जो ज़िंदा हो तो फिर....

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 5:31 pm

मराठी साहित्याला कुठेही कमी न लेखता म्हणेन, की उर्दू शायरी किंवा एकंदरितच उर्दू साहित्य वाचताना एक अवर्णनीय भारदस्तपणा सतत जाणवत रहातो. शब्दांचा भारदस्तपणा, अर्थाचा भारदस्तपणा, रचनेचा आणि वाचनानुभवाचा. उसकी बात अलग है. बिलकुल अलग. किसी दूसरी भाषा में इसे बयां तो किया जा सकता है, पर महसूस नही किया जा सकता. तरीही, मिपावर आतापर्यंत तीन चार ग़ज़ल अर्थासहित, रसग्रहणासह पोस्ट झाल्या, तो सिलसिला चालू ठेवत उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका ता-याची ही एक जरा वेगळी पण मला भावलेली ग़ज़ल तुमच्यासोबत वाचतोय.

हा शायर म्हणजे वसीम बरेलवी. गावाच्या नावावरून आडनावं पडलेली उदाहरणं अनेक आहेत. त्यापैकीच हे एक. लुधियानवी, मोरादाबादी, जौनपुरी तसे हे बरेलवी. बाकी माहिती लिहीत नाही, ती द्यायला गूगल समर्थ आहे.

ग़ज़ल अर्ज़ है...

उसूलोंपे जहां आंच आए टकराना जरूरी है
जो ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना ज़रूरी है

मत्लाच इतका प्रोफाउंड. तुमच्या तत्वांशी जिथे तडजोड होत असेल तिथे तुमचा विरोध व्हायलाच हवा. ती तडजोड व्हायला नको. कारण तुमची तत्व हीच तुमची खरी ओळख असते. आणि जिथे तत्व संपली तिथे तुमची ओळख संपली. जो ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना जरूरी है.... काय रुपक आहे! सुरेख. A man is known by his principles असं इंग्रजी सुवचन आहे. नेमकं हेच वसीम बरेलवी या पहिल्या शेरातून सांगतात.

नई उम्रोंकी खुद-मुख्तारियोंको कौन समझाए
कहां से बचके चलना है कहां जाना ज़रूरी है

नई उम्रोंकी; नवी पिढी. खुद-मुख्तारी - स्वयंपूर्णता. इथे शायर जे म्हणतात ते अगदी घरोघरी वालं म्हणणं आहे. आजकालच्या.... पासून वाक्य सुरू झालं की जे म्हणायचं असतं ते इथे दोन ओळीत म्हटलेलं आहे. की नव्या पिढीतल्या आत्मविश्वासापुढे त्यांना काही समजवायचं कसं आणि कुणी? कारण ते सहसा कुणाचं ऐकत नाहीत. अनुभवाने चार समजुतीच्या, चार शिकवणीच्या गोष्टी सांगायचीही सोय नाही.

थके हारे परिंदे जब बसेरे के लिये लौटे
सलीका़मंद शाखोंका लचक जाना ज़रूरी है

शब्दार्थ सोपा आहे, दमून भागून जेंव्हा पक्षी घरट्याकडे येतात, विसाव्यासाठी फांदीवर येतात, तेंव्हा फांदीने वाकणं जरूरी आहे. सलीका़मंद हा शब्द बघा; सलीका़ म्हणजे मॅनर. मराठीत पद्धत. इथे शायर जुन्या पिढीवर बोट ठेवतोय. ज्या नव्या पिढीला आधीच्या शेरात खुद-मुख्तार म्हटलं त्या नव्या पिढीला इथे परिंदे अशी उपमा देत जुन्या पिढीला फांदीची उपमा दिलेली आहे. आणि शायर म्हणतो, नवी पिढी त्यांच्या आकाशात भरारी मारून जेंव्हा थकते, दमते, तेंव्हा जुन्या पिढीनेही फांदीचा लवचिकपणा अवलंबणं गरजेचं आहे. आपल्या धोरणांमधे लवचिकपणा आणत पुढच्या भरारीसाठी प्रोत्साहन देणं गरजेचं, आणि श्रेयस्कर आहे.

बहुत बेबाक़ आंखोंमें ताल्लुक टिक नही पाता
मुहब्बत में कशिश रखने को शर्माना ज़रूरी है

बेबाक म्हणजे बोल्ड. इथे, रोखलेले डोळे. रोखलेल्या डोळ्यांत नात्याचं सौंदर्य शोभत नाही. प्रेमाची ओढ कायम राहण्याकरिता त्या पापण्यांचं लाजेने झुकणं गरजेचं आहे. लाजवाब, तरल वर्णन !

सलीका़ही नही शायद उसे महसूस करने का
जो कहता है ख़ुदा है तो नज़र आना ज़रूरी है

'दर्शन दे रे, दे रे भगवंता' म्हणणा-याला, 'देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी' याचा अर्थ कळणार नाही. शायर म्हणतो, ख़ुदा ला दृश्यरूप नाही म्हणून त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ठेवणा-याला बहुदा गोष्टी अनुभवण्याची, प्रचीती घेण्याची कला अवगत नाही.

शेवटचा शेर लक्षवेधी आहे.

