२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली. त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’.
कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच.
दरम्यान अनेकदा या मुलींची नावं संगणकाच्या पडद्यावर उमटली. कधी वयानुसार गट, कधी भाषेनुसार, कधी कुटुंबाच्या माहितीनुसार. वडील नसलेल्या मुली किती, नातलगांकडे राहणा-या मुली किती, सावत्र आई/वडील असलेल्या मुली किती....वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीचं विश्लेषण आणि त्या अनुषंगाने नवनव्या कल्पना.
शिबीर आठ जिल्ह्यांत झालं, आता हा शेवटचा जिल्हा. या जिल्ह्यात सहा शाळा. प्रत्येक शाळेची भेट आणि त्यात ‘रापारिगा लीडर्स’शी संवाद. जमलं तर गृहभेट आणि पालकभेट.
भर दुपारी बारा वाजता आम्ही शाळेत पोचलो. मुलींचा वर्ग बारा वाजता सुरु होतो, त्यामुळे ही योग्य वेळ त्यांना भेटायची. पाचेक मिनिटांत लाजून, मान खाली घालून, तरीही उत्सुक तिरक्या नजरेने पाहणा-या सहा मुली माझ्यासमोर उभ्या. एकेक नाव सांगतेय आणि मी हातातल्या यादीवर ‘बरोबर’ची खूण करतेय. एक, दोन, तीन, चार, पाच.... वा! इथं एकही ‘रापारिगा लीडर’ शाळा सोडून गेली नाहीये तर! अरेच्चा! पण ही सहावी मुलगी वेगळंच नाव सांगतेय – कागदावर ते नाव नाहीये. हं! म्हणजे इथंही गळती झालीय तर! लग्न झालं की काय तिचंही?... एका क्षणात मनात किती ते विचार!
मी त्या नव्या सहाव्या मुलीची आधी व्यवस्थित विचारपूस करते.
मुख्याध्यापकांकडे वळून मी प्रश्न विचारणार – तितक्यात विचार बदलून मी मुलींना विचारते, “पण सेलेस्टिना कुठेय? ती फक्त आज नाही आली शाळेत की बरेच दिवस गैरहजर आहे?”
“ela morreu” (ती मेली) निर्विकार चेह-याने एक मुलगी सांगते.
मला काय बोलावं ते सुचत नाही.
“काय झालं”, मी विचारते.
“माहिती नाही. एक दिवस आजारी पडली, दुस-या दिवशी गेलीच ती डॉक्टरकडे न्यायच्या आत.” मुख्याध्यापक सांगतात.
“कधी झालं हे?” मी विचारते.
आपापसात चर्चा करून ‘आठ दिवस’ या निष्कर्षाप्रत ते येतात.
“तिच्या आई-वडिलांना भेटता येईल का?” या माझ्या प्रश्नावर ते सध्या कामासाठी गाव सोडून गेल्याचं कळलं.
मृत्यू मला नवा नाही. जिवलगांच्या जाण्यातून त्याची अनेकदा चाहूल घेतली आहे.
पण मृत्यूची सवय होता होत नाही; प्रत्येकवेळी तो नवा असतो. तितकाच अंतर्मुख आणि हतबल करणारा असतो. त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव लख्ख करणारा असतो.
परक्या भूमीतल्या, जिला मी कधीही भेटले नव्हते अशा या मुलीच्या निमित्ताने मृत्यू आज पुन्हा भेटला. पुन्हा एकदा डोळे ओलावून गेला.
प्रश्न मरण्याचा नसतो तर जगण्याचा असतो हे अधोरेखित करणारी पुनर्भेट.
अजून किती बाकी आहेत?
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 10:21 pm | सविता००१
पण मृत्यूची सवय होता होत नाही; प्रत्येकवेळी तो नवा असतो. तितकाच अंतर्मुख आणि हतबल करणारा असतो. त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव लख्ख करणारा असतो.- हे फार फार पटलं.भयानक.
22 Jul 2015 - 10:23 pm | खेडूत
!!
पोर्तुगीज.. म्हणजे बहुधा मोझांबिक?
अजून थोडं सविस्तर हवं होतं!
22 Jul 2015 - 10:29 pm | त्रिवेणी
लेख वाचला पण संदर्भ नीट लक्षात नाही आले.
थोडा सविस्तार असता तर नीट काळला असता.
23 Jul 2015 - 8:05 pm | आतिवास
खेडूत आणि त्रिवेणी,
प्रतिसादासाठी आभारी आहे.
खरं तर जे सांगायचंय, ते फक्त शेवटच्या सात ओळींत आहे.
बाकी गरज नसताना विस्ताराने लिहिलंय.
22 Jul 2015 - 10:54 pm | एस
संवेदनशील चिंतन. अजून विस्तृत असायला हवा होता.
कधीकधी जिथे जीवन ओंगळवाणे झालेले असते तेव्हा मात्र मृत्यू जर आला तर तो कदाचित सुंदर वाटू शकतो. जन्म आणि मृत्यू समान वाटू लागतील इतकी तटस्थता एखाद्या स्थितप्रज्ञालाच जमू जाणे!
23 Jul 2015 - 7:58 pm | आतिवास
'मृत्यू जामीन होऊनी यावा,
जीवनाचा तुरुंगवास नको'
या भीमराव पांचाळे यांच्या ओळी आठवल्या तुमचा प्रतिसाद वाचून!
24 Jul 2015 - 4:08 pm | सूड
+१
24 Jul 2015 - 11:48 am | तुडतुडी
कधीकधी जिथे जीवन ओंगळवाणे झालेले असते तेव्हा मात्र मृत्यू जर आला तर तो कदाचित सुंदर वाटू शकतो. जन्म आणि मृत्यू समान वाटू लागतील इतकी तटस्थता एखाद्या स्थितप्रज्ञालाच जमू जाणे!>>>+११११११११११
अर्धवट वाटतोय अनुभव . अजून विस्तृत असायला हवा होता
24 Jul 2015 - 11:54 am | बॅटमॅन
(चक्क) सहमत.
