मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जनातलं, मनातलं
12 Jun 2015 - 9:39 am

मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन

आज इतकी वर्षे झाली पण मला कधी झोप येत नसेल तर आठवते लोरी म्हणजे अंगाई गीत. लहानपणी आईने अनेकदा अंगाई म्हणून निजवले असले तरी जेव्हापासून हिंदी चित्रपट संगीताचा शौक जडला तेव्हापासून दोन लोरी गीतांनी माझ्यावर जबरदस्त मोहिनी घातली. एक म्हणजे अलबेला मधील “धीरेसे आजा रे अखियनमें निंदिया आजा रे आजा” आणि दुसरी झांझर मधली “जा री जा निंदिया जा निंदिया जा न आ अखियोमें आज न आ”. या दोन्ही लोरीना सी रामचंद्र उर्फ अण्णा यांच्या संगीताचा परीसस्पर्श आणि लता दिदींची अमृतवाणी लाभली आहे.

सी रामचंद्र असे मद्रासी धाटणीचे नाव घेऊन हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अजरामर संगीताची छाप सोडलेले रामचंद्र नरहर चितळकर हे एका उच्च ब्राम्हण कुळात जन्मलेले. नगर जिल्ह्यातील पुणतांबे हे त्यांचे गाव. वडील रेल्वेखात्यात नोकरीला होते. रेल्वेच्या क्वाटर्समध्ये राहताना संगीताचे गुण रक्तात भिनलेले आणि शिक्षणात रस नसलेले अण्णांनी सुरवातीच्या काळात अनेक टक्केटोपणे खाल्ले. पण काही करायचे ते संगीतक्षेत्रातच करायचे या जिद्दीने त्यांनी आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना केला. आणि म्हणूनच अलबेला, अनारकली सारखे अविस्मरणीय संगीताने नटलेले चित्रपट ते देऊ शकले.

चित्रपट गाण्यात पाश्चिमात्य वाद्यांचा बेमालूम वापर करून अगदी निरर्थक वाटणाऱ्या शब्दांची पण गाणी बनविण्यात अण्णांची हातोटी होती. "अपलम चपलम" किंवा "आना मेरी जान संडे के संडे" वा "इना मीना डिका" अशा धाटणीची गाणी कमालीची लोकप्रिय करून दाखविली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे हिंदी गाण्यात पाश्चिमात्य वाद्यांचे आगमन ही अण्णांमुळे झाली असे मानले जाते. त्यावेळच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन त्यांना आवडतील अशी उडत्या चालीची गाणी बनविण्यात आणि ती यशस्वी करून दाखविण्यात त्यांचा हातखंडा होता.

पण गाणे उडत्या लयीचे असो वा तरल प्रेमगीत असो, विरहगीत असो वा एखाद्या रागदारीवर आधारित असो अण्णा तितक्याच तन्मयतेने आणि सहजेतेने ते गाणे संगीतबध्द करायचे. म्हणूनच आजच्या रिमिक्सच्या जमान्यात सुध्दा त्यांच्या चित्रपटाच्या गाण्यांना अजूनही पसंती मिळते.

अण्णांनी आपल्या आयुष्यात अनेक नवीन चेहऱ्यांना पुढे आणले. मधुबाला झवेरी हे त्यातलेच एक नाव. अतिशय गोड गळ्याची ही गायिका दुर्दैवाने काही गाण्यांच्यापुढे जाऊ शकली नाही. लता दीदींची कारकीर्द घडविण्यात अण्णांचा ही मोलाचा वाटा होता. “ए मेरे वतन के लोगो” सारख्या अजरामर गीताची चाल सुध्दा त्यांनीच बांधली होती. भगवान दादा सुध्दा त्यांच्या पाठीशी नेहमी असायचे. खूप थोड्या लोकांना हे माहित असेल की सारे जहा से अच्छा हे प्रसिध्द देशभक्तीपर गीत अण्णांनी 1942 मध्ये “सुखी जीवन” नावाच्या चित्रपटासाठी संगीतबध्द केले होते.

