<<मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.>>
पहिला भाग इथे वाचा
मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब. कुणाच्या बहनच्या शादीला पैसे नव्हते तर कुणाची अम्मी बीमार. पचास – साठ हजार घरवाल्यांना मिळतील म्हणून सगळे चालले होते. आणि दोन वक्ताची रोटीची तजवीज.
मौलवीचा इथे काय संबंध ते माहित नाही पडल शेवटपर्यन्त. पण मौलवीकडे येणारे त्याचे दोस्त मात्र इथे ही भाषण दयायला यायचे. काय जबान होती त्या दोघांची. तीन घंटे लगातार बोलले तरी त्यांनी अजून बोलायला पाहिजे असं वाटायचं .रोज वेगळी टेप दाखवायचे. हिंदुस्तान आपल्या जातभाईंवर नाइन्साफ करतो हे आता समोर यायला लागलं होतं. इतके दिवस पिकचरमध्ये बघितलेल्या हिंदुस्तानची ही बाजू समोर यायला लागली.
रोज कसरत मात्र करायला लागायची. झाडावर चढून रस्सीने दुसरया झाडावर जायचं. पहाडीवर धावायचं. मरकज़-तय्यबाच्या त्या थंडीत पोहायला पण लावायचे. हाथ- पायावर सरपटायला लागायचं. पच्चीस किलो वजन घेउन चालायला लावायचे. एखादा चक्कर येउन पडला तर त्याला फटके मारुन पुन्हा चालायला लावायचे. कसरत खूप करुन घेतली.एकदम आर्मीतले लोक करतात तशी. पण भूक लागली की खायला भरपूर मिळायचं. रोज मस्त गोश्त खायला दयायचे. दूध, बादाम, सेब खूप खायला देत. एवढं अब्बूने कधी दिलं नसतं.
फायरिंगमध्ये माझा निशाना बघून बॉस तर खूष झाला. हो त्याला बॉस म्हणायचं. त्याचं नाव नाही विचारायाचं तो आर्मीत होता म्हणे. माझा निशाना बघून तो म्हणायचा, काश ! करगील ला पाठवले त्यांचा असा निशाना असता तर?
आता त्या हिंदुस्तान्यांना सबक देण्याची वेळ आली होती. कश्मीरमधून हिंदुस्तानात पाठवणार होते. हिंदुस्तानात गेलो की एक दफा तरी मुंबई बघायची असं ठरवलं होतं.
पण काय झालं काय माहित , अचानक मला मरकज़-तय्यबा मधून माझी रवानगी दौरा-आम इथे झाली. तिथे सहा महिने समुंदरवर ट्रेनिंग झालं आता मला त्याची आदत पडली होती. त्यामुळे ट्रेनिंग पूरी करायला काही तकलीफ नाही झाली. फायरिंग तर माझी सगळ्यात चांगली होतीच. तेव्हा आपली बोट आपल्याला पाहिजे तिथे कशी न्यायची ते पण शिकवलं. एकदम नवीन फोन वापरायला शिकवला. त्यात तर आपण कुठे आहोत ते पण दिसायचं. आसपासचा नक्शा पाण दिसायचा. स्साल्या पिंडी कॅन्टानमेन्टमध्ल्या, आर्मी अफसरांच्या त्या घरवाल्या मोबाइलवर खिदळताना आठवायच्या. त्यांच्या मोबाइलपेक्षा हा फोन तर अजून बढकर होता.
अजून कारवाइचा हुकुम येत नव्ह्ता. कधी एकदा हिंदुस्तानात जातोय असं झालं. माझ्यासारखे अजून बरेच होते ट्रेनिंगला. पण ह्या समुंदरवर ट्रेनिंग कशाला असा एकदा प्रश्न विचारला बॉसला. हो त्याचं पण नाव नाही माहित. नेव्हीत होता तो. त्याला काय वाटलं काय माहित. त्याने सरळ मला उचलून समुंदरमध्येच फेकून दिलं आणि लॉंच घेउन गेला. तेव्हा एक डेढ घंटा पोहत राहिलो. तो परत आला. उचलून आत घेतलं आणि बेहोश होइपर्यन्त मारला मला तिघांनी मिळून.