24 Jul 2015 - 2:34 pm | नाखु
हे उमजेपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य गेलेले असते आणि "कुतरओढ जाणीव" उरलेले आयुष्य झाकोळते.
इथे कदाचीत अप्रस्तुत ठरेल पण एक रोकडा अनुभवः
सन १९९६ चा आकटोबर महीना. जवळचा मित्र (माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी लहानच) पण त्याला अगदी बालपणापासून ओळखत असल्याने घट्ट मैत्री. हृद्याशी संबधीत दुसरी शस्त्र्क्रिया तीही वर्ष सव्वा वर्ष अंतरात. तो रूबीत दाखल. मला सायंकाळी फोन येऊन भेटून जा (त्यावेळी मोबाईल नव्हतेच्/रादर आम्च्या आवाक्यात नव्हते) मी पुण्यात मार्केट यार्ड परेइसरात नोकरीला राहायला चिंचवडला. नेमके त्याच दिवशी ब्रँचला मार्केटिंगची अचानक मिटींग ठेवली गेली एरीया मॅनेजरचा आडमुठेपणा ( मी हजर असलोच पाहिजे म्हणून) शेव्टी मिटिंग रात्री १२.३० ल संपली शेवटची बस करून रात्री १.३० ला घरी. पहाटे ३.३० ला रूबीला जावे लागले. सगळे संपले होते. मित्राच्या आईच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती. आजही स्वतःला माफ करू शकत नाही ("तो काल तुझी वाट पहात होता रात्री १० पर्यंत" आईने चार-पाच वेळा सांगीतले" हे कानात आजही ताजे आहे).
त्यानंतर आजतागायत जेव्हां जेव्हा सहज भेटायला जातो तरी प्रचंड अपराधी वाटते. बोच आयुष्यभर राहील.
नाखु
24 Jul 2015 - 10:55 pm | आतिवास
:-(
24 Jul 2015 - 10:56 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
24 Jul 2015 - 11:16 pm | पैसा
घरातल्या मुक्या प्राण्यांचा मृत्यूही तेवढाच त्रास देणारा असतो. कधी कधी कोणा न पाहिलेल्या व्यक्तीचा मृत्यूही खूप अस्वस्थ करतो. सवय खरे तर आपल्याला कसलीच होत नाही. ना मरण्याची ना जगण्याची. कधी एखादे मरण जगण्याहून चांगले असे वाटतं तर कधी एखाद्याचे जगणे मरणाहून भयानक असेल असं वाटतं.
मात्र तुम्ही लिहिलंत ते लहान मुलीने मृत्यूबद्दल निर्विकार होणे फार म्हणजे फार भयानक वाटलं. आज झोप येणे कठीण.
25 Jul 2015 - 6:17 am | सविता००१
खरय :(
25 Jul 2015 - 9:59 am | आतिवास
मलाही क्षणभर तसं वाटलं.
पण ओळखदेख नसलेल्या, भाषा धड येत नसलेल्या, सरळ आणि स्पष्टपणे 'परक्या' दिसणा-या व्यक्तीपुढे मोकळेपणाने न बोलणं - हेही मी समजू शकते.
अवांतर: वसाहतवादाच्या अनुभवाचा काय परिणाम होतो हे इथं काहीसं तटस्थपणे पाहताना भारतीय मनोवृत्ती समजायला मला मदत होते आहे. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
25 Jul 2015 - 6:35 am | बहुगुणी
नेहेमीप्रमाणेच अस्वस्थ करणारा लेख.
लहान मुलीने मृत्यूबद्दल निर्विकार होणे फार म्हणजे फार भयानक वाटलं
+१इथे कुणाच्याही अनपेक्षित मृत्यूने होणारा मानसिक त्रास अभिप्रेत असला तरीही, अशा 'समाज सुधारतो आहे' असं वाटता-वाटता बसणार्या स्त्रियांच्या अपमृत्यूचा धक्का हाही मुद्दा आहेच असं वाटतं. गेल्या दोनच दिवसांत दोन काहीश्या संबंधित बातम्या वाचायला/पहायला मिळाल्या आणि हा लेख वाचून वाटलं तसंच अस्वस्थ व्हायला झालं: मानवी संघर्षांच्या घडामोडीत प्रामुख्याने frontline वर स्त्रियाच का बळी जातात? हे कोणत्या उत्क्रांतीचं लक्षण आहे?
सिरियासारख्या निर्वासितांच्या घटनांमध्ये स्त्रियाच प्यादं म्हणून वापरल्या जात आहेत.
कालच, मानवी तस्करी आणि स्त्रियांना गुलामासारखी वागणूक मिळणं हे global warming चा अपरिहार्य परिणाम आहे आणि तो थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न झाले पाहिजेत असं पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन येथे महापौरांच्या जागतिक परिषदेत सांगितलं.
25 Jul 2015 - 10:07 am | आतिवास
दुव्यांसाठी आभार.
इथल्या मुलींचं जगणं पाहताना प्रचंड त्रास होतो.
इथं मला भारतातल्या आदिवासीबहुल क्षेत्राची वारंवार आठवण येते - इतकं विलक्षण साम्य आहे अनेक बाबतीत.
13 Feb 2017 - 2:41 pm | अनिंद्य
@ आतिवास
पण मृत्यूची सवय होता होत नाही; प्रत्येकवेळी तो नवा असतो. - खरं आहे.
तुम्ही एक तीव्र भावनानुभव मांडलाय अगदी शांत-साध्या शब्दात!