माझं करीयर मार्गदर्शन (!)

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 5:27 pm

परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते. आता दुसरी लोकल पकडणे शक्य नसते. शेवटी आपण त्या गर्दीचाच एक भाग होतो.
असो. तर त्या मुलाला माझ्याकडून थोडं करीयर मार्गदर्शन हवं होतं. आमच्यात संवाद सुरु झाला.

मी त्याला विचारलं," काय राजे? कसं वाटतंय इंजिनियर झाल्यावर?"
"मस्त वाटतंय"
"मग पुढे काय ठरवलंय?"
"तेच ठरवायचं आहे. तुमचं थोडं मार्गदर्शन हवं होतं"
"अरे जरूर ..आवडेल मला..मला सांग इंजिनियरिंग का केलंस तू? म्हणजे आवड की अजून काही ?"

स्व.सर विश्वेशरैय्या आणि ३ इडीयट्समधला रॅंचो सोडून या प्रश्नाच उत्तर कोणालाही सापडलं असेल का याबद्दल मला दाट शंका आहे!

तो उत्तरला," बारावीला चांगले मार्क होते. मग घरातले सगळे म्हणाले की..........."
"बरं बरं..मग नोकरी करायचा विचार आहे का आता?”
"हो"
"बरं मग त्याविषयी काही शंका असेल तर विचार मला."
"करीयरच्या सुरवातीला पहिली कंपनी कशी निवडावी?"

मी बुचकळ्यात पडलो. आपण कंपनी निवडायची असते हे याला कोणी सांगितलं? तसं कॉलेज मध्ये असताना मलाही वाटायचं की आपण आपल्याला पाहिजे त्याच कंपनीत जायचं…मनापासून आवडेल तेच काम करायचं…आपले छंद जपायचे… वर्क- लाईफ बॅलन्स वगैरे भ्रामक कल्पना मीसुद्धा केल्या होत्या. पण कॉलेज संपल्यावर या सगळ्या कल्पना गळून पडल्या
मी म्हणालो," आधी तुला कुठल्या क्षेत्रात जायचंय ते ठरवं. मग त्या क्षेत्रातल्या कंपन्या शोध. आणि मुलाखत देत रहा."
आता या वाक्याचा मनात म्हटलेला उत्तरार्ध खालीलप्रमाणे होता.
"शेवटी कोणतीही कंपनी आपल्याला भाव देत नाहीये हे लक्षात येइलच. मग मिळेल ती नोकरी स्वीकारून गप गुमान बसं!"
"मुलाखतीची तयारी कशी करावी ?", त्याने विचारले.
या प्रश्नाचा दुसरा अर्थ मुलाखतीत विचारणाऱ्या प्रश्नांचे '२१ अपेक्षित' कुठे मिळते असा होतो.
मला एकदम कॉलेजमधले व्हायव्हाचे दिवस आठवले. पहिल्या रोलनंबरचा मुलगा व्हायव्हा देऊन बाहेर आला की आम्ही सगळे त्याला घेरून ," काय विचारते बे मास्तर ?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडायचो. अर्थात मास्तरनी काहीही विचारलं तरी आपल्याला येणार नाहीये हे माहिती असायचं. मग मास्तरसमोर उगाचच विचारीमुद्रेचा अभिनय करून, दोन-चार इकडतिकडचे शब्द जोडून उत्तर तयार व्हायचं. मास्तरांची सहनशक्ती संपली की ते बाहेर हाकलायचे.