किनारयावर आल्यावर समोर माझा छोटा भाइ रसूल दिसला. त्यांनी त्याला पकडून आणला होता. मग दोन दिवसांनी माझा इम्तेहान घेतला. माझ्याकडे रिव्हॉल्वर दिले. समोर माझा रसूल . हुकुम आला “फायर” माझे हाथ कापले. परत हुकुम आला “फायर” तरीपण हाथ कापले. मग मानेवर रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श जाणवला.परत हुकुम आला “फायर”. माझे हाथ आपोआपच चालले. ट्रीगर दाबला गेला. मी डोळे मिटून घेतले. बेहोश होउन खाली पडलो. किती वेळाने शुद्धीवर आलो ते माहित नाही, पण डोळे उघडले तर समोर रसूल होता. त्याला काहीच समजले नव्हते. बॉस आला. थंडपणे म्हणाला. "तू सिलेक्ट हो गया मिशन के लिये, रिव्हॉल्वर खाली था."
मिशन पूरी होइपर्यन्त रसूल आता आमचा मेहमान बनून राहणार असे सांगून निघून गेला.
मला आता चीड आली होती. स्साला जाउन त्या हिंदुस्तान्यांवर गोळ्याच चालवतो. ग्रेनेड फेकून किती जणांना मारुन टाकतो असं होउन गेलं.अजून महिनाभर ट्रेनिंग झालं. आणी मिशन वर जायचा हुकुम आला.
त्यादिवशी आम्हाला एकदम हेवी अम्युनिशन दिले गेले. एकदम नवीन रायफल मिळाल्या. बॉसचा बॉस आला होता. बॉस त्याला सर म्हणत होता. सर म्हणाला माझी मिशन कधीच फेल नाही गेली. माझ्या मिशनमधली पोरं परत आली आहेत. तुम्ही दहाजण परत आणण्याची जिम्मेद्दारी आपली असं म्हणाला. चाहे तो हवाइजहाज अग्वा करेंगे पर तुम सबको वापस लायंगे. एकदम थंड, शांत बोलत होता. पण अजून मिशन काय ते माहित नव्हतं.
सर ने पडदयावर हिंदुस्तानचा नक्शा दाखवला. मग तो मुंबईत आला. मी मनात म्हणालो, वाह क्या बात है, आपलं स्वप्न पूरं होणार तर. पहिलंच मिशन आणि मुंबईत. आमच्यापैकी काही आधीच मुंबईत त्या हॉटेलात जाउन राहून आले होते. त्यांनी आम्हाला नकशे समजाउन सांगितले. दोन रात्री समजून घेण्यात गगुजरल्या.
तिसरया दिवशी पहाटे स्पीडबोटीतून दौरा-आम सोडलं. पोरबंदरला एक मच्छीची लॉंच पळवली. त्याच्यावर चारजण खलाशी होते . त्यांना आम्ही खलास केलं. तिथून मुंबइत उतरलो.
माझ्याकडे सीएसटी आणी कामा हॉस्पिटलचे मिशन सौपले होते. कामा हॉस्पिटल मध्येच त्या तिघांना मारले आम्ही. मरकझ- तय्यबाला फोन लाउन खुष- खबरी दिली. बाहेर पडून पळून जात होतो तर मुंबईची पुलिस पाठी पडली. त्यांनी जीपच घातली आमच्या कारवर. आमच्याहातात गन्स दिसतात तरी ते जांबाज पुलिस आमच्यावर कूदले. सायनाइड यला टाइमच नाही मिळाला. आणी कैद झालो.
आता माझ्या साथीदारांना, इथले मुस्लीमभाई कब्रस्तानात दफन करु नाही देणार. मी जेव्हा माझ्या छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो. पण आर्मीच्या खौफमुळे काम करत राहिलो. आता तर रसूल त्यांच्या ताब्यात आहे. काय करतील त्याचं . त्याचा दुसराकासीम करतील की त्याला मौत देतील? अम्मी-अब्बुला ते एक लाख देणार होते . आता देतील का? एक लाख जाउ दे, तकलीफ तरी नक्कीच देतील. आर्मीवाले नाही सोडणार माझ्या बडेभय्याला, सलमाआपाला.
पण आता पछतावा होउन काय फायदा. त्या वेळीच विचार करायला हवा होता. पण हे पोट? त्याचं काय केलं असतं?
छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो मी. आता जिंदा राहून काय करु? म्हणून सांगतो मला मारुन टाका..
पूर्णत: काल्पनिक. तसेच खालील बातम्यांवर आधारित.
१.TOI Making of a Jehadi page 13
http://epaper.timesofindia.com/Daily/skins/TOI/navigator.asp?Daily=TOIM&...
२. http://timesofindia.indiatimes.com/India/Mumbai_attacks_were_planned_for...
३.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3785643.cms
४.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3786258.cms
५.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3786273.cms
प्रतिक्रिया
3 Dec 2008 - 9:47 pm | संदीप चित्रे
कपिल... कल्पना विस्तार चांगला जमलाय.. लेख वाचतानाच गेल्या आठवड्याभरातल्या वेगवेगळ्या बातम्या डोक्यात फ्लॅस्ग होत होत्या.
'हत्यार चालवणारे' पकडले जाणं महत्वाचे आहेच पण त्याहून महत्वाचे आहे 'हत्यार चालवायला उद्युक्त करणारे' पकडले जाणं !!
3 Dec 2008 - 9:49 pm | टुकुल
दोन्ही भाग आणी दिलेले दुवे वाचुन डोक्क सुन्न झाल.
4 Dec 2008 - 12:09 am | कलंत्री
आपणच ( माणुस) कसे आपले सुंदर आयुष्य नरकासारखे करतो ना? कोणीतरी कोणाचे बाहुले करतो आणि स्वताची पोळी भाजून घेतो.
सर्वच तरुणानी वाचावे आणि अंतर्मुख व्ह्यावे असा लेख.
4 Dec 2008 - 2:51 am | योगी९००
काळे साहेब,
तुमचे सगळे लेख आणि प्रतिसाद मला आवडतात..(डाव्या लोकांवर केलेला हल्ला तर मनापासून आवडला..पण आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने तो ले़ख तुम्हाला काढावा लागला..)
पण हा नाही आवडला.. या लेखामुळे तुम्ही त्या अतिरेक्याविषयी सहानभुती निर्माण व्हावी असे वातावरण तयार करत आहात...आहो समजा हे सगळे खरे जरी असले तरी अशा वेळी हा लेख नको येथे... अशा वेळी म्हणजे आपल्या सर्वांच्या मनात त्या पाकड्यांविषयी आग धुमासत असताना हा लेख म्हणजे आगीत बर्फ टाकल्या सारखे आहे. उगाच मानवाधिकार(Human Rights), निधर्मी (so called secular) वगैरे लोकांच्या हातात कोलित देत आहात.
कदाचित महेश भट वगैरे निधर्मी लोकांना चित्रपटाची कथा म्हणुन हा लेख सुरेखच...(पण महेश भट या कथेत हिंदूनी अत्याचार केला म्हणून तो अतिरेकी झाला असे दाखवेल आणि मौलवी लोकांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला असे ही दाखवेल..)
समजा आपल्या समाजातील लोकांवर अशी वेळ आली तर आपण असे अतिरेकी बनू? मला नाही वाटत... तसे असले तर आ़ज या जगात बरेचसे हिंदू अतिरेकी निर्माण झाले असते...कारण आपल्या देशात ही प्रचंड उपासमार आहे.
खादाडमाऊ.
4 Dec 2008 - 3:42 am | कपिल काळे
असे मी धम्मकलाडूला दिलेल्या प्रतिसादात लिहिले आहे. ही कथा दहशतवादाचे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे. पण मला जे सांगायचे आहे ते वरती संदीप चित्र्यांनी बोलून दाखवले आहे.
फक्त दहशतवादी पकडून किंवा मारुन उपयोग नाही. आता १० मेले तर उदया १०० येतील.
त्यासाठी दहशतवादी पैदा( तयार!) करणारी एक नियोजनपूर्वक चालणारी जी यंत्रणा आहे ते उद्ध्वस्थ करायला हवी. नाहीतर दहशतवादी बनवण्याचा कारखाना सुरुच राहिल. मग ही यंत्रणा नाहिशी करायला अगदी युद्ध करावे लागले तरी हरकत नाही. ते करायला हवे.
माझ्या लेखनात दाखवल्याप्रमाणे गरीबी तसेच शिक्षणाचा अभाव ह्यामुळे पैसे मिळवण्यासाठी तरुण दहशतवादाकडे खेचला जातो.