शेवटी माझ्या अतिशय आवडीची अण्णांची काही गाणी इथे देऊन मी इथे आवरते घेतो आहे. यामध्ये अण्णांच्या अनारकली, अलबेला, नवरंग, आझाद, पतंगा, शहनाई सारख्या प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यांचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे कारण ती सर्वतोमुखी आहेतच. त्यांच्या कमी प्रसिध्द पण मला आवडलेल्या पाच गाण्यांचा उल्लेख इथ केला आहे.

मला आवडलेले संगीतकार :– 3 अनिल बिश्वास

कलासंगीत

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jun 2015 - 9:46 am | मुक्त विहारि

वाखूसा

विशाल कुलकर्णी's picture

12 Jun 2015 - 10:22 am | विशाल कुलकर्णी

हा लेख सुद्धा छान जमला आहे. माझी परत तीच तक्रार आहे, खुप लवकर संपल्यासारखा वाटला....

सी रामचंद्र असे मद्रासी धाटणीचे नाव घेऊन हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अजरामर संगीताची छाप सोडले

आपल्या संगीत कारकिर्दीची सुरूवात अण्णांनी ’जयकोडी’ नामक एका तमिळ चित्रपटापासून केली होती. कदाचित त्यामुळे रामचंद्र चितळकर हे मराठमोळे नाव न घेता सी. रामचंद्र हे दाक्षिणात्य ढंगाचे आणि काहीसे सुटसुटीत नाव अण्णांनी घेतले असावे. हिंदीतला त्यांचा पहिला चित्रपट होता भगवानदादांचा ’सुखी जवान’ हा चित्रपट कचकून आपटला. पण यातलं गाजलेलं गाणं म्हणजे कवि इकबाल यांचं "सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा". पहिला चित्रपट जरी पडला असला तरी भगवानदादांनी आपल्या अजून एका चित्रपटासाठी अण्णांना संधी दिली. हा चित्रपट मात्र तुफ़ान चालला. नाव होते ’अलबेला’ . अण्णांच्या गाण्यांनी अक्षरश: इतिहास घडवला. ’भोली सुरत दिलके खोटे’ या गाण्याने भगवानदादांना त्यांची ओळख मिळवून दिली.

भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा मनोहारी संगम प्रथम घडवून आणण्याचे श्रेय मला वाटते अण्णांनाच द्यायला हवे. पाश्चात्य संगीताला भारतीय शैलीत गुंफ़ण्याचे काम करणारा हा मनस्वी संगीतकार. मला वाटतं या प्रकारच्या फ़्युजनची परंपरासुद्धा अण्णांनीच प्रथम आपल्याकडे आणली. त्यानी रंबा संबा (गोरे गोरे ओ बाके छोरे),रॉक एन रोल (इना मिना डिका ) ही शैली रुजविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले.ट्रंम्पेट, ओबो, सेक्सोफोन, चेलो, ड्रम्स, स्पॅनिश गिटार ,हार्मोनिका यासारख्या विदेशी वाद्यांचा वापर त्यांच्या संगीतात सर्रास आढळतो. अर्थात भारतीय वाद्येही तितक्याच ताकदीने हाताळली त्यांनी. ’अनारकली’च्या ’ये जिंदगी उसीकी है’ मध्ये वापरलेली सतार कोण विसरू शकेल? १९४४-५५ हा त्यांच्या बहराचा काळ होता. १९५८ मध्ये लताबाईंशी काही वाद झाले आणि त्यानंतर लताबाईंनी त्यांच्यासाठी गाणे थांबवले. मला वाटतं १९६० च्या नंतर अण्णांची कारकिर्द संपली ती संपलीच.

त्यानंतर १९६४ मध्ये त्यांना अजून एक संधी मिळाली आणि त्यांनी तिचे सोने केले. कवि प्रदीप यांनी लिहीलेलं आणि लताबाईंनी गायलेलं ’ऐ मेरे वतन के लोगो..’ हे अविस्मरणीय गीत अण्णांच्या संगीताने सजलेलं होतं. सतत काहीतरी नवे करण्याच्या शोधात, प्रयत्नात असलेला हा मनस्वी संगीतकार.

सादर प्रणाम !

सुनील's picture

12 Jun 2015 - 11:48 am | सुनील

१९६० च्या नंतर अण्णांची कारकिर्द संपली ती संपलीच

बॉलिवूडबद्दल बोलत असाल तर होय.

