वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे
गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !!
राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे
एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !!
तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे
वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !!
नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा
गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !!
लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे
फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !!
मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला
कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!
प्रतिक्रिया
7 Jul 2015 - 6:59 am | एस
नेमके!
7 Jul 2015 - 8:59 am | dadadarekar
छान...
काही ओळीत वृत्त बिघडले आहे.
7 Jul 2015 - 12:16 pm | होबासराव
मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे संपादकाना
कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त डुआयडी रोखण्याला !!
7 Jul 2015 - 2:10 pm | पथिक
मस्त!
7 Jul 2015 - 2:17 pm | विशाल कुलकर्णी
कवितेचा आशय सुंदर आहे. पण दादा दरेकर म्हणतात त्याप्रमाणे बहुतेक द्वीपदीत वृत्तभंग आहे. टायपो/शुद्धलेखनावर थोडे लक्ष द्या. काही ठिकाणचे वृत्तभंग या टायपोंमुळे झालेले आहेत. पुलेशु.
7 Jul 2015 - 5:25 pm | सटक
तुमचे बरोबर आहे. फालतू चुका झाल्या आहेत टायपोंच्या!! "कपाळी" ऐवजी "कपळी", "फत्तराच्या" ऐवजी "फत्तरच्या". एडिट करायचे तर कसे हे ही माहिती नाही.
पुढील वेळी लक्श देईन....तो "क्ष" ही आत्ता मिळाला आहे!! इतर वृत्तभंग सांगितलेत तर तेही सुधारता येतात का बघेन.
7 Jul 2015 - 5:32 pm | यसवायजी
यांच्याशी संपर्क साधा.
7 Jul 2015 - 9:04 pm | विशाल कुलकर्णी
इतर वृत्तभंग सांगितलेत तर तेही सुधारता येतात का बघेन.
तुमची कविता 'व्योमगंगा' या वृत्तात बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. व्योमगंगा वृत्ताची लगावली असते
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
आता तुमच्या कवितेतल्या द्वीपदी पाहुयात...
वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे
गंध सारे विठ्ठ्लाच्या मूर्तीचे वाहून गेले !!
यातली पहिली ओळ वृत्तात आहे. पण दुसर्या ओळीत "मूर्तीचे वाहून गेले" (गागागागा गालगागा ) इथे वृत्तभंग आहे.
राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे
एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !!
यात ही पहिली ओळ वृत्तात. मात्र दुसर्या ओळीत "एक फत्तर" (गागालल) इथे वृत्तभंग आहे.
तुम्ही ते चढवा चढावे, अन करा मिन्नती हजारे
वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !!
इथे उलटे झालेय. दुसरी ओळ व्यवस्थीत वृत्तात आहे. पहिल्या ओळीत "तुम्ही ते चढवा" (गागागागा), या ओळीत मात्राही जास्त होताहेत.
नाक घासा पयरीवर, उंबर्यावर शीष ठेवा
गंध कोरून घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !!
इथे पहिल्या ओळीत 'पायरीवर' असे केल्यास वृत्त साधले जाईल. दुसरी ओळ वृत्तात आहे. (जर 'कोरुन' चा 'रु' र्हस्व असेल तर)
लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे
फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !!
ही द्वीपदी वृत्तात आहे. (अर्थात 'मूर्तिला' या शब्दात तुम्ही सुट घेतली आहे. कविता असल्याने चालुन जाईल, पण गझल असती तर नसते चालले. खरेतर कवितेत सुद्धा चालायला नकोय कारण ती शुद्धलेखनाची चुक आहे. तो शब्द 'मुर्तीला' असा हवा आहे)
आणि आता शेवटचे कडवे..
मागणे तुमचे नि माझे, आज कळू दे विठ्ठ्लाला
कष्ट आम्ही भोगू सारे, फक्त बडवे रोखण्याला !!
यात "आज कळू दे" (गागागागा) आणि "भोगू सारे" (गागागागा) यामध्ये वृत्तभंग होतोय.
हे जिथे जिथे वृत्तभंग झालेला आहे, तिथे तिथे ती ओळ "गालगागा गालगागा गालगागा गालगागा" मध्ये बांधता येते का पाहा. पुलेशु. :)
7 Jul 2015 - 9:06 pm | विशाल कुलकर्णी
राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे
एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !!
क्षमस्व , इथे 'एक फत्तर' बसतेय वृत्तात. माय मिस्टेक , क्षमस्व !
7 Jul 2015 - 9:13 pm | सटक
मला खरे तर "बस" मधील "स" चा पाय मोडायचा आहे...पण कसे करायचे ते मिळाले नाही!
7 Jul 2015 - 9:11 pm | सटक
तुमचे जेवढे आभार मानावे तितके थोडेच आहेत! मी ह्यावर काम करतो. पाहू काही सुधारणा करता येतात का!!
परत एकदा..खूप खूप धन्यवाद!
8 Jul 2015 - 12:01 am | रातराणी
_/\_
8 Jul 2015 - 12:23 am | सटक
बघा जमलेय का...
वाहिले आकाश सारे, बरसता रात्रीत काळे
गंध सारे विठ्ठ्लाचे, गोमटे वाहून गेले !!
राहिले निर्माल्य केवळ, हरविले ते पुण्यधारे
एक फत्तर बस उभा तो, भंगले देवत्व सारे !!
रोजचे आता चढावे, रोजच्या मिनत्या हजारे
वायद्याच्या कायद्याचे, भरजरी गंडे नी दोरे !!
नाक घासा पायरीवर, उंबर्यावर शीष ठेवा
गंध कोरुन घ्या कपाळी, दक्षिणा परि साथ ठेवा !!
लाख ह्यांच्या पाद्यपूजा, लाख गोंधळ लाख फेरे
फत्तराच्या मूर्तिला त्या ताटव्यांचे रोज भारे !! (मूर्तिला हे शुद्धलेखनी बरोबर आहे असे वाटते आहे, मूळ शब्द मूर्ती)
मागणे तुमचे नि माझे, पोचवा त्या विठ्ठ्लाला
कष्ट आम्ही लाख भोगू, फक्त बडवे रोखण्याला !!
7 Jul 2015 - 5:53 pm | dadadarekar
http://www.maayboli.com/node/21889
7 Jul 2015 - 6:29 pm | सटक
अतिशय सुरेख माहितीचा खजिनाच उपलब्ध करून दिलात!! वाखु साठवली आहे!
7 Jul 2015 - 7:36 pm | विवेकपटाईत
आवडली कविता.