मी म्हणालो," आधी तर तुझ्या क्षेत्रातले बेसिक कन्सेप्ट्स क्लियर करून घे"
हा सल्ला काही जगावेगळा नव्हता. पण मी तो देण्यामागचं कारण होतं, 'मी दिलेली पहिली मुलाखत'!
"इंजीनियरिंगमध्ये तुमचा आवडता विषय कोणता होता?”, एका नामांकित कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंटने मला मुलाखती दरम्यान विचारले.
बोंबला!! आता काय सांगाव? कोणताही विषय सांगितला तर त्यावर हा मला फाडून खाणार हे निश्चित.
"थर्मोडायनामिक्स!" मी सांगितले.
थर्मोडायनामिक्स शिकवणाऱ्या सरांची शप्पथ घेऊन सांगतो की मी खोटं बोलत होतो. परीक्षेत माझ्या समोर बसणाऱ्या मित्राने जर हे उत्तर ऐकलं असतं तर तिथेच मला झोडपून काढलं असतं. पण आत्ता तो माझ्या समोर बसला नव्हता. माझी मुलाखत सुरु होती. शिवाय इतर विषयांपेक्षा या विषयाचा अभ्यास मला जरा जास्त वेळ (वेळा!) करावा लागला होता. त्यामुळे ह्यातलं ज्ञान इतर विषयांपेक्षा ३-४ टक्क्यांनी जास्त असल्याची माझी समजूत होती. (चाळीस अधिक तीन-चार म्हणजे चौरेचाळीस टक्के असा हिशोबही मनातल्या मनात मी करून टाकला !)
"ओह्ह.. आय सी", व्हाइस प्रेसिडेंट.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपत नव्हता. आणि माझ्या चेहऱ्यावरचे शुन्य भावही त्यांनी टिपले असतीलच.
“कॅन यु एक्सप्लेन दी सिमील्यारीटी बिटविन फ़र्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ?"
एव्हढंच ना ! फ़र्स्ट अँड सेकंड लॉच्या भरवश्यावरंच तर परिक्षा (एकदाची!) पास झालो होतो. मी भडाभडा उत्तर दिले. आणि विचारलेले नसताना आगाऊपणा करून समोरच्या कागदावर उदाहरणसुद्धा एक्सप्लेन करून दिले.
"गुड, व्हेरी गुड… पॉवर प्लांटमध्ये थर्मोडायनामिक्सचं अप्लिकेशन कसं असतं जरा सांग ", ते म्हणाले. (ही मुलाखत बहुभाषिक पद्धतीने सुरु होती)
अरे देवां… पहिल्या लोवर फुलटॉसवर षटकार मारल्यावर पुढचा चेंडू असा ब्लॉक होलमध्ये आला तर सेहवागची जी अवस्था होईल तशी माझी झाली होती. पण शेवटी सेहवाग तो सेहवागच! थर्मोडायनामिक्सशी संबंधित तीन -चार शब्द पकडून मी अंदाधुंद फटकेबाजी सुरु केली. साधारण १५ मिनिटे बोलल्यावर त्यांनी मला थांबवलं.
ते म्हणाले," यंग मॅन… टुडे यु हॅव चेंज्ड माय बेसिक कन्सेप्ट्स ऑफ थर्मोडायनामिक्स!!"

"पण मुलाखतीत फक्त बेसिक कन्सेप्ट्स विचारतात का?", त्याच्या या प्रश्नाने मी भानावर आलो.
"फ्रेशर्स मुलांना तरी तेच विचारतात", मी उत्तरलो.
"पण असं का? असे सोपे प्रश्न विचारून त्यांना माझ्यातलं टॅलेंट कसं कळणार?"
(अरे मग पहिल्याच दिवशी तुला काय क्रायोजेनिक इंजिन डिझाईन करायला सांगणार का? की एक्स्प्रेस वे कसा बांधतात ते विचारणार? की स्विस बँकेसाठी सॉफ्टवेयर बनवायला सांगणार? -- माझ्या मनातलं उत्तर!)
"हे बघ असं नसतं...आधी तुझी आकलनशक्ती, ज्ञान, समज, योग्यता यांची पारख केल्या जाते. त्यात तू पास झाला तरच तुझी निवड करतात.मग तुला योग्य ते प्रशिक्षण देऊन छोटे-मोठे काम देतात. नंतर तुझं टॅलेंट दाखवायला तू मोकळा आहेस."
"पण हे तर चुकीचं आहे ना!”
"का? ह्यात चुकीचे काय वाटतंय तुला?”, मी म्हणालो.
"ते नाही सांगता येणार. पण चुकीचं आहे हे निश्चित!” तो ठामपणे म्हणाला.
साधारणपणे सगळ्या नवख्यांना प्रस्थापित गोष्टी चुकीच्याच वाटतात. परीक्षांमध्ये मिळालेले थोडेबहुत मार्क्स आणि कॉलेजमधले दोन -चार कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव गाठीशी घेऊन हे नवखे अख्ख्या भांडवलशाहीच्या विरोधात उभे राहण्याच्या बेतात असतात. इंजीनीयरिंग किंवा अन्य कोणतेही शिक्षण पूर्ण केले म्हणजे आपण एक युद्ध जिंकून आता नव्या युगाच्या नेतृत्वासाठी सज्ज आहोत अश्या आविर्भावात वावरतात. आम्हीही असेच होतो. बरं एखादी कंपनी, तिथले कामाचे स्वरूप आणि ह्यांचे त्याविषयीचे स्वप्नरंजन हे सर्वस्वी भिन्न असते. उदा. रिसर्च आणि डेव्हलपमेण्टमध्ये जाऊ पाहणाऱ्या नवख्यांना, तिकडे गेल्यावर आपण डायरेक्ट पाण्यावर धावणाऱ्या गाडीचेचं संशोधन करणार असं काहीसं वाटतं असते. किंवा सॉफ्टवेयर कंपनीत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी आपल्याला अमेरिकेच्या विमानात बसवणार अशी रम्य कल्पना असते.
"तुमच्या क्षेत्रात माझ्यासाठी काही स्कोप आहे का?", त्याने विचारले.
"आहे ना...पण नको येऊ आमच्याइथे.काही खरं नाही. मलाच पश्चाताप होतो कधीकधी."
हा प्रश्न त्यानी मलाच काय अगदी बिल गेट्सला जरी विचारला असता तरी हेच उत्तर आलं असतं !
"मग काय करू मी? बाबा म्हणतायेत एमबीए कर"
"अरे मग कर ना..बरोबर सांगतायेत ते. हे बघ हेच वय असतं शिकण्याच. नंतरच काही सांगता येत नाही. खूप अडचणी येतात."
आता हे संभाषण जरा सोप्या ट्रॅकवर आलं होतं. काय आहे की कोणालाही, अरे तू हे शिक..तू ते शिक असं सांगणं खूप सोपं असतं. त्यातही एमबीए हे एक गोग्गोड स्वप्न आहे ज्यात कोणीही सहज फसतं. बीई,एमबीए किंवा बीएस्ससी,एमबीए असं बिरुद नावामागे लागलं की आपलं पोरगं एकतर जनरल मॅनेजर तरी होईल किंवा वॉलमार्टसारखी कंपनी तरी सुरु करेल असं सगळ्या पालकांना वाटतं.
"एमबीए करून पुढे काय स्कोप आहे?",त्याने विचारले.
"फक्त स्कोप वगैरे असा विचार करू नको रे. कदाचित एमबीए करूनही तुला तेव्हढ्याच पगाराची नोकरी मिळेल पण ते शिक्षण कधी ना कधी उपयोगी पडेलच."
"पटतंय मला तुमचं. एमबीए करणंच बरोबर ठरेल"
"हो...पण फक्त मी किंवा तुझे बाबा म्हणतायेत म्हणून करू नको. तुझी इच्छा असेल तरच कर"
"हो"
आता मी 'नरो वा कुंजरो वा' या भूमिकेत शिरलो होतो. शिक्षण कधीच वाया जात नाही हे वादातीत वाक्य मी बोललो होतो. आणि अर्थात अतिशिक्षणाचा फायदा काय ह्यावर गप्प बसलो होतो. इथे आमचं संभाषण संपलं. तो समाधानी होऊन त्याच्या घरी गेला. मी त्याच्या वडीलांकडून मिळणारे आशीर्वाद आणि २ वर्षांनी त्याच्याकडून मिळणारे शिव्याशाप ह्यांचा विचार करत बसलो.
-- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

1 Jul 2015 - 5:52 pm | बबन ताम्बे

सही. विनोदी अंगाने सद्य आणि सत्य परिस्थितीचे उत्तम चित्रण केले आहे.

लिखाण उत्तम.

संदीप डांगे's picture

1 Jul 2015 - 6:52 pm | संदीप डांगे

आमचा आवडता विषय...

धमाल लिहिलंय आणि त्यातलं सत्यही तितकंच बोचरं आहे.

"आहे ना...पण नको येऊ आमच्याइथे.काही खरं नाही. मलाच पश्चाताप होतो कधीकधी."
हा प्रश्न त्यानी मलाच काय अगदी बिल गेट्सला जरी विचारला असता तरी हेच उत्तर आलं असतं !

>> हे एक नंबर...

विवेकपटाईत's picture

1 Jul 2015 - 7:18 pm | विवेकपटाईत

बी टेक, बी एस सी केलेली मुले MTS दहा हजारापेक्षा कमी पगाराची नौकरी करत आहे. थोक भावात उच्च शिक्षणाच्या शाळा (?) उघडण्याचा परिणाम.

सस्नेह's picture

1 Jul 2015 - 8:16 pm | सस्नेह

करिअर हा गहन विषय आहे खरा.

ऋतुराज चित्रे's picture

1 Jul 2015 - 8:29 pm | ऋतुराज चित्रे

विषय व लिखाण आवडले.
सिव्हिलचा अपवाद वगळता बाकिच्या इंजिनिअरिंग शाखांचे किती टक्के विद्यार्थी स्वतंत्र व्यवसायाचे स्वप्न बघतात व पुर्ण करतात? जसे मेडिकल चे विद्यार्थी करतात.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2015 - 9:13 pm | मुक्त विहारि

माझ्या मुलाला पण हाच प्रॉब्लेम भेडसावत आहे.

पण सध्या तो इंजि.च्या ३र्‍या वर्षाला असल्याने, पुढच्या आठवड्यात, आम्ही दोघे करियर मार्गदर्शनाकडे जावू.

तुमच्या ह्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.

हे असे लेख वाचले की, मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो.

क्रेझी's picture

2 Jul 2015 - 10:23 am | क्रेझी

मुविजी तुम्ही करियर मार्गदर्शकाकडून आल्यावरचा अनुभव नक्की आम्हांला सांगा हं, मला फार उत्सुकता आहे करियर मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय सांगतात ह्याबद्दल :)

@चिनार - लेख छान जमलाय :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Jul 2015 - 9:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे मग पहिल्याच दिवशी तुला काय क्रायोजेनिक इंजिन डिझाईन करायला सांगणार का?

हेहेहेहेहेहेहे!!! खुप छान लिहिलयं.

बेसिक फंडा माहित नसेल तर त्या मुलानी साधा रेडिएटर डिझाईन केला तरी डोक्यावरुन पाणी.

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 12:30 am | उगा काहितरीच

सत्य आहे :-( :-(
(इंजिनियरींग पोस्ट ग्रॅज्युएट बेरोजगार)

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

2 Jul 2015 - 1:42 am | अरवीन्द नरहर जोशि.

आति उत्तम विशय आहे.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

2 Jul 2015 - 1:42 am | अरवीन्द नरहर जोशि.

आति उत्तम विशय आहे.

हेहेहेहे छान लिहिलंय. पण आज कालची मुलं इतकी भाबडी नसतात हो. उलट एवढ्यात ज्यांनी ईंजिनियरींग केलंय किंवा शेवटच्या वर्षाला आहे त्यांचा आवाका बघुन कौतुक वाटतं. सगळीच तशी नस्तात पण तो खुप सारी कॉलेजेस उघडल्याचा परिणाम असावा.

काही वर्षातच माझा लेकही यातून जाईल!त्याला देते वाचायला!!

चिनार's picture

2 Jul 2015 - 9:18 am | चिनार

धन्यवाद !!

सिरुसेरि's picture

2 Jul 2015 - 10:06 am | सिरुसेरि

करीअरचा बाउ करु नये . खुद्द रामशास्त्री यांनीही खुप उशीरा काशीला जाउन वेदविद्या अध्ययन घेतले होते . त्यातूनही कुणाला जर खात्रीची 'कल चाचणी घेणारी केंद्रे' माहित असतील तर , येथे माहिती द्यावी. माझाच याच विषयावरील एका लेखातील प्रतीसाद येथे परत देत आहे . पहिल्या व दुसरया महायुद्धामध्ये सैनिक म्हणुन भारतातील अनेक गावातील लोकांची इग्रजांनी सक्तीने भरती केली होती. पण याच सैनिकांनीही युद्धामध्ये पराक्रम गाजविला.
माणसाचे मन हे खुप चंचल असते . कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते. याला अपवाद म्हणजे - लताजी , आशाजी , भिमसेनजी , सचिन , सुनील इत्यादी. पण ही सर्व थोर माणसे . सर्व सामान्य माणसांनी यांच्याशी आपली तुलना करु नये . व जे कुठले क्षेत्र आपल्याला लाभले त्यामध्येच नवीन काहीतरी करुन दाखविण्याचा ध्यास बाळगावा . खुद्द पु.ल. देशपांडे यांचेही शिक्षण बी.ए. , एम्.ए. , एल्.एल.बी. असे झाले होते .व कथा , नाट्य - साहित्य लेखन , वाचन , संगीत - गायन , वादन , गीत , अभिनय ,दिग्दर्शन ,चित्रपट , ध्वनी , छायाचित्रण ,प्रवास, भाषा ,प्राध्यापकी , सादरीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचीही मुशाफिरी झाली होती . व त्यांनीही हे सर्व वेळोवेळी मनापासुन एन्जॉय केले होते .

हे सांगणे / बोलणे खूप सोपे असते साहेब. मध्यम वर्गीयांना हे निर्णय घेणे एवढे सोपे नाही जात. आम्हाला इंजिनियरिंग ला अडमिशन घेतल्यावर हेच का घेतले तेच का घेतले नाही. स्कोप कुठे आहे वगैरे फुकटचे सल्ले देणाऱ्या एका शिक्षकपेशा नातलगाची स्वताच्या मुलाच्या १२ वी नंतर काय करायचे आणि इंजिनियरिंग करायचे तर कोणत्या क्षेत्रात या विचारांनी पळता भुई थोडी होताना पाहिले आहे अस्मादिकांनी

अभियांत्रिकी कॉलेज चा बाजार बसण्यआधी BE आणि बाजार उठायला लागल्यानंतर PG केलेला
कहर

संदीप डांगे's picture

3 Jul 2015 - 11:32 pm | संदीप डांगे

कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते
माझ्यामते माझ्या आणि चिनार यांच्या लेखात आवडीच्या क्षेत्रात असूनही कुरबूर करणार्‍या व्यक्तींबद्दल लिहिलेले नाही. त्यामुळे वरील वाक्य या दोन्ही लेखांच्या बाबतीत अप्रस्तुत वाटतं. दोन्ही लेखांचा उद्देश आपल्या आवडी-निवडीनुसार विचारपुर्वक ज्यात काम करायला आवडेल असे क्षेत्र निवडतांनी विद्यार्थी-पालकांना येणारे अनुभव हा आहे.

माणसाचे मन चंचल असते हे मान्य. पण एखाद्याचा उपजत व्यवसाय-कल हा स्थिर असतो. याला अपवाद आहेत पण म्हणून ते खोटं ठरत नाही. माझ्यामते कुणीही सर्वसामान्य नसतो. प्रत्येकात काहीतरी विशेष असतेच. काहिंना ते बाहेर येण्यास योग्य ती पार्श्वभूमी लाभते काहिंना नाही. बहुसंख्य लोकांमधे एकप्रकारचा न्यूनगंड असतो. चाकोरीबाहेर जाण्याची हिंमत नसते. सुरक्षित व सामाजिक प्रतिष्ठेचं आयुष्य जगायचे ही सर्वात पहिली प्राथमिकता असते.

करीअर म्हणजे ज्या क्षेत्रात जास्त स्कोप (पैसा वा संधी) आहे त्यात काम/नोकरी/व्यवसाय करून चरितार्थ चालवणे/संपत्ती गोळा करणे असं ढोबळमानाने समजल्या जातं. जे मुदलात चुकीची धारणा आहे. आयटीचा बूम आलाय तर कुणी भरमसाठ पगाराची नोकरी मिळवून इतरांपेक्षा लवकर सेटल झालाय म्हणजे तो त्याच्या करीअर मधे यशस्वी झालाय असं नसतं. त्याने पैसे मिळवण्याची एक संधी मिळवली असते. ते काम करून तो मनातून खूष असेलच असे नाही.

करीअर म्हणजे व्यक्तिगत आवडी-निवडी, क्षमता, बुद्धिमत्ता इत्यादींच्या अनुषंगाने एखादे क्षेत्र निवडून व्यक्तिगत व समाजाचा विकास साधण्यात मोलाची भूमिका बजावणे असा आहे. निवडलेल्या क्षेत्रात आवड असते म्हणून रस घेऊन अधिक काम आणि त्यातून अधिक योग्यता मिळत जाते. यात पैसा हा दुय्यम असून योग्यता व अधिकार यानुसार वेगवेगळ्या पातळीवर योग्य तो पैसा मिळेल हे गृहितक अध्याहृत असतं. सामान्यपणे लोक कुठे पैसा आहे हे बघून क्षेत्र निवडतात. खरंतर स्वतःचा, कामाचा दर्जा वाढला की पैसा मागोमाग चालत येतो हे समिकरण खरं असतं. रँचोच्या मते 'काबील बनो कामयाबी झक मारके पिछे आयेगी'. आणि माझ्यामतेही हेच अंतिम सत्य आहे.

पुढचा मुद्दा असा की जे क्षेत्र मिळालंय त्यातच आनंद माना. ही अगदी शरणागतीची भूमिका आहे. आयुष्य कुठल्याही क्षणी कधीच संपलेलं नसतं. प्राप्त परिस्थितीत बदल करणे आवश्यक आहे असं एखाद्याला वाटत असतं ते त्याला शक्यही दिसतं, पण फक्त न्यूनगंड किंवा भीती यामुळेच तसं करणं तो कायम टाळत असतो. आपल्याकडेही एखादी गोष्ट केली की चुकीचेच कसे होईल याचीच चर्चा जास्त होते. ते टाळून हेच करायचं असेल तर काय उपाय आहेत ते कधीच चाचपून बघितले जात नाही.

साधं उदाहरण देतो. एखादयाला मॉडेल म्हणून काम करायचं आहे. आता मॉडेल म्हटलं की लगेच '३६-२४-३६' हेच डोळ्यासमोर उभं राहतं. पण मॉडेल इंडस्ट्रीकडे जरा व्यवस्थित बघितलं तर हे ३६-२४-३६ ची गरज इतर मॉडेल्स च्या मानाने फारच कमी असतं. म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही क्षणी एखादी व्यक्ती मॉडेलचं काम करू शकते. अगदी लहान बाळापासून ८० वर्षाच्या आजीआजोबापर्यंत कुणीही. पण खरंच किती लोकांच्या डोक्यात हा विचार येतो? मॉडेल इंडस्ट्रीला सतत अशा लोकांची गरज असते. आपण आपल्या डोळ्यांनी हजारो अ‍ॅडस बघत असतो, त्यात असे सगळे मॉडेल्सच वापरलेले असतात. किती अ‍ॅड्स ३६-२४-३६ वाल्या मॉडेल्सची असतात? फेविकॉलची कतरीना कैफवाली अ‍ॅड. यात सगळ्यांना कतरीना लक्षात राहते पण दुर्लक्ष केल्या जाणारे तो नवरदेव आणि ती लठ्ठ-बेढब नवरी हेही मॉडेल्सच आहेत, त्यांच्याशिवाय त्या अ‍ॅडला अर्थच नाही. झापडबंद मानसिकता ती हीच. समोर दिसूनही चाकोरीबद्ध विचारपद्धतीने शक्य ते पर्यायांची नोंद घेतल्या जात नाही. हेच इतर व्यवसायांमधेही होतंच. मॉडेलींगचं उदाहरण सर्वपरिचयाचं म्हणून दिलंय.

एकदा आपल्या आवडत्या क्षेत्रात आलो की नेहमी आवडीचंच किंवा मनाला पटेल असंच काम करायला मिळेल असंही नसतं. तेव्हा जे मिळालंय ते आवडीनं करा असं म्हणणे संयुक्तिक आहे. मी एक जाहिरात-व्यवसायिक आहे. मला व्यक्तिशः एखादी गोष्ट पटत नाही त्याच व्यक्तीचं, कंपनीचं जाहिरातीचं काम आले तर ते मी आवडत नसेल तरीही नाकारणार नाही. त्या संदर्भात माझे अत्युच्च ज्ञान आणि अनुभव वापरून योग्य तो रीझल्ट देणे हेच माझे उद्दीष्ट असेल. इतर व्यवसायतंही असंच होत असेल. पण जाहिरात व्यवसायिक म्हणून मला अनैतिक किंवा समाजविघातक काम करायला लागले तर ते आनंदाने काय कसेच करू शकणार नाही. नावडीचं काम आवड म्हणून सतत करायला लागणे हा व्यक्तिगत क्षमतांचं अपरिमित नुकसान आहे. यात फोर्थ लेबरची कामं ही फार आवडीची म्हणून केली जातील का असाही प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. मुळात ती कामं करायला जे लेबर लागतं त्यांची प्राथमिक गरज सुरक्षित नोकरी आणि अन्न असतं. ही कामही आवडीनं करणारी लोक असतातच.

कुरकूर करणारे कुठेही असू शकतात. चपराशापासून एखाद्या देशाच्या अध्यक्षापर्यंत कुणीही कुरकूर करु शकतो. त्याचा करीअरशी संबंध नाही.

अभिजीत अवलिया's picture

4 Jul 2015 - 11:27 pm | अभिजीत अवलिया

सुंदर उत्तर संदीप.

सुबोध खरे's picture

7 Jul 2015 - 9:24 am | सुबोध खरे

कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते.
डांगे साहेब
बर्याच लोकांना आपल्या बायकोच्या बाबतही असेच वाटत असते. ( ह. घ्या.)
बाकि प्रतिसाद समर्पक आहेच.

संदीप डांगे's picture

7 Jul 2015 - 1:33 pm | संदीप डांगे

अगदी खरे आहे डॉक्टरसाहेब. कारण पलिकडचे शेत नेहमीच हिरवंगार दिसतं.

साधा मुलगा's picture

9 Jul 2015 - 12:38 pm | साधा मुलगा

" बेंबट्या, एक लक्षात ठेव नोकरी आणि बायको कितीही बदला, दुसर्याचीच चांगली वाटते!"
-पु. लं च्या असामी असामी मधून साभार

चिनार's picture

6 Jul 2015 - 12:15 pm | चिनार

समर्पक प्रतिसाद..

मित्रहो's picture

2 Jul 2015 - 12:43 pm | मित्रहो

बारावी नंतर कुठली ब्रँच घेउ? कोणत्या ब्रँचला जास्त वाव आहे?
आयूष्याची फक्त 18 वर्षे झाली असतात आणि साधारण अजुन ५० ते ६० वर्षे बाकी असतात. पुढे कशाला वाव येइल हे कसे कोण सांगनार. मुलांचा दोष नाही हा प्रश्न मनात ठेवून मी पण हिंडलो होतो. आमचे मार्गदर्शक कोण तर आमच्यापेक्षा फक्त दोन ते तीन वर्षाने सिनियर मुले.

मी MBA करु, M. Tech करु की नोकरी करु?
बऱ्याचदा गोम अशी असते आईवडीलांना वाटते मुलाने नोकरी करावी पण मुलगा अजूनही मजेत जगण्याच्या मूडमधे असतो. तसे बघितले तर कमीत कमी चार ते पाच वर्षे अनुभव असल्याशिवाय MBA करु नये.

कोणती कंपनी जॉइन करु?
फार कठीण प्रश्न आणि उत्तर नाहीच.

तुमच्या इथे जमेल काय?
रेझ्युमे पाठवा

वेल्लाभट's picture

2 Jul 2015 - 3:36 pm | वेल्लाभट

हं............

अभिजीत अवलिया's picture

4 Jul 2015 - 11:29 pm | अभिजीत अवलिया

हसून हसून पुरेवाट.
इंजिनीरिंग करून फसलेला अभिजित अवलिया.

यशोधरा's picture

5 Jul 2015 - 3:40 am | यशोधरा

आवडला लेख.

"माणसाचे मन चंचल असते . कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते." - या बाबतीत बरेचदा आजुबाजुचे फुकट सल्लागार कारणीभुत असतात . 'वडील , मुलगा व गाढ्व' ही कथा तर सर्वांनाच माहिती आहे .
त्यातील वडील , मुलाप्रमाणेच, अजाण मुले / त्यांचे चिंतातुर पालक हे त्या वेळी मनाच्या चंचल अवस्थेत असतात . सततच्या वेगवेगळ्या परस्पर विरोधी करीअर विषयक सल्ल्यांमुळे मनुष्य गोंधळुन जाउ शकतो. व खरोखरच एखाद्या चांगल्या क्षेत्रात असतानाही त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटु लागते . त्यामुळेच 'डरके आगेही जीता है\ आणी 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' हे लक्षात ठेवावे . त्यामुळे कोणी जर खरोखरच एखाद्या चांगल्या क्षेत्रात असेल किंवा आला असेल तर त्याने त्यातच ठाम राहावे.

नाखु's picture

6 Jul 2015 - 8:53 am | नाखु

पण आम्च शंकेखोर मन त्याच्या काही जुनाट शंखा !!!!

  • आपल्या पाल्याच आवडीचं क्षेत्र आणि कल नक्की पाल्याचे कितव्या वर्षी कळतो ?
  • कल आणि आवड यात नक्की कशाला ज्यास्त महत्व द्यायचे?
  • आवड असून्ही क्षमता आणि गुणवत्ता यांची कमतरता असेल तर काय करावे ?
  • घरची परीस्थीती आणि कुटुंबातील स्वतःचे स्थान (थोरला-धाकटा) याचा काहीच परीणाम होत नाही का?
  • करियर मार्गदर्शनाकडे जाण्याची योग्य वेळ कोणती दहावी-बारावी-??

संबंधीतानी + जाणकारांनी विजेरी झोत टाकावा ही विनंती.

बालक असलेला पालक नाखु

संदीप डांगे's picture

6 Jul 2015 - 1:05 pm | संदीप डांगे

'आयुष्य आणि करीअर' चा दुसरा भाग लिहितोय. माहिती गोळा करतोय. लवकरच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यातून होईल. :-)

मृत्युन्जय's picture

6 Jul 2015 - 12:00 pm | मृत्युन्जय

खतरनाक लिहलय. कुठल्याही करीयर मध्ये घुसणार्‍या माणसाला आपण काय करतोय हे माहिती असते की नाही कुणास ठाउक.

चिनार's picture

6 Jul 2015 - 2:02 pm | चिनार

धन्यवाद !

खटपट्या's picture

6 Jul 2015 - 3:17 pm | खटपट्या

चांगलाय लेख.

इनिगोय's picture

7 Jul 2015 - 9:00 am | इनिगोय

लेख अगदी मुद्देसुद.

अलिबाबा.कॉम चे संस्थापक जॅक मा यांचा याच विषयाशी सुसंगत असा हा एक व्हिडिओ.

https://www.youtube.com/watch?v=tCvDhzK0nCw

निरन्जनदास's picture

7 Jul 2015 - 3:01 pm | निरन्जनदास

भारतात १० + २ + ३ ही अत्यंत दिव्य शिक्षण पद्धती आहे.
तिचे आध्यात्मिक वर्णन, -
"आता कसं वाटतंय !? गार गार वाटतंय "
"आता कसं वाटतंय !? गार गार वाटतंय "
"आऽऽताऽऽऽ कसं वाटतंय !? गार्र गार्र गार्र वाटतंय "
"आता कसं वाटतंय !? लै गार वाटतंया "
.. .. .. ..
यापुढील व्हर्शन आपापल्या मगदुरानुसार वाचाव्यात. शक्यतो लिहाव्यातच. इतरांना लाभ होईल. त्यात प्रादेशिक शिव्यांची फोडणी मारावी, तर मग खमंगपणा लज्जत वाढवेल.

चिनार's picture

7 Nov 2015 - 2:32 pm | चिनार

प्रस्तुत लेख उत्तमकथा मासिकाच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Nov 2015 - 5:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

चिनार भाऊ लैच ख़ास न हो! निरा दांगडो! मले एकदम चष्मा लावेल तो होतकरु पोट्टा अन जिंदगी घोऊन पेलेले तुम्ही दोघ बी दिसले!

चिनार's picture

9 Nov 2015 - 10:51 am | चिनार

धन्यवाद बाप्पू …