिहीतोय. अगदी शप्पत!
29 Jul 2015 - 8:50 pm | अस्वस्थामा
घ्या बरं आईच्या पाटल्यांची शप्पत.. !!
(स्वगतः बेणं मजा घेतंय बरं का लोकांची.. ह्म्म..)
29 Jul 2015 - 6:00 pm | उगा काहितरीच
क्रमशः राहीलं का ? लै ताणू नका आता ! लौकर टाका पुढी भाग .( रच्याकने : पाटलांच्या पाटल्या मिळाल्या का ? हा प्रश्न कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं असा होतोय,)
29 Jul 2015 - 6:03 pm | चिमी
मिळाल्या की नाही शेवटी ते सांगुन टाका एकदाचे.
उत्सुकतेसोबत टेंशनसुद्धा वाढत आहे :(
29 Jul 2015 - 6:32 pm | तिमा
एवढं लांबवलाय, म्हणजेच मिळाल्या.
29 Jul 2015 - 6:52 pm | प्यारे१
+११११
29 Jul 2015 - 9:28 pm | संजय पाटिल
नाही हो लांबवत वगैरे नाही. मराठी टायपयंग प्राण खातय माझा
29 Jul 2015 - 6:59 pm | माझिया मना
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
29 Jul 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी
हा ही भाग छान रंगलाय.
पुभाप्र.
30 Jul 2015 - 6:23 am | स्पंदना
मिळाल्या की नाही सांगा बा.
आमच्या घरात उशीच्या अभ्र्यात मंगळसुत्र ठेवुन दोन दिवस घर झाडायला लावल होत मातोश्रींनी.
30 Jul 2015 - 4:41 pm | ब़जरबट्टू
एकता कपूर कोण हो तुमची ?
नसेल तर तडक ओळखी काढा.. लय पोटेनशियल आहे बघा.. :)
30 Jul 2015 - 11:22 pm | संजय पाटिल
हें हें बघतो पर्यत्न करून. तुमची पन काय जरा वळख आसल तर सांगून ठेवा नाव आपलं.