परंतु, माझ्या माहितीनुसार, ८०-९० च्या दशकात त्यांनी कुसुमाग्रजांच्या काही कवितांना चाली लावून, अल्बम काढला होता.

चुकलामाकला's picture

12 Jun 2015 - 1:11 pm | चुकलामाकला

विशाल भाऊ, सुंदर !

विशाल कुलकर्णी's picture

12 Jun 2015 - 10:30 am | विशाल कुलकर्णी

काही दिवसांपूर्वी म्हणजे १ मे २०१५ च्या लोकसत्ताच्या अंकात एक लेख आला होता. संगीतकार आणि गायक यांच्यातील दुरावे असा काहीसा विषय होता लेखाचा. त्यामुळे त्यावेळी तो लेख मी कॉपी करुन ठेवला होता. मिपा संपादकांची हरकत नसेल असे गृहीत धरून त्या लेखातील अण्णा चितळकर आणि लताबाईंच्या दुराव्याचा किस्सा इथे कॉपी-पेस्ट करतोय. जर हे मिपाच्या धोरणात बसत नसेल तर कृपया उडवून टाकावे. त्यासाठी आगाऊ क्षमस्व !

सी. रामचंद्र - लता मंगेशकर
संगीतकार सी. रामचंद्र यांनी लतादिदींकडून अनेक अवीट गोडींची गाणी गाऊन घेतली. अनारकली, अलबेला, यास्मिन, आझाद, अमरदीप, बारिश, देवता इ. अनेक चित्रपटांत सदाबहार (लताची) गीते केवळ अविस्मरणीय! लताचा उदय होण्यापूर्वी अण्णासाहेबांनी ललिता देवलकर, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम, सुरैया यांच्याकडून त्यांच्या नदिया के पार, पतंगा, नमूना, शहनाई, खिडकी इ.इ. चित्रपटांतील गीते गाऊन घेतली. पण लताशी त्यांचे टय़ुनिंग झाल्यावर त्यांनी वरील सर्वाना बाजूला केले (त्यांना एकदा शमशाद बेगमने ''क्या अण्णासाहब, आप तो हमें भूल ही गये'' असे म्हटले होते.) व्ही. शांताराम यांच्या 'नवरंग'पर्यंत हे टय़ुनिंग झकास होते, पण पुढे दोघांचे इगो आडवे आले. अण्णासाहेबांनी 'लता केवळ एक गोड गळय़ाचा टेप रेकॉर्डर' अशी तिची संभावना केली व त्यांच्या सर्व हीट-सुपरहिट गाण्यांचे श्रेय स्वत: घेतले. यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन मोठा दुरावा निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी लताला वगळून नवरंगपासून बहुतांशी आशा भोसले (व सुमन कल्याणपूर) यांना गाणी दिली. त्यातील निवडक अशी!
* 'तुम मेरे मैं तेरी', 'तुम सैंया गुलाबी फूल', 'आ दिल से दिल मिला ले' इ.इ.
(सर्व नवरंग (१९५९), गीतकार भरत व्यास/ संध्या
* 'गा रही है जिंदगी हर तरफ बहार है' (आशा + महेंद्र कपूर)
(चित्रपट:- आँचल, गीतकार- प्रदीप) सुरेश कुमार + बेबी नंदा
* 'मेरे जीवन में किरन बन के आने वाले'- (आशा + मन्ना डे)
(चित्रपट:- तलाक, गीतकार- प्रदीप/ राजेंद्रकुमार- कामिनी कदम )
* आजा रे आजा. (सरहद) (सुचित्रा सेन) (मजरूह सुलतान पुरी)
राजकमलच्या 'स्त्री' (१९६१) या चित्रपटात व्ही. शांताराम यांच्या मध्यस्थीमुळे अण्णासाहेब व लता पुन्हा एकत्र आले व अर्थात 'ओ निर्दयी प्रीतम' 'आज मधुवातास डोले (मन्ना डे) बरोबर इ.इ. अशी अवीट गोडीची गाणी दिली. बहुरानी (१९६३) मध्ये 'मैं जागू तुम सो जाओ', 'बलमा अनाडी मन भाये' इ. सुमधुर गाणी दिली. बहुरानी १९६३ मध्ये आला (प्रदर्शित झाला), पण ही गाणी १९६० पूर्वीच रेकॉर्ड झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. १९६२च्या चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवरचे 'ऐ मेरे वतन के लोगों (कवी प्रदीप)' या ऐतिहासिक गीतानंतर सी. रामचंद्र व लताजी पुन्हा कधी एकत्र आले नाहीत व सी. रामचंद्र यांच्या संगीतातील जादू ओसरत चालली होती. या सर्व दुराव्यानंतर अण्णासाहेबांची कारकीर्द संपुष्टात आली.