मेरे होठोंपे अपनी प्यास रखदो और फिर सोचो
की इसके बाद भी दुनिया में कुछ पाना ज़रूरी है

इथे अपनी म्हणजे तुला असलेली, की तुझी असे दोनही अर्थ होऊ शकतात. पण तुझी हा मला योग्य वाटला. प्रेमात बुडालेल्या माणसाला तो प्रेम करत असलेली व्यक्ती हे एकमेव उद्दिष्ट दिसत असतं. ती व्यक्ती आहे तर सगळं आहे, ती नाही तर काहीच नाही. अशा अवस्थेत स्वतःला ठेवून शायर म्हणतो, तुझी ओढ माझ्या ओठांवर म्हणजेच ख-या अर्थाने मनावर ठेवून बघ, तुला जीवनात साध्य असं दुसरं काहीही दिसणार नाही.

गविंच्या सारखा प्रभावीपणे अर्थ पोचवता आला की नाही माहीत नाही. पण बहुदा थोडाफार जमला असेल.

जाता जाता याच वसीम बरेलवींचे दोन शेर (मागच्या वेळेला जास्त लिहीले ते काहींना रुचले नाहीत)

मै इस उम्मीद पे डूबा के तू बचा लेगा
अब इसके बाद मेरा इम्तिहान क्या लेगा

अपने चेहरे से जो ज़ाहिर है छुपाए कैसे
तेरी मर्ज़ी के मुताबिक नज़र आए कैसे

----------------------

गझलआस्वाद

प्रतिक्रिया

पहिलं कडवं अतिशय प्रभावी. रात्री निवांत वाचणार. मस्त वेल्लाजी

खरं सांगायचं तर भगवद्गीतेच्या एखाद्या अध्यायातून घेतल्यासारखं वाटतं पहिलं कडवं!!! अजून पहिल्या कडव्याच्या प्रेमात!!!

अश्फाक's picture

16 Jul 2015 - 6:05 pm | अश्फाक

Thake hare panchhi mhanje sansari bapyaa aani Salika mand shakhe mhanje changlya walanachi sri(lady)
Baki chalu dya

वेल्लाभट's picture

16 Jul 2015 - 6:12 pm | वेल्लाभट

मला उमगलेला अर्थ मी लिहीला आहे. हीच खरी गंमत आहे की प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या दृष्टीने भावार्थ लिहीलात तर स्वागत आहे.

...बहोत खूब..जियो वेल्लाभट..

वेल्लाभट's picture

17 Jul 2015 - 11:10 am | वेल्लाभट

धन्यवाद गवि, जडभरत

पैसा's picture

17 Jul 2015 - 12:25 pm | पैसा

तुम्ही दोघे छान ओळख करून देता आहात. लिहीत रहा!

यशोधरा's picture

17 Jul 2015 - 7:46 pm | यशोधरा

सुर्रेख!

उसूलोंपे जहां आंच आए टकराना जरूरी है
जो ज़िंदा हो तो फिर ज़िंदा नज़र आना ज़रूरी है

क्या बात! जबरदस्त!

पद्मावति's picture

17 Jul 2015 - 9:34 pm | पद्मावति

एकेक शेर अप्रतिम आहेच पण तुम्ही त्याचे रसग्रहण ज्या ताकदीने केलेत त्याला तोड नाही.

थके हारे परिंदे जब बसेरे के लिये लौटे
सलीका़मंद शाखोंका लचक जाना ज़रूरी है

सुरेख....

जहां देखा यहीं देखा, गमोंसे जर्द है मौसम
खुदा बंदे को अब तेरे, खुशी मिलना जरूरी है !!

अगर तेरी इन आखों में, यूं भरके अब्र है आया
उठा फिर जाम, के, इस अब्र का घुलना जरूरी है !!

जयन्त बा शिम्पि's picture

18 Jul 2015 - 1:43 pm | जयन्त बा शिम्पि

उत्तम रसग्रहण ! वसिम बरेली यांचा मला आवडलेला एक शेर
कौनसी बात , कब , कैसी और किससे कही जाए ,
इसका अगर सलीका हो तो , हर बात सुनी जा सकती है !

शब्दबम्बाळ's picture

18 Jul 2015 - 3:27 pm | शब्दबम्बाळ

खूप छान लिहिलंय!
नवीन गझल कळाली...
असाच चालू राहूदे हा उपक्रम! :)

अजया's picture

18 Jul 2015 - 5:40 pm | अजया

जो जिन्दा हो ..मस्तच!
थके हारे परिन्दे पण.तुम्ही लावलेला अर्थ भावला.

सानिकास्वप्निल's picture

18 Jul 2015 - 7:43 pm | सानिकास्वप्निल

वाह!! बढिया!!

मित्रहो's picture

18 Jul 2015 - 8:18 pm | मित्रहो

नवीन गझल समजली

विशाल कुलकर्णी's picture

21 Jul 2015 - 2:59 pm | विशाल कुलकर्णी

वाहवा एकदम खालिस गझल !
आणि श्रेष्ठी, तुमचं विश्लेषण दुधात साखर , क्या बात, क्या बात !

मतला जबरदस्तच !

तुमचा अभिषेक's picture

23 Jul 2015 - 12:30 am | तुमचा अभिषेक

सुंदर
गझलांचा शौकीन नसूनही भिडले आवडले

वेल्लाभट's picture

23 Jul 2015 - 10:46 am | वेल्लाभट

सगळ्यांचेच अनेक आभार :)