यावर उपाययोजना करायला हवी. हेच समोर आणण्यासाठी मी हे लेखन केले.
लिहिल्यानंतर मला सुद्धा ते धम्मकलाडू किंवा तुमच्या सारखे दहशतवादाचे उदात्तीकरण वाटले. किंवा तुम्ही म्हणता तशी ही महेश भट्टच्या सिनेमाची कथा वाटते. पण त्याला माझा नाइलाज आहे. ह्यातून सूचित करण्याचा अर्थ समजून घ्या .
माझ्या प्रतिसादानंतर तो अजूनही उघड होइल असे वाटते.
<<समजा आपल्या समाजातील लोकांवर अशी वेळ आली तर आपण असे अतिरेकी बनू? मला नाही वाटत... तसे असले तर आ़ज या जगात बरेचसे हिंदू अतिरेकी निर्माण झाले असते...कारण आपल्या देशात ही प्रचंड उपासमार आहे.>>
नाही हिंदू अतिरेकी निर्माण होणार नाहीत अश्या परिस्थितीत , ह्याला कारण म्हणजे आपल्याकडे उपल्ब्ध असलेले शिक्षण. आपल्या शेजारी तसेच भारतातील मुस्लीम समाजात अजूनही शिक्षणाचा प्रसार म्हणावा तेवढा झालेला नाही. तसेच धर्मावरील श्रद्धेचा गैरफायदा घेणारी साखळी आहेच. त्यामुळे ते अतिरेकाकडे सहज झुकतात. हिंदू झुकत नाहीत.
मला वाटतं की मी लेखनामागचा माझा उद्देश स्पष्ट केला आहे. कळत - नकळत मी कोणाही वाचकाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा.
अजून एक
साहेब म्हणू नका. म्हातारा झालो असं वाटतं
http://kalekapil.blogspot.com/
4 Dec 2008 - 4:32 am | योगी९००
आहो कपिल भाऊ,
मला हि हे कळतेच की तुमचा प्रयत्न आणि ह्या लेखनामागचा उद्देश हा दहशतवादाचे उदात्तीकरण हा नाही. पण एक सेकंद का होइना.. आपल्याला थोडी सहानभुती वाटतेच...जास्त चित्रपट पाहिल्याचा परिणाम...
माझे म्हणणे एवढेच की आत्ता अशा वेळी हा लेख नको होता..तुम्हाला जे सुचित करायचे आहे ते बहुतेक करून सर्वाना माहित आहे.
आता साहेब नाही पण भाऊ म्हणतोय..कारण नकारत्मक प्रतिसादही चांगला हाताळत आहात.
खादाडमाऊ
4 Dec 2008 - 9:15 am | अनिल हटेला
कपीलजी !!
कल्पना विस्तार जमलाये खरं ...
पण तरीही माझ्या सारख्या बैलाला ह्या लोकाची कीव नाय येत हो...
रागच येतोये...
आणी आम्ही रागात एखाद दुसराच जरी शब्द बोललो तरी गहजब होउन जाइन ...
तुर्तास इतकेच की ' लेखन म्हणुन छान आहे..'
सत्य वेगळे ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
(एन्काउन्टर पेशालीस्ट)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
4 Dec 2008 - 12:01 pm | वेताळ
आवडले लिखाण .तुम्ही म्हणता ते ठिक आहे गरिब मुसलमानाना पैशाचे लालुच दाखवुन ते दहशतवादी कारवायाना उद्युक्त करत असावेत. परंतु हे सर्व थांबवायला भारतसरकार ने काही तरी करायला हवे ना? आता ती वेळ आली आहे . बघु आपले बोटचेपे सरकार ह्यावर काय निर्णय घेते ते.
वेताळ
5 Dec 2008 - 11:32 am | विसुनाना
एक कथा म्हणून लेखन चांगले आहे. तुम्हीच दिलेल्या दुव्यांचा एक कल्पनारम्य विस्तार असे म्हणता येईल.
पण ते दुवेही ज्या माहितीवर अवलंबून आहेत ती माहिती देणाराच कितपत खरे बोलत आहे याबद्दल शंका आहे.
त्यामुळे सत्यरंजित कथा असेही म्हणत नाही.