सिरुसेरि's picture

12 Jun 2015 - 12:08 pm | सिरुसेरि

सी. रामचंद्र यांनी काही गाणी स्वताच्या आवाजात गायली आहेत . चितळकर या नावाने . आझाद मधील 'कितना हसीन है मौसम' या गाण्यामधे त्यांच्या आवाजात बरेचदा तलतशी साम्य वाटते . विशेष करुन 'साथी है खुबसुरत , यह मौसमकोभी खबर है' या ओळीत .

चुकलामाकला's picture

12 Jun 2015 - 1:10 pm | चुकलामाकला

शिरीष कणेकरांनी सांगितलेला एक किस्सा,
‘अलबेला’मधलं लता व सी. रामचंद्र यांचे धीरेसे आजा री अखियन में हे द्वंदगीत ऐकून बडे गुलाम अली खान विलक्षण खूश झाले. ते म्हणाले, ‘क्या बढिया धून बनायी है. लेकिन लता के साथ वो बेसुरा कौन गाता है?’

एस's picture

12 Jun 2015 - 3:04 pm | एस

छान माहिती!

पैसा's picture

18 Jun 2015 - 10:24 am | पैसा

छान आठवणी.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2015 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा

सुरेख लेख

चौकटराजा's picture

19 Jun 2015 - 3:43 pm | चौकटराजा

सी रामचंद्र उर्फ चितलकर हे एक अजब रसायन.मला वाटते त्यांच्या सारखा त्यांच्या जमान्यात अष्टपैलू संगीतकार झालाच नाही. सामाजिक, पोषाखी, ऐतिहासिक विनोदी कसाही सिनेमा असो. त्यात गोडवा हवाच हा आग्रह त्यांचा ओपींप्रमाणे असायचा. अर्थात आण्णा ओपी पेक्षा अधिक चौफेर.
काही किस्से अण्णासाहेबांविषयक-
नौशाद यानीच त्यांचे नाव आजाद साठी सुचविले कारण निर्मात्याना गीते चटकन करून हवी होती. नौशाद यांची पद्धत वेळखाउ असल्याने सी रामचंद यांचे नाव आले. असे म्हणतात की त्यानी एका रात्रीत सर्व गीतांच्या चाली लावल्या.

सी रामचंद्र हे चितलकर या नावाने लता मंगेशकर ( आनंद घन नव्हे) यांच्या संगीत निर्देशनाखाली एक गीत गायल्याचे आठवते. तो मराठी चित्रपट म्हणजे राम राम पाव्हणं.

सी रामचंद्र याना गरबा गीतानी प्रभावित केल्याचे दिसते. खेमटा हा त्यांच्या आवडता ठेका असावा. शाम ढले खिडकी तले, गा रही है जिंदगी ( महेंद्र आशा) ही गीते या तालात आहेत.

मराठीतही त्यानी काही प्रमाणात काम केले आहे. जिवाच्या सखीला कितीदा पुकारू हे धनंजय या चित्रपटातील गीत , नंदराणी तुला गातसे हल्लरू हे आंगाई गीत ( लता) नंबर फिफटीफोर) ( मूळ चाल टकिला ) मुंगी उडाली आकाशी ( आशा) हवे तुझे दर्शन मजला ( गायक चितलकर ) इ काम मराठीतही आहे.

एकदा साप्ताहिक रसरंग मधे असा उल्लेख एकाने केला की रामचंद्र याना लता या आवाजने पार घेरून टाकले होते. झाले.
अण्णा चा एक अभ्यासक खवळला .त्याने पुढच्याच अंकात एक यादी प्रसिदद्ध केली . विषय - सी रामचंद्र व त्यानी वापरलेले गायक गायिका .त्यात एकूण ६५ ( तब्बल ६५ गायकांचा उल्लेख